इतिहास

स्पेन महासत्ता का नाही ?

खफवर २० तारखेच्या आसपास ज्या गप्पा झाल्या, त्याबद्दल अधिक बोलण्यासाठी चिंजंनी धागा काढायला सांगितलं. तो हा धागा.
.

खफवरच्या माझ्या शंका --
शंका क्र१
भारतात समुद्री व्यापार- वसाहतीसाठी पोर्तुगीज डच इंग्रज फ्रेंच असे सगळे लोक आले (अगदि व्हेनिशिअन व्यापारीही येउन गेले चौलच्या युद्धाच्या वेळी.) पण मग स्पेन ह्या बर्‍यापैकी मजबूत मध्ययुगीन सत्तेला भारतात का येता अलं नाही ? ते येण्यात इंट्रेस्टेड नव्हते का ?
.
शंका क्र२
दक्षिण अमेरिकी देशच्या देश बेचिराख झाले; उजाड झाले म्हणे, युरोपिअन तिथे पोचल्यावर.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

आइशमन इन जेरुसलेम : सामान्यांचा दुष्टपणा


एडॉल्फ आइशमन/आईशमन (जर्मन) एस.एस.चा सदस्य होता. त्याचं काम होतं, ज्यू आणि समलैंगिक, जिप्सी लोकांच्या 'प्रवासा'ची तजवीज करायची. हा प्रवास म्हणजे त्यांच्या राहत्या शहर/गावांतून परदेशात हकालपट्टी किंवा कोणत्याशा यातनातळाकडे रवानगी. यातनातळात नक्की काय होत असे, ह्याच्याशी त्याच्या कामाचा संबंध नव्हता.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

भारतीय गणितातील संकल्पनांचा इतिहास

नुकतीच फेसबुकावर एक चर्चा झाली त्यात कोणीतरी एक लेख सादर केला होता - त्यात लेखकाने 'भारतात अतिशय पुरातन काळापासून कोटी, शंकू इतकंच काय तर १ वर ५० शून्य असलेल्या संख्येलाही नाव होतं. यावरून गणित किती पुढारलेलं होतं पाहा.' असं काहीसं म्हटलं होतं. संख्येला नाव आहे म्हणजे ती संख्या वापरात होती असं नाही; आणि मोठ्ठ्या संख्यांना नावं असणं म्हणजे गणिताची प्रगती असंही नाही.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

सोम (Somme) लढाईच्या शताब्दी निमित्ताने : पहिले महायुद्ध आणि मराठी साहित्य

शंभर वर्षांपूर्वी आजच्या दिवशी, जुलै १ १९१६, पहिल्या महायुद्धातील सोमच्या (Somme) लढाईला सुरवात झाली. ही लढाई म्हणजे मानवी इतिहासातील एक काळाकुट्ट दिवस आहे.

ही लढाई आपल्याला वाटते त्यापेक्षा फार जवळची आहे कारण त्यात कित्येक मराठी बोलणाऱ्या माणसांनी जीव गमावला आहे. १२ लाख भारतीय जवानांनी पहिल्या महायुद्धात भाग घेतला आणि त्यातील ७४,००० जणांनी प्राणांची आहुती दिली. (दुसर्या महायुद्धात ८७,०००; १९७१च्या युद्धात ३,९००; १९६२च्या ३,०००; १९६५च्या ५,३०० जवान शहीद झाले होते. सर्व आकडे विकिपेडिया वर आधारित.)

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

मायकेल हेर- 'डिसप्याचेस' आणि 'अपोकलिप्स नाउ' वाले- वारले

'डिसप्याचेस', १९७७ या व्हिएतनाम युद्धावरील प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक मायकेल हेर जुन २३ २०१६ ला वारले. 'अपोकलिप्स नाउ', १९७९ या अत्यन्त गाजलेल्या सिनेमाच्या जडणघडणीत सुद्धा त्यान्चा हात होता.

'डिसप्याचेस' मधील माझ्या अन्गावर आलेली काही वाक्ये:

“ I went to cover the war and the war covered me; an old story, unless of course you’ve never heard of it.”

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

गोव्यातील इन्क्विझिशन

’इन्क्विझिशन’ ही रोमन चर्चमधील एक संस्था कॅथलिक चर्चचे पावित्र्य अबाधित ठेवण्याच्या हेतूने ९व्या ग्रेगरी - पोप असण्याचा काल १२२७ ते १२४१ - ह्या पोपने सुरू केली. पाखंड शोधून त्याचा नाश करणे हा त्याचा हेतु होता. त्या काळामध्ये युरोपात बहुतेक सर्व देशांमध्ये कॅथलिक चर्चचेच आदेश पाळले जात. प्रत्येक राजाने आपापल्या सत्तेच्या भागात इन्क्विझिटर नावाचे खास अधिकारी नेमून चौकशी करून शिक्षा देण्याचे विशेष अधिकार त्यांना द्यावेत आणि त्यांच्यासाठी विशेष सोयी निर्माण कराव्यात असा पोपचा आदेश होत. तदनुसार ’होली रोमन एम्परर’ दुसरा फ़्रेडेरिक आणि फ्रान्सचा राजा ९वा लुई ह्यांनी इन्क्विझिटर्स नेमले आणि संशयित पाखंडी व्यक्तींना पकडून अमर्याद काळापर्यंत तुरुंगात डांबून, तसेच त्यांना शारीरिक यातना देऊन त्यांच्याकडून पाखंड कबूल करवून घेण्याची अमर्याद सत्ता अशा इन्क्विझिटर्स कोर्टांना बहाल केली. पाखंड सिद्ध झाल्यास मृत्युदंड द्यायचे अधिकारहि त्यांना होते आणि राजसत्ता त्यांच्या कारभारात कसलाहि हस्तक्षेप न करण्यास बांधलेली होती.

लवकरच इन्क्विझिटर्स कोर्टांची ’न भूतो न भविष्यति’ अशी दहशत सर्व युरोपात पसरली. कबुली मिळेपर्यंत संशयिताचा छळ करणे, सांगोवांगीवरून किंवा कोणाच्या तक्रारीवरून संशयिताला ताब्यात घेणे असे प्रकार फैलावले. कोणाच्या पाखंडाची माहिती असतांनाहि ती कोर्टापुढे न आणणे हाहि गुन्हा ठरला आणि त्यामुळे स्वत:च्या सुरक्षिततेच्या भीतीमधून दुसर्‍यावर आरोप करणे असले प्रकार बळावले आणि इन्क्विझिटर्स कोर्टांची सत्ता आणि दहशत अमर्याद झाली.

ज्यू धर्म हा येशूच्या मारेकर्‍यांचा धर्म म्हणून आणि मुस्लिम धर्म ख्रिश्चनांची पवित्र स्थाने ताब्यात ठेवणारा प्रतिस्पर्धी धर्म म्हणून इन्क्विझिशनचे विशेष लक्ष्य ठरले. तसेच ख्रिश्चन धर्मविरोधी वर्तन, समलिंगी आणि अनैसर्गिक प्रकारचे लैंगिक वर्तन, एकाहून अधिक बायका असणे अशी गुन्ह्यांची संख्या वाढू लागली.

पश्चिम युरोपात, विशेषत: स्पेनमध्ये, मूरिश अरबांची सत्ता सुमारे ४०० वर्षे टिकून होती. फ्रान्सच्या सीमेपर्यंत त्यांचा प्रसार झाला होता. चार्ल्स मार्टेलने ७३२ मध्ये तूरच्या लढाईत अरबांचा फ्रान्समधील प्रसार थोपवला होता पण सर्व स्पेन अरबांच्या कमीअधिक ताब्यात होते. कास्तिलची राणी इझाबेला आणि आरगॉनचा राजा फर्डिनंड ह्याच्या विवाहानंतर स्पेनमधील ख्रिश्चन पक्षातील दुफळी मिटून आधुनिक स्पेनचा उदय होण्यास सुरुवात झाली - १५व्या शतकाचा दुसरा अर्धभाग - आणि त्यांच्या सत्तेच्या काळात इन्क्विझिशनला आणखीनच बळ मिळाले. अरब सत्तेचा शेवट करायला प्रारम्भ तर त्यांनी केलाच पण त्या बरोबरच सर्व ज्यू- धर्मियांची आपल्या देशातून त्यांनी हकालपट्टी केली. त्यांच्या ह्या कॅथलिक निष्ठेमुळे Their Most Catholic Majesties असे स्वत:ला म्हणवून घ्यायची मुभा पोपने त्यांना दिली होती.

वर वर्णिलेल्या पाखंडाला आणखी एक जोड ज्यू हकालपट्टीबरोबर मिळाली. ती म्हणजे relapsed christians असण्याचा आरोप. पुष्कळ ज्यू लोकांनी देश सोडण्याऐवजी धर्म बदलून कॅथलिक होणे पसंत केले होते. असे बाटगे हे धर्माशी खरेखुरे एकनिष्ठ नाहीत अशी शंका उपस्थित करून ज्यू लोकांना relapsed christians म्हणून त्रास देण्याचा नवा प्रकार सुरू झाला. कोणी असा ख्रिश्चन डुकराचे मांस खात नाही अशी शंका घेऊन त्याच्याविरुद्ध कारवाई करण्याची प्रथा पडली. (Goya's Ghosts नावाचा चित्रपट यूट्यूबर उपलब्ध आहे. गोया ह्या प्रख्यात स्पॅनिश चित्रकाराची मैत्रीण इनेस ही डुकराचे मांस खात नाही ह्या आरोपावरून इन्क्विझिशनने तिल्या ताब्यात घेतले. दरबारामध्ये आणि चर्चमध्ये असलेले आपले वजन वापरून तिची सुटका घडवण्याचे गोयाचे प्रयत्न हा ह्या चित्रपटाचा विषय आहे.

इन्क्विझिशनचे काम मोठ्या गंभीरपणे चालत असे. आरोपींची शारीरिक छळ, बनावट साक्षी असे सर्व मार्ग वापरून चौकशी झाल्यावर काही सुदैवी सुटून बाहेर येत पण गुन्हा सिद्ध झालेल्यांना मालमत्ता जप्तीपासून जळून मारण्यापर्यंत अनेक शिक्षा होऊ शकत. वर्षामधून एक किंवा दोन वेळा अशा शिक्षांची सार्वजनिक अमलबजावणी होत असे. माद्रिद शहरामध्ये Plaza Mayor हा शहरातील प्रमुख चौक ही तेथील इन्क्विझिशनची जागा आजचे महत्त्वाचे टूरिस्ट डेस्टिनेशन झाले आहे. गावातील प्रमुख चौकामध्ये चारी बाजूंनी प्रेक्षकांची बसायची सोय करून उच्चासनावर इन्क्विझिटर न्यायालय बसत असे आणि दंडित आरोपी तेथे समारंभाने आणले जात. त्यांच्या शिक्षा येथे त्यांना वाचून दाखवल्या जात पण आपापल्या शिक्षा दुर्दैवी दंडितांना आधीच ठाऊक असत कारण शिक्षेच्या वेळी त्यांनी वापरायचे कपडे त्या त्या शिक्षेनुसार ठरलेले असत. जाळून मारण्याची - burning at stake - san benito नावाची पिवळी उंच निमुळती टोपी घातलेली असे आणि त्यांच्या अंगावरच्या पिवळ्या लांब कपड्यावर क्रूस, विस्तवाच्या ज्वाला आणि सैतानाच्या दूतांच्या चित्रांनी वेढलेले त्याचे स्वत:चे चित्र असे. हाच वेष पण क्रूसाशिवाय असा वेष केलेले म्हणजे गुन्हा सिद्ध झालेले आणि तरीहि माफी मिळालेले. स्वत:च्याच कपड्यात आलेले म्हणजे दंड भरून सुटका करण्यायोग्य गुन्हेगार अशा त्यांच्या दर्जाप्रमाणे शिक्षा असत. शिक्षा वाचून दाखविल्यानंतर धार्मिक अधिकारी दंडिताचा आत्मा जीजसच्या काळजीवर सोपवला आहे असे जाहीर करून दंडितांना राजाच्या हवाली करत आणि राजाचे यमदूत तेथेच आधी उभ्या केलेल्या शेकोट्यांवर दंडितांना बांधून जागीच शिक्षेची अंमलबजावणी करत असत. अशा ह्या मोठया नाटकी आणि गंभीर देखाव्याला auto da fe - act of faith असे नाव होते. (किंचित् अवान्तर. औरंगजेबाने संभाजीराजाला हालहाल करून ठार मारण्याची शिक्षा सुनावली. तेव्हाचे जे वर्णन आहे त्यामध्ये उंटावर बसवून आणि दोक्यावर विदूषकाची उंच टोपी घालून त्यांची मुघल छावणीभर मिरवणूक काढण्यात आली असे वाचले आहे. तशीच ही उंच टोपी दिसते.)

पोर्च्युगाल आणि स्पेनने अशिया-अमेरिकेमध्ये पाय पसरायला सुरुवात केल्यावर इन्क्विझिशन राजसत्तेपाठोपाठ ह्या नव्या प्रदेशांमध्येहि पोहोचले

नव्याने ताब्यात आलेल्या मेक्सिकोमध्ये असे auto da fe होत असत. मेक्सिको शहरातील नॅशनल पॅलेसमध्ये दिएगो गार्सिया ह्या प्रख्यात म्यूरलिस्टने रंगविलेली आणि मेक्सिकोचा सर्व इतिहास चित्ररूपाने दाखविणारी एक म्यूरल चित्रांची मालिका उंच जिन्याच्या दोहो बाजूस रंगविलेली आहेत. त्यातील auto da fe चे चित्र येथे खाली पहा. उंच टोपीतील दंडित आगीत जळण्याची वाट पाहात तेथे दिसतात.

