Skip to main content

रेल्वे - भारतीय, अभारतीय, जाडी-बारीक आणि इतर

आपण अमेरिकेत राहतो, किंवा येऊन गेलो आहोत, याचा उल्लेख केल्याशिवाय थोर मराठी लेखन अपूर्ण राहतं. इतर कोणत्या परदेशात गेला असलात तर तेही जाहीर करून टाकावं; म्हणजे लेखनाला वजन येतं. तर मी सायबाच्या देशातही काही वर्षं राहिले. आणि तेव्हा कामासाठी जर्मनी, नेदरलंड्समध्येही ट्रेननं प्रवास केला.

ठाण्यात लहानाची मोठी झाल्यामुळे गावात ट्रेन असणं, घरापासून चालत जाण्याच्या अंतरावर स्टेशन असणं वगैरे प्रकार मला नॉर्मल वाटायचे. देशाटन करून, सायबाच्या देशात गेले तरीही ट्रेनचा शिरस्ता मोडला नाही. मात्र १५ मिनीटं चालत गेलं की स्टेशन याऐवजी, १५ मिनीटं सायकल हाकल्यावर स्टेशन असा फरक झाला. खेड्यात राहणं आणि शहरात राहाणं यांत फरक असायचाच. सायबाचा देश असला तरी काय झालं!

मात्र सायबाच्या देशात ट्रेन बघितली आणि "ई, केवढीशी आहे ही ट्रेन? आणि चारच डबे? सगळे लोक कसे मावणार?" असले प्रश्न माझ्या डोक्यात आले. देशाटन केल्यामुळे भारताची लोकसंख्या बरीच जास्त आहे आणि ठाण्या-मुंबईत लोकसंख्येची घनता अंमळ जास्तच आहे; या आकड्यांचं भावनिक आकलन झालं. इंग्रजीत ज्याला appreciation म्हणतात, ते; understanding निराळं.

अमेरिकेत, ऑस्टिनात, घर विकत घेताना स्टेशन जवळ असल्याचं मी बघून घेतलं होतं. शहराच्या मध्यवर्ती भागात कोर्स आणि पुढे नोकरी करताना रोज ट्रेनचा प्रवास फारच सोयीचा वाटला. रोज ट्रॅफिकमध्ये अडकण्याची भीती नाही; त्याचा ताण येत नाही; डाऊनटाऊनमध्ये गाडी लावण्यसाठी पार्किंग शोधायची गरज नाही. वर ट्रेनमध्ये बसून नियतकालिकं वाचता येतात.

ही ट्रेन पहिल्यांदा बघितली तेव्हा सायबाच्या देशातल्या लोकल ट्रेनसुद्धा मोठ्या होत्या असं वाटलं. ही ट्रेन म्हणजे मुंबईच्या लोकल ट्रेननं खेळण्यातल्या ट्रेनसोबत पोर काढलं तर कसं दिसेल, तशी वाटते. त्यातून हल्ली ट्रेनवर 'द हँडमेड्स टेल' या हुलूवरच्या मालिकेची जाहिरात दिसते. डिस्टोपिक कादंबरी‌वर आधारित मालिकेची जाहिरात ट्रेनवर दिमाखात मिरवताना दिसते, त्याचा नक्की काय अर्थ लावायचा याचा निर्णय होत नाहीये.

गाड्या, ट्रेन वगैरेंची मापं, इंजिनं, यांत मला कधीही रस नव्हता. त्यामुळे ज्या चवीचवीनं खरडफळ्यावर चर्चा सुरू आहे, त्यात मला भर घालता येणार नाही. पण एक गोष्ट लक्षात आली. रोज ट्रेन/बसनं प्रवास केला की बरंच अवांतर वाचन होतं. घरी मुद्दाम वेळ काढून वाचायला बसेनच असं नाही; घरी टीव्ही, मांजर, फोन अशा बऱ्याच गोष्टी खुणावतात. ट्रेनमध्ये बसलं, फोनचा सिग्नलही फार नसला की वाचनाशिवाय फार काही करता येत नाही.

भारत, ब्रिटन आणि अमेरिकेत सार्वजनिक वितरण व्यवस्था वापरताना आणखी एक गोष्ट लक्षात आली. अमेरिकेत बस-ट्रेन वापरणाऱ्या लोकांच्या चेहऱ्यावर बराच जास्त आत्मविश्वास असतो. तेही स्वतःचं वाहन परवडत असूनही ट्रेन-बस वापरणाऱ्यांच्या चेहऱ्यावर जरा जास्तच. मी ज्या बस/ट्रेननं प्रवास करते, त्याचं तिकीट (शहराच्या तुलनेत) सगळ्यात महाग आहे. अमेरिका जगाची मॉनिटर आहे म्हणूनच हा आत्मविश्वास असतो असं नाही; ते एक कारण असू शकतं. प्रवाहाविरोधात पोहण्यासाठी थोडं धाडस करावं लागतं; तेच कारण असेल असंही नाही. आम्ही फक्त स्वतःच्या कष्टांमुळे इथवर पोहोचलो आहोत, आता जगाचं काही का होईना, अशी काहीशी बेमुरवत वृत्तीही बारक्या बारक्या गोष्टींमध्ये दिसते. कधी भर दिवसा डोक्यावरचे दिवे प्रवासी सुरू ठेवतात; कधी बस पूर्ण भरलेली असताना, ३० मिनीटांच्या प्रवासासाठी मागे बसलेल्या प्रवाश्यांचा विचार न करता सीट मागे रिक्लाईन करणारे लोक दिसतात; एकदा तर बॅग ठेवलेली सीटही मागे सरकवलेली बघितली होती. अमेरिकी वृत्ती किंवा संस्कृती बेदरकार-डार्विनी असण्याचे पुरावे शब्दशः बसल्या जागी मिळतात.

मी बसच्या रांगेत उभी असतानाही, लोक आपल्याशी बोलायला येतील या भीतीपोटी नियतकालिक उघडून वाचायला सुरुवात करते. न्यू यॉर्करमधले मोठेसे लेखही ऑफिसात पोहोचेस्तोवर वाचून होतात. मी आंजावर येऊन त्या लेखांतून मिळालेलं 'ग्यान' वाटत सुटते.

उज्ज्वला Thu, 31/05/2018 - 23:17

फ्रांसमधे मी 3 महिने रोज ट्रेनने प्रवास केला पण लोक एकमेकांसी बोलतील तर शपथ. गर्दीच्या वेळी उभ्याने प्रवास करतानासुद्धा आपलं आपलं पुस्तक नाहीतर वर्तमानपत्र वाचतील नाहीतर कानाला वायरी लावून श्रवण. बोलतील फक्त आपण दाराशी असलो तर "उतरणार आहात ?" एवढा प्रश्न.
हेच मुंबईच्या ट्रेन्समधे एकमेकांशी ओळख नसली तरी थोडातरी संवाद घडतो. आणि उतरणार आहात का हे विचारायला येऊ घातलेल्या स्टेशनचं नाव घ्यायचं फक्त. सांताक्रूज ? सांताक्रूज ? नाही पार्ला, म्हणत ती व्यक्ती बाजूला होणार.

पिवळा डांबिस Thu, 31/05/2018 - 23:20

सबवे न्यूयॉर्कची आणि,
एस्सेला बॉस्टन-डीसीची
सर्फलायनर कॅलीची किंवा,
ॲमट्रॅक साऱ्या देशाची
:)

फारएण्ड Fri, 01/06/2018 - 00:31

तर चित्रपट आणि रेल्वे हे दोन आवडीचे विषय एकत्र करून लिहीलेल्या लिन्क देण्याचा मोह अजिबात न आवरता ती येथे देतो.
http://www.aisiakshare.com/node/6319

अमेरिकेत सनीवेल पासून ते शिकागो च्या युनियन स्टेशन ते न्यू यॉर्क ग्रॅण्ड सेन्ट्रल् पर्यंत अनेक ठिकाणी ही रेलफॅनगिरी केलेली आहे. लिहीतो आठवेल तसे.

चिमणराव Fri, 01/06/2018 - 05:37

खफवर रेल्वे चर्चा सुरू झाल्याचं निमित्त झालं ते ओवरहेड वायरमधून पंचविस हजार वोल्ट्स दाबाचा वीज प्रवाह वाहू शकतो का याला मिळालेले विनोदी उत्तर " लघुलहरीनी" यामुळे. मग चर्चा रंगली. बरीच माहिती तांत्रिकच होती. सामान्य प्रवाशांच्या मनात फक्त गाडी वेळेवर येईल का,मला बसायला जागा मिळेल का एवढ्याच चिंता असतात. ते एकदा जमल्यावर पुढचे झोपायला मिळेल का, स्टेशनवर चा येईल का? पुस्तक/पेपर वाचता येईल का इत्यादी.
भारतात अजुनही आरक्षित जागेने केलेल्या प्रवासाइतकेच अनारक्षित सवारी गाडीतल्या प्रवासाचे महत्त्व अजिबात कमी जालेलं नाही. त्यातला गोंधळ १८५४ (ठाणे रेल्वे सुरू झाल्यावर वर्षाने) "लोखंडी रस्त्यांवरचे रथ" या पुस्तकात दिला आहे त्यात दीडशे वर्षांनंतर काहीच बदल झालेला नाही. हे पुस्तक मला अजून वाचायला मिळालेले नाही. दुसरे एक पुस्तक/कादंबरी म्हणजे फ्रेंच लेखकाने इंग्रज माणसाच्या धाडसाचे कौतुक करणारे,भारतातल्या प्रवाससाधनांचे कौतुक करणारे "अराउंड द वल्ड इन एटि डेज." एक वैज्ञानिक सत्यही त्यात आहे, पहिली मुंबई -कलकत्ता रेल्वे वाया अलाहाबाद रेल्वे प्रवासाचे वर्णनही आहे. ( या पुस्तकावरच्या सिनेमात बरेच प्रसंग गाळून दुसरेच घुसडले आहेत ते सोडा.) पारशी लोकांचा उल्लेखही येतो.
मुंबई -सुरत, मंगळुर -ते दक्षिणेकडे किनाय्राने रेल्वे होऊन बराच काळ लोटला तरी मुंबई ते मंगळुर रेल्वे नव्हतीच. मग ती कोकण रेल्वे या नावाने ( दंडवते/श्रीधरन/जपान यांना श्रेय देऊन) १९९५च्या अगोदर धावायला थोडी सुरुवात झाली. महाराष्ट्रातील खाड्यांमुळे ती बरीचशी किनाय्राला चाळीस किमि फटकून धावते तरी कोकण रेल्वेच म्हणतात. चाकरमानी मुंबईतला संपत चालला आणि दोन दिवसांत कोकणात जाऊन घराकडे पाहून येण्याचे स्वप्न साध्य झाले. पहिल्यावहिल्या दिवा - वीर गाडीने जाऊन पुढे एसटीने पाचाड - रोपवेने रायगड असं फारसे पाय न हलवता साध्य झाले.
रेल्वेचा पसारा अन सेवा वाढल्या तेवढेच प्रवासी वाढल्याने प्रिमिअम ट्रेन उर्फ बोलीने तिकिट खरेदी करून जाणेही परवडू लागले. रात्रीचा प्रवास हॅाटेलींग वाचवतो या कारणाने विमानप्रवासाला अजूनही प्रतिस्पर्धी आहे. शिवाय झाडाझडती सामानाची अन अंगाची नसते.
बघू आता बुलेट ट्रेनला किती म्हशी आडव्या येतात ते.

