Skip to main content

साडेसाती

मला साडेसाती या विषयावरील अनुभव जाणून घेण्याची जिज्ञासा आहे म्हणून हा धागा. शिवाय लिंबूटिंबू यांच्या राशींच्या धाग्यावर कोणीतरी ज्योतिषाला अंधश्रद्धा म्हटले असल्याने वाईट वाटूनही हा धागा काढला गेला आहेच (खोटं कशाला बोलू). ज्या ज्या गोष्टी सहज सिद्ध करता येत नाहीत त्यांची लगेच अंधश्रद्धेत बोळवण होऊ नये. यावर जर कोणी विचारेल की - ज्योतिष हे शास्त्र आहे हे सिद्ध कर तर मी आत्ताच हार मानते पण माझे काही अनुभव आहेत त्यावरून मी या शास्त्रावर श्रद्धा ठेवते.

आता मूळ मुद्द्याकडे ,साडेसाती बद्दल थोडेसे -
प्रत्येक कुंडलीमध्ये १२ स्थांनांपैकी एका स्थानात चंद्र असतो. शनि हा भ्रमण करता करता या स्थानाच्या आदल्या स्थानात आला की त्या जातकाची साडेसाती सुरु होते असे म्हणतात. आणि चंद्राच्या दुसर्‍या स्थानामधून शनि निघून जाईपर्यंत ती चालू रहाते. म्हणजे माझ्या कुंडलीत जर चंद्र १ ल्या घरात पडला असेल, तर १२ वा घरात शनि आला की माझी साडेसाती चालू होणार आणि २ र्‍या घरातून शनि बाहेर पडेपर्यंत ती चालू रहाणार. प्रत्येक राशीत अडीच वर्षे वास्तव्य करत असल्यामुळे शनिस ही एकूण ३ घरे पादाक्रांत करण्यासाठी साडेसात वर्षे लागतात म्हणून नाव साडेसाती.

ऐकीव माहीतीनुसार, काही राशींना पहीलं अडीचकं त्रासदायक जाते तर काही राशींना मधलं तर काही राशींना शेवटचं. पण एक नक्की समज असा रुढ आहे की साधारण साडेसातीचा बराचसा काळ त्रासदायकच जातो. आर्थिक नुकसान किंवा शारीरीक/ मानसिक कष्ट सोसावे लागतात. किंवा कमीत कमी उल्लेखनिय चढ-उतार/ स्थित्यंतरांना तोंड हे द्यावेच लागते. (सध्या "तूळ" राशीला साडेसाती आहे असे ऐकून आहे.)

मी जे काही लोक पाहीले त्यांच्यामध्ये - मला आणि काही जणांना साडेसातीमध्ये जबरदस्त त्रास झाल्याचा अनुभव आहे. म्हणजे आयुष्यात झाला नाही तेवढा त्रास या लहानशा कालावधीत झाला काय आणि संपलाही काय. पण मागे वळून पाहता असे जाणवते की त्या काळात माझ्या जीवनात जो बदल घडला तो खूप चांगल्याकरता घडला. म्हणजे एखादं गळवं ठसठसत असावं आणि एखाद्या निष्णात वैद्याने (शनि) ते निष्ठुरतेने , दाभणाने फोडावे तसे काहीसे. तेवढ्या काळात खूप उलाघाल झाली पण मार्ग सापडून गेला. मी तोवर फक्त ऐकून होते की या काळात माणसाला आपलं कोण, परकं कोण हे लख्ख कळो येतं, पण खरोखर तसा अनुभव आला. या अनुभवासंदर्भात दुर्गा सप्तशतीमधील (देवी महात्म्य) पुढील ओळी जास्त समर्पक आहेत -

"चित्ते कृपा , समरनिष्ठुरता च दृष्ट्वा,
त्वय्येव देवि वरदे भुवनत्रयेSपि|"

या श्लोकात देवीचे वर्णन केल्यासारखे, त्या काळात प्रारब्ध/ नशीब मला फक्त निष्ठुर नाही तर "समरनिष्ठुर" भासायमान होत असे पण आता त्यातून पार पडल्यावर ,कळते की मूळ गाभा हा कृपेचाच होता. ज्योतिषाच्या भाषेतच सांगायचे झाले तर - शनि माणसाला पराकोटीचे जेरीला आणतो पण त्याचे दोष जावेत निदान कमी व्हावेत, जीवनात संतुलन यावे हाच हेतू त्यामागे असतो. तसाही शनि तूळेसारख्या संतुलन-प्रिय राशीत उच्चीचा आहे.

मग लोक साडेसातीत बरेच उपायदेखील करतात - मी देवळात जाते तेथे नवग्रहांपैकी सर्वात जास्त नैवेद्य, काळे तीळ, तेल न अमकं न ढमकं शनिला वाहीलेले दिसते. तर कोणी मारुती शनिविरुद्ध म्हणून मारुतीला तेल वाहतात. तर शरद उपाध्ये २ च उपाय सांगतात - शनि हा कामगारवर्गाचा कारक आहे तसेच अपंग/अंध असे शारीरीक दौर्बल्य असणार्‍या व्यक्तीदेखील शनीच्या कारकत्वाखाली येतात , त्यामुळे शनीस तोषविण्याचा एक मार्ग म्हणजे पंगु लोकांना , गोरगरीबांना मदत करणे आणि अंगी सदैव विनम्रता बाणणे. मी तरी साडेसातीते वरीलपैकी काहीही बाह्योपचार केले नव्हते.

परत मुद्द्याकडे वळते - साडेसातीवर आपला विश्वास आहे का? असल्यास , साडेसातीच्या काळात आपल्याला त्रास झाला का? साधारण कशाप्रकारचा झाला? आणि त्या अनुषंगाने येणारे अनुभव मांडावेत ही विनंती.

प्रा.डॉ.उगीच बिरुदे Thu, 03/11/2011 - 03:17

माझा विश्वास आहे. मला खूप त्रास झाला. मी शनिमाहात्म्य वाचु लागलो मग त्रास कमि झाला,

............सा… Thu, 03/11/2011 - 03:24

In reply to by प्रा.डॉ.उगीच बिरुदे

तुमचा प्रतिसाद खोडसाळ नसेल तर सांगा पाहू - शनिमहात्म्यानुसार "गुरु" ग्रहाला किती काळाची साडेसाती आली होती? :)
सांगा सांगा ... लवकर सांगा ....

प्रियाली Thu, 03/11/2011 - 06:05

In reply to by ............सा…

शनिमहात्म्यानुसार "गुरु" ग्रहाला किती काळाची साडेसाती आली होती? :)

शनिचा गुरु हा "गुरु ग्रह" का बरं? आता असे शनिमहात्म्य म्हणते का?

आयुष्यात झाला नाही तेवढा त्रास या लहानशा कालावधीत झाला काय आणि संपलाही काय

बाकी, साडेसाती हा काळ लहान वाटत नाही म्हणजे साडेसाती निघून गेल्यावर १५-२० वर्षांनी लहान भासेलही; पण एखाद्याला १३ व्या वर्षी साडेसाती सुरू झाली तर गेलं ना त्यांचं आख्खं "टिनेजर" फुकट. ;-). एखाद्याला ग्रॅज्युएशननंतर सुरू झाली तर गेली ना त्याच्या करिअरमधली पहिली साडेसात वर्षे फुकट. ;-)

असो. तुमची रास तूळ असेल तर काळजी घ्या. शनि येतो आहे ना घरात? पण असे उपाय करून जे व्हायचे ते टळते की आयुष्यात सावध राहिलात तर फायदा होतो हे तुम्ही ठरवायचे.

............सा… Thu, 03/11/2011 - 06:23

In reply to by प्रियाली

प्रियाली, "सिव्हीअर" त्रास फक्त अडीच वर्षं झाला त्यामुळे लहान कालावधी म्हटले :)
बाकी काळात विशेष त्रास नाही झाला.

प्रा.डॉ.उगीच बिरुदे Thu, 03/11/2011 - 03:34

अडिच तास. अडिच तासातच इतका त्रास दिला, साडेसात वर्षात किती देशील असे गुरु म्हणतो.

गुरू म्हणे बापा शनैश्चरा
सवा प्रहरांत केला माझा मातेरा
साडेसात वर्षे येतासी खरा
तरी मग काय होते कळेना

............सा… Thu, 03/11/2011 - 03:47

In reply to by प्रा.डॉ.उगीच बिरुदे

तुम्ही गुगल केलत :) पटदिशी सव्वा प्रहर उत्तर नाही दिलत :) असो. १० पैकी ८ गुण दिले .

