Skip to main content

जातक कथा – अरुण खोपकर

ऐसी अक्षरे दिवाळी अंक २०२५ ललित

 

मांजरांचा विदुषक

 

पीटर आणि ॲनाची आणि माझी ओळख फ्लोरेन्समध्ये झाली. आम्ही एकाच हॉटेलमध्ये राहत होतो. पहिल्या दोनेक दिवसात आम्हांला लक्षात आले की आमच्या आवडीनिवडीही बऱ्याचशा सारख्या आहेत. आम्हांला पाहायच्या म्युझिअम्स व सिएना, रावेना इत्यादी प्रेक्षणीय गावे यांच्या याद्याही जुळल्या. तेव्हा आम्ही वेळापत्रक जुळवून घेतले आणि तीनच दिवस बरोबर होतो. पण आवडीचे चित्रकार, स्थापत्यकार व स्थळे अशी काही जमून गेली की जुनी मैत्री असावी.

 

ते दोघे वॉशिंग्टन डी. सी.त राहत होते. ॲना लायब्ररी ऑफ काँग्रेसमध्ये कामाला होती आणि पीटर तिथेच कायदे विभागात कामाला होता. मी युरोप पाहून फिरत फिरत दोन महिन्यांनी वॉशिंग्टन डी. सी.ला जाणार होतो. कुठे राहणार वगैरे बोलणे होताहोता ॲनाने मला विचारले, "तुला मांजरे आवडतात?" हा प्रश्न जरा अचानक व अनपेक्षित आला. मी आश्चर्याने तिच्याकडे पाहिले आणि म्हणालो, "अत्यंत. माझ्या लहानपणापासून मी मांजरांबरोबर वाढलो." मग ती पीटरकडे पाहून हसली आणि मला म्हणाली, "मग तुझी हरकत नसेल तर तू आमच्याकडे का राहत नाहीस? आम्ही सकाळी तुला शहरात घेऊन जाऊ व संध्याकाळी परत घरी आणू."

 

दोन महिन्यांनी मी विंचवाचे पाठीवरचे बिऱ्हाड घेऊन त्यांच्याकडे थडकलो. मी घरात पाऊल टाकले आणि बसलो तोच मला फायरप्लेसच्या मँटलवर बसलेली तीन मांजरे दिसली. ती अगदी गांधींच्या प्रिय अशा तीन माकडांच्या पुतळ्यांसारखी, तीन वेगळ्या पोजेस घेऊन बसली होती. एक हात ओले करून डोळे साफ करत होते. दुसरे मागील पायाने कान खाजवत होते व तिसरे स्तब्ध होते. ॲनने माझी ओळख करून दिली 'हा डॉट. हा कॉम आणि हा ॲस्टेरिक्स'. डॉटच्या अंगावर खरंच डॉट होते. बाकीच्या दोघांच्या शरीरावर त्यांची नामचिन्हे नव्हती. मी त्यांच्याजवळ गेल्यावर त्यांनी मांजरच माणसाकडे ज्या तुच्छतेने बघू शकते तसे माझ्याकडे पाहिले आणि आत्मप्रसाधनात गर्क झाली.

 

मला माझी खोली दाखवण्यात आली. तीन मांजरांसाठी तीन छोटे खोके होते व त्यात मऊ वुलनची गादी व चादर होती. ॲना म्हणाली, "या तिघांच्या बेडस इथेच आहेत. त्यांचा तुला काहीही त्रास होणार नाही. त्यांच्याकरता आम्ही काचेची लहान झुलती दारे केलेली आहेत. त्यांना रात्री बाहेर जायचे असले तर ती सहज जातात येतात. तू दमला असशील. रात्री जेवणाच्या वेळी भेटू या."

 

दुसऱ्या दिवशी आम्ही न्याहारीला एकत्र आल्यावर पीटर म्हणाला, "जिच्यामुळे आमचे लग्न एक वर्ष लांबणीवर पडले होते अशी ह्या मांजरांची एक खोड तुला सांगायलाच हवी." माझे कुतूहल जागे झाले. त्याने खुलासा केला,

''ॲना स्टुडिओ अपार्टमेंटमध्ये एकटी रहात असल्यापासून ही मांजरे तिच्याकडे आहेत. ती एकाच आईची प्रजावळ. ॲना आंघोळीला गेली की ह्या तिघांना शॉवरमधून येणाऱ्या गरम वाफेचे आकर्षण वाटत असे. सामान्यत: मांजरांना पाणी आवडत नाही. तरीही ही तिघे बाथरूममध्ये घुसून लेजवर बसून ॲनाची आंघोळ होईपर्यंत वाफेच्या उष्म्याचे सुख घेत. मग शॉवर बंद केला की ती बाहेर येत.''