'न'वी बाजू Fri, 01/06/2018 - 07:55

In reply to by चिमणराव

बघू आता बुलेट ट्रेनला किती म्हशी आडव्या येतात ते.

यावरून अंग्रेज़ों के ज़माने वाली एक गोष्ट आठवली. मला वाटते चिं.वि. जोश्यांनी ही कोठेशीशी नमूद करून ठेवलेली आहे.

एकदा मद्रास अँड सदर्न मराठा रेल्वेची कोठलीशी गाडी आपल्या सिग्नेचर विलंबित गतीने मार्गक्रमणा करीत असते. मध्येच ब्रेक लावून थांबते. म्हटल्यावर, गार्ड रुस्तमजी आपली केबिन सोडून चौकशीसाठी इंजिनाकडे जातो, नि इंजिनड्रायव्हर सोहराबजीला म्हणतो, "काय रे सोहराबजी, काय झाले? गाडी का थांबवली?"

"अरे काही नाही रे, गाडीसमोर रुळावर म्हैस आडवी आली."

झाले, दोघेजण मिळून म्हशीला रुळावरून हाकलतात, रुस्तमजी पुन्हा आपल्या गार्डाच्या केबिनीकडे जातो, नि गाडी पुन्हा संथगतीने मार्गक्रमणा करू लागते. दहा मिनिटांनी ब्रेक लावून पुन्हा थांबते.

"काय रे सोहराबजी, काय झाले? गाडी का थांबवली?"

"अरे काही नाही रे, गाडीसमोर रुळावर म्हैस आडवी आली."

दोघेजण मिळून म्हशीला रुळावरून हाकलतात, रुस्तमजी पुन्हा आपल्या गार्डाच्या केबिनीकडे जातो, नि गाडी पुन्हा संथगतीने इ.इ.

असे चारपाच वेळा झाल्यावर रुस्तमजी वैतागतो, नि सोहराबजीला विचारता होतो, "अरे, काय, म्हशींचा कळपबिळप मोकाट सुटलाय की काय रे?"

"नाही रे, साली तीच तीच म्हैस मरायला पुन्हा पुन्हा रुळावर येते आहे."

..........

सांगण्याचा मतलब, म.स.म. रेल्वेच्या गाडीला आडवी यायला एकच म्हैस पुरली असेलही कदाचित, परंतु बुलेट ट्रेनचा वेग लक्षात घेता, बुलेट ट्रेनला आडवे येण्याकरिता म्हशींचा मोकाट सुटलेला किमान एक कळप तरी लागावा.

इत्यलम्|

नितिन थत्ते Fri, 01/06/2018 - 16:49

In reply to by चिमणराव

मद्रास ॲण्ड सदर्न मराठा म्हणजे आताची साऊथ सेंट्रल रेल्वे. त्यातील पुणे कोल्हापूर भाग आता मध्य रेल्वेत आला आहे.

बार्शीलाईट रेल्वे ही मिरज - कुर्डूवाडी - लातूर नॅरो गेज रेल्वे.

तिरशिंगराव Fri, 01/06/2018 - 13:57

माझा नोकरी निमित्त झालेला लोकल प्रवास जेवढा आहे त्यापेक्षा जास्त, बोईसरला जातानाचा अप-डाऊनचा आहे. आणि खरे किस्से आणि अनुभव त्या प्रवासाचेच आहेत. दहा वर्षांच्या या प्रदीर्घ प्रवासांत जे अनुभव आले ते पुढे आयुष्यभर उपयोगी ठरले.
अप-डाऊन वाल्यांच्या दादागिरीत कधीही ॲक्टिव्ह सहभाग नसला तरी मूक प्रेक्षकाची काम केलेच आहे. तेंव्हाच्या प्रथम दर्जाच्या डब्यांत कूपे असत. त्यांत जर कधी पारशी मंडळी असली तर बहारदार भांडण होत असे. बावाजी आम्हाला कूपेमधे घुसू द्यायचे नाहीत, आणि कूपेचा दरवाजा लावून घ्यायचे. अशा वेळेस, आमच्यातले काही म्होरके, कूपेला बाहेरुन कुलुप लावीत. आणि बोरिवलीला उतरल्यावर बाहेरुन खिडकीतल्या हवालदिल बावाजीला , 'आता जा, बाँबे सेंट्रलपर्यंत', असा आशीर्वाद देत.

mydharavi Fri, 01/06/2018 - 14:53

व्हिएन्ना ते शायफलींग सारख्या छोट्या गावा पर्यंत, शेवटचा एक तास गाडी फक्त माझ्यासाठीच धावत होती.

शायफलींगच्या स्टेशनला प्लॅटफॉर्मच नाही... गाडी (आपल्याकडे जशी फाटकात रूळ आणि रास्ता असतो) तश्या जागेवर थांबते, पायऱ्या अल्लाद उलगडतात... कोणी अपंग व्यक्ती उतरणार असेल तर त्या खुडूक स्टेशनात एक छोटी क्रेन-गाडी पण अवतारायची.

ऑस्ट्रियातल्या बऱ्याच स्टेशनत प्लॅटफॉर्मची उंची लुटुपुटू असते, तरी सुन्या पडलेल्या स्टेशनात रूळ क्रॉस करणाऱ्या मला पाहून तिकडच्या मास्तरचा जीव वर खाली झाला होता.

म्युनिक स्टेशनातून निघालेली गाडी थोड्या अंतरावरून परत उलटीकडे चालली...जिथे सगळ्या प्रवासी शांत होते तिथे बाजूच्या डब्यातून जोरजोरात आवाज याला लागले... तिथे दुबईतून आलेले भारतीय कुटुंब होतं.

तोंड बांधलेली कुत्री, पिंजर्यातली मांजरी, खास पिंजरायताले कोंबडे हे हि तुमचे सहप्रवासी असू शकतात.

जेंव्हा भारतीय रेल्वे ऑनलाईन तिकिटाचे प्रिंट आऊट काढू नका असे आवाहन करत होती आणि रेल्वेच्या प्रचंड पसरलेल्या जंजाळात कागद फ्री (फुलप्रूफ) सिस्टिम उभी करत होती तेंव्हा तिथे मासिक पासचा एक कागद आणि डिस्कॉउंट तिकिटाचा दुसरा आणि ID कार्ड असं लटाबर (रोज!) सांभाळणारे tech-savvy प्रवासी होते.

छोटा प्रवास तर सोडाच पण ९-१० तास गप्प बसून प्रवास करणारे लोक, यात बिगर यूरोपीय प्रवाशांचाच आधार.

आसेतुहिमाचल पळणाऱ्या भारतीय रेल्वेबद्दल कौतुक कम अभिमान वाटावा अशी युरोपातली रेल्वे प्रवास कहाणी.

आदूबाळ Fri, 01/06/2018 - 15:33

रोज ट्रेन/बसनं प्रवास केला की बरंच अवांतर वाचन होतं.

मी अडीच वर्षं रोज नेमाने ट्यूबप्रवास केला. ट्यूबमध्ये वाचण्याची मोठी परंपरा आहे. डब्यात घुसलं की ब्याग पायात आणि पुस्तक/किंडळ बाहेर ही लोकांची प्रतिक्षिप्त क्रिया आहे. मोबाईलची रेंज खोल खड्ड्यात येत नाही हीदेखील वाचनसंस्कृतीला खतपाणी घालणारी बाब.

थोड्याच दिवसांत मला जाणवलं की आपले सहप्रवासी वाचतायत ती पुस्तकं आपल्या वाचनाच्या कक्षेच्या पूर्ण बाहेरची आहेत. (माझं इंग्रजी वाचन 'बरं आहे' असा तोवर माझा उगाचच समज होता.)

मग लोकांच्या हातातली पुस्तकं बघायचा छंद लागला. (किंडलच्या आयचा घो.) पुस्तकाचं मुखपृष्ठ दिसत नसेल तर हळुहळू त्या व्यक्तीच्या जवळ सरकायचं, उगाच आळोखेपिळोखे दिल्यासारखं करून योग्य तो अँगल साधायचा प्रयत्न करायचा, काही नाही तर त्या व्यक्तीचा चेहरा लक्षात ठेवायचा आणि परत डब्यात भेटण्याची वाट पाहायची, अशी स्टॉकरसुलभ कौशल्यं त्याच काळात कमावली.

इतकं करूनही कधीकधी अर्धवटच काहीतरी दिसायचं. उदा० अंडरमेजरडोमो मायनर यामधला 'डोमो' हा शब्द आणि मुखपृष्ठाचं डिझाईन एवढंच दिसलं होतं. त्यावरून शेरलॉकगिरी करून पुस्तक शोधायला लय घाम गाळावा लागला.