प्रा.डॉ.उगीच बिरुदे Thu, 03/11/2011 - 04:43

In reply to by ............सा…

पट्दिशी उत्तर द्यायला इथे नव्हतो. तरीबी ८ गुणाकरता धन्यु.

limbutimbu Thu, 03/11/2011 - 10:21

चांगले लिहीलय :)साडेसातीबद्दल बहुतेक महत्वाचे मुद्दे आलेत.
यावर सविस्तर उत्तर वेळ मिळताच लिहीन, सध्या इतकेच, की माझा यावर विश्वास आहे. दोन साडेसात्या उपभोगल्या आहेत. पैकी पहिल्या साडेसातीवेळेस, शालेय आयुष्यात, आईबाप जीवन्त असताना, तितकासा त्रास झाला नाही, पण "अस्थम्याची" (दम्याचे) कायमस्वरुपी व्याधी सुरू झाली, व अनेकानेक कारणपरत्वे, साडेसातीचा काळभर, त्यावर तितकीशी पुरेशी उपाययोजनाही होऊ शकली नाही. मूळ कुंडलीतील अष्टमातील शनीदेखिल या दमा/मूळव्याध वगैरे दीर्घकालिक व्याधी व अनामिक भिती दर्शवितोच. पण याच व्याधीमूळे/परिस्थितीमुळे, आत्यन्तिक चिवटपणा/मानसिक खंबिरता देखिल लाभली हे नाकारता येत नाही.
दुसर्‍या साडेसातीत भयंकर आर्थिक संकटे ओढवली. मात्र मी याबाबत "शनिला" दोषी वा तत्सम वाईट असे काही समजत नाही, तर शनि माणसाचा अहंकार चेचून काढतो पक्षी अंती उपयुक्त ठरतो असे मानतो. किंबहूना, गीतेत वर्णन केलेल्या "कर्मफलाच्या" सिद्धान्तातील केल्या कर्माचे अप्रत्यक्ष फल देण्याचे/वाटण्याचे उत्तरदायित्व शनिवर सोपविलेले आहे की काय, असे मानण्यास बरीच जागा आहे.
[केल्या कर्माचे अप्रत्यक्ष फल : कालच मित्राबरोबर यावर चर्चा केली होती. हे अप्रत्यक्ष फल म्हणजे काय? तर क्रियेला प्रतिक्रिया हा सामान्य सिद्धान्त, तर मी निवान्त बसलेल्या कुत्र्याला हाडहाड केले वा लाथ मारुन हाकलले, तर काय होईल? कुत्रे (घाबरणार्‍यातले असले तर) घाबरुन शेपुट घालुन पळून जाईल. अर्थात हाकलणे या क्रियेला त्याने पळून जाऊन प्रतिक्रिया दिली आहे. ही झाली भौतिक क्रियाप्रतिक्रिया! मात्र यामागिल "अप्रत्यक्ष, वा माझे पंचेन्द्रियास न जाणवलेली" आदिदैविक प्रतिक्रियाही त्या कुत्र्याने नक्कीच दिलि असेल, ती म्हणजे माझ्या नावाने खडे फोडले अस्तील्/शिव्याशाप घातले असतील, थोडक्यात "तळतळाट" व्यक्त केला असेल, त्याच्या भाषेत, त्याच्या मनात, जो मला कळलाच नाही/कळू शकत नाही/कळून घेण्याची "गरज" वाटत नाही. अशा प्रतिक्रियात्मक संचित कर्मफलाचे दु:ष्परिणाम साडेसातीमधे जास्त प्रकर्षाने दिसून येतात]

वर आपण चंद्रराशीच्या मागिल, राशीमधिल, व पुढील स्थानावरील शनिचे भ्रमण साडेसाती म्हणून सांगितले आहे, त्याव्यतिरिक्त, चतुर्थ स्थानातील शनिचे भ्रमणास देखिल "छोटी पनवती" म्हणले जाते. व तशी ती अनुभवास येते.
मूळ कुंडलीतील शनी चंद्राची अंशात्मक स्थिती, व गोचर स्थिती, गुरुचे तत्कालिक भ्रमण, बाकी ग्रहांचे पाठबळ वा विरोध यावरुन प्रत्यक्ष साडेसातीतील कोणता कालखंड त्रासाचा आहे हे समजुन घेता येते.
सध्या इतकेच, वेळ मिळाला की पुन्हा येतो.

घंटासूर Thu, 03/11/2011 - 09:29

शनी सूर्यापासून सहाव्या स्थानावर आहे. त्याचे बरेचसे वस्तुमान वायूंमुळे असून सूर्यमालेतील आकाराने दोन क्रमांकाचा मोठा ग्रह आहे. शनीभोवती बर्फ व अंतरीक्ष कचर्‍यापासून बनलेली कडी आहेत. गुरु ग्रहानंतर आकाराने सर्वात मोठा ग्रह पण हा त्याच्या आकारापेक्षा त्याच्या भोवताली असलेल्या देखण्या कड्यांमुळे अधिक प्रसिध्द आहे.

शनी ग्रह देखील गुरु ग्रहाप्रमाणे वायुरुपी ग्रह आहे. शनीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास साधारणत: २९ वर्ष लागतात. शनी ग्रहाचे सूर्यापासूनचे अंतर साधारणत: १,४२६,७२५,४०० कि. मी. एवढे आहे.

शनी ग्रह आकाराने प्रचंड असलातरी याची घनता पाण्यापेक्षा कमी आहे, म्हणजे जर शनी पाण्यात पडला तरी तो त्या पाण्यावर सहज तरंगेल.

शनी ग्रहाभोवती असणाऱ्या असंख्य लहान मोठ्या खडकांनी मिळून कडी निर्माण झाली आहेत. वस्तुत: या कड्यांची संख्या असंख्य आहेत. या कड्यांची प्रामुख्यांनी सात वेगवेगळ्या कड्यांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. या कड्यांमध्ये एक मोठी पोकळी दिसते या पोकळीला "कॅसिनी डिव्हिजन" असे म्हणतात. या पोकळीतील दोन कड्यांमधील अंतर ४,००० कि. मी. आहे.

शनी ग्रह त्याच्या अक्षाभोवती साधारणत: २८ अंशांनी कललेला असलेल्यामुळे पृथ्वीवरुन आपणास शनीची कडी व्यवस्थित दिसतात, काही वेळा पृथ्वी शनीच्या विषुववृत्ताच्या पातळीत येते, त्यावेळी शनीच्या कडा पृथ्वीवरून दिसेनाशा होतात व फक्त एक बारीक रेषा दिसते.

शनीला एकूण ३० चंद्र आहेत.

तेव्हा शनीमुळे साडेसाती सुरु होते असे म्हणण्यात काहीच अर्थ नाही.

आडकित्ता Thu, 03/11/2011 - 09:32

In reply to by घंटासूर

ग्रहगोल त्यांच्या गुरुत्वाकर्षणामुळे परिणाम साधतात असे म्हणतात. यासाठी नेहेमीचे लाडके उदहरण चंद्र व भरती ओहोटीचे.
अंतर व वस्तुमानाचा हिशेब केल्यास रस्त्यावरून चालतना बाजूने गेलेली बेस्टची बस गुरू पेक्षा जास्त गुरुत्वीय बलाचा वापर माझ्या शरीरावर करीत असते, असे वाचनात आले होते.

बाकी चर्चा चालू द्या.

घंटासूर Thu, 03/11/2011 - 09:44

In reply to by आडकित्ता

गुरुत्वाकर्षणाचा मानवी शरिरावर किंचितसा परीणाम होत असेलही पण एकूण मानव शरीराचा आकार पाहता हा परीणाम अतिशय अल्प स्वरूपाचा असतो . मिपावर पूर्वी याबद्दल उद्भोदक चर्चा झाल्याचे स्मरते.
शिवाय शनि, गुरु ह्या ग्रहांच्या पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षणापेक्षा चंद्र, सूर्य यांचे गुरुत्वबल नक्कीच जास्त आहे. त्यामुळे साडेसाती झालीच तर चंद्राची अथवा सूर्याची व्हायला पाहीजे.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 03/11/2011 - 09:51

In reply to by घंटासूर

प्रतिसाद आवडला. एकच सुधारणा सुचवते. "शनीला एकूण ३० चंद्र आहेत" इथे चंद्र याऐवजी उपग्रह म्हणावे. चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे.

तेवढा शब्द नसता तर शालेय निबंधाचा परिणाम अजिबात राहिला नसता. कृपा शनिदेवांची! ;-)

(काही किंचित खगोलाभ्यासक) अदिती

घंटासूर Thu, 03/11/2011 - 09:57

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

सुधारणा करता येत नाही. तिथे आडकित्ता यांनी आता बूच मारून ठेवले आहे. (इंग्रजी मध्ये सरसकट मूनच म्हटले जाते तोच न्याय इथेही लावला आहे.)
बाकी हा प्रतिसाद विकिपेडीयावरील शनिवरून उधार घेतल्या गेला आहे. :)

(खगोलअभ्यासेच्छुक) चंद्रासुर

गवि Thu, 03/11/2011 - 11:10

In reply to by घंटासूर

घंटासूर, तुमचा प्रतिसाद झकास आहे. आवडला.

