नांगर
नांगर
===
- राजीव उपाध्ये
उषेने आपल्या पापण्या अजून पूर्ण उघडल्या नव्हत्या. दुरवर शुक्राची चांदणी अजुनही लुकलुकत होती. जणू ती पहाटेला निरोप देण्यासाठी थांबली होती.
डोंगरांच्या कुशीत झुळझुळणार्या नदीला धुक्याने अलगद मिठी मारली होती. पाण्यावर आकाशाचा फिकट निळा श्वास तरंगत होता. मधूनच एखादा बगळ्यांचा थवा शांतपणे पाण्याच्या आरशावरून सरकून जात होता.
त्या गूढरम्य शांततेत गुरु क्योमो आणि त्यांचा शिष्य त्सुकी लाकडी होडी नदीत उतरवत होते.
वल्ह्याने पाण्याला पहिला स्पर्श केला आणि गोलाकार तरंग अंधुक प्रकाशात दूरवर विरघळून गेले.
दोघेही एकसारख्या लयीत वल्ही मारत होते.
होडी हलत होती...
पाणी मागे सरकत होते...
समोरचा किनारा जणू चित्रात रंगवून ठेवला होता.
त्सुकीने जोर वाढवला.
वल्ही आता पाण्यावर नव्हे, स्वतःच्या अहंकारावर आदळत होती.
त्याच्या कपाळावरून घामाचे थेंब नदीत पडत होते. प्रत्येक थेंब जणू अजून एक प्रयत्न, अजून एक हट्ट.
तरीही किनारा तितकाच दूर.
शेवटी तो दमून म्हणाला,
"गुरुजी... आज नदी इतकी हट्टी का झाली आहे?"
क्योमोनी उत्तर दिले नाही.
त्यांनी फक्त मागे वळून बघितले आणि होडीच्या मागे हात घातला.
एक ओलसर दोरी वर आली. तिच्या टोकाशी लोखंडी नांगर होता.
तो अजूनही नदीच्या तळाशी काळ्या दगडाला घट्ट मिठी मारून बसला होता.
क्योमोनी तो नांगर अलगद होडीत ठेवला.
पुन्हा वल्ही पाण्यात उतरली.
यावेळी नदीने क्षणाचाही विलंब केला नाही.
होडी पाण्यावरून अशी घसरू लागली, जणू ती आधीपासूनच पुढे जाण्याची वाट पाहत होती.
शिष्य बराच वेळ त्या ओल्या नांगराकडे पाहत राहिला.
त्यावर नदीतला बराच चिखल अडकला होता.
मनाच्या तळाशी साचलेल्या भूतकाळा सारखा.
क्योमो हळू आवाजात म्हणाले,
"नदीने तुला अडवले नव्हते. तूच नदीला धरून बसला होतास."
त्सुकीने डोळे मिटले.
पुन्हा शांतता.
फक्त वल्ह्यांची लय.
त्याला दिसू लागले,
वर्षानुवर्षे जपलेले अपमान.
अजून न आलेल्या उद्याची भीती.
इतरांच्या नजरेत उंच दिसण्याची धडपड.
गमावण्याची धास्ती.
सिद्ध करण्याची हाव.
मनाच्या तळाशी प्रत्येकाचा स्वतःचा एक नांगर रुतलेला असतो.
होडीत बसलेला तो हलका होता.
पण आतून...
तो संपूर्ण नदी वाहून नेत होता.
सूर्य धुक्याच्या पलीकडे उगवला.
क्षणात नदी सोनेरी झाली.
दोघांच्या वल्ह्यांची लय एक झाली.
लाकूड, पाणी, श्वास आणि शांतता...सारेच एका अदृश्य तालात बांधले गेले.
होडी अलगद डुलत होती. पाणी मागे सरकत होते.
होडी पुढे सरकत राहिली.
आणि शिष्याला प्रथमच समजले,
थकवा प्रवासाला नसतो.
थकवा नांगर देत असतो.