 

दोघांनी लग्नाचा विचार केला तेव्हा ॲनने पीटरला स्पष्ट सांगितले की ही माझ्या मांजरांची जुनी सवय आहे. ती जर तुला पसंत नसेल तर आपण जवळजवळच्या दोन अपार्टमेंटमध्ये राहू या. मांजरे माझ्याबरोबर राहतील.

 

विदुषकाकडे बघणारी मांजरं

पीटरने आपल्याला रोज आंघोळीच्या वेळी मांजरांची कंपनी आयुष्यभर कशी काय परवडेल ह्याबद्दल विचार केला. शेवटी दोघांनाही एकत्र राहावेसे वाटले आणि त्याबरोबर मांजरेही आली. आता त्यांना घरातल्या कुठल्याही शॉवरचा आवाज ऐकल्यावर आत जायचे असते. पीटर मला म्हणाला, "तू कृपया त्यांना आत येऊ दे. नाहीतर ती बाहेर दरवाजा खरवडत ओरडत बसतात."

 

स्व-प्रदर्शन हा काही माझा खास गुण कधीच नव्हता. हा प्रकार मला इतका गंमतीचा वाटला की मी त्याला संमती दिली. माझी आंघोळीची वेळ झाल्यावर मी शॉवरचा पडदा ओढून घेतला व शॉवर सुरू केला. तो आवाज ऐकताच माझ्या खोलीत खेळत असणारे हे तिघे आत घुसले. टॉवेलच्या शेल्फवर मागच्या पायावर बसून पुढचे दोन्ही पाय सरळ ठेवून एका रांगेत शहाण्या प्रेक्षकांसारखे माझी आंघोळ पाहत राहिले. शॉवर बंद करून अंग पुसायला लागताच ते तिघेही एकसाथ पटापट उड्या मारून मला हसत हसत निघून गेले. हा प्रकार माझ्या संपूर्ण मुक्कामात रोज होत होता.

 

यापूर्वी व यानंतर मी इतक्या प्रेक्षणीय आणि विनोदी आंघोळी कधीही केल्या नाहीत.

 

सर्पसूत्र

 

अभिजीत आणि आमोद या माझ्या पुतण्यांना प्राण्यांचा आणि जंगलांचा नाद होता. त्या दोघांनाही सापांचे खास आकर्षण होते. एका सहलीत त्यांनी एक धामण पकडली.

 

धामण हा अतिशय देखणा साप आहे. तो नागासारखा दिसतो पण फणा उभारत नाही. तो बिनविषारी आहे आणि तो वेगवेगळ्या प्रकारच्या जागांत, अगदी मनुष्यवस्तीतही राहू शकतो. त्यामुळे त्याला घरी पाळावे असा त्या दोघांनाही मोह झाला.

 

धामण हा दिवसा वावरणारा किंवा दिनचर साप आहे. त्याचे शरीर सडपातळ असते आणि ते पिवळे, तपकिरी, राखाडी किंवा काळे असू शकते. तो अतिशय वेगाने हालचाल करू शकतो. त्याच्या खालच्या ओठांच्या खवल्यांवर काळी पट्टी असणे हे त्याचे एक वैशिष्ट्य आहे आणि तिच्यामुळे तो नागापासून वेगळा ओळखता येतो.

 

माझ्या पुतण्यांनी साप घरी आल्यावर एक जुने काचेचे अक्वेरिअम साफ केले. त्यात गारगोट्या, गुळगुळीत दगड, रेती आणि गवत टाकले. त्या दोघांपैकी कुणालाही मोकळा वेळ मिळाला की ते त्याला बाहेर काढून घरात मोकळे फिरू देत. तासा-दोन-तासांनी पुन्हा काचेच्या पेटीत ठेवून जाळीचे झाकण लावत.

