संस्कृती

भोजनकुतूहल - २

भाग १

ह्या भागामध्ये भोजनात वापरल्या जाणार्‍या काही मोजक्या ठळकठळक कृतींकडे वळू. ग्रन्थामध्ये सुमारे ३५०-४०० कृतींचे वर्णन आहे. येथे त्यांपैकी काही प्रातिनिधिक कृति दाखवितो. ग्रन्थकार प्रत्येक कृतीबरोबर आयुर्वेदाच्या दृष्टीमधून त्या त्या कृतीचे शरीराला होणारे लाभ वर्णन करतो.

आयुर्वेदामधील अधिकारी लेखक सुश्रुत ह्याने अन्नाचे सहा प्रकार सांगितले आहेत:

भक्ष्यं भोज्यं च पेयं च लेह्मं चोष्यं च पिच्छिलम् ‌।
इति भेदाः षडन्नस्य मधुराद्याश्च षड्रसाः ॥

षड्‌‍विध अन्न - १ मक्ष्य - चर्वण करून खाण्याचे - भाकरी, पोळी वगैरे, २ भोज्य - भात वगैरे, ३ पेय - प्यावयाचें, ४ लेह्य - चाटून खाण्याचें पंचामृत वगैरे, ५ चोष्य - चोखून खाण्याचें आणि ६ पिच्छिल - चटण्या - कोशिंबिरी.
षड्रस म्हणजे सहा चवी अशा:

मधुरो लवणस्तिक्त: कषायोऽम्ल: कटुस्तथा।
सन्तीति रसनीयत्वादन्नाद्ये षडमी रसा:॥ (शब्दकल्पद्रुम)

मधुर, खारट, तिखट, तुरट, आंबट आणि कडू हे अन्नामधील सहा रस.
भोजनकुतूहलकार ग्रन्थामध्ये एका जागी अन्नाचे सहा प्रकार असे दर्शवितो:

आहारं षड्विधं चोष्यं पेयं लेह्यं तथैव च।
भोज्यं भक्ष्यं तथा चर्व्यं गुरु विद्याद् यथोत्तरम्॥

तांदूळ, गहू अशा कोठल्याहि धान्यामध्ये चौपट, पाचपट, सहापट आणि चौदापट पाणी घालून धान्य शिजवले की अनुक्रमे विलेपी, भात, यवागु आणि पेया असे पदार्थ तयार होतात. पेयाहून थोडया अधिक घट्ट पदार्थाला यूप असे नाव आहे. येथील पेया म्हणजेच आपली परिचित पेज. येथील भात सध्याच्या कुकरमधील भाताहून अधिक शिजलेला आणि मऊ दिसतो. काञ्जिका म्हणजे भरडलेले धान्य पाण्यात घालून आंबवणे. भातामध्येच शिजतांना तांदुळाबरोबर कोणतीहि डाळ आणि आले-लसूण-हिंग घातले की कृसरा किंवा मिश्रोदन, अर्थात् खिचडी तयार होते. (हे वर्णन देणार्‍या श्लोकाच्या नंतर लेखकानेच कधीकधी ’भाषायाम्’ असा उल्लेख करून पदार्थाचे मराठी नाव दिलेले आहे. ’खिचडी’ हा शब्द असाच पुरविला आहे.) तांदुळात चांगले घुसळलेले दही चौपट, हरिद्रा (हळद), मरीच (मिरी) आणि अजाजि (जिरे) घालून शिजविले म्हणजे हरिद्रान्न तयार होते. शिजलेल्या भातात त्याच्या दुप्पट गोड दही, मिरीची पूड, आले आणि मीठ घातले की ’दध्योदन’ तयार होतो. ’घनश्याम सुंदरा’ मधील यशोदा मुकुंदाला ’मुकुंदा दध्योदन भक्षी’ असे सांगत आहे तोच हा दध्योदन दिसतो. असