पॅटर्न्स आणि ज्योतिष : एक शक्यता ?
नुकताच व्यवस्थापकीय प्रशिक्षणाचा, कंपनीने आखलेला (कंपनीचे पैसे खर्च करून) 'उद्याचे नेतृत्व (Tomorrows Leadership)' हा एक अभ्यासक्रम पूर्ण केला. फारच माहितीवर्धक आणि ज्ञानप्रबोधक असा अभ्यासक्रम होता. एकंदरीत कंपनीतील बर्याच नवीनं सहकार्यांची भेट होऊन त्यानिमीत्ताने नवीनं मित्र झाले आणि 'नेटवर्किंग' ह्या कॉर्पोरेट जगतातील एका पर्वाला सुरुवात झाली. असो मुद्दा तो नाही.
ह्या अभ्यासक्रमात एक महत्त्वाचा भाग होता तो म्हणजे एखाद्याचे 'Organizational Behavior' ओळखणे. त्यातून त्याचा 'नेतृत्वगुण गुणांक' आणि 'नेतृत्वशैली' पडताळणे. त्यासाठी त्या प्रशिक्षण देणार्या कंपनीने एक 'डिस्क (DISC) प्रोफाइल' नावाची एक प्रश्नमंजूषा असलेली संगणकप्रणाली तयार केली होती. त्या संगणकप्रणालीत, काम करताना, कामाच्या ठिकाणी उद्भवणार्या वेगेवेगळ्या परिस्थिती, त्यावेळी उद्भवणारे कलह व ते हाताळण्याची पद्धत, कंपनीतील सहकार्यांशी आणि सीनियर मॅनेजर्स बरोबर केली जाणारी आपली वागणूक अश्या बर्याच विषयांवर, त्या त्या परिस्थितीत तुम्ही आहात असे समजून आणि त्यावेळी कसे वागाल आणि कसे वागणार नाही ह्याची उत्तरे त्या प्रश्नमंजुषेत द्यायची होती. ही प्रश्नमंजूषा ऑब्जेक्टीव्ह प्रकाराची होती. कसे वागाल आणि कसे वागणार नाही ह्यासाठी प्रत्येकी फक्त एक पर्याय सिलेक्ट करायचा. हा, थांबा, तुम्हाला वाटते तेवढी ती प्रश्नमंजूषा सोपी अजिबात नव्हती. कसे वागाल आणि कसे वागणार नाही ह्या उत्तरांच्या पर्यायांमध्ये एक अतिशय थिन लाइन होती. उत्तरे द्यायची अट एकच होती, नैसर्गिकरीत्या जसे वागाल तसाच विचार करून पर्याय निवडायचे, तार्किकदृष्ट्या समर्पक उत्तर काय असेल ते विचार करून पर्याय निवडायचा नाही. पण ते पर्याय असे खत्रुड होते की नैसर्गिक उबळ येऊनच पर्याय निवडला जायचा. खूप विचारपूर्वक ती प्रश्नमंजूषा तयार केल्याचे जाणवत होते. त्यामुळे मग जरा सीरियस होऊन उत्तरे दिली. त्यानंतर १-२ दिवसांनी त्याचा निकाल लागून प्रत्येकाचे डिस्क (DISC) प्रोफाइल कळणार होते. D - Dominance, I - Influence, S - Steadiness आणि C – Conscientiousness ह्यावर आधारित ते प्रोफाइल असणार होते.
त्या निकालाचे एक ईमेल १-२ दिवसांनी आले, पण मुख्य कामात व्यस्त असल्याने त्याकडे लक्ष देण्यास वेळ मिळाला नाही. प्रशिक्षणाच्या पुढच्या कार्यशाळेत गेल्यावर सर्वांची चर्चा चालू होती आपापल्या डिस्क प्रोफाइलवर. एक नवीनच झालेला बंगाली मित्र, पार्था, एकदम उत्साहात माझ्याजवळ आला आणि माझे प्रोफाइल काय आले ते विचारू लागला. माझी एकदम फाफलली कारण मी ते मेल बघितलेच नव्हते. त्याला तसे सांगितल्यावर, “अरे, मेल चेक कर ना बाबा” असे म्हणत माझ्या मागेच उभा राहिला. माझ्यापेक्षा जास्त उत्साहाने तो माझे प्रोफाइल बघण्यासाठी का बरे उतावीळ झाला आहे ते मला कळेना. त्याला तसे विचारल्यावर एकदम जोरात म्हणाला, “अनबिलीव्हेबल! स्साला, उस प्रोफाइल मे एकदम कुंडली लिखा है यार हर एक का”. च्यायला, हे बंगाली सगळेच काळ्या जादूच्या प्रभावाखाली असतात की काय असा विचार चमकून गेला आणि त्यावर हसत हसत मी माझे प्रोफाइल उघडले आणि माझी मतीच गुंग झाली. अगदी आरशात प्रतिबिंब दाखवावे तसे त्या प्रोफाइलमध्ये माझे सर्व 'गुण' उधळलेले होते. माझी निर्णयक्षमता, नेतृत्वशैली, वागणूक, conflict management style, pressure handling capacity अशा अनेक पैलूंवर प्रत्येकी अर्धे पान असे विवेचन होते. अगदी कुंडलीत जसे ग्रहमान मांडलेले असते अगदी तसेच, वेगवेगळ्या आलेखांसकट, तंतोतंत खरे. मी चाटच पडलो. त्या प्रशिक्षण देणार्या बाबाला (हो, त्याला आता 'बाबा' म्हणणेच भाग होते) पकडून हे असे कसे काय होऊ शकते ते विचारले. त्याने मग वेगवेगळे १५-२० डिस्क पॅटर्न्स आहेत आणि आम्ही दिलेल्या उत्तरांच्या आधारे (ठराविक निर्णयक्षमतेमुळे) आम्ही कोणत्या पॅटर्न्स मध्ये मोडतो ते ठरवले जाते असे सांगितले. हे सर्व मी अतिशय सोप्या भाषेत आता इथे सांगतोय प्रत्यक्षात त्याने खूपच क्लिष्ट आणि तांत्रिक भाषेत ते समजावून सांगितले. पण मुख्य गाभा हाच की 'पॅटर्न्स'.