Inquisition in Mexico

असेच इन्क्विझिशन गोव्यातहि येऊन पोहोचले आणि जुन्या गोव्यात आदिलशहाच्या पूर्वकालीन वाड्यामध्ये त्याची जागा होती. डेलॉन - M Dellon - नावाचा एक फ्रेंच डॉक्टर दमणमध्ये असतांना इन्क्विझिशनमध्ये सापडला. पवित्र कुमारी मेरीच्या चित्राला त्याने पुरेसा आदर दाखविला नाही अशा आरोपावरून त्याला ताब्यात घेण्यात आले. दमणमधील एका ख्रिश्चन बाईबरोबर त्याचे मैत्रीचे संबंध स्थापन होत होते ते दुसर्‍या एका प्रतिष्ठिताला आवडले नाही आणि त्याने डेलॉनला खोट्या आरोपात गोवले होते. आधी दमणमध्ये काही दिवस आणि नंतर सुमारे दोन वर्षे गोव्यामध्ये इन्क्विझिशनच्या कैदेत कष्टात काढल्यानंतर मोठ्या मुष्किलीने त्याची सुटका झाली आणि मोझांबिक-ब्राझील-पोर्च्युगालमार्गे तो अखेर मायदेशी म्हणजे फ्रान्सला पोहोचला. तेथे आपल्या गोव्यातील अनुभवावर एक पुस्तक लिहून १६८० साली प्रसिद्ध केले. ते आता भाषान्तररूपात उपलब्ध आहे. अनंत काकबा प्रियोळकरांनी गोवा इन्क्विझिशनच्या विषयावर जे पुस्तक लिहिले आहे त्यात डेलॉनचे अनेक संदर्भ मिळतात असे वाटते. (प्रियोळकरांचे पुस्तक मी पाहिलेले नाही.)

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

जे.रॉबर्ट ओपेनहाइमर, अ‍ॅटम बॉंब आणि भगवद्गीता.

जे.रॉबर्ट ओपेनहाइमर ह्या पदार्थविज्ञानशास्त्राच्या प्रख्यात प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली न्यू मेक्सिको राज्यातील लॉस अलामोस येथील ’मॅनहॅटन प्रॉजेक्ट’मध्ये पहिला अ‍ॅटम बॉंब बनविण्यात येऊन न्यू मेक्सिकोमधीलच अलामोगोर्डो-स्थित ट्रिनिटी चाचणी केन्द्रामध्ये त्याची यशस्वी चाचणी १६ जुलै १९४५ ह्या दिवशी करण्यात आली. ह्या पहिल्या बॉंबबरोबरच Little Boy आणि Fat Man अशी सांकेतिक नावे दिलेले दोन बॉंब बनविण्यात आले होते. पैकी Little Boy चा स्फोट हिरोशिमा शहरावर ६ ऑगस्ट १९४५ ह्या दिवशी टाकण्यात आला. त्यानंतर तीन दिवसांनी ९ ऑगस्टला Fat Man नागासाकी शहरावर टाकण्यात आला. दोन्ही स्फोटांमध्ये अपरिमित हानि झाली. परिणामत: शरणागति पत्करण्याशिवाय जपानजवळ अन्य मार्ग उरला नाही आणि दुसरे महायुद्ध अखेर संपले. हा इतिहास आपणा सर्वांच्या परिचयाचा आहे.

चाचणीच्या वेळी जी प्रचंड ऊर्जा निर्माण झाली आणि सहस्र सूर्यांचे तेज प्रकट झाले (दिवि सूर्यसहस्रस्य भवेद्युगपदुत्थिता। यदि भा: सदृशी सा स्याद्भासस्तस्य महात्मन:॥ गीता ११.१२) ती पाहताच ओपेनहाइमर ह्यांना डोळ्यासमोर उभे राहिले ते म्हणजे गीतेतील कृष्णाने अर्जुनाला दिलेला उपदेश, दाखविलेले विश्वरूपदर्शनाचे चित्र आणि कृष्णाचे शब्द - Now I have become Death, the Destroyer of worlds. (कालोऽस्मि लोकक्षयकृत्प्रवृद्ध: लोकान्समाहर्तुमिह प्रवृत्त: - गीता ११.३२) (ओपेनहाइमर ह्यांच्या स्वत:च्या शब्दांमध्ये हे वर्णन येथे पहा.)

असे विनाशकारी शस्त्र बनविण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतांना त्यांची मन:स्थिति कशी होती, त्यांच्या मनामध्ये कोणते द्वन्द्व चालू होते आणि भगवद्गीतेने त्यातून त्यांना मार्ग कसा दाखविला हे पुढील लेखनामधून दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.

’मॅनहॅटन प्रॉजेक्ट’चे प्रमुख शास्त्रीय मार्गदर्शक (Scientific Director) असलेल्या ओपेनहाइमर ह्यांना ह्या प्रयत्नाला यश मिळायला हवे होतेच पण त्याचबरोबरच त्यांच्या मनामध्ये दोन परस्परविरोधी विचार उभे रहात होते. प्रमुख शास्त्रज्ञ म्हणून अंगीकृत प्रयत्न अयशस्वी ठरू नये अशी त्यांची साहजिक इच्छा होतीच पण त्या प्रयत्नाच्या यशामधून पुढे जी परिस्थिति निर्माण होईल तिच्या उत्तरदायित्वाचीहि भीति त्यांना वाटत होती. ह्या प्रयत्नाच्या यशातून मानवाच्या हातामध्ये पूर्ण मानवजातीच्या संहाराचे साधन आपण सोपवत आहोत असे त्यांना वाटत होते. चालू युद्ध संपले तरी त्यानंतरहि अणुशक्तीचा वापर संहारक कार्यासाठी करण्याचे प्रयत्न चालूच राहतील आणि त्यांना वाढते यश मिळत जाईल ही भीति त्यांना अस्वस्थ करीत होती.

त्यांचे पूर्वायुष्य ’मॅनहॅटन प्रॉजेक्ट’मध्ये प्रमुख शास्त्रज्ञ ह्या त्यांच्या उत्तरायुष्याच्या उलट वाटावे असे होते. त्यांचा जन्म एका सधन ज्यू घरामध्ये १९०४ साली झाला. त्यांचे वडील ज्यूलिअस ओपेनहाइमर आणि आई एला हे वंशाने ज्यू असले तरी यहुदी धर्माचे कट्टर पुरस्कर्ते नव्हते. त्याऐवजी फेलिक्स अ‍ॅडलर ह्यांच्या Society for Ethical Culture ह्या धर्मतत्त्वांपेक्षा मानवी मूल्यांवर आणि परस्परकल्याणावर भर देणार्‍या चळवळीशी ते दोघेहि संबंधित होते आणि त्यामुळे त्या चळवळीच्या शाळेमध्ये जे.रॉबर्ट ओपेनहाइमर ह्यांचे शालेय शिक्षण झाले आणि त्या शिकवणुकीचे बाळकडू त्यांना शालेय काळामध्ये मिळाले. नंतर हार्वर्ड विद्यापीठात शिक्षण घेत असतांना इंग्रजी भाषान्तरांमधून वाचनात आलेल्या हिंदु विचारांचा मागोवा घेण्यामध्येहि त्यांना रुचि निर्माण झाली.

गॉटिंगेन विद्यापीठामधून पदार्थविज्ञानशास्त्रामध्ये डॉक्टरेट मिळवून परतल्यावर कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कली आणि कॅल्टेक येथे १९२९ साली पदार्थविज्ञानशास्त्र विभागात शिक्षकाचे काम त्यांना मिळाले. तेथेच त्यांनी अनेक शोधनिबंध लिहिले आणि पहिल्या रांगेतील शास्त्रज्ञ अशी त्यांची ख्याति होऊ लागली. पुढे १९३६ साली त्याच विद्यापीठांमध्ये प्राध्यापकाचे स्थानहि त्यांना मिळाले. ह्याच वेळेत बर्कलीमध्ये आर्थर रायडर हे संस्कृत भाषेचे एक गाजलेले विद्वान पौर्वात्यविद्या विभागामध्ये प्राध्यापक होते. त्यांच्याशी परिचय होऊन ओपेनहाइमर ह्यांनी आपल्या विस्तृत विचारविश्वाचा भाग म्हणून रायडर ह्यांच्या मार्गदर्शनाखाली मूळ संस्कृतमधून गीता वाचली आणि ह्या वाचनाचा त्यांच्या मनावर मोठा परिणाम झाला. अन्य संस्कृत वाङ्मयहि त्यांनी वाचले असे दिसते कारण नंतर पुढे १९६३ साली Christian Century ह्या मासिकाला मुलाखत देतांना गीता आणि भर्तृहरीची शतकत्रयी ह्या दोन पुस्तकांचा आपल्या मनावर सखोल परिणाम झाला आहे असे त्यांनीच सांगितले होते आणि आपल्यावर सर्वाधिक परिणाम करणार्‍या दहा पुस्तकांमध्ये त्या दोन पुस्तकांना त्यांनी पहिले आणि दुसरे स्थान दिले होते. त्याच मुलाखतीमध्ये गीता आणि शतकत्रयीबरोबरच त्यानी टी.एस. ईलियट ह्यांच्या The Waste Land ह्या दीर्घ कवितेचा उल्लेख केला होता आणि ही कविताहि भारतीय उपनिषदांचे ऋण मानते. तिची अखेर ’दत्त दयध्वं दम्यत’ आणि ’शान्ति: शान्ति: शान्ति:’ ह्या औपनिषदिक शब्दांनी झाली आहे. ओपेनहाइमर ह्यांच्या कार्यालयात जवळच सहज हाती येईल अशा पद्धतीने गीतेचे पुस्तक दिसे असे त्यांच्या परिचितांनी नोंदवले आहे. ह्या सर्वावरून असे दिसते की ओपेनहाइमर ह्यांच्या विचारांच्या जडणघडणीमध्ये भारतीय तत्त्वज्ञान आणि विशेषत: गीतेची शिकवण ह्यांचा मोठा प्रभाव होता.

१९२५ साली केंब्रिजमध्ये शिकत असतांना युद्धविरोधी Pacifist चळवळीच्या सभांमध्ये त्यांची उपस्थिति असे. मॅनहॅटन प्रॉजेक्टच्या यशस्वी कार्यानंतर आणि हिरोशिमा आणि नागासाकी स्फोटांनंतर अणुशस्त्रे आणि अणुयुद्ध ह्या दोन्हींच्या विरोधकांमध्ये ते प्रमुख होते. त्यांची ही विरोधातील भूमिका माहीत असल्यानेच नंतरच्या काळात १९५४ साली Atomic Energy Commission समोर त्यांना चौकशीला तोंड द्यावे लागले आणि चौकशीचा परिणाम म्हणजे त्यांची गुप्तता पातळी - Security Clearance - काढून घेण्यात येऊन गोपनीय कार्यांमध्ये त्यांना भाग घेता येणार नाही असा निर्णय झाला. अशा रीतीने स्वभावत: शान्तिप्रेमी आणि अणुशस्त्रविरोधी अशी ही व्यक्ति बॉंबनिर्मितीच्या कामामध्ये महत्त्वाची भूमिका निभावू शकली हा मोठाच परस्परविरोध आहे. ह्या विरोधातून मार्ग काढतांना ओपेनहाइमर ह्यांना गीतेचे मार्गदर्शन कसे मिळाले असेल?

कुरुक्षेत्रावर युद्धाला प्रारंभ होण्यापूर्वी कृष्णाने अर्जुनाचा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये उभा केला. आपल्या विरोधात आपलेच पितामह, गुरु, बंधु आणि अन्य आप्त उभे आहेत हे पाहिल्यावर युद्ध करण्याची अर्जुनाची इच्छा नष्ट होऊन त्याची जागा नैराश्याने, क्लैब्याने आणि वैराग्याने घेतली. तो म्हणाला:

दृष्ट्वेमं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थितम् ॥ १-२८॥
सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति ।
वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते ॥ १-२९॥
गाण्डीवं स्रंसते हस्तात्त्वक्चैव परिदह्यते ।
न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः ॥ १-३०॥
निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव ।
न च श्रेयोऽनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे ॥ १-३१॥
न काङ्क्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च ।
किं नो राज्येन गोविन्द किं भोगैर्जीवितेन वा ॥ १-३२॥
येषामर्थे काङ्क्षितं नो राज्यं भोगाः सुखानि च ।
त इमेऽवस्थिता युद्धे प्राणांस्त्यक्त्वा धनानि च ॥ १-३३॥
आचार्याः पितरः पुत्रास्तथैव च पितामह: ।
मातुलाः श्वशुराः पौत्राः श्यालाः सम्बन्धिनस्तथा ॥ १-३४॥
एतान्न हन्तुमिच्छामि घ्नतोऽपि मधुसूदन ।
अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतोः किं नु महीकृते ॥ १-३५॥
निहत्य धार्तराष्ट्रान्नः का प्रीतिः स्याज्जनार्दन ।
पापमेवाश्रयेदस्मान् हत्वैतानाततायिनः ॥ १-३६॥
तस्मान्नार्हा वयं हन्तुं धार्तराष्ट्रान्स्वबान्धवान् ।
स्वजनं हि कथं हत्वा सुखिनः स्याम माधव ॥ १-३७॥

असे निराशेचे उद्गार काढून धनुष्यबाण टाकून देऊन दु:खी अर्जुनाने रथातच बसकण मारली.

