दि अल्टिमेट गिफ्ट
Self help या आजकालच्या तरुणांच्या जिव्हाळ्याच्या विषयावर लिहिलेल्या पुस्तकांच्या ढिगार्यातून खरोखरच एखादे तरी वाचनीय पुस्तक मिळू शकेल याबद्दल शंका असतानाच जिम स्टोव्हाल या लेखकाचे दि अल्टिमेट गिफ्ट हे पुस्तक हाती लागले. सोप्या व मोजक्या शब्दात आपली जडण घडण कशी असावी, आपली जीवनशैली कशी असावी, कुठल्या जीवनमूल्यांना अग्रक्रम द्यावीत, इत्यादी अनेक पैलूवर या पुस्तकात फार सुंदर मांडणी केलेली आहे. कुठलेही शब्दालंकार नाहीत, साहित्यिक टीका टिप्पणी नाही, संदर्भबंबाळपणा नाही, वस्तुपाठ म्हणून इतरांचा उल्लेख नाही. जे काही सांगायचे आहे ते कुठलाही आडपडदा न ठेवता सांगितल्यामुळे पुस्तक अत्यंत वाचनीय झाले आहे. हौवर्ड 'रेड' स्टिव्हेन्स या 80 वर्षाच्या वृद्ध श्रीमंताच्या मृत्युपत्राचा संदर्भ घेत जिम स्टोव्हाल यांनी तरुण पिढीला काही जीवनमूल्यांच्या संदर्भात सांगण्याचा प्रयत्न या पुस्तकातून केला आहे.
'रेड' स्टिव्हेन्स यानी स्वकष्टाने तेल व जनावरांच्या व्यापार व्यवहारातून गडगंज संपत्ती कमावली आहे. श्रम व पैशाची जाणीव असल्यामुळे तो त्याच्या आयुष्यभरात गरीबांसाठी, वंचितांसाठी त्याच्या ट्रस्टतर्फे ठिकठिकाणी काही उपक्रम राबवत होता. त्याच्या मृत्युनंतर त्यात खंड न पडता ते काम पुढे चालू रहावे या उद्देशाने हा कारभार त्याचा 23 वर्षाचा पुतण्या, जेसनच्या हाती सोपवण्याआधी तो या कामासाठी योग्य आहे की नाही याचा त्याला शोध घ्यावयाचा होता. मृत्युपूर्वी जे जमू शकले नाही ते आता मृत्युनंतर करण्यासाठी त्याने मृत्युपत्रात काही अटी घातल्या होत्या. मृत्युपत्राची अंमलबजावणीची जबाबदारी त्याच्या तरुणपणातील जिवलग मित्र व त्याच्या कंपनीतील एक भागिदार, हॅमिल्टनवर सोपवलेली होती.
स्टिव्हेन्सच्या मृत्युनंतर हॅमिल्टन यानी मृत्युपत्रात उल्लेख केलेल्या स्टिव्हेन्सच्या वारसदारांना बोलावून प्रत्येक वारसदारांना काय काय मिळणार आहे, याची कल्पना देतो. गंमत म्हणजे शेवटपर्यंत जेसनचा त्यात उल्लेख नसल्यामुळे अक्षरश: तो चिडतो. परंतु स्टिव्हेन्स यानी त्याच्यासाठी एक अल्टिमेट गिफ्ट राखून ठेवलेली असते. फक्त ते गिफ्ट मिळवण्यासाठी जेसनला काही अटी पूर्ण करावे लागेल असे हॅमिल्टन सांगतो. श्रीमंतीत वाढलेल्या जेसनला काकानी संपत्ती कशी वाढवली, काय काय कष्ट घेतले याची, इतर कुटुंबियाप्रमाणे, अजिबात कल्पना नव्हती. काकाचे पैसे उडविण्यातच आतापर्यंतचे त्याचे आयुष्य गेले होते. व काकाच्या मृत्युनंतर विनासायास फार मोठे घबाड मिळणार याचीसुद्धा त्याला खात्री होती. परंतु इतर कुटुंबियांपेक्षा 'रेड' स्टिव्हेन्सला जेसनवर जास्त प्रेम होते. जेसनला एक चांगले आयुष्य जगता यावे याचाही विचार 'रेड' स्टिव्हेन्स यानी केला होता. स्टिव्हेन्सला जेसनमध्ये काही 'स्पार्क' असण्याची शक्यता वाटल्यामुळे त्याच्याकडून भरपूर अपेक्षा होत्या. म्हणूनच मृत्युपत्रात अल्टिमेट गिफ्ट देण्यापूर्वी काही अटींची पूर्तता केली पाहिजे यावर 'रेड' स्टिव्हेन्सचा भर होता.