ती कार्यशाळा संपल्यावर बसने घरी येता येता ह्या पॅटर्न्स वर विचार करायला वेळ मिळाला. प्रत्येक क्षेत्रात हे पॅटर्न्स असतात. स्थापत्यशास्त्रात आर्किटेक्चरशी निगडित अनेक पॅटर्न्स आहेत त्यांच्याद्वारे मोठ्या मोठ्या गगनचुंबी इमारती बांधताना त्यांची फार मदत होते. संगणक प्रणाली तयार करताना 'पॅटर्न्स' हा एक बझवर्ड झालेला आहे. डिझाइन पॅटर्न्स, सॉफ्टवेअर अर्किटेक्चरल पॅटर्न्स, UI पॅटर्न्स असे शेकड्याने पॅटर्न्स आहेत. तर हे पॅटर्न्स म्हणजे काय? तर आमच्या संगणक क्षेत्रात त्याला 'In software engineering, a design pattern is a general reusable solution to a commonly occurring problem within a given context' असे म्हटले जाते. तर विकिपीडियानुसार पॅटर्न म्हणजे, Pattern is a type of theme of recurring events or objects. The elements of a pattern repeat in a predictable manner. Patterns can be based on a template or model which generates pattern elements, especially if the elements have enough in common for the underlying pattern to be inferred, in which case the things are said to exhibit the unique pattern.
मग अचानक मनामध्ये एक विचार चमकला की जर सर्व क्षेत्रात ह्या पॅटर्न्स नुसार प्रॉब्लेम्सवर सोल्युशन्स शोधता येऊ शकतात तर आपल्या पूर्वजांनी ह्याच पॅटर्न्स च्या आधारे ज्योतिषशास्त्र विकसित केले नसेल कशावरून? म्हणजे बघा. आपली प्राचीन संस्कृती हजारो वर्षे जुनी आहे. आणि त्या काळात खगोलशास्त्रही विकसित झालेले होते. मानवाला मी कोण? आणि माझे ह्या ब्रह्मांडाशी नाते काय? हे प्रश्न पडून त्याचे उत्तरे मिळवणे त्या काळापासूनच चालू झालेले आहे. अवकाशाचे, तार्यांचे, ग्रहांचे निरीक्षण करून त्याच्या नोंदी घेणे त्यावेळेपासूनच सुरू झाले असणार. त्या ओघातच पुढे वेगवेगळ्या ग्रहांच्या स्थिती आणि त्याचे मानवजातींवर होणारे परिणाम यांच्याही नोंदी ठेवणे सुरू झाले असावे. आता ह्या नोंदी घेणे आणि जपून ठेवणे वर्षानुवर्षे (शेकडो) चालले असणार. त्यामुळे त्यातले पॅटर्न्स ओळखणे कठीण नाही. मग पुढे त्या पॅटर्न्स च्या नोंदी घेणे चालू होऊन त्यांतूनच पुढे ठोकताळे बांधणार्या होराशास्त्राचा जन्म झाला असावा. पुढे ह्या नोंदींचे प्रमाण वाढले जाऊन आणि त्यानुसार बांधण्यात आलेले होरे खरे होण्याचे प्रमाण वाढून त्यांतूनच ज्योतिषशास्त्राचा जन्म झाला असावा का?
त्याही पुढे, सर्व विश्वाची उत्पत्ती ही 'बिग बॅंग' ने झाली. त्यापासूनच हे चराचर निर्माण झाले. सर्व विश्व एका अनामिक शक्तीने एकत्र बांधलेले आहे. एक विशिष्ट परस्परसंबंध आणि एक तोल आहे ह्या सर्व ग्रह-तार्यांचा एकमेकांबरोबर. ते एकमेकांवर परिणाम करू शकतात. मग आपणही ह्याच 'बिग बॅंग' ची निर्मिती आहोत तर मग त्यांचा आपल्यावर परिणाम होणे का शक्य नाही? किंवा जो एक ताळमेळ ह्या ग्रह-तार्यांचा एकमेकांशी आहे आणि त्यामुळे हा विश्वाचा डोलारा उभा आहे, आपणही का त्याचा भाग नाही? किंवा त्या ताळमेळाशी आपला का संबंध असू नये?
जर ज्योतिषशास्त्राकडे, पॅटर्न्स आणि आपणही ह्या 'बिग बॅंग' ची निर्मिती आणि पर्यायाने ब्रह्मांडाचा एक पूरक भाग ह्या अँगलने जर बघितले तर ज्योतिषशास्त्र फक्त एक थोतांड आहे 'न मानण्यास' वाव असू शकतो. मी काही ह्या विषयातला जाणकार नाही. काहीतरी विचार मनात आले, जे विस्कळीत असण्याची शक्यताच जास्त आहे. पण जाणकारांनी ह्यावर आपापली मते व्यक्त केली तर चर्चा घडून ज्ञानात भर पडावी हाच हेतू आहे ह्या लेखामागे.
किंवा, पर्यायाने, हा 'डिस्क'
किंवा, पर्यायाने, हा 'डिस्क' प्रकार हाही एक थोतांड आहे, असे 'मानण्यास'ही वाव असू शकतो.
सहमतीपलिकडे मत नाही.
