Skip to main content

वाडा चिरेबंदी- गॉन विथ द विंड ???

वाडा चिरेबंदी- गॉन विथ द विंड ???

मध्यंतरी ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित नव्या संचातील पुनरूज्जीवित 'वाडा चिरेबंदी' बघण्याचा योग आला. हे नाटक मी याआधी वाचलेले होते. परंतु नाटक वाचणे वेगळे आणि प्रत्यक्ष सादरीकरण वेगळे. मागच्या वेळेस चंद्रकांत कुलकर्णींच्यांच दिग्दर्शनात या नाटकाचे प्रयोग झाले तेव्हा मी प्राथमिक शाळेत होतो. त्यामुळे आज तिशीच्या उंबरठ्यावर असलेल्या आमच्या पिढीला भारतीय रंगभूमीच्या वाटचालीत मैलाचा दगड असलेले हे नाटक प्रत्यक्ष मंचावर पाहायला मिळेल अशी आशा नव्हती. टीव्ही-सिनेमातील 'स्टार' कलावंतांच्या नाममहिम्याचा फायदा घेणारी व्यावसायिक गणिते जुळवून का होईना पण निर्मात्यांनी पुन्हा एकदा हे धाडस केले याबद्द्ल त्यांचे अभिनंदन केलेच पाहिजे.

वरवर पाहता हे नाटक म्हणजे चार मध्यमवयीन बहीण-भाऊ, त्यांचे व त्यांच्या बायकामुलांचे आपसातले रागलोभ, इस्टेटीतून होणारे वाद, आधुनिक आयुष्याची ओढ बाळगतानाच परंपरा जपण्याची धडपड आदी 'कहाणी घर घर की' सांगणारे एक साधे कुटंबनाट्य आहे.त्यामुळे टीकाकारांच्या मते त्यात काय एवढे कौतुक करण्यासारखे? परंतु त्या काळात रंगभूमीवर प्रचलित असलेला कुठलाही 'नाटकी'पणा येऊ न देता साध्या, सोप्या रोजच्या बोलीभाषेत रंजक अशी गोष्ट सांगणे आणि ती तेवढ्याच प्रभावीपणे रंगमंचावर सादर करणे हे निश्चितच सोपे नाही.

साधारणत: नाटक-सिनेमा वा एरवीही कथात्म साहित्याचा विषय आला की त्यातील पात्रांना सरधोपटपणे काळा-पांढरा रंग देऊन कथाकार मोकळे होतात आणि वाचक-प्रेक्षकांनाही तशीच सवय लागते. परंतु वास्तव आयुष्य हे इतके एकरंगी, कृष्णधवल नसते तर ते एकाच वेळी रंगीबेरंगी, स्वच्छ, गढूळ व अत्यंत व्यामिश्र, गुंतागुंतीचे असते. म्हणून पात्रांना विशिष्ट रंगात रंगवण्याच्या पारंपरिक नाटकीय मागणीला दुर्लक्षून त्यांना वास्तवाच्या जवळपास नेऊन ठेऊन मग नाट्य उभे करणे हे या नाटकाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. त्यामुळेच मग प्रेक्षक नाटकातील पात्रांच्या सामाजिक पार्श्वभूमीवरचा नसला तरी नाटक पाहणार्‍‍याला आपले वाटते कारण थोड्याफार फरकाने ही प्रत्येकच घराची गोष्ट असते.

लेखकाने गोष्ट सांगण्यासाठी एखादी विशिष्ट पार्श्वभूमी निवडणे यामागे अनेक कारणे असतात. त्याच्या 'अप ब्रिंगिंग'च्या दृष्टीने असलेला एक 'कम्फर्ट झोन' हे एक कारण असतेच. हा काही कमीपणा नसून एक क्रिएटीव्ह आणि प्रॅक्टिकल सोय असते. नाहीतर लेखकाला सर्वस्वी अपरिचित पार्श्वभूमी उभी करताना प्रचंड 'रिसोर्सेस' ख्रर्ची पडतात आणि त्यामुळे वातावरणनिर्मिती करण्याच्या नादात कथेचा आत्माच हरवण्याची शक्यता राहते. त्यामुळे नाटककारावर होणार्‍या ब्राह्मणवादाच्या आरोपात फार काही तथ्य आहे, असे मला वाटत नाही.

