Skip to main content

निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या सर्वांसाठी

मला खरोखर कौतुक वाटतं तुमच्या पिढीचं. साधारण सत्तरीच्या दशकातील बालपण. स्वातंत्र्य मिळून अजून तीस वर्षेही नसतील झाली. घरात सुबत्ता अशी नसायचीच. मोठ्या भावाची पुस्तके लहान भावाने किंवा बहिणीने वापरायची असा अलिखित नियमच होता त्यावेळी. नवीन कपडेही वर्षातून एकदाच घेतले जायचे. आईस्क्रीम, चोकोलेट म्हणजे चैनीच्या गोष्टी. कधीतरी खायच्या. हॉटेलात खाणे तर जवळजवळ वर्ज्यच. फार फार तर एखादी आंबोळी खायला जायचं तेही अवघडच. कार, स्कूटर म्हणजे तर विचारायलाच नको.खूप दूरच्या गोष्टी त्या सगळ्या. सायकल चालवायला मिळायची हीच मोठी गोष्ट होती. कडक आणि कर्मठ आजी आजोबा.वडीलही तसे करारीच. स्वाभिमानी, प्रत्येक गोष्ट मानापमान, संस्कार रीतीरिवाज यात मोजणारी , भिडस्त , शिस्तप्रिय अशी तुमच्या आधीची पिढी. मोडेन पण वाकणार नाही अशा बाण्याची. त्यांना सांभाळून घेणे कठीणच काम होतं. पण ते तुम्ही व्यवस्थित पार पाडलत. बायकांनी शक्यतो नोकरी करू नये अशी साधारण पद्धत त्याआधीची. तसे प्रमाणही खूप कमी. जर कुणी केलीच तर चारचौघांत कुजबुज व्हायची. ती जुनीपुराणी पद्धत सर्वप्रथम मोडून काढली तुमच्याच पिढीने. पुराणातली वांगी पुराणातच ठेऊन सत्य स्वीकारलत. उगाच आपल्या गरीबीचे स्वाभिमानी गोडवे गात आयुष्य घालवण्यापेक्षा दोघांनी नोकरी करून कष्ट केले तर चार पैसे कमावून आणि साठवून सुखाचं आयुष्य स्वत:लाही जगता येईल आणि मुलांनाही आनंद देता येईल हा विचार सर्वप्रथम तुम्हीच मांडला. आणि प्रत्यक्षात आणलादेखील. बचतीचे महत्व तुम्ही जाणलेतच पण तरीही सतत मन मारून हलाखीत आयुष्य काढणे म्हणजेच शहाणपण नव्हे हेही तुम्ही ओळखलेत. तसा विचार तुम्ही आम्हालाही दिलात. त्याबद्दल तुमचे आभार मानावे तितके थोडेच.
पण त्यासाठी तुम्हा लोकांना अनेक तडजोडीदेखील कराव्या लागल्या. खासकरून स्त्रियांना. मुलांना एकट सोडून दिवसभर राबणे. मग आल्यानंतर त्यांची काळजी घेणे.इतके सोपे नव्हते. मग अशावेळी पुरुष मंडळींनीदेखील आपला अहं विसरून हळूहळू घरकामात मदत करायला सुरुवात केली.निदान घरात इकडची काडी तिकडे करायला तरी शिकले. पण हे सर्व करताना स्वत:साठी वेळ मिळायचा का हो तुम्हा लोकांना? किंवा स्वत:साठी वेळ काढायला हवा हा विचार करण्यासाठी तरी वेळ मिळत असेल की नाही कोण जाणे. खूप राबलात.
पण येणाऱ्या पिढीला शक्य ते सर्व काही द्यायचा प्रयत्न केलात तुम्ही. पै पै साठवून नव्या वस्तू घेतल्या. मुलांना घेऊन दिल्या.खेळणी,नवे कपडे, नवीकोरी पुस्तके सर्व त्यांना वेळच्या वेळी मिळेल याची काळजी घेतलीत.
टीव्ही असो , फ्रीज असो किंवा वाशिंग मशीन त्या काळी तशा त्या वस्तू नव्यानेच देशाच्या बाजारात आलेल्या. चैनीच्या वस्तू म्हणूनच प्रसिध्द होत्या. पण तुम्ही बिनधास्त घेतल्या. आणि घेताना कपाळावर आठ्या नाही आणल्या कधी. दुसर्याने घेतल्या म्हणून नाकेही नाही मुरडली. किंवा आपण मुलांवर काहीतरी फार मोठे उपकार करतोय असा अविर्भावही नसायचा कधी तुमच्या चेहऱ्यावर.