अर्थात एक आहे की, वर दिलेल्या फॅक्चुअल माहितीमुळे "त्या ग्रहाचा आपल्या आयुष्यातल्या घटनांवर परिणाम होणार नाही" याला आपोआप तात्विक सिद्धता मिळत नाही..

त्यामुळे मी इतक्या मायक्रो लेव्हलवर युक्तिवाद न करता असं म्हणेन की:

आपल्या याक्षणी असलेल्या बुद्धीच्या मर्यादेपलीकडे (फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि अन्य तार्किक शास्त्रे) असंख्य गोष्टी आहेत. त्यपैकी आपल्या आयुष्यातल्या थेट इंपॅक्ट करणार्‍या गोष्टी या आपल्या खास इंटरेस्टच्या असल्याने आपण त्यांचं एक्स्प्लेनेशन शोधण्याच्या जास्त आटोकाट प्रयत्न करतो. विशेषतः ज्यांच्या बाबतीत (मलाच का? चं) कारण सहज सापडत नाही अशा गोष्टी (अ‍ॅक्सिडेंट, अकाली मृत्यू, असाध्य आजार वगैरे)

अशा वेळी मग दोन मार्ग असतातः

१. मला काही समजत नाही असं म्हणून अज्ञेयवाद की काय म्हणतात तो स्वीकारायचा आणि रडत हसत जे आलंय त्यातून पुढे जात रहायचं.
२. काहीतरी कारण आहे आणि ते प्रयत्न केला तर समजून घेता येईल आणि कदाचित उपायही करता येईल अशा अ‍ॅप्रोचने शोध घेत राहायचं.

यापैकी पहिला मार्ग घेतलेल्याला लोक फारच निर्विकार आणि निरिच्छ समजतील. त्याला नवीन ज्ञान मिळवण्याची इच्छाच नाही अशा अर्थाने... अशा व्यक्तीशी फार काही चर्चाही होऊ शकणार नाही.

दुसरा मार्ग घेणारे लोक एकतर सरधोपट तर्काने जातील सायन्स (आणि तत्सम) किंवा "इन्व्हेडिंग दि अननोन" च्या थराराने ज्योतिष (आणि तत्सम) वेगळ्या मार्गाने जातील.. "अननोन मार्गाने" जाण्यात एक समाधान आहे की "पूर्णपणे न समजणारं काहीतरी" हेच आपल्या "कामास" येईल किंवा "सोल्युशन" देईल असा एक विचित्र विश्वास असहाय्य मनःस्थितीत उपयोगी येतो (आठवा: नवस, देव इ इ). अशावेळी जे अधिक नीट रितीने माहीत आहे (उदा फिजिक्स) त्यावर केवळ माहीत असल्यानेच विश्वास ठेवता येत नाही. त्यापेक्षा ज्योतिष बरं.. कारण त्याला एका अज्ञाताचं (म्हणूनच आशेचं) लिव्हरेज आहे..

यामधे प्रत्येकाला आपलं तेच सायन्स असं वाटेल.. कारण आपण सर्वजण काहीतरी करुन आपल्या विचारांना शास्त्रीय आधार शोधत असतो..

उपरिनिर्दिष्ट सर्व भानगडींमधे काहीतरी "उत्तर शोधण्याची" तीव्र इच्छा आहे.. वी जस्ट काण्ट लेट एनीथिंग गो अनएक्स्प्लेन्ड.. न्यूटनच्या नियमांनी किंवा ग्रहगोलांच्या प्रभावाने.. बट वी वाँट एक्स्प्लेनेशन...

:) त्यामुळे मला असं वाटतं की "आपल्याला काही समजत नाही" ची बोच जर "काहीतरी शास्त्र आहे बरं का त्यात" असं म्हणत म्हणत ज्योतिषशास्त्राने / विज्ञानाने / टॅरोने / रेकीने कमी होत असेल तर त्यावर विश्वास ठेवण्यात काही गैर नाही.

बाकी प्रश्न राहिला तो ज्योतिषावर विश्वास ठेवून प्रयत्नवाद बाजूला पडण्याचा.. ("असेल हरी तर.." मानसिकता)

त्याबाबतीत असं म्हणावंसं वाटतं ज्योतिषाला बाद ठरवून मुळात प्रयत्नवादी नसलेले लोक प्रयत्नवादी होतील असं म्हणणं म्हणजे कमी उंचीची घरं बांधण्याने आत्महत्या कमी होतील असं म्हणण्यासारखं आहे.

घंटासूर Thu, 03/11/2011 - 11:29

In reply to by गवि

तुमचे म्हणणे मान्य, मुद्देही पटले.

त्यापेक्षा ज्योतिष बरं.. कारण त्याला एका अज्ञाताचं (म्हणूनच आशेचं) लिव्हरेज आहे..

ही श्रद्धा का अंधश्रद्धा? जिथे भाविकांच्या श्रद्धेचा आपल्या तुंबड्या भरण्यासाठी उपयोग केला जातो असलं ज्योतिष काय कामाचं?
दर शनिवारी शनिमहिन्म वाचणं, नवग्रहांना फेर्‍या मारणे हे समजू शकतो.यात श्रद्धेचा भाग आला, पण साडेसातीच्या नावाखाली शनिची दहशत घेणं, आपल्या आयुष्यात येणार्‍या अपयशांची कारणं जाणून न घेता ती शनिवर ढकलणे, ज्योतिषांवर पैसा घालवणे याला काय अर्थ आहे?
शनिचे आपल्या आयुष्याततले स्थान महत्वाचेच, किंबहुना गुरु, शनि यासारख्या महाग्रहांमुळेच पृथ्वी सूर्याजवळ ढकलली जाउन नंतर जीवसृष्टीची स्थापना होवू शकली.
अर्थात हे शास्त्रीय सत्य जाणून न घेता वाईट कर्मांचे फल शनिवर ढकलणे हा निव्वळ पलायनवाद झाला असे आमचे मत.

गवि Thu, 03/11/2011 - 11:51

In reply to by घंटासूर

श्रद्धा आणि अंधश्रद्धा या थिऑरिटिकली वेगळ्या केल्या जातात पण त्या एकच आहेत.

दर शनिवारी शनिमहिन्म वाचणं, नवग्रहांना फेर्‍या मारणे हे समजू शकतो.यात श्रद्धेचा भाग आला, पण साडेसातीच्या नावाखाली शनिची दहशत घेणं, आपल्या आयुष्यात येणार्‍या अपयशांची कारणं जाणून न घेता ती शनिवर ढकलणे, ज्योतिषांवर पैसा घालवणे याला काय अर्थ आहे?

ही तुमची बाउंडरीलाईन झाली..

समजा साडेसातीच्या नावाखाली शनीची दहशत घेणं चुकीचं म्हणून ही पद्धत जनामनातून उतरवली (काही जादूने) तरी मूळ प्रवृत्ती "शनीची" दहशत घेण्याची नसून "अज्ञाताची" दहशत घेण्याची आहे. त्यामुळे मग वास्तूतले दोष, ईशान्येकडे बाथरूम असणं, .. अशांची दहशत शोधली जाईल.
ते सर्व नाहीसं करत गेलात तर कॉस्मिक रेडिएशन, कोणाचीतरी नजर, निगेटिव्ह "व्हाईब्ज" अशा कोणत्या ना कोणत्या रुपात ते डोकं वर काढणारच..

पण एक ऑप्शन काढून घेतला तर अशा प्रवृत्तीचा मनुष्य प्रयत्नवादी होईल ही भाबडी समजूत आहे..

राहता राहिला प्रश्न त्यावर तुंबडी भरणार्‍यांचा.. अहो असू देत.. कारण तेवढाच एक "डिसइन्सेंटिव्ह" आहे हो या बाबतीत.. खिशाला चाट पडते.. पैसे भरावे लागतात.. तेही विनामूल्य व्हायला लागलं तर मग काय मर्यादा?

एक उदाहरण देतोच.. दारु पिणं ही माणसाची सवय आहे. "दारु" नव्हे तर "व्यसन" ही मूलभूत प्रवृत्ती आहे. यावर दारु बंद करण हा उपाय वरवर बरा दिसला तरी खरा नाही कारण हेच की ते एक व्यसन आहे.. आणि दारु बंद केली की काहीतरी दुसरं केमिकल येईलच..

अशावेळी देशीपासून सर्व दारुंची किंमत वाढत असेल आणि तरी लोक घेत असतील तर वाढू देत.. आणि त्याउप्पर ती पिऊन नंतर हँगओव्हर होतो.. तो ही होऊदेत..