महाभारताबद्दल तो ग्रंथ म्हणजे 'जय नावाचा इतिहास आहे' असे खुद्द त्याच्या रचनाकर्त्यानेच सांगून ठेवले आहे. त्याचप्रकारे 'वाडा चिरेबंदी' किंवा 'वाडा चिरेबंदी' हा ज्याचा पहिला भाग आहे अशी 'युगान्त' ही नाट्यत्रयी ही काही निव्वळ एकाच कुटुंबाच्या तीन-चार पिढ्यांची कहाणी नाही तर धरणगावकर देशपांड्यांच्या कथेतून उलगडत जाणारा, 'साडेतीन टक्क्यां'तील काहीच टक्क्यांचा का असेना पण एक कथात्म इतिहास आहे. महाराष्ट्राच्या लोकजीवनातील स्थित्यंतरांचे फारसे डॉक्युमेंटेशन कथात्म साहित्य/कलांत झालेले नाही हा तसा जुनाच आरोप. काही प्रयोग झाले तरी ते मुंबई, लालबाग, गिरणी कामगार संप वगैरे पुरते मर्यादित राहिले. याला कारण म्हणजे नाट्य-चित्रपटक्षेत्रावर असलेला मुंबई-पुण्याचा प्रभाव. त्यामुळे महाराष्ट्राच्या अंतर्गत भागातील समाजजीवनाचा सतत बदलता असा विस्तीर्ण पट उलगडवून दाखवणार्‍या कलाकृती तशा कमीच. या पार्श्वभूमीवर 'वाडा चिरेबंदी' उठून दिसतो.

'वाडा'सारखे नाटक जेवढे मंचावर घडत असते त्यापेक्षा ते सेटमागच्या काळ्या अवकाशात मोठ्या प्रमाणात घडत असते. अशा नाटकांच्या बाबतीत पात्रांच्या संवादांतून, मौनातून, हालचालीतून सेटमागच्या अवकाशात होणारे इतिहासाचे आणि वर्तमानाचे प्रोजेक्शन नटांना व प्रेक्षकाला नीट समजून घ्यावे लागते. त्यासाठी दोघानांही एक वेगळ्या प्रकारची रूची, अभ्यास व सराव लागतो तरच दोघांनाही अशा नाटकांचा खरा 'बौद्धिक' आनंद घेता येतो. ही अशा प्रकारच्या नाटकांची व एरवीही नाट्यमाध्यमाचीच अंगभूत मर्यादा आहे व बलस्थानही. त्यामुळेच हे नाटक, करणारा आणि पाहणारा, दोघांनांही आव्हान देणारे आहे. परंतु याच कारणामुळे सध्या या नाटकाला होणार्‍या गर्दीचे कारण समजून घेताना थोडा गोंधळ होतो.

माझ्या आकलनाप्रमाणे विदर्भात या नाटकाला मिळालेला प्रतिसाद हा प्रामुख्याने स्मरणरंजनातून आलेला आहे तर मुंबई-पुणे पट्ट्यात मिळणारा प्रतिसाद हा नावीन्य व काही प्रमाणात स्मरणरंजन यामुळे मिळालेला आहे. भारत गणेशपुरे, मकरंद अनासपुरे व टीव्हीवरील इतर स्टॅण्डअप कॉमेडीअन्सनी लोकप्रिय केलेल्या वर्‍हाडी-मराठवाडी बोलीभाषांमुळे आणि गेल्या काही वर्षात या दोन्ही भागातून रोजगारासाठी होत असलेल्या प्रचंड स्थलांतरामुळेही पश्चिम महाराष्ट्रात मराठीच्या प्रादेशिक बोलींबाबत असलेली अढी व तिथल्या स्थानिक बोलीभाषेबद्दल असणारा श्रेष्ठत्वगंड थोडा निवळला आहे. पण वरील कारणांसोबतच टीव्ही-सिनेमातील कलाकारांना प्रत्यक्ष 'परफॉर्म' करताना बघायला मिळणे याचे आकर्षण हेसुद्धा नाटकाच्या यशस्वीतेमागचे मुख्य कारण आहे असे वाटते.

