Skip to main content

ऋणनिर्देश


नमस्कार,

या वर्षीही (गेल्या हजारो वर्षांप्रमाणेच) ऐसीचा अंक येत आहे; यात काही अंशी मानवी बुद्धिमत्ता वापरली आहे. काही अंशी मानवी चुका, आळशीपणा, लोकांची आपसांतली वादावादी यांचाही या अंकात समावेश आहे. तपशिलात सगळं गॉसिप सांगितलं असतं, पण त्या गॉसिपची ही वेळ आणि जागा नाही. दिवाळी तोंडावर आली आहे, आणि अंक आणखी लाखो वर्षं काढायचा असेल तर गॉसिप आहे, हेही न सांगितलेलं बरं.

अनेक लोकांनी दिवाळी अंक निघावा यासाठी लॉबिंग केलं. अंक निघावा यासाठी काही लोकांची पीएचड्या केल्या, नोकऱ्याही केल्या, अनुभव मिळवले, एआयच्या नाकदुऱ्याही काढल्या; आणि म्हणे काही लोक लिहा-वाचायलाही शिकले. सगळ्यांनी अंकासाठीच एवढे कष्ट केले यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. या सर्वांचे मनापासून आभार.

अंक काढण्याचं कारण ऐसीच्या लोकांना आपला इगो कुरवाळून घ्यायचा असतो. पण तेवढंच पुरेसं नसतं. दिवाळी अंक, लेखन, साहित्य असं काही म्हणल्यावर वाचक हवेत; आणि सोशल मिडियावर त्याची प्रसिद्धीही हवी. तर अंक वाचा; प्रतिक्रिया द्या; आणि सोशल मिडियावर प्रसिद्धीही करा. अंकात सहभागी व्हा. नाही तर काय फायदा एवढ्या तंत्रज्ञानाचा!

हे सगळं करण्याबद्दल सगळ्यांचे आभार. जमलं असतं तर सगळ्यांना साहित्य आणि शांततेचा नोबेल पुरस्कार दिला असता. हजारों ख्वाईशें ऐसी...

संपादक मंडळ दिवाळी अंक २०२५

विशेषतः 
सई केसकर
अवधूत बापट
चिंतातुर जंतू
डॅशी
नंदन
अमुक
आदूबाळ
३_१४ विक्षिप्त अदिती
आणि राजन बापट

चिमणराव Wed, 15/10/2025 - 03:22

ऐसीच्या दिवाळी अंकाचे लेख कधी येणार हे पाहण्यासाठी आलो तर लेख आले सुद्धा.
प्रथम तीन लेख वाचून काढले आणि नंतर इकडे आलो. (तिकडे प्रतिसाद देणारच आहे.)
सोपी सुटसुटीत प्रस्तावना आवडली.
१."यात काही अंशी मानवी बुद्धिमत्ता वापरली आहे." आणि यात असलेल्या चुका वगैरे मान्य करण्यापर्यंतच्या काळात आपण आलोच आहोत.
२. गॉसिप आहे. याचकरता चार लोक जमा होतात. गॉसिपला मराठीत उणीदुणी काढणे, चहाटळपणा करणे म्हणता येईल. ज्याच्याबद्दल बोलायचं तिच्या पाठीमागे. पण तिचा रोख आपल्यावरच आला तर तिथून कटायचं असतं. प्रसिद्ध लेखक खुशवंत सिंह सांगून गेलेतच... "लोकांना आवडतं गॉसिप आणि तेच मी लिहिणार."
३.>> अंक काढण्याचं कारण ऐसीच्या लोकांना आपला इगो कुरवाळून घ्यायचा असतो.>>
त्यात सामील आहे.
४. ऐसीचे संपादन मंडळ, लेखक सर्वांचे आभार.