महागपणा आणि हँगओव्हर हे दारुचे डिसइन्सेंटिव्ह्ज आहेत. स्वस्त दारु केली किंवा हँगओव्हर न होऊ देणार्‍या अक्सीर गोळ्या काढल्या तर तोही जाईल..

तुम्ही म्हणताय ते "न लुटणारे" उपाय अशा अर्थाने तितकेच भयंकर म्हणा किंवा व्यर्थ म्हणा, आहेत..

Nile Thu, 03/11/2011 - 12:59

In reply to by गवि

ही विचारसरणी अत्यंत चुकीची आहे.

उपरिनिर्दिष्ट सर्व भानगडींमधे काहीतरी "उत्तर शोधण्याची" तीव्र इच्छा आहे.. वी जस्ट काण्ट लेट एनीथिंग गो अनएक्स्प्लेन्ड.. न्यूटनच्या नियमांनी किंवा ग्रहगोलांच्या प्रभावाने.. बट वी वाँट एक्स्प्लेनेशन.

हे मान्य होत नाही. उत्तर शोधण्याची तीव्र इच्छा असेल असे मानले तर जोतिषामध्ये त्याचे उत्तर मिळाल्यावरच समाधान व्हायला हवे. असे होत नाही. जोतिषावर विश्वास ठेवणारे लोक अज्ञानी, घाबरट आणि आत्मविश्वास गमावलेले असतात. "तुमच्यावर असा प्रसंग ओढवला मग विश्वास बसेल" अशा प्रकारच्या मनोवृत्तीचे असतात. विज्ञानात उत्तर सापडत नाही, विज्ञान कळत नाही ही अडचण इथे नसते विज्ञान हे मानवाने 'बनवलेले' आहे आणी त्याउलट जोतिष सारख्या गोष्टी मात्र जगन्नियंत्याने बनवलेल्या आहेत (म्हणून त्याला कॉन्ट्रॅडिक्ट करणारे सायन्स बरोबर कसे असेल?) ही समजूत असते.

अशा लोकांना प्लीज विचार करणार्‍या, उत्तरं शोधणार्‍यांच्या यादीत बसवू नका. 'याला उत्तर नाही हे तर दैव' ही मानसिकता त्यांना जास्त भावते.

एक उदाहरण देतोच.. दारु पिणं ही माणसाची सवय आहे. "दारु" नव्हे तर "व्यसन" ही मूलभूत प्रवृत्ती आहे. यावर दारु बंद करण हा उपाय वरवर बरा दिसला तरी खरा नाही कारण हेच की ते एक व्यसन आहे.. आणि दारु बंद केली की काहीतरी दुसरं केमिकल येईलच..

हा तर्कही ओढून ताणून लावलेला. याच न्यायाने सर्व गुन्हे माफ करुन जगन्मान्य करायला हवेत का? एक चूकीची गोष्ट गेली की दूसरी येते असा क्रम नसून नवनविन गोष्टी येतच राहतात. जुन्या रोगांचे निदान करू नका, उद्या दुसरा रोग होईल असे म्हणणे निव्वळ व्यसनाधीनाचे फूटकळ बहाणे आहेत.

गवि Thu, 03/11/2011 - 13:14

In reply to by Nile

तुम्ही माझ्या म्हणण्याला वेगळ्या कोनातून बघता आहात.

ज्योतिष किंवा विज्ञान या दोन्ही मार्गांनी उत्तरं मिळत नाहीत असं माझं म्हणणं आहे.

पण तुलनात्मक फरक करता येतो.

विज्ञानात बर्‍याच गोष्टी नीट तर्काने बांधलेल्या असल्याने आणि त्यामुळे रोजच्या व्यवहारातले बरेच प्रश्न सुटतात आणि प्रत्यक्ष वापराची यंत्रं बनवता येतात..

ज्योतिष हे (विज्ञानाच्या मानाने) खूपच ढिसाळ आणि अतार्किक असल्याने त्यातून रेप्रोड्युसिबल रिझल्ट्स आणता येत नाहीत. ते रिलायेबलही नाही.

मी एक्झॅक्टली हाच धागा पकडून म्हणतोय की घाबरट म्हणा किंवा काही म्हणा, लोकांना जेव्हा सरळ मार्गाने (तार्किक) उत्तरं मिळत नाहीत तेव्हा ते अतार्किक मार्गावर जाणारच. मग एक मार्ग बंद केलात तर दुसर्‍या मार्गाने..

त्याचमुळे वरील उदाहरणार दारु बंद करु नये असं म्हटलेलं नसून, त्यातली अपरिहार्यता लक्षात घेऊन त्यातले डिसैन्सेंटिव्हज तरी कमी करु नये असं म्हटलं आहे.

शोध घेतल्यास कळेल की हँगओव्हरवर उपायासाठी एक्स्टेन्सिव्ह संशोधन करण्यास वैद्यकीय जगताचा विरोध आहे कारण दारु या प्रकाराच्या अतिसेवनाला तो एक नैसर्गिक चाप आहे.

म्हणून फुकट असतात त्या श्रद्धा आणि पैसे उकळणार्‍या अंधश्रद्धा अशी विभागणी करु नये एवढाच लिमिटेड पॉईंट आहे.

...............

ज्यांना ज्योतिषावर विश्वास ठेवता येतोय त्यांना ठेवूदेत असं माझं म्हणणं आहे. त्याने वाटतं तेवढं नुकसान नाही एवढंच माझं म्हणणं आहे. मी, अ‍ॅज अ पर्सन, ज्योतिषावर काडीचाही विश्वास ठेवत नाही पण एखाद्याचा त्यावर असलेला विश्वास तोडण्याची ऑथोरिटी माझ्याकडे आहे किंवा मी तो तोडला तर तो आळशीपणा सोडून प्रयत्नवादी बनेल, किंवा फिजिक्स /लॉजिक वगैरेसारख्या मी पदवी घेतलेल्या (माझी फिजिक्सची पदवी आहे म्हणून उदाहरण फक्त) विषयातून मी एक्स्प्लेन केलेल्या घटना आणि एखाद्याने ग्रहगोलांमधे उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केलेल्या समस्या यांमधे काही प्रचंड क्वालिटेटिव्ह फरक आहे असं स्युडो लॉजिक मी मानू शकत नाही. कारण एकूण गौडबंगाल फार म्हणजे फार मोठं आहे.

Nile Thu, 03/11/2011 - 13:53

In reply to by गवि

माझा मुख्य आक्षेप तुमच्या प्रतिसादातील दोन गोष्टींना आहे.

१. अंधश्रद्धेवर विश्वास ठेवणारे आणि विज्ञानावर विश्वास ठेवणारे दोघे तत्वतः एकाच कॅटेगीरीतले आहेत. याचे कारण अर्थातच ते एका कॅटेगरीत नाहीत हे आहे.
२. त्यांच्या अंधश्रद्धेला मान्यता द्यावी या मुद्द्याला.

ज्योतिष किंवा विज्ञान या दोन्ही मार्गांनी उत्तरं मिळत नाहीत असं माझं म्हणणं आहे.

हे म्हणणं अमान्य आहे. पण हे या चर्चेत महत्त्वाचं नाही.

मी एक्झॅक्टली हाच धागा पकडून म्हणतोय की घाबरट म्हणा किंवा काही म्हणा, लोकांना जेव्हा सरळ मार्गाने (तार्किक) उत्तरं मिळत नाहीत तेव्हा ते अतार्किक मार्गावर जाणारच. मग एक मार्ग बंद केलात तर दुसर्‍या मार्गाने..

हे सुद्धा पटत नाही. तार्किक उत्तरे न मिळाल्यावर अतार्किक मार्गावर जाण्याची क्रिया कशी घडते? जोतिष आणि तत्सम अंधश्रद्धावादी लोक किती प्रमाणात तार्किक विचार करून अतार्किक मार्गावर जात असतील? साडेसातीचेच उदाहरण घ्या हवं तर.

जर या अंधश्रद्धा तार्किक विचाराच्या कुठल्यातरी सीमेला पोहोचल्यानंतर बनल्या असतील ( हे काल सापेक्ष आहे, कारण तार्किकता काल सापेक्ष आहे) तर त्या तार्किकतेच्या खुणा दिसाव्यात. आणि त्या खुणांची सीमाही कालसापेक्ष असावी. असे मला तरी दिसत नाही.

आंतरजालावरीलच उदाहरण सांगतो, सर्वव्यापक असे नाही हे माहित आहे तरीही..
इथे गेली दोन-तीन वर्षे घातलेल्या वादांच्या अनुभवानुसार बहुसंख्य अंधश्रद्धाळुंची तार्किकता साध्या फिजिक्सच्या न्युटनच्या पहिल्या/दुसर्‍या नियमांइतकीही नसती. (हे नियम दहावी की बारावी शिकलेल्या सगळ्यांनाच असतात.)