अशा अर्थाने 'बिग बँग' (मायमराठीत महास्फोट) आणि ग्रह-तार्यांचा संबंध लावणं अंमळ मजेशीर आहे. मंगळावरून याच आकाशात पाहिलं तरी हे ग्रह-तारे थोडे वेगळे दिसतील, तर बाकीचं विश्वरचनाशास्त्र कुठे घेऊन बसलात राव!
बरं असं खरोखरच असेल तर जुळ्यांची आयुष्यही एवढी वेगवेगळी का असतात? कसलं फलज्योतिष आणि कसले पॅटर्न्स?
जाणकारांनी ह्यावर आपापली मते
जाणकारांनी ह्यावर आपापली मते व्यक्त केली तर चर्चा घडून ज्ञानात भर पडावी हाच हेतू आहे ह्या लेखामागे
हेतू चांगला आहे पण या क्षेत्रात कोणी 'जाणकार' असायची गरज असते असे वाटत नाही. उद्या तुम्ही-मी देखील चार कुंडल्या बघुन चार भविष्ये वर्तवली तर धादांतवादाने त्यातली काही बरोबर येतील तर काही चुकतील. जर तुम्ही/मी बरोबर आलेल्या (तथाकथित) भविष्याचे उत्तम मार्केटिंग करू शकलात तर तुम्ही/मी सुद्धा झालो जाणकार ;)
असो. गमतीचा भाग सोडला तरी, या विषयावर आता बर्यापैकी ठाम झालेली मते असल्याने पुनर्विचारास स्कोप फारच कमी दिसतो. क्षमस्व!
छान
उत्तम रे ब्रिजेशा.ज्योतिषामागे काही विज्ञान आहे की नाही ठावूक नाही पण जी काही राशींबद्दल निरिक्षणे असतात त्यामागे पॅटर्न्स असणारच असे मलाही वाटते.डिझाईन पॅटर्न्स वाले तुझे ते एरिक गामा काय म्हणतात ते पहायला हवे.माणसांबद्दलची निरिक्षणे नोंदवून तसे काही ठोकताळे मांडले असावेत आपल्या पूर्वजांनी.
(ग्रह पाहूनच कधी कधी निर्णय घेणारी) रमाबाई
कशाचे ठोकताळे?
अगदि अगदि ढोबळ मानानं सांगायचं झालं तर सोकोबांनी दिलेली टेस्ट म्हणजे ह्या धर्तीवरचं निरिक्षण असू शकतं:-
"एखाद्यानं अनावधानानंही चूक केल्यावर हा माणूस रागावतो. चूक प्रथमच झाली असेल, अनवधानानं झाली ह्यास तो महत्व देत नाही असे दिसते. तस्मात् हा माणूस थोडा रागीट आहे."
म्हणजे, त्याच माणसाची एका ठिकाणची कृती किंवा त्याच माणसाचे एखाद्या घटनेबद्दलचे विचार ऐकल्यावर तो माणूस स्वभावाने कसा ह्याचा तर्क लावता येतो.
इथं निरिक्षण कुठल्या ऑब्जेक्टचं होतं? सोकोबांचं.
स्वभावबद्दलचे तर्क कुणाबद्दल वर्तवले गेलेत ? सोकोबांच्या.
आता सांगा, सोकोबा मुंबैत रागावतात तेव्हा नासकीवाडीमधील शिरपतरावांच्या बैलाला बुळकांड्या लागतात असा पॅटर्न कुणी शोधलाय का? तसला तर्क कुणी लावलाय का? थट्टा म्हणून नाही; एक उदाहरण देतो ते लक्षात घ्या.
शिरपतराव, गणपतराव, बाळंभट अशा नासक्यावाडीतील सर्व ग्रामस्थांच्या बैलांच्या रोगाचा अभ्यासच करायचा ठरवला आणि त्याचा त्याचा सोकोबांच्या अगदि व्हिस्की,रम पिण्याशीच प्याटर्न शोधायचा म्हटला तर अशक्य नाही. कुठे ना कुठे एक प्याटर्न नक्कीच सापडेल.
म्हणजे असं बघा:- सोकोबांनी जेव्हा पारले ऐवजी ब्रिटानियाची बिस्किटे खाल्ली तेव्हा इतर कुणास काही झाले नाही, पण म्हाद्याची गाय कालावधी; बरोब्बर तीन ते चार महिन्याच्या कालावधीत. म्हणजे सोकोबांचे बिस्किट हे गाय व्याण्याचे pre indicator आहे. असा तर्क निघू शकतो.
अशा गोष्टींना तर्कशास्त्रात fuzzy pattern म्हणतात म्हणे. असे का घडते?
इथं निरिक्षण कुठल्या ऑब्जेक्टचं होतं? सोकोबांचं.
निरिक्षणे/तर्क कुणाबद्दल वर्तवले गेलेत ? नासक्यावाडीतल्या पशूंचे.
ज्योतिषात काय होतं?
निरिक्षण कुठल्या ऑब्जेक्टचं होतं? :- खगोलीय व काल्पनिक वस्तू
भविष्य्/स्वभाव जाणण्याचे दावे कुणाचे केले जातात? :- व्यक्तींचे
बिंग बँगपूर्वी जग जोडले गेले होते, ह्या बिंदूपासून पुढे अनेक ठिकाणी स्यूडोसायन्स जन्म घेते. कथा, मिथके रचली जातात.
मुद्दाम रचली जातात असे नव्हे, काही बारीकसे तर्क आपल्याला तिकडे घेउन जातात. सगळेच बरोबर असतील असे नाही.
