रायगडावरील शिवसमाधि कोणी 'शोधली'?
रायगडावरील शिवसमाधि कोणी 'शोधली’ हा एक वादग्रस्त मुद्दा झालेला आहे. कोणी ह्याचे श्रेय महात्मा फुले ह्यांना देतात तर कोणी लोकमान्य टिळकांना. महात्मा फुले ह्यांच्यावरील विकिपीडिया लेखात पुढील उल्लेख आहे: ’The celebration of "Shiv Jayanti"(Birth day of Chhatrapati Shivaji Maharaj)for the first time in India has been attributed to him. He also discovered the "Samadhi" of Chhatrapati Shivaji Maharaj on Raigad Fort which had disappeared in creepers and climbers.’ लोकमान्य टिळकांच्याकडेहि ह्याचे श्रेय काहीजण देतात. ह्या दोन्ही बाजूंमागे स्वत:च्या विशिष्ट विचारधारा असल्यामुळे मला दिसत असलेली वस्तुस्थिति चर्चेसाठी पुढे आणावी अशा हेतूने हा मजकूर लिहीत आहे. ह्या लेखनासाठी प्रामुख्याने तीन पुस्तकांतील मजकुराचा आधार घेतला आहे. ती अशी - १) `Oriental Experience` by Sir Richard Temple, London, 1883, २)`A Book of Bombay` by James Douglas, Bombay, 1883 आणि ३) लोकमान्य टिळक यांचे चरित्र, भाग १, न.चिं.केळकर, १९२३.
मला असे दिसते की शिवसमाधि ’शोधायची’ काही आवश्यकता नव्हती कारण तिचे अस्तित्व पुष्कळांना ठाऊक होते. १८१८ नंतर भग्नावस्थेत गेलेल्या ह्या किल्ल्यावर स्थानिक धनगर, गुराखी, लाकूडफाटा गोळा करणारे खेडूत अशांचा वावर अव्याहत चालूच होता आणि त्यांना ही जागा माहीत असणार, यद्यपि तिचे महत्त्व ध्यानात येण्याइतके शिक्षणचे संस्कार त्यांच्यापाशी नव्हते. मुंबईकर इंग्रजांना एकूणातच शिवचरित्राबद्दल ‘romantic’ औत्सुक्य होते. (पुष्कळ इंग्रज शिवाजीची तुलना स्कॉटलंडमधील विल्यम वॉलेसशी करत.) हा किल्ला पाहण्यासाठी दरवर्षी लोक जात असत आणि कोठल्याहि चौकस गवर्नराने हा किल्ला पाहण्याचे ठेवलेले नसावे असे न.चि.केळकर लिहितात. मुंबईचे गवर्नर सर रिचर्ड टेंपल (१८७७-१८८०) हे त्यांच्या कारभाराच्या वर्षातील एका वर्षीच्या नोवेंबरात किल्ल्यावर गेले होते. फेब्रुवारी १८८२ मध्ये लंडनमधील Royal Geographical Society पुढे 'Birthplace and Cradle of Mahratta Power’ असे भाषण त्यांनी केले. ह्या भाषणात त्यांनी शिवकालीन महाराष्ट्राचा आणि शिवचरित्राचा आढावा घेतला आहे. त्यांनी स्वत: काढलेली काही पेन्सिल स्केचेसहि ह्या भाषणासाठी त्यांनी वापरलेली दिसतात. त्या भाषणातील शिवसमाधीचे पुढील लक्षणीय वर्णन पहा:
ह्याच भेटीचे अधिक तपशिलात वर्णन मुंबईचे तेव्हाचे कमिशनर क्रॉफर्ड ह्यांनी टाइम्स ऑफ इंडियामध्ये काही वर्षानंतर केले आहे आणि केळकरांनी त्याचा गोषवारा मराठीत दिला आहे. तो असा:
१८८३ साली मुंबईत छापण्यात आलेल्या जेम्स डग्लस ह्यांच्या 'A Book of Bombay' ह्या पुस्तकात पान ४३३ वर समाधीच्या पडझडीचे वर्णन केले आहे आणि कोल्हापूरचे, तसेच सातारचे शिवाजीचे वंशज, पेशवाईचा कारभार ह्या सर्वांना समाधिस्थानाला अशा दुरवस्थेस आणल्याबद्दल दोष दिला आहे. ब्रिटिश सरकार जसे ब्रिटनमध्ये जुन्या टयूडर आणि स्टयुअर्ट राजवटींच्या स्मृति आस्थेने सांभाळते तसेच मुंबईतील सरकार रायगडाची देखभाल का करू शकत नाही असा प्रश्नहि विचारण्यात आला आहे.