म्हणून फुकट असतात त्या श्रद्धा आणि पैसे उकळणार्‍या अंधश्रद्धा अशी विभागणी करु नये एवढाच लिमिटेड पॉईंट आहे.

पैशांचा संबंधच येतो कुठे? जी अंधश्रद्धा ती अंधश्रद्धा. अंधश्रद्धेने फसवून लोकांना लुबाडणारे ते चोर आणि लुबाडले जाणारे निर्बुद्ध, मुर्ख लोक. पण म्हणून हा मुर्खपणा जस्टीफाय करता येणार नाही.

ज्यांना ज्योतिषावर विश्वास ठेवता येतोय त्यांना ठेवूदेत असं माझं म्हणणं आहे.

कोणाला काय विश्वास ठेवायचा ते त्यांच्या बुद्धीवर अवलंबून आहे. पण असा विश्वास ठेवणं हे मुर्खपणाचं आहे हे एक आणि दुसरं म्हणजे कोण विश्वास ठेवतं म्हणून त्या मुर्खपणाला मान्यता देण्याची गरज नाही.

राहिला मुद्दा अंधश्रद्धेचा तर, याला विरोध केलाच पाहिजे. पुर्वी सती प्रथेला, बालविवाहाल इ. विरोध झाला तेव्हा समाजातून अशा प्रथा नाहीश्या झाल्या. याही अंधश्रद्धाच होत्या. विरोध केला नाही तर ती बळावण्याची शक्यताही असते. त्यामुळे विरोध करणे महत्त्वाचे आहे.

मुळात साडेसातीवर धागा काढणे हेच हास्यास्पद आहे. व्यवस्थापनाने जर जोतिष विभाग द्यावा का यावर माझे मत विचारले असते तर मी त्याला विरोधच दर्शवला असता.

म्हणून फुकट असतात त्या श्रद्धा आणि पैसे उकळणार्‍या अंधश्रद्धा अशी विभागणी करु नये एवढाच लिमिटेड पॉईंट आहे.

पैशांचा संबंधच येतो कुठे? जी अंधश्रद्धा ती अंधश्रद्धा. अंधश्रद्धेने फसवून लोकांना लुबाडणारे ते चोर आणि लुबाडले जाणारे निर्बुद्ध, मुर्ख लोक. पण म्हणून हा मुर्खपणा जस्टीफाय करता येणार नाही.

पैशाचा मुद्दा म्हणजे लुबाडले जाण्याचा, तो अन्य एका प्रतिसादात आला होता. त्यामधे पैसा लुबाडले जाणे म्हणजे एक डिस-इन्सेंटिव्ह आणि तो राहूदे, असा मुद्दा मांडताना मी दारुचं उदाहरण दिलं, त्याचा तुम्ही प्रतिवाद केलात म्हणून मी मूळ उद्देश सांगितला. पैशाचा मुद्दा असा तिसरीकडून कनेक्ट झाला आहे.

बाकी माझे प्रतिसाद म्हणजे हटवादी तत्वज्ञान नव्हे. इनफॅक्ट तुम्ही एक बाजू छान सांगितली आहेत आणि मीही त्यावर विचार करायला लागलो आहे. तुमच्या मुद्द्यांत तथ्य नक्कीच आहे.. अधिक विचाराअंती माझ्या विचारांतली काही मतं बदलायला किंवा त्यातला आडमुठेपणा (असल्यास) कमी व्हायला मदतच होईल. अशीच चर्चा करण्यात आनंद मिळतो. धन्यवाद.

Nile Thu, 03/11/2011 - 19:57

In reply to by गवि

अशीच चर्चा करण्यात आनंद मिळतो. धन्यवाद.

याच्याशी सहमत आहे. (उपमुद्दा: लुबाडले जाण्यासाठीचे अनेक मार्ग उघडे असतीलच, त्याबाबत काळजी नको! ;-) )

सहमत आहे पण ज्या श्रद्धा(अंध) निरुपद्रवी असतात त्याना कसा आणि किती विरोध करायचा हे कालसापेक्शतेने ठरवावे. पुण्याचा गणेश उत्सव आणि जर्मनीचा ऑक्टोबर बिअर फेस्ट एका अर्थी उत्सवच आहेत, दोघांचे रूप विकृत होउ नये एवढी काळजी घ्यावी, बाकी दोघांचे फायदे आहेतच.

Nile Thu, 03/11/2011 - 20:01

In reply to by मी

सहमत आहे पण ज्या श्रद्धा(अंध) निरुपद्रवी असतात त्याना कसा आणि किती विरोध करायचा हे कालसापेक्शतेने ठरवावे.

हे ढोबळमानाने बरोबर आहे. पण हे तर आपण प्रत्येकवेळीच पाहतो, फक्त अंधश्रद्धेला विरोध करतानाच पाहतो किंवा पहायला हवे असे नाही. कोणतीही गोष्ट करताना फायदे कीती तोटे किती याचा ताळा प्रत्येक जण लावायच प्रयत्न करत असतो. ताळा लावण्यात अनेक लोक चुकतात हा भाग निराळा.

बाकी दोघांचे फायदे आहेतच.

अंधश्रद्धा आणि उत्सव साजरे करणे यात फरक आहे. उत्सव साजरा करण्यासाठी कोणतीही अंधश्रद्धा बाळगावी लागतेच असे नाही. पण हा वेगळ्या चर्चेचा मुद्दा, तेव्हा इथे थांबतो.

आडकित्ता Thu, 03/11/2011 - 12:17

In reply to by गवि

अशा वेळी मग दोन मार्ग असतातः

१. मला काही समजत नाही असं म्हणून अज्ञेयवाद की काय म्हणतात तो स्वीकारायचा आणि रडत हसत जे आलंय त्यातून पुढे जात रहायचं.
२. काहीतरी कारण आहे आणि ते प्रयत्न केला तर समजून घेता येईल आणि कदाचित उपायही करता येईल अशा अ‍ॅप्रोचने शोध घेत राहायचं.

साहेबा,
या लॉजिकने विचार करत गेल्यास, पुढे जाऊन कुठे पोहोचतो ते बघू यात का जरा?

१. अज्ञेयवाद स्वीकारून जे असेल त्याचा सामना करणे.
अगदी बाकी कोणत्याही 'वादी जरी असले, तरी 'मोक्षाची' आराधना करणारे आधी स्थितप्रज्ञ होऊ इच्छितातच. रडत हसत जे आलंय त्यातून पुढे जात रहायचं. हे करणारे स्थितप्रज्ञच नव्हेत काय? दैववादाच्या मार्गाने जाउनही शेवटी तीच स्थितप्रज्ञता मिळवायची आहे ना? मग या असल्या ज्योतिषी कुबड्या कशाला हव्यात? जे आहे ते स्वीकारावे लागतेच. कर्मविपाक मानता? मग तुमच्या कर्माचे याच जन्मातले तात्काळ फळ आहे ते. भोगावेच लागते.

यापैकी पहिला मार्ग घेतलेल्याला लोक फारच निर्विकार आणि निरिच्छ समजतील. त्याला नवीन ज्ञान मिळवण्याची इच्छाच नाही अशा अर्थाने... अशा व्यक्तीशी फार काही चर्चाही होऊ शकणार नाही.

निर्विकार, निरिच्छ अशाच लोकांना सगळे दैववादी संत वगैरे म्हणतात ना? मग त्यांच्याशी चर्चा कशाला करायची? ते सांगतात ते स्वीकारायचे. बाबा वाक्यं प्रमाणं ;) असे म्हणत.

२. अ. कारण शोधण्यासाठी सायन्सची कास धरली तर तो माणूस परत क्याटेगरी १ कडे जाणार.
२. ब. आहे ते 'वाईट' स्वीकारून, त्याकडे दुर्लक्ष करणे (Accepting existing evil) कारण अन्यथा दुसरे काही वाईट उद्भवेल ही भिती. तुम्ही दारूचे उदाहरण दिले, मी फलज्योतिषाचे म्हणतो. समाज त्या ऐवजी दुसरी काही प्रथा स्वीकारेल या भितीने त्याला मूक संमती देणे. हे योग्य कसे काय ठरू शकते?

त्याबाबतीत असं म्हणावंसं वाटतं ज्योतिषाला बाद ठरवून मुळात प्रयत्नवादी नसलेले लोक प्रयत्नवादी होतील असं म्हणणं म्हणजे कमी उंचीची घरं बांधण्याने आत्महत्या कमी होतील असं म्हणण्यासारखं आहे.

मुळातले पक्केआळशी तर पूर्णपणे सुधरणार नाहीत, पण त्यांना अन बॉर्डरलाईनवाल्यांनाही "ब्वा माझ्या साडेसातीमुळे मी अपयशी होतो आहे - माझ्या नाकर्तेपणामुळे नाही." असे म्हणण्याची कुबडी राहणार नाही. मग थोडेफार तरी सुधारतील, फटके पडल्यावर.