पत्रिका, ज्योतिष ह्याबद्दल ज्याला जे हवे ते करायचे स्वातंत्र्य आहेच, किंवा काहीही वाचण्यापूर्वी बहुतांश सर्वच जण आपली भूमिका घट्ट पकडूनच वाचायला बसणार हे सत्य आहे. प्रथमपासूनच ज्यांचा विश्वास आहे, त्यांनी तो कायम ठेवण्यास हरकत नाही, माझी हरकत असेल तरीही ती फाट्यावर मारत ते ठेवणार आहेतच, फक्त वरील तर्कानुसार नव्याने त्या गोष्टीला जे सिरियसली घेउ शकतात, त्यांनी मी दिलेल्या तर्कावर एकदा अवश्य विचार करुन पहावा. विश्वास ठेवायचा तर सोकोबांचा तर्क बाजूला ठेउन "असे घडते,असे होते, कसे होते ते माहीत नाही" अशी भूमिका निदान प्रामाणिक म्हणता यावी.
वरती मीच म्हटल्याप्रमाणं वाद अगणित चालणार आहे, मी फक्त पुन्हा एक भूमिका करुन पाहिली इतकच.
आता पुन्हा दर्शकाच्या भूमिकेत शिरत आहे. (प्रतिसादात "मी,माझे तर्क" असले शब्द पुनः पुनः आल्याबद्दल क्षमस्व. )
बैलाला होणारा रोग
बैलाला होणारा रोग आहे हे नक्की.
"परिसर अभ्यास" की जीवशास्त्र ह्या विषयात पाचवी-सातवीत शिकलो होतो; गावाकडच्या मित्राच्या म्हणण्यानुसार बुळकांड्या मोठ्या प्रमाणात बैलाला जुलाब होणे.
विशेष्तः दुर्गंधीयुक्त. त्यावरूनच आम्ही शाखेवर असताना "ह्याला काँग्रेसी सेक्युलरतेच्या बुळकांड्या लागल्यात" असे एखाद्या पुरेशा कट्टर नसलेल्या सदस्यास म्हणत असू.
मनोबा, उदाहरणे विचार करायला
मनोबा,
उदाहरणे विचार करायला लावणारी आहेत, पण तो विचार म्हणजे 'सोकोबा मुंबैत रागावतात तेव्हा नासकीवाडीमधील शिरपतरावांच्या बैलाला बुळकांड्या लागतात' हा पॅटर्न आहे का? आणि असलाच हा पॅटर्न तर जनरालाइज (सर्वसामन्यीकरण ?) करता येण्याजोगा आहे का? म्हणजे जर हे असे वर्षानुवर्षे (शेकडो, हजारो) घडत असेल तर मान्य करता येईल की सोकोबा रागवाला की बैलाला बुळकांड्या लागतात.
- (पुणेकर व सध्या चेन्नैत राहणारा सोकोबा मुबैत रागावतो ह्यातला पॅटर्न शोधणारा) सोकाजी
तुम्ही असे आहात....
"तुम्ही असे आहात" असे म्हणून कुणाचेही ध्यान वळवून घेता येते. त्यानुसार वाटेल ते सांगता येते ह्या आशयाचा एक गविंचा धागा होता. माझ्या वाचखूणांत आहे.
ज्योतिष हा एव्हरग्रीन जालिय विषय आहे. त्यामुळे चालु द्यात.
बरीचशी माहिती खालील लिंकांवर मिळेलः-
http://mr.upakram.org/node/806
http://mr.upakram.org/node/992
http://mr.upakram.org/node/947
http://mr.upakram.org/node/945
http://mr.upakram.org/node/814
http://mr.upakram.org/node/1065
http://mr.upakram.org/node/843
http://mr.upakram.org/node/955
http://mr.upakram.org/node/991
ह्या सिरिजचा भाग नसलेला अजून एक धागा http://mr.upakram.org/node/465.
हल्ली दोन्ही सर्वसाधारणपणे तेच तेच मुद्दे येताना दिसताहेत. रंगमंचावर नवीन अभिनेत्यांनी जुनीच गाजलेली पात्रे वठवत रहावीत आणि जुन्यांनी संन्यास घ्यावा तसे काहीसे. अभिनेते गाजतात, जातात, पात्रे कायम तीच, तिथेच असतात, संवादही तेच ते बोलतात, तरीही न रहावून एक प्रतिसाद दिलाय.
आकारबंध आणि वर्गीकरण
हे डिस्क इव्हॅल्युएशन आमच्या कंपनीतही केलं होतं. त्यात अर्थातच तुमच्या स्वभावाची रूपरेखा काही प्रश्न मांडून केली जाते. मात्र याला पॅटर्न ओळखणं यापेक्षा वर्गीकरण करणं असं म्हणणं जास्त योग्य ठरेल.
एक व्हेरिएबलचं वर्गीकरण आपण बघू - त्यासाठी एक प्रश्न पुरेसा होतो.
१. तुमचं वय किती? या प्रश्नाचं सगळ्यांनी खरं उत्तर दिलंत की लगेच लोकांचं वर्गीकरण होतं. या अत्यंत साध्या वर्गीकरणावरून काही ठोकताळे बांधता येतात. कारण बहुतेक विशीतल्या लोकांची वागणूक, त्यांची ध्येयं, त्यांची विचार करण्याची पद्धती, कष्ट करण्याची क्षमता हे याच चाळिशीतल्या लोकांपेक्षा वेगळे असतात.
हेच वर्गीकरण अधिक क्लिष्ट करून बघू. त्यासाठी दुसरा प्रश्न विचारायचा.
२. तुमचं उत्पन्न किती?
आता आपल्याकडे प्रत्येक व्यक्तीसाठी दोन व्हेरिएबलची माहिती झाली. या दोन्ही व्हेरिएबल्सबरोबर काहीतरी कोरिलेशन असलेल्या गोष्टी असतात. म्हणजे उदाहरणार्थ रेस्टॉरंटवर केला जाणारा खर्च. हा डेटा अभ्यासाने मिळवता येतो. म्हणजे दरमहा एक लाख उत्पन्न असलेला विशीतला तरुण कदाचित दरमहा दहा हजार खर्च करेल, तर चाळिशीतला माणूस कदाचित सहा हजारच करेल. प्रत्यक्ष आकडे वेगळे असू शकतील, पण ज्या प्रमाणात हे कोरिलेशन लागू होतं त्या प्रमाणात तुम्हाला त्या व्यक्तीविषयी प्रेडिक्षन करता येतं. आणि त्या प्रमाणात ते लागू पडतं.
