जातककथा – अरुण खोपकर

पिटल्या
पिटल्या हा बोका माझ्या अडीच-तीन वर्षांपासूनच्या आयुष्यातला व आठवणीतला अत्यंत जवळचा असा पहिला प्राणी होता. पिटल्या आठवणीत राहण्यासारखाच होता. त्याचा देह धष्टपुष्ट. चालणे रूबाबदार. तो चालताना नेहमी त्याचे शेपूट शरीराशी नव्वद अंशाचा कोन करून असायचे. टोक किंचित वळल्यामुळे ते अधिकच सुंदर दिसत असे. पिटल्याचा रंग सोनेरी-केशरी होता. त्याच्या सर्वांगावरही वाघासारखे पट्टे होते, पण ते काळे नसून गर्द केशरी रंगाचे होते.
पूर्वेला उघडणाऱ्या छोट्या अरूंद खिडकीजवळ माझे 'अभ्यासा'चे सागवानी टेबल होते. माझ्या वडिलांना – वसंतला – सुतारकाम अतिप्रिय असतानाच्या काळात त्याने ते टेबल बनवले होते. माझ्या डोळ्यासमोर टेबलाचे जे चित्र आहे, त्यातून मला आता जाणवते की ते art nouveau ह्या शैलीतले होते. निसर्गात वेलींना असणाऱ्या सहजसुंदर वळणांचा त्याच्यात जागोजागी वापर केला होता. त्याच्या पृष्ठभागाच्या कडाही अशाच वळणावळणातून बनलेल्या. पायांना कंसासारखा बाक. उन्हात त्याच्या पॉलिशचा हलका तपकिरी थर चकाकत असे. पिटल्या त्याच्या जंगलवजा वक्र रेषांच्या मधोमध वाघासारखा लोळत, कुशी बदलत, शरीराचे विविध कमनीय आकार करून, अर्धवट डोळे मिटून सकाळचे ऊन खात असे. कधी झोपेत त्याच्या गुलाबी जिभेचे टोक जरासे बाहेर आलेले असे. ते पाहत पाहत, त्याची मान अलगद कुरवाळणे हा एक सुखद विरंगुळा होता.
माझा थोरला भाऊ अरविंद व वडील वसंत ह्या दोघांनाही फोटोग्राफीचा छंद असल्याने आमच्या घरात शेकडो फोटो होते. या अस्ताव्यस्त संग्रहात, माझा बिनहाताच्या बनियनमधला नुक्त्याच झोपेतून उठलेल्या अवस्थेत खुर्चीवर बसलेला फोटो अनेक वर्षे होता. माझ्याशेजारी टेबलावर पिटल्या बसलेला आहे. त्याच्या शरीराच्या एकाही स्नायूत ताण जाणवत नाही. त्याने दोन्ही पंजे लांब केलेले आहेत. चेहरा माझ्या बाजूला वळवला आहे. बाकीच्या शरीराने नदीच्या वळणासारखे वळण घेतले आहे आणि तो सुखासनात पहुडला आहे.
अनेक दशकांनी मी टांझानियातल्या गोरांगोरो या निद्रिस्त ज्वालामुखी विवरात सिंहाला, आपल्या सिंहिणी व छाव्यांसह, तिसऱ्या प्रहराच्या उन्हात ऐटीत बसलेला पाहिला, तेव्हा मला पिटल्याची फार आठवण आली. ह्या दोघांच्या शरीराच्या सहजसुंदर लावण्यासारखाच त्यांना जोडणारा दुवा म्हणजे, ते एकाच मार्जार कुटुंबातले होते आणि शिकार करणे हा त्यांचा स्वभाव होता.
मी अडीच वर्षांचा असल्यापासून सात वर्षांचा होईपर्यंत, पिटल्या आमच्या घरी येऊन जाऊन राहात असे. मला सौंदर्यानुभवाचे पहिले धडे मिळाले, ते पिटल्याकडे सतत पाहून. आधीच मांजरजातीला निसर्गाने असे शरीर बहाल केले आहे, की जणू तो प्रवाही पाराच आहे. कोणत्याही आकाराच्या जागेत ते अगदी चपखलपणे बसते. मग ती जागा स्वयंपाकघरातले पातेले असो, दिवाणखान्यातली पाहुण्याची हॅट असो, अडगळीतला बुटाचा खोका असो, घरातली उंच तुळई असो, कपाटाखालची जागा असो, चुकून उघडा राहिलेला टेबलाचा खण असो, सहज हातातून नेता येणाऱ्या टाईपरायटरचे कव्हर असो, दरवाजाबाहेरचे पायपुसणे असो, वेताची परडी असो किंवा उघडी हँडबॅग असो. मांजराचे शरीर नेहमी सर्वात सहजसुंदर आकार करून, त्यात असे फिट्ट बसते, की जणू ती जागा त्याच्याचकरता निर्माण केलेली आहे.
अर्थातच हे सारे विचार लहानपणी माझ्या मनात नव्हते. मी पिटल्याचे सौंदर्य, जेव्हा संधी मिळेल तेव्हा न्याहाळत असायचो. तू काय करतो आहेस असे मला कुणी विचारले, तर मी सांगत असे, की मी पिटल्याला बघतो आहे. पिटल्याला 'बघणे' हा एक पूर्ण वेळाचा 'व्यवसाय' मी साधारण दोन वर्षे चालवला व त्यात यशस्वी झालो. आज मला मांजरांच्या व मांजरकुटुंबांच्या डझनावारी हालचाली व पोझेस दृक्-पाठ आहेत.