गवि Thu, 03/11/2011 - 12:23

In reply to by आडकित्ता

मी भविष्याला विरोध किंवा समर्थन करण्याऐवजी त्यातली निरर्थकता दाखवतोय.. (ज्योतिषातली नव्हे, त्याला विरोध किंवा समर्थन देण्यातली.. कारण अज्ञाताचं आकर्षण ही मूळप्रवृत्ती आहे..)

आता खालील म्हणण्याबद्दल..

मुळातले पक्केआळशी तर पूर्णपणे सुधरणार नाहीत, पण त्यांना अन बॉर्डरलाईनवाल्यांनाही "ब्वा माझ्या साडेसातीमुळे मी अपयशी होतो आहे - माझ्या नाकर्तेपणामुळे नाही." असे म्हणण्याची कुबडी राहणार नाही. मग थोडेफार तरी सुधारतील, फटके पडल्यावर.

नीट निरिक्षण केल्यावर असं लक्षात येईल की बॉर्डरलाईन लोक हेही आणि तेही करत असतातच.

म्हणजे ऑपरेशनही करु अन ताईतही बांधू..

अँटिबायोटिकही घेऊ, अंगाराही लावू आणि कोणती दशा चालू आहे ते पाहून ग्रहशांतीही करु.. वरुन एक कुर्ल्याला मावशीने सांगितलेले आयुर्वेदिक वैद्य आहेत त्यांचंही औषध घेऊ..

"प्रयत्नात" काही कमी पडायला नको आपल्याकडून..

त्यामुळे बॉर्डरलाईनवाल्यांचं विदिन नॉर्मल लिमिट्स चालूच असतं हो सर्व बाजूंनी आवश्यक ते करणं..

ज्योतिष्यावर विश्वास ठेवणार्‍यांचा "ज्योतिष्यासहित कशावरच" १००% विश्वास नसतो हे प्लीज ध्यानात घ्या..

घंटासूर Thu, 03/11/2011 - 12:40

In reply to by गवि

ज्योतिषातली नव्हे, त्याला विरोध किंवा समर्थन देण्यातली.. कारण अज्ञाताचं आकर्षण ही मूळप्रवृत्ती आहे.

अज्ञाताचं आकर्षण नाही तर अज्ञाताची भीती हा शब्द येथे जास्त उचित होईल काय?
ग्रह, तार्‍यांचा शोध, परग्रहावरील जीवसृष्टीचा शोध, समुद्रातळात अधिकाधिक खोल खोल जाण्याची उर्मी ह्याला तुम्ही अज्ञाताचं आकर्षण म्हणू शकता. विविध शोध ह्या अज्ञाताच्या आकर्षणापायीच लागलेले आहेत.

येथे साडेसातीपायी जे उपाय केले जातात ते फेर्‍या मारण्यासारखे, स्तोत्रे म्हणण्यासारखे निरूपद्रवी असोत वा ज्योतिषांसारखे उपद्रवी पण ते केले जातात ते शनीच्या भीतीपायीच ना. आपण हे केले नाही तर शनीची वक्रदृष्टी पडेल, कोप होईल. हे आकर्षण नसून भीतीपायी केले जाणारे उपाय.

त्यामुळे बॉर्डरलाईनवाल्यांचं विदिन नॉर्मल लिमिट्स चालूच असतं हो सर्व बाजूंनी आवश्यक ते करणं..
ज्योतिष्यावर विश्वास ठेवणार्‍यांचा "ज्योतिष्यासहित कशावरच" १००% विश्वास नसतो हे प्लीज ध्यानात घ्या

याबाबतीत पूर्णपणे सहमत. हे तर घडोघडी अनुभवास येतेच.

गवि Thu, 03/11/2011 - 12:57

In reply to by घंटासूर

अज्ञाताचं आकर्षण नाही तर अज्ञाताची भीती हा शब्द येथे जास्त उचित होईल काय?

तसंही चालेल.. आकर्षण आणि भीती हे एकाच स्पेक्ट्रममधले दोन बाजूचे रंग आहेत.

शनीची भीती ऊर्फ शनिकोपावरच्या उपायाचं आकर्षण.

मेडिकल सायन्सने "हा कॅन्सर बरा होणार नाही" असं सांगितल्यावर मेडिकल सायन्सकडून निश्चित १००% निराशा पदरी पडलेली आहे म्हणजे पूर्ण ज्ञान झालेलं आहे.. पूर्ण ज्ञान झाल्याने आता त्याचा आधार नाही.. आता आधार तर हवाच आहे.. मग अज्ञाताचा आधार त्यातल्या अज्ञात भागामुळेच काहींना घेता येतो..

तशी गूढता आयुर्वेदात काही प्रमाणात टिकून आहे. (अमुक वैद्यबुवांच्या हाताला इतरांपेक्षा "वेगळा गुण" आहे..) किंवा सेमी-मेडिकल व्यावसायिक.. (अमुक एक वनस्पती वापरुन अमावास्येच्या रात्री पूर्वेकडे तोंड करुन घेतली की गुण येतो..)

त्यातही उपाय होईल न होईल (आयुर्वेदाची कोणाशी तुलना करायची नाहीये इथे हे स्पष्ट करतो..) .. पण मनाला समाधान मिळतंच.. कारण आपल्याला अज्ञात असा काही उपाय होण्याची शक्यता आपल्याला त्यात सापडते..

उदा. आयुर्वेद जर स्टँडर्डाईझ झाला आणि त्यानेही स्पष्ट सांगायला सुरुवात केली की माझ्याकडे या कॅन्सरवर उपाय नाही.. तर लोक आयुर्वेद सोडून अन्य कशाकडेतरी वळतील.. ज्योतिष म्हणा किंवा अन्य काही..

..असो..

घंटासूर Thu, 03/11/2011 - 13:26

In reply to by गवि

वरील उदाहरणं म्हणजे सगळे प्रयत्न संपल्यावर केलेले हतबल झाल्यानंरचे उपाय.
पण इथे श्रद्धेचा भाग येतो. की आता सगळे उपाय थकले आता तूच त्राता असे म्हणून नास्तिक माणूसही दैववादाकडे वळताना दिसतो.

पण साडेसातीमध्ये असे घडत नाही, प्रतलावर त्या राशीत शनी असल्यामुळे आपले एखादे काम होत नाही म्हणून साडेसाती, लग्न होत नाही-साडेसाती आहे, नोकरी मिळत नाही-साडेसाती आहे, लोक आपली कर्मे विसरून मग कर्मकांडातच जास्त रममाण होतात.
बारा राशी म्हटल्यावर केव्हा ना केव्हा कुठल्यातरी राशीत शनी असणारच याचाच अर्थ एकाचवेळी ८० ते ९० कोटी लोकं साडेसातीग्रस्त आहेत असे समजायचे का? तेव्हा साडेसाती म्हणजे निव्वळ भंपकपणा, परीस्थितीला सामोरे जाण्याऐवजी पलायनासाठी घेतलेली दैववादाची कास.

गवि Thu, 03/11/2011 - 13:39

In reply to by घंटासूर

तेव्हा साडेसाती म्हणजे निव्वळ भंपकपणा, परीस्थितीला सामोरे जाण्याऐवजी पलायनासाठी घेतलेली दैववादाची कास.

भंपकपणाच आहे तो.. ठीक आहे.. पण कसलीतरी कास घ्यायचीच ना.. तर काहीजण या वादाची घेतात आणि काहीजण त्या वादाची.. प्रत्येक वेळी सर्व उपाय थकलेली परिस्थितीच कशाला पाहिजे.. रोजच्या जगण्यात कष्ट, प्रयत्न सगळं करत असूनही त्रिविध तापपीडांनी कणाकणाने पिचणार्‍या माणसाला खूपदा कसलीच आशा दिसत नसते.. अशा वेळी "मीच काहीतरी काळजी घेण्यात कमी पडलो म्हणून ही संकटं , पीडा आल्या.." असं मानण्याऐवजी "साडेसाती आहे म्हणून चाललंय सगळं.." असं म्हणत नशिबाला बोल लावून त्याचं समाधान होत असेल तर होईना..

प्रोजेक्ट केलं जातं त्यापेक्षा बीनाईन आहे असं म्हणण्याचा प्रयत्न चालू आहे माझा..