एवमुक्त्वार्जुनः सङ्ख्ये रथोपस्थ उपाविशत् ।
विसृज्य सशरं चापं शोकसंविग्नमानसः ॥ १-४७॥

त्याची ही शोकमग्न आणि भ्रान्त वृत्ति पाहून कृष्णाने त्याला केलेला उपदेश आणि त्याच्या संशयाचे निराकरण थोडक्या शब्दांमध्ये असे. हा उपदेश देतांना कृष्ण कर्तव्य, नियति आणि श्रद्धा ह्या तीन गोष्टींचे विवरण करतो.

१) कर्तव्य - ’क्षत्रियत्व’ हा तुझा धर्म आहे आणि हा धर्म तुला समाजस्थितीमधून मिळालेला आहे. तस्मात् युद्ध करणे हे तुझे कर्तव्य आहे.

स्वधर्ममपि चावेक्ष्य न विकम्पितुमर्हसि ।
धर्म्याद्धि युद्धाच्छ्रेयोऽन्यत्क्षत्रियस्य न विद्यते ॥ २-३१॥
यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृतम् ।
सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम् ॥ २-३२॥
अथ चेत्त्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि ।
ततः स्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापमवाप्स्यसि ॥ २-३३॥
श्रेयान्स्वधर्मो विगुणः परधर्मात्स्वनुष्ठितात् ।
स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः ॥ ३-३५॥
श्रेयान्स्वधर्मो विगुणः परधर्मात्स्वनुष्ठितात् ।
स्वभावनियतं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम् ॥ १८-४७॥
सहजं कर्म कौन्तेय सदोषमपि न त्यजेत् ।
सर्वारम्भा हि दोषेण धूमेनाग्निरिवावृताः ॥ १८-४८॥

२) कर्तव्यावर पूर्ण विश्वास - एकदा नियत कर्तव्य ठरले की त्याच्या प्राप्तीसाठी नि:शंक मनाने कार्य करावे, तसे करतांना काही पापकृत्य घडले तरी त्यातून पापाचा दोष लागत नाही असे गीता सांगते.

अपि चेदसि सर्वेभ्य: पापेभ्य: पापकृत्तम:।
सर्वं ज्ञानप्लवेनैव वृजिनं सन्तरिष्यसि॥ ४.३६॥
अपि चेत्सुदुराचारो भजते मामनन्यभाक्।
साधुरेव स मन्तव्य: सम्यग्व्यवसितो हि स:॥ ९.३०॥
सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज।
अहं त्वां सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच;॥ १८.६६॥

३) नियति - युद्धामध्ये आपल्या विरोधकांची आपल्या हातून हत्या झाली तर तो दोष आपल्याला लागेल ह्या अर्जुनाच्या भीतीचे निराकरण करण्यासाठी कृष्ण त्याला सांगतो की प्रत्येकाचे - तुझे आणि तुझ्या प्रतिपक्षाचे - भविष्य ठरलेले आहे. मारणारा तू नाहीस, मीच आहे. त्यांचे मरण जर यायचे असेल तर ते तुझ्यामुळे येणार आहे हा तुझा भ्रम आहे. त्यांच्या अटल मृत्यूचे तू केवळ निमित्त असशील.

कालोऽस्मि लोकक्षयकृत्प्रवृद्धो लोकान्समाहर्तुमिह प्रवृत्तः ।
ऋतेऽपि त्वां न भविष्यन्ति सर्वे येऽवस्थिताः प्रत्यनीकेषु योधाः ॥ ११-३२॥
तस्मात्त्वमुत्तिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रून् भुङ्क्ष्व राज्यं समृद्धम् ।
मयैवैते निहताः पूर्वमेव निमित्तमात्रं भव सव्यसाचिन् ॥ ११-३३॥

इतकेच नाही तर दोन्ही बाजूचे योद्धे आधीच आपल्या विनाशाच्या मार्गावर निघालेले आहेत हेहि अर्जुनाला दाखविले जाते कारण अर्जुन म्हणतो:

अमी च त्वां धृतराष्ट्रस्य पुत्राः सर्वे सहैवावनिपालसङ्घैः ।
भीष्मो द्रोणः सूतपुत्रस्तथासौ सहास्मदीयैरपि योधमुख्यैः ॥ ११-२६॥
वक्त्राणि ते त्वरमाणा विशन्ति दंष्ट्राकरालानि भयानकानि ।
केचिद्विलग्ना दशनान्तरेषु सन्दृश्यन्ते चूर्णितैरुत्तमाङ्गैः ॥ ११-२७॥

जो संहार व्हायचा आहे तो अगोदरच निश्चित आहे, तो तुझ्या कर्माचे फल नाही म्हणून तुझे नियत कर्म तू करत राहिले पाहिजेस आणि फलाविषयी चिन्तित राहू नकोस हे कृष्ण अर्जुनाला पुन:पुन: बजावतो.

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।
मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि ॥ २-४७॥
त्यक्त्वा कर्मफलासङ्गं नित्यतृप्तो निराश्रयः ।
कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किञ्चित्करोति सः ॥ ४-२०॥
युक्तः कर्मफलं त्यक्त्वा शान्तिमाप्नोति नैष्ठिकीम् ।
अयुक्तः कामकारेण फले सक्तो निबध्यते ॥ ५-१२॥

कर्मफल कसे असेल, ते कसे मिळेल वा मिळणार नाही अशा चिन्ता व्यर्थ आहेत हा संदेश भर्तृहरीनेहि नीतिशतकामधून पुढील श्लोकाद्वारे दिला आहे. तो म्हणतो:

मज्जत्वम्भसि यातु मेरुशिखरं शत्रूञ्जयत्वाहवे
वाणिज्यं कृषिसेवनादिसकला विद्याः कलाः शिक्षतु |
आकाशं विपुलं प्रयातु खगवत्कृत्वा प्रयत्नं परम्
नाभाव्यं भवतीह कर्मवशतो भाव्यस्य नाशः कुतः ॥ ४८॥

(मनुष्याने पाण्यामध्ये बुडी मारली, मेरुपर्वतावर आरोहण केले, युद्धामध्ये शत्रूंना जिंकले, वाणिज्य, कृषि, सेवाभाव अशा नाना विद्या आणि कला आत्मसात् केल्या, मोठा प्रयत्न करून आकाशामध्ये उड्डाण केले. असे काहीही केले तरी कर्मवशतेमुळे जे न होणारे आहे ते होणार नाही आणि जे होणारे आहे ते टळणार नाही. यदभावि न तद्भावि भावि चेन्न तदन्यथा!)

मनुष्याच्या हातून केल्या जाणार्‍या कार्याच्या फलावर जर त्याचा कसलाच ताबा नसेल आणि त्याच्या कार्याचा परिपाक आधीच ठरलेला असेल तर त्याने निहित कार्याकडे तटस्थतेने आणि संन्यस्त दृष्टीने पाहावे अशी गीतेची शिकवण आहे.

सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ ।
ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि ॥ २-३८॥
काम्यानां कर्मणां न्यासं संन्यासं कवयो विदुः ।
सर्वकर्मफलत्यागं प्राहुस्त्यागं विचक्षणाः ॥ १८-२॥

एकीकडे शास्त्रज्ञ म्हणून पार पाडायचे कर्तव्य आणि दुसरीकडे हे कर्तव्य पार पाडले तर त्यातून निर्माण होणार्‍या भावी घटनांची आणि संहाराची भीति ह्या अन्तर्द्वन्दामधून गीतेची ही तीनपेडी शिकवण ओपेनहाइमरना मार्गदर्शक ठरते. शालेय जीवनामध्ये फेलिक्स अ‍ॅडलर ह्यांच्या Society for Ethical Culture ह्या धर्मतत्त्वांऐवजी मानवी मूल्यांवर आणि परस्परकल्याणावर भर देणार्‍या चळवळीचे संस्कार त्यांच्यावर झाले होते. त्या संस्कारांच्या पूर्णपणे विरुद्ध अशा अणुशस्त्रासारख्या गोष्टीची निर्मिति हे शास्त्रज्ञ म्हणून त्यांचे कर्तव्य ठरले होते. हे कर्तव्य शान्तिप्रियतेच्या त्यांच्या श्रद्धांनाहि छेद देणारे होते. येथे गीतेने त्यांना सांगितले की तुझे शास्त्रज्ञ म्हणून नियत कर्तव्य अणुशस्त्रनिर्मिति हेच आहे. त्या अणुशस्त्रांचा पुढे कसा सदुपयोग वा दुरुपयोग होईल हे ठरविण्याचे कर्तव्य हे तुझ्या शासकीय वरिष्ठांचे आणि राजकारणी पुरुषांचे आहे, त्या क्षेत्रामध्ये तुझा काही अधिकार नाही. तेव्हा त्याचा विचार न करता तू तुझे नियत कर्तव्य निर्मम बुद्धीने करावेस. त्याच्या परिणामांची चिन्ता करण्याचे तुला कारण नाही.

गीतेची शिकवणूक अशा पद्धतीने कामी आणून आपले शास्त्रज्ञाचे नियत कर्तव्य पार पाडल्यानंतर ओपेनहाइमर ह्यांचा अणुशस्त्रविरोध पुन: डोके वर काढू लागला. त्यांच्या मित्रांच्या सांगण्यावरून असे दिसते की अणुशस्त्रनिर्मितीमधील सहभागामुळे नंतरच्या वर्षांत त्यांना खंत वाटू लागली होती. हायड्रोजन बॉंबनिर्मितीच्या विषयामध्ये त्यांचे मत विचारले गेले असता त्यांनी आपल्या चिंतेला उघड वाच्यता दिली.

शास्त्रज्ञ ओपेनहाइमर गीतेचे मार्गदर्शन घेऊन बॉंब बनविण्याच्या कार्यात मग्न असतांना हार्वर्ड विद्यापीठाचा एक अन्य स्नातक, टी.एस. ईलियट, गीतेचेच शब्द वापरून लिहीत होता:

And do not think of the fruit of action.
Fare forward.
...
...
So Krishna, as when he admonished Arjuna
On the field of battle.
Not fare well,
But fare forward, voyagers.

(Four Quartets, Quartet No. 3, The Dry Salvages.)

('The Gita of J. Robert Openheimer' by James A. Hijiya ह्या निबंधावर आधारित.)

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

शिवराज्याचा राज्यव्यवहारकोश - भाग १.

कित्येक शतके लुप्त झालेला प्राचीन हिंदु पद्धतीमधील राज्याभिषेक समारंभ शिवाजीमहाराजांनी पुनरुज्जीवित केला आणि परकीय मूळ असलेल्या राजकीय वर्चस्वाला आह्वान दिले. सांस्कृतिक पातळीवर असेच करण्यासाठी परक्या शासकांबरोबर आलेल्या फारसी-उर्दू भाषांचे मराठीवरील आक्रमण थांबवून पुन: ह्या देशातील मूळच्या अशा मराठी भाषेला राज्यकारभारात योग्य स्थान देण्याचे त्यांनी ठरविले.

राज्याभिषेककालापर्यंत खरोखरच येथील जनतेची स्वत:ची मराठी भाषा फारसी-उर्दूच्या आक्रमणाखाली गुदमरून गेल्यासारखी दिसत होती. १४व्या शतकाच्या प्रारंभाला देवगिरीचे यादवांचे राज्य नष्ट झाले आणि खिलजी सल्तनतीचे अंमल सुरू झाला. शासक आपली भाषाहि आपल्याबरोबर आणतो ह्या नियमास धरून फरसी-अरबी शब्दांचे मराठीवरील आक्रमण तेव्हापासून सुरू झाले. १७व्या शतकापर्यंत प्रामुख्याने गद्य लेखनामध्ये हे आक्रमण जाणवण्या-खुपण्याइतपत वाढले होते. पद्य लेखनामध्ये ते त्यामानाने कमी दृग्गोचर होते कारण तत्कालीन पद्यलेखन हे सर्व धार्मिक-आध्यात्मिक स्वरूपाचे असल्याने त्याची परंपरा ही प्राचीन भारतीय दर्शने, पुराणे आणि रामायण-महाभारतासारख्या काव्यामधून आलेली होती. गद्य लेखन हे सरकारी कामकाज, महसूल गोळा करणे अशा हेतूने होत असल्याने शासकांच्या भाषेचा प्रभाव तेथे अधिक लक्षात येण्याजोगा होता. हा परकीय प्रभाव पुढील दोन उतार्‍यांच्या तुलनेतून स्पष्ट दिसतो. पहिला उतारा महानुभावांच्या ’लीळाचरित्र’ ह्या ग्रन्थातून घेतला आहे. ह्याचा काल १३व्या शतकाचा मध्य.

Lilacharitra
Lilacaritra

दुसरा उतारा इ.स. १७०० च्या पुढेमागे परशुरामपंत प्रतिनिधीने गोव्याच्या ’विजरई’ ला -Viceroy - पाठविलेल्या एका पत्रामधून घेतला आहे. पत्रामध्ये गोवेकरांच्या एका वर्तणुकीबद्दल नापसंती दर्शविली आहे. उतार्‍यातील वाक्यरचना आणि विभक्तिप्रत्यय वगळता येथे मराठी अभावानेच दिसते आहे.

Farsi

ही परिस्थिति बदलण्यासाठी आणि मराठीला तिचे नैसर्गिक स्वरूप मिळवून देण्यासाठी आणि राज्यकारभारातील फारसीचा अतोनात प्रसार ताब्यात आणण्याच्या दृष्टीने पाऊल म्हणून शिवाजीराजांनी आपला दक्षिण प्रान्तातील अधिकारी आणि तंजावरनिवासी रघुनाथ नारायण हणमंते ह्यांना फारसीच्या जागी देशी शब्द सुचविणारा ’राज्यव्यवहारकोश’ रचण्यास सांगितले. लगोलग कामाला लागून रघुनाथपंतांनी असा कोश रचून तो राजापुढे १६७८ च्या सुमारास सादर केला . ह्या साठी संस्कृत भाषेचा आधार घेण्यात आला आणि फारसी शब्दांच्या जागी समानार्थी संस्कृत शब्द सुचविण्यात आले.