पिटल्याने मला एका कृत्याने जबरदस्त धक्का दिला. त्याला घेऊन मी एकदा घराच्या गच्चीवर गेलो होतो. पिटल्या इतका वजनदार होता, की त्याला उचलून कुठेही नेऊ शकणे ही मला फार मोठी कामगिरी वाटायची. कलत्या दुपारची वेळ होती. पिटल्याबरोबर खेळण्याकरता मी एक टेबलटेनिसचा चेंडू घेऊन गेलो होतो. मी तो फेकायचा आणि पिटल्याने तो पकडायचा. क्वचित तो आपला पंजा हॉकी स्टिकसारखा वळवून, चेंडूचा पाठलाग करीत दूर नेत असे आणि अचानक पाठीवर लोळून, कधी या बाजूला तर कधी त्या बाजूला नेत असे.
पिटल्या जिथे लोळत होता, त्यापासून काही अंतरावर उतरलेल्या तीन-चार चिमण्यांचा चिवचिवाट सुरू झाला. अचानक पिटल्याने बाकी इतर सर्व हालचाली थांबवल्या. फक्त डोळे उघडून चिमण्यांवर नजर रोखली. ती न उचलता, तो अलगद उठून बसला. त्याच्या सर्व शरीरात दबलेल्या स्प्रिंगसारखा ताण आला. त्याने एका झेपेत चिमण्यांच्या वर्तुळातून जरा बाहेर आलेल्या एका चिमणीला पकडले. बाकीच्या चिमण्या मोठ्याने चिवचिवाट करत उडून गेल्या.
पिटल्या चिमणीपासून जरासा वर उठल्यावर मी पाहिले, तर चिमणी निपचिप पडून होती. तिच्या मानेजवळ रक्ताचे थेंब दिसत होते. मी पिटल्याकडे पाहिले तर त्याच्या तोंडालाही रक्त लागले होते. मला इतकी भीती वाटली की मी ओरडूदेखील शकलो नाही. त्या क्षणी मला जाणवले, की माझ्या लाडक्या पिटल्याच्या शरीरात मला कधीच शंकाही न आलेला दुसरा पिटल्या राहतो आहे.
पिटल्या चिमणीपासून चार पावले दूर गेला. आपण मारलेली चिमणी खाण्यात त्याला काहीच रस नव्हता. मग त्याने ती तोंडात उचलली व माझ्या दिशेने नेहमीच्या रूबाबाने येऊ लागला. मी त्याला तिथेच सोडून घरी धावत गेलो. जे काही झाले होते, ते सारे माझ्या आकलनापलीकडे होते. चिमणीने पिटल्याचे काहीही वाकडे केले नव्हते. मग त्याने तिला का मारले? एक दिवस तो असाच माझ्यावर चालून आला तर?
मी माझ्या आईला – लीलाला – सारे सांगितले. तिने मला समजावून सांगितले, की मांजर हे जन्मताच शिकारी असते. पिटल्याचा त्यात काही दोष नाही. तिने माझी खूप समजावणी केली. हळूहळू मी थाऱ्यावर आलो. पण हा प्रसंग कधीच विसरलो नाही.
मी हे सारे डोळ्यासमोरून बाजूला केले व पिटल्यावर पूर्ववत प्रेम करू लागलो. तो नेहमीप्रमाणे घरी येत असे. रात्री माझ्या अंथरूणात झोपतही असे. पिटल्याची शिकारी वृत्ती मी जवळजवळ साफ विसरलो होतो, तेवढ्यात तिची आठवण करून देणाऱ्या काही घटना घडू लागल्या.
आमच्या वाडीत पाठारे नावाचे एक कुटुंब रहात होते. स्वत:चा छोटासा बंगला असलेले वाडीतले ते एकच एक कुटुंब. त्यांचा एक मुलगा, बाबा उर्फ प्रसाद, माझ्या वर्गात होता. पाठारे कुटुंबाची जीवनशैलीच वेगळी होती. बाबा आपल्या वडिलांना पप्पा म्हणायचा व आईला मम्मी. १९४८ ते १९५० या काळात, मराठी कनिष्ठ मध्यमवर्गाच्या रोजच्या आयुष्यात ह्या दोन शब्दांचा प्रवेश झाला नव्हता. बाबाचे वडील सिव्हिल इंजिनीअर होते. ते पंख पसरलेल्या फुलपाखरासारखा बो-टाय व कोट घालून कामाला जात. त्यांची एक जुनी मोटरगाडीही होती.
पप्पा पाठारे स्वभावाने अत्यंत मवाळ व मितभाषी. पण बाबाच्या आईंना मात्र पप्पांसकट इतर कुटुंबीय व सारे वाडीवासी घाबरून असत. त्या भरदार शरीराच्या होत्या, तर पप्पा नाजूक. त्यांच्या साड्या उंची, तलम व रूबाब कडक. त्यांच्या घरी गेल्यावर आपल्याला ठाऊक नसलेल्या 'मॅनर्स'मधली – हा शब्दही मी प्रथमच ऐकला होता – कोणती आपण न कळत तोडू हे कळत नसे. टेबलावर बसून सुरीकाट्याचमच्याने खाणारे हे माझ्या माहितीतले पहिले कुटुंब. मम्मी उदार स्वभावाच्या होत्या व त्यांच्या घरी गेल्यावर काही तरी खाऊ मिळत असे. पण तो विशिष्ट 'मॅनर्स'नी खायला लावल्याने, तो कसा लागतोय यापेक्षा, आपण तो कसा खातो याच्याकडे सारे लक्ष केंद्रित झाल्याने त्याची चवच निघून जात असे.