ऋषिकेश Thu, 03/11/2011 - 10:03

माझा फलज्योतिषावर विश्वास नाही.
मात्र लेखातील काही तृटि दूर करतो व पुरवणी जोडतो

साडेसाती एका राशीला नाही तर एकावेळी तीन राशींना चालु असते. सध्या कन्या राशीचे शेवटचे अडीच, तुळचे मधले अडिच आणि वृश्चिकेचे पहिले अडीच चालु असावेत. राशी म्हणजे चंद्र-सुर्याच्या 'भासमान' मार्गाचे १२ समान भाग. या भागात असलेल्या तार्‍यांचा एक आकार कल्पून 'अभ्यासाच्या सोयीसाठी' त्यांना राशींमधे (व त्याच मार्गाचे २७ भाग करून नक्षत्रांमधे विभागले आहे) यापैकी ग्रहांची गती पृथ्वीच्या गतीपेक्षा वेगळी असल्याने हे ग्रह वेगवेगळ्या राशीत आहेत असा आपल्याला पृथ्वीवरून बघता 'भास' होतो. (मुळात एका राशीतील तारे हे आपल्याला एका प्रतलावर दिसत असले तरी प्रत्यक्षा त्रिमिती-चतुर्मिती मधे विचार केल्यास एकमेकांशी त्यांचा सांबंधही लावता येऊ नये. असो.). त्यामुळे शनी चे आकाशातील स्थान, त्याच्या उगवण्या-मावळण्याच्या वेळा वगैरे अभ्यास करण्यासाठी या ज्योतिषशास्त्राचा उपयोग असला तरी त्याला कुणी 'फल' चिकटवू लागला की मी तेथून दुर होतो.

असो. अजून बरेच लिहिता येईल.. तुर्तास इथेच थांबतो

अमोल केळकर Thu, 03/11/2011 - 10:09

चर्चा आवडली. :)

अवांतर : - शनी महाराजांचे कधीही समोरुन दर्शन घेऊ नये. तिरपे उभारुन घ्यावे. शनी महाराजांची दृष्टी वाईट असते म्हणुन शनी महाराजांच्या डोळ्याकडे पाहू नये.

अमोल केळकर
----------------------------------------------------------------------------

नितिन थत्ते Thu, 03/11/2011 - 12:19

आमचे एक बॉस म्हणत असत, "मला साडेसाती नसते. माझीच इतरांना साडेसाती असते".

परिकथेतील राजकुमार Thu, 03/11/2011 - 13:12

भिंती,दरवाजे रंगवून ठेवणार्‍या लहान मुलाच्या हातात अचानक नविन डायरी पडली, तर त्याला जो काय आनंद होतो म्हणून सांगु...

इतरांच्या डॉक्याला मात्र ताप....

संगणकस्नेही Thu, 03/11/2011 - 16:07

साडेसाती प्रकार संपुर्णपणे खरा आहे असा माझा स्वानुभवारुन ठाम विश्वास आहे.

पुष्करिणी Thu, 03/11/2011 - 17:03

कधी कधी काहीही न करणं हाच उत्तम मार्ग असू शकतो, काही रिअ‍ॅक्शन देण्याऐवजी वेट अँड वॉच फॉर सम टाइम. केले प्रयत्न आणि मिळाला लगेच रिझल्ट असंही कधी कधी होत नाही. आयुष्यातल्या काही काळात प्रयत्न तर करावेच लागतात पण त्याचबरोबर पेशन्सही दाखवावा लागतो, अधिरता दाखवून उपयोग होत नाही. आणि हा काळ त्या वेळेस प्रयत्नांपेक्षा पेशन्स दाखवावा लागल्यानं बराच मोठा वाटत जातो. साडेसातीचा काळ असा असावा.

श्रद्धेचा बाजार मांडून स्वतःची तुंबडी भरण्याच्या वॄत्तीचा निषेध आहेच, पण साध्या आजारात नाही नाही त्या टेस्ट करायला लावून रूग्णाला आणि त्याच्या कुटुंबाला घाबरवणारे डॉक्टरही काही कमी नाहीयेत, स्वतः अनुभव घेतेलेला आहे.
त्यामुळे मी व्यक्तीला जर एक ग्राहक समजत असेन तर त्या व्यक्तिने आयुर्वेद, योग, ज्योतिष, कला, शास्त्र, न्युमरोलॉजी, संगीत, वास्तुशास्त्र इ.सगळ्यांचा कायदेशीर मार्गाने स्वतःच्या शारिरिक/मानसिक फायद्यासाठी जरूर उपयोग करून घ्यावा ह्या मताची मी आहे. बहुतेक लोकं ही वर गविंनी म्हट्ल्याप्रमाणे बॉर्डरलाइन कॅटेगिरीत येतात. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक/डिपेंडंन्सी चूकच.

प्रा.डॉ.उगीच बिरुदे Thu, 03/11/2011 - 17:07

'शनिदेव रुठा तो आसमान टुटा' असे गाणे आमच्या गावच्या मारुती मंदिराबाहेर वाजत असते. तेव्हापासून आपण शनिची धास्तीच घेतली आहे.

प्रकाश घाटपांडे Thu, 03/11/2011 - 18:40

सारिका म्याडन ना यात खरोखरीच रस असेल असे गृहित धरुन त्यांच्यासाठी ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी... प्रश्नोत्तरातुन सुसंवाद मधुन उधृत......

१४) साडेसाती काय प्रकार आहे?
शनीने पिडलेली साडेसात वर्षे म्हणजे साडेसाती. ही साडेसात वर्षे तीन अडीचक्यांमध्ये विभागलेली असतात. आयुष्यातला बॅड पॅच या अर्थानेही साडेसाती शब्द वापरला जातो. कोणत्याही काळी बारा पैकी कोणत्या ना कोणत्या तरी तीन सलग राशींना एकाच वेळी साडेसाती चालू असतेच. याचा अर्थ, शंभरातल्या २५ जणांना साडेसाती चालूच असते. एकेका राशीत अडीच वर्षे राहात शनी ३० वर्षात बारा राशीतून प्रवास करतो. माणसाच्या जन्म-वेळी चंद्र ज्या राशीत असतो ती त्याची रास मानतात. समजा एखाद्याची वृषभ रास असेल तर शनी जेव्हा त्या राशीच्या 'अलिकडे` म्हणजे मेष राशीत येतो तेव्हा त्याला साडेसातीची पहिली अडीचकी चालू होते. जेव्हा शनी प्रत्यक्ष 'त्या` म्हणजे वृषभ राशीत प्रवेश करतो तेव्हा मधली अडीचकी चालू होते व जेव्हा तो 'पलिकडे` म्हणजे मिथुन राशीत प्रवेश करतो तेव्हा शेवटची अडीचकी चालू होते. अशी ही साडेसाती.
साडेसातीच्या काळात माणसाच्या प्रयत्नांना यश येत नाही, त्याची व्यावहारिक गणितं चुकतात, त्याला दुर्बुद्धी सुचते, त्याच्यावर संकटं कोसळतात अशी समजूत आहे. खरंतर अशा गोष्टी आपल्या आयुष्यात इतर वेळीही होत असतात. पण साडेसातीच्या काळात घडल्या तर त्यांचा संबंध लगेच शनीशी जोडला जातो. या काळात शनीची अवकृपा होउ नये म्हणून शनिवारी, अमावस्येला शनीला तेल वहाणे, रूईची माळ वहाणे, शनीमहात्म्य वाचणे इ. गोष्टी पीडाशामक म्हणून ज्योतिषी सुचवतात अन् माणूस त्या गोष्टी करतो. समजा शनीने जाहीर केले की, बाबांनो मी काही तुम्हाला त्रास देणार नाही, तर मग कोण कशाला करील या गोष्टी ? म्हणजे या सर्व गोष्टी शनीच्या भीतीपोटी केल्या जातात, भक्तीपोटी नव्हे. साडेसाती बाबत विष्णुशास्त्री चिपळूणकर आपल्या १८७५ साली प्रसिध्द झालेल्या निबंधमालेतील 'लोकभ्रम` या निबंधात म्हणतात, '' येथे कोणाच्या राशीवर शनिमहाराजांची स्वारी वळली की, त्याच्या प्रीत्यर्थ लोहदान, तिलदान वगैरे हजारो धर्मकृत्ये केली तरी त्यांचा रोष कमी होत नाही; पण तीच स्वारी इंग्लंडातल्या वगैरे मनुष्यांच्या बिलकुल वाटेस न जाता खुशाल आपल्या वाटेने चालती होते. तेव्हा या त्यांच्या पंक्तीप्रपंचाचे काय बरे चीज असावे.? ज्या अत्युग्र ग्रहाने प्रत्यक्ष शंकरावरही दोन तीन घटिका प्रभाव गाजवला, ज्याची दृष्टि लंकापतीच्या सिंहासनावर सारखी लागली असता लवकरच चौदा चौकडयांचे राज्य फडशा होऊन गेलेे, त्याचेच सामर्थ्य य:कश्चित परदीपस्थ मनुष्यांवर चालू नये हे केवढे आश्चर्य! ``
ज्योतिषाने सांगितल्याप्रमाणे आपण उपाय करतोय् ना, मग आता आपल्याल त्रास होणार नाही, या स्वयंसूचनेनेच माणसाला बळ येते. त्याचा उपयोग संकटांशी सामना करण्यासाठी होतो. "आपल्या अपयशाला आपण जबाबदार नसून ग्रहस्थितीमुळे तसे घडतंय्, देवादिकांना सुद्धा जिथं साडेसाती चुकली नाही तिथं तुमची आमची काय कथा?" हा विचार माणसाला धीर देतो.

