Skip to main content

रातराणीची गोष्ट

5 minutes





रातराणीची गोष्ट
========

-राजीव उपाध्ये


जंगलाच्या खोल कुशीत एक गंधनगरी होती. तिथे रातराणीची झाडे इतकी दाट उभी होती की दिवसा पाहणाऱ्याला ती इतर झाडाझुडपांसारखीच हिरवी, शांत आणि किंचित उदास वाटत; पण संध्याकाळी जंगलाच्या माथ्यावरचा प्रकाश विरघळू लागला, झाडांच्या सावल्या एकमेकींत मिसळल्या आणि चांदण्याचा पहिला फिकट थेंब पानांवर उतरला की त्या नगरीला जणू हळूहळू जाग येई. रातराणीच्या मिटलेल्या कळ्या एकामागून एक उघडत, त्यांच्या पांढऱ्या पाकळ्यांतून बेभान करणारा गंध बाहेर पडत आणि तो ओल्या मातीवरून, शेवाळलेल्या दगडांवरून, झुडपांच्या फटींतून वाहत रातव्यांच्या मऊ पंखांवर बसून दूरवरच्या ओढ्यापर्यंत पोहोचत असे. रानात उशिरापर्यंत भटकलेले प्राणी त्या गंधावरून पाण्याची दिशा ओळखत, रातवे त्याच वाटेने परत येत आणि ओढ्याच्या काठावर रात्रभर पाणी पिणाऱ्या प्राण्यांच्या श्वासातही रातराणीचा मंद वास मिसळून राहत असे.

त्या नगरीचे खरे रहस्य मात्र फुलांत नव्हते, तर जमिनीखाली होते, कारण तिथली झाडे केवळ फुलत नव्हती, ती आठवणी साठवत होती. मातीच्या काळोख्या थरांत एकमेकांना स्पर्श करीत पसरलेली मुळे कोणत्या रात्री गंध कोणत्या दिशेने गेला, कोणत्या फांदीवर कोणता रातवा विसावला, कुठल्या वाटेने हरिणांची पिल्ले ओढ्याकडे गेली आणि कुठल्या दगडापाशी एखाद्या तहानलेल्या प्राण्याने दिशा बदलली, हे सारे जणू स्वतःच्या अंगात साठवून ठेवत. वर जंगल होते, जमिनीखाली त्याची स्मृती होती; आणि गंधनगरीचे आयुष्य फुलांच्या सौंदर्यावर नव्हे, तर त्या अदृश्य स्मरणाच्या जाळ्यावर टिकून होते.

एकदा काय झालं, एके रात्री दूरच्या रानातून अन्नाच्या शोधात भटकत आलेली एक कोल्ही त्या गंधापर्यंत पोहोचली. इतका दाट आणि मोहक वास तिने यापूर्वी कधीच घेतला नव्हता. तिने नाक वर करून बराच वेळ हवा हुंगली, मग रातराणीच्या बुंध्यांभोवती फेरी मारली आणि तिच्या डोळ्यांत हळूहळू लोभाचा एक बारीक प्रकाश चमकू लागला. एवढा मौल्यवान गंध जमिनीवरच्या साध्या फुलांतून कसा येईल, याच्या मुळाशी नक्कीच काहीतरी दडलेले असणार, असा तिचा सरळ-सरळ होता आणि जंगलातल्या अनेक संकटांप्रमाणे हे संकटही दुष्टपणातून नव्हे, तर स्वतःला फार शहाणे समजणाऱ्या अज्ञानातून जन्माला आले.