पाठाऱ्यांच्या आवारात कोंबड्यांची खुराडी होती. सकाळी व संध्याकाळी जमिनीवर दाणे फेकून त्यांना बाहेर सोडत. मला त्यांच्या घरी असलेल्या कुर्रेबाज कोंबड्याच्या ऐटीची, बांग देण्याची, लाल तुरा झटकण्याची फार गंमत वाटायची. त्याचे डोळेही लाल व तपकिरी. कानांच्या 'पाळ्या' आणि चोचीखालचा 'ओठ' हेदेखील लालभडक आणि दाणेदार.
मला कोंबडीची पिल्ले दाणे टिपताना पाहायला आवडायचे. कोंबडी अंडे कसे उबवते हे ऐकल्यावर मी थक्कच झालो. चकचकीत अंडे कोंबडीतून कसे बाहेर पडते, हे मला पाहायचे होते, पण आजतागायत माझी ही इच्छा सफल झाली नाही. ती उठल्यावरच हे ब्रह्मांडदर्शन व्हायचे. त्याचा निर्दोष आकार पाहण्याची मजा ही जितकी डोळ्यांना येते, त्यापेक्षा ते अंडे हातात घेऊन गोल फिरवल्याने उबदार स्पर्शाची अधिक गंमत येते.
एका संध्याकाळी मी पिल्लांकडे पाहात होतो, तेव्हा मला झाडीत लपलेला एक आकार दिसला. मी जरा पुढे झाल्यावर तो त्वरेने दूर गेला. पाहिले तर तो माझा पिटल्या! मनात पाल चुकचुकली.
दुसऱ्या दिवशी सकाळी आमच्या घरात गोंधळ माजला होता. पायपुसण्यावर कोंबडीचे एक मेलेले पिल्लू पडले होते. त्याच्या मानेवर रक्ताचे डाग होते. बरोबर गच्चीवरच्या चिमणीसारखे. बाकी आजूबाजूला रक्ताचा मागमूस नव्हता. ते पिल्लू जखमी होऊन, स्वत: आमच्या दारापर्यंत येऊन तिथे मेले असण्याची शक्यता नाही, असे सारी वडीलमंडळी बोलत होती. मी नंतर आईला माझी शंका बोलून दाखवली. ती म्हणाली, "अरे पाठाऱ्यांचा बंगला कुठे, आपले घर कुठे. जर पिटल्याने ते पिल्लू मारले असते, तर त्याने ते इतक्या लांब कसे आणि का आणले असते?" अर्थातच माझ्याकडे या प्रश्नाला उत्तर नव्हते. परंतु पिटल्याने मारलेली चिमणी त्याने स्वत: न खाता मला देण्याचा प्रयत्न करत असताना मी पळालो होतो हे मला नीट आठवत होते.
तिसरा दिवस उजाडला. माझे वडील, म्हणजे वसंत, नेहमी पहाटे उठत असे. कालच्या प्रकारानंतर त्याने प्रथम दरवाजा उघडून पायपुसणे पाहिले, तर त्यावर कोंबडीचे दुसरे मारलेले पिल्लू होते. कुणी तरी आम्हाला काळी जादू वगैरे करून घाबरवायचा प्रयत्न करतो आहे, असे वसंतला वाटले. शेजारची मंडळीही जागी झाली होती. त्यांना ही बातमी कळताच, त्यांच्यातल्या एका-दोघांनाही हा जारणमारणाचा प्रकार वाटला.
तळमजल्याला एक 'शिवाजी पार्क हिंदु हॉटेल' नावाची खाणावळ होती. तिथली मंडळी अगदी लौकर उठून कामाला लागत. डाळतांदूळांचे वाटे काढणे, कांदेबटाटे सोलणे, भाज्या चिरणे, मटण आणि मासे साफ करणे इत्यादी कामे सुमारे साडेचार-पाच वाजल्यापासून सुरू होत. त्यांची जाग साधारण चार वाजल्यापासून असायची. त्यांना विचारून पाहिले. त्यातल्या कुणीही कोणालाही येताना व जाताना पाहिले नव्हते.
चौथ्या दिवशी पहाटेच घराची घंटा घणघणली. वडलांनी दार उघडले, तो समोर संतापलेल्या पाठारे बाई आणि पायपुसण्यावर मरून पडलेले पिल्लू. रोज एकेकच पिल्लू कमी व्हायला लागल्यावर पाठारे बाईंनाही आश्चर्य वाटले होते. चोर असला तर तो रोज एकच पिल्लू कशाला चोरील? त्या लौकर उठून खुराड्याकडे पहारा देत बसल्या होत्या. तेवढ्यात त्यांना खुराड्यातल्या वरच्या बाजूच्या भोकातून बाहेर पडणारा पिटल्या दिसला. त्याच्या तोंडात एक पिल्लू होते.
पाठारेबाईंना हे मांजर आमच्या घरचे हे कसे कळले देव जाणे. का त्यांनी पिटल्याचा पाठलाग केला? पण त्यांनी पिटल्याचा आमच्या घराशी संबंध जोडला आणि त्या संतापून तिथे थडकल्या.