या पुस्तकसुचवणीच्या ट्यूबपद्धतीमुळे लेखकच्या लेखक, जॉन्राच्या जॉन्रा सापडले आहेत. 'स्टीमपंक' हा जॉन्रा वाचण्याचं एरवी काही प्रयोजन नसतं. तसंच, ज्युलियन बार्न्स किंवा बेन ॲरोनोविचही कधीच सापडले नसते.

फारएण्ड Fri, 01/06/2018 - 19:08

आज आमची चाइल्डहूड क्रश डेक्कन क्वीन चा वाढदिवस. परवा खफ वर ही चर्चा झालीच होती. पुण्यातून निघतानाच्या सेलेब्रेशन ची क्लिप आली यू ट्यूब वर. थोड्या वेळाने मुंबईमधलीही येइल बहुधा. या क्लिप मधे शेवटी तो एक ठराविक पद्धतीचा हॉर्न वाजवतात तो ही ऐकू येइल.

या क्लिप मधे पहिल्यांदा डेक्कन ला गेल्या काही वर्षात इतरत्र वापरलेली WAP इन्जिने आहेत त्यापैकी एक दिसले. नाहीतर गेली अनेक वर्षे WCAM टाइपची इंजिने असत. अगदी सहा महिन्यांपूर्वी सुद्धा तीच होती.

पूर्वी पुणे मुंबई लाइन वर डीसी ट्रॅक्शन असताना दिसणारी ती युनिक इंजिने असत त्यातली २-३ वेगवेगळी इंजिने डेक्कन ला असत. मिड डे च्या लेखातील चित्रात दिसेल.

यातही मॉडेल्स वेगवेगळी असली, तरी ढोबळ दोन प्रकार आहेत:
१. ब्रिटिश बनावटीचे WCM-1 इंजिन - यात दोन मॉडेल्स होती

२. भारतीय बनावटीचे WCM-5 इंजिन. ९० च्या दशकात मला हे जास्त पाहिल्याचे आठवते.

मग डीसी->एसी ट्रॅक्शन करताना मिक्स वापराकरता असलेली इंजिने बरीच वर्षे होती - साधारण लेट ९०ज ते आत्ताआत्तापर्यंत.

आणि आता पूर्ण एसी ट्रॅक्शन वाले आले.

पण खरी नॉस्टॅल्जिक करणारी डेक्कन ही फक्त या लिन्क वरच्या फोटोतली!

फारएण्ड Sat, 02/06/2018 - 06:16

In reply to by चिमणराव

राजधानी वगैरे गाड्या बहुधा सर्वात वेगवान होत्याच. नंतर शताब्दी आली आणि इतर अनेक आल्या. त्यात घाट सेक्शन मुळे आणि मुंबईतील गर्दीच्या स्टेशन्समुळे गाड्यांचा वेग इतर ठिकाणांपेक्शा कमीच असतो. मात्र वेगवान गाड्यांपैकी एक ती असायची, अजूनही असेल. आता शक्तिशाली WAP लोको मुळे ती सुद्धा १५० किमी ने जाउ शकेल.

मात्र मुंबईतील स्टेशनांमधून गाड्या मूळ वेगात नेण्याचे प्रमाण आता खूप कमी झाले आहे - तेथील गर्दी, रूळ ओलांडण्याचे प्रमाण वगैरे मुळे लोकलही हळूच नेतात बहुतांश (एका मोटरमन च्या लेखात वाचले होते). लहानपणी कल्याणमधून वेगाने जाणारी डेक्कन बघायला आवर्जून गेलो होतो एक दोन दा. आता अशी जर प्रत्येक स्टेशनातून गेली तर दोन तासात पोहोचेल.

'न'वी बाजू Sat, 02/06/2018 - 08:59

In reply to by चिमणराव

... लक्षात घ्या की राव! पुण्यामुंबईच्या मध्ये घाट आहे. तो नसता तर... (शिवाय अंतरसुद्धा किती कमी आहे. एवढ्याश्या अंतरात मध्ये दोनतीनच स्टॉप धरले, तरीसुद्धा...)

बरे, तुमची कोकण रेल्वे तर परवापरवा आली. राजधानी एक्सप्रेस १९७०च्या दशकापासून धावतेय. तीसुद्धा मुंबईबाहेर पडल्यावर १२०च्या स्पीडने धावत आलेली आहेच की! (असे इथे म्हटलेले आहे. छापील पान क्र. २३, पानांचा उजवा अर्धा भाग, वरून १८वी ते २०वी ओळ.)

पण राजधानी एक्सप्रेस मुंबईहून सुटल्यावर थेट वडोदऱ्याला थांबते. म्हणजे मुंबई-पुणे अंतराच्या दुप्पट अंतर. पहिल्या थांब्यालाच. तोही भाग आहेच ना!

चिमणराव Sat, 02/06/2018 - 13:19

मग काय बरं होता डेक्कनचा युएसपी?
डेक्कनचे प्रवासी हा एक मजेदार लेख भुस्कुटे यांनी लिहिला आहे. बोले तो त्यांनी डोंबिवलीमधल्या ज्योतिषांनाही सोडलेले नाही. प्रत्येक इमारतीखाली १)इथे मुले संभाळली जातील, २) पोळीभाजी डबा मिळेल, ३)साडीला फॅाल पिकोफॅाल लावला जाईल, ४) कुंडलीमेलन, ज्योतिष पाहतो.,५)ट्युशन क्लासेस या पाट्या असणारच.

फारएण्ड Sat, 02/06/2018 - 17:41

In reply to by चिमणराव

फास्ट हा मर्यादित अर्थाने होता हे खरे. पुणे-मुंबईच्या दरम्यान अनेक दशके हीच गाडी सर्वात फास्ट असावी शताब्दी सुरू होईपर्यंत. अगदी सुरूवातीला तीन तासापेक्शा कमी वेळात जात असे. इंद्रायणी सुद्धा होती अगदी सुरूवातीला बहुधा पण नंतर स्टॉप्स वाढवले तिचे. प्रगती एक्स. तशीच. पण मुळात यातले "फास्ट" हे थांबे कमी असल्याने असावे, प्रत्यक्श वेगात फारसा फरक नसेल. भारतात इतरत्र राजधानी, पंजाब मेल, फ्र्ण्टियर मेल ई. गाड्या तितक्याच वेगवान होत्या. कदाचित जास्तही असतील.

मात्र जेव्हा इतर गाड्या त्या पूर्वीच्या ठराविक तपकिरी रंगाच्या असत तेव्हा डेक्कन ला खास तो निळा-पांढरा व नंतर निळा-पिवळा रंग, इंजिनालाही तसाच रंग (लिव्हरी म्हणत त्याला बहुधा) असे त्यामुळे एकतर उठून दिसे. सकाळी फक्त लोणावळा आणि दादर, तर संध्याकाळी थेट कर्जत, मग लोणावळा आणि नंतर लोकांना उतरायला सोयीचे म्हणून शिवाजीनगर अशी इतर गाड्यांच्या मानाने बरीच कमी स्टेशने घेणे यामुळे एक 'इलाईट' पणा असे. दादर ला सुद्धा (संध्याकाळी) न थांबणे हे फक्त एके काळी डेक्कन व राजधानीच करत होत्या.

आणखी काही युएसपी होते. तिला 'डीलक्स ट्रेन' म्हणत. त्याचे नक्की कारण माहीत नाही. पण सुरूवातीला रेल्वे मधे तीन वर्ग असताना डेक्कन मधे फक्त पहिला व दुसरा होते. १९६० च्या आसपास तिसरा वर्ग आला (पुलंच्या लेखात उल्लेख आहे). पण तरीही या गाडीला जनरल डबा नसे. पूर्ण आरक्शित असायची, कॉरिडॉर मधे लोक उभे आहेत वगैरे प्रकार आधी नव्हते. २ बाय २ चा पहिला वर्ग आणि इव्हन दुसऱ्या वर्गातली सीट्स इतर गाड्यांपेक्शा वेगळी होती हे लक्शात आहे. नंतर कधीतरी ते बदलले.

ही भारतातली पहिली 'व्हेस्टिब्यूल ट्रेन' - ज्यात एका डब्यातून दुसऱ्या डब्यात थेट जाता येते. पूर्वी बहुतांश इतर गाड्यांत ती सोय नसे. इतर गाड्यांना अगदी आत्ताआत्तापर्यंत पिवळे बल्ब्ज असत डब्यांत. डेक्कन मधे खूप आधीपासून ट्यूबलाइट्स आहेत - शिवाजीनगर ला संध्याकाळी येणाऱ्या गाड्यांत ती चटकन ओळखू येइ. इतर गाड्यांत पॅण्ट्री कार्स असत - डेक्कन मधे डायनिंग कार आहे.

पुणे-मुंबई प्रवासात पूर्वी मानाची गाडी असल्याने व नंतर रोज पुणे-मुंबई अप-डाउन वाले असल्याने अजूनही त्या रूट वर हिला प्रायॉरिटी आहे. ही जरी लेट असली तरी वाटेवरच्या इतर गाड्या बाजूला काढून हिला पुढे काढतात. दरवर्षी एक जून ला तिचा वाढदिवस केक, बॅण्ड, डेकोरेशन लावून साजरा केला जातो. आणि हे पुढचे ऐकीव माहितीवर - रिटायर होणाऱ्या लोको ड्रायव्हर्स ना रिटायर होण्या आधी डेक्कन वर पाठवतात व तिच्या प्रवासात दुसऱ्या दिशेने जाणाऱ्य प्रत्येक ट्रेन चे ड्रायव्हर्स काहीतरी वेगळा हॉर्न मारून फेअरवेल देतात.

बाकी पॉप्युलर कल्चर मधले उल्लेख, वसंत बापटांची कविता वगैरे गोष्टी अनेक वर्षे आहेतच. या गाडीने गेलेला माणूस "डेक्कनने आलो" असे आवर्जून सांगतो असे पूर्वी म्हणत. ब्रिटिश लोकांनी "फ्लायिंग स्कॉट्स्मन" ची लीगसी ठेवली आहे. तिचा वेगही वाढवला आहे आता. तसे काहीतरी करायला हवे. डेक्कन सुरू झाली तेव्हा ६-७ डबे घेउन २ तास ५५ मिनीटांत मुंबई गाठत असे. आता १७ डबे आले, मुंबईतील स्टेशन्स मधली गर्दी वाढली आणि वेग मंदावला. आता नवीन इंजिने आहेतम, नवीन तंत्रद्न्यान आहे आता पुन्हा दोन-अडीच तासात करता येइल. लीगसी ट्रेन म्हणून नाही तरी पुणे-मुंबई अप-डाउन वाल्यांचा वेळ वाचवण्याकरता तरी करावे.