 

त्याच्या मोकळ्या फिरण्याच्या वेळेत तो घरभर फिरत असे. प्रथम तो कपाटांच्या खाली किंवा तत्सम सहज हात न पोचेल अशा जागीच जात असे. जरा सरावानंतर तो अधिक मोकळेपणे वावरू लागला होता. अशा वेळी पाहुणे आल्यास दार उघडताना खबरदारी तर घ्यायलाच लागत असे, परंतु घरात साप आहे याची कल्पना त्यांना द्यावी लागत असे. एखाद्या धाडसी पाहुण्याची हरकत नसली तर त्यांची भेटही करवून दिली जात असे.

 

साप्पा

साप घरी रहायचा म्हणजे पहिला प्रश्न त्याच्या खाण्यापिण्याचा. धामण सापांचे मुख्य खाद्य म्हणजे उंदीर आणि बेडूक. आता मुंबईतल्या शिवाजी पार्कच्या घराजवळ यांचा नियमित पुरवठा कुठे मिळणार? परंतु माझे पुतणे हे कोणत्याही अडचणीतून मार्ग काढणारे युक्तिबाज होते. त्यांचा मित्रपरिवारही खूप मोठा होता आणि त्यात अनेक नमुने सामील होते. त्यापैकी एक म्हणजे त्यांचा मित्र चंदू रणदिवेचा धाकटा आणि लहान चणीचा भाऊ. त्याच्या लहान शरीरयष्टीमुळे त्याचे हाक मारायचे नाव मायक्रो होते आणि मग त्याचा मायक्र्या झाला.

 

रणदिवे घराण्याचा पारंपरिक व्यवसाय म्हणजे शाडू मातीचे गणपती बनवणे. गणेश पेठ लेनमध्ये ते राहात होते व त्यांचा कारखानाही होता. तिथे गणरायाच्या कृपेने उंदरांचा सुळसुळाट होता. मायक्र्याने जबरदस्त अक्कल चालवली. त्यांच्याकडे गंगाजलाचा एक तांब्या बरीच वर्षे पडून होता. त्याची लाख जाऊन पाणीही हवेत गेले होते. मायक्र्याने तो तांब्या घेतला आणि त्यात एक बटाटा ठेवून तो कारखान्यात रात्री झोपण्यापूर्वी मोक्याच्या जागी ठेवला.

 

दुसर्‍या दिवशी सकाळी मायक्र्या विजयी मुद्रेने झाकणासकट तांब्या घेऊन आमच्या घरी प्रकटला. आमोदने तो तांब्या घेतला व झाकण किलकिले करून पहाताच 'गणपती बाप्पा मोरया' म्हणून आरोळी ठोकली. एक लहानसा उंदीर त्याच्या नजरेस पडला होता. तो त्याने सापाला नैवेद्य म्हणून दाखवताच त्याने तो गट्टम् केला.

 

मायक्र्याला एक बटाटा आणि रिकामा तांब्या परत देण्यात आले व घरातल्या सर्वांनी मायक्र्याला डोक्यावर घ्यायचे बाकी ठेवले होते. त्यानंतर दहा दिवस मायक्र्याला बटाटा देणे व त्याने बदल्यात उंदीर देणे ही देवाणघेवाण अखंड चालू राहिली. एक दिवस एवढेसे तोंड करून मायक्र्या आला. हातात तांब्या नव्हता. अगदी रडकुंडीला येऊन त्याने आपले अपयश जाहीर केले.

 

सापाला उंदीर आवडतो म्हणून मुलांनी त्याचे नाव साप्पा ठेवले होते. दुसर्‍या दिवशी साप्पाच्या जेवणाची बोंब. मायक्र्या म्हणाला, 'मी रोज बटाटा ठेवेन. एक ना दोन दिवसांनी उंदीर नक्कीच येईल.' पण त्याचे फलज्योतिष्य धादांत खोटे ठरले. दोन-तीन दिवस अन्न न मिळाल्याने साप्पा मलूल दिसू लागला.