१८८० नंतर समाधीच्या दुरवस्थेकडे काही लक्ष वेधले गेल्यामुळे महाराष्ट्रातील जनतेमध्येहि ह्याविषयी आपण काही करावे अशी भावना निर्माण होऊ लागली. केळकरांच्या लेखनानुसार वसईच्या गोविंद बाबाजी जोशी ह्यांच्या वाचनात वर उल्लेखिलेले मजकूर आले आणि १८८५ साली स्वत: रायगडाला जाऊन आल्यानंतर ह्या समाधीच्या जीर्णोद्धाराबद्दल आपण काही करावे असे त्यांनी ठरविले आणि ’नेटिव ओपिनियन’सारख्या वृत्तपत्रांमधून लेख लिहिले. १८८७ साली ह्या विषयावर एक पुस्तक त्यांनी छापले. डग्लस ह्यांच्या खोचक लिखाणावरून स्फूर्ति घेऊन त्यांनी जनतेच्या सहभागाने जीर्णोद्धार करण्यासाठी किरकोळ रकमांच्या वर्गण्याहि गोळा करण्यास प्रारंभ केला. पुढे ७-८ वर्षे असाच छोटया प्रमाणात हा प्रश्न जिवंत राहिला.
१८९५च्या एप्रिलपासून ’केसरी’मध्ये समाधीच्या जीर्णोद्धाराबद्दल लेख येऊ लागले. ’शिवाजीचे नाव तुम्ही गाजवा हे पद्य आमच्या कानी पडल्यास बरेच दिवस झाले परंतु त्यातील अर्थाप्रमाणे उपदेश घेऊन काम करतांना कोणीहि आढळत नाही’ अशी टीका केसरीने केली. जीर्णोद्धारासाठी रक्कम पाठविणारांची पोच छापायला केसरीने सुरुवात केली. ३० मे ह्या दिवशी हिराबागेत स्मारकाबाबत एक सभा झाली. तिला अनेक प्रतिष्ठित व्यक्ति, संस्थानिक उपस्थित होते. २५,००० पर्यंत खर्चाचा अंदाज करण्यात आला. ह्या सर्वाचे फलित म्हणजे स्मारकाची रक्कम हळूहळू(च) वाढत गेली. नोवेंबरपर्यंत ती ९००० ला पोहोचली. (ह्याच वेळी सुरू झालेल्या लॉर्ड हॅरिस स्मारक फंडात ४०,००० जमले होते ही बाब लक्षणीय आहे.) सयाजीराव गायकवाडांनी १००० रुपये पाठविले. एका गुजराथी नाटक कंपनीने एका खेळाचे उत्पन्न ७०० रुपये दिले. करवीकर छत्रपतींकडे मदत मागण्यासाठी गेलेल्या डेप्युटेशनला मदतीचे तोंडभर आश्वासन मात्र मिळाले. (मनात आणते तर ते एकटेहि पितृकर्तव्य म्हणून जीर्णोद्धार करू शकले असते!)
अशा ह्या चळवळीतून पुढे १८९७ साली अनेक वळणांतून जात जात आणि एकेक सरकारी आक्षेप दूर करत शिवजयंतीउत्सव सुरू झाला पण तो वेगळा इतिहास आहे.
मला सत्य जाणण्याची इच्छा आहे.
हा धागा सुरू करण्याचे कारण म्हणजे 'ऐसी'वरच गेल्या दोनएक महिन्यांमध्ये मी अशा अर्थाचे एक विधान वाचले होते की रायगडावरील शिवसमाधि जोतिबा फुले ह्यांनी शोधली. कोठल्या धाग्यात मी हे वाचले होते ते मला आता स्मरत नाही आणि शोध घेऊनहि मला तो धागा पुनः सापडत नाही. त्या विधानाची सत्यासत्यता ताडून पाहण्यासाठी मी हा धागा सुरू केला.