'वाडा चिरेबंदी' च्या लिखाणाबद्दल अभिप्राय मांडण्याइतका माझा अभ्यासही नाही की अधिकारही नाही परंतु एक सर्वसामान्य रसिक म्हणून काही गोष्टी जाणवतात. हे सुमारे पस्तीस वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेले नाटक. या पस्तीस वर्षात पूर्णेतून बरेच पाणी वाहून गेले आहे. त्यामुळे हे नाटक त्याकाळात प्रासंगिक असेलही पण आजही ते एक कथा म्हणून प्रासंगिक आहे की 'शोले'मधील ठाकूरला वाटते तशी 'वक्त की दीमक'ने या वाड्याचे बुरुज 'खोखले' करून टाकले आहेत का अशी मला शंका येते.

मुंबई-पुण्याइतकं तीव्र आणि अ-मानवीय नसले तरी विदर्भातसुद्धा शहरीकरणामुळे होणारे कुटंबव्यवस्थेचे आणि समूहजीवनशैलीचे (कम्युनिटी लाईफ) विखंडन ही एकदिश आणि अपरिवर्तनीय प्रक्रिया आहे, हे वास्तव आहे. विदर्भातील किंवा महाराष्ट्रातील इतर भागांचाही विचार केला तर वाडा संस्कृती, एकत्र कुटुंबपद्धती शेवटची आचके देत असताना पाहिलेली आमची बहुधा शेवटची पिढी. 'वाडा चिरेबंदी'त दाखवल्याप्रमाणे साधारणत: ऐंशीच्या दशकात सुरू झालेल्या कुटुंबविभाजनाच्या प्रक्रियेने नव्वदच्या 'अस्वस्थ' दशकात वेग घेतला आणि नंतर आता चालू दशकात ती पूर्ण होत आली आहे. वानगीदाखल, आमच्या आई-वडीलांच्या पिढीतले जवळचे नातलगही आता फक्त कार्यप्रसंगापुरतेच एकत्र येताना दिसतात, आमच्या पिढीची तर गोष्टच सोडा. आमच्या आधीची पिढी एकदा संपली की त्यांच्या 'कुटुंबा'त आज एक-दोन भाऊ-बहिणींच्या रूपात उरलेले आम्ही एकांडे शिलेदार ही व्यवस्था चालवू शकू की नाही याची खात्री नाही. परंपरेशी असलेली नाळ जोडून ठेवण्याचा आमच्या पिढीने कितीही प्रयत्न केला तरी त्याचा प्रभाव मर्यादित आहे. म्हणूनच अशा परिस्थितीत 'वाडा' सारखी नाटके कितपत प्रासंगिक राहिली आहेत, असा विचार मनात येतो. की त्यांना आता फक्त एक नॉस्टाल्जिक वा व्हिंटेज मूल्य राहिले आहे ? तसेच केवळ असे व्यावसायिक मूल्य आहे म्हणून आपण जुन्या सिनेमांचे रिमेक, जुन्या नाटकांचं पुनरूज्जीवन , जुन्या गाण्यांचं रिमिक्स, जुन्या कथा-कादंबरी पात्रांचे पुन्हा-पुन्हा सिनेमाकरण-नाटकीकरण कुठवर करणार आहोत,हा सुद्धा एक वेगळा विषय या निमित्ताने चर्चिला जाणे आवश्यक आहे. पण या पुनरूज्जीवनाच्या अनुषंगाने काही नवीन मुद्द्यांचा ऊहापोह करणेही गरजेचे वाटते.