नितिन थत्ते Sat, 02/06/2018 - 18:38

In reply to by फारएण्ड

>>इव्हन दुसऱ्या वर्गातली सीट्स इतर गाड्यांपेक्शा वेगळी होती हे लक्शात आहे.

डे टाइम मध्ये धावणाऱ्या गाड्यांमध्येही पूर्वी द्वितीय श्रेणीच्या डब्यांत १x४ आसन व्यवस्था असे. डेक्कन क्वीनला पूर्वीपासून २x३ होती बहुधा. लाकडी पट्ट्यांचे बाक जाऊन कूशन्ड सीट्स मी सीओईपीत असताना केव्हातरी ८०-८४ दरम्यान आल्या. डेक्कन क्वीनला आधीपासून होत्या का?

रेल्वेच्या स्टॅण्डर्डनुसार एका रांगेत सहा सीट्स हे अयोग्य आहे. ई एम यू लोकलमध्ये ३x३ आसनव्यवस्था असते पण लोकलची रुंदी लांबपल्ल्यांच्या गाड्यांपेक्षा फूटभर तरी जास्त असते. त्यामुळे तिथे चालून जाते. (त्यामुळेच राम नाईक रेल्वेमंत्री असताना डहाणू लोकलची घोषणा झाली तरी ती सुरू मात्र अगदी अलिकडे झाली. कारण दोन लोकल समोरासमोरून पास होण्यासाठी अप आणि डाऊन रुळातील अंतर वाढवावे लागले. डायमेन्शन न पाहता घोषणा करणे हे तेव्हापासून ८ नोव्हेंबर २०१६ पर्यंत चालूच आहे. ;) )

'न'वी बाजू Sun, 03/06/2018 - 02:15

In reply to by नितिन थत्ते

लाकडी पट्ट्यांचे बाक जाऊन कूशन्ड सीट्स मी सीओईपीत असताना केव्हातरी ८०-८४ दरम्यान आल्या. डेक्कन क्वीनला आधीपासून होत्या का?

नव्हत्या.

लाकडी पट्ट्यांची बाके (डेक्कनमध्येसुद्धा) अंधुकशी आठवतात.

'न'वी बाजू Sun, 03/06/2018 - 02:08

जंक्शनची नक्की व्याख्या काय? त्यात नक्की काय अभिप्रेत आहे? दादर हे जर जंक्शन होऊ शकते, तर एल्फिन्स्टन रोड-परळ का नाही? केवळ त्या स्टेशनांची नावे वेगळी आहेत, म्हणून? मस्जिद हे जंक्शन आहे हे ठीकच, परंतु सँडहर्स्ट रोड (हायर+लोअर लेव्हल) ही दुक्कल जंक्शन का नाही?

इतरही प्रश्न असू शकतात, परंतु आधी एवढे पुरे. यांच्या उत्तरांतून आणखी उपप्रश्न निघाले, तर अवश्य विचारेन.

या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे माहीत असूनही जर का ती कोणी दिली नाहीत, तर त्याच्या/तिच्या आयडीचे शंभर डुआयडी होऊन ते त्याच्याच/तिच्याच तंगड्यांत कडमडू लागतील.

फारएण्ड Sun, 03/06/2018 - 04:43

In reply to by 'न'वी बाजू

हीच व्याख्या पुस्तकांत वाचली होती व बहुधा अजूनही व्हॅलिड आहे. दादर हे रेल्वे च्या व्याख्येप्रमाणे जंक्शन नाही. असू शकले असते - पण मध्य आणि पश्चिम रेल्वे च्या अंतर्गत दादर (मध्य) व दादर (पश्चिम) हे दोन्ही भाग त्या त्या एकाच मार्गावर आहे. दादर ला त्यामुळे "फाटा" नाही. कारण मध्य रेल्वे च्या गाड्या तेथे एकाच मार्गाने पुढे जातात, तसेच पश्चिम रेल्वेचे ही आहे.

दादर चा उल्लेख सहसा दादर टर्मिनस/टीटी असा वाचला आहे. मस्जिद सुद्धा मी जंक्शन समजत नव्हतो. माझ्या आठवणीत मुंबई पुणे मार्गावर फक्त दिवा (पुणे- पनवेल), कल्याण (कर्जत-कसारा), आणि पुणे (दौंड, मिरज) हीच फक्त जंक्शन्स आहेत. नेरळ चे लक्शात नाही.

एकाच रूळावरून येणारी गाडी एकापेक्शा जास्त दिशांना जाउ शकत असेल - असे लॉजिक धरले तर दादर किंवा नेरळ दोन्ही त्यात बसत नाही.

१४टॅन Sun, 03/06/2018 - 08:49

In reply to by फारएण्ड

दादरची प आणि म ठेसनंही वेल सेपरेटेड आहेत. एक ट्रक जाईल इतका मोठा एक खाजगी रस्ताही मध्ये आहे. ३-४ पूल फक्त जोडतात आणि नाव सारखंच आहे इतकंच काय ते.

नितिन थत्ते Sun, 03/06/2018 - 20:54

In reply to by फारएण्ड

ठाणे हे तसे जंक्शन आता झाले आहे पण त्याला अजून जंक्शन म्हणत नाहीत. कदाचित जंक्शन म्हणून नोटिफाय करण्याची पद्धत बंद झाली असावी.

वडाळ्यालाही म्हणत नाहीत आणि सानपाड्याला, तुर्भ्याला आणि कुर्ल्यालाही म्हणत नाहीत.

घाटावरचे भट Mon, 04/06/2018 - 09:52

In reply to by फारएण्ड

नेरळ जंक्शन आहे. रेल्वेमध्ये युनिफॉर्मिटी नसणे हा ही एक युनिफॉर्म गुणधर्म आहे. त्यात इंजिनांच्या क्लासिफिकेशन पासून जंक्शनच्या नावांपर्यंत सगळे आले.
neral junction

फारएण्ड Mon, 04/06/2018 - 19:18

In reply to by नितिन थत्ते

पूर्वी फक्त लोकलची खोपोली लाइन वेगळी होत होती कर्जतला. त्यामुले जंक्शन म्हणत नव्हते ते बरोबर होते. आता पनवेल लाइन सुरू झाल्यापासून आणि प्रगती एक्स, पुणे-मनमाड एक्स तेथून जात असल्याने ते जंक्शन झाले आहे.

फक्त लोकलचे फाटे असतील तर म्हणत नसावेत.

नितिन थत्ते Mon, 04/06/2018 - 19:34

In reply to by फारएण्ड

बडनेरा ते अमरावती या मार्गावर पूर्वी पॅसेंजर धावत असे. भुसावळ नागपूर मार्गावरील कोणतीही गाडी बडनेरा येथून वळून अमरावतीकडे जात नसे. तरी बडनेरा स्टेशनला जंक्शन म्हणत असत.

नितिन थत्ते Tue, 05/06/2018 - 10:53

In reply to by फारएण्ड

>>दादर चा उल्लेख सहसा दादर टर्मिनस/टीटी असा वाचला आहे.

यातील टीटी हे ट्राम टर्मिनस या जागेसाठी आहे. आता त्या जागेला खोदादाद सर्कल म्हणतात. प्लाझा कडून टिळक ब्रिजने गेले की दादर टीटी भेटते.

फारएण्ड Tue, 05/06/2018 - 19:24

In reply to by नितिन थत्ते

मी टर्मिनस चे शॉर्ट तसे केले असे इतके दिवस समजत होतो. म्हणजे हे फक्त सेण्ट्रल लाइन वरच्या स्टेशन करताच वापरत असावेत. दादरहून सुटणाऱ्या वेस्टर्न लाइन च्या ट्रेन्स करता कदाचित नसेल.

'न'वी बाजू Tue, 05/06/2018 - 21:22

In reply to by फारएण्ड

(ऐकीव माहिती)

मुंबईत जेव्हा ट्राम होत्या, त्या काळात दादरचे ट्रामचे टर्मिनस थत्त्यांनी म्हटल्याप्रमाणे खोदादाद सर्कलजवळ होते. म्हणून त्या परिसरास (बोले तो, दादरच्या रेल्वेलाइनीच्या पूर्वेकडील भागास) सामान्यजनांच्या परिभाषेत 'दादर टीटी' म्हणून संबोधले जात असे. (पुढे ट्राम गेलेल्या तरी नाव कायम राहिले.)

(माइंड यू, दादर टीटी हे नाव त्या रेल्वे स्टेशनचे नसून त्या स्टेशनलगतच्या परिसराचे होते.)

(रेल्वे लाइनीच्या पश्चिमेकडील दादरच्या परिसराचे - स्टेशनचे नव्हे! - नाव कॉरस्पाँडिंगली 'दादर बीबी' असे होते. दादरच्या बीबीसीआय रेल्वेवरील स्टेशनच्या नजीकचा परिसर म्हणून. पुढे बीबीसीआयची परे झाली तरी जुन्या/स्थानिक लोकांच्या तोंडी नाव कायम राहिले.)

..........

अवांतर: दादर टीटीची ही माहिती अर्धवट ऐकून आमच्या एका बिगरमुंबईकर मित्राने, व्हीटी बोले तो व्हिक्टोरिया टर्मिनस म्हणजे पूर्वी जेथे व्हिक्टोरियांचे टर्मिनस होते यानी कि पूर्वी जेथे व्हिक्टोरिया (घोड्याच्या भाडोत्री गाड्या) उभरत्या राहात, ती जागा, असा जावईशोध लावला होता. आता, व्हीटीच्या (आजच्या सीएसटीच्या) बाहेर पूर्वी व्हिक्टोरिया उभ्या राहात, हे खरेच आहे. परंतु ते नाव त्यावरून नसून व्हिक्टोरिया राणीवरून आहे, हे या आमच्या सन्मित्राला कोणी आणि कसे समजावावे! (हाच सन्मित्र एकदा मुंबईचा सूर्योदय पाहण्यासाठी भल्या पहाटे उठून चौपाटीला जाऊन बसला होता म्हणे. गो फिगर.)

