धुरंधर सिनेमा: गुप्तचर कारवाईचा गौरव की सनातनी अजेंडा?
(मी स्वतः पंतप्रधान कार्यालयात असताना, सर्वश्री ए. एस. दुलत आणि एम. के. नारायण साहेबांचा पी.ए. राहिलो असल्याने, गुप्तचर कारवाई म्हणजे काय आणि त्या कशा कार्य करतात याची थोडी कल्पना होती. शत्रू देशांत राहून आलेल्या काहींनी त्यांचे किस्सेही सांगितले होते. अर्थात, त्यावर मी कधीही लेख लिहिणार नाही. हा लेख लिहिताना संदर्भासाठी आणि भाषा शुद्धीसाठी एआयचा वापर केला आहे.)
गेल्या रविवारी मुलाने विचारले, “बाबा, धुरंधर सिनेमा पाहणार का?” माझ्या डोक्यात प्रकाश पडला. गेल्या १५ वर्षांपासून आम्ही नवरा-बायको दोघांनी थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहिलाच नव्हता. तसेही मला सिनेमा वगैरे पाहण्याचा शौक नाही, आणि घरात मोठा टीव्ही असल्याने थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहण्याची जिद्द सौ. ने कधी केलीच नव्हती. असो. २०२६ च्या आधुनिक सुविधांनी युक्त, थंडगार ए.सी. थिएटरमध्ये २५० रुपयांचे पॉपकॉर्न आणि पेप्सी (सिटच्या एका बाजूला पेप्सी ठेवण्याची जागा असते) घेऊन आम्ही चार तासांचा धुरंधर २ सिनेमा पाहिला. त्याच्या आधी टीव्हीवर पहिला भागही पाहिला. धुरंधर हा सिनेमा सर्वांनी पाहिलाच असेल, तरी त्याची कथा थोडक्यात:
आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर (२०२५) आणि त्याचा नुकताच प्रदर्शित झालेला दुसरा भाग धुरंधर: द रिव्हेंज (२०२६) हे हिंदी चित्रपट खऱ्या जागतिक घडामोडी आणि गुप्तचर मोहिमांवर आधारित हाय-व्होल्टेज ‘स्पाय थ्रिलर’ आहेत. या सिनेमात जसकीरत सिंग रंगी नावाच्या भारतीय गुप्तहेराची कथा आहे, जो हम्झा अली मजारी या बनावट ओळखीने पाकिस्तानमधील कराचीच्या ल्यारी भागात अंडरकव्हर एजंट बनून जातो. भारतावर होणारे दहशतवादी हल्ले रोखणे, विशेषतः २६/११ सारख्या कटांमागील गुन्हेगारी सिंडिकेट आणि आयएसआयचे नेटवर्क उद्ध्वस्त करणे, हे त्याचे मुख्य ध्येय असते.
या सिनेमात आर. माधवन (अजित डोवाल सारखा) संजय दत्त, अक्षय खन्ना आणि अर्जुन रामपाल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या शिवाय शत्रूच्या गोटात अनेक वर्षे राहणाऱ्या एका एजंटचा भावनिक सांसारिक प्रवास ही धुरंधरमध्ये मांडला आहे.
मोदीजी सत्तेत आल्यानंतर गुप्तचर धोरणात मोठा बदल झाला. पूर्वी केवळ निरीक्षण व माहिती संकलनावर भर होता, परंतु आता “डॉक्ट्रिन” बदलून प्रत्यक्ष कारवाईवर भर देण्यात आला आहे. सिनेमाच्या सुरुवातीला पाकिस्तानातील दहशतवाद्यांवर झालेल्या कारवायांचा उल्लेख येतो. पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सुलेमान शाह, एकेकाळचा पाकिस्तानी सैनिक, भारतीय दलांच्या ऑपरेशनमध्ये ठार झाला. त्याच्यासह आणखी दोन दहशतवादी मारले गेले.