शिवसमाधीच्या 'शोधा'चे श्रेय महात्मा फुले ह्यांच्याकडे आहे हे काही वर्तुळांमध्ये 'प्रस्थापित सत्य' म्हणून गणले जाते. (हा विकिपीडिया लेख तेच सांगतो.) तसेच लोकमान्य टिऴकांना शिवजयंती सार्वजनिक पातळीवर सुरू करण्याचे श्रेय दिले जाते. खेदाची गोष्ट अशी आहे की ह्या दोन्ही विचारांच्या मागे स्वतःचा अजेंडा पुढे ढकलणारे दबावगट आहेत. मला त्या दोन्ही गटांशी काहीच देणेघेणे नाही. एक 'उचापत्या' चौकस व्यक्ति म्हणून मला केवळ वस्तुस्थिति (facts) जाणून घ्यायची इच्छा आहे.
शिवसमाधीच्या 'शोधा'बाबत मला दिसलेल्या facts मी वर लिहिल्याच आहेत. जोतिबा फुले ह्यांनी समाधि 'शोधली' म्हणजे नक्की काय केले हे कोणी साधार पुढे आणले तर हवे आहे.
प्रस्थापित सत्य
हा धागा सुरू करण्याचे कारण म्हणजे 'ऐसी'वरच गेल्या दोनएक महिन्यांमध्ये मी अशा अर्थाचे एक विधान वाचले होते की रायगडावरील शिवसमाधि जोतिबा फुले ह्यांनी शोधली. कोठल्या धाग्यात मी हे वाचले होते ते मला आता स्मरत नाही आणि शोध घेऊनहि मला तो धागा पुनः सापडत नाही
बहुधा तुम्हा ह्या धाग्यावरील शेवटचा प्रतिसाद म्हणायचा असावा!
खेदाची गोष्ट अशी आहे की ह्या दोन्ही विचारांच्या मागे स्वतःचा अजेंडा पुढे ढकलणारे दबावगट आहेत
शक्य आहे पण सदर ठिकाणी असहमत!
ही गोष्ट मी कुठेतरी वाचली होती (विकी नव्हे) आणि तिचा जोरकस प्रतिवाद वाचायला न मिळाल्याने ते खरेच (प्रस्थापित सत्य) असे समजून होतो.
असो, त्यानिमित्ताने एक चांगला लेख ऐसीकरांना वाचायला मिळाला, हेही नसे थोडके!
यात आश्चर्य नाही.
रंगभूमीच्या सुरुवातीच्या काळात गुजराती-पारशी रंगभूमीची आश्रयदाते जसे सर्वसामान्य मराठी-गुजराती रसिक होते तसेच मराठी संस्थानिकही होते. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात मुंबईतले गिरणीमालक, सटोडिये, व्यापारी हे बालगंधर्वांचे जबरदस्त चाहते होते. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मराठी आणि गुजराती रंगभूमीमध्ये बरीच देवाणघेवाण (गुजराती रंगभूमीकडून जास्त करून मराठी नाटकांची घेवाणच) झाली आहे. नाट्यसंपदाची पुष्कळशी नाटके गुजराती रंगभूमीवर गेली आहेत. यात कांती मडिया, दामू जवेरी अशी रंगकर्मींची काही नावे आठवतात. मखमालीचा पडदा या पुस्तकात गंधर्व कंपनीचा इतिहास आहे. त्यात जाता जाता वर्णिलेल्या काही घटनांवरून हे स्पष्ट होते. अन्य फुटकळ संदर्भही इथेतिथे विखुरलेले आहेत.
इतिहासकालीन पूर्वग्रह कलेच्या प्रांतात कायम राहिले नाहीत हे आपले सुदैव.