डिस्कसाठीचे प्रश्न बहुतांशी दोन व्हेरिएबलचे असतात तुम्ही लोकाभिमुख कितपत आहात की आंतर्मुख आहात हा एक पैलू आणि तुम्ही इतरांवर स्वतःचा अंमल चालवता की इतरांना स्वतःवर अंमल चालवू देता हा दुसरा पैलू. या दोन पैलूंच्या कॉंबिनेशनने किमान चार वर्ग तयार होतात. जर त्यातही बारीक तुकडे केले (खूप लोकाभिमुख, बेताचा लोकाभिमुख, बेताचा आंतर्मुख, आणि खूप आंतर्मुख) गुणिले ( खूप आक्रमक, बेताचा आक्रमक, बेताचा पॅसिव्ह, आणि खूप पॅसिव्ह) असे सोळा भाग तरी करता येतात. या दोन बाबींनी तुमची वागणूक खूप प्रमाणात ठरते. त्यामुळे जर तुम्ही खरी उत्तरं दिली असतील, आणि प्रश्न चांगले तयार केले असतील तर त्यांतून स्वभावाचे पैलू दिसणारच.
मात्र ज्या वागणुकींशी या स्वभाववैशिष्ट्याशी कोरिलेशन असतं तिथेच तुम्ही बऱ्यापैकी प्रेडिक्षन करू शकता. डिस्कवाल्या लोकांनी आत्तापर्यंत अनेकदा ही टेस्ट वापरून ही कोरिलेशनं सर्वसाधारणपणे शोधलेली आहेत. त्यामुळे तुमच्या डिस्क स्कोअरवरून तुमचा शिक्षकी पेशाकडे कल राहील की स्वतःचा धंदा काढावासा वाटेल हे साधारण ओळखता येऊ शकेल. मात्र तुमच्या मुलाचं नाव 'स' वरून सुरू होईल की 'म' वरून हे सांगता येणार नाही. आणि इथेच ज्योतिषाविषयीच्या तुमच्या कल्पना मोडून पडतात. तुमच्या स्वभावाच्या पैलूंचं तुमच्या वागणुकीशी उच्च कोरिलेशन असतं. मात्र जर तारकांच्या स्थानांचं जगातल्या घटनांविषयी कोरिलेशनच नसेल तर कितीही अभ्यास केला तरी प्रेडिक्षन काय करणार, कपाळ?
मनुष्याविषयीच्या प्रेडिक्षनांची आणखीन एक गंमत असते, ती म्हणजे लोकं साम्य शोधण्याचा प्रयत्न करतात. फोरर इफेक्ट किंवा बार्नम इफेक्ट या नावाने तो प्रसिद्ध आहे. डिस्कवाले लोक थोड्याफार कोरिलेशनबरोबर हा इफेक्ट वापरतात, तर ज्योतिषी शेकडो वर्षं बिना कोरिलेशनचे, नुसत्याच या इफेक्टवर भागवतात.
अवांतर माहिती
सहमत.
यावरून आठवले
अवांतर माहिती: मुंबई युनिव्हर्सिटि तर्फे एल्फिन्स्टन कॉलेजात दर मे महिन्याच्या सुट्टीत १०वीच्या विद्यार्थ्यांचा आयक्यु, इक्यु आणि आवड/कल या प्रकारची चाचणी नाममात्र फी भरून घेण्यात येते. त्याचे निष्कर्ष देखील बर्यापैकी सुयोग्य असतात व त्या असमंजस असणार्या वयात निश्चितच दिशादर्शक असतात हे स्वानुभवाने सांगतो. ज्यांची मुले - परिचित दहावी पास झाली आहेत किंवा यंदा दहावीला आहेत त्यांना याचा लाभ घेता यावा म्हणून ही महिती दिली
नाडी आठवली.
तुम्हालाच प्रश्न विचारून तुम्ही कसे आहात हे ओळखण्याच्या पद्धतीवरून 'नाडी' आठवली.
असो. पण हे 'ओळखणे' म्हणजे 'डिस्क'वरील विश्वास (किंवा अंध/श्रद्धा) वाढवण्यासाठी (आणि पर्यायाने त्याचे क्लँडेस्टाईन मार्केटिंग करण्यासाठी)केलेली क्लृप्ती आहे असे मला वाटते. (असे इतर कुणाला वाटते का?)
त्यापलीकडे त्याचा काय फायदा होतो? की अशा अशा स्वभावाच्या व्यक्तीने असे असे वागले असता हमखास यशस्वी नेतृत्व करता येते असेही काही ठोकताळे 'डिस्क'मध्ये आहेत? अशी काही यशस्वी नेता होण्याची रेसिपी असू शकते का?
http://www.misalpav.com/node/18754
गविंचा http://www.misalpav.com/node/18754 हा धागा ह्यासंदर्भात आठवला.
अशा स्वभावाच्या व्यक्तीने असे
अशा स्वभावाच्या व्यक्तीने असे असे वागले असता हमखास यशस्वी नेतृत्व करता येते असेही काही ठोकताळे 'डिस्क'मध्ये आहेत? अशी काही यशस्वी नेता होण्याची रेसिपी असू शकते का?
तसे नव्हे! डिस्क वरून काढलेले प्रोफाईल हा आरसा आपला आपल्यासाठी. त्यानुसार आपली वागण्याची पद्धत कोणती हे कळते. मग एखाद्या विशिष्ट परिस्थितीत आपण कसे योग्य आचरण करावे ह्याचे ठोकताळे बांधून आपण कॉर्पोरेट विश्वात परिणामकारक वावरून ठसा उमटवू शकतो...असे काहीहे...