गेल्या काही वर्षांत, विशेषतः २०२२ आणि २०२३ पासून, भारतात विविध दहशतवादी हल्ल्यांत सहभागी असलेल्या आणि पाकिस्तानात आश्रय घेतलेल्या सुमारे २० ते २५ हून अधिक हाय-प्रोफाइल दहशतवाद्यांचा ‘अज्ञात हल्लेखोरांनी’ खात्मा केला आहे. यामध्ये पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाइंड शाहिद लतीफ, लष्कर-ए-तैयबाचा टॉप कमांडर अदनान अहमद (उर्फ अबू हन्झला), खलिस्तान कमांडो फोर्सचा प्रमुख परमजित सिंग पंजवार, जैश-ए-मोहम्मदचा मौलाना रहीम उल्लाह तारिक, २६/११ हल्ल्याशी संबंधित साजिद मीर (काही दाव्यांनुसार), आयसी-८१४ हायजॅकर झहूर मिस्त्री (उर्फ झाहीद अखून), लष्करचा अक्रम गाझी, हिजबुल मुजाहिद्दीनचा बशीर अहमद पीर, आणि भारतीय नागरिक सरबजीत सिंग यांची हत्या करणारा आमिर सरफराज उर्फ तांबा यांचा समावेश आहे.
या गूढ हत्यांमुळे पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांमध्ये मोठी घबराट पसरली असून, हे अज्ञात हल्लेखोर नेमके कोण आहेत याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
धुरंधर सारख्या चित्रपटांतून आजच्या ‘नव्या भारताचे’ कणखर धोरण स्पष्टपणे प्रतिबिंबित होते. भारत आता केवळ स्वतःच्या सीमांचे रक्षण करण्यापुरता मर्यादित राहिला नसून, राष्ट्राच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या शत्रूला जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात शोधून संपवण्याची क्षमता आणि इच्छाशक्ती बाळगतो.
तरीही अनेक पुरोगामी लोकांचे म्हणणे आहे की धुरंधर सिनेमा हा सरकारी प्रचार आहे,२०१४ पूर्वीच्या सरकारला बदनाम करणे हा हेतू आहे. सनातनी मतदारसंघ मजबूत करण्यासाठी देशात संप्रदायिकता वाढविणे हा छुपा हेतू आहे. तथापि, दुसरीकडे काहींचे म्हणणे असे आहे की आपल्या देशातील गद्दारांची पोल या सिनेमाने जगासमोर आणली आहे. आपले मत काय आहे?
न बा , परवा माझे दोन माझ्याच…
न बा , परवा माझे दोन माझ्याच वयाचे मित्र हा चित्रपट बघून आहे. गहिवरले होते.
हा चित्रपट बघण्याचे प्रयोजन काय असे मी (उगाचच) विचारले. एक मित्र म्हणाला ' आपल्या देशाचा इतिहास आपल्याला कळायला हवा ना'
(दहावीस वर्षांपूर्वी घडलेल्या' गोष्टींना इतिहास म्हणतो का रे येड्या' हा प्रश्न तर मी विचारलाच नाही)
इतिहास कळायला पिक्चर बघतो ? हाही प्रश्न मी विचारला नाही.
'देशातील गद्दारांची पोल या सिनेमाने जगासमोर' वगैरे असं पटाईत लिहीत आहेत यावरून त्यांचेही मत तेच असावे.
चित्रपट जोरात सुरु आहे म्हणतात यावरून काय ते समजून घ्या.
…
(दहावीस वर्षांपूर्वी घडलेल्या' गोष्टींना इतिहास म्हणतो का रे येड्या' हा प्रश्न तर मी विचारलाच नाही)
हा हा हा!
इतिहास कळायला पिक्चर बघतो ? हाही प्रश्न मी विचारला नाही.
इतिहास कळायला तर नाहीच, परंतु, करंट टॉपिक्स कळायलासुद्धा जर पिच्चरची गरज लागत असेल, तर खरोखरच कठीण आहे.
चित्रपट जोरात सुरु आहे म्हणतात यावरून काय ते समजून घ्या.
इथे अटलांटातसुद्धा तूर्तास धुरंधर-२ जोरात सुरू आहे. परंतु, मी बघणार नाही.
(बघितला असता. परंतु, धुरंधर-१ बघितलेला नाही. त्यामुळे, आगापिछा लागणार नाही; उपयोग नाही.)
(धुरंधर-१सुद्धा अटलांटात बऱ्यापैकी चालला, म्हणतात. बघण्याची इच्छा होती१ (निदान काय तारे तोडलेत, ते पाहण्यासाठी तरी), परंतु, राहून गेले. आणि, आता तर तो गेला. जाऊदे. इतकाही डेस्परेट नव्हतो बघण्यासाठी. टाइमपाससाठी तेवढा एकच मार्ग नाही. आणि, धुरंधर-१ बघितला नाही, म्हटल्यावर धुरंधर-२ बघून उपयोग नाही. गरजही नाही, म्हणा! असो.)