काकाच्या विक्षिप्तपणावर जेसन तडफडतो, चिडतो. परंतु हॅमिल्टनपुढे त्याचे काही चालत नाही. शेवटी वैतागून त्या अटी तरी काय आहेत हे ऐकण्यासाठी थांबतो. हॅमिल्टनची असिस्टंट, मिस हेस्टिंग्स एक बॉक्स घेऊन येते. त्यात 'रेड' स्टिव्हेन्स यांनी मृत्युपूर्वी रेकॉर्ड केलेले व्हिडिओ कॅसेट्स असतात. त्यातील क्रमांक एकची कॅसेट ती प्ले करते.
'रेड' स्टिव्हेन्स टीव्हीच्या पडद्यावरून रेकॉर्डेड संभाषणाद्वारे जेसनला उद्देशून पुढील 12 महिन्यात 12 कॅसेट्स दाखवल्या जात असून त्यात उल्लेख केल्याप्रमाणे जेसनला त्या अटी पूर्ण कराव्या लागतील, व त्या अटी पूर्ण केल्यानंतरच अल्टिमेट गिफ्टचा हकदार बनण्याची शक्यता आहे. असे सांगतो. हवे असल्यास जेसन केव्हाही यातून अंग काढून बाहेर पडू शकतो वा हॅमिल्टनला अटीची पूर्तता झाली नाही असे वाटत असल्यास जेसनला ती गिफ्ट मिळणार नाही, याची कल्पना देतो. जेसनचा सहभागी होण्यास होकार मिळाल्यानंतर मिस हेस्टिंग्स पुढील कॅसेट प्ले करते. त्यात श्रममूल्यासंबंधीच्या सूचना असतात. अशा प्रकारे इतर कॅसेट्समध्ये पैशाचे महत्व, मित्रत्वाचे नाते, ज्ञानाची आस, समस्यांना सामोरे जाणे, कुटुंबसौख्य, हास्य - विनोद यांचे योगदान, निरपेक्ष प्रेमाचे महत्व, वेळेचा सदुपयोग, इत्यादी गोष्टींचे महत्व कळून घेण्यासाठीच्या सूचना असतात. या गोष्टी जेसनला शिकविण्यासाठी त्याला वेगवेगळ्या ठिकाणी पाठविण्याची व्यवस्था 'रेड' स्टिव्हेन्स व हॅमिल्टन यांनी अगोदरच केलेली होती. प्रत्येक अटीच्या पूर्ततेसाठी एक महिन्याचा वेळ दिलेला असतो. महिन्याच्या शेवटी हॅमिल्टनला भेटून काय काय घडले, हे सांगायचे असते.
श्रमाचे मूल्य कळण्यासाठी जेसनला 'रेड' स्टिव्हेन्सचा मित्र, गस् काल्डवेलच्या रँचवर पाठवले जाते. स्वत:चे व इतरांचे सामान उचलण्यापासून रँचच्याभोवती एकट्यानेच खड्डे खणून कुंपण घालण्याचे त्या महिन्याभऱात करण्याचे काम त्याच्यावर सोपवलेले असते. पहिल्यां पहिल्यांदा काम करण्यास कुरबुर करणारा जेसन शेवटी शेवटी शारीरिक श्रमातून मिळणार्या आनंदाची मजा घेत परत येतो. या कामाचा मोबदला म्हणून गस् काल्डवेल त्याला 1500 डालर्स देतो. आयुष्यातील त्याची स्वश्रमाची ही पहिली कमाई असते. हॅमिल्टनला जेसनचे हे पहिले पाऊल योग्य दिशेने पडत आहे, असे वाटते.