 

ताबडतोब 'सर्पान्न समिती'ची स्थापना करून धामण जातीच्या सापाच्या भक्षणयोग्य पदार्थांवर संशोधन सुरू झाले. तो मांसाहारी असल्याने त्याला कोंबडीच्या व बोकडाच्या मांसाचे तुकडे टाकण्यात आले. ते तसेच पडून राहिले. मग कुणी तरी सल्ला दिला की सापाला जिवंत जीवच आवडतात. रावत मॅन्शन, न. चिं. केळकर रोड, शिवाजी पार्कमध्ये लहान लहान जिवंत जीव कुठे मिळणार? या प्रश्नाचा उहापोह होत असताना लीलाने – माझ्या आईने – त्याला झुरळे देऊन पाहू अशी सूचना केली. सामान्यत: लोकांना झुरळांची किळस असली तरी लीला झुरळे लीलया पकडू शकत असे. कृतिशील लीलाने दोन-तीन झुरळे पकडून ती साप्पाच्या काचपेटीत टाकली. साप्पाने त्यांच्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. झुरळे त्यांना आरक्षित जागा मिळाल्याने खुष होऊन काचपेटीत इकडे तिकडे जाऊ लागली. जराशी उडून साप्पाच्या अंगावर बागडू लागली.

 

समितीला माहिती मिळाली की धामण सापाला बेडूक आवडतात. माझा थोरला भाऊ हा कॅन्सर रिसर्च केंद्रात नोकरीला असल्याने त्याच्या वशिल्याने जीवशास्त्राच्या अभ्यासाकरता विच्छेदनाकरता येणारे बेडूक अधूनमधून मिळत. पण हा काही कायमचा तोडगा नव्हता.

 

उंदीरविरोधी मोहिमेत काम करणाऱ्या मुंबई महापालिकेच्या कर्मचार्‍यांकडे वशिला लावल्यावर काही वेळा सापळ्यातले उंदीरही मिळू लागले. शेवटी स्वावलंबन व 'मेड इन रावत मॅन्शन'ला पर्याय नसल्याचे लक्षात आल्यावर मुलांनी काही उंदीर खोक्यात पाळले आणि प्रतीक्षेला फळ आले. त्यातल्या एका मादीला पिल्ले झाली आणि साप्पाच्या अन्नाचा प्रश्न तात्पुरता तरी सोडला गेला.

 

उंदरांचा कारखाना या प्रकरणाला सारे घर वैतागले. त्यांचे हगणेमुतणे, उग्र वास, ते कैदेतून सुटका करून घेऊन घरादारात हैदोस मांडतील ही रास्त भीती इत्यादी कारणांमुळे शेवटी माझ्या पुतण्यांना साप्पांचे यथाविधी विसर्जन करावे अशी नोटीस देण्यात आली. अर्थातच तोपर्यंत साप्पांनी प्रत्येक कुटुंबियाच्या मनात बीळ केले होते. त्यांच्या विविध लीलांनी आम्हाला फार सुख होत होते.

 

साप्पांसमोर काठी धरली तर ते तिला विळखा घालीत. हात पुढे केला तर त्याच्या भोवताली पेच घालून तुमच्या अंगावर सरसर सरपटत येत. मानेभोवती अंग लपेटत. पायांना विळखा घालीत. हलत्या चेंडूला पकडीत. त्यांची सर्पगती ही इतकी डौलदार असे की ते घरभर फिरायला निघाल्यावर काय बिशाद की तुमचे लक्ष दुसरीकडे जाईल! सर्पिल गतीसारखी झोकदार गती इतर कुठेच मिळणार नाही. नदीही त्याच गतीचे अनुकरण करते. सुप्रसिद्ध इंग्रज चित्रकार विल्यम होगार्थने आपल्या सौंदर्याचे विश्लेषण करणाऱ्या ग्रंथात ऽ या आकाराचे निसर्गातील विरोधी प्रेरणांना सामावून घेणारा 'सर्वसुंदर' आकार असे वर्णन केले आहे.

 

शेवटी महादेवाच्या 'सत्यम् शिवम् सुंदरम्' या त्रयीतल्या सुंदरम् या गुणाचा पराजय झाला. साप्पांच्या आहाराच्या समस्येतले कठीण वस्तुस्थितीतले सत्यम् हे विदारक होते हे मान्य करायलाच लागले. एक दिवस सगळ्यांनी साप्पांचा ओलावलेल्या डोळ्यांनी निरोप घेतला व पुतण्यांनी त्यांची जंगलात प्रतिस्थापना केली.

 

 

सुपारी किलर

 

मला खात्री आहे की या गोष्टीवर तुमचा विश्वास बसणार नाही. परंतु ही गोष्ट सर्वथा खरी आहे. माझ्या विजूताईच्या बाबतीत अशा अनेक गोष्टी आहेत की ज्यांच्यावर पटकन विश्वास बसत नाही. त्या अविश्वसनीय वाटतात ह्याचा अर्थच त्या खऱ्या आहेत.