माझे आईवडील दोघेही पाठारेबाईंशी बोलत होते. बाईंचे म्हणणे होते, की आम्ही पिटल्याला त्यांच्या कोंबडीची पिल्ले चोरी करायला शिकवले आणि म्हणूनच तो ती पिल्ले आम्हाला आणून देतो. तेवढ्यात एक-दोन शेजारी आले. त्या सगळ्यांनीच हे किती अशक्य आहे व मांजराला असे कोण व कसे शिकवेल असे प्रश्न त्यांना विचारले. त्यांचे एकच उत्तर. ज्या अर्थी पिटल्या चोरून पिल्लू आणून खोपकरांच्या दारापुढे ठेवतो, त्या अर्थी याची सर्व जबाबदारी पूर्णत: खोपकर कुटुंबावर आहे. शिवाय एक भीतीदायक बाब म्हणजे पप्पा पाठाऱ्यांकडे बंदुकीचा परवाना होता. जर पिटल्या परत त्यांच्या आवारात दिसला, तर त्याला गोळी घालून ठार करण्यात येईल अशी धमकीही पाठारेबाईंनी दिली. यशस्वी युद्धनौकेच्या तोऱ्यात त्या घरी परतल्या.
ह्या सगळ्या गोष्टी सुमारे अर्धा तास चालल्या होत्या. मी घरात आलो तेव्हा टेबलावर उन्हे पडली होती व पिटल्या उन्हात पडून आपले पंजे चाटून साफ करत होता. हा दुसराच पिटल्या असेल आणि त्याचा शिकारी पिटल्याशी काही संबंध असणे शक्य नाही असे कुणालाही सहज वाटले असते.
पिटल्या सुमारे दहा वर्षे आमचा पाहुणा होता. त्याच्या सहवासाने त्याने मला बालपणात तर सुख दिलेच, पण पौगंडावस्थेतही माझी साथ केली. एक दिवस तो जो नाहीसा झाला तो परत कधी दिसलाच नाही. आम्ही त्याचा पुष्कळ शोध केला, पण तो मिळालाच नाही. माझ्या आयुष्यात एक मोठी पोकळी निर्माण झाली. अजूनही क्वचित मला जागेपणी तो जाणवतो, स्वप्नात दिसतो आणि त्याचा बुलंद आवाज कानात घुमत रहातो.
सुमारे चाळीस वर्षांनंतर मी डेस्मंड मॉरिस या प्राणीशास्त्रज्ञाचे 'कॅटवॉचिंग' हे पुस्तक वाचले. त्यात मांजरांच्या शिकार मारून यजमान व्यक्तीला किंवा कुटुंबाला भेट देण्याच्या सवयीबद्दल माहिती दिली आहे. त्यांचे म्हणणे असे, की काही पाळीव मांजरांना, आपल्या घरातल्या व्यक्तींचे निरीक्षण केल्यावर आढळून येते, की हे लोक शिकार करीत नाहीत. त्यांच्याबद्दल उमाळा येऊन, ते आपली शिकार आपल्या प्रिय व्यक्तींना नजराणा म्हणून देतात. पिटल्याने मला मारून दिलेली चिमणी व नंतरची पाठारे कुटुंबाच्या कोंबड्यांची पिल्ले ह्या दोन्ही गोष्टी किती गाढ प्रेमाचे तोहफे होते ते मला चाळीस वर्षांनी समजले.
पांढरू
पांढरू हा पांढऱ्या रंगाचा, काळ्या कानांचा व शेपटीचा, मजबूत दातांचा, भरभक्कम शरीराचा, बारीक केसांचा, चकाकत्या तपकिरी डोळ्यांचा, एक अत्यंत बुद्धिमान आणि दांडगा कुत्रा होता. हा कुत्रा खरा तर रस्त्यावरचा. पण रस्त्यावरचे हुशार कुत्रे जसे एकाद्या कुटुंबाला स्वत:च दत्तक घेतात, तसे त्याने आमचे कुटुंब दत्तक घेतले होते. तो रात्रभर रस्त्यावर इतर कुत्र्यांबरोबर टोळीचा नायक म्हणून हिंडत असे. दुसऱ्या टोळ्यांबरोबर मारामाऱ्या करीत असे. कधी त्याच्या अंगावर ह्या लढायांची वीरचिन्हे दिसत. रोज सकाळी साळसूदपणे आमच्या दारासमोर येऊन न्याहारीची वाट पाहत असे.
पांढरूचा खास मित्र पिवळू, हा सतत त्याच्याबरोबर असे. पिवळू हा पिवळ्या सोनेरी लांब केसांचा, मोठाल्या काळ्या व भावदर्शी डोळ्यांचा व शांत वृत्तीचा पापभीरू कुत्रा होता. तो बहुतेक वेळ आमच्या दाराबाहेरच असे. माझ्या कल्पनेप्रमाणे पांढरूच्या निशाचर आयुष्यात तो विशेष उत्साहाने भाग घेत नसावा. निदान त्याच्या अंगाखांद्यावर रात्रीच्या लढायांच्या खुणा तरी नसत.