- (फक्त कॉकटेलच्या रेसिपी माहिती असलेला) सोकाजी
गुर्जी, जबरदस्त प्रतिसाद!
गुर्जी,
जबरदस्त प्रतिसाद! मनापासून पटला आणि आवडला.
मात्र ज्या वागणुकींशी या स्वभाववैशिष्ट्याशी कोरिलेशन असतं तिथेच तुम्ही बऱ्यापैकी प्रेडिक्षन करू शकता
सहमत!
मात्र जर तारकांच्या स्थानांचं जगातल्या घटनांविषयी कोरिलेशनच नसेल तर
हीच तर गोम आहे ना, हे कोरिलेशन आहे किंवा नाही कसे सिद्ध करणार?
हीच तर गोम आहे ना, हे
हीच तर गोम आहे ना, हे कोरिलेशन आहे किंवा नाही कसे सिद्ध करणार?
माणसाचा स्वभाव, वागणं हे मानसशास्त्राच्या अभ्यासाचा भाग आहे. हे शास्त्र अगदी न्यूटनच्या नियमांंएवढं घट्ट बांधलेलं नसलं तरीही सामान्य ठोकताळे, शास्त्र व्यवस्थित काम करतं. अगदी सामान्य लोकांपासून ते विशेष गरजा (special needs) असणार्या लोकांपर्यंत! तार्यांचा अभ्यास हा खगोलशास्त्राच्या आवाक्यात येतो. तार्यांबद्दलही इत्थंभूत माहिती नसली तरी कोणत्या वेळेस कोणता तारा, ग्रह कुठे असेल हे भीतीदायक नेटकेपणाने वर्तवता येतं. तार्यांमधून कोणत्या प्रकारची ऊर्जा बाहेर पडते हे ही आपल्याला बर्यापैकी नेटकेपणे माहित आहे.
आणि या दोन शास्त्रांच्या अभ्यासाचा एकमेकांशी काहीही संबंध लागत नाही हे दोन्हींचा अभ्यास करून समजतं, समजलेलं आहे. पृथ्वी सपाट आहे ही कल्पना जशी एकेकाळी आपण (मनुष्याने) अभ्यास करून मोडीत काढली, तशी फलज्योतिषाची पाळी आलेली आहे.
ह्या प्रतिसादात
ह्या प्रतिसादात मानसशास्त्राच्या आणि तार्यांचा अभ्यास यांची सांगड घालण्याचा प्रयत्न झालेला दिसतो. म्हणजे मानसशास्त्र म्हणजे फलज्योतिष असा अर्थ निघतो आहे किंवा मी तसा घेतो आहे. पण मानसशास्त्र म्हणजे फलज्योतिष नव्हे.
या दोन शास्त्रांच्या अभ्यासाचा एकमेकांशी काहीही संबंध लागत नाही हे दोन्हींचा अभ्यास करून समजतं, समजलेलं आहे.
म्हणजे अजुनतरी हा समजंच आहे. :) हा समज त्या अभ्यासकाचा(च) किंवा त्याच्यापुरता मर्यादित असू शकतो.
पृथ्वी सपाट आहे ही कल्पना जशी एकेकाळी आपण (मनुष्याने) अभ्यास करून मोडीत काढली, तशी फलज्योतिषाची पाळी आलेली आहे.
पृथ्वी सपाट नाही हे 'सिद्ध' झाले असल्यामुळे, ती तशी आहे हा 'समज' राहिलेला नाही. फलज्योतिषाबाबतीत तसे सिद्ध झाले आहे का? तसे नसेल तर मी मुळात म्हटल्याप्रमाणे ते असू शकते असे 'समजण्यास' वाव असू शकतो.
- ('समज'दार) सोकाजी
मानसशास्त्र म्हणजे फलज्योतिष
मानसशास्त्र म्हणजे फलज्योतिष असा अर्थ निघतो आहे
मग my bad.
माझ्या दृष्टीने मानसशास्त्र हे समाजशास्त्राचा एक भाग आहे किंवा एक प्रकारचं शास्त्र आहे. मानसशास्त्राचा अभ्यास वैज्ञानिक पद्धतीने होतो, त्याचे निकाल भौतिकशास्त्र, रसायनशास्त्राप्रमाणे अगदी १००% रिप्रोड्यूसेबल नसले तरीही! फलज्योतिष हे फारतर करमणूकीचं एक साधन.
भविष्य सांगताना तुमचा स्वभाव अमुक-ढमुक आहे असंही सांगतात (म्हणे!) म्हणून मानसशास्त्राचा उल्लेख केला एवढंच.
एखाद्या प्रश्नावलीच्या
एखाद्या प्रश्नावलीच्या उत्तरांचा आधार घेऊन त्याच्या स्वभावाबद्द्ल भाष्य करणे आणि भविष्य सांगणे यात खूपच मोठी दरी आहे.
प्रत्येक व्यक्तिचं आयुष्य वेगळं असतं. पॅटर्न बघायचे झाले तर... एका प्रकारचं आयुष्य असलेली एकच व्यक्ति आहे मग दुसर्यांचे पॅटर्न पाहून या व्यक्तिबद्द्ल/त्याच्या भविष्याबद्द्ल तुम्ही कसला निष्कर्ष काढणार?
फलज्योतिष्यामध्ये अमुक ग्रहाचा/तार्याचा तुम्च्यावर आणि तुमच्या भविष्यावर असा 'परिणाम' होतो असं काही सांगतात. आता हा 'परिणाम' खूपच ढोबळ वाटतो- म्हणजे नक्की कसा होतो हा परिणाम? शास्त्राला महित नसलेल्या कुठ्च्या गूढ फोर्सनेच हा होतो म्हटलं तर शेवटी गाडी..." ते मानण्या -न मानण्यावर असतं " यावर येते. त्यामुळे फलज्योतिषाला काहीही शास्त्रीय अधार नाही हेच मला वटतं.