प्रियाली Thu, 03/11/2011 - 18:48

In reply to by प्रकाश घाटपांडे

लंकापती परदेशीच नाही का? यावरून शनीमहाराजांची वक्र दृष्टी परदेशस्थ मंडळींवरही पडते असे मानण्यास जागा वाटते. ;-) ह. घ्या.

आडकित्ता Thu, 03/11/2011 - 20:01

In reply to by प्रियाली

अभ्यास करत जा जरा.
लंका आसिंधूसिंधूमधे 'मोडते'. काय हे प्रियाली ताई? बीएमाआर हाय झाला तुमचा (बेसिक मे राडा) ;) :दिवे:

Nile Thu, 03/11/2011 - 20:05

In reply to by आडकित्ता

लंका हे शत्रू राष्ट्र असले तरी ते आमचे शत्रू राष्ट्र असल्याने तिथे आमचे नियम लागू आहेत. ;-)

प्रियाली Thu, 03/11/2011 - 20:09

In reply to by आडकित्ता

त्यांच्या काँटेक्स्ट मधे(आसिंधूसिंधू) बरोबर असेल. आज त्यांची काँटेक्स्ट मान्य आहे का तुम्हाला? ;-)

आजच्या काँटेक्श्टमध्ये लंका परदेस आहे बरें! ;-)

............सा… Thu, 03/11/2011 - 18:49

In reply to by प्रकाश घाटपांडे

धन्यवाद.
पण माझा साडेसातीतील अनुभव अधिक कष्टदायक होता. जो की नेहमी मी अनुभवला नाही आणि एक विशेष म्हणजे, त्यावर तोडगाही सापडला. या काळात खूप अंतर्मुख होणे, परमार्थाकडे वळणे (जबरदस्तीने, भीतीने) आदि अनुभव वाट्यास आले, जे की यापूर्वी आले नव्हते व आता देखील येत नाहीत.
I would say the period shaped my life in Unique way

प्रकाश घाटपांडे Thu, 03/11/2011 - 18:56

In reply to by ............सा…

आयुष्यात उन्मादाने उन्मत्त झालेल्या लोकांना साडेसाती विचार करायला लावते. माज उतरवते अशा अर्थाने साडेसाती ही आवश्यकही आहे असे म्हणतात.

............सा… Thu, 03/11/2011 - 19:06

In reply to by प्रकाश घाटपांडे

आयुष्यात या काळाने अतोनात "संतुलन" आणले. मानसिक, भवनिक खूप स्थिरबनवले. दीर्घकाळ रेंगाळलेले प्रश्न मार्गी लागले. घंटासूर म्हणतात त्याप्रमाणे - अपयशाचे खापर शनिवर फोडायचा मानस तर दूरच, मला शनिइतका दुसरा ग्रह प्रिय नाही. परत तेच -

"चित्ते कृपा समरनिष्टुरता च दृष्ट्वा...." ................... अतिशय निष्ठुर भासणारा हा कालावधी किती महत्वाचा होता हे आज कळून येते. पण तेव्हा मी तप्त तव्यावर टाकलेल्या कीडामुंगीसारखी अक्षरक्षः .... अतिशय घालमेलीचा कालावधी.

तिरशिंगराव Thu, 03/11/2011 - 19:53

माझ्या आयुष्यात दोनदा साडेसाती येऊन गेली. त्या साडेसातीच्या काळातले आणि बाकीच्या काळातले अनुभव आठवले तर असे म्हणता येईल की त्या काळात
शारीरिक व मानसिक त्रास जास्त झाला. पण त्याचबरोबर आर्थिक व मानसिक प्रगतीही जास्त झाली. थोडक्यात दोन्ही प्रकारची फळे जास्त तीव्रतेने मिळाली.
याकाळात मी कोणतेही धार्मिक वा इतर उपाय केले नाहीत व स्वतःच्या हिंमतीवर आलेल्या सर्व प्रसंगांना तोंड दिले.

धनंजय Thu, 03/11/2011 - 21:31

माझ्या वयाचे साडेसात-साडेसात वर्षे भाग केले, तर कुठल्याही साडेसात वर्षात जीवन बदलणार्‍या गोष्टी झाल्या :
०-७.५ वर्षे : अर्भक-स्वास्थ्याचे कठिण प्रकार आणि बाल-मनावरील संस्कार
२.५-१० वर्षे : बालमनावरील संस्कार
५-१२.५ वर्षे : आवडीनिवडी, छंद, बालमनावरील संस्कार
७.५-१५ वर्षे : प्राथमिक आणि माध्यमिक शाळा - बर्‍यापैकी तणावपूर्ण ("अँग्स्टपूर्ण") काळ. बरेचसे आयुष्यभर साथीचे छंद सुरू
१०-१७.५ वर्षे : माध्यमिक आणि हायस्कूल. मॅट्रिकची परीक्षा त्यानंतर घराबाहेर पडणे - बराच तणाव/आनंदमय प्रसंग (पौगंडावस्थेत भावना ज्या उंच-खोल प्रकारे प्रवास करत तसा नंतर क्वचितच होतो.)
१२.५-२० वर्षे : अभ्यास करायची आणि विचार करायची तयारी होण्याची वर्षे. ज्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला त्यामुळे आयुष्याची गती बदलली
१५-२२.५ वर्षे : काहीसे आदल्यासारखे, पण कॉलेजमधून उत्तीर्ण झाल्यानंतर तणाव, निवडलेले/उपलब्ध/अनुपलब्ध पर्याय यांमुळे पुढची वाटचाल ठरणे
१७.५-२५ वर्षे : आईवडलांच्या छत्राबाहेरील पहिला काळ. आयुष्यावर परिणाम करणारे स्वतंत्र निर्णय घेतले.
२०-२७.५ वर्षे : उच्च शिक्षण आयुष्यात फार महत्त्वाचे. पहिली प्रेमप्रकरणे, खोल आघात, वगैरे
२२.५-३० वर्षे : पहिली प्रेमप्रकरणे, अत्युच्च शिक्षणाबाबत अशाश्वती, पहिल्या "खर्‍या" नोकरीबाबत अशाश्वती
२५ - ३२.५ वर्षे : ...
वगैरे.

मला झालेले मोठे आजार, दुखापती, वाहन अपघात वगैरे वेगवेगळ्या वयांत झालेले आहेत.

आता वरील यादीमधून कुठली साडेसात वर्षे सर्वात महत्त्वाची, ते काही मला सांगता येत नाही. पण कुठलीही साडेसात वर्षे जीवन बदलणारी होत. कुठल्याही साडेसात वर्षांत आयुष्याशी झगडावेच लागले, काही विशेष सुखदायक घटना होत्या.

मला आधी माहीत नव्हते, पण आताच चटकन हिशोब करून माझी साडेसातीची वर्षे कोणती ते पडताळले. अर्थातच वरील यादीपैकी एक कलम साडेसातीचे कलम आहे. आता मला आधी ती वर्षे सांगितली असती, आणि विचारले असते "या काळात आयुष्य बदलणार्‍या सुखद/दु:खद/तणावपूर्ण घटना घडल्या का?" तर मी तेवढ्यापुरताच ताळा लावून मी "होय" म्हणाले असतो.

चर्चाप्रास्तवक सारीका यांना माझी जन्मतारीख/वेळ माहीत नाही. त्यामुळे वरील दहा कलमे म्हणजे दहा वेगवेगळ्या साडेसातींचे अनुभव आहेत, असे त्यांनी मानून घ्यावे. (कारण कोणाची-ना-कोणाची साडेसाती ०-७.५, २.५-१०,... वगैरे येणारच. प्रत्येक कलम म्हणजे त्या-त्या जणाने सांगितलेली कथा मानावी.) Buy 1 get 9 free.

दुर्लक्ष Thu, 03/11/2011 - 22:41

काही लोकांचे अख्खे आयूष्य असे जाते जणू स्वर्गातच वावरत आहेत, तर काही लोकांच्या कश्ट, त्रास, दूखः यांना पारावार नसतो. यात विशीष्ठ ७.५ वर्षांचा संबंध येतोच कसा ? Anyways if the matter is beyond humanity it is certainly beyond me.... म्हणूनच खात्रीने असे काणतेही मत व्यक्त करता येणार नाही, पण लोकांचे प्रतीसाद रोचक.

अवांतर :- सदरील धागा हा ग्रहांकितचा दिवाळी अंक वाचायला न मिळाल्याचे लक्षण का मानू नये ? ;)