कोल्हीने पंजे मातीत खुपसले. पहिल्या काही फटक्यांनी फक्त ओली माती इकडेतिकडे उडाली; मग एक बारीक मूळ बाहेर आले आणि तिच्या नखाखाली तुटले. त्या क्षणी वरच्या एका फांदीवरची कळी मिटली, पण कोल्हीचे लक्ष तिकडे गेले नाही. तिने आणखी खोल खणले. दुसरे मूळ तुटले तेव्हा ओढ्याकडे जाणाऱ्या गंधाची एक बारीक वाट विरून गेली; तिसरे मूळ तुटले तेव्हा दूरवरून परतणारा एक रातवा नेहमीची फांदी न सापडल्याने बराच वेळ काळोखात घिरट्या घालत राहिला. तरीही कोल्ही खणत राहिली. खजिना आता अगदी जवळ असणार, असे तिला प्रत्येक नव्या मुळानंतर अधिकच खात्रीने वाटत गेले आणि पहाटेपर्यंत तिच्या मागे मातीचे ढीग, तुटलेल्या मुळांचे पांढुरके तुकडे आणि उघडी पडलेली जमीन एवढेच उरले.

खजिना कुठेच नव्हता.

पण त्या एका रात्रीत गंधनगरीने आपल्या स्मृतीचा एक भाग गमावला होता.

त्यानंतर रातवा तपासत फिरणारा वारा आला. तो जंगलाचा शत्रू नव्हता; त्याला फक्त रिकाम्या जागा सापडत. जिथे गंध दाट असे तिथे तो पानांवरून अलगद घसरून पुढे जाई, पण जिथे मुळे तुटल्यामुळे गंधाची वीण उसवली होती तिथे त्याला आत शिरायला वाट मिळाली. त्या वाटेने तो दिवसेंदिवस खोल जात राहिला. आधी काही पाने कडांपासून करपली, मग कळ्यांचा पांढरेपणा मळकट झाला, काही फांद्या आतून पोकळ होऊ लागल्या आणि ओढ्याच्या काठावरची ओली काळी रेघ हळूहळू मागे सरकू लागली. एकेकाळी दूरच्या टेकडीवरूनही जाणवणारी गंधनगरी आता स्वतःच्या मध्यभागी स्वतःचा वास शोधू लागली होती.

कोल्ही तोपर्यंत आपल्या रानात परतली होती. तिला आपण मागे काय सोडून आलो याची जाणीव होण्याचे काही कारणही नव्हते, जोपर्यंत एका संध्याकाळी तिची पिल्ले खेळता खेळता जंगलात दूर गेली आणि अंधार पडल्यानंतर परतलीच नाहीत. रोज रातराणीचा गंध पकडून घराची दिशा शोधणाऱ्या त्या पिल्लांना त्या रात्री हवा निष्प्राण लागली. कोल्हीने सारी रात्र जंगल पालथे घातले, प्रत्येक झुडूप हुंगले, दगडांच्या फटींत नाक खुपसले, काट्यांत अंग ओरबाडून घेतले; पण ज्या गंधवाटेने तिची पिल्ले घरी आली असती, ती वाट तिच्याच पंजांनी काही दिवसांपूर्वी जमिनीखालून तोडून टाकली होती.

भटकता भटकता ती पुन्हा गंधनगरीत आली तेव्हा पहाटेचा राखाडी उजेड पसरत होता. तिने स्वतः खणलेल्या खड्ड्याभोवती पाहिले. तिथे माती कोरडी पडली होती, काही मुळे उन्हात पडलेल्या हाडांसारखी पांढरी दिसत होती आणि त्या सगळ्या उजाडपणाच्या कडेला रातराणीची एक तुटकी फांदी अर्धी मातीत गाडलेली होती. तिच्यावर एकच कळी जिवंत होती. कोल्हीने ती फांदी दातांत धरली, पण यावेळी तिच्या जबड्यात लोभाची घट्ट पकड नव्हती. तिने ती अलगद ओल्या मातीत आणून ठेवली आणि पंजांनी तिच्याभोवती माती सारली. ते प्रायश्चित्त होते की स्वतःच्या पिल्लांपर्यंत पोहोचणारी वाट पुन्हा मिळवण्याची हताश धडपड, हे मात्र जंगलाने विचारले नाही.