 

१९५६ साली विजूताईचे लग्न मुधोळच्या बापूसाहेब पागनीसांबरोबर झाले व ते दोघे कांदिवलीच्या डहाणूकरवाडीतल्या एका छोट्या घरात रहायला गेले. त्या काळी डहाणूकरवाडीच्या आसपास जंगल होते. साप निघायचे. कधी वाघ फेरी मारून कोंबड्याकुत्र्यांचा फराळ करून जायचे. विजूताईत वाघिणीचे काही गुण असल्याने ती तेथे निर्भीडपणे राहू लागली. आवारात चार-पाच बिऱ्हाडे होती. ती सर्व कनिष्ठ मध्यमवर्गातली.

 

विजूताईला जनावरांचे प्रचंड प्रेम आणि जनावरांना विजूताईचे. ती जिथे जाईल तिथे प्राण्यांच्या वर्तुळात तिच्या येण्याची खबर लागत असे. मग ती मंडळी हळूहळू विजूताईच्या घराच्या अवतीभोवती वावरून तिचे लक्ष वेधून घेत. कुत्री शेपट्या हलवता हलवता कुल्लेही हलवू लागत. मांजरे तर तिच्या पायात इंग्लिश आठाचे आकडे करून तिला चालणे मुष्किल करत. मग एकेक प्राणी दत्तक घेतला जात असे. विजूताईच्या यजमानांना, बापूसाहेबांना, शेतावरच्या गाईम्हशी आवडत, पण घरात लुडबूड करणारी कुत्री-मांजरी अजिबात आवडत नसत. विशेषत: मांजरी.

 

विजूताईचे दत्तक वारस बापूसाहेबांना नामंजूर असत. विजूताई झाशीच्या राणीपेक्षा तेजस्वी असल्याने तिचा एकही दत्तक वारसा जाहीरपणे नामंजूर करण्याची हिम्मत बापूसाहेबांनाही नसे. परिणामी लग्नानंतरच्या अकरा महिन्यांत विजूताईच्या घरी तेरा मांजरी वावरत असत. मांजर-फ्री असा कुठलाही झोन नसे.

 

वाडीच्या आजूबाजूला असलेल्या जमिनीत उंदीर, घुशी अगदी दिवसाढवळ्यादेखील यथेच्छ विहार करीत. अर्थातच तिथे सापही न्याहारीकरता किंवा रात्रीच्या जेवणाकरता येऊ लागले. परंतु विजूताईच्या मांजरसेनेची त्यांना दहशत होती. त्यामुळे प्रत्यक्ष तिच्या घरात त्यांना शिरकाव करायची संधी मिळाली नाही.

 

विजूताईच्या बेकायदेशीर खाजगी सेनेची बॉस होती सुपारी किलर मांजर. सुपारी संपूर्ण काळी होती. तिच्या नावात तिचे काम व तिची कीर्ती एकवटली होती. कुणाच्या घरी फार उंदीर झाले की तिला सुपारी दिली जायची. तिला घरात घेऊन गेल्यावर एकादा मासा दिला की ती त्या घराच्या आसपास फेरी देत पहारा करीत असे. रात्री ती उंदरांचा असा फडशा पाडत असे, की सुपारीच्या एन्काऊंटरचे बळी दुसऱ्या दिवशी मोजून वधस्थानापासून दूर केले जात. एक-दोन रात्रीत ती आपले काम बजावून मग भरपूर जेवणाचा मोबदला घेऊन विजूताईच्या घरी परत जात असे.

 

सुपारीचे बापूसाहेबांशी खास नाते होते. विजूताईच्या छोट्याशा घराचे स्वयंपाकघर वेगळे करणारी तुळई ही सुपारीची लाडकी जागा होती. ती तिथे स्थानापन्न झाली की तिला चहूबाजूचे विहंगमदृश्य दिसत असे. बापूसाहेब त्या तुळईखालून जात असले की सुपारी पंजाची नखे बाहेर काढून तो बापूसाहेबांच्या डोक्यावर न चुकता फिरवत असे. एक तर त्यांचे टाळूवरचे केस जरा विरळ होऊ लागले होते. त्यामुळे त्यांना पुरेसे नैसर्गिक संरक्षण मिळत होते. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना सुपारी आवडत नाही हे त्यांनी तिच्यापासून लपवून न ठेवता तिचे उघड शत्रुत्व घोषित केले होते. कधी तरी ते रागावले की तिला मासळीबाजारात सोडण्याच्या धमक्या देत. एरवी ती त्यांच्या थाऱ्याला उभी राहत नसे. फक्त तुळईच्या बुरुजावर पोचल्यावर ती आक्रमक पवित्रा घेत असे.

