आवडलेले काही... ३

परत एकदा दुर्गाबाई

काही दिवसांपूर्वी दुर्गाबाईंचे 'आठवले तसे' हे पुस्तक हाती आले. त्यात एका प्रकरणात दुर्गाबाईंनी त्यांच्या कॉलेज जीवनातील काही आठवणी सांगितल्या आहेत. मानवी मनाचे विविधगुणदर्शन अतिशय रोचक पद्धतीने मांडले आहे. अर्थात, लिहिणार्‍या दुर्गाबाई, त्यामुळे लेखन अगदी थेट, फारसा आडपडदा न ठेवता केलेले असे आहे. त्यातील हा भाग, वाचल्यावर... शेवटचा भाग वाचल्यावर, अंगावर आलेला काटा बराच वेळ तसाच होता.

***

आता याच फादर लोकांचे एक विदारक चित्र मी देणार आहे. १९३२ चे वर्ष असावे. मी एम. ए. चा प्रबंध लिहीत होते. सुटीच्या दिवसांतही मी कॉलेजात जाऊन लिहीत बसायची. त्या वेळी केमिस्ट्री डिपार्टमेंटचे प्रमुख आणि नुकतेच प्रिन्सिपॉल झालेले फादर सकासा अत्यवस्थ असून हॉस्पिटलमधे होते. महिन्यापूर्वीच मी झाडाखालून कॉलेजमधे येत असताना एका सरड्याने अंगावर उडी घेतली. हाताला बोचकारले. रक्त येऊ लागले. सकासांची नि माझी ओळखही नव्हती. पण ते मागून येत होते. त्यांनी ते पाहिले. ममतेने जवळ येऊन त्यांनी हात धरून मला केमिस्ट्रीच्या दालनात नेले आणि कापसाने रक्त पुसून काही औषध लावले. मग हसून "आता जा मुली!" असं म्हणाले. त्यांनी माझे नावही विचारले नाही. आभार मानून मी निघाले. ते सकासा शेवटचे क्षण मोजताहेत ही वार्ता ऐकून बरे वाटेना.

माझ्या पेनमधली शाई संपली होती. शाई घेण्यासाठी मी पहिल्या मजल्यावरच्या ऑफिसमधे गेले. शाई भरली. तोच खाली दारत मोटरचा आवाज ऐकला. अशुभाने मन शंकित झाले. मी खिडकीशी उभी रहिले. फादर पॅलेशिओंनी माझ्याकडे पाहूनच 'गेले' असे सांगितले. मी उदास होऊन खाली जाणार तोच आमच्या कॉलेजचे जुने हेडक्लार्क गोम्स बाहेर आले. ते म्हणाले, "जरा थांब. तुला मौज पाहायला मिळेल. परत अशी संधी येणार नाही!" मग गंभीर, दगडी चेहरा करून त्यांनी प्रिन्सिपॉलची सही असणार्‍या नोटिसा काढून घेतल्या. त्या ऑफिसमधे ठेवल्या आणि स्तब्ध बसून राहिले.

मी आता काय होणार या बुचकळ्यात होते तोवर पॅलेशिओ (त्यांना संध्याकाळी प्रिन्सिपॉल नेमण्यात आले), फादर लॉरेन्स आणि सगळे फादर्स ऑफिसात आले. "नोटिसा काढल्या?" त्यांनी विचारले. गोम्सनी नोटिसांचे कागद समोर धरले. त्या फादर लोकांच्या चर्येवर दु:खाचा लवलेशही नव्हता. ते उत्साहात होते. क्रौर्य त्यांच्या चेहर्‍यांवर दाटले होते. हे सारेजण जणू गिरकी घेतल्याप्रमाणे वाटोळे फिरले आणि अत्यंत बेशिस्तपणे फादर सकासांच्या खोलीत शिरले. त्यांनी सकासांना सर्व युरिपियन भाषांत अभद्र शिव्या दिल्या. ते नाचले. थुंकले. फादर लॉरेन्स म्हणाले, "May his soul go to purgatory. (त्यांचा आत्मा नरकात जावो)." हा डेथडान्स (मरणनाच) पाहून मी थक्क झाले. मनात आले : मी इथे आलेच का? होय, गोम्स म्हणाले होते की, "तू जा त्यांच्यामागून, मी येतोच!" म्हणून मी सकासांच्या खोलीपाशी बाहेर जाऊन उभी राहिले होते. त्या फादर लोकांनी सकासांच्या जेवढ्या वस्तू पळवता आल्या तेवढ्या पळवल्या. नष्ट करता येतील त्या नष्ट केल्या. आरडाओरडा तर चालूच होता. हे ख्रिस्तभक्ताचे शांतिनृत्य की सैतानाचा आतंकनाच?

हे भयानक दृश्य पाहून मी हादरले. मला त्यांची किळस आली. बरे झाले सुटीचे दिवस होते म्हणून, नाहीतर हे भयनाट्य विद्यार्थ्यांना मोफत पाहायला मिळते! पण आता ते सारे लाजलज्जेच्या पलिकडे गेले होते. गोम्स शांतपणे बाहेर उभे राहिले. त्यांना पाहून ही सेना पाय आदळीत बाहेर पडली आणि निघून गेली. गोम्सनी उसासा टाकला नि खोलीला सील केले. ते म्हणाले, "असंच असतं. मी ऑफिसमधे मुद्दामच बसून राहिलो. नाहीतर त्यांनी तिथेही नासधूस केली असती. जा तू आता."

