Skip to main content

कारगिलजवळची हरका बहादूर बॉर्डर पोस्ट

कारगिलजवळची हरका बहादूर बॉर्डर पोस्ट
.

कारगिलमध्ये रात्र काढल्यानंतर सकाळी लेहला जाण्यास निघालो, तर एकाने सुचवले की तेथून जवळच द्रासच्या दिशेने एक बॉर्डर पोस्ट आहे. ती तुम्हाला वाघा बॉर्डरपेक्षाही पहायला आवडेल. ती जरूर पहा.

तर श्रीनगरकडून कारगिलकडे जाताना कारगिलच्या थोडेच आधी डाव्या बाजुला नदीवर एक पूल आहे. हरका बहादूर ब्रिज असे त्याचे नाव आहे.
या हरका बहादूर व त्यांच्या गोरखा साथीदारांच्या अचाट पराक्रमामुळे १९४८मध्ये कारगिलचा भाग पाकिस्तानात जाता जाता राहिला. हरका बहादूर राणा स्वत: तर त्या युद्धात शहिद झाले. आपल्याला सहसा १९९९च्या कारगिल युद्धाचीच माहिती असते. हमरस्त्याच्या एका बाजुला त्यांचे छोटेसे स्मारक आहे.

या ब्रिजपासून काही अंतर आत गेले की पाकिस्तानची सीमा लागते. तेथे पोहोचेपर्यंत अनेक मोठ्या खडकांवर Tagra Raho असे लिहिलेले दिसले. सीमेवर पोहोचलो तेव्हा कळले की तो भाग आसाम रायफल्सकडे आहे व त्यांचे घोषवाक्य आहे ‘तगडा रहो’. तसे जाटांचे घोषवाक्य आहे ‘जाट बलवान – देश भगवान’.

तेथील अगदी तरूण कॅप्टन अरुणाचलचा होता. माझ्या गाडीची MH12ची नंबरप्लेट पाहिल्यावर तो आवर्जून पुढे आला व सांगितले की तो एनडीएमध्येच ट्रेनिंगला होता. त्याच्याकडे पुण्याच्या अनेक चांगल्या आठवणी होत्या. त्याने एक गंमतीदार आठवण सांगितली. ट्रेनिंगचा भाग म्हणून त्यांना रात्री जंगलात सोडून देत असत. एक पैसा जवळ नाही की खायलाप्यायलाही जवळ काही नाही. पहाटपर्यंत काहीही करून एनडीएमध्ये परतायचे अशी अट असे. त्याने सांगितले की त्याने व त्याच्या मित्रांनी एक छान युक्ती शोधली होती. मध्ये कोणतीही वाडी लागली की तेथे मारूतीचे छोटे का होईना मंदिर असायचे. रात्री-अपरात्री तेथे जाऊन जोरात ओरडायचे ‘आई, भूक लागली’. त्यावर कोणी ना कोणी तरी त्यांच्या मदतीला यायचे. जेवायला तर मिळायचेच, शिवाय पुढे कसे जायचे याचे मार्गदर्शनही.

त्यांच्या तगडा रहो या घोषवाक्याबद्दल तो म्हणाला, की त्यांच्याकडे येणा-या पाहुण्यांना उद्देशून राम रामच्या ऐवजी तगडा रहो असेच म्हणतात. कोणी महिला भेट देणा-या असतील व त्यांना उद्देशून तसे म्हटले तर त्यांना ते विचित्र वाटते.

तेथे काही दिशा व अंतर दाखवणारे दगड होते. उदा. दिल्ली अमुक दिशेकडे व अंतर तमुक. तसे इस्लामाबादचाही दगड होता. दिशा दाखवली होती व आणखी लिहिले होते की Within Reach.

इथली सीमा अतिशय जवळ आहे. पन्नास मीटर असेल नसेल.

त्यांच्या बायनॉक्युलरमधून पाकिस्तानी जवान अगदी स्पष्ट दिसत होते. ते सगळे पंजाबी सलवार कुर्त्यामध्येच होते. एकाकडेही युनिफॉर्म नव्हता.

कॅप्टनशी बोलताना त्याला विचारले की कारगिलसारख्या प्रकरणी पाकिस्तानने आपली निव्वळ फसवणूक केली व तो भूभाग परत घेण्याच्या प्रयत्नात आपले अनेक जवान व काही अधिकारीही कामी आले. त्यावरून सीमेपलीकडील पाकिस्तानी सैनिकांबद्दल मनात चीड येत नाही का? माझी अपेक्षा होती की तो म्हणेल, हो, खूप राग येतो. पण तो म्हणाला की तेदेखील आमच्यासारखेच फौजी आहेत. जसे आम्हाला वरून आदेश येतात तसेच त्यांनाही. शिवाय यांच्याबद्दल चीड येत नाही. याचे कारण युद्धसदृश्य परिस्थिती नसेल तर यांचे हाल कुत्रे खात नाही. दुसरे काही येत नसेल, कुठेच नोकरी मिळण्यासारखी नसेल, तर मुलांना सैन्यात पाठवणे ही बाब पाकिस्तानात अगदी सामान्य आहे. तेव्हा इकडे आले तर काही पैसे घरी पोहोचतील, या आशेवर असे लोक फौजेत आलेले असतात. त्यांना वर्षातून एक युनिफॉर्म मिळाला तरी नशीब असते. थंडीच्या दिवसातही अनेकदा त्यांच्याकडे पुरेसे कपडे नसतात. पगाराचे पैसेही वेळेवर मिळत नाहीत.

याउलट चीनच्या सैनिकांची परिस्थिती. त्यांची परिस्थिती तर आमच्यापेक्षाही किती तरी सरस. त्यामुळे पाकिस्तानी सैनिक व चिनी सैनिक यांची तुलनाच करता येणार नाही, इतकी पाकिस्तान्यांची स्थिती वाईट असते.
आम्हाला परत कारगिलला जाऊन पुढे लेहला जायचे असल्याने त्यांचा निरोप घेतला.

श्रीनगरहून रस्त्याने लेहला जाणार असाल तर कारगिलच्या आधी द्रासमध्ये जे कारगिल युद्धाचे स्मारक आहे, त्यालाच लागून आर्मीचे एक म्युझियमही आहे. तेथे कारगिलवरची साधारण ४५ मिनिटांची व्हिडियो क्लिप दाखवतात. ती क्लिप फार सुंदर आहे. ती पूर्णपणे आर्मीच्या दृष्टिकोनातून केलेली आहे. द्रासला थांबल्यावर थोडा वेळ या चित्रफितीसाठी ठेवा व तसेच हरका बहादूर ब्रिजजवळील वर उल्लेख केलेल्या बॉर्डरपोस्टसाठीही.

तुमचा वेळ वाया गेला असे वाटणार नाही याची खात्री.

Node read time
3 minutes

ललित लेखनाचा प्रकार

3 minutes