१७व्या शतकात राजाचे कुटुंब, राज्यकारभार कसा चालत असे, राजसभेमध्ये शिष्टाचार कसा असे, राज्यातील शासकीय आणि सैनिकी अधिकारी कोण होते येथेपासून सुरुवात करून वापरातील शस्त्रे, अंगावरचे दागिने, राज्याचा अर्थव्यवहार, महसूल आकारणी, नाणी, व्यापार-उदीम, कापडचोपड आणि कपडे, मादक पेये, धूम्रपान, तांबूलद्रव्ये, सुगंधी तेले अशा आर्थिक आणि सामाजिक विचाराच्या दृष्टीने मनोरंजक आणि उद्बोधक वाटतील अशा वस्तूंचे उल्लेख येथे मूळ फारसी/उर्दू शब्द आणि त्यांच्यासाठी सुचविलेला संस्कृत शब्द ह्या मार्गाने मिळतात. असे सुमारे १३८० शब्द १० गटांमध्ये - अमरकोशाची भाषा उचलून त्यांना ’वर्ग’ असे नाव दिले आहे- आपणास येथे दिसतात.

ह्या कोशाच्या एकमेकापासून कमीअधिक प्रमाणात भिन्न अशा अनेक प्रती महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या मिळाल्या आहेत. त्यापैकी कोल्हापूरहून का.ना. साने ह्यांनी मिळालेली प्रत १९२५ साली भारत इतिहास संशोधक मंडळाने प्रकाशित केलेल्या ’शिवचरित्रप्रदीप’ ह्या ग्रंथामध्ये छापलेली आहे. ह्या प्रतीचे वैशिष्टय असे की मुख्य कोशापलीकडे तिच्यामध्ये ८४ संस्कृत श्लोकांचा उपोद्घात आणि अखेरीस ५ श्लोकांचा उपसंहार आहे, जो अन्य प्रतींमध्ये नाही. उपसंहारामध्ये कोशाच्या निर्मितीविषयी अधिक माहिती आहे. पुढील लेखन ह्या प्रतीवर आधारलेले आहे.

कोशातच अनेक ठिकाणी म्हटल्याप्रमाणे त्याची निर्मिति ही रघुनाथपंतांनी केली आहे. उपोद्घातामध्ये पुढील श्लोक दिसतात.

कृते म्लेच्छोच्छेदे भुवि निरवशेषं रविकुला-
वतंसेनात्यर्थं यवनवचनैर्लुप्तसरणीम्।
नृपव्याहारार्थं स तु विबुधभाषां वितनितुम्।
नियुक्तोऽभूद्विद्वान्नृपवर शिवच्छत्रपतिना ॥८१॥
सोऽयं शिवच्छत्रपतेरनुज्ञां मूर्धाभिषिक्तस्य निधाय मूर्ध्नि।
अमात्यवर्यो रघुनाथनामा करोति राज्यव्यवहारकोशम् ॥८२॥

सूर्यवंशाचा जणू तुराच अशा राजश्रेष्ठ शिवछत्रपतीने पृथ्वीवर म्लेच्छांचा समूळ उच्छेद केल्यानंतर यवनोक्तींनी झाकोळलेल्या देवभाषेला राज्यव्यवहारासाठी वाढविण्याच्या हेतूने एका विद्वानाला नियुक्त केले. ८१.
तो मी अमात्य रघुनाथ शिवछत्रपतीची आज्ञा मस्तकी धारण करून राज्यव्यवहारकोश करीत आहे. ८२.

प्रत्येक वर्गाच्या अखेरीस पुढील प्रकारचा समारोप आहे:

इति श्रीशिवच्छत्रपतिप्रियामात्येन नारायणाध्वरिसूनुना रघुनाथपण्डितेन शिवराजनियोगत: कृते राजव्यवहारकोशे पण्यवर्गो दशम: समाप्त:॥
(शिवछत्रपतीचा प्रिय अमात्य, नारायणाचा पुत्र अशा रघुनाथपंडिताने शिवाजीराजाच्या आदेशावरून केलेल्या राजव्यवहारकोशामध्ये पण्यवर्ग हा दहावा वर्ग समाप्त झाला.)

ह्याउलट उपसंहारामध्ये पुढील दोन श्लोकांमध्ये असे लिहिले आहे:

व्यासान्वयाब्धिचन्द्रेण लक्ष्मणव्याससूनुना।
कोशोऽयं ढुंढिराजेन रघुनाथमुदे कृत:॥१॥
यथामति विचार्यैव नामान्यर्थानुसारत:।
विहितानि मयाकार्यमार्यैरत्र मनो मनाक्॥२॥

(व्यासकुल हा सागर, त्यातून उत्पन्न झालेल्या चन्द्रासारखा असलेल्या, लक्ष्मण व्यासाचा पुत्र, अशा ढुंढिराजाने रघुनाथाच्या संतोषासाठी हा कोश केला. १.
बुद्धीने विचार करून अर्थानुसारी शब्द मी येथे योजिले आहेत. आर्य विद्वानांनी ह्याकडे थोडे लक्ष द्यावे. २.)

हे सर्व श्लोक एकत्रितपणे विचारात घेतले तर असे म्हणता येते की रघुनाथपंडिताला हे कार्य मिळाले. तो स्वत: तंजावरचा निवासी असून त्याच्याकडे शिवराज्यापैकी दक्षिणभागाचे शासन हे प्रमुख कार्य होते. पूर्ण कोश स्वत: करणे त्याला शक्य नसणार म्हणून त्याने ढुंढिराज नावाच्या परिचित विद्वानाला हे कार्य सोपविले. कोशनिर्मितीमध्ये असा दोघांचाहि काही वाटा आहे. ढुंढिराजाने शब्द गोळा करणे असे पहिले काम केले आणि दोघांनी मिळून त्याला हे अखेरचे स्वरूप दिले. (प्रख्यात पंडितकवि रघुनाथपंडित, नलदमयंतीस्वयंवराचा कवि आणि रघुनाथपंत अमात्य हे एक का दोन, ढुंढिराज व्यास कोण होता असे बरेच काही लिहिण्याजोगे आहे पण विस्तारभयास्तव ते येथे न लिहिता त्याचा नुसता उल्लेख करतो.)

ह्यापुढे प्रत्यक्ष कोशाचा धावता आढावा घेऊ. संस्कृत पंडितप्रथेला धरून शिवजन्मामागे ईश्वरी प्रेरणा आहे असे सुचविणारे, कोशकार्याची आवश्यकता काय आणि ते करण्यास रघुनाथपंडित कसा सर्वथैव पात्र आहे ह्याचे वर्णन करणारे आणि अतिशयोक्तीने भरलेले ८४ श्लोक उपोद्घातामध्ये आहेत. त्यांचा सारांश असा:

यवनाक्रान्त आणि त्यामुळे त्रस्त अशी पृथ्वी ब्रह्मदेवाकडे ’माझी यवनांपासून सोडवणूक कर’ असे सांगण्यासाठी गेली. हे कार्य करण्यास विष्णु अधिक योग्य आहे असे सांगून ब्रह्मदेव तिला बरोबर घेऊन विष्णूकडे गेला. आपल्यापेक्षाहि शंकराने हे कार्य केल्यास उत्तम होईल असे म्हणून सर्वजण कैलासावर शंकराकडे गेले. तेथे शंकर ’परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्। धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे॥’ असे तूच पूर्वी सांगितले होतेस अशी विष्णूला आठवण करून देतो आणि म्हणतो:

निहता भवता हरे पुरा ये पौलस्त्यमुखा: सुखाय भूमे:।
अहितान्पुनरेव जन्मभाजो जहि तान्प्राप्तनराकृतिस्त्वमेव॥४६॥
येषां कलौ दुर्नयमेव सोढुं बुद्धावतार: कलितो मयाऽभूत्।
तेषां विनाशं स्फुटमेव कर्तुमसाम्प्रतं मे मनुषे यदीत्थम्॥४७॥
उपायमप्यत्र वदामि भूमिमवाप्य मन्नामनिगूढभाव:।
साहाय्यमंशेन पुनर्भवान्या लब्ध्वापि त्तानाशु सुखेन हन्या:॥४८॥

हे हरे, पूर्वी भूतलावर सुख आणण्यासाठी तू रावणादींचा वध केलास. आता पुन: जन्म घेतलेल्या त्या शत्रूंना मनुष्यरूपाने तू नष्ट कर. ४६.
’ज्यांचा दुष्टपणा सहन करण्यासाठी मी कलियुगामध्ये बुद्धावतार धारण केला होता त्यांचा विनाश करण्यासाठी मी मनुष्यरूप धारण करणे अयोग्य आहे’ असे जर तुला वाटत असेल...४७.
...तर त्यावर मी उपाय सांगतो. गुप्तपणे माझे नाव धारण करून तू धरणीवर अवतीर्ण हो आणि सहजपणे त्यांचे हनन कर. ह्यामध्ये भवानीचेहि साहाय्य अंशत: तुला मिळेल. ४८.

विष्णूस असा आदेश दिल्यावर शंकर पुढे सांगतो...

अस्ति प्रशस्तविभवो भुवि भानुवंशे विख्यातभोसलकुलामृतसिन्धुचन्द्र:।
श्रीशाहवर्मनृपतिर्विधिपार्वतीशश्रीशा हवि: क्रतुषु नित्यमदन्ति यस्य ॥४९॥
तस्य प्रिया भूपतिभर्तुरार्या रूपेण संतर्जितकामभार्या।
साध्वी जिजूर्नाम सुलक्षणास्ते पत्नी दिलीपस्य सुदक्षिणेव॥५०॥
त्वं शाहपृथ्वीपतिवीरपत्न्यामस्यां समासाद्य मनुष्यजन्म।
म्लेच्छापहत्या सुखमाचरय्य भूमे: पुन: स्थापय वर्णधर्मान्॥५१॥
पार्थं प्रति प्राक्तव धर्महानौ सृजेयमात्मानमिति प्रतिज्ञा।
जगत्सु गीतैव तदत्र कार्षी: कार्येऽधुना माधव मा विचारम्॥ ५२॥

अर्थ - विख्यात भोसले कुलरूपी सागरातून वर आलेला चन्द्रच जणू असा शाहाजी नावाचा कीर्तिमान् राजा आहे ज्याचा यज्ञातील हवि ब्रह्मदेव, शिव आणि विष्णु नित्य ग्रहण करतात. त्याची प्रिय आणि दिलीपाची सुदक्षिणा असावी अशी जिजू नावाची सुलक्षणा रूपवती भार्या आहे. ४९-५०.
तिच्यापासून मनुष्यरूपाने जन्म घेऊन तू म्लेच्छविनाश करून पृथ्वीवर पुन: सुखसमाधान आण आणि वर्णाश्रमधर्माची पुन:स्थापना कर. ५१.
धर्महानि झाली असता मी पुन: जन्म घेऊन उतरेन असे तूच पूर्वी गीतेमध्ये सांगितले आहेस. तेव्हा आता अधिक विचार न करता तू हे कार्य अंगावर घे. ५२.

आदेशाप्रमाणे स्वत: श्रीविष्णूने ’शिव’ ह्या नावाने पृथ्वीवर जन्म घेतला आणि भवानीचा अंश असलेल्या जिजाबाईच्या पाठिंब्याने म्लेच्छांचा संहार केला.

क्रमेण जित्वा स दिशश्चतस्रो राजा शिवच्छत्रपति: प्रतापात्।
नि:शेषयन्म्लेच्छगणं समस्तं पाति स्म पृथ्वीं परिपूर्णकाम:॥६५॥

सर्व म्लेच्छगणांचा आपल्या पराक्रमाने नि:शेष करणारा परिपूर्णकाम राजा शिवछत्रपति चारी दिशा क्रमाने जिंकून सर्व पृथ्वीचे रक्षण करू लागला.

तदनंतर...

कृते म्लेच्छोच्छेदे भुवि निरवशेषं रविकुला-
वतंसेनात्यर्थंयवनवचनैर्लुप्तसरणीम्।
नृपव्याहारार्थं स तु विबुधभाषां वितनितुम्।
नियुक्तोऽभूद्विद्वान्नृपवर शिवच्छत्रपतिना ॥८१॥
सोऽयं शिवच्छत्रपतेरनुज्ञां मूर्धाभिषिक्तस्य निधाय मूर्ध्नि।
अमात्यवर्यो रघुनाथनामा करोति राजव्यवहारकोषम् ॥८२॥

अर्थ - सूर्यवंशाचा जणू तुराच अशा राजश्रेष्ठ शिवछत्रपतीने पृथ्वीवर म्लेच्छांचा समूळ उच्छेद केल्यानंतर यवनोक्तींनी झाकोळलेल्या देवभाषेला राज्यव्यवहारासाठी वाढविण्याच्या हेतूने एका विद्वानाला नियुक्त केले. ८१.
तो मी अमात्य रघुनाथ शिवछत्रपतीची आज्ञा मस्तकी धारण करून राज्यव्यवहारकोष करीत आहे. ८२.

आपल्या ह्या कोशकार्याची कुचेष्टाहि होऊ शकेल असे वाटून रघुनाथपंडित उपोद्घाताच्या अखेरीस सांगतो:

विपश्चित्संमतस्यास्य किं स्यादज्ञविडम्बनै:।
रोचते किं क्रमेलाय मधुरं कदलीफलम् ॥८४॥

विद्वन्मान्य अशा ह्या कार्याची अडाण्यांनी कुचेष्टा केली म्हणून काय बिघडते? उंटाला गोड केळ्याची चव कोठे कळते? ८४.