सोकाजीराव, काहीतरी भलतंच बोलू नका
पृथ्वी सपाट नाही हे 'सिद्ध' झाले असल्यामुळे, ती तशी आहे हा 'समज' राहिलेला नाही. फलज्योतिषाबाबतीत तसे सिद्ध झाले आहे का? तसे नसेल तर मी मुळात म्हटल्याप्रमाणे ते असू शकते असे 'समजण्यास' वाव असू शकतो.
समजण्यास वाव असणे आणि समज असणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे. पृथ्वी सपाट नाही असा समज सर्वत्र पसरलेला आहे हे जगाचं दुर्दैव. पण म्हणून पृथ्वी गोल नसून सपाट आहे असे असे 'समजण्यास' वाव आहेच आहे. किंबहुना ते सत्यच आहे असं मी मानत असेन तर? ती गोल आहे हे सिद्ध करून दाखवा पाहू. ओपन च्यालेंज तुम्हाला.
अवघड नाही
गूगलबाबाच्या जमान्यात काहीही अवघड नाही. मला काही रक्कम मिळणार असेल तर मी असे सिद्ध करु शकतो.बानु मुसा ह्यानं इस्लामच्या वैभवशाली काळात बाराशे वर्षापूर्वी फारशी साधने नसताना निव्वळ दिवस रात्रीचे निरिक्षण करुन ते सिद्ध केलं.(त्यासाठी त्याला बराच लांब प्रवासही करावा लागला; पण त्यानं अगदि पॄथ्वीचा परिघही बर्याच अचूकतेने शोधून दाखवला होता.) पुरेशा पैशांच्या आशेने मी हे wheel पुन्हा reinvent करुन दाखवू शकतो.
तुम्ही बहुधा बाद
ज्योतिष सत्य समजण्यास वाव देण्याइतकी तुमची बुद्धी उदारमतवादी नसल्यास तुम्ही बाद. मला म्हणायचं आहे, की सोकाजींनी पृथ्वी गोल असण्या वा नसण्याबद्दल उदारमतवाद दाखवलेला नाही. अशा कोत्या विचारसरणीला मी च्यालेंज दिलेलं आहे.
मला काही रक्कम मिळणार असेल तर मी असे सिद्ध करु शकतो.
म्हणजे हा दुसरं तिसरं काही नसून पैसे काढण्याचा उद्योग आहे तर! असो. काय प्रकारचा विदा घ्यावा लागेल, किती खर्च येईल याचा अंदाज दिलात तर बरं.
गूगलबाबाचा आधार घेणं म्हणजे शब्दप्रामाण्य मानणं. पाश्चात्य लोकांनी हिंदू संस्कृतीची जी बदनामी करण्याचा शतकानुशकतं प्रयत्न चालू ठेवला आहे त्या प्रयत्नांतलाच आंतरजाल व गूगल हा एक मोठा भाग आहे. तुम्हाला कदाचित चंद्रावर लोक खरोखरच गेले हेही खरं वाटत असेल.
ज्ञानाच्या बाबतीत आंतरिक अनुभूती महत्त्वाची असते. आत्तापर्यंत मला व इतरांना जे अनुभव आलेले आहेत, मला जे पॅटर्न्स दिसलेले आहेत त्यात पृथ्वी सपाट असल्याचंच दिसलेलं आहे. काही ठिकाणी थोडे चढउतार आहेत, पण सर्वसाधारणपणे सपाटच आहे.
बारा टक्के
ह्यावर एक रोचक चर्चा वाचल्याचे स्मरते, त्या चर्चेनुसार ज्योतिषाच्या अचुकतेची टक्केवारी रँडम टक्केवारीपेक्षा जास्त भरल्याचे निरीक्षण असल्यास त्यात तथ्य असू शकते हा विचार केला जाऊ शकतो, पटर्न्स म्हणजे आपणास बहूदा संख्याशास्त्र म्हणायचे आहे काय? तसे असल्यास ज्योतिष, स्टॉकमार्केट हे दोन्ही घोडे बारा टक्केच आहेत.
अवांतर - वर मानसशास्त्राबद्दल काही वाचण्यात आले, त्यावर हा संदर्भ रोचक आहे.
किंतु-परंतु
मानसशास्त्राप्रमाणे हवामानशास्त्रावरही काही शंका व्यक्त केल्या जातात. तसा लेख मागे वाचला होता. आता आठवत नाही कुठे पण दुवा मिळाला तर देईन.
मात्र हवामान किंवा मानसशास्त्र काय दोन्हीही काही ठोस वैज्ञानिक तथ्यांवर आधारित आणि सतत नवनवीन तथ्ये शोधत प्रगती करणार्या शाखा (शास्त्र नाही म्हणत बस्स? ;)) आहेत. फलज्योतिषासोबत त्याची तुलना करता येऊ नये. (म्हणजे तुम्ही करताय असे नाही पण अनेकदा हा मुद्दा येतो) फलज्योतिषाच्या बाबतीत स्थल-काल-व्यक्ती निरपेक्ष असे (ग्रहांची स्थिती सोडल्यास) काहीच नियम नसावेत ;) आकाशातील ज्योतिंचा केवळ डोळ्याने अभ्यास करणारे पुरातन खगोलशात्रज्ञ कुठे आणि त्या आयत्या कच्च्या मालावर फलज्योतिषाचे थोतांड रचणारे कुठे! वगैरे ड्वायलाग मारता येतीलच ;)
चालू
हवामान पूर्वानुमान हे विज्ञानाचे उपयोजन आहे, मानसशास्त्र हा ठोकताळ्यांवर चालणारा अभ्यास आहे(ह.घ्या), हे ठोकताळे कदाचित ज्योतिषाच्या ठोकताळ्यांपेक्षा अधिक जास्त/कमी अभ्यास करुन बनविलेले आहेत, तसेच ते अनपेक्षित/घबाड लाभांचे/तोट्यांचे दावे करीत नाहीत त्यामुळे ते ज्योतिषाप्रमाणे चालूप्रकारातले वाटत नाहीत.