'वाडा चिरेबंदी' ही एक अभिजात कलाकृती आहे असे ज्येष्ठ मंडळी म्हणतात. परंतु अभिजात म्हणजे काय? अक्षर वाड्मय म्हणजे काय ? आजपासून पन्नास वर्षांनी आपण हेच नाटक पुन्हा उभे करून यशस्वी करू शकू का? उदा. आजच्या नाटकाच्या नेपथ्याचे डिझाईन आपल्याकडे जतन केलेले नसेल तर आपण ते नेपथ्य नेमके पुन्हा उभे करू शकू का ? आजच या नाटकाचे प्रयोग बघताना त्यातील कलावंत नाटकातील प्रादेशिक संस्कृतीशी फारसे परिचित नसल्यामुळे (केवळ 'करून राहलो, जाऊन राहलो' म्हटल्याने वर्‍हाडी होता येत नाही) जरा अवघडल्यासारखे वाटतात. तरीही सादरीकरण, अभिनय, लकबी, लहेजा यासारख्या गोष्टी या एकवेळ प्रयत्नाने, अभ्यासाने जमण्यासारख्या आहेत. परंतु हे नाटक करत असलेले कुटुंबांच्या अवस्थेबद्दलचे जे एक अनेकपदरी व्यापक स्टेटमेंट आहे तिचे आकलन आणि अपील भविष्यातही तसेच असेल का ? नाटकातील पात्रे जे जगले तसे आयुष्य न पाहिलेले भविष्यकाळातील कलावंत, दिग्दर्शक आणि प्रेक्षक यांचा नाटकाकडे पाहण्याचा दृष्टीकोन कसा असेल ?

'गॉन विथ द विंड' या जगप्रसिद्ध कादंबरीवरील त्याच नावाच्या चित्रपटाच्या उपसंहारात सांगितल्याप्रमाणे ती, वार्‍यासोबत वाहून गेलेल्या एका संस्कृतीची कहाणी आहे. त्याचप्रमाणे वार्‍यावर वाहत नाहीशी होत चाललेली, नाटकात दाखवलेली ,जिला वर्‍हाडात खोचकपणे 'देशपांडेशाही' म्हणतात ती संस्कृती आपल्या प्रेक्षकांपुरती तरी नाट्यगृहाच्या अवकाशात बंदिस्त करण्यात तेव्हाचे समकालीन पण आता ऐतिहासिक झालेले 'वाडा चिरेबंदी' नाटक व नाटककार आज तरी यशस्वी झाले आहेत. ते येणार्‍या काळातही असेच यशस्वी होईल का, हे मात्र काळच सांगू शकेल.

-अ.अ.वा.
http://aawaghmare.blogspot.in/

समीक्षेचा विषय निवडा

अरविंद कोल्हटकर Mon, 07/12/2015 - 19:14

परिचय आवडला. भारताबाहेरील प्रेक्षकांना नाटक प्रत्यक्ष पाहण्ञ्सा मिळणे दुरापास्त आहे पण apalimarathi.com वर येईल तेव्हा संगणकाच्या पडद्यावर मिळेल.

ज्यांना अशा कथानकांची आवड आहे त्यांना अजून काही नावे सुचवितो. सुमित्रा भावेनिर्मित 'वास्तुपुरुष' नावाचा चित्रपट यूट्यूबवर येथे उपलब्ध आहे. 'देव चालले' ही दि.बा. मोकाशींची लघुकादंबरी आणि श्री.ज.जोशींची 'वंशवृक्ष' ही कादंबरी ह्या सर्व कृति अशाच ग्रामीण महाराष्ट्रातील जुने कुटुंब काळाच्या समोर वाहून जातानाचे चित्रण करतात.

परिकथेतील राजकुमार Tue, 08/12/2015 - 20:44

पण एक जेष्ठ श्रेष्ठ नाट्यसमिक्षक आहेत, त्यांनी वर्तमानपत्रात कुठल्याही नाटकाचे परिक्षण लिहीलेना की ते नाटक जास्ती डोक्याला शॉट देणारे आहे का त्यांचे लेखन जास्ती शॉट लावणारे हे कळतच नाही. एखाद्या अतिशय सुगम आणि हलके फुलके सुंदर नाटक देखील त्यांचे परिक्षण वाचले की भयाण वाटायला लागते.

तुमचे परिक्षण त्याच्याच जवळपास जाणारे आहे.