ह्यापुढे १० वर्गांमध्ये मिळून १३८० फारसी-उर्दू शब्दांना संस्कृत भाषेतील शब्द समानार्थी शब्द सुचविण्यात आलेले आहेत. कोशाचे १० वर्ग असे: १) राज्यवर्ग २) कार्यस्थानवर्ग ३) भोग्यवर्ग ४) शस्त्रवर्ग ५) चतुरंगवर्ग ६) सामन्तवर्ग ७) दुर्गवर्ग ८) लेखनवर्ग ९) जनपदवर्ग १०) पण्यवर्ग . ह्यापुढे ह्या लेखामध्ये कोशामधील कोणताहि शब्द दाखवितांना प्रथम राज्यव्यवहारकोशाने सुचविलेला पर्याय आणि नंतर कंसात मूळ फारसी शब्द अशी रचना ठेवली आहे.

हा राज्यव्यवहार पुष्कळसा पूर्वीच्या मुस्लिम पद्धतीमधून घेतला आहे. राज्याच्या कारभाराचे १८ कारखानेआणि १२ महाल असे विभाजन तेथूनच घेतले आहे, मात्र ते जसेच्या तसे ह्या कोशामध्ये उतरलेले नाही. कसे ते लवकरच दिसून येईल.

राज्याच्या १८ कारखान्यांची मुस्लिम राजवटीतील नावे आणि त्यांच्या कामाचे विषय असे- i) खजिना - कोशागार ii) जवाहिरखाना - रत्ने, दागिने iii) अंबरखाना - धान्यसाठा iv) शर्बतखाना - औषधे v) तोफखाना - तोफा, बंदुका इत्यादि vi) दफ्तरखाना - राज्यविषयक कागदपत्रे vii) जामदारखाना - वस्त्रप्रावरणे ह्यांची व्यवस्था viii) जिरातखाना - शस्त्रे, चिलखत, टोप इत्यादि ix) मुतबकखाना - पाकसाधना, रसोई इत्यादि, x) फीलखाना -हत्ती आणि त्यांचे सामान xi) उष्टारखाना - उंट आणि त्यांचे सामान xii) नगारखाना - नौबत, ढोल, शिंगे इत्यादि xiii) तालिमखाना - मल्लशाळा, xiv) फरासखाना तंबू, राहुटया, जाजमे इत्यादींची व्यवस्था, xv) आबदारखाना - पाणी अन्य पेयांची व्यवस्था xvi) शिकारखाना - पाळीव प्राणी (वाघ, सिंह इत्यादि) xvii) दारू खाना - तोफा-बंदुकांसाठी दारूगोळा xviii) शहदखाना - सफाई खाते.

१२ महाल असे: i) पोते - व्यय, ii) सौदागर - व्यापार उदीम, iii) पालखी, iv) कोठी, v) इमारत, vi) वहिली - रथशाळा, vii) पागा - अश्वदल, viii) सेरी - सुखसोयी, ix) दरुनी - अन्त:पुर, x) थट्टी - गाईम्हशींचा तबेला, xi) टांकसाळ, xii) सबीना - संरक्षक.

ह्या कारखाना आणि महालांपैकी कशाकशाची नोंद राज्यव्यवहारकोशामध्ये घेतली गेली आहे ते आता पाहू.

कारखान्यांपैकी कोशागार (खजिना), रत्नशाला (जवाहिरखाना) आणि वसनागार (जामदारखाना) ह्यांमधील वस्तु आणि तेथील अधिकार्‍यांची नावे ही क्रमाने वर्ग २ - कार्यस्थानवर्ग येथे मिळतात. पाकालय (मुतबकखाना). जलस्थान (आबदारखाना), सुधास्थान (शरबतखाना), पक्षिशाला (शिकारखाना), आस्तरणक (फरासखाना) हे कारखाने वर्ग ३-भोग्यवर्ग येथे आहेत. शस्त्रागार (जिरातखाना), अग्निचूर्णक (दारूखाना) आणि मल्लशाला (तालिमखाना) हे वर्ग ४ - शस्त्रवर्ग येथे आहेत. गजशाला (फीलखाना, ह्यामध्येच मन्दुरा - घोड्यांची पागा ह्या महालाचाहि समावेश केला आहे), रथशाला (वहिलीमहाल), उष्ट्रशाला (शुतुर्खाना म्हणजेच उष्टारखाना), वाद्यशाला (आलंखाना म्हणजेच नगारखाना) इतक्यांचा समावेश वर्ग ५ - चतुरंगवर्ग केला आहे. वर्ग ६ - सामन्तवर्गामध्ये सैनिकांचे प्रकार, अधिकार्‍यांची नावे. सैन्याची हालचाल आणि मुक्काम अशा सैन्याशी संबंधित शब्द आहेत. वर्ग ७ - दुर्गवर्गामध्ये प्रथम दुर्ग-किल्ले ह्यांच्याशी संबंधित परिभाषा दर्शवून त्यानंतर संभारगृह (अंबारखाना) हा कारखाना, इमारत हा महाल आणि अखेरीस मलस्थान (तारतखाना किंवा शहदखाना ह्यांच्याशी संबंधित श्ब्द दर्शविले आहेत. कोशातील सर्वात मोठा वर्ग म्हणजे वर्ग ८ - लेखनवर्ग. ह्यामध्ये लेख्यशाला (दफ्तरखाना) हा कारखाना, व्यय (वेतनादि खर्च) हा महाल आणि त्यानंतर पत्रव्यवहारात, वाटाघाटींमध्ये, राजसभेमध्ये, शिष्टव्यवहारामध्ये, कर्जव्यवहार आणि दोन पक्षांमधील आर्थिक विवादामध्ये वापरायचे अनेक फारसी शब्द आणि त्यांना प्रतिशब्द दिले आहेत. वर्ग ९ - जनपदवर्ग ह्यामध्ये नाना देशविभाग, त्यांचे अधिकारी, जमिनीचे महसूलासाठी प्रकार, महसूलाशी संबंधित शब्द, वजनेमापे, अशा गोष्टी दिसतात. अखेर वर्ग १० - पण्यवर्ग येथे उत्पादनाच्या आणि विक्रीच्या वस्तु आणि ते निर्माण करणारे ह्यांची नावे दिसतात.

(क्रमश:. पुढील भागामध्ये काही रंजक आणि लक्षणीय शब्द.)

आधार:
१) राज्यव्यवहारकोश - सं. का.ना.साने, शिवचरित्र प्रदीप, पृ.१३७ पासून पुढे.
२) Administrative System of the Marathas by Surendranath Sen पृ. ५९-६१

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

आर्यभटाची पृथ्वी, भास्कराचार्यांचे पाटण...

मी 'उपक्रम' आणि 'ऐसी' येथे वेळोवेळी केलेल्या लेखनातील काही लेखांचा संग्रह bookganga.com येथे ह्या URLने प्रकाशित झाला आहे. संग्रहाचे नाव 'आर्यभटाची पृथ्वी, भास्कराचार्यांचे पाटण आणि अन्य लेख' असे असून सुरुवातीच्या प्रास्ताविक निवेदनामध्ये हे लेख 'उपक्रम' आणि 'ऐसी' आलेले आहेत असेहि नोंदवले आहे.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

लीप इयर, अधिकमास इत्यादि.

आज २९ फेब्रुअरी २०१६ हा लीप दिवस आहे. ह्या संबंधात ख्रिश्चन कालगणनेमधील लीप दिवस, त्याचप्रमाणे हिंदु कालगणनेमधील अधिकमास, क्षयमास आणि तिथींची वृद्धि आणि क्षय ह्या संकल्पनांचा आढावा ह्या लेखाद्वारे घेण्याचा प्रयत्न केला आहे. दोन धर्मपरंपरांमधील ह्या संकल्पना वरवर पाहता भिन्न वाटल्या तरी त्यांची प्रेरणा एकच आहे आणि ती म्हणजे कालगणना ही ‍ऋतुचक्राबरोबर चालत राहील अशी योजना करणे. मुस्लिम कालगणनेमध्ये ह्या संदर्भात काय केले जाते ते अखेरीस काही शब्दात दाखवितो.

हिंदु परंपरा कशी विकसत गेली हे प्रथम पाहू. अतिप्राचीन कालामध्ये कालगणनेची पहिली संकल्पना नैसर्गिकपणे उद्भवलेली असणार ती म्हणजे दिवस, एका सूर्योदयापासून दुसर्‍या सूर्योदयापर्यंत लोटणारा काळ म्हणजे एक दिवस. त्या नंतरची निर्माण झालेली संकल्पना म्हणजे मास किंवा महिना. अमावास्या म्हणजे सूर्य-चंद्र युती किंवा सूर्य आणि चन्द्र ह्यांचे रेखांश सारखे असणे. अशा एका अमावास्येपासून पुढच्या अमावास्येपर्यंतचा कालावधि म्हणजे एक चांद्रमास होय. हा चांद्रमास वरवर पाहिल्यास ३० दिवसांचा असतो असे भासते. मास हा शब्दच ’मास्’ किंवा ’मास’ अशा चन्द्रदर्शक शब्दांतून बनलेला आहे. पौर्णमासी-पूर्णमासी-पूर्णिमा म्हणजे चन्द्र पूर्ण असण्याची तिथि. माहेमोहर्रम (मोहर्रमच्या महिन्यात) अशा मुस्लिम शब्दरचनेमध्ये असणारा ’माह’ हा शब्दहि अवेस्ताच्या प्राचीन भाषेमधून पर्शियन भाषेमध्ये आला आहे. अवेस्ताच्या भाषेचे आणि संस्कृतचे साम्य प्रसिद्धच आहे. असे बारा चान्द्रमास गेले म्हणजे एक ऋतुचक्र पूर्ण होते ही सहज निरीक्षणामधून कळलेली तिसरी संकल्पना. अतिप्राचीन काळातील असे वर्ष ३६० दिवसांचे होते असे ऋग्वेदातील उल्लेखावरून समजते.

अमावास्येपासून पहात गेले तर चन्द्र आणि सूर्यामधले कक्षावृत्तावरील रेखांश अंतर रोज १२ रेखांशांनी वाढत असते आणि असे ३० वेळा झाले की ३६० अंशांमधून चन्द्र फिरून पुन: चन्द्रसूर्यांची युति होऊन पुन: अमावास्या येते हे दिसून येते. ह्या तीस घटनांना ’तिथि’ असे नाव आहे. ह्या १२ अंशांच्या ह्या प्रत्येक वाढीनंतर तिथि बदलते. अमावास्येनंतर पहिल्या १२ अंश भागाचा प्रवास चन्द्र सुरू करतो आणि तदनंतर जो पहिला दिवस उजाडतो त्याच्या सूर्योदयक्षणापासून प्रतिपदा तिथि सुरू झाली असे म्हणतात. ह्या मार्गाने वाढत्या चंद्राच्या प्रतिपदा-द्वितीया अशा १५ तिथींना शुक्ल पक्ष म्हणतात आणि उतरत्या चन्द्राच्या १५ तिथींना कृष्ण पक्ष म्हणतात.

वेदकालानंतर कितीएक शतके लोटली आणि कालाचे अधिक सूक्ष्म मापन करता येणे शक्य झाले. त्यामुळे ऋतुचक्र पूर्ण होण्यास ३६० दिवस पुरे पडत नाहीत तर काही अधिक दिवस लागतात असे कळले असावे, यद्यपि त्या प्राचीन कालात बर्षाचे माप कितपत सूक्ष्म होते हे सांगणारे काहीच साधन उरलेले नाही. ह्या ऋतुचक्र काळामध्ये सूर्य एका संपातबिंदूपासून निघून रोज सुमारे १ अंश कक्षेमध्ये चालत पुन: त्या संपातबिंदूपाशी येतो. ह्याला सांपातिक सौर वर्ष अथवा सावन सौर वर्ष असे म्हणतात आणि ऋतुचक्र ह्या वर्षाशी बांधलेले असते. (’सांपातिक’ म्हणजे एका संपातबिंदूपासून निघून कक्षेत वर्षभर भ्रमण करून पुन: त्या संपातबिंदूपर्यंत सूर्य पोहोचण्यास लागणारा काळ.) ऋतुचक्राला बांधलेल्या ह्या वर्षाला ३६० दिवसांहून असा थोडा अधिक काळ जातो हे सहजी लक्षात येण्याजोगे नाही. १०००० वर्षांपूर्वी शेती करण्यास मानवाने प्रारंभ केला तेव्हा ३६० दिवस आणि बारा महिन्यांच्या चन्द्रावर बेतलेल्या गणनेचाच पेरणी आणि शेतीच्या अन्य कामांना उपयोग केला गेला असणार. शेतीला ही गणनापद्धति चालत नाही हे कोणाहि शेती करणार्‍याला एका आयुष्याच्या कालावधीत वैयक्तिक अनुभवामधून कळेल पण कैक पिढ्या आणि शतके लोटल्यानंतरच असे अनुभव सर्वमान्य झाले असणार. त्याचा उपाययोजना म्हणजे वेदकालातच निर्माण झालेली अधिकमासाची कल्पना. सूक्ष्म मापन अजून कैक शतके दूर होते पण अनुभवावरून हे लक्षात आले असणार की ३६० दिवसांच्या वर्षगणनेमध्ये आणि ऋतुचक्रामध्ये फरक आहे. तो फरक काढून टाकण्यासाठी केलेली उपाययोजना म्हणजे अधिकमास हे वेदांतच दिसते. यजुर्वेदाच्या तैत्तिरीय संहितेमध्ये तिचा स्पष्ट उल्लेख आहे.