तिरशिंगराव Mon, 04/06/2018 - 10:20

माणसाला, ग्रामीण भागांत, बरेच वेळा 'जंक्शन माणूस' म्हणतात. त्यातल्या जंक्शनचा अर्थ काय ?

उज्ज्वला Mon, 04/06/2018 - 11:07

In reply to by तिरशिंगराव

माणसाला, ग्रामीण भागांत, बरेच वेळा 'जंक्शन माणूस' म्हणतात. त्यातल्या जंक्शनचा अर्थ काय ?
-- बडे प्रस्थ.
गंमत म्हणजे हा शब्द माझ्या वाचनात, ऐकण्यात अजून आलेला नसताना कै. अरुण आठल्ये यांचा बोजड शब्द वापरून समीक्षा करण्याची खिल्ली उडवणारा लेख बहुधा लोकसत्तामधे आला होता, त्यात मला पहिल्यांदा हा शब्द गेला. अरुण आठल्ये यांनी एक समीक्षा साधन देऊ केले होते, त्याला त्यांनी जंक्शन जंबोशब्द जनित्र असे नाव दिले होते. त्याच्या प्रस्तावनेत या तीनही शब्दांचा अर्थ विशद केला होता. त्यात त्यांनी तीन रकान्यांत काही विशिष्ट शब्दांची जंत्री दिली होती आणि त्यातले शब्द वापरून एका तशा दुर्बाध कवितेचे तितकेच अगम्य रसग्रहण करून दाखवले होते.

चिमणराव Mon, 04/06/2018 - 11:17

इंग्रजीतला हँडिमॅन म्हणजे जंक्शन.
भाषण देणाराच माणूस केवळ वक्ता न राहता वेळेअगोदर येऊन झाडलोट करणे, संतरज्या घालणे, माइक ठीकठाक करणे, फलक लिहून लावणे, टेबलं मांडणे करतो तो जंक्शन.

राइट हँड का हँडी मॅप नबा?

ठाणे सबरओबन भागात आल्याने त्याला जंक्शनचा दर्जा दिला नसेल. दिव्याहून कोकण रेल्वे फाटा ,वसई फाटे फुटतात. दिवा जंक्शन. कल्याणला नाशिक/पुणे फाटे फुटतात.

चिमणराव Mon, 04/06/2018 - 11:15

बाकी या धाग्यात रेल्वे प्रवाशांच्या सवई, सुखदु:ख ( असा शब्दप्रयोग चाल आहे) मांडली जात आहेत, रेल्वेच्याजाड बारीक चपळ धिमेपणाशी संबंध नसल्याने खफवरची चर्चा इथे आणत नाही /आणण्याचे प्रयोजन वाटत नाही. ( अण्णा हे असं आहे. हे रेल्वेचे रॅाक नसून ब्लूज आहेत. थोडे पिंकही वाटतात. खफवरची तांत्रिक चर्चा सांधा बदलून प्रवाशांच्या आळोखेपिळोख्यांकडे लक्ष देईनाशी झाली त्यामुळे मालकिणबैंनी नवीन रेल्वे लैन टाकली.)

पुंबा Mon, 04/06/2018 - 20:14

तुम्हा लोकांना रेल्वेची एवढी माहिती कशी काय आहे काय कळत नाही. किती ही प्रवास करत असलं तरी असं स्टेशनंच्या स्टेशनं अन कुठलं जंक्शन आहे/नाही, कुठल्या गाड्या कुठल्या मार्गाने जायच्या/जातात वगैरे अशी इत्थंभूत माहिती असणं ती पण एकाच संस्थळावरच्या इतक्या साऱ्या मेंबर्सना, आश्चर्याची गोष्ट म्हणावी लागेल.

फारएण्ड Mon, 04/06/2018 - 22:15

In reply to by पुंबा

हे एकच कारण :) लहानपणीपासून असलेले फॅसिनेशन अजून तसेच आहे.

थेउरवरून एकदा परत येताना सोलापूर रोड ला लागायच्या आधी पूर्वी एक लेव्हल क्रॉसिंग होते (अजूनही असेल). तेथे आलो तेव्हा गेट बंद झाले. साधारण वेळेच कॅल्क्युलेशन करून बायकोला सहज कोणती गाडी येत असावे याचा अंदाज सांगितला आणि खरोखरच तीच गाडी पास झाली. तेव्हापासून माझ्या रेल्वेप्रेमाला घरातही "रिस्पेक्ट" मिळू लागला. आता इतक्या वेळेवर नेहमी असेलच असे नाही पण नेमकी त्यादिवशी होती.
(पहिल्यांदा लिहीताना थोडा तपशील गंडल्यामुळे बदल केला आहे. ही अनेक वर्षांपूर्वीची आठवण)

अजून एक गंमतशीर सीन. लोणावळ्याजवळ असेच बंद गेट लागले. माझी आवड मी मुलावर जवळजवळ लादली आहे ;) तेथे त्याला गाडी जवळून बघता येइल म्हणून गेटवर गेलो. माझ्या मागोमाग सुमारे १०-१५ लोक आमच्याबरोबरचे (दोन तीन कार्स होत्या) सहज आले. प्रत्यक्शात फक्त दोन इंजिने इकडून तिकडे गेली. तेव्हा तेथे एक दोन इंजिने बघायला क्रॉसिंग गेट वर विविध वयांचे १०-१५ लोक उभे आहेत असे चित्र दिसत होते :)

चिमणराव Tue, 05/06/2018 - 06:02

In reply to by फारएण्ड

सरसकट ब्रॅाडगेजीकरण आणि साडेचार/सहा हजार एचपी पॅावरची दोनच इले/डिजल एंजिने यामुळे विविधता गेलीच.

चिमणराव Mon, 04/06/2018 - 21:07

मुद्दामहून माहिती काढायला कुणी गेलं नसणार. बदलीच्या नोकय्रांमुळे आपसूकच कळले.
आता तर गेज कन्वर्शनमुळे सगळंच मिळमिळीत होणार. अन्यथा शोलेचं एंजिन पाहायला ( सेल्फी) प्रचंड गर्दी होईल. परदेशासारखं ट्रेनस्पॅाटिंग( एंजिनासह) काय घंटा करणार?

नितिन थत्ते Tue, 05/06/2018 - 09:56

इंटरेस्ट हे तर खरंच.

माझे वडील दरवर्षी उगाच रेल्वेचे टाइमटेबल विकत आणत असत. ते चाळता चाळता अनेक रूट्सची माहिती झाली.

सीओईपीला असताना दर महिना पुणे ठाणे ट्रिप्स होत. तेव्हा इंजिनिअरिंगचे स्टुडंट म्हणून काही माहिती मिळाली. इतर इलेक्ट्रिकल वाले विद्यार्थी असत त्यांच्याकडून माहिती मिळे.

प्याशन हेच खरं.
तरी मुंबईत राहणाऱ्यांचा रेल्वेशी रोजचा संबंध येतो. पुण्यात किंवा इतरत्र राहणाऱ्यांना रेल्वेची इतकी माहिती असणे आश्चर्यकारक आहे. पुणेकरांचा तर रेल्वेशी संबंध मुंबईला जाण्यापुरताच येत असावा.

चिमणराव Tue, 05/06/2018 - 11:19

ते ब्राडशा नावाचं जाडजूड टाइमटेबल एकदा पाहिलं पण घेतलं नाही. चार झोन्सची टाइमटेबल्स मी ठेवली आहेत. त्यातले फक्त वेस्टन झोन बदलतो, इतर माहितीसाठी आहेत. ( पॅसेंजर ट्रेन्स फक्त त्यात्या झोनमध्येच असतात. शिवाय म्याप .) )
तुलना केल्यास नॅार्दन झोन भंकस आहे. हिरव्या पानावरची काळी छपाई दिसत नाही,विस्कळीत आहे.
सदर्न झोनमध्ये स्टेशनस चार अनुक्रमणिकांत शोधावी लागतात. वेस्टन सर्वात उत्तम.
कोणी मठ्ठ अफिसरने केलेला फारम्याट रेटतात.

फारएण्ड Tue, 05/06/2018 - 21:26

ही अशीच एक रॅण्डम मेमरी. रेल्वेच्या बाबतीतले विविध उल्लेख कायमस्वरूपी डोक्यात राहिलेले आहेत कधीतरी कोणालातरी विचारायचे म्हणून, त्यातले एक.

गांधीजींबद्दलच्या कोणत्यातरी घटनेच्या उल्लेखात ते पुण्याला येण्याकरता कुलाब्याला गाडीत बसले असे वाचले होते. मुंबईत पूर्वी कुलाबा स्टेशन होते आणि गाड्या तेथपर्यंत जात (चर्चगेटच्या पुढे) असे वाचलेले आहे. पण ती लाइन बीबीसीआय (पश्चिम रेल्वे) ची असल्याने ती दादर किंवा कोठेतरी फिरवून जीआयपी (मध्य रेल्वे) च्या लाइन वर आणत की काय माहीत नाही. त्या घटनेतील स्टेशनच्या नावाचा उल्लेख बरोबर आहे हे गृहीत धरून हे विचारतोय.

म्हनजे व्हीटीवरून जशा हार्बर लाइन च्या लोकल्स उडी मारून मध्य वरून पश्चिम रेल्वेच्या रूट वर जातात तसे थ्रू ट्रेन्स बद्दल ऐकलेले नाही तेथे (म्हणजे दादर ई. ला. कल्याण/दिवा/वसई वगैरे करतात माहीत आहे).

फारएण्ड Wed, 06/06/2018 - 20:06

In reply to by घाटावरचे भट

मी तेथे जाउन ब्राउज करून सुद्धा पाहिले पण सापडली नाही (त्या निमित्ताने इतर पन्नास पाने तेथील बघून आलो :) )

घाटावरचे भट Thu, 07/06/2018 - 09:23

In reply to by फारएण्ड

त्यांच्या पिक्चर ग्यालरीमधील नकाशा आहे. अधिक माहितीसाठी ती साईट धुंडाळावी लागेल. पण साइट बेष्टंपैकी आहे.