बराच काळ काहीच घडले नाही. पाऊस आला, माती ओली झाली, पुन्हा वाळली; चंद्र वाढला, कमी झाला आणि अनेक रातवे त्या उजाड जागेवरून दुसरी वाट धरून गेले. मग एका ओल्या रात्री त्या फांदीखालून केसाएवढे बारीक पांढरे मूळ मातीत उतरले. त्यामागून दुसरे आले, मग तिसरे. हळूहळू जमिनीखाली तुटलेल्या स्मृतींच्या कडांना नवे धागे जोडले जाऊ लागले आणि काही महिन्यांनी एका रात्री तिथे पहिली कळी उमलली. तिचा गंध फार दूर गेला नाही, पण पुढच्या रात्री आणखी एक फूल आले, मग आणखी काही, आणि ऋतू बदलता बदलता गंध पुन्हा ओढ्यापर्यंत पोहोचू लागला.

तरीही गंधनगरी पूर्वीसारखी झाली नाही. तिच्या एका कोपऱ्यातली जमीन कायमची कोरडी राहिली. पाऊस तिथेही इतरत्र पडतो तसाच पडत असे, चांदणे तिथेही तितकेच स्वच्छ उतरत असे, ओढ्याचा ओलावा कधी कधी त्या मातीपर्यंत पोहोचत असे; तरी त्या जागी रातराणीचे एकही रोप पुन्हा उगवले नाही. मातीने पाणी स्वीकारले, बी स्वीकारले, ऋतू स्वीकारले; पण विस्मरण स्वीकारले नाही.

झाडांना कोल्हीला जंगलाबाहेर हुसकावून लावता आले असते, पण त्यांनी तसे केले नाही; आणि तिला पूर्वीसारखी मुक्तपणे फिरूही दिले नाही. त्यांनी तिच्यासाठी गंधनगरीच्या कडेला एक जागा ठेवली. ओढ्यातून तिला पाणी मिळू लागले, पण त्या पाण्याबरोबर एक न बोललेला नियमही तिच्या वाट्याला आला—ज्या मातीने तिची तहान भागवायची, त्या मातीवर दुसऱ्या कोणाचे पंजे लोभाने पडू द्यायचे नाहीत. त्यानंतर कुणी मुळे खणण्यासाठी आले की अंधारातून सर्वप्रथम चमकणारे डोळे कोल्हीचे असत आणि ऐकू येणारी पहिली गुरगुरही तिचीच.

अशा रीतीने वर्षे गेली. गंधनगरी पुन्हा दाट झाली, रातराणी पुन्हा चांदण्यात उमलू लागली, रातवे पुन्हा जुन्या फांद्यांवर उतरू लागले आणि गंधाच्या वाटा पुन्हा ओढ्यापर्यंत जाऊ लागल्या. कड्यावर बसलेली कोल्ही त्या सगळ्यावर रात्रभर नजर ठेवत असे आणि तहान लागली की खाली उतरून ओढ्यातून पाणी पीत असे—तिला जितके पाणी मिळे, तितक्याच पाण्याच्या वाटेचा पहारा आता तिच्या वाट्याला आला होता.

फक्त तो एक कोपरा अजूनही कोरडा होता.

कधी एखाद्या कोरड्या रात्री वारा तिथून जरा जोराने गेला की वरची धूळ उडून जाई आणि मातीत पुरलेले जुन्या मुळांचे पांढुरके तुकडे क्षणभर उघडे पडत. कड्यावर बसलेली कोल्ही तेव्हा खाली पाहत राहायची. तिच्या मागे गंधनगरी फुललेली असायची, समोर ओढा चांदण्यात चमकत असायचा आणि हवेत पुन्हा रातराणीचा गंध भरलेला असायचा; पण त्या करड्या मातीतून कधीच कोणता गंध उठत नसे.

जंगलाने कोल्हीला राहू दिले होते, काळाने तिच्या पंजांचे ठसेही जवळजवळ पुसून टाकले होते; पण जमिनीखाली तुटलेल्या मुळांच्या जागा अजून तशाच होत्या. कारण फुले दर ऋतूत नवी येतात, पाने गळून पुन्हा फुटतात आणि गंधही वाऱ्याबरोबर दूर निघून जातो; फक्त मुळे जमिनीच्या अंधारात पडून राहतात—आणि मुळांना विसरण्याची कला कधीच अवगत होत नाही.

Node read time
5 minutes