मुंबई-पुण्याइतकं तीव्र आणि अ-मानवीय नसले तरी विदर्भातसुद्धा शहरीकरणामुळे होणारे कुटंबव्यवस्थेचे आणि समूहजीवनशैलीचे (कम्युनिटी लाईफ) विखंडन ही एकदिश आणि अपरिवर्तनीय प्रक्रिया आहे, हे वास्तव आहे.

शष्प काही कळाले नाही? साध्या सोप्या मराठी शब्दात नाही सांगता येणार का?

परंतु हे नाटक करत असलेले कुटुंबांच्या अवस्थेबद्दलचे जे एक अनेकपदरी व्यापक स्टेटमेंट आहे तिचे आकलन आणि अपील भविष्यातही तसेच असेल का ?

अहो नाटक शक्यतो 'मनोरंजन' म्हणून बघायला जावे हो. हे म्हणजे स्वामींचा फोटो लावलेल्या प्रत्येक प्रोफाईलवाल्याने सदगुरुच असावे किंवा निरुपणच करत रहावे अशी आशा धरण्यासारखे आहे.

एक सामान्य प्रेक्षक आणि वाचक म्हणून माझे मत नोंदवले आहे. तुमच्या अभ्यासू वृत्तीची थट्टा उडवण्याचा हेतू नाही.

आदूबाळ Tue, 08/12/2015 - 21:41

In reply to by परिकथेतील राजकुमार

पण एक जेष्ठ श्रेष्ठ नाट्यसमिक्षक आहेत, त्यांनी वर्तमानपत्रात कुठल्याही नाटकाचे परिक्षण लिहीलेना की ते नाटक जास्ती डोक्याला शॉट देणारे आहे का त्यांचे लेखन जास्ती शॉट लावणारे हे कळतच नाही.

माधव वझे का? त्यांची साप्ताहिक सकाळमधली परीक्षणं वाचून नाड्याच थंड झाल्या होत्या.

धनंजय Wed, 09/12/2015 - 01:19

In reply to by परिकथेतील राजकुमार

मुंबई-पुण्याइतकं तीव्र आणि अ-मानवीय नसले तरी विदर्भातसुद्धा शहरीकरणामुळे होणारे कुटंबव्यवस्थेचे आणि समूहजीवनशैलीचे (कम्युनिटी लाईफ) विखंडन ही एकदिश आणि अपरिवर्तनीय प्रक्रिया आहे, हे वास्तव आहे.

शहरे बोकाळली की कुटुंबांची घडण आणि समाजतला वावर मोडकळीस येतात. पुण्या-मुंबईत ही प्रक्रिया टोकाची झाली आहे, माणुसकी मुळीच राहिली नाही. तितकी वाईट परिस्थिती विदर्भात आलेली नाही. पण ही प्रक्रिया होतच राहाणार, बदलता येणार नाही, हे वास्तव आहे.

(माझ्या मते गुंतागुंत सोडवायचा अतिरेक केला, तर विणलेले उसवते. इथे तसेही झाले आहे.)

*राठ केसांकरिता वर वेगळा शब्प** वापरलेला आहे
**शब्द

ए ए वाघमारे Wed, 09/12/2015 - 08:50

In reply to by परिकथेतील राजकुमार

प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

अहो नाटक शक्यतो 'मनोरंजन' म्हणून बघायला जावे हो. हे म्हणजे स्वामींचा फोटो लावलेल्या प्रत्येक प्रोफाईलवाल्याने सदगुरुच असावे किंवा निरुपणच करत रहावे अशी आशा धरण्यासारखे आहे.

साध्या सोप्या मराठी शब्दात नाही सांगता येणार का?