नव्वदचं दशक ओलांडलं तसं हळूहळू भारत तंत्रज्ञानाच्या दिशेने नवे पाउल टाकू लागला. वर्षानुवर्षे चालत आलेल्या गोष्टी केरात जाऊन नव्या एकेक गोष्टी येऊ लागल्या. त्यातली सर्वात महत्वाची ‘चीज’ म्हणजे कॉम्प्युटर. कधीही न पाहिलेला. आजवर फक्त थोडाफार कुठेतरी ऐकलेला. त्यावर नेमकं काय आणि कसं करतात काहीच माहित नव्हतं. अशावेळी अचानक हे कॉम्प्युटरचं धूड तुमच्यासमोर येऊन पडलं आणि त्याचबरोबर तो वापरायला शिकण्याची जबाबदारीही. पण तुम्ही शिकलात. थोडं घाबरत , गोंधळत , हळूहळू का होईना पण जिद्दीने,चिकाटीने शिकलात.
एकीकडे जुन्या वळणांना चिकटून असलेली कणखर ताठ अशी आधीची पिढी आणि दुसरीकडे क्षणाक्षणाला बदलणाऱ्या जगात सहजतेने वावरणारी बदलांना सामोरी जाणारी ,थोडीशी स्वार्थी , practical असणारी पुढची पिढी. एकीकडे मुलांना संस्कार शिकवा बिघडू देऊ नका असे सतत सांगणारी आधीची माणसं तर दुसरीकडे स्वत:ला सतत बंधनात बांधून घेणे आणि तडजोड करत राहणे म्हणजे संस्कार नव्हेत असे ठासून सांगणारी आताची मुलं. तसे दोघेही बरोबर. पण दोघांना न दुखवता सांभाळून घेण्याची जबाबदारी तुम्ही पार पाडलीत.कधी याच्या कलाने आणि कधी त्याच्या , तुमची ओढाताण तर होत असणारच.
येणाऱ्या काळाशी जुळवून घेतलत. पिझ्झा,बर्गर,चायनीजफूड,नूडल्स पाहिल्यावर “शी! हा काय प्रकार” असे म्हणणाऱ्या आजीबाईंना तुम्ही समजावलेतच.पण त्याचबरोबर स्वत:ही ते सर्व आवडीने खाताना आपली भाजीभाकरी नाही विसरलात.
पाश्चिमात्य जे जे काही चांगलं असेल ते बिनधास्त घ्यायची मुभा दिलीत आम्हाला. त्याकाळी नवीन असलेली आमची जीन्स टी-शर्टची हौस पुरवलीत. नंतर तुम्हीही वापरायला शिकलात.
नोकरी करता करता स्वत:ची घरे बांधलीत. गाड्या घेतल्यात सुबत्ता आणलीत. मुलांवर आपले निर्णय न लादता त्यांना त्यांच्या मर्जीनुसार करियर करू दिलं. स्वत:च्या पायावर उभारू दिलं. “जे आम्हाला नाही मिळालं ते निदान मुलांना मिळू दे” या भावनेतून करत राहिलात सगळं.
आज आपण सर्वजण निवृत्तीच्या उंबरठ्यावर उभे आहात. आता नोकरीनंतरचे जीवन आरामात घालवू शकाल. स्वत:साठी वेळ देऊ शकाल. तुमची जागा आता आम्हाला घ्यावी लागेल.तुम्हा लोकांशी अनेक बाबतीत आम्ही असहमत असलो तरी तुम्ही आमच्यासाठी आमच्या सर्व पिढीसाठी केलेल्या गोष्टी आम्ही कधीच विसरू शकणार नाही.
हो, थोडे बिघडलो असू पण आम्ही इतकेही वाईट नाही. practical आहोत आम्ही पण पाषाणहृदयी नक्कीच नाही. आहोत थोडेसे चैनखोर पण पैशाची उधळपट्टी आम्हालाही आवडत नाही. खात असू बर्गर-पिझ्झा आवडीने पण झुणका-भाकरीची चव अजून विसरलेलो नाही. आहोत थोडेसे आळशी आणि निष्काळजी पण बेजबाबदार नक्कीच नाही. थोडी जास्तीच स्वप्ने पाहतो आम्ही हे खरंय.आमच्या पुढील पिढी आमच्यापेक्षाही हुशार , स्मार्ट आणि ध्येयवादी असेल. मोठी स्वप्ने पाहणारी असेल. पण मला विश्वास आहे. ही स्वप्ने जितकी मोठी होत जातील तितका आपला देश पुढे जात राहील.
बस तुमचे आशीर्वाद पाठीशी असूद्यात इतकीच इच्छा आहे.

