जुन्या मराठीचे नमुने
कलकत्त्याजवळील सेरामपूर छापखान्यामध्ये मिशनरी कामाचा भाग म्हणून अनेक पुस्तके देशी भाषांमधून छापली जात. मराठी शब्दकोश, व्याकरण अशी काही पुस्तके १८०५ ते १८२५ च्या काळामध्ये तेथे छापण्यात आली. 'A Grammar of the Mahratta Language' नावाचे एक पुस्तक १८०५ साली W. Carey, Teacher of the Sungskrit, Bengalee and Mahratta Languages in the College at Fort William ह्यांनी तेथे छापवून घेतले. पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये Vidyunath, Cheif Mahratta Pundit in the College at Fort William ह्यांनी लेखकास साहाय्य केले असा उल्लेख आहे. (इंग्रज सत्ताधारी कामास उपयुक्त म्हणून शिक्षक नेनून त्यांच्याकडून देशी भाषा शिकत असत. संस्कृत, मराठी, बंगाली अशा भाषांसाठीच्या शिक्षकांस 'पंडित' आणि फारसी, उर्दू, अरेबिक ह्यांच्या शिक्षकांस 'मुन्शी' असे म्हणत असत. 'हॉब्सन-जॉब्सन' अशा मजेदार नावाच्या शब्दकोशात इंग्रजांच्या वापरातील पण हिंदुस्तानी भाषांपासून निर्माण झालेल्या शब्दांचा संग्रह आहे. तेथे 'मुन्शी',चा उगम अरेबिक 'मुन्सिफ'पासून दाखविला आहे. साधारणतः ह्याच दर्जाचे एतद्देशीय लोक न्यायखात्यातील सर्वात खालच्या पातळीवरच्या 'मुन्सिफ' ह्या हुद्द्यावर नेमले जात.) व्यापारी पत्रव्यवहारासाठी Moorh लिपीचा उपयोग सर्वत्र केला जात असला तरी Devu Nuguri लिपि सर्व वरच्या दर्जाच्या पुस्तकांसाठी वापरली जाते आणि व्याकरणातील बारकावे दाखविण्यासाठी ती अधिक उपयुक्त आहे म्हणून पुस्तक त्या लिपीमध्ये आहे असाहि उल्लेख प्रस्तावनेमध्ये आहे. पुस्तक books.google.com येथे e-book ह्या स्वरूपात येथे उपलब्ध आहे.
पुस्तकाच्या अखेरीस काही पानांवर भाषा कशी बोलली आणि वापरली जाते ते कळावे म्हणून काही संवाद छापले आहेत. मोल्सवर्थ-कँडी आणि त्यांचे पंडित ह्यांनी वळण लावण्यापूर्वी मराठी भाषा कशी होती हे दिसावे, तसेच तत्कालीन व्यवहारांची माहिती व्हावी अशासाठी त्यातील दोन संवाद खाली चित्ररूपाने चिकटवीत आहे.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
जब्बरदस्त! पुस्तकाची ओळख
जब्बरदस्त!
पुस्तकाची ओळख आवडली. वरील उदाहरणांत उल्लेखनीय गोष्ट म्ह. अ आणि ण यांचे फाँट. ते वेगळे आहेत. माझे स्मरण बरोबर असेल तर देवनागरीसाठीचा फाँट स्टँडर्डाईझ करतेवेळी एक मुंबै अन एक कलकत्ता असे दोन फाँट होते, पैकी वरील संवादांतील फाँट हा कलकत्ता आहे. पुढे मुंबै फाँट मोर ऑर लेस कायम केला गेला, यद्यपि हिंदी लिहिण्याकरिता कैक वर्षांपर्यंत हे फाँट वापरले जायचे. चार आणा इ. किंमतीची वरील फाँटातील नाणी पाहिल्याचे आठवते आहे.
मराठी प्रोवर्ब्स्
मराठी प्रोवर्ब्स् या १८९९ सालच्या 'मन्वारिन्ग' नामक रेवरन्डाने लिहिलेल्या जबरदस्त पुस्तकात अ आणि ण वगळता बहुतेक सगळी अक्षरे आताच्या देवनागरीत बसण्यासारखी (पण किंचित तिरपी) आहेत.
थोडक्यात, १८०५ ते १८९९ मध्येच बरेच बदल होत गेले, असे म्हणता येईल का ?
फाँट्स
आपले अभ्यासू आणि व्यासंगपूर्ण लिखाण नेहेमीच आवडते, त्याप्रमाणे हेही जुन्या मराठी भाषा आणि लिपीच्या नमुन्यांचे संशोधन आवडले.