चिमणराव Fri, 08/06/2018 - 19:01

In reply to by घाटावरचे भट

दिसतोय नकाशा. बॅकबे होण्याअगोदर चर्चगेटचा पुढचा दक्षिण भाग कोलाबा म्हणत असावे. बलॅार्ड पिअर बस डेपो - कोलाबा आगार.

'न'वी बाजू Sat, 09/06/2018 - 18:34

In reply to by चिमणराव

...गेटवेच्या आजूबाजूचा भाग ना?

बाकी, 'बधवार पार्क' नावाच्या भागात हल्ली जेथे रेल्वेवाल्यांचे क्वार्टर्स/रेसिडेंशियल कॉलनी आहे (ऐकीव माहिती), तेथे पूर्वी कुलाब्याचे रेल्वे स्टेशन होते, असे पूर्वी कधीतरी वाचलेले आहे. (चूभूद्याघ्या.)

चिमणराव Sat, 09/06/2018 - 20:17

In reply to by 'न'वी बाजू

कुलाबा हे खूप अगोदरचे कोळीवाड्यापासूनचे भागाचे नाव। रेल्वे चर्चगेटला/ बोरीबंदरला जात असली तरी लोक कुलाब्याला जातो म्हणत असणार.

बधवार पार्क नावाच्या इमारतीत मफतलालशेट राहात. मफतलाल हाऊस नंतर झाले.

राही Sat, 09/06/2018 - 22:34

In reply to by चिमणराव

रेल वे कुलाब्यापर्यंत जात होती असली तरी ती चर्चगेट स्ट्रीटलाच रिकामी होत असे. कारण फाउंटन वगैरे भाग विकसित झाला होता. म. गांधी रस्त्यावर अनेक व्यापारी कचेऱ्या होत्या. सी टी ओ, ओल्ड सेक्रेटरिएट, बॅंका, विमा कंपन्या, मुंबई विद्यापीठ, हाय कोर्ट हा सगळा सेंट्रल बिझिनेस डिस्ट्रिक्ट चर्चगेट स्ट्रीटपासून जवळ होता.
वांद्र्यापासून पुढे उत्तरेकडील लोक या भागात जायचे असल्यास मुंबईला जातो असे म्हणत तर दादर गिरगाव ग्रॅंट रोडचे लोक फोर्टात जातो असे म्हणत. मूळ फोर्ट विभाग थोडासा पूर्वेला होता तरी रॅंपार्ट रो, आर्मी ॲंड नेवी बिल्डिंग, ओल्ड कस्टम्स हाउस इत्यादि नावांमुळे हा टापू किल्ल्याचाच भाग असल्याचा भास होई.

राही Sat, 09/06/2018 - 22:01

In reply to by 'न'वी बाजू

कूपरेज मैदानाच्या बाजूला जुन्या कुलाबा स्टेशनचा एक जिना होता असे म्हणत. जिनासदृश बांधकाम पाहिले आहे पण तो स्टेशनचाच जिना होता ह्याविषयी ठाम सांगता येत नाही.
प्रेसिडेंट हॉटेलच्या आजूबाजूचे रेक्लमेशन झाले आणि कफ परेडचे रूपच बदलून गेले. वुडहाउस रोड पूर्वी खूपसा समुद्रकिनाऱ्याजवळून जायचा. समुद्राचा वारा खात बसण्यासाठी रस्त्याच्या कडेने बाक ठेवले होते. पुढे समुद्र खूप लांब सरला तरी ती बाकडी कित्येक वर्षे तशीच होती.

नितिन थत्ते Wed, 06/06/2018 - 10:11

In reply to by फारएण्ड

>>म्हनजे व्हीटीवरून जशा हार्बर लाइन च्या लोकल्स उडी मारून मध्य वरून पश्चिम रेल्वेच्या रूट वर जातात तसे थ्रू ट्रेन्स बद्दल ऐकलेले नाही तेथे (म्हणजे दादर ई. ला. कल्याण/दिवा/वसई वगैरे करतात माहीत आहे).

सध्या तांत्रिकदृष्ट्या परळ/एलफिन्स्टन रोड प्रभादेवी येथे बहुधा (चूभूदेघे) गाड्या इकडून तिकडे नेण्याची सोय आहे. (नाहीतर वेस्टर्नला नवीन गाड्या मिळाल्या की वापरलेल्या जुन्या गाड्या सेंट्रलला कशा मिळतील)?. पूर्वी गाड्या रेग्युलरली तशा जातही असतील.

माझ्या लहानपणी ठाण्याहून व्हीटी मेन आणि व्हीटी हार्बर अशा लोकल सुटत असत. ठाण्याहून कुर्ल्याला येऊन नंतर या गाड्या कुर्ल्यानंतर हार्बर लाईनने जात असत. नंतर केव्हातरी या बंद झाल्या. पण तांत्रिक दृष्ट्या कुर्ल्याला मेनलाईनवरून हार्बर लाईनला जाता येतेच.

राही Thu, 07/06/2018 - 18:48

In reply to by फारएण्ड

फार एण्ड, दादरला ट्रॅक बदलण्याची सोय असावी. कारण इथल्या थंडीच्या दिवसांत बॅलार्ड पिअर मोल स्टेशनवरून सुटणारी फ्रंटिअर मेल बी पी टी रेल वे लाइनवरून प्रवास करीत जी आय पी चा मार्ग पकडे आणि दादर परळ दरम्यान बीबीसीआय वर येई.एरवी ही बीबीसीआयचीच गाडी होती आणि ती कुलाब्यावरून सुटे. त्या काळी(१९२८) दादर हे जंक्शन होते. शिवाय त्या आधी रेल्वेच्या सुरुवातीच्या काळात वीटीवरून ठाण्याबरोबर माहीमसाठी सर्विसेस सुटत. माहीमच्या गाड्या दादरला रूळ बदलत. तशीच सोय बीबीसीआयवरून जीआय्पी मार्गावर येण्यासाठी होती असणार.

तिरशिंगराव Fri, 08/06/2018 - 09:59

In reply to by राही

तशी सोय अजूनही आहे. मध्यंतरी, काही कारणाने पश्चिम रेल्वेच्या गाड्या दिल्लीपर्यंत जाऊ शकत नव्हत्या, त्यांना दादारमार्गेच सेंट्रल रेल्वेवर वळवले होते.

घाटावरचे भट Fri, 08/06/2018 - 17:38

In reply to by तिरशिंगराव

>>मध्यंतरी, काही कारणाने पश्चिम रेल्वेच्या गाड्या दिल्लीपर्यंत जाऊ शकत नव्हत्या
राजस्थानातील गुज्जर आंदोलनाच्या वेळी

चिमणराव Wed, 06/06/2018 - 05:39

हे माहित नाही.
# माझीही एक शंका -
फारनरांच्या आवडीच्या ( आणि त्यांनाच परवडणाय्रा) 'प्यालिस ओन वील्स, डेक्कन ओडिसी इत्यादी गाड्यांत त्यांच्या आवडीचे सामिष (बीफ,पॉर्क) आहार देतात का?

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 06/06/2018 - 07:38

In reply to by चिमणराव

गोमांस आहे म्हणून परदेशी लोकांना आवडेलच असं काही नाही. काही दिवसांपूर्वी मी ब्रिटनमधल्या भारतीय अन्नाबद्दल किरकीर करत होते. तेव्हा अमेरिकी बॉसनं बेल्जियममधल्या गोमांसावर टीका करायला सुरुवात केली. मग 'जेनू काम तेनू ठाय' यावर आमचं एकमत झालं.

काही अमेरिकी मित्रांना, पातळ डोसे घालता येतात, यामुळे माझ्याबद्दल अत्यंत असूया वाटते.

मात्र परदेशी लोकांसाठी मुद्दाम काही आहारबदल करायचा तर कमी तिखट, कमी जळजळीत, कमी मसालेदार वगैरे पर्याय दिले तर ते अधिक सयुक्तिक ठरेल.

चिमणराव Wed, 06/06/2018 - 10:35

आवडपेक्षा तो पर्याय ठेवणे रेल्वे टाळते का? (फारनर लोक कितीही वाराणसी/रुषिकेश(ऋ,)ला राहोत, माडिकेरी_कुर्ग,गोवा इथे जाऊन जिभेचा ओषटपणा घालवतातच/आणतात.

अभ्या.. Wed, 06/06/2018 - 11:26

अगेन थँक्स टू रेल्वे,
लै स्वस्तात आणि वेळेत पोहोचता येतंय.
पिंपले सौदागर ते सोलापूर गाठायचे म्हणजे नाशिक फाट्यावरून ओला किंवा रिक्षा करून स्वारगेट गाठायचे आणि बस पकडून सोलापूर म्हणजे 8 तास आणि 600 ला चुना. तेच कासारवाडीवरून सकाळीची लोकल पकडून स्टेशन, तेथून इंद्रायणी म्हणजे 5 तास आणि 130 रु. बेस्टच. निवांतच एकदम.

बॅटमॅन Thu, 07/06/2018 - 13:38

In reply to by अभ्या..

पुणे स्टेशन ते चिंचवड, निगडी वगैरे पट्ट्यातच फक्त जर लोकलची फ्रीक्वेन्सी वाढवली तरीही बरेच काही होईल. सध्या फक्त तासात एकदा असती.

घाटावरचे भट Thu, 07/06/2018 - 15:48

In reply to by बॅटमॅन

सध्या काही फेऱ्या फक्त तळेगावपर्यंतच असतात. त्या वाढवल्या तरी चालतील. मेट्रो निगडीपर्यंत नेली तरी बेष्ट.

फारएण्ड Fri, 08/06/2018 - 08:41

पुणे मेट्रो व एकूणच भारतातील दिल्ली व बहुधा कलकत्ता सोडल्यास इतर सर्व मेट्रो या स्टॅण्डर्ड गेज वाल्या आहेत असे वाचले. त्यामुळे रेल्वे लाइन्स वरून मेट्रो वर जाण्याकरता लोकांना गाडी व स्टेशन बदलण्याशिवाय पर्याय नसेल असे दिसते.