१ अटलांटात येणारे वेडेवाकडे हिंदी-मराठी सिनेमे मी अनेकदा उगाच बघतो. (बायको घेऊन जाते; मी ‘नाही’ म्हणत नाही.) अगदी ‘बाईपण भारी देवा’१अ नि ‘नवरा माझा नवसाचा-२’१बसुद्धा! (‘सावरकर’ मात्र कटाक्षाने टाळला.१क असो.)
१अ हा फॉरअचेंज बरा होता.
१ब ब्येक्कार! (अपेक्षेप्रमाणेच.)
१क कशाचेही अति करू नये. (ठीक आहे; ब्येक्कार सिनेमे बघतो कधीकधी. परंतु, म्हणून ‘सावरकर’??? असो.)
+
>>आणि पेप्सी (सिटच्या एका बाजूला पेप्सी ठेवण्याची जागा असते)
ही माहिती अनावश्यक वाटली.
‘तीर्थरूपांना संभोगाचे (अगदी प्राथमिक स्वरूपाचे) धडे देणे’ अश्या अर्थाची जी एक ग्राम्य म्हण (विशेषेकरून पुण्यात) प्रचलित आहे, तिची (का, कोण जाणे, परंतु) उगाच आठवण झाली. चालायचेच.
(तसेही, (कोकचे जागतिक मुख्यालय या नात्याने) अटलांटा ही कोक टेरिटरी आहे. (‘कोकप्रदेश’ म्हणणार होतो, परंतु उगाच भलता अर्थ व्हायचा!) आमच्यात (अगदीच नाइलाज झाल्याशिवाय) शक्यतो पेप्सी पीत नाहीत. बाकी, थेटरात प्यायचे म्हणाल, तर थेटरकंपनीचा ज्यांच्याशी टायअप असेल, ते जबरदस्तीने प्यावे लागते. एएमसीअसेल, तर कोक; रीगलअसेल, तर पेप्सी. असो.)
आणि पेप्सीच का? कॅम्पाकोला का नाही?
अय्या! कँपाकोलाचे पुनरुज्जीवन झाले? ‘आमच्या जमान्या’तले ड्रिंक! (१९७७ साली जॉर्ज फर्नांडिसाने कोकाकोलाला भारतातून हाकलल्यानंतर त्याची जागा घ्यायला जी असंख्य बांडगुळे उत्पन्न झाली, त्यांपैकी सर्वाधिक लोकप्रिय दोघांपैकी एक. आमचे बालपण जरी कोकाकोलावर गेलेले असले, तरी कँपाकोला हा आमचा पौगंडातला आणि तारुण्यातला — अगदी कॉलेजातून बाहेर पडेपर्यंतचा — साथी होता. त्यानंतर मग (‘लेहर पेप्सी’ नावाखाली) पेप्सी आला.)
नॉस्टाल्जिया व्हॅल्यूसाठी तरी (निदान आमच्यासारख्यांनी) कँपाकोला प्यायलाच पाहिजे!
आपलं आहे. देशी आहे. आपल्या माणसांनी तयार केलेलं आहे.
ते तर झालेच. त्याशिवाय, पेप्सीचे भारतात आगमन राजीव गांधींच्या कारकीर्दीच्या अखेरीकडे (म्हणजेच काँग्रेसच्या काळात) झाले. झालेच तर, कोकचे पहिले आगमन तथा पुनरागमन, दोन्हीं काँग्रेसच्याच काळात झाली. कँपाकोलाच्या (मूळ) स्थापनेच्या वेळेस मात्र जनता पक्षाचे राज्य होते, ज्यात (भारतीय जनता पक्षाचा पूर्वसूरी) जनसंघ हा एक घटकपक्ष होता.
तेव्हा, बाकी कोणी पिवो वा न पिवो, परंतु, निदान पटाईतकाकांकडून तरी कँपाकोलाच पिण्याची अपेक्षा आहे. (किंबहुना, पटाईतकाकांनी पेप्सी पिण्याइतकी गद्दारी दुसरी नाही.)
पण लक्षात कोण घेतो?
.
>>नॉस्टाल्जिया व्हॅल्यूसाठी तरी (निदान आमच्यासारख्यांनी) कँपाकोला प्यायलाच पाहिजे!