'रेड' स्टिव्हेन्सच्या मते पैशामुळे जरी माणूस सुखी होत ऩसला तरी पैशाच्या अभावामुळेसुद्धा तो सुखी होत नाही. पैसा हे फक्त साधन असून त्याचा योग्य रीतीने उपयोग केल्यास आयुष्यात समाधान मिळण्याची शक्यता आहे. जेसन गुलछबू वृत्तीचा असल्यामुळे आतापर्यंतचे आयुष्य (काकाचा) पैसा पाण्यासारखे खर्च करण्यात घालविलेले होते. परंतु श्रमाचे मूल्य कळलेल्या आताच्या जेसनला पुढील महिन्याभरात 1500 डॉलर्सचा विनियोग कठिण परिस्थितीत असलेल्यांच्या स्थितीत बदल घडविण्यासाठी करण्याची अट घालतो व अशा परिस्थितीग्रस्तांचा शोध घेण्यासाठी जेसनला पाठविले जाते. जेसन या पैशाचा विनियोग स्काउट मुलांच्या शेवटच्या क्षणातील अडचणी सोडविण्यासाठी, एका कष्टकरी महिलेची कार जप्त होण्यापासून वाचवण्यासाठी, नोकरी नसल्यामुळे फूड कूपन्सवर गुजराण करत असलेल्या दंपतीच्या मुलांना साताक्लॉजच्या भेटवस्तू घेण्यासाठी आणि एका वृद्ध दांपत्याच्या औषधपाण्यासाठी खर्च करतो.
खर्या मैत्रीचे महत्व गस् काल्डवेल आणि 'रेड' स्टिव्हेन्स (व हॅमिल्टन) यांच्या मैत्रीच्या गोष्टी ऐकून त्याला कळते. वाटेत भेटलेल्या ब्राइन या तरुणाच्या सहवासातून निरपेक्ष मैत्रीची कल्पना त्याला येते. ज्ञान संपादनाची आस कशी असते याची कल्पना जेसनला दक्षिण अमेरिकेतील जंगलातील एका खेड्यात महिन्याभराच्या मुक्कामात असताना कळते. तेथे 'रेड' स्टिव्हेन्सच्या ट्रस्टच्या वतीने एक लायब्ररी चालविले जात असते. पुस्तकांसाठी, स्वत:च्य़ा ज्ञानात भर पडावे म्हणून तेथील गरीब खेडूत किती कष्ट घेतात याची त्याला तेव्हा लक्षात येते. आपण स्वत: कॉलेजच्या शिक्षण काळात किती असभ्यपणाने वागत होतो याची त्याला लाज वाटू लागते.
अशाच प्रकारे वेगवेगळे संदर्भ व प्रसंगातून चांगले आयुष्य जगण्यासाठी अनुभवांची शिदोरी कशी जमवावी लागते याच्या प्रात्यक्षिकांचे वर्णन या पुस्तकात आहे. कौटुंबिक सौख्य म्हणजे नेमके काय असू शकते याचा प्रत्यय एका निराधार बालकांच्या अनाथाश्रमात महिनाभर मुक्काम केल्यानंतर जेसनला येतो. आयुष्यातील आपलेच दु:ख फार मोठे आहे अशी समजूत करून घेतलेल्यानी अवती भोवती काय चालले आहे याचे निरीक्षण केल्यास आपले दु:ख म्हणजे काहीच नाही असे वाटू लागते. समस्यांच्या शोधात असलेल्या जेसनला सात वर्षाच्या मुलीसोबत आलेल्या एका तरुणीची भेट एका बागेत होते. मुलगी कॅन्सरग्रस्त रुग्ण. सर्व वैद्यकीय उपाय थकलेले. हॉस्पैसमध्ये शेवटचे क्षण मोजत असलेली. तरीसुद्धा त्या मुलीची इच्छा पूर्ण करण्यासाठी ही तरुणी धडपडत असते. त्या लहान मुलीला जेसनसुद्धा तिच्याप्रमाणे कॅन्सरग्रस्त रुग्ण आहे असे वाटून त्याचे समाधान करते. जेसनला हा एक नवीन अनुभव होता. कठिण परिस्थितीतसुद्धा विनोद माणसाला बळ देते याचा प्रत्यय डेव्हिड रीस याच्या भेटीत आला.