कालान्तराने सूक्ष्म मापन शक्य झाल्यावर पुढील गोष्टी समजून आल्या. पृथ्वी सूर्याभोवती भ्रमण करीत असतांना पृथ्वीवरून सूर्याचे दिसणारे स्थान रोज बदलत असते. असे रोज स्थान बदलत सूर्याला परत पहिल्या स्थानी येण्यासाठी लागणारा काल, म्हणजेच एक ’सावन वर्ष’ अथवा tropical year, एक ऋतुचक्र पूर्ण होण्यासाठी लागणारा काल असे वर सांगितलेच आहे. ग्रीक विद्वान् हिप्पार्कसच्या मते ते वर्ष ३६५ दिवस ५ तास ५५ मिनिटे आणि १२ सेकंदांचे होते म्हणजेच ३६५.२४६६६ दिवसांचे होते. आर्यभटाच्या मते ते ३६५ दिवस १५ घटिका ३१ पळे १५ विपळे म्हणजेच ३६५.२५८६८ दिवस होते. सध्याच्या हिशेबानुसार ते ३६५ दिवस ५ तास ४९ मिनिटे आणि १९ सेकंदांचे आहे म्हणजेच ३६५.२४२५८ दिवस इतके आहे. चान्द्रमास (एका अमावास्येपासून दुसर्‍या अमावास्येपर्यंतचा काल) हाहि तीस पूर्ण दिवस नसून २९ दिवस १२ तास ४४ मिनिटे आणि ३ सेकंद म्हणजेच २९.५३०५८९ दिवस इतका आहे. ह्यावरून १२ चान्द्रमास म्हणजे ३५४.३६७०६८ इतके दिवस. साहजिकच एका सावन वर्षात १२ चान्द्रमास पूर्ण होऊन १३ व्या चान्द्रमासाचाहि काही काल - १०.८७५५१२ इतके दिवस - बसतो. चन्द्राचे भ्रमण अधिक सहजपणे लक्षात येणारे आणि मोजण्यास अधिक सुलभ असल्याने बहुसंख्य मानवी समूहांचे धर्मांशी निगडित आचार, सण इत्यादि चान्द्रवर्षाशी जोडलेल्या आहेत. आता चान्द्रवर्ष आणि सौरवर्षांची एकमेकात काही मार्गाने सांगड न घातल्यास धार्मिक बाबी, सणवार आदींचे ऋतूंशी काही नाते उरणार नाही. असे नाते टिकविण्यासाठी बहुसंख्य जुन्या कालगणनांमधून वेगवेगळ्या मार्गांनी चान्द्रवर्षामध्ये दिवस वाढवण्याचे मार्ग शोधले गेले आहेत. ह्याचा भारतीय प्रकार म्हणजे अधिकमास आणि क्षयमासांची योजना.

वेदकालापासून अधिकमास आणि क्षयमासाच्या संकल्पना होत्या असे आपण वर पाहिले पण ते मास केव्हा घालायचे ह्याचे जे काय गणित वेदकालामध्ये असेल ते लुप्त झालेले आहे. आपले सध्याचे गणित ह्या पुढे वर्णिल्यानुसार आहे.

सर्व ग्रह, चन्द्र आणि सूर्य हे आकाशामध्ये भ्रमण करीत असतांना पूर्वपश्चिम वृत्ताच्या दोन बाजूस ८+८=१६ अंश अशा पट्टयामध्ये असतात. त्या भागात दिसणार्‍या तारकापुंजामधून आकृतींची कल्पना करून बनविली गेलेली अश्विनी-भरणी-कृत्तिका-रोहिणी इत्यादि २७ नक्षत्रे आणि ३०-३० रेखांशांचे विभाग कल्पून ठरवलेल्या मेषादि १२ राशि इ.स. पूर्व कालापासून भारतीयांना तसेच चीन आणि पाश्चात्य विद्वानांना ज्ञात आहेत. ह्यापैकी नक्षत्रांचे उल्लेख वेदांमधून मिळत असल्याने नक्षत्रे भारतीय आणि वेदकालीन असावीत असे मत शं.बा. दीक्षित ’भारतीय ज्योतिषशास्त्राचा इतिहास’ ह्या ग्रंथात मांडतात. मात्र राशि आणि त्यांचे नावे पश्चिमेकडून आपल्याकडे इ.स.पूर्व २०० च्या पुढेमागे आली असेहि ते म्हणतात.

आकाशात भ्रमण करतांना सूर्य प्रतिदिनी सुमारे १ अंश चालतो आणि एक राशि ३० दिवसात पूर्ण करतो. त्यावरून चान्द्रमास, अधिकमास आणि क्षयमास पुढील प्रकारे निश्चित होतात: सूर्याने मेष राशीमध्ये प्रवेश केला की चैत्र मास, वृषभ राशीत प्रवेश केला की वैशाख मास अशा मार्गाने १२ राशिप्रवेशांवरून - १२ राशिसंक्रमणांवरून - चैत्रवैशाखादि १२ मासनामे निश्चित होतात. अशा रीतीने बहुतेक वर्षांमध्ये सूर्याचे एक राशिसंक्रमण आणि त्याच्या बरोबर एक चान्द्रमास असे बरोबरीने चालत राहतात.

एक सावन वर्ष आणि एक चान्द्रमास ह्यांची सूक्ष्म मापने वर उल्लेखिलेली आहेत. ह्यावरून दिसेल की साहजिकच एका सावन वर्षात १२ चान्द्रमास पूर्ण होऊन १३ व्या चान्द्रमासाचाहि काही काल बसतो. तीन ते साडेतीन वर्षांमध्ये तो जवळजवळ एका महिन्याइतका वाढून बसतो आणि कोठेतरी एक अधिकमास वाढविण्याची आवश्यकता पडते. पृथ्वी आणि चन्द्र ह्यांच्या भ्रमणकक्षा पूर्ण गोलाकृति नसतात. त्या लंबगोलाकृति असतात आणि त्यामुळे त्यांचा चलनाचा वेग हा स्थिरांक (constant) नसतो, तो बदलत असतो कारण कोपर्निकसचे ग्रहभ्रमणाविषयीचे नियम. ह्या सर्वांचा परिणाम म्हणून बारा संक्रान्ति आणि बारा चान्द्रमास ह्यांचे जुळून राहणे मधूनमधून तुटत राहते. त्यासाठीची योजना अशी. ज्या चान्द्रमासात सूर्याचे मेषसंक्रमण होते (सूर्य मेषराशीत प्रवेश करतो) तो चैत्र, ज्यात वृषभसंक्रमण होते तो वैशाख इत्यादि ह्याचा उल्लेख आलाच आहे. ज्या चान्द्रमासात कोठलेच संक्रमण होत नाही तो अधिकमास आणि त्याचे नाव पुढच्या मासावरून. त्यानंतरच्या पुढच्या संक्रमणाचा जो मास असेल तो निज (आणि तत्पूर्वीचा अधिक). ज्या चान्द्रमासात दोन संक्रमणे होतील त्यात दुसर्‍या संक्रमणाशी संबंधित जो मास असेल तो क्षयमास. ज्या वर्षी क्षयमास येतो त्याच वर्षी त्याच्या पुढेमागे दोन अधिकमास येऊन वर्ष १३ महिन्यांचेच राहते.

अधिक आणि क्षय महिना येणे हे सूर्यचन्द्रांच्या आकाशातील विशिष्ट स्थानांशी आणि त्यातून उत्पन्न होणार्‍या त्यांच्या गतींशी संबंधित असल्याने काही महिनेच अधिक किंवा क्षय येऊ शकतात. फाल्गुन, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद आणि आश्विन हेच महिने अधिक येऊ शकतात आणि कार्तिक, मार्गशीर्ष आणि पौष ह्यांच्यातीलच एखाद्या महिन्याचा क्षय होऊ शकतो. माघ महिना कधी अधिकही येत नाही आणि त्याचा कधी क्षयही होत नाही.

आणखी एका विचाराने हा प्रश्न समजून घेता येतो. इ.स.पूर्व ४३२ सालापासून ग्रीक विद्वान मेटन ह्याला हा एक नैसर्गिक योगायोग माहीत होता की १९ सौर वर्षांत २३५ चान्द्रमास जवळजवळ पूर्णत: बसतात. त्याला माहीत असलेली दोन्हीची मूल्ये आजच्या अधिक सूक्ष्म मापनाहून थोडी कमी सूक्ष्म होती तरीहि आज आपण १९ सौर वर्षे = ६९३९.६०९०२ सावन दिवस आणि २३५ चान्द्रमास = ६९३९.६८८६५ सावन दिवस ह्या गणितावरून मेटनला दिसलेले जवळजवळ योग्यच होते हे ताळून पाहू शकतो. १९ वर्षांमध्ये पडणारा हा फरक ०.०७९६३ दिवस किंवा १.९१११२ तास इतका किरकोळ आहे.

मेटनच्या - किंवा ज्याने कोणी हा योगायोग पहिल्यांदा हेरला - त्याच्या ह्या शोधाचा उपयोग असा की १९ सावन वर्षांमध्ये चंद्राच्या सर्व तिथि एकदा मोजल्या की त्या पुढच्या १९ वर्षांसाठी त्या तिथि पुन: त्याच सौर दिवसांवर पडणार, तो हिशेब पुन: करण्याचे कारण नाही. १९ सौर वर्षांमध्ये २२८ चान्द्रमास नैसर्गिकत: पडतात आणि ७ चान्द्रमास अधिक पडतात. त्या ७ अधिक मासांना एकदा सोयीनुसार बसवले की तेच चक्र पुढच्या, त्याच्या पुढच्या अशा अनेक १९ वर्षांच्या चक्रांना लावता येते.

भारतीय पद्धतीत ही सोय राशिसंक्रमण आणि चान्द्रमास ह्यांची सांगड घालून करण्यात आले आहे आणि ३६० दिवसांचे, ३० तिथींचे आणि १२ महिन्यांचे हे आदिमकालीन चान्द्र वर्ष अजूनहि मधूनमधून अधिक मास, क्षयमास, तिथींचा क्षय आणि वृद्धि घालून आपण चालवत आहोत. तिथीचा क्षय आणि वृद्धि ह्या कशामुळे होतात ते आता थोडक्यात पाहू.

एक चान्द्रमास २९.५३०५८९ दिवसांचा (प्रत्येकी २४ तासांचा मध्यम मानाचा दिवस) असतो असे वर लिहिलेले आहे. तो तीस दिवसांहून सुमारे अर्धा दिवस कमी आहे. १२ रेखांश चालण्यासाठी चन्द्राला लागणारा काल म्हणजे एक तिथि आणि प्रत्येक चान्द्रमासामध्ये ३० तिथि असतात हे वर उल्लेखिलेले आहे. ह्याचा अर्थ म्हणजे प्रत्येक तिथि मध्यममानाने ०.९८४३ दिवसांइतकी असते. सूर्य-चन्द्रांच्या आपापल्या कक्षांमधील गति अनियमित आहेत ह्याचाहि उल्लेख आला आहे. चन्द्र पृथ्वीभोवती फिरतो तो लंबवर्तुळामध्ये (ellipse). त्यामुळे त्याच्या तिथी प्रत्यक्षामध्ये ५० ते ६८ घटिका (२० ते २७ तास) इतक्या कालाच्या असू शकतात. तिथिनामाचा असा नियम आहे की आकाशात चन्द्राने १२ अंश पार केले की त्या क्षणाला तिथि बदलायला पाहिजे पण प्रत्यक्षात तसे होत नाही. सूर्योदयाच्या वेळेस जी तिथि चालू असेल त्या नावाने तिथि पुढच्या सूर्योदयापर्यंत चालत राहते. आता एका सूर्योदयानंतर काही थोडयाच काळात आकाशात पुढची तिथि सुरू झाली आणि पुढच्या सूर्योदयापूर्वीच संपली तर ती पुढची तिथि पडणारच नाही, तिच्यामध्ये कोठलाच सूर्योदय न पडल्याने तिचा ’क्षय’ होईल. ह्याउलट एक तिथि चालू झाली आणि ती संपण्यापूर्वीच दुसरा सूर्योदय झाला तर तीच तिथि दोन दिवशी मोजली जाईल किंवा तिची वृद्धि होईल.

अशा रीतीने हिंदु पद्धतीमध्ये चंद्र आणि सूर्य ह्या नैसर्गिक घडयाळांची सांगड कशी घातली हे पाहिल्यावर आता ख्रिश्चन कालगणनेकडे जाऊ.

जगात सध्या सर्वत्र प्रचलित असलेले ख्रिश्चन कॅलेन्डर हे त्याच्या मुळात चन्द्रावरूनच सुरू झाले पण आता ते पूर्णपणे सूर्याशी जुळून चालणारे आहे. त्यात चन्द्र आणि सूर्य ह्यांच्या चलनाच्या जुळवणुकीचा प्रश्न उरलेला नाही. त्याचा प्रश्न वेगळाच आहे आणि त्याचे उत्तर काय आहे ते आता पाहू.

