Skip to main content

Digitization विषयक भारतातील अनास्था.

माहितगारमराठी ह्यांच्या ’उस्मानियाच्या ऑनलाईन डिजिटल ग्रंथालयात १४०० मराठी पुस्तके’ ह्या http://www.aisiakshare.com/node/3070 येथील धाग्यावरून पुढील लिखाणाचे कारण मला मिळाले. माहितगारमराठी ह्यांच्या लिखाणाचे उद्दिष्ट एक विकीपान निर्माण करणे हे असल्याने पुढील लिखाण आणि त्यावरील चर्चा तेथे अप्रस्तुत ठरेल म्हणून हा वेगळा धागा निर्माण करीत आहे. ह्याचे उद्दिष्ट digitization ची भारतातील दयनीय स्थिति ह्याला आनुषंगिक अशी चर्चा व्हावी हे आहे.

सुमारे दोन वर्षांपूर्वी http://mr.upakram.org/node/3450 असा धागा मी लिहिला होता आणि त्यामध्ये DLI च्या ढिसाळ कारभाराबद्दल आणि तेथे उपलब्ध माहितीच्या अंदाधुंदीबद्दल बरेच काही सोदाहरण लिहिले होते. त्याखालील चर्चेत सर्व प्रतिसाद ह्याला अनुमोदन देणारेच होते.

OUDL DLI हून काकणभर सरस आहे कारण तेथे पीडीएफ फ़ाइल उतरवून घेण्यास मिळते. DLI वाल्यांनी आपल्या संस्थळाच्या वापरात अनेक अडथळे घालून ठेवले आहेत. त्यापैकी एक म्हणजे तेथे पुस्तक उतरवून घेणे वा online वाचणे हे शक्य नाही. त्यासाठी dli downloader ह्या third-party software चा अनधिकृत वापर करावा लागतो.

अजूनहि ती परिस्थिति बदललेली नाही.

मला आश्चर्य असे वाटते की मुंबई-पुणे-नागपूर अशी जुनी विद्यापीठे अणि त्यांची ग्रन्थालये ह्या digitization च्या कामात संपूर्णतया उदास आहेत. अशी विद्यापीठे आणि गावोगावची नगर वाचनालये मिळून हजारो मराठी, संस्कृत आणि अन्य भारतीय भाषांमधील पुस्तके आपल्या कपाटांमधून साठवून आहेत. जसजसा काळ पुढे जात आहे तसतशी ही पुस्तके वाळवी, ओलावा, कागदाचा जुनेपणा, चोर्‍या, दुर्लक्ष अशा कारणांनी नष्ट होत आहेत. अशा ठेव्याचे रक्षण आणि विस्मृतप्राय अशा ह्या ज्ञानाचा इच्छुकांना वापर करता येईल असे काही करणे हे खरे विद्यापीठे आणि ज्ञानाच्या अन्य क्षेत्रांमधील अन्य संस्था ह्यांचे काम आहे. पण गूगल बुक्स, archive.org,scribd.com अशी संस्थळे अस्तित्वात आल्याला एक दशक लोटत आले तरी इकडे जाग येत नाही असे का? अन्य देशांतील पुष्कळ विद्यापीठे हे कार्य करतात. त्यात भारतीय विद्यापीठे कोठे आहेत?

ह्यापलीकडे मला असाहि प्रश्न पडतो की माहितीचे मोठे खजिने वृत्तपत्रांच्या जुन्या अंकात पडून राहिले आहेत ते digitization मार्गाने विनामूल्य वा थोडे मूल्य घेऊन इच्छुकांना उपलब्ध का करून दिले जात नाही? भारतात टाइंम्सने असा थोडा प्रयत्न केल्याचे दिसते पण तो अतिशय तोटका आणि २००१ सालानंतरचाच आहे. एकाहि मराठी वृत्तपत्राने असे काही केल्याचे मला ठाऊक नाही. वृत्तपत्रांना उत्पन्नाचा हा नवा स्रोत अजून का दिसत नाही? New York Times, London Times, Spectator अशी काही वृत्तपत्रे त्यांच्या पहिल्या दिवसांपासून digitization स्वरूपात उपलब्ध आहेत.

ह्या अनास्थेवर ’ऐसी’च्या वाचकांना काय वाटते?

अजो१२३ Mon, 21/07/2014 - 23:06

New York Times, London Times, Spectator अशी काही वृत्तपत्रे त्यांच्या पहिल्या दिवसांपासून digitization स्वरूपात उपलब्ध आहेत.

रोचक. म्हणजे केव्हापासूनची माहीती?

अरविंद कोल्हटकर Mon, 21/07/2014 - 23:35

लंडन टाइम्स १.१.१७८५ पासून उपलब्ध आहे, तसेच न्यू यॉर्क टाइम्स १२९ वर्षांचे अंक उपलब्ध आहेत असे दिसते. मात्र ह्या दोन्हींसाठी काही शुल्क असावे असेहि दिसते.

The Spectator हे ब्रिटिश वृत्तपत्र जुलै १८२८ पासून असून ते विनामूल्य आहे. (सहज testing करतांना मला वासुदेव बळवंत फडके ह्यांच्या खटल्याविषयी लेख http://archive.spectator.co.uk/article/13th-december-1879/6/the-marhatt… येथे मिळाला. तो OCR'd तसेच लेखाचे चित्र अशा दोन्ही स्वरूपांमध्ये आहे.)