 

सुपारी किलर

तुळईवरचे चपळ मांजर पकडणे ही साधी बाब नाही. त्याकरता तिच्या दिशेने हात लांब करावा लागतो. गनिमी काव्याने एक फटका मारून तुळईवरची आपली जागा तिला सहज बदलता येत असे. संतापलेल्या माणसाचा हात दुसऱ्या जागी पोचला की दुसरा फटका, असे करून तिने बापूसाहेबांना जेरीला आणले होते. विजूताईला त्यांची लढाई पहाण्यात फार आनंद होत असे व ती नेहमीच सुपारीची बाजू घेत असे. बापूसाहेबांच्या सुपारीने केलेल्या जखमांवर मीठ चोळण्याकरता विजूताईची जीभ पुरेशी असे. "एवढे कसे तुम्ही बावळट! साधी तुळईवरची मांजर पकडता येत नाही आणि म्हणे तिला मासळीबाजारात नेऊन टाकीन." अशा प्रकारची वाक्ये जरी सुपारीला कळत नसली तरी बापूसाहेबांना कळत. वाचक हो! आपल्यातल्या कोणी जर मांजराला त्याच्या इच्छेविरूद्ध पकडायचा प्रयत्न केला असेल, तर त्याला बापूसाहेबांची असहाय, दयनीय व केविलवाणी अवस्था सहज समजेल.

 

मी विजूताईच्या घरी क्वचितच रहायला जात असे, पण एकदोन भेटींतच सुपारीची व माझी चांगली गट्टी झाली. मी तिला उचलून घेत असे. तिचे मागचे पाय तळहातावर घेऊन दुसऱ्या हाताने तिला सांभाळत फिरवून आणत असे. तरीही बापूसाहेब माझ्याशी चांगले वागत असत. बाकीच्या बारा मांजरांचेही आपापले गुण होते. नाही असे नाही. पण सुपारी ही जन्मजात शिकारी व गनिमी काव्यात तरबेज निंजा होती आणि एक दिलचस्प चीझ होती. तिची सर इतर कुणाला नव्हती.

 

एकदा वैजूच्या आईंनी सुपारीला सुपारी दिली. इमानदार कॉन्ट्रॅक्ट किलरप्रमाणे आपले काम फत्ते करून ती आपल्या मोबदल्याची वाट बघत होती. वैजूच्या आई कामात होत्या. एक-दोनदा तिने म्यांव केले तरी त्यांनी तिच्याकडे लक्ष दिले नाही. मग तिने जरा आक्रमक पवित्रा घेतल्यावर त्यांनी तिची बशी खाण्याने भरून तिच्यासमोर आपटली. या अनपेक्षित अपमानामुळे सुपारीला धक्काच बसला. ती जागच्या जागी वळली. शेपटी वर करून आपले गुदद्वार त्यांना दाखवले व दिमाखाने पावले टाकत विजूताईच्या घरी विजयी वीरासारखी परतली.

 

त्यानंतर सुपारीने वैजूच्या आईंच्या घरात कधीही पाऊल टाकले नाही.

 

(मॅजेस्टिक प्रकाशनाच्या 'पंजे, पाय आणि पंख' या आगामी प्रकाशनातून साभार)

सई केसकर Tue, 14/10/2025 - 10:06

फारच गोड लेख आहे.

तिरशिंगराव Tue, 14/10/2025 - 14:41

लेख आवडला. मला सुद्धा प्राण्यांची खूप आवड आहे. पण ते फ्लॅट मध्ये ठेवले तर इतरांवर अन्याय होतो, म्हणुन पाळत नाही. अर्थात सापांची मात्र आवड नाही. कुत्र्यांना, आपण समोरच्या माणसाला आवडतो की नाही हे समजण्याचा सिक्स्थ सेन्स असावा. कारण रस्त्यातली वा कोणाच्या घरची कुत्री माझ्यावर सहसा भुंकत नाहीत आणि पटकन मैत्री करतात, त्यांना काही खायला घातलं नाही तरी!