त्या काळात प्रत्येक कुत्र्याकरता प्रतिवर्षी पाच रूपये देऊन म्युनिसिपालटीचा एक परवाना घ्यावा लागत असे. त्या परवान्याच्या पावतीबरोबर एक बिल्ला दिला जात असे. तो कुत्र्याच्या गळ्यात असला तरच त्याला म्युनिसिपालिटीच्या श्वानविरोधी टोळ्यांपासून अभय असे.
आठ-पंधरा दिवसांनी नगरपालिकेची कुत्रे पकडण्याची गाडी येत असे. ती जागोजागी थांबत असे व तिच्यातून पोती आणि मोठ्या सांडशा घेतलेले खाकी वेशधारी राक्षस, नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे रूप धारण करून बाहेर पडत. बिल्ले नसणाऱ्या बेवारशी कुत्र्यांचा पाठलाग करीत. त्यांना सांडशीने किंवा दोरीच्या फासाने पकडत. पोत्यात घालून गाडीत टाकत. मग त्यांना पांजरपोळात नेत. सात दिवसात त्यांचा मालक आला, तर त्याला परवान्याची रक्कम व दंड भरून कुत्र्याला सोडवता येत असे. ते न झाल्यास कुत्र्याला मारून टाकत.
कुत्र्यांवरची धाड हा सरकारी यंत्रणेतल्या कार्यपद्धतीच्या क्रौर्याचा माझा पहिला अनुभव. मी साधारण तीनचार वर्षांचा असल्यापासूनच्या या धाडी मला चांगल्याच आठवतात. ते सांडशीत माना अडकलेले, हातपाय झाडणारे, तडफड करणारे, मानेभोवतीच्या लोखंडी पकडीने श्वास गुदमरत असतानाही भुंकण्याचा प्रयत्न करणारे कुत्रे, पोत्यात पकडलेले, धडपडणारे आणि केविलवाणे ओरडणारे कुत्रे, त्यांच्या घुसमटलेल्या किंकाळ्या आणि महापालिकेच्या गणवेशात वावरणारे यमदूत-कर्मचारी. जेव्हा मी यमाच्या व त्याच्या रेड्याच्या गोष्टी आजीकडून ऐकल्या तेव्हापासून मला यमदूत हे खाकी गणवेषांतच दिसतात. अजूनही अमानुष क्रौर्याचा रंग खाकी आहे असेच मला वाटते.
रेबीज, कुत्र्यांपासून असणारे इतर धोके वगैरे समजायचे ते वय नव्हते. पण सार्वजनिक क्रौर्यप्रदर्शनाने मला नव्याने स्वतंत्र झालेल्या भारताच्या पुरातन स्वभावाचा भाग, कुणी न बोलता, न शिकवता कुत्र्यांच्या गुदमरलेल्या किंकाळ्यांतून समजू लागला. आजही दलितांवर सवर्णांनी केलेल्या अत्याचाराच्या कथा वाचतो तेव्हा वाटते, कुत्र्यांवरच्या धाडी किती दयाळू होत्या!
आमच्या घराच्या दारिद्र्याच्या तुलनेत, दोन कुत्र्यांच्या बिल्ल्यांचे दहा रूपये ही रक्कम फार मोठी होती. गल्लीत गाडी येताच, बेवारस कुत्रे घरी असणाऱ्या लहान मुलांच्या टोळ्या तो संदेश घरोघरी पोचवीत. मग कुत्रे लपवण्याचा कार्यक्रम होत असे. धडधडत्या हृदयाने आपापल्या कुत्र्यांना रस्त्यावर शोधून, महापालिका कर्मचाऱ्यांच्या नजरेस न पडता घरी आणून, लपवण्याच्या कार्यक्रमात मी कितीतरी वेळा सहभागी झालो होतो. जातीय दंग्यांत अशाच प्रकारची भीती मी लहानपणी व मोठेपणीही अनुभवली होती. धडाधड वाजणारे लाठ्याकाठ्यांचे आवाज, फटाफट बंद होणारी खिडक्या-दारे, उंचावलेल्या तलवारींनी केलेले हातवारे, तोंडातून अभद्र शब्द व आरोळ्या हे त्यात सामील असत. अल्पसंख्यांक सावज हे जनावर असो वा माणूस, त्याच्याविरूद्धचे क्रौर्य हे तितकेच अमानुष असते.
ह्या धाडींच्या काळात आम्हाला पांढरूची हुशारी कळली. त्याच्या प्रभातफेरीत कुठेही ह्या धाडीची गाडी दिसली किंवा कर्मचारी दिसले, की तो पिवळूला घेऊन घराच्या दिशेने धावत सुटे. दार बंद असले, तर पंजांनी ते धाडधाड वाजवीत असे, खरवडत असे, पण अजिबात भुंकत नसे. मग त्याला घरात घेतले, की तो आणि पिवळू कॉटखाली लपत. काही काळ गेल्यावर तो बाहेर येऊन, खिडकीवर दोन पंजे ठेवून वाकून रस्त्यावर बघत असे. गाडी व कर्मचारी अदृश्य झाल्यावरही, तो पिवळूलाही काही काळ बाहेर येऊ देत नसे. ते दोघेही एकादा तास घरात काढून मग बाहेर पडत. या दोघांकडे पाहून माझी आयुष्यातली पहिली आर्थिक महत्त्वाकांक्षा निर्माण झाली. लौकरात लौकर मोठे होऊन दर वर्षी दहा रूपये कमावून, पांढरू-पिवळूंना कायम बिल्ले खरीदावे ही ती महत्त्वाकांक्षा होती.