पुणे वेधशाळेचे अनुमान बघता, ते ज्योतिषालाच कन्सल्ट करत असावेत असे वाटते, पण हवामान खात्यातील तज्ञ लोकांच्या अनुसारभारतीय हवामानाचा अंदाज बांधणे दुरापास्त आहे असे दिसते.
पण सोकाजिंना अपेक्षित ज्योतिषातले पटर्न्स बहुदा कोरीलेशन संबंधित असावे, उदाहरणार्थ- बटाट्याचे भाव वर गेल्यावर टाटा मोटर्सचा भाव कमी होतो हे निरिक्षण 'य' वेळेला केल्यास एक कोरीलेशन(निगेटीव्ह/पॉझिटीव्ह) बांधता येउ शकते.
+१
पण सोकाजिंना अपेक्षित ज्योतिषातले पटर्न्स बहुदा कोरीलेशन संबंधित असावे, उदाहरणार्थ- बटाट्याचे भाव वर गेल्यावर टाटा मोटर्सचा भाव कमी होतो हे निरिक्षण 'य' वेळेला केल्यास एक कोरीलेशन(निगेटीव्ह/पॉझिटीव्ह) बांधता येउ शकते.
धन्यवाद मी!
- ('मी' 'तु' पणाची बोळवण झालेला) सोकाजी
इतर शक्यता / एक विनंती
किंवा, पर्यायाने, हा 'डिस्क' प्रकार हाही एक थोतांड आहे, असे 'मानण्यास'ही वाव असू शकतो.
असो. एक अवांतर मुद्दा:
आपले विचार काहीही असोत, परंतु सार्वजनिक मंचावर कृपया अशी विधाने शक्य तोवर टाळावीत, अशी विनंती आहे. काय आहे, की या विधानास प्रांतीयतेचा वास असून (यात कदाचित तथ्य असू शकेलही.) राष्ट्रीय एकात्मतेस ते घातक आहे (याबाबत किंचित साशंक आहे. म्हणजे, काऊच्या शापाने cow मरण्याइतकी भारताची राष्ट्रीय एकात्मता लेचीपेची असावी, असे वाटत नाही - चूभूद्याघ्या.), असा दावा केला जाऊ शकतो. त्यापुढे, अशा विधानांच्या प्रकाशनामुळे प्रस्तुत संकेतस्थळाच्या व्यवस्थापनावर त्यात सहभागाचे आणि त्यास नैतिक पाठिंब्याचे, तसेच प्रांतीयवादी धोरणाचे आरोप होऊन नाह्क त्यांस फौजदारी गुन्ह्यात अडकवले जाण्याची शक्यताही निर्माण होते.
एखाद्या संकेतस्थळावर लिहिणे हे त्या संकेतस्थळाचे मीठ खाण्याशी तुलना करता येण्यासारखे अजिबात नसले, तरी आपण ज्या संस्थळावर लिहीत आहोत, त्यावर आपल्या लिखाणामुळे एखादे वैधानिक संकट यावे, असा आपला उद्देश खचितच नसावा, आणि अजाणतेपणाने, शक्य परिणामांबद्दल अनभिज्ञतेपोटीच आपण असे विधान केले असावे, अशी मला खात्री आहे. आणि म्हणूनच, केवळ नव्याने लक्षात आलेली ही शक्यता आपल्याही लक्षात आणून देण्याच्या उद्देशाने आपणांस ही कळकळीची विनंती करीत आहे.
गैरसमज नसावा, अशी आशा आहे. आभार.
(अतिअवांतरः
वकिलांच्या संदर्भातील एक विनोद असाच आठवला, तो येथे देण्याचा मोह आवरत नाही.
एकदा काय होते, एक गावोगाव फिरणारा वकील (traveling lawyer) असतो. फिरतीवर असताना वाटेवरच्या एका ठराविक सराईमध्ये (inn अशा अर्थी) उतरण्याचा त्याचा प्रघात असतो. वारंवार त्या सराईत त्याचे उतरणे असते.
एकदा काय होते, सराईच्या मालकाची मुलगी गरोदर राहते. चौकशीअंती, यास आपले वकीलमहोदय जबाबदार आहेत, असे सराईमालकास निष्पन्न होते. लागलीच आपली बंदूक काढून मालकमजकूर वकीलमहोदयांपाशी जातात, आणि त्यांना धमकावतात, "आत्ताच्या आत्ता येथून चालता हो, आपले तोंड काळे कर आणि पुन्हा आयुष्यात ते मला दाखवू नकोस. नाहीतर गोळी घालीन." वकीलमहोदय घाबरून पोबारा करतात.
मालकमजकुरांच्या मित्रमंडळात याची यथावकाश वार्ता होते, तेव्हा ते आश्चर्य व्यक्त करतात. "अरे, नाहीतरी तू बंदुकीचा धाक दाखवतच होतास, आणि एवीतेवी या गृहस्थापासून तुझ्या मुलीला दिवस गेलेले आहेत, तर मग तू त्यास तिच्याशी लग्न करावयास भाग पाडावयाचे सोडून त्यास हाकलून का दिलेस?"
मालकमजकुरांचे उत्तर मोठे बाणेदार - आणि मार्मिक - असते. "I would sooner have a bastard in my family than a lawyer in my family."
असो.)