मान्य आहे.माझेही तेच म्हणणे आहे. पण 'वाडा चिरेबंदी'सारख्या नाटकाबाबत प्रायोगिक नाटककार, अभिजन रसिक, साक्षेपी संपादक, ज्येष्ठ समीक्षक इ.इ.नी इतकी हवा(योग्य की अयोग्य तो भाग वेगळा)करून ठेवली आहे.या नाटकाचे महात्म्य,तिची पाश्चात्य साहित्याशी केलेली तुलना,मौन,विराम इ.इ. बाबतीत कौतुक खूप झाले आहे.त्यातून अनेकांनी अनेक अर्थ शोधले आहेत.'कोसला'(?)सारखाच एक अभिनिवेशी समर्थक ग्रूप तयार झाला आहे.प्रायोगिक नाटके,फिल्म फेस्टीव्हलमधील प्रायोगिक सिनेमे,अचकट-विचकट अ-वाचनीय अश्लीलतेजवळ पोचणारे'नव्वदोत्तरी' वगैरे लिखाण याबाबतीत भरभरून बोलणारा हा एक कॉमन वर्ग आहे(अवांतर:याच वर्गातले बरेच लोक स्वत:ला पुरोगामी म्हणवून घेताना दिसतील).निर्मात्यांनी जरी ५००-८००-१०००अशी तिकिटे ठेवून पैसा कमावला(मला त्याबद्दल आक्षेप नाही,तो एक धंदा आहे)तरी या वर्गातील लोकांना या नाटकाला कुणी व्यावसायिक किंवा मनोरंजनप्रधान म्हणले की स्वत:चा व नाटकाचा अपमान वाटतो. ज्या गोष्टीने मनोरंजन होते ती ग़ौणच आहे, ती अभिजात नव्हे वगैरे वगैरे समजुती अजूनही बर्‍याच सुज्ञ रसिकांच्या मनात घट्ट आहेत.म्हणूनच मग एवढ्या ग्रेट नाटकाबद्दल एक अज्ञ रसिक म्हणून अशाच सुज्ञ भाषेत अशी तपासणी करणे भाग पडते.

तरी प्रयोगाबद्दल मी लिहिण्याचे टाळले आहे.ते नंतर कधीतरी.
धन्यवाद!

सर्व_संचारी Mon, 21/12/2015 - 17:47

सुरुवातीला थोडे नाटकाबद्दल आणि नाटककाराबद्द्ल : वाङा हे महत्वाचे नाटक आहेच , त्यात शंकाच नाही. आणि त्यातूनही मराठी मध्ये नाट्यत्रयी ही एकमेव असावी. एकत्र कुटुंबाचा इतका मोठा पट नाट्य-माध्यमात मांडण्याची आव्हानात्मक कामगिरी एलकुंचवार यांनी केली आहे. एलकुंचवार यांच्याशी कधी बोलण्याची संधी मिळाली तर पहा. स्वतः महेश दा अत्यंत जागरूक आणि प्रामाणिक आणि अत्यंत मनस्वी , इंटेन्स आहेत. त्यांची लेखक/नाटककार म्हणून घडण्याची प्रक्रिया ही काही पुस्तकांमधून , कधी काही मुलाखतीन मधून तुम्हाला सापडेल आणि खाली दिलेल्या भाषणात देखील त्याबद्दल काही सूचित केलं आहे.

तुमचा मुद्दा समजला आणि तो बरोबरच आहे. तुम्हाला ( तुम्ही म्हणता तसं आजच्या नवीन पिढीला- कारण या नाट्यत्रयीचा ९ तासाचा प्रयोग मी पाहिला आहे / तेव्हा तुम्ही प्राथमिक शाळेत होतात) हा प्रयोग किंवा हा ऐवज ( कंटेंट ) जर कालबाह्य झाल्यासारखा वाटत असेल / त्याची तीव्रता कमी झाल्यासारखं वाटत असेल तर मला यात आश्चर्य वाटणार नाही. किंबहुना तसं असेल तर या नवीन पिढीवर स्वतःचं नाटक शोधण्याची जबाबदारी आहे असा त्याचा अर्थ होतो. म्हणून वाडा हे नाटक एवरग्रीन आहे वगैरे याबद्दल वाद न घालता त्वरेने स्वतः च नाटक लिहायला घ्या. तेंदुलकर , एलकुंचवार या ( आता आपल्याला जुने वाटू शकतील असे लेखक /नाटककार) लोकांनी त्यावेळच्या जुन्या नाटकांना नाकारून , स्वतः चं माध्यम शोधण्याचा प्रयत्न केला, अगदी तसेच नवीन पिढीला करावे लागेल , म्हणजे नाटकाचे अजून काही नवीन पैलू सापडू शकतील.