यातील प्रत्येक 'भेटवस्तू'च्या मागे असलेली गोष्ट वाचत असताना त्याचे महत्व कळू लागते. शेवटी जेसन, हौवर्ड 'रेड' स्टिव्हेन्सच्या सर्व अटींची पूर्तता करून 100 कोटी डॉलर्सची उलाढाल असलेल्या 'रेड' स्टिव्हेन्सच्या ट्रस्टचा कारभार सांभाळतो.
जेमतेम 150 पानाच्या या पुस्तकाचे लेखक, जिम स्टोव्हाल अंध असूनसुद्धा एकेकाळचे वेट लिफ्टिंग स्पर्धेतील ऑलिंपिक चॅंपियन होते. नरेटिव्ह टेलिव्हिजन नेटवर्क या कंपनीचे ते संचालक असून ही कंपनी अमेरिकेतील 130 लाख अंधव्यक्ती व त्यांचे कुटुंबीय यांच्यासाठी टीव्ही सिरियल्स व चित्रपटांची निर्मिती करत असते. नेटवर्कच्या शोमध्ये कॅथरिन हेपबर्न, जॅक लेमन, कॅरोल चॅनिंग, स्टीव्ह ऍलन, एड्डी अल्बर्ट इत्यादी अमेरिकन सेलिब्रीटीज भाग घेत असतात. जिम स्टोव्हाल यांनी अंधव्यक्ती व इतरांसाठी अनेक पुस्तकं लिहिली आहेत. दि अल्टिमेट गिफ्ट पुस्तकाच्या आशयावरून काढलेला चित्रपट व डीव्हीडीची निर्मिती केली आहे.
एक संग्राह्य पुस्तक!
समीक्षेचा विषय निवडा
मदत
एक सिक्रेट सांगतो, एका मित्राने आमचं मन जिंकलं आणि मजेत म्हणून हॉटेल शिवराज मध्ये चिकन सूप खायला घातले,आणि आमची जीभ बिघडली हो.
तेव्हापासून या प्रकारात चव नाहीच हे मनावर ठसले होते.
तरीही काहीतरी बरं असणारच असं वाटत होतं.
ह्या परिचयामुळे हे पुस्तक वाचावेसे वाटत आहे.
धन्यवाद.
प्रभाकर नानावटी साहेब....
प्रभाकर नानावटी साहेब....
केवळ श्रद्धाळू आणि धार्मिकांना झोडणारे लिखाण न करता आपण अशाप्रकारचे इतरही चांगले लिखाण करता हे पाहून खरोखरीच मनापासून आनंद झाला. पुस्तक परिचय आणि परिचय करुन देण्याची पद्धत मनापासून आवडली.
पुन्हा एकदा धन्यवाद ! पुस्तक वाचायच्या यादीत नोंदले आहे.
अवांतर : तुम्ही तुमच्या लेखावरील प्रतिसाद वाचता की नाही याची कल्पना नाही. (अनेक नट्या त्यांनी स्वतः कामे केलेले चित्रपट पाहत नाहीत असे सांगतात. खरे खोटे देव (पक्षी विज्ञान किंवा वैज्ञानिक) जाणे.