Node read time
4 minutes

ललित लेखनाचा प्रकार

4 minutes

चिमणराव Sun, 03/01/2016 - 01:29

समाजातल्या एका गटाच्या पिढीचे(१९५० च्य आसपास जनमलेल्यांचे)त्यांच्या मुलांच्या पिढीविषयीचे विचार.नवीन पिढीस वाढताना इतरांशी संबंध आल्यावर कळलं आपल्याला मिळालेलं बाळकडू खरंच कडू होतं."एक हात तलावाच्या शिडीला घट्ट धरून पोहोत रहायचं ,पलीकडे पोहोचणार नाहीस परंतू बुडणार नक्की नाहीस.आम्ही असंच केलं."

पिवळा डांबिस Thu, 07/01/2016 - 00:46

निवृत्तीच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या पिढीच्या वतीने अनेक धन्यवाद.
आमच्या पूर्वीच्या पिढीच्या, 'ठेविले अनंते, तैसेचि रहावे', किंवा, 'अंथरूण पाहून पाय पसरावेत' अशा तत्वज्ञानाला झुगारून 'आपलं अंथरूणच इतकं मोठं करायचं की आपल्या परिवाराला त्यात अडचण न येता खुशाल लोळता यावं' ही महत्वाकांक्षा बाळगून जीवन घालवलं. एखादं पटणारं सामाजिक कार्य दिसलं तर त्याला नुसती शब्दांचीच सहानुभूती न दाखवता त्या कार्याला हातभार लावण्याची पात्रता कशी अंगी येईल हे पाहिलं.
काही निर्णय अचूक ठरले तर काही चुकलेही. पण त्या चुकलेल्या निर्णयांनीही बरंच काही शिकवलं, उदा. ह्या ग्लोबलायझेनशच्या भयाकारी लाटा छातीवर कशा तोलायच्या ते!
सहचर/ सहचरिणीच्या बुद्धिमत्तेला प्रोत्साहन देऊन मग त्याच्या/तिच्या करियरमुळे वाट्याला आलेली कामं परंपरागत चौकट मोडून केली. तीच शिकवण मुलांनाही दिली...
मुलांना लहानपणी फक्त कडेवर घेणं म्हणजे त्यांना अंगाखांद्यावर खेळवणं असं न मानता आपल्या मुलांचा प्रत्यक्ष खेळगडी होऊन त्यांना आमच्या पाठीचा घोडा, खांद्याची खुर्ची आणि पोटाची निजायला उशी करून दिली...
मुख्य म्हणजे आम्ही स्वतः करियर निवडतांना कशात पुरेसे पैसे मिळतील हा विचार त्यावेळेस मुख्य असला तरी आता आमच्या मुलांना त्यांची करियर निवडतांना, 'तुला जे काय आवडतं ते तू कर, पैशाची चिंता करू नकोस!' ही संधींची उपलब्धता प्राप्त करून दिली...

नवी पिढी ही वेगळी आहे, असणारच! पण ती बिघडलेली वा बेजबाबदार नाही, पाषाणहृदयी तर मुळीच नाही. तिचे विचार वेगळे आहेत, ते प्रकट करायची पद्धत तर भीषण आहे, पण मूल्य तीच आहेत.
अशा या नव्या पिढीला माझ्या हार्दिक शुभेच्छा!

अस्वल Thu, 07/01/2016 - 01:01

आणि भावनेने वगैरे ओथंबून जाण्याचा रस्ता टाळल्याने अजूनच आवडलं.