***
पांढरू-पिवळूंच्या आंघोळी हे एक महाकठीण साप्ताहिक श्वानकर्म होते. त्यांना मोरीत नेणे, दोरीने बांधणे, त्यांच्यावर कोमट-गरम पाणी ओतणे, त्यांना लाईफबॉय साबूने खसाखसा घासणे, डोळ्यांतला, कानांतला आणि नखांतला मळ काढणे आणि मग अंगाचा सर्व साबण निघेपर्यंत सतत गरम पाण्याचे तांबे ओतणे आणि मग स्वयंपाकघरात नेऊन, कोरडे टॉवेल-पंचे जमिनीवर पसरणे हे त्या कर्मातले क्रमश: येणारे महत्त्वाचे विधी. पांढरू-पिवळू पाठीवर लोळून, बाजू बदलून स्वत:ला कोरडे करीत. मग ते पळून जायच्या आत पिसवा, गोचड्या काढणे इत्यादी ब्युटी पार्लरची कामे माझ्या बहिणी आणि मी झपाट्याने करत असू.
आंघोळीतली पहिली पायरी म्हणजे कुत्र्यांच्या जोडीला मोरीत नेणे. दोरी गळ्यात पडताच पुढे काय होणार ते माहीत असल्याने, विशेषत: पांढरू हैदोस घालत असे. तो अतिशय शक्तिमान असल्याने मला फरपटत खेचून नेत पळून जात असे. त्याकरता मोरीत या दोघांना आवडणाऱ्या खाद्यपदार्थाची बशी ठेवून, ते खाऊ लागल्यावर सफाईने दोरी बांधणे ही आमची शक्कल होती. पण पांढरू हा जात्याच मुत्सद्दी असल्याने तो बशीतले जमेल तितके खाऊन पळ काढी.
एक दिवस पांढरू बशीत वाढलेले खाऊन सवयीप्रमाणे पळून गेला आणि तासाभरात परत आला नाही. माझ्या दोघी बहिणी आणि मी हताश होऊन बसलो होतो. आमची आई लीला म्हणाली, "काही काळजी करू नका. भूक लागल्यावर झक्कत येईल परत. तेव्हा नीट पकडा म्हणजे झाले." आम्ही त्याचा नाद तात्पुरता सोडून, तो आला की त्याला चक्रव्यूहात कसे अडकवायचे ते ठरवून टाकले आणि आपापल्या कामाला लागलो.
जेवणे झाली. दुपार झाली व संध्याकाळही होऊ लागली. पांढरूचा पत्ताच नाही. मग आम्ही सारे काळजीत पडलो. तो वाऱ्यासारखा धावताना कुठे अपघात तर झाला नाही ना, त्याला कुत्र्यांच्या गाडीने पकडले तर नाही ना, अशा एक ना दोन अनेक शंका मनात येऊ लागल्या. सारे घर बेचैन झाले. शेजाऱ्यापाजाऱ्यांना विचारले, रस्त्यावरच्या भाजीवाल्यांना आणि प्रतिष्ठित दुकानदारांनाही विचारले. पांढरूचे शेपूटही कुणी पाहिले नव्हते. हा गेला तरी कुठे?
संध्याकाळी मामा बाजार करून परत जाताना आमच्याकडे थांबला. मला विचारले, "तुझा पत्ता काय? सकाळपासून मामी तुझी वाट पहाते आहे." मला आश्चर्य वाटले. आई म्हणाली, 'सकाळी अरूण तुझ्याकडे येणार असे तुला का वाटले?' मामा म्हणाला, "लीले, अरूण यायच्या आधी नेहमी पांढरू झेंडा होऊन घरात येतो, तसा सकाळी आलेला आहे. मामीला वाटले नक्कीच पाठोपाठ अरुण येतोय. तिने घाईघाईने त्याच्यासाठी घावन बनवले. अरुण आलाच नाही. पांढरूही अजून अरूणची वाट पहात बसून राह्यलाय. शेवटी मामीने त्याला जेवायलाही घातले आणि तो मटनातली हाडे जोरजोरात फोडत जेवला. मामी आता त्याच्या रात्रीच्या जेवणाचीही तयारी करायला लागली आहे."
पांढरू जो सकाळी मोरीतून सुटला, तो भूक लागल्यावर घरी न परतता थेट माझ्या मामाकडे गेला. एका जेवणावर ताव मारला. आंघोळ टाळली व आता दुसरे जेवण वसूल करायच्या तयारीत होता. मामाला हे कळल्यावर त्याने कपाळाला हात लावला.
पांढरूला ठाऊक होते, 'मामाची बायको सुगरण, रोज रोज रस्सा मऽटण!'
***
पांढरूचे माझ्यावर कधीही न विसरता येणारे उपकार, म्हणजे त्याने मला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सदस्य होण्यापासून वाचवले. गांधींच्या खुनानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर घातलेली बंदी उठवल्यानंतर, १९५० साली आजूबाजूला राहणाऱ्या संघवाल्यांनी ठिकठिकाणी संघाच्या शाखा उघडल्या. शिवाजी पार्कवरही संघाची एक शाखा उघडली. साहजिकच कोवळ्या कोकरांची भरती करण्याची मोहीम सुरू झाली, तिच्यात मी सापडलो आणि एका संध्याकाळी शाखेत दाखल झालो.