नक्कीच. जो कै पूर्वग्रह असेल
नक्कीच. जो कै पूर्वग्रह असेल तो सयाजीरावांसारख्यांमुळे तरी बराच कमी झाला होता. इतिहासाचे भांडवल सोयीस्कर ठिकाणीच केले जायचे, उदा. सुरत अधिवेशनाला टिळक जाणार होते तेव्हा म्हणे "तीनशे वर्षांपूर्वी शिवाजीनामक लुटारूने सुरत लुटली तेच काम आत्ता टिळकनामक लुटारू करावयास आला आहे" छाप पत्रके निघाली होती तिथे. हा किस्सा त्र्यंबक शंकर शेजवलकरांच्या एका लेखात आहे.
इतिहासकालीन पूर्वग्रह कलेच्या प्रांतात कायम राहिले नाहीत हे आपले सुदैव.
कुडंट अग्री मोर.
ऐतिहासिक गोष्टींचे श्रेय
ऐतिहासिक गोष्टींचे श्रेय घेण्याची वृत्ती फार बळावली आहे. (कोण्या एका माझ्या) जीवनात कुणी मराठा मित्र भेट्ला तर तो शिवाजी त्याला माझ्यापेक्षा जवळचा आहे हे कळत नकळत जाणवून देत असतो. सुदैवाने मी स्वतः खूप भाग्यवान आहे. माझे मराठे मित्र शिवाजी त्यांचा तितकाच माझा मानतात. सगळा इतिहास आपापसात वाटून घेतला तर मग आपण या मोठ्या लोकांना (स्वर्गात /किर्तीरुपाने उरलेल्या अवशेषाला) काय तोंड दाखवायचं?
सहमत आहे. महापुरुषांचीही
सहमत आहे. महापुरुषांचीही वर्गवारी झालीये काही अपवाद वगळता- टिळक गोखले सावरकर ब्राह्मणांचे, आंबेडकर बौद्धांचे, फुले माळी समाजाचे, इ.इ.इ. शिवाजीसारखे फार थोडे लोक जे सगळीकडे हजेरी लावतात आणि त्याबद्दल कोणाला काही वाटत नाही. बाकी मराठा शॉव्हिनिझमबद्दल सहमत. पण सुदैवाने मला नॉन शॉव्हिनिस्ट मराठे मित्र जास्त भेटले हे मी माझेही भाग्यच मानेन.
माठ
आम्हाला आमच्यासारखेच माठे भेटले. कुणालाच इतिहासाचा फारसा गंध नाही, रसही नाही, अभिनिवेश तर दूरचीच गोष्ट.
उद्या खादाडीला कुठं जायचं किंवा ट्रिपला कुठं भटकायचं एवढ्याच काय त्या गप्पा होत; किंवा खाजगी गप्पा.(अॅडमिशन कुठं घ्यायचं,
एन्ट्रन्स कोणती द्यायची,मागची उधारी कधी परत करणार, अवतार बरा करुन आमच्यासोबत ये-नायतर तुझी नाय पण आमची
इज्जत जाइल पोरींसमोर वगैरे वगैरे.) हो , जातीचा मुद्दा ठळक झाला एकदा; तो अॅडमिशन वगैरेच्या वेळी. आरक्षण वगैरे बद्दल काहिंचा
राग बाहेर आला.पण त्यालाही व्यावहारिक नजरिया, फायद्या-तोट्याचे गणितच अधिक होत.
.
एका मित्राच्या लग्नानंतर माघारी त्याच्या बायकोने केलेली कुजबूज "हा आपल्यातला नाही पण तुझा घट्ट मित्र दिसतोय" ऐकण्यात आली
तेव्हा मात्र "ह्याची आणि आपली जात वेगळी आहे" हे जाणवलं.तोवर विचार नाही आला डोक्यात.
अस्मिता टिकवायच्या असल्यास हे
अस्मिता टिकवायच्या असल्यास हे जाणवणारे बाल्कनायझेशन सहन करावे लागणार, शिवाजी माझा आहे म्हणून त्याच्या समाधीचे कौतुक आहे, त्या टिकवण्यामधे तो 'काळ' टिकवण्यापेक्षा त्याच्याशी संबंधीत भावनाच टिकवणे गरजेचे वाटते. नेते मंडळी हि अस्मिताच जपण्याच प्रयत्न कायम करत आले आहेत.
वाचनीय
वाचनीय