पत्रिकेचं नक्की आयुष्यातलं स्थान काय आणि किती ?
ही गोष्ट आहे 1990 मधली. माझ्या ऑफिस मधल्या एका मैत्रिणीला एक स्थळ सांगून आलं होतं. अतिशय श्रीमंत. घरच्यांना एकदम पसंत. त्याला ती पसंत. पण तीला काही तो आवडला नव्हता. तिचा नकार घरच्यांच्या पचनी पडेना. त्यांनी एकांना पत्रिका दाखवली. त्यांनी रामबाण अस्त्र काढलं. त्यांनी सांगितलं की 'हा सुवर्णयोग जर चुकवला तर नंतर 10 वर्षं मुलीच्या कुंडलीत विवाहयोग नाही.' मैत्रिण हैराण.
मी तिला म्हटलं की, 'पत्रिकेवर विश्वास ठेवायचा तर नीटच ठेव. तुझ्या नशिबात हाच मुलगा लिहीला असेल तर जेव्हा केव्हा योग येईल तेव्हा हाच मुलगा नवरा मुलगा असेल.
योग एकतर आत्ता असेल किंवा दहा वर्षांनी ... त्यात जर-तर कसं काय ? पत्रिका म्हणजे अटळ योग. काळ्या दगडावरची रेघ.
नाही तर पत्रिकेवर विश्वास ठेवू नकोस. तुला पसंत नसलेल्या मुलाशी विवाह करू नकोस. स्वत:वर विश्वास ठेव आणि घे नशिबाची परिक्षा.'
सुदैवाने तिने हिंमतीने विरोध केला. लगेचच एका उत्तम मुलाशी दोघांच्याही पसंतीने विवाह झाला. आज ते सुखात लग्नाचा रौप्यमहोत्सव साजरा करतायत.
माझा एक मित्र एकीच्या प्रेमात पडला. त्याचा पत्रिकेवर खूप विश्वास. त्याने खटपटी लटपटी करून तिची पत्रिका मिळवली. दुर्दैवाने पत्रिका जुळेना. त्याने तिचा विचार मनातून काढून टाकला.
दोघांनी प्रेमविवाह ठरवला. आधी घरून विरोध. मग पत्रिका तरी बघू अशा तडजोडीपर्यंत गाडी आली, तर पत्रिका जुळेनात.
मग काहींनी सांगितलं, 'प्रेमविवाहात पत्रिका बघत नाहीत.'
कुणी म्हणे, 'मुलीला मंगळ आहे.'
कुणाचं म्हणणं, 'complementary गुण धरले तर पत्रिका जुळते.'
तर कुणी म्हणे, 'पत्रिका चांगल्या पायगुणाची आहे. लक्ष्मी येईल घरात.'
एकाने तर त्या मुलीला हात बघून भविष्य सांगितलं, 'हिचे एक लग्न ठरुन मोडेल.'
या सगळ्या गोंधळात त्यांनी परस्परांवर विश्वास ठेवून विवाहाचा निर्णय घेतला. दोघेही सुखरुप आहेत. संसारही सुखाचा आहे. आर्थिक परिस्थिती सर्वसाधारणच आहे, लक्ष्मीकृपा लांबच आहे.
याऊलट उत्तम गुण जुळलेल्या, नीट पाहून विवाह केलेल्या तीन जोडप्यांचे माझ्यासमोर घटस्फोट झालेले आहेत.
माझ्या कुंडलीत 'विवाहापासून सुख' हा योगच नसेल तर पत्रिका पाहून विवाह करण्यात काय हशील ? तरीही पत्रिकेला एवढं अवास्तव महत्त्व का ? पत्रिकेचं नक्की आयुष्यातलं स्थान काय आणि किती ?
ज्योतिषावर विश्वास ठेवून
ज्योतिषावर विश्वास ठेवून सगळीकडे दिंडोरा पिटणार्या गृहस्थांनी एकदा एका वधूपित्यास, त्याच्या मुलीची पत्रिकाच बदलून दिल्याचे, लगीन जमावे म्हणून अॅडजस्ट केल्याचे स्वहस्ते पाहिले तेव्हापासून या वायझेड धंद्यावरची श्रद्धा उडाली. त्याच्या आधीही लय काही होती असे नाही पण इंटर्नल कन्सिस्टन्सीही नाही हे पाहिल्यापासून तर सगळी ज्योतिषकार्यालये जमीनदोस्त करावीत अशी आसुरी इच्छा होते.
मला वाटतं की गिल्टी होणं ही
मला वाटतं की गिल्टी होणं ही एक आदिम प्रवृत्ती असावी आणि त्यामुळेच "आपल्याकडून आपण काही कमी केलं नाही" किंवा "आम्ही सगळी काळजी घेतली" ही भावना पूर्ण करणं हीसुद्धा त्यातून उगवलेली एक अनिवार गरज असावी.
त्यावरच बर्याच गोष्टी / व्यवसाय चालतात. चांगला मुहूर्त बघून शुभारंभ केला, शुभहस्ते आरंभ केला, चांगलं पूर्वाभिमुख घर घेतलं, वास्तुशास्त्रानुसार सिद्ध करुन घेतलं, पत्रिकेतले सर्व गुण म्याच करुन पाहिले, त्र्यंबकेश्वरास नारायण नागबळी केला, शांत केली, मुंज केली, वेदोक्त केले, शास्त्रोक्त केले, अंगारा केला, पुडी केली, करणी परतवली इ इ इ.. काही काही कमी ठेवलं नाही.
तरीही काही अप्रिय घडलं तर आपण (तरी) कुठे कमी पडलो (नाही) बुवा? असं म्हणायला या गोष्टींचा आधार होत असावा असा आपला एक अंदाज.
नाही.. तू म्हणतोयस ते बरोबरच
नाही.. तू म्हणतोयस ते बरोबरच आहे. इनफॅक्ट आपण "प्रयत्नांत" कुठे कमी पडलो नाही असे म्हणण्यामधे मानवी कक्षेबाहेरचे बरेच काही (करायला सोपे) ते सर्व अवास्तव महत्व देऊन केले जाते आणि किमान रॅशनल आणि थेट आवश्यक अश्या भौतिक खबरदार्या मात्र विसरल्या जातात. उदा. बांधकामाचा दर्जा तपासून घेणे, ओसी आहे का ते तपासणे, एरिया चेक करणे अशा बेसिक गोष्टी न करता पूर्वेकडे तोंड आणि भूमिपूजन, वास्तुशांत वगैरे आवर्जून.
माझ्या कुंडलीत 'विवाहापासून
माझ्या कुंडलीत 'विवाहापासून सुख' हा योगच नसेल तर पत्रिका पाहून विवाह करण्यात काय हशील ? तरीही पत्रिकेला एवढं अवास्तव महत्त्व का ? पत्रिकेचं नक्की आयुष्यातलं स्थान काय आणि किती ?
उडन खटोला,या साठी आपण यंदा कर्तव्य आहे? हे पुस्तक डाउनलोड करुन वाचू शकता.
माहीत नाही
मी स्वतःच्या लग्नात पत्रिका बघितली नाही किंवा दाखवली नाही. पण बहिणीचे लग्न ठरवताना बहुतेक वेळा पत्रिका मागत असत असा अनुभव आहे. मुलगी पसंत नाही असे स्पष्ट सांगायची हिंमत नसेल तर कदाचित पत्रिकेचे कारण पुरत असेल.