जेव्हा जेव्हा कधी मी घराबाहेर जात असे – अगदी खाली भाजीवालीकडे जात असलो तरी – तेव्हा तेव्हा पांढरू माझ्याबरोबर येत असे. एकप्रकारे तो 'माझा' कुत्रा होता. माझ्या रक्षणाची संपूर्ण जबाबदारी पांढरूने स्वत:वर घेतली होती. माझे आईवडील, भावंडे या सर्वांनी ह्याची प्रात्यक्षिकेही पाहिली होती. रस्त्यात पांढरू माझ्याबरोबर असताना कुणी अनोळखी माणसाने नुसते माझ्याशी बोलायचा प्रयत्न केला, किंवा नुसते माझ्याकडे बोट केले, तरी पांढरू गुरगुरायला लागत असे. त्यामुळे माझ्या वयाच्या इतर मुलांच्या मानाने, मला एकटे जायला सहज परवानगी मिळत असे. आई मला फक्त, "पांढरू आहे ना रे बरोबर?" एवढेच विचारायची. होकार मिळाला की सुटलो आम्ही दोघे.
आता तुम्हाला पांढरूच्या काही विक्षिप्त मतांची माहिती देतो. मोठ्यांनी अर्धी चड्डी घालण्याला पांढरूचा सक्त विरोध होता. असा एखादा माणूस जर घरी आला, तर तो आपल्या खणखणीत व खोल आवाजात भुंकून त्याला परत घालवत असे किंवा मागच्या दोन पायांवर उभा राहून, पुढचे दोन पाय त्याच्या खांद्यावर ठेवत असे आणि अगदी त्याच्या चेहऱ्यापर्यंत पोचत असे. त्या माणसाने अधिक धैर्य दाखवल्यास तो सर्व प्रकारचे आवाज एकदम बंद करून, आपले दोन्ही ओठ वर खेचून आपले सशक्त, निर्दोष आणि अत्यंत धारदार असे पांढरे दात दाखवत असे. आमच्याकडे गोरक्षणाकरता फंड मागायला आलेल्या एका लोचट अर्धी खाकी चड्डीधारी इसमाला, त्याने इमारतीतला प्रवेश कायम बंद केल्याची कथा ही रावत मॅन्शन, न. चिं. केळकर रोड, शिवाजी पार्क, दादर पश्चिमच्या मौखिक इतिहासात सोन्याचे पान झाली होती.
पांढरू आणि मी शाखेत पोचलो तेव्हा तिथे सात-आठ लहान मुले व अर्ध्या चड्डीतले तीन-चार बाप्ये होते. बाप्यांच्या हातात संघवाल्या लाठ्या होत्या. आम्ही तिथे पोचताच पांढरूने त्यांच्या वेषभूषेबद्दलची आपली नापसंती व्यक्त केली. प्रकरण वाढायच्या आत मी पांढरूला काही अंतरावर बसवले व तिथेच बसून राहायला सांगितले. तो जरासा लांब बसला. मग 'नमस्ते सदा वत्सले मातृभूमी' सुरू होऊन सारे निश्चल झाल्यावर पांढरूने संधी साधली.
पांढरूने प्रथम शाखाचालकांकडे मोर्चा वळवला. त्यांची वॉलरस मिशी त्यांच्या लहान चेहऱ्याच्या मानाने, फार मोठी व खाली वळलेली होती. त्यांचे कान पाण्याच्या दुकर्णी जगच्या हँडलसारखे दोन्ही बाजूने चिकटवलेले वाटत असत. त्यांच्या घेरदार पोटाभोवती बांधलेल्या चामडी पट्ट्याने आणि त्याला दुजोरा देणाऱ्या गच्च दोरीने, त्यांची खाकी चड्डी मुष्किलीने विषुववृत्तावर स्थिरावलेली असे. त्यांच्या काटकुळ्या हातापायांच्या मानाने चड्डीचा खुला घेर प्रमाणाबाहेर मोठा असे. पांढरूलाच काय पण कुणालाही कुतूहल वाटावे अशीच असामी होती ती.
पांढरूने पहिल्या फेरीत सर्व खाकी चड्डीवाल्या बाप्यांची पहाणी केली. मग आपले लक्ष शाखाचालकांवर केंद्रित केले. त्यांच्या पँटच्या खुल्या घेरातून वर पाहात तपासणीला सुरूवात केली. त्याने तपासणी करत करत त्यांच्याभोवती एक फेरी मारली. पांढरूचे तोंड जेव्हा त्या घेरातून आत जाऊन, तेथील प्रदेशाचे सूक्ष्म निरीक्षण करू लागला, तेव्हा परिस्थिती बिकट झाली. 'नमस्ते सदावत्सले मातृभूमी' चालू असताना कुणी गोळी मारली तरी हालचाल करायची नाही ही संघाची शिस्त आणि इथे तर पांढरूचा सरळसरळ हल्ला!
पांढरू हा काही झाले तरी रस्त्यावरचा अंडरडॉग. खालच्या जातीचा कुत्रा. अगदी दलितच म्हणा ना. ब्राह्मण शाखाचालकांच्या गणवेशाच्या कोणत्याही भागात नाक खुपसू नये इत्यादी सुसंस्कार त्याच्यावर झाले नव्हते. पांढरू अर्ध्या खाकी चड्डीत तोंड घालून, मान रडारसारखी हलवून, मुद्द्यावर नजर रोखून निरीक्षण करीत असताना, आपल्या अरक्षित शरीराबद्दल बेचैन असलेल्या शाखाचालकांच्या तोंडून एक विचित्र आवाज निघाला. पांढरूने गुरगुरणे वगैरे प्राथमिक पवित्रे न घेता, किंवा कोणताही आवाज न करता, सरळ आपले तीक्ष्ण दात व हिरड्या शाखाप्रमुखांना दाखवल्या. तेव्हा मी संघाची नुक्तीच समजावून घेतलेली शिस्त मोडून ओरडलो, "पांढरू!".
