समुद्रच आहे एक विशाल जाळं .. कविता महाजन
हे पुस्तक म्हणजे एक दीर्घ कविता आहे.
ही समुद्रात राहणाऱ्या एका निळ्या पोटाच्या काळ्या मासोळीची गोष्ट आहे. या मासोळीचे मनोविश्व मोठे विलक्षण आहे. एकसलग वाचत रमून जावे अशी गोष्ट.
या मासोळीला सारखे वाटत असते की ती इतरांपेक्षा वेगळी आहे. तिच्या मते प्रत्येकजण आपापल्या जागी वेगळा असला तरी मी या सगळ्यापेक्षा वेगळी आहे. प्रत्येकाचे दिसणे वेगळे असते, चाकोरीतले जगणे वेगळे असते. मात्र हिला चाकोरीच नकोशी झाली आहे. तिचे आजूबाजूच्या विश्वात मन रमत नाही. तिचे ठाम मत आहे की आपण चाकोरीत अडकून पडायलाच पुनः पुनः जन्म घेत असतो. आणि म्हणूनच तिला या सगळ्यातून बाहेर पडायचे आहे.
मी वेगळी आहे
हा माझा भ्रम नाहीये
सत्यच आहे ते
सत्य आहे की वेगळाच असतो प्रत्येक मासा
जसा वेगळा आहे खडक मासा माझ्याहून
ती विचार करते की एखाद्याच्या दैनंदिनीमध्ये किंवा एखाद्या जागेत कितीही बदल झाले तरी काय फरक पडणार आहे? चाकोरी ती चाकोरीच. ती आजूबाजूच्या माशांना जगण्याची धडपड करताना बघते. त्यांना कधी एकटे तर कधी एकत्र फिरताना बघते.
ती स्वतःची इतरांबरोबर तुलना करत राहते. तिला खूप प्रश्न पडतात. रोजच्या आयुष्याकडून काय हवे आहे हे तिला माहीत नाही आणि स्वतःकडून काय हवे आहे हे ही तिला माहीत नाही. चाकोरीबद्ध जगल्याने आपली प्रगती होते आहे का ? का आपली प्रगतीच होत नाही आहे? अशा प्रकारचे विचार तिला सतावतात.
त्याच त्याच वर्तुळात राहून आपण कोठे जात आहोत, आपण कोण आहोत ? या कशाचीही उत्तरे मिळत नाहीत. वर्तुळाबाहेर गेल्यावरच स्वतःची किंमत कळते या विचाराने ती या जागेतून निघून जाण्याचे ठरवते.
तिला वाळूवर जायचे आहे. एक दिवस अचानक स्वतःला सिद्ध करून दाखवण्याचे भय तिच्यातून निघून जाते. तिच्या या धारिष्ट्यमुळे तिच्यात बदल होतात. तिला एक अद्भुत जग दिसते. तिला रंगांचे ज्ञान होऊ लागते. तिला जग रंगीबेरंगी दिसू लागते... जे इतर माश्याना दिसत नाही. त्यांचा तर जग रंगीबेरंगी असते यावरच विश्वास नाही
तिला आश्चर्य वाटते की स्वतःला रंग असूनही काही माश्याना अद्भुत गोष्टी कशा काय समजत नाहीत. ही प्रगती आहे हेच त्यांना कळत नाही किंवा हा विधात्याचा अनुग्रह आहे हेही त्यांना समजत नाही. ते अज्ञानी असावेत किंवा आपल्यामध्ये काहीतरी उणीव आहे हेच त्यांना उमगत नसावे. ते त्यांच्या चाकोरीत रममाण राहतात.
हळूहळू मासोळीचे ज्ञान वाढत राहते. तिला समजते की आपणच आपले विश्व उभे करत असतो. हे सगळे सगळे आपल्याच मनाचे खेळ असतात.
कधी कधी वाटत
समुद्र हा समुद्र नसून
मीच समुद्र आहे
मीच आहे जाळं
मीच माझी सुरुवात
मीच माझा अंत
आपल्या आत्म्याला परमात्म्याला भेटायची ओढ लागली आहे आणि हेच अंतिम सत्य आहे हे तिला उमगते. तिला आता मृत्यूची ओढ लागली आहे. वाट बघत राहण्याचाही तिला आता कंटाळा येऊ लागतो. एक दिवस .. ते आता सांगत नाही. तुम्हीच वाचा.
या दीर्घ कवितेचे यश आहे ते यात लपलेल्या गर्भितार्थत ..
जी मासोळीची मनोवस्था आहे तीच तर अध्यात्माच्या वाटेवर चालणाऱ्या व्यक्तीची मनोवस्था असते. अशा व्यक्तीला स्वतःचा शोध घ्यावासा वाटतो. अशा व्यक्तीचे मन चाकोरीत रमत नाही.. आपण का जन्माला आलो आहोत.. आपल्याला कशाची ओढ लागली आहे? असे प्रश्न पडत राहतात. मासोळीसारखेच सगळे त्याच्याही आयुष्यात चालू असते. असेच प्रश्न ....हीच अस्वस्थता.. हीच ओढ.... हीच बेचैनी असते. या कवितेत मासोळीच्या प्रतिकातून अध्यात्माचा तंतोतंत गुंफला गेलेला हा धागा प्रभावीपणे जाणवतो.
उत्तम कवितेचे असेही एक वैशिष्ट्य असते की उत्तम कविता बहूपदरी असते. प्रत्येक वाचक स्वतःच्या परीने त्याचा अनेक पातळ्यांवर अर्थ लावत असतो. या कवितेची भाषा कधी कधी तर बाळबोध म्हणावी इतकी सोपी आहे. मात्र त्याच जोडीला ओघवती आणि खिळवून ठेवणारी आहे.
मी असे कोठेतरी वाचल्याचे आठवते की स्वतःच्या या निर्मितीवर कविता महाजन म्हणाल्या होत्या की, “ यानंतर आयुष्यात काहीही न लिहिता मेले तरी चालेल.. अस लिहिता आले पाहिजे.. असे वाटत होते ते हातून लिहून झाले.”
आज कविता महाजन आपल्यात नाहीत. पण खरोखरीच मैलाचा दगड ठरावी अशी ही त्यांची काव्यरचना. निव्वळ अप्रतिम.
अशी ही मनस्वी, निष्पाप, बुद्धिमान निळ्या पोटाची काळी मासोळी नकळत तुमच्याही डोळ्यांसमोर उभी राहील……आणि खूप काळ मनात रेंगाळत राहील.
सुंदर रसग्रहण
शक्य झाले तर ती कविता इथे द्या की.