आकाशातील गोलांची दैनन्दिन गति हे एक कालगणनेचे निसर्गनिर्मित साधन आहे. त्यांपैकी चन्द्राची दैनंदिन गति ही अन्य कोठल्याहि गोलापेक्षा आणि आकलनाला सोपी असल्याने रोमन संस्कृतीच्या शेतीप्रधान काळातील कालगणना चान्द्रमासांच्या होत्या. त्यांमध्ये मार्च ते डिसेंबर असे दहा महिने होते. त्या महिन्यांपैकी मार्च, मे, जुलै आणि ऑक्टोबर ह्यांना प्रत्येकी ३१ दिवस आणि अन्य सहा महिन्यांना प्रत्येकी ३० दिवस असे एकूण ३०४ दिवस होते. त्या महिन्यांची नावे Martius, Aprilis, Maius, Iunius, Quintilis, Sextilis, Septembris, Octobris, Novembris, Decembris अशी होती (१० महिन्यांच्या ह्या कालगणनेची खूण आजहि टिकून आहे. Septembris पासून Decembris पर्यंतची नावे सातवा ते दहावा महिना ह्यांची निर्देशक आहेत आणि तो निर्देश सध्याच्या चालू नावांमध्येहि आपणास दिसतो, जरी सप्टेंबर ते डिसेंबर हे आता ७वा ते १०वा असे महिने नसून ९वा ते १२वा झाले आहेत. Martius ते Iunius ही चार नावे मार्स, जूनो ह्या देवतांशी वा शेतीकामाशी संबंधित आहेत.) उत्तर गोलार्धातील वसंतऋतूपासून हे दहा महिन्यांचे शेतीवर्ष सुरू होऊन हिवाळा सुरू होईपर्यंत चालत असे. हिवाळ्याच्या अशा उर्वरित सुमारे ६० दिवसांची गणति ह्या वर्षामध्ये केली जात नसे.

ह्यामध्ये पहिला बदल रोमचा दुसरा राजा नुमा पॉंपिलिअस (इ.पू. ७१५-६७३) ह्याच्या काळात झाला. ३०४ दिवसांच्या ह्या गणनेमध्ये ५० दिवस वाढवून आणि ३० दिवसांच्या सहा महिन्यांमधून प्रत्येकी एक दिवस कापून २८ दिवसांचे दोन नवे महिने निर्माण करण्यात आले आणि त्यांना जानेवारी आणि फेब्रुवारी - Januarius, Februarius - अशी नावे देण्यात आली आणि ते दोन महिने डिसेंबरच्या नंतर जोडण्यात आले. रोमन संस्कृतीमध्ये सम संख्या अशुभ आणि विषम संख्या शुभ मानीत असत तदनुसार जानेवारीचे २८ दिवस बदलून त्यालाहि २९ दिवसांचा महिना केले गेले. अशा रीतीने ३१ दिवसांचे ४ महिने, २९ दिवसांचे ७ महिने आणि २८ दिवसांचा एक महिना - फेब्रुवारी - असे ३५५ दिवसांचे वर्ष निर्माण करण्यात आले. हे वर्ष चन्द्राच्या पृथ्वीभोवतीच्या १२ महिन्यांच्या प्रदक्षिणाकालाशी - Synodic months - जवळजवळ सारखे आहे. तदनंतर केव्हातरी ह्याच प्राचीन काळात जानेवारी आणि फेब्रुवारी ह्यांना वर्षाच्या शेवटापासून काढून वर्षाच्या प्रारंभास जोडले गेले आणि वर्ष जानेवारीपासून सुरू होऊ लागले.

चान्द्रवर्षांची अशी गणना सूर्याच्या ३६५.२५ दिवसांच्या सौरवर्षाच्या गणतीशी जुळती नसल्याने त्याचे दुष्परिणाम दिसू लागले. शेतीची कामे सुरू करण्याचा पारंपारिक मार्च महिना पेरणीला आवश्यक अशा हवामानात पडण्याची खात्री राहिली नाही आणि ह्या दोन्ही गणना एकमेकींच्या बरोबर राहाण्यासाठी चान्द्रगणनेमध्ये काही अधिक दिवस काही वर्षांनंतर वाढविण्याची आवश्यकता निर्माण झाली.

इ.स.पूर्व ४५० पासून असे महिने मधूनमधून घालण्याची प्रथा सुरू झाली, यद्यपि त्यासाठी सार्वकालीन नियम असा कोणताच निर्माण करण्यात आला नाही. वर्षगणनेचा प्रारंभिक हेतु वेगवेगळी धार्मिक कृत्ये, उत्सव वगैरे वेळच्यावेळी पार पाडली जावी असा असतो. सर्व इतिहासात जागोजागी हेच तत्त्व दिसून येते. तदनुसार अधिक मास केव्हा टाकायचा हा निर्णय धर्माधिकार्‍यांच्या अधिकारात होता. (अशा व्यक्तींना Pontifex म्हणत असत आणि त्यांच्या प्रमुखाला Pontifex Maximus - सर्वोच्च धर्माधिकारी - असे म्हणत असत. नंतरच्या काळात कॉन्सल वा सम्राट् हाच Pontifex Maximus असे आणि ख्रिश्चन पोपहि स्वत:ला हे बिरुद घेत आले आहेत.)

ह्या अधिक महिन्याला Mercedonius असे नाव होते. फ़ेब्रुवारी, जो सर्वसाधारणपणे २८ दिवसांचा महिना असे, त्यातील शेवटचे ५ दिवस वेगळे काढून त्यांना आणखी २२ दिवस जोडून हा महिना तयार होत असे आणि अशा रीतीने धर्माधिकार्‍यांच्या निर्णयानुसार मधूनमधून काही वर्षे ३५५+२२=३७७ दिवसांची असत. फेब्रुवारी (Februarius) हा शब्द februa - religious purification ह्यापासून निर्माण झाला असून त्या महिन्यात सर्व प्रकारचे शुद्धिविधि केले जात, Mercedonius चा तोच उपयोग होता.

आर्थिक व्यवहारांवर अशा अधिक महिन्याचा परिणाम होत असल्याने धर्माधिकारी असा महिना आपल्या सोयीने जोडत. त्या कारणाने अधिक महिन्यामुळे प्रश्न न सुटता अधिकच जटिल होऊन बसला. सुमारे ४०० वर्षे ही अंदाधुंदी चालू राहिल्यानंतर इ.स.पूर्व ४६ साली तेव्हाचा Pontifex Maximus ज्यूलिअस सीझरने अधिक शास्त्रीय पद्धतीने हा गुंता सोडवायचे ठरवले. (स्वत: Pontifex Maximus झाल्यावरहि प्रथम तो गॉल प्रदेशाच्या - आजचा फ्रान्स - मोहिमेवर असल्याने आणि नंतर रोममधील बंडाळ्य़ांमध्ये अडकून पडल्याने कित्येक वर्षे अधिक महिना घोषितच झाला नव्हता.) त्याच्या ह्या सुधारित पद्धतीस ’ज्यूलिअन कालगणना - Julian Calendar' असे म्हणतात आणि थोडया फरकाने तीच गणना आपण आज वापरत आहोत.

ह्या वेळेपर्यंत नैसर्गिक ऋतु आणि त्यांच्याशी संबंधित उत्सवांचे दिनदर्शिकेत दर्शविलेले दिवस ह्यांच्यामध्ये सुमारे तीन महिन्यांचे अंतर पडले होते. ज्यूलिअस सीझरच्या सुधारणेनुसार इ.स. पूर्व ४६ ह्या वर्षात फेब्रुवारीचे शेवटचे ४ दिवस कमी करून त्याला २७ दिवसांचा एक अधिक मास जोडण्यात आला, तसेच नोवेंबर आणि डिसेंबरच्या मध्ये ३३ आणि ३४ दिवसांचे दोन अधिक मास टाकण्यात आले. इ.स.पूर्व ४६ हे वर्ष अशा मार्गाने ३५५-४+२७+३३+३४=४४५ दिवसांचे झाले. तदनंतर जानेवारी १ ला इ.स.पूर्व ४५ हे वर्ष सुरू झाले. त्या वर्षापासून पुढे जानेवारी ३१ दिवस, फेब्रुवारी २८ दिवस, मार्च ३१ दिवस इत्यादि आपल्याला परिचित महिने ठरवून देण्यात आले आणि सर्वसाधारण वर्ष ३६५ दिवसांचे झाले. सांपातिक वर्षाचे प्रत्यक्ष मान सध्याच्या सूक्ष्म मापनानुसार ३६५.२४२५८ दिवस इतके आहे, म्हणजेच ३६५ दिवसांचे वर्ष पूर्ण सांपातिक वर्षाच्या तुलनेत सुमारे १/४ दिवसाने लहान आहे आणि तेच चालू राहिले तर त्याच्या तारखा ऋतूंच्या तुलनेने ४ वर्षांमध्ये १ दिवस, १०० वर्षांमध्ये २५ दिवस इतक्या आधी पडतील. असे होऊ नये म्हणून असेहि ठरले की इ.स.पूर्व ४५ पासून ४ ने भाग जाणारे प्रत्येक वर्ष ३६६ दिवसांचे असेल आणि त्याच्या फेब्रुवारी महिन्यात २४ हा दिनांक दोनदा पडेल. दिनांक दर्शविण्याच्या रोमन पद्धतीनुसार हा दिवस VI Kal. Mar. - मार्च कॅलेंड्स् पूर्वीचा सहावा दिवस - असा ओळखला जात असे. तो दोनदा पडल्यामुळे अशा वर्षांना bissextile - सहावा दिवस दोनदा येणारे वर्ष - असे म्हणत असत. कालान्तराने हीहि पद्धति जाऊन अधिक दिवस फेब्रुअरी महिन्याच्या शेवटाला ’२९’ ह्या दिनांकाने जोडला जाऊ लागला. आपण इंग्लिशमध्ये त्या दिवसाला Leap Day आणि त्या वर्षाला Leap year म्हणतो. Leap year ह्या वर्णनाचे मूळहि मनोरंजक आहे. सर्वसाधारण ३६५ दिवसांच्या वर्षात ५२ पूर्ण आठवडे आणि १ दिवस असतो. एका वर्षाच्या १ मार्चला सोमवार पडला तर पुढच्या साधारण वर्षाच्या १ मार्चला मंगळवार पडतो. पण ते पुढचे वर्ष ’लीप’ असेल तर १ मार्चला बुधवार पडतो, म्हणजेच एका वारावरून ’उडी’ मारली जाते म्हणून ते ’लीप’ वर्ष.

ह्या ज्यूलियन गणनेनुसार १०० वर्षांत ३६५२५ दिनांक होतात. त्याच कालात ३६५२४.२५८ इतके सावन दिवस पडतात. ह्या दोनातील फरक १०० वर्षांमध्ये अदमासे ३/४ दिवस इतका छोटा असल्याने त्या काळात त्याच्यासाठी काहीच तरतूद करण्यात आली नाही. तितक्या प्रमाणामध्ये ज्यूलियन गणना सावन गणनेच्या पुढे जाते ही गोष्ट तशीच सोडून देण्यात आली.

ह्यानंतरचा महत्वाचा बदल म्हणजे दोन महिन्यांच्या नावांमध्ये बदल. ज्यूलिअस सीझरच्या सेनेटमधील प्राणघातक हल्ल्यानंतर सेनेटने Quintilis ह्या सातव्या महिन्याचे नाव बदलून ते ’जुलै’ असे केले. तदनंतर त्याचा वारस ऑगस्टस - पहिला रोमन सम्राट् - ह्याचा सन्मान म्हणून सेनेटने इ.स.पूर्व ८ साली Sextilis ह्या आठव्या महिन्याचे नाव बदलून त्याला ’ऑगस्ट’ असे नाव दिले.

१०० सांपातिक वर्षे १०० ज्यूलिअन वर्षांहून ३/४ दिवस ( सुमारे १८ तासांनी) छोटी असण्याचा परिणाम साठत जाऊन १५८२ इसवीपर्यंत जवळजवळ १६ शतके गेल्याने ज्यूलिअन कालगणनेच्या तारखा सांपातिक वर्षाच्या नंतर सुमारे ११/१२ दिवस पडू लागल्या होत्या.

ईस्टरचा दिवस कोणता मानायचा हा प्रारंभापासून एक गहन प्रश्न झाला होता आणि त्याबाबत अनेक मतमतान्तरे होती. सम्राट् कॉन्स्टंटाइनने सन ३२५ मध्ये बोलविलेल्या Council of Nicaea ची शिफारस अशी होती की वसंतसंपाताच्यानंतरच्या पहिल्या पौर्णिमेनंतरच्या रविवारी ईस्टर पडावा. वसंतसंपाताचा दिवस २१ मार्च असा ठरला होता. ह्या दिवसानुसार ईस्टर ठरविला तर तो खर्‍या (वेधावरून ठरविलेल्या) वसंतसंपाताच्या बराच नंतर पार पडला जाण्याची शक्यता होती. (ह्या काळापर्यंत खरा वसंतसंपात ११ मार्चपर्यंत मागे आलेला होता.) ही शक्यता दूर करण्यासाठी तेव्हाचा पोप १३वा ग्रेगरी ह्याने १५८२ साली कालगणनेमध्ये पुन: मोठी सुधारणा घडवून आणली. तिच्यानुसार १५८२ सालातील गुरुवार ४ ऑक्टोबर ह्या दिवसानंतरचे १० दिवस मोजण्यात आले नाहीत आणि शुक्रवार १५ ऑक्टोबरला गणना पुन: सुरू झाली. लीप वर्ष मानण्याचा नियमहि बदलण्यात आला आणि ’दर चौथे वर्ष लीप, पण ते वर्ष १०० ने भागले जात असल्यास ते लीप नाही, पण ते वर्ष ४०० ने भागले जात असल्यास ते लीप आहे’ असा नियम करण्यात आला. ह्यामुळे ४०० वर्षात ९७ लीप दिवस आणि १४६०९७ दिनांक पडतात. त्याच काळात ४०० सांपातिक वर्षांचे १४६०९७.०३२ इतके सावन दिवस होतात. आता सांपातिक वर्ष ग्रेगोरियन वर्षापेक्षा मोठे आहे पण दोनांतील फरक ४०० वर्षांमागे ०.०३२ दिवस इतका आहे. सांपातिक वर्षाला ग्रेगोरियन वर्षाहून पूर्ण एक दिवसाने मोठे होण्यासाठी सुमारे १२५०० वर्षे लागतील म्हणून सध्यापुरते ह्या प्रश्नाला येथेच सोडलेले आहे. (पृथ्वीचीच दैनंदिन आणि वार्षिक गती कमी होणे इत्यादि बाबी येथे विचारात घेतल्या गेलेल्या नाहीत.)