मुंबई विमानतळावरून सामानासकट लोकांना कोणत्यातरी ट्रेन ने गर्दीच्या भागातून बाहेर काढून पुणे, नाशिक व इतर जवळच्या शहरात पोहोचवण्याची व्यवस्था व्हायला हवी. तसा काही प्लॅन आहे का कल्पना नाही.

राही Fri, 08/06/2018 - 14:05

आम्हां भावंडांना अगदी लहान असल्यापासून विविध शैक्षणिक साधने हाताळण्याची संधी वडिलांमुळे मिळाली. मुंबई इलाख्याचा, द्विभाषिक मुंबई राज्याचा, मग महाराष्ट्र , भारत, अखण्ड भारत असे अनेक नकाशे घरी होते. रेल मार्गांचे विलीनीकरण आणि पुनर्रचना झाल्यानंतरचा एक मोठाच्या मोठा भारतीय रेल मार्गांचा नकाशा आमच्या इथे होता. वडील एक लाकडी रूळ घेऊन ते सर्व मार्ग आम्हांला दाखवीत. इटारसी, गुंटकल, रेणिगुंटा, भुसावळ अशी चित्रविचित्र नावे तेव्हा परिचयाची झाली आणि डोक्यात घट्ट रुतून बसली. आजूबाजूच्या मुलांमध्ये आमचे हे विशेष ज्नान आम्ही पाघळत असूं आणि आपापसात युरोपीय देश आणि त्यांच्या राजधान्या सांगण्याचा भेंड्यासारखा खेळ खेळत असूं. यामुळे बाकी काही नाही तरी भारतीय रेल आणि भूगोलामध्ये लहानपणापासूनच स्वारस्य निर्माण झाले .

चिमणराव Fri, 08/06/2018 - 16:24

प्रिन्सेस स्ट्रीट दवाबाजार रोडवर धावणाय्रा इलेक्ट्रिक बसमध्ये एकदा बसलो आहे. आवाज अजिबात येत नसे.

ट्रामने अरोरा थेटर( माटुंगा) ते राणीबाग गलो आहे. फार खडखडाट करत धावायची.

आताच्या मेट्रो छान वाटतात.
पश्चिम रेल्वेवर एसी लोकल खूप झाल्या आहेत. गारवा आहे परंतू एसीचा आवाज फार मोठा आहे. शांतपणे वाचन नाही जमणार. त्यापेक्षा गरीबरथ/एसी डबे मोठ्या गाड्यांची शांतता चांगली.

घाटावरचे भट Fri, 08/06/2018 - 17:47

मध्यंतरी कुठेतरी (बहुतेक खरडफळ्यावर) मीटर गेज इलेक्ट्रिक इंजिनाबद्दल चर्चा झाली होती. त्याचा एक नमुना चेन्नै येथील प्रादेशिक रेल्वे संग्रहालयात ठेवला आहे त्याचे फोटो इथे पहावयास मिळतील (फोटतली अवस्था बघितल्यास 'जतन करुन' असे म्हणावयास धजावत नाही). जपानी बनावटीचे इंजिन आहे (हिताची + मित्सुबिशी + तोशिबा).

अभ्या.. Fri, 08/06/2018 - 19:10

माझी एकच इच्छा राह्यली , त्या इन्स्पेक्शनच्या ट्रॉलीमध्ये बसुन फिरायची. मागनं चार लोकं ती ढकलायचे. दोन उड्या मारुन बसायचे. आता रेल्वेत नोकरी मिळणार नाही, तशा ट्रॉल्याही दिसेनात आजकाल.
काय तरी स्पेशल शब्द होता त्या ट्रॉलीला. आठवेना आता. :(
(रेल्वे व्हेन्डरकड्नं सव्वा लाखात होंडाचे इंजिन बसवलेली मिळते पण ती फिरवायची कुठे? ;) )

अभ्या.. Fri, 08/06/2018 - 23:09

In reply to by मार्मिक गोडसे

आठवले, पुश ट्रॉली तर प्रॉपर शब्द झाला.
रेल्वे भाषेत ह्याला लाडीस म्हणतात, लॅडिस नावाचा पत्त्याचा खेल पण असतो भौतेक.

चिमणराव Sat, 09/06/2018 - 12:48

माथेरानची मिनिरेल्वे जेव्हा उतरते तेव्हा चार तरुण दोन डब्यांमधल्या जागेत उभे राहून हँडब्रेक मारत राहाणे हे त्यांचे काम असते. गाडी वेगात खाली येताना वळते तेव्हा त्याबाजुला डबे चिकटतात त्यापासून वाचत काम करावे लागते. एकजण चिरडलाही गेला आहे. मला अगोदर वाटले हे विदाउट तिकिट जाण्याचा प्रयत्न करताहेत.

अभ्या.. Sat, 09/06/2018 - 14:12

In reply to by चिमणराव

तसलाच अजुन एक रिस्की आयटम म्हनजे तो ड्रायव्हरने मेटलचा गोळा टाकायचा आणि स्टेशन पोर्टर त्या रॅकेटसारख्या साधनाने कॅच करायचा. तो काय प्रकार कशासाठी असायचा ते अद्याप कळलेले नाही.

बोका Sat, 09/06/2018 - 23:37

In reply to by अभ्या..

तो मेटलचा गोळा म्हणजे ब्लॉक टोकन. अनेक ठिकाणी दोन स्टेशनांच्या मधे केवळ एकच गाडी पाठवता येते. (मुंबई सारख्या ठिकाणी अर्थातच असे नसते). जेव्हा पहिली गाडी पाठवली जाते, तेव्हा स्टेशन मास्तर ब्लॉक नावाच्या यंत्रातून एक गोळा काढून चालकाला देतो. हा गोळा मिळाल्याशीवाय चालकास गाडी पुढे नेण्यास परवानगी नसते. यंत्रातून एका वेळी एकच गोळा काढता येतो. चालक गोळा आपल्याबरोबर पुढच्या स्टेशनपर्यंत नेतो आणि पुढच्या स्टेशनच्या स्टेशन मास्तरना देतो. तो गोळा त्या स्टेशनच्या ब्लॉक यंत्रात टाकला जातो. त्यानंतरच दुसरा गोळा यंत्रातून (आधीच्या किंवा या स्टेशनच्या ) काढता येतो. चालक प्रत्येक स्टेशन ला एक गोळा परत करतो आणि एक गोळा उचलतो. हे चक्र चालू राहते. प्रत्येक दोन लगतच्या स्टेशनच्या जोडीत एक ब्लॉक यंत्रांची जोडी असते. या यंत्रणेमुळे दोन स्टेशनांच्या मधे केवळ एकच गाडी पाठवता येते.

चिमणराव Sun, 10/06/2018 - 04:23

यालाच की key म्हणतात. एकच रूळ जाण्या/येण्यासाठी वापरतात. एखादी काठीही असते किंवा वेताचे मोठे वळं ( hoop)
ते स्टेशन न घेता जाणारी जलद रेल्वे त्या स्टेशनात ते वळं घेण्यासाठी न थांबता कसं मिळवते हे पाहाणे मजेदार होते. मालगुडी डेजमध्ये चित्रासह आहे. २००५ पर्यंत पुणे - सातारा - कराड मार्गावर मी पाहिले आहे. ( बॅटमॅननेही पाहिले असेल.) नंतर सिमन्स कंपनीचे सिग्नल आले.

बोका Sun, 10/06/2018 - 19:41

In reply to by चिमणराव

मी प्रत्यक्ष पाहून आलोय. मॉडेल ट्रेनची अद्भुत दुनिया आहे. ते सर्व पाहून मी ही एक ट्रेन सेट विकत घेतला. पण जागेअभावी (आणि उत्साहाअभावी ! ) कपाटात पडून आहे.
हाम्बूर्ग ला गेलात तर नक्की बघा.

चिमणराव Sun, 10/06/2018 - 21:37

In reply to by बोका

२०१४ (बहुतेक)क्रिसमस निमित्ताने हे तासभर दाखवले होते. आतून/खालून दुरुस्ती कशी करतात हेसुद्धा. फारच आवडलेले.

चिंतातुर जंतू Tue, 12/06/2018 - 17:28

भारतातल्या सर्वात जुन्या पाच नॅरो गेज लाइन्स तशाच ठेवायचा निर्णय रेल्वेनं घेतला आहे. सर्व गुजरातमध्ये आहेत आणि महाराजा गायकवाडांनी त्या सुरू केल्या होत्या :
Running since 19th Century, five narrow gauge rail lines to stay

चिमणराव Tue, 12/06/2018 - 17:40

छान!
पुर्णा - खांडवा -उज्जैन मिटरगेज तशीच ठेवायला हवी होती.

आदूबाळ Wed, 13/06/2018 - 03:51

शुभदा गोगटे यांनी लिहिलेली 'खंडाळ्याच्या घाटासाठी' ही कादंबरी सर्व रेलप्रेमींनी जरूर वाचणे. मुंबईतला एक रूढार्थाने काहीच न जमलेला, धरसोड वृत्तीचा तरुण नव्यानेच तयार होत असलेल्या रेल्वे कंपनीच्या नोकरीत लागतो. ते काम त्याला जमतं, आवडतं. पदोन्नतीच्या आकांक्षेपोटी खंडाळ्याच्या घाटाच्या बांधणीच्या कामाला ओव्हर्सियर म्हणून लागतो. तिथे त्यावर कायकाय संकटं येतात, त्यातून तो कसा मार्ग काढतो, अशी 'मॅन वर्सेस नेचर' कादंबरी.

मूळ प्रकाशन केशव भिकाजी ढवळ्यांचं होतं बहुतेक. पण त्यांनी अध्यात्माची कास घट्ट धरून बाकी कासा सोडायचं ठरवल्यावर ही कादंबरी औटऑफप्रिंट झाली होती. दोनेक वर्षांपूर्वी अजब प्रकाशनाने आपल्या पन्नास रुपये मालेत नव्याने प्रकाशित केली आहे.