तुम्ही नॉस्टॅल्जिया म्हणून प्यालही पण त्यातून नीतावहिनींच्या बैलपोळा पाचू नेकलेसमधल्या एका वीस कॅरेट पाचूचा एक कोट्यांश विकत घेतला जाईल. आणि त्यांची धन करण्यात काही गैर नाही. पण ते दागिने बघवत नाहीत.
त्यापेक्षा तुम्ही प्रात:स्मरणीय मेहेंदळेंची धन करा. किमान त्यांच्याकडे सोबर रंगाच्या पैठण्या विकत घेतल्या जातील (त्यालाही माझा आक्षेप आहेच. पण ते बरंच सुसह्य).
धुरंधर - एक पुरोगामी चिकित्सा
आदित्य धर लिखित-दिग्दर्शित-निर्मित धुरंधर चित्रपट ही अनेकार्थाने प्रोपागंडा फिल्म आहे. तब्बल अडीच दशकांचा कलावधी केवळ साडे सात, आठ तासात - दोन भागात खपवला आहे. ही निव्वळ भोळ्या भाबड्या जनतेची फसवणूक असून त्याकडे अल्पसंख्याक विरोधात असंतोषाचे वातावरण निर्माण करणारी कलाकृती म्हणून पाहिले पाहिजे. पवित्र इस्लाम धर्म हा शांततेचे प्रतिक आहे. त्यासाठी अतिपवित्र जिहाद आजपावेतो कार्यरत आहे. गेली कैक शतके पवित्र जिहादी शिकवण जनसामान्य जनतेत रूजवण्यासाठी प्रसंगी किरकोळ हिंसा, फिदाईन ॲटॅक वगैरे करणे अनिवार्य होते. पण चक्क धुरंधर सारख्या प्रोपागंडा फिल्म मध्ये हे जिहादी कार्य दुष्कृत्य म्हणून हिणवले जाते हे मानवतेला धरून नाही. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाची बालवाडी, प्राथमिक शाळा आणि महाविद्यालये ही जगाला दिलेली देणगी आहे. यातून बाहेर पडणाऱ्या तडफदार तरुणांना जर ऑन जॉब ट्रेनिंग देण्यासाठी छोटे मोठे बॉम्बस्फोट घडवण्यासाठी भारतात पाठवले तर पोटशूळ दुखण्याचे कारणच काय? बिचारे बापुडे अतिरेकी कबाडकष्ट करून जीवाची पर्वा न करता प्रसंगी धारातीर्थी पडतात. त्यांची ही शहादत सामाजिक एकोप्यासाठी प्रेरणादायी आहे. कोण कुठला सळसळत्या रक्ताचा तरूण सत्तरावर दोन बहाहत्तर सुंदऱ्यांचा उपभोग घेण्यासाठी जंग जंग पछाडतो. काहीही करून वैश्विक एकात्मिक शांततेसाठी मृत्यूला भिडतो. याला टुकार हिंदुत्ववादी मानवतेविरोधी घटना सांगतात. निर्घृण हल्ला संबोधतात. दहशतवाद्यांच्या कार्याला देशद्रोही ठरवताना लाजा कशा वाटत नाहीत. धुरंधर पूर्वार्ध आणि उत्तरार्ध पाहून तळपायाची तिडिक मस्तकात जाते. कसाला हिंसक आणि प्रोपागंडा सिनेमा आहे हा. असे सिनेमे फक्त आणि फक्त पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या परमोच्च कृत्यांना जगभरात बदनाम करण्यासाठी काढले जातात.