पांढरूची एकाग्रता भंग पावली व तो माझ्याकडे वळला. माझ्याशेजारी बसून शेपूट हलवू लागला. शाखाप्रमुखांवरचे संकट टळले. प्रार्थना संपायच्या आतच मी अत्यंत खजील होऊन पांढरूला घेऊन घरी पळत सुटलो.
त्यानंतर मला आजतागायत कुणीही संघाच्या शाखेत परत बोलावले नाही.
***
महाशिवरात्र असल्याने शाळांना सुटी होती. बाकी सारे व्यवहार चालू होते. मी आणि माझ्या दोघी बहिणी घरीच होतो. जेवणे झाली. मधला भाऊ बंकिम रस्त्यावर मित्रांबरोबर क्रिकेट खेळत होता.
मी अर्ध्या दिवसाची शाळा संपवून, जेवण करून सतरंजीवर पडून छताकडे बघत होतो. डोळ्यांनी छताकडे पाहायचे आणि कान टवकारून एका विशिष्ट आवाजाची वाट पहायची. मग दुपारच्या विशिष्ट वेळी एक जादूचा प्रयोग दिसत असे. तो आवाज आला की काही सेकंदांत पांढरे छत रक्तासारखे लालभडक व्हायचे.
दुपारी पोस्टाची लाल गाडी आली, की तिच्यावर पडलेले ऊन परावर्तित होऊन, ती गाडी खाली असेपर्यंत, पांढऱ्या छताचा रंग तांबडा दिसत असे. मग दहा मिनिटांनी गाडी गेली, की आपोआप हे लाल ग्रहण सुटून छत परत पांढरे होत असे. मी प्रथम ती जादू घरूनच पाहून, मग आलेली लाललाल गाडी पाहायला खाली जात असे. मग धावतधावत परत वर येऊन छताकडे बघत त्याचा रंग पांढरा होण्याची वाट पाहात असे.
छताचा रंग पूर्ण तांबडा होण्यापूर्वीच गाडीच्या ब्रेकचा मोठा आवाज आला, गाडीवर काहीतरी वस्तू जोराने थडकली आणि एक किंकाळीसारखा आवाज ऐकू आला. त्यानंतर बंकिमने, माझ्या मधल्या भावाने, खालून मोठ्याने मारलेली हाक ऐकू आली. "पांढरू, पांढरू". मी ताडकन उठून खिडकीतून पाहिले, तर मला पोस्टाची लाल गाडी तिरकी थांबलेली दिसली व तिच्यासमोर माणसांची गर्दी! बंकिम कुठेही दिसत नव्हता, मात्र त्याच्या पांढरूला मारलेल्या हाकांचा आवाज ऐकू येत होता.
मी धावत खाली गेलो. पोस्टाच्या लाल गाडीने उडवलेला पांढरू, रक्ताच्या थारोळ्यात पडून होता. बंकिम त्याचे डोके मांडीवर घेऊन अवाक होऊन बसला होता. पांढरूच्या डोक्यातून भळाभळा रक्त वहात होते. तेवढ्यात घरच्या कुणी तरी मला मागे खेचले. मी 'पांढरू, पांढरू' असा हंबरडा फोडत होतो. मला पांढरूजवळ जायचे होते. त्याचे डोके मांडीवर घ्यायचे होते. त्याला डॉक्टरकडे न्यायचे होते. वाचवायचे होते. पण मी काहीही करेपर्यंत आमच्या शेजाऱ्याने मला घरात आणून ठेवले.
माझी आई सोडून घरातली सारी माणसे खाली धावली. मी आईच्या कुशीत हुंदके देत होतो. तिच्याशी खाली जायचे म्हणून भांडत होतो. तिला मुठींनी बुकलत होतो. ती माझे सांत्वन करत होती. खालून लोकांचे आवाज येत होते. पुढचे मला काही आठवत नाही.
मी डोळे उघडले तेव्हा पांढरूला आंघोळ घालून एका पांढऱ्या चादरीवर ठेवला होता. त्याच्या डोक्यावरही एक चादर होती आणि तिच्यात रक्त झिरपल्याचे डाग दिसत होते. मी जवळ जाऊन पांढरूला मिठी मारली. माझे ओक्साबोक्शी रडणे चालू असतानाच, कुणीतरी मला आतल्या खोलीत नेले आणि बिछान्यावर ठेवून थोपटायला सुरूवात केली. मी इतका दमलो होतो की जरा वेळातच मला झोप लागली.
मी जागा झालो तेव्हा, पांढरू सोडून सारे कुटुंबीय घरी परतले होते. काळोख दाटलेला होता. घरात कमालीची शांतता होती. फक्त बाहेरून मोटारींचे हॉर्न ऐकू येत होते.
(मॅजेस्टिक प्रकाशनाच्या 'पंजे, पाय आणि पंख' या आगामी प्रकाशनातून साभार)