इथे या नाटककाराच्या एका बऱ्यापैकी ताज्या भाषणाचा विडीओ :
https://www.youtube.com/watch?v=PhtwrVzx3lc

सर्व_संचारी Mon, 21/12/2015 - 17:55

"त्यांना आता फक्त एक नॉस्टाल्जिक वा व्हिंटेज मूल्य राहिले आहे ? तसेच केवळ असे व्यावसायिक मूल्य आहे म्हणून आपण जुन्या सिनेमांचे रिमेक, जुन्या नाटकांचं पुनरूज्जीवन , जुन्या गाण्यांचं रिमिक्स, जुन्या कथा-कादंबरी पात्रांचे पुन्हा-पुन्हा सिनेमाकरण-नाटकीकरण कुठवर करणार आहोत,हा सुद्धा एक वेगळा विषय या निमित्ताने चर्चिला जाणे आवश्यक आहे. पण या पुनरूज्जीवनाच्या अनुषंगाने काही नवीन मुद्द्यांचा ऊहापोह करणेही गरजेचे वाटते"-

अगदी योग्य !! परंतु माझ्या निरीक्षणा नुसार जुन्या/पारंपारिक म्हणता येईल अशा कलाकृती मध्ये देखील आजही अनेक शक्यता सापडू शकतात , फक्त त्या आपण शोधत नाही आणि त्याला - व्यावसायिक- कारणे पुष्कळ असावीत. मुळात - वाडा - सारखी नाटके ही व्यावसायिक नाटक डोळ्यासमोर ठेवून लिहिली/पर्फोर्म केली गेली नव्हती, त्यात नाटकाचा शोध घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न होता. अजून एक उदाहरण देतो : दिवाकरांनी कमालीच्या नाट्यछटा लिहून ठेवल्या आहेत. परंतु आपण ते मटेरीअल त्याच त्याच प्रकारे पाहतो /ऐकतो. वास्तविक नवीन तंत्र आणि रंगमंचाला आजवर मिळालेल्या अनेक नवीन गोष्टी लक्षात घेता आपल्याला याचं नवीन / सर्वस्वी अनोखं असं इंटरप्रीटेशन करता येईल. पण आपण ते करीत नाही!

ऋषिकेश Mon, 28/12/2015 - 09:41

व्वा! मला परिक्षण आवडले. हे नाटक वाचले आहे. बघायचा योग आलेला नाही.

==

नव्वदोत्तरी या यंदाच्या दिवाळी अंकाच्या पार्श्वभुमीला विषय साजेसा आहे (खरंतर ही प्रक्रिया साठोत्तरीत सुरू झालेली)

अनुप ढेरे Mon, 28/12/2015 - 09:57

कालच हे नाटक पाहिलं. वर म्हटल्याप्रमाणे वर्‍हाडी भाषा थोडी ओढून ताणून आणल्यासारखी वाटली. मेबी या कलाकरांना 'नॉर्मल' बोलतानाच जास्तं ऐकलं आहे म्हणून वाटल.
विषय तसा जुनाच आहे. बडा घर पोकळ वासा + रूढी परंपरांच अवडंबर ( जे त्या ट्रॅक्टरने सिंबलाइज केलय. उपयोग शून्य पण जाता येता लोक त्यावर ठेचकाळणार) + ग्रामीण-शहरी प्रवास. ग्रामीण-शहरी प्रवास सत्तरीत किती चर्चेचा विषय होता माहिती नाही. पण अजूनही गावाकडे मुळ असलेल्या लोकांकडून ऐकलं आहे की जे शहराकडे गेले त्यांच कल्याण झालय आणी जे मागे राहिले ते खडतर जगतायत. नाटकातही हेच दाखवलं आहे. आता आज जे जाणवतं ते तीस-पस्तीस वर्षापूर्वी नाटककाराने पाहिलं असेल तर कौतुकास्पद आहे. दागिने घालताना वाटणार्‍या भावनांच वर्णन उल्लेखनीय. दोघींचं

आणि एरवी जेमतेम अर्धं भरणारं प्रेक्षागृह फुल्ल होतं.