गेल्या वीस वर्षात ज्या गोष्टी किंवा बातम्या ऐकल्या/पाहिल्या असतील त्यामागचा माहिती नसलेला भाग सिनेमात आहे. पाकिस्तान कसे बकवास आहे आणि दहशतवादाला खतपाणी घालणारा आहे हे दाखवले आहे. हे करण्याची सिनेमॅटिक लिबर्टी दिली कुणी? हे संविधानाच्या विरोधात आहे. व्यक्तिस्वातंत्र्याचा कैवार घेऊन तुम्ही एखाद्या गरीब देशाच्या गरीब औद्योगिक क्षेत्राला बदनाम करण्याचा वैश्विक कट रचला आहे. याला सर्वस्वी जबाबदार समकालीन हिंदुत्ववादी संघटना आणि सरकार आहे. दहशतवादाची मोडस ऑपरेंडी सिल्व्हर स्क्रीनवर दाखवून काय साध्य होणार आहे? कैक वर्षे बॉलिवूड नामक चित्रपटसृष्टीत गंग जमुना तहजीबचे बाळकडू पाजले जात होते ते एकाएकी धुळीस मिळवले जातेय हा निव्वळ करंटेपणा आहे. (अवांतर- खरंतर गंगा जमुना तहजीब भारतातील तमाम पुरोगाम्यांनी शिया सुन्नी पंथीय बांधवांना शिकवायची गरज आहे. अहाहा! यात जर यशस्वी झाले तर मध्य पूर्वेतील अशांतता कायमस्वरूपी नष्ट होईल… असो…) अशात धुरंधर सारख्या चित्रपटात पाकिस्तान स्थित दहशतवाद्यांच्या, गुन्हेगारांच्या कारनाम्यांची मालिका दाखवली जाते. हे सेक्युलर समाजासाठी अत्यंत घातक आहे. सिनेमॅटिक लिबर्टीचा किती तो अतिरेक!
आजपर्यंत आजवर अनेक हिंदी चित्रपट भारतीय समाजमन घडवत होते. कैक सिनेमे मानवतेचे उपदेश देऊन सामाजिक बांधिलकी, जाणीवा वाढवत होते. कितीतरी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सिनेमांनी समतेच्या कक्षा रूंदावल्या. भारतीय जनमानसात विषमता वाढवण्यासाठी धुरंधर सारखे सिनेमे तयार केले जात आहेत. हा या लोकशाहीवादी देशाचा अपमान आहे. कोण कुठला पंजाबी मुंडा धडाधड गोळीबार करून कोण्या एका स्वच्छ चारित्र्याच्या आमदाराच्या कुटुंबातील पुरूषांना वेचून वेचून ठार करतो. कारण काय तर त्याच्या कुटुंबाला किरकोळ छळ सहन करावा लागला म्हणून. हे काही बरोबर नाही. गांधीच्या देशात अशी हिंसा! हे नितिमत्तेला धरुन नाही. यावरची कडी म्हणजे अंडरकव्हर एजंट म्हणून त्याला पवित्रभूमी पाकिस्तानात पाठवले जाते गुंड होण्यासाठी. मग गल्लीगुंड, गावगुंड शहरीगुंड ते सरकार पुरस्कृत राष्ट्रीय गुंड असा प्रवास करून अननोन मेन ला नेम धरून गोळ्या झाडण्यासाठी फ्री हॅंड मिळवतो. ही कसली दळभद्री कथा? या कथेत कुठेच समता बंधुता एकात्मता दिसत नाही. कोण तो सुक्काळीचा हमजा मारून गमजा “कराची की प्यारी ल्यारी” चा बाजार उठवतो हे सद्सद्विवेक बुद्धीला पटणारे तरी आहे काय? आपल्या देशात काय चालू आहे त्यावर चर्चा करायला नको म्हणून असे सरकारी आशीर्वादाने सिनेमे दाखवले जातात. बेरोजगारी, गरीबी असूनही असे सिनेमे हजारो करोड रुपयांची उलाढाल करतात म्हणजे काय? ही कसली नैतिकता? सामाजिक वीण टराटरा अन् फराफरा फाडली जाते असे सिनेमे पाहिल्यावर. कसला तो जल्लोष सुरु आहे धुरंधर वरून? अननोन मेन म्हणे! कोणत्याही भारतीय एजन्सी ने अननोन मेन आमचेच धुरंधर आहेत म्हणून अधिकृतपणे पुष्टी केलेली नाही. नरिंदर चा दलिंदर सिनेमा म्हणजे धुरंधर. एक नंबरचा वाह्यात सिनेमा आहे. कोण तो बिचारा आतिक अहमद युपीवाला आय एस आय