वरील नमुन्यांतले 'अ', 'घ,' 'ण', 'श', 'झ' हे फाँट्स् सध्याच्या मराठी देवनागरी फाँट्स् पेक्षा वेगळे दिसतात. श, थ, ळ, ढ हे सध्याच्या गुजराती लिपीशी साधारण मिळतेजुळते वाटतात. 'ल' चा फाँट काही वर्षांपूर्वी मराठीत वेगळा होता. वरील नमुन्यांतले 'अ','झ','ण','ल' हे फाँट्स हिंदीत वापरले जात असत/जातात. देवनागरी लिपी सर्वत्र सारखी असावी या हेतूने काही वर्षांपूर्वी समन्वयाचा एक प्रयत्न सरकारी सहभाग /पुढाकाराने झाला. त्यानुसार मराठीतला 'अ' हिंदीने स्वीकारला आणि हिंदीतले 'ल','ख' मराठीने घेतले. तत्पूर्वी 'ख' मराठीमध्ये 'रव' असा एकाच शिरोरेखेखाली एकत्र लिहिला जात असे, जो वरील नमुन्यात दिसतो. ही सरकारमान्य समान देवनागरी लिपी बहुतेक सर्व प्रमुख प्रकाशनसंस्थांनी स्वीकारली आहे. (तसा ऐच्छिक नियमच केला गेला.) पण हिंदी हार्ट्लँड मध्ये अजूनही काही ठिकाणीं 'अ' ,'ण', 'झ' हे वरील नमुन्यांतल्याप्रमाणेच लिहितात/ छापतात. त्यांचा 'झ' आणखी थोडा बदलला आहे. तो 'भ' आणि 'क' एकत्र लिहिल्यासारखा दिसतो. 'र' हे अक्षर वरील नमुन्यात सध्याप्रमाणेच दिसत असले तरी 'रु,' 'रू' लिहिताना जुन्या शिलालेखांतला 'र' र् (चामुण्डराजें करवियलें) वापरला आहे. स्वा. सावरकरांच्या लिपिशुद्धि चळवळीत त्यांनी या 'र'चा पुरस्कार केला होता कारण क्र, ग्र, त्र, प्र, ब्र, वगैरे जोडाक्षरे 'र'च्या एकाच फाँटमध्ये छापता आली असती. आणि असे लिहिणे सोपेही आहे.
वरील नमुन्यांतल्या अक्षरांना तिरप्या छाटलेल्या टोकाच्या बोरूने लिहिल्याप्रमाणे अ-समान जाडी आणि गोलाई आहे. बहुधा लिखित अक्षराबरहुकुम दिसण्यासाठी अक्षरे तशी पाडली असावी. त्या काळी अक्षराचे हेच वळण अधिकृत किंवा सर्वमान्य होते. आणखी म्हणजे येथे पूर्णविरामाऐवजी दण्डचिह्न आहे जे हिंदीत अजूनही काही ठिकाणी वापरले जाते. त्यांही, त्याहांस ही रूपे आणि विदा होणे/करणे हे वाक्प्रचार वेगळे वाटतात. एकंदरीत हिंदी भाषेचा आणि लिपीचा थोडा प्रभाव जाणवतो तो उत्तरेत छपाई झाली असल्यामुळे असावा.
+
>>एकंदरीत हिंदी भाषेचा आणि लिपीचा थोडा प्रभाव जाणवतो तो उत्तरेत छपाई झाली असल्यामुळे असावा.
किंवा उत्तरेत बराच काळ राहिलेल्या मराठी माणसाने लिहिले असल्यास तसा भाषेवरच प्रभाव असेल. [लिहून दिलेल्या मजकूरात छपाई-कामगार बदल करेल असे वाटत नाही].
>>वरील नमुन्यांतल्या अक्षरांना तिरप्या छाटलेल्या टोकाच्या बोरूने लिहिल्याप्रमाणे अ-समान जाडी आणि गोलाई आहे. बहुधा लिखित अक्षराबरहुकुम दिसण्यासाठी अक्षरे तशी पाडली असावी.
तसे सर्वच भाषांमधील फॉण्ट्समध्ये दिसते.
आपण हल्ली बोलताना सगळ्याच अंताक्षरांचा उच्चार अर्धवट करतो. या छापील मजकूरात मात्र काहीच शब्दांची अंताक्षरे मुद्दाम पायमोडकी छापलेली दिसतात.
कॅरीच्याच प्रेसने मराठीत,
कॅरीच्याच प्रेसने मराठीत, मोडी लिपीत १८१४-१५ दरम्यान छापलेले "सिंहासन बत्तिशी' इथे डकवत आहे. स्क्रिब्डी वरून उतरवूनही घेता येईल. हे मराठीतील प्रथम छापील मोडी लिपीतील पुस्तक अतिशय दुर्मिळ आहे, मला खूप कष्टाने हार्वर्डच्या लायब्ररी डिपॉजिटरीतून ई-प्रत मिळवता आले. "हितोपदेशाची" प्रत सुद्धा मिळाली, ती खाली देते. मोडी लिपीत एकूण चार पुस्तकांचा संच छापला गेला असं दिसतं - स्थानिक राजा प्रतापादित्याचा बखरवजा इतिहास यात शामिल होता, पण अद्याप तो माझ्याजवळ नाही. प्रतीच्या स्कॅन्स चांगल्या नाहीत, पण मोडी जाणकारांना पुस्तक बर्यापैकी वाचता येण्यासारखं आहे.
थोडी वेगळीच आहे भाषा.
थोडी वेगळीच आहे भाषा.