नितिन थत्ते Tue, 19/02/2019 - 23:12

हा जुना धागा वर काढला कारण एक बातमी आज फेसबुकवर सरकारची अचीव्हमेंट म्हणून शेअर केलेली पाहिली.
https://economictimes.indiatimes.com/industry/transportation/railways/m…

डिझेल लोकोचे इलेक्ट्रिक लोकोमध्ये रूपांतर केलेल्या पहिल्या लोको ला पंतप्रधानांनी हिरवा कंदील दाखवला वगैरे.

मला माहिती आहे त्याप्रमाणे डिझेल लोको हे डिझेल इलेक्ट्रिक लोकोच असतात. डिझेल इंजिनच्या सहाय्याने जनरेटर द्वारे वीज निर्मिती आणि त्यावर इलेक्ट्रिक मोटर चालणे अशी रचना असते. तर त्याचे इलेक्ट्रिक लोकोमध्ये रूपांतरण म्हणजे त्यातील डीझेल यंत्रणा काढून टाकून त्यावर पेंटोग्राफ बसवणे इतकेच असायला हवे. त्यात मोदींनी स्वत: उद्घाटन करण्यासारखे विशेष काय असेल?

या आधी फर्स्ट इंजिनलेस ट्रेन म्हणून असाच गवगवा झाला होता. (ज्याला आपण लोकल ट्रेन म्हणतो तशा) इंजिनलेस ट्रेन तर ब्रिटिशकाळापासून शेकडो आहेत.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 20/02/2019 - 00:52

In reply to by नितिन थत्ते

हे काम 'टोकन' आहे, याची तक्रार काही प्रमाणात समजते.

वीज तयार होते तिथे प्रदूषण आटोक्यात आणणं सोपं असतं, त्या हिशोबात धावत्या वाहनानं जाळलेलं डिझेल, पेट्रोलचं प्रदूषण आवरणं कठीण. दुसरं, वीज आपली आपण भारतातच तयार करू शकतो, पेट्रोल/डिझेल या गोष्टी आयात कराव्याच लागणार. वीज उत्पादनातली स्वयंपूर्णता आणि प्रदूषण कमी होणं या दोन्ही गोष्टी कदाचित सध्या स्वप्नवत असतीलही, मात्र अशक्य कोटीतल्या नाहीत. तिसरं, या प्रकल्पात काही प्रमाणात आव्हानं असणारच; ती पार पडण्याचा आनंदही रास्त आहे.

पंप्रंना मिरवण्याची हौस आहेच; निदान ही कामं झाली तिथे जाऊन मिरवलं नाही हे नशीब समजायचं! ही कामं संपल्यावर मिरवतात तेव्हाच किती काळ ही कामं सुरू होती, याची जाहिरात होत नाही; कोणाच्या पुढाकारानं कामं सुरू झाली आणि राहिली हेही मिरवलं पाहिजे. हे लोक मॅनेजर, अभियंते असणार; त्यांनाही ग्लॅमर मिळालं पाहिजे.

घाटावरचे भट Wed, 20/02/2019 - 12:54

In reply to by नितिन थत्ते

रेल्वेच्या दृष्टीने ही एक अचीव्हमेंट आहेच. पॅकेजिंगसाठी बरीच मेहेनत करावी लागली असे ऐकतो.

दुसऱ्या दृष्टीने पाहता हा रेल्वेचाच गाढवपणा आहे.
१. पेट्रोल कंपन्यांनी काही वर्षांपूर्वी रेल्वेला विशेष (म्हणजे कमी) दरात डिझेल देणं बंद केलं. साहाजिकच डिझेलवर खर्च वाढला.
२. इलेक्ट्रिक लोकोजची डेव्हलपमेंट आणि उत्पादन याकडे इतके दिवस अक्षम्य दुर्लक्ष केलं गेलं.
३. भरीस भर म्हणून नवीन सरकार आल्यावर रेल्वेमार्गांच्या विद्युतीकरणावर प्रचंड भर देण्यात आला.
४. त्या प्रमाणात विद्युत इंजिनांची निर्मिती वाढली नाही. त्यामुळे आता इलेक्ट्रिक लोकोजचं शॉर्टेज आहे आणि डिझेल लोकोज आवश्यकतेपेक्षा जास्त उपलब्ध आहेत. म्हणून अर्धं-अधिक कोडल लाईफ शिल्ल्क असलेली डिझेल लोकोज विजेवर चालण्यायोग्य बदलतायत.

डिझेल इंजिनच्या सहाय्याने जनरेटर द्वारे वीज निर्मिती आणि त्यावर इलेक्ट्रिक मोटर चालणे अशी रचना असते. तर त्याचे इलेक्ट्रिक लोकोमध्ये रूपांतरण म्हणजे त्यातील डीझेल यंत्रणा काढून टाकून त्यावर पेंटोग्राफ बसवणे इतकेच असायला हवे.

डिझेल इलेक्ट्रिक लोकोजमधील मोटर्स डीसी मोटर्स असतात. इलेक्ट्रिक लोकोजमधील (सध्याच्या सर्व) मोटर्स एसी मोटर्स असतात. तस्मात, त्यांची नियंत्रण प्रणालीही वेगळी असते. शिवाय इलेक्ट्रिक लोकोजमध्ये ओव्हरहेड वायर्समधलं २५ किलोव्होल्टचं व्होल्टेज कमी करण्यासाठी ट्रान्स्फॉर्मर्स लागतात. हे सगळं करणं आणि 'नुसता पेंटोग्राफ बसवणं' यात बराच फरक आहे.

नितिन थत्ते Wed, 20/02/2019 - 15:59

In reply to by घाटावरचे भट

म्हणजे यातल्या मोटर्स सुद्धा बदलल्या आहेत का? फक्त चासी आणि बॉडी तीच ठेवून आतला सगळा मसाला बदललाय?

मागे मुंबईच्या जुन्या लोकल्स डीसी च्या एसी केल्या तेव्हा त्यांना जुने काढून नवे पेंटोग्राफ आणि इतर प्रणाली बदलावी लागली. त्यात काही ग्रेट अचिव्हमेंट आहे असे मला वाटत नाही.
डीसी सीरिज मोटर्स एसीवरही चालतात.

घाटावरचे भट Wed, 20/02/2019 - 17:45

In reply to by नितिन थत्ते

>>म्हणजे यातल्या मोटर्स सुद्धा बदलल्या आहेत का? फक्त चासी आणि बॉडी तीच ठेवून आतला सगळा मसाला बदललाय?
माझ्या माहितीप्रमाणे हो. बोगी/ट्रक आणि ट्रॅक्शन मोटर्स (जे एकमेकांना जोडलेले असतात) WAG7 या जुन्या एसी इलेक्ट्रिक इंजिनाची वापरलेल्या आहेत आणि डिझेल इंजिन काढून इतर यंत्रणा २५केव्ही इलेक्ट्रिकलसाठी बदलण्यात आलेली आहे. खरे पाहता या जुन्या एसी इलेक्ट्रिक इंजिनांतही ट्रॅक्शन मोटर्स डीसीच आहेत आणि त्यांच्या बोगी/ट्रक्सही डिझेल इंजिनाच्याच पण थोड्याफार बदलून बनवलेल्या आहेत. नवीन इलेक्ट्रिक इंजिनांत (WAP7, WAG9 वगैरे) आणि डिझेल इंजिनांत (WDG4, WDP4 वगैरे) मात्र ३ फेज इंडक्शन मोटर्स वापरल्या जातात.

अजून एक मुद्दा - हे एक कन्व्हर्टेड इंजिन म्हणजे खरं तर दोन कन्व्हर्टेड इंजिनं एकमेकांना कायमची जोडलेली आहेत. एका जुन्या डिझेल इंजिनाची ताकद २६०० एचपी आहे, पण दोन इंजिनं जोडून बनवलेल्या या कन्व्हर्टेड इंजिनाची ताकद मात्र १०००० एचपी आहे. ही इंजिनं केवळ मालवाहतुकीसाठी वापरली जातील असे वाचले.

>>त्यात काही ग्रेट अचिव्हमेंट आहे असे मला वाटत नाही
ओक्के

अतिशहाणा Thu, 21/02/2019 - 17:51

In reply to by नितिन थत्ते

अहो, हे इंजिन दाखवलं नाही तर दुसरी अचिव्हमेंट काय दाखवणार मोदी? Demonization, राफेल की 56 इंच छातीने पाकड्यांना दिलेले सणसणीत उत्तर?

अबापट Wed, 20/02/2019 - 16:03

रेल्वेबद्दल अवांतर :
पॉल थरो नामे लेखकाने जगातल्या अनेक भागात रेल्वेने फिरून त्याबद्दल प्रवासवर्णने लिहिली आहेत . उत्तम आहेत .
१. द ग्रेट रेल्वे बझार : १९७५ साली लंडनमधून निघून इराण अफगाणिस्तान पाकिस्तान भारत संपूर्ण साऊथ इस्ट आशिया जपान आणि मग ट्रान्स सायबेरियन ( व्लाडिव्होस्टॉक मॉस्को .. तीच ती ७ दिवस वाली सगळ्यात लांब प्रवास असणारी डायरेक्ट ट्रेन ) परत लंडन .
अत्यंत वाचनीय : वेगवेगळ्या रेल्वे , त्यातील माणसे वगैरे (रेल्वेबद्दल तांत्रिक डिटेल्स नाहीत , सर्व ... )
२. घोस्ट ट्रेन टू इस्टर्न स्टार : याच मार्गावर परत तीस पस्तीस वर्षांनी प्रवास करून पुस्तक .
३. द ओल्ड पॅटागोनियन एक्सप्रेस : उसातील स्वतःच्या घरातून (MA )निघून पॅटागोनिया , दक्षिण अमेरिकेतील अर्जेन्टिना आणि चिलेचा दक्षिणेच्या टोकाचा भाग ..इथे सगळ्या देशातून ट्रेन ने केलेला प्रवास .
४. रायडींग द आयर्न रुस्टर : चीनमधील ...
अशी व अजूनहि काही पुस्तके आहेत त्याची .. सगळी वाचनीय आणि प्रवाही ..

'न'वी बाजू Sat, 11/01/2025 - 09:59

(धागा वर आणण्याकरिता तथा जुने प्रतिसाद दृश्य करण्याकरिता.)