चा हस्तक म्हणून दाखवलाय सिनेमात. मति भ्रष्ट झाली आहे की काय? सेक्युलर भारताचा कणा ताठ रहावा म्हणून धडपडणारा कुशल संघटक आतिक अहमद. गोरगरीब अशिक्षित कमी शिक्षित तरूणांना नशील्या पदार्थाच्या डिलिवरी बॉय म्हणून नोकऱ्या देणारा मसीहा म्हणजे आतिक अहमद. त्याला ऑन कॅमेरा मारल्याचे संदर्भ दाखवून धुरंधर ने नेमके काय साधले? नोव्हेंबर २००८ साली मुंबईतील हल्ला हा विश्वविद्यालयातून स्नातकोत्तर प्रमाणपत्र प्राप्त झाल्यावर शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन अतिरेकी कारवायांच्या ॲपरेंटशीप साठी आलेले भटके हुए जवानांचा डिप्लॉयमेंट प्रोजेक्ट होता. बिचारी तरुण पोरंटोरं ड्रायफुट्स खाऊन एकेफोर्टी सेव्हन मधून गोळ्या झाडून भारतीयांवर टेस्टिंग करत होती. ते पाकिस्तानी प्रदीर्घ अनुभव असणारे प्रबंधक २४x७ डोळ्यात तेल घालून लक्षपूर्वक सगळ्या घडामोडींवर देखरेख ठेवत होते. गो लाईव्ह असा प्रशिक्षणार्थींच्या सी आय सी डी पाईप लाईन प्रोजेक्टला तुम्ही अतिरेकी कारवाई म्हणून पदाखवता? कुठे फेडाल ही पापे! असे पेरून ठेवलेले संदर्भ घेऊन धुरंधर अंगावर काटा येईल असा करण्याचा हेतू नक्कीच वाईट आहे. मुळात अतिरेकी हे प्रेमळ असतात. जिहाद म्हणून ते समोरच्या व्यक्तीवर गोळ्या झाडतात, बॉम्बने उडवतात. प्राणाची आहुती देतात. अशा निरागस लोकांना निस्वार्थी सेवाकार्य करण्यासाठी मदत केली पाहिजे. आपली न्यायव्यवस्था फासावर लटकवते? हे कोणत्या गुडबुक मध्ये बसतं?
धुरंधर हा धादांत विखारी सिनेमा आहे. याच्यावर कायमस्वरूपी बंदी घातली पाहिजे.
एक सटकलेला उद्विग्न नवपुरोगामी
दोन प्रश्न
१. कधीपासून होतंय हे असं?
२. परसाकडेहून आलात, की डायरेक्ट शाखेतून?
(स्वगत: आयचा घो! हे लिखाण बोले तो, व्हर्बल डायरिया आणि मेंटल कॉन्स्टिपेशन यांचा एकसमयावच्छेदेकरून कसला मनोहर संगम आहे! शिवाय बोनस म्हणून वासापुरता लिटरल फ्लॅच्युलन्स फेकलेला आहे, तो वेगळाच. मान गये, उस्ताद! खुद्द पटाईतकाकासुद्धा आपल्या लिखाणातून इतका इफेक्ट आणू शकणार नाहीत. धडे घेतले पाहिजेत त्यांनी तुमच्याकडून. वाहवा! बहोत खूब! कीप इट अप!)
या सिनेमात अमक्याला टिपून…
या सिनेमात अमक्याला टिपून मारला, तमक्याला टिपून मारला असे दाखवले* आहेत.
ते अमका आणि तमका मोदीजी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवारसुद्धा ठरले नव्हते त्यापूर्वीच मारले आहेत अशा काही पोस्ट सोमीवर वाचनात आल्या. त्याविषयी त्या काळी पंप्र कार्यालयात दुलत यांचे सचीव असलेले पटाईत काका किंवा इतर खुलासा करतील का?
*सिनेमा पाहिलेला नाही.
.
हो हो. आजकाल पाकिस्तानात अंडरकव्हर एजंट पाठविताना, गुप्त आयडेंटिटी म्हणून त्याला खोट्या नावाचा भारताचाच दुसरा पासपोर्ट देऊन पाठवतात.
आणि मग, तो पकडला गेला, की आंतरराष्ट्रीय कोर्टापर्यंत जाण्याची वगैरे प्राइमटाइम ड्रामेबाजी करतात. (त्यातून एका मर्यादेपलीकडे फार काही निष्पन्न होत नाही. होणारही नसते. परंतु, पब्लिकची तेवढीच घटकाभर फुकटची करमणूक. Panem et circensesपैकी ब्रेडचा पत्ता नाही; सर्कशी मात्र भरपूर आहेत.)