माझे पाय जड झाले. चालवेना. मी कशीबशी भिंतीला धरून खाली आले. काम तर कसले होणार? सरळ घरी गेले.

दुसर्‍या दिवशी सकासांचे दफन होणार होते. त्यांचे अंत्यदर्शन घ्यावे म्हणून मी निघाले. मला वाटले, प्रेत हॉलमधे किंवा कॉलेजच्या चॅपलमध्ये असेल. पण कळले की प्रेत झेविअर शाळेच्या चॅपलमधे ठेवले होते. अगदी एकाकी. फक्त राहवेना म्हणून म्हातारा गोम्स रात्रभर जवळ बसून होता. एरवी ख्रिस्ती लोकांत अशा वेळी death watch चे- मृतावरच्या पहार्‍याचे- स्तोम किती माजवले जाते ते ख्रिस्ती वस्तीतल्या खोताच्या वाडीत राहून मला चांगलेच माहीत झाले होते. शिवाय वर समजले ते हे की, सकासांचे भूत येईल म्हणून सारे फादर लोक घाबरले होते. कोणी प्रेताजवळ बसायला तयार होईना. म्हणून कॉलेजातून प्रेत हलवले गेले. ऐकून मन उदास झाले. मी झेविअर शालेत जायचे ठरवले. इतक्यात रोझ जॅकोबेथ ही सकासांच्या हाताखाली बी. एस. सी. करणारी ज्यू मुलगी ओक्साबोक्शी रडत तिथे आली. तिच्याबद्दल व फादरबद्दल लोक बोलत. तेवढ्यात फादर लॉरेन्स आले नि तिला पाहून हसत कुचेष्टेने म्हणाले, "I am glad, that devil Father of yours is dead. May his soul go to hell." हे शब्द मलाही वज्राघातासारखे वाटले, मग तिला तर काय? अगदी असहाय्य होऊन ती तोंड झाकून रडू लागली. सारे जण तमाशा बघत होते उभे होते. पण कोणी काही बोलेना. फादर लॉरेन्सकडे बघत मी तिच्याभोवती हाताचा विळखा घातला. ते तुच्छतेने हसून निघून गेले. मग तिला हाती धरून मी झेविअर शाळेत जिथे प्रेत ठेवले होते तिथे गेले. फक्त स्निग्ध नि शांत तिथल्या मेणबत्त्याच होत्या. मृताबद्दलचा ओलावा कुठेच नव्हता. मला वाटले होते, इथे कुणी प्रार्थना करीत असतील. मुक्याने तरी. पण तसे काही या धर्मगुरूच्या प्रेताजवळ नव्हते.

जॅकोबेथ कोसळून खाली बसली. तिच्याकडे बघत जो तो बाहेर जाऊ लागला. मी दर्शन घेतले. जरा थांबले. जॅकोबेथला 'चल' म्हटले. ती येईना तेव्हा मी तिला तिथेच सोडून उदास होऊन बाहेर पडले. माझ्याही मनात सकासा नव्हतेच. फक्त भीषण विडंबन थैमान घालीत होते. क्रौर्य एवढे सर्वसंचारी असते का? धर्म, माणूसकी, श्रद्धा एका क्षणात भीषण क्रौर्य कोलमडून पाडू शकते?

किती वर्षे मग ती हुकलेली माणुसकी शोधीत आपण भटकत राहतो. पण तिची चर्या बदलते ती बदलतेच.

- 'कॉलेजातले काही किस्से', आठवले तसे, दुर्गा भागवत, वरदा बुक्स.

field_vote: 
3.75
Your rating: None Average: 3.8 (4 votes)

प्रतिक्रिया

दोन-तीन महिन्यांपूर्वी वाचले हे पुस्तक. अर्थातच आवडले. पुस्तकविश्ववर पुस्तककोड्यात यातील दोन उतारे दिले होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"आठवले तसे" हे काही दुर्गाबाईंच्या एकंदर लौकिकाला साजेसं पुस्तक नव्हे. इरावती कर्वे, शेजवलकर, आळतेकर , घुर्ये इत्यादिंवर अभ्यासातल्या मतभेदाच्या संदर्भातली नव्हेत तर व्यक्तिगत लांच्छनास्पद मजकूराने बरबटलेली प्रकरणे. एवढे एक पुस्तक लिहिले नसते तरी चालले असते असं मला वाटलं.

अन्यत्रही अशा स्वरूपाचं मत लोकांनी मांडलेलं आहे : दुवा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

दुर्गाबाईंचे हे लेखन एकांगी आहे, असे वाचतांना वाटत राहीले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दुर्गाबाईंचे जे काही थोडेफार वाचले आहे, त्यात बर्‍याच वेळा असे वाटते. विशेषकरुन "ऐसपैस गप्पां"मध्ये असे वाटत राहते. मला वाटते रोखठोक आणि भीडबाड न बाळगता बोलण्याच्या एकंदर थाटामुळे तसे वाटत असावे. फार वाचन आणि अभ्यास नसल्याने, मला असे वाटते एवढेच म्हणतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिकांचा व्यासंग व एकूण प्रकटन उत्तमच

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

हा धागा निसटला होता!
मनोबा आभार!

कोणतीही पाश्वभूमी न घेताही वाचून अंगावर काटा आला. पुस्तक वाचलेच पाहिजे! Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ही काय भानगड आहे? हे सगळं व्यक्तिगत रोषामधून घडलं, का "मरणनाच" वगैरे त्या पंथाची एक परंपरा आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

बादवे - भाग १ आणि २ कुठे आहेत? कोणी लिंकवू शकेल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.