Skip to main content

कातरवेळ

फिकट झालेत पश्चिमेला, क्षितिजावरचे रंग
क्षितीज झालंय आभाळाच्या, निळाईमध्ये दंग

उरली आहे क्षितिजावरती, अंधुक एक पिवळी रेघ
क्षितिजाच्या पल्याड दूर, बरसणारा कृष्णमेघ

अंधाराच्या शून्यात क्षितीज, कुणाला एवढं शोधतंय ?
आर्त गहिऱ्या निळाईत, वेडं स्वतःच हरवतंय !

क्षितिजाच्या मनात उठलंय, चांदण्यांचं काहूर
अंतरात मंतरलेली… अनाहत हुरहूर

वाऱ्यासारखं सैरावैरा, मनासारखं अधीर झालंय
क्षितीज त्याच्या क्षितीजासाठी, केवढं सैरभैर झालंय

शांतपणे रात्र दुरून, पाहतीये सारा खेळ
पांघरतीये क्षितिजावरती, गर्द निळी कातरवेळ…

मिसळपाव Fri, 01/05/2015 - 14:20

थोडी "चिंगारी कोई भडके"च्या शब्दांची आठवण करून देणारी. विशेषतः या ओळी;

क्षितीज त्याच्या क्षितीजासाठी, केवढं सैरभैर झालंय


अवांतरः गवि, अशी एखादी कविता त्या "शून्य प्रतिसाद मिळालेल्या लेखनात ५०% कविता असतात" गटात नाहि मोडत ;)

उदय. Fri, 01/05/2015 - 20:40

आवडली. उन्हामागून चालत येते गार गार कातरवेळ हे "गारवा"चे शब्द अचानक आठवले.

तिरशिंगराव Sat, 02/05/2015 - 09:37

गारवा हा काखांना सुखावणारा असतो, असं नुकतंच कळालं अन तेही ऐसीवरच.

राहुल बनसोडे Tue, 06/03/2018 - 20:14

खुप छान आहे कविता.