पूर्वी (म्हणजे २०१४पूर्वी) खरोखरच असे नव्हते. ‘रॉ’चे एजंट म्हणजे तेव्हा खरोखरच ‘गुप्तचर’ असत. कधी आले, कधी गेले, तेथे जाऊन त्यांनी काय केले, पब्लिकला पत्ता नसे. फार कशाला, पकडले जरी गेले, नि अगदी लिक्विडेट जरी झाले, तरीसुद्धा आम पब्लिकला वर्षानुवर्षे त्याची खबर नसे. (लिक्विडेट झालेल्यांपैकी एखाद्याचे क्वचित्प्रसंगी legends वगैरे बनत, नाही असे नाही, परंतु ते कित्येक वर्षांनंतर.) That, in my opinion, is how a good ख़ुफ़िया agency is supposed to operate — outside of the public eye. (ऑपरेशन यशस्वी होवो, नाहीतर तोंडावर आपटो, परंतु) आम पब्लिकला याची (अगदी मुळात ऑपरेशन होते, याचीसुद्धा) माहिती होण्याची (झालेच तर जेवणानंतर मुखशुद्धी म्हणून चघळण्याची) काडीमात्र गरज नसते.
आता मात्र धोरण बदलले. आता गाजावाजा होतो. मग त्याच्यावर पिक्चर बनतात. इतकेच नव्हे, तर त्या पिक्चरचे सीक्वेलसुद्धा बनतात. तरी बरे, अद्याप पाकिस्तानात गुप्तहेर पाठविण्यापूर्वी अगोदर ‘पाठवणार, पाठवणार’ म्हणून गाजावाजा करून, दूरदर्शनवर (झालेच तर बीबीसीवर, सीएनएनवर) जाहीर करून पाठविण्याची पद्धत अंमलात आलेली नाही. उद्या, कोण जाणे, कदाचित तेही होईल. मोदी है, तो (साला कुछ भी) मुमकिन है। चालायचेच.
(हे म्हणजे थोडेसे आमच्या ट्रंपतात्यांसारखे झाले. पूर्वीसुद्धा इराणशी सख्य वगैरे नव्हतेच. परंतु, वाटाघाटी वगैरे करून इराणला contain वगैरे करण्याची प्रथा होती. अगदीच झाले, तर सँक्शन्स, वगैरे. आता म्हणजे डायरेक्ट हाणामारी. तीदेखील मागचापुढचा विचार, प्लॅनिंग वगैरे काहीही न करता. भले त्यात तोंडावर आपटलो, तरी बेहत्तर. पब्लिकला ॲक्शन दिसली पाहिजे. त्यात तिकडून चिथावायला नेतान्याहू आहेच. तू तिकडे माझ्या वतीने लढ, मी मागे उभा राहून कपडे सांभाळायचे फक्त आश्वासन देतो. या सगळ्यातून एक गोष्ट मात्र अवश्य साध्य होते. ती म्हणजे, इतर भानगडींपासून१ पब्लिकचे लक्ष अवश्य विचलित होते. किंबहुना, याचिसाठी केलेला असतो अट्टाहास.२ चालायचेच.)
१ Epstein वगैरे. कदाचित इतरही अनेक.
२ ते राममंदिर काय होते मग? ते कशासाठी बांधले, असे वाटते? तेसुद्धा, अगोदर ‘देश को देवालय की नहीं, शौचालय की ज़रूरत है’ वगैरे डोस पाजून. बांधले तिथे अयोध्येत मोठ्ठे शौचालय? नाही! तिथे गरजूंना अद्याप रस्त्याच्या कडेसच बसावे लागणार. (वर पुन्हा शौचालय ही राज्यप्रशासनाची नाहीतर स्थानिक प्रशासनाची जबाबदारी आहे, केंद्रप्रशासनाची नव्हे, म्हणून पळवाट काढायला मोकळे! म्हणजे मग मंदिरे बांधणे ही काय केंद्रप्रशासनाची जबाबदारी आहे?) राममंदिर जे बांधले (झालेच तर त्याअगोदर तिथली मशीद जी पाडली), ते काय (तथाकथित) हिंदुत्ववाद्यांना हिंदुधर्माबद्दल, झालेच तर हिंदू प्रजेबद्दल२अ, प्रचंड आस्था होती, म्हणून वाटले की काय? अरे छट्!
२अ होय, ‘हिंदू नागरिक’ नव्हे, ‘हिंदू प्रजा’च. बहुतांश हिंदू जन हे अद्याप ‘नागरिक’ वगैरे म्हणवून घेण्याच्या पात्रतेप्रत पोहोचले आहेत, असे प्रामाणिकपणे वाटत नाही. (कदाचित पोहोचणारही नाहीत.) (चूभूद्याघ्या.)