ह्या सुधारणा कॅथलिक पोपकडून आलेल्या असल्याने ख्रिश्चन धर्माच्या अन्य वेगवेगळ्या शाखांमध्ये त्यांना मान्यता मिळायला वेळ लागला. कॅथॉलिक भागांनी - इटलीतील राज्ये, पोर्तुगाल, स्पेन इत्यादींनी - ती लगेच मान्य केली पण प्रॉटेस्टन्ट ब्रिटनमध्ये ती मान्य व्हायला १७५२ साल उजाडले. तोपर्यंत फरक ११ दिवसांचा झाला होता आणि तेथे १७५२ साली बुधवार २ सप्टेंबर नंतर गुरुवार १४ सप्टेंबर हा दिवस घालण्यात येऊन मधले ११ दिवस गायब करण्यात आले. ऑर्थोडॉक्स चर्च मानणार्‍या रशियामध्ये ही सुधारणा पोहोचायला राज्यक्रान्ति व्हावी लागली. कम्युनिस्टांनी सत्ता प्राप्त केल्यावर १९१८ मध्ये ३१ जानेवारी नंतर १४ फेब्रुवारी हा दिवस आणून मधले १३ दिवस गायब करण्यात आले. ह्यातून एक मौज अशी झाली की २४ ऑक्टोबर १९१७ च्या ’महान् ऑक्टोबर क्रान्ती’चा ( The Great October Revolution) वार्षिक वाढदिवस सोवियट संघ अस्तित्वात असेतोपर्यंत नोवेंबरमध्ये साजरा होत असे. अशा सर्व देशांच्या त्या त्या दिवसातील ऐतिहासिक तारखा O.S./N.S. (Old Style/New Style) अशा दाखविण्याची प्रथा आहे.

आज पडलेल्या लीप दिवसाच्या मागे असा इतिहास आहे.

आता काही शब्द इस्लामच्या हिजरी दिनगणनेबद्दल. पवित्र कुराणातील सुरा ९.३६-३७ मध्ये असा आदेश आहे:

On the Day God created heaven and earth, He decreed that the numbr of months be twelve in number. Out of these four are sacred. That is the true religion. Do not wrong your souls in these months. Fight the polytheists all together, as they fight you all together, and know that the God is with the righteous.

The postponing (of sacred months) is but one more imstance of (their) refusal to acknowledge the truth - by which those who are bent on denying the truth are led astray. They declare this to be permissible in one year and forbidden in another year, so that they may adjust the months which God has sanctified, thus making lawful what God has forbidden. Their evil deed seems fair to them: God does not guide them who deny the truth. (मौलाना वहीदुद्दीन खान भाषान्तर.)

अल्बेरुनीने आपल्या The Chronology of Ancient Nations (tr. Dr. C. Edward Sachau) ह्या ग्रन्थामध्ये ह्याचा इतिहास पुढील शब्दांमध्ये दिला आहे.

Alberuni

अरेबिक महिन्यांची नावे इस्लाम-पूर्व काळात चालत होतॊ तीच चालू आहेत पण ही नावे इस्लाम-पूर्व चालीरीती, उत्सव इत्यादींची दर्शक होती. इस्लाम मानणार्‍यांना त्या चालीरितींपासून दूर ठेवण्यासाठी पैगंबराने कालगणनेमध्ये दिवस वाढविण्याची जुनी रीत इस्लामबाह्य ठरविली.

अशा रीतीने इस्लामचे हिजरी वर्ष ३५४ दिवसांचे असते. त्यामध्ये सर्व समसंख्यांक महिने २९ दिवसांचे आणि सर्व विषमसंख्यांक महिने ३० दिवसांचे असतात. ह्याची दरमहिना सरासरी २९.५ इतकी पडते. प्रत्यक्षामध्ये चंद्राचा महिना - पृथ्वीभोवती एक प्रदक्षीणा करण्याचा काळ २९.५३०५८९ इतके दिवस असतो. ही ०.०३०५८९ इतकी कसर भरून काढण्यासाठी दर ३० वर्षांमध्ये २,५,७,१०,१३,१६,१८,२१,२४, आणि २६ किंवा २९ ह्या ११ वर्षांमध्ये वर्षाचा शेवटचा महिना ३० दिवसांचा असतो. अशा रीतीने १९ वर्षे प्रत्येकी ३५४ दिवसांची आणि ११ वर्षे ३५५ दिवसांची होऊन ३० वर्षांमध्ये - ३६० महिन्यांमध्ये - १०,६३१ दिवस पडतात, ज्यांची दरमहाची सरासरी २९.५३०५५५ इतकी असते आणि ह्या मार्गाने दिनगणना आणि चन्द्राच्या प्रदक्षिणा ह्यांच्यामध्ये पुरेसा ताळमेळ राखला जातो.

इस्लामी दिनगणना सांपातिक वर्षाशी आणि ऋतुचक्राशी ताळमेळ राखत नाही ही गोष्ट राज्यकर्त्यांना नेहमीच गैरसोयीची वाटत आली आहे. करआकारणी ऋतूंशी ताळमेळ ठेवत नाही. ३० ऋतुचक्रांमध्ये १०,९५० दिवस पडतात. ३१ हिजरी वर्षांमध्ये १०,९८५ दिवस पडतात म्हणजे ३० वेळच्या पीकपाण्याच्या उत्पन्नामधून ३१ वर्षांचा शेतसारा रयतेला भरावा लागतो. ह्यावर इलाज म्हणून अकबराने ’फसली’ नावाची एक नवीन सौर कालगणना सुरू केली होती. त्याच्या कारकीर्दीपासून शहाजहानाच्या कारकीर्दीपर्यंत ती वापरात होती. तिचा उपयोग नंतरनंतर कमी होत गेला. निजामाच्या ताब्यातील हैदराबाद राज्यात मात्र ती अखेरपर्यंत टिकून होती आणि तेथून ती आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यांच्या महसूल पद्धतीमध्ये आजहि पाहण्यास मिळते असे वाचनात आले आहे.

१. अमावास्येच्या दिवशी पृथ्वीवरून पाहिल्यास चन्द्र आणि सूर्य एकाच रेषेत असतात. त्यांच्या रेखांशांमध्ये फरक नसतो. ते जणू ’एकाच जागी’ राहतात. ’अमावास्या’ हा शब्द ’अमा’ एकाच जागी, एकत्र आणि ’वास्य’ वसति ह्यापासून निर्माण झाला आहे. ’अमावास्या’ म्हणजे dwelling together.)

२. द्वादशारं नहि तज्जराय वर्वर्ति चक्रं परि द्यामृतस्य।
आ पुत्रा अग्ने मिथुनासो अत्र सप्त शतानि विंशतिश्च तस्थु:॥ ऋग्वेद १.१६४.११
सत्य भूत आदित्याचे बारा आरे असलेले चक्र द्युलोकाभोवती सदैव भ्रमण करीत असते तरी नाश पावत नाही. हे अग्ने, ह्या चक्रावर पुत्रांची ७२० जोडपी आरूढ झालेली असतात. - शंकर बाळकृष्ण दीक्षित.
Formed with twelve spokes, by length of time, unweakened, rolls round the heaven this wheel of enduring Order. Herein established, joined in pairs together, seven hundred Sons and twenty stand, O Agni. - Ralf TH Griffith.)

३, मधुश्च माधवश्च शुक्रश्च शुचिश्च नभश्च नभस्यश्चेषश्चोर्जश्च सहश्च सहस्यश्च तपश्च तपस्यश्च। उपयाम गृहीतोऽसि संसर्पोऽसि।अंहस्पत्याय त्वा॥ तैत्तिरीय संहिता १.४.१४
(हे सोमा) तू मधु, माधव, शुक्र, शुचि, नभस्, नभस्य, इष, ऊर्ज, सहस्, सहस्य, तपस्, तपस्य आहेस. तू उपयामाने (स्थालीने) घेतलेला आहेस. तू संसर्प, तू अंहस्पति आहेस. (शंकर बाळकृष्ण दीक्षित)
Thou art Madhu and Madhava; thou art Shukra and Shuchi; thou art Nabhas and Nabhasya; thou art Isha and Urja; thou art Saha and Sahasya; thou art Tapa and Tapasya. Thou art taken with a support.
Thou art Samsarpa. To Anhaspatya thee! (AB Keith translation)

वरील उतार्‍यांमध्ये मधु ते तपस्य ही बारा महिन्यांची नावे आहेत आणि संसर्प आणि अंहस्पति हे अनुक्रमे अधिकमास आणि क्षयमास आहेत. पुढे राशिकल्पना आणि तत्संबंधी नक्षत्रकल्पना भारतीय ज्योतिषात प्रविष्ट झाल्यावर मासांची ही वेदकालीन नावे जाऊन त्यांच्या जागी सध्याची प्रचलित चैत्र-वैशाखादि नावे आली. तरीहि कालिदासाच्या काळापर्यंत जुन्या नावांची स्मृति जिवंत होती. कालिदासाने ’प्रत्यासन्ने नभसि दयिताजीवितालम्बनार्थी’ - ’श्रावण मास जवळ आल्यावर विरहव्याकुल प्रियेचे आयुष्य लांबावे अशी इच्छा करणार्‍या’ अशा शब्दांनी यक्षाचे वर्णन केले आहे. येथे ’श्रावण मास’ ह्यासाठी त्याने ’नभस्’ हे वेदकालीन नाव वापरले आहे.

४. १ दिवस = ६० घटिका = ६०*६० पळे = ६०*६०*६० विपळे

५. चैत्र-वैशाखादि नावे कशी ठरतात ह्याविषयीचा नियम विद्यारण्यकृत ’कालमाधव’ नावाच्या ग्रंथामध्ये आहे तो असा:

मेषादिस्थे सवितरि यो यो मास: प्रपूर्यते चान्द्र:।
चैत्राद्य: स ज्ञेय: पूर्तिद्वित्वेऽधिमासोऽन्त्य:॥

मेषेत सूर्य असतांना ज्या चान्द्रमासाची पौर्णिमा होते तो चैत्र आणि असेच पुढे. एका राशीत दोन मास पूर्ण झाले तर दुसरा अधिक. (दुसर्‍यामध्ये संक्रान्ति नाही.)

६. ही अधिकमास आणि क्षयमास घालण्याची पद्धति निश्चित केव्हा सुरू झाली ह्याचा काही पुरावा उरलेला नाही. भास्कराचार्यांच्या ’सिद्धान्तशिरोमणि’ ह्या ग्रन्थाचा एक भाग ’गणिताध्याय’. त्याच्या ’अधिकमासादिनिर्णय’ ह्या प्रकरणामध्ये पुढील श्लोक आहेत जे वर वर्णिलेली सध्याची पद्धति दर्शवितात. म्हणजे गेली सुमारे १००० वर्षे तरी ही प्रथा चालत आली आहे.

असंक्रान्तिमासोऽधिमास: स्फुट: स्यात्
द्विसंक्रान्तिमास: क्षयाख्य: कदाचित्।
क्षय: कार्तिकादित्रये नान्यत: स्यात्
तदा वर्षमध्येऽधिमासद्वयं च॥
ज्या चान्द्रमासामध्ये सूर्यसंक्रान्ति मुळीच होत नाही त्यास अधिमास असे म्हणतात. ज्या चान्द्रमासामध्ये दोन सूर्यसंक्रान्ति होतात त्यास क्षयमास म्हणतात. हा क्षयमास क्वचित् येतो आणि तो कार्तिक-मार्गशीर्ष-पौष ह्या तीन महिन्यांमध्येच येतो, अन्य महिन्यांमध्ये येत नाही. त्या वर्षामध्ये दोन अधिमास येतात.

गतोब्ध्यद्रिनन्दैर्मिते शाककाले
तिथीशैर्भविष्यत्यथाङ्गाक्षसूर्यै:।
गजाद्र्यग्निभूमिस्तथा प्रायशोऽयम्
कुवेदेन्दुवर्षै: क्वचिद् गोकुभिश्च॥
असा क्षयमास ९७४ ह्या शकामध्ये आला होता आणि १११५, १२५६, १३७८ ह्या शकांमध्ये येईल. हा बहुतकरून १४१व्या किंवा क्वचित् १९व्या वर्षी येतो.
(अवान्तर - ह्या श्लोकामध्ये ’अङ्कानां वामतो गति:’ आणि सांकेतिक शब्दांनी संख्यादर्शन पाहण्यास मिळते.)

(हा लेख शंकर बाळकृष्ण दीक्षितलिखित 'भारतीय ज्योतिषशास्त्राचा इतिहास' तसेच 'Encyclopedia of Religion and Ethics, Vol. III,' ed. James Hastings ह्या ग्रन्थांमधील माहितीवर आधारलेला आहे. ईस्टर रविवार, ख्रिस्ताब्द कालगणना आणि अन्य तसलेच useless knowledge... ह्या 'ऐसी'मधील लेखातील माहितीहि वापरण्यात आली आहे.)

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

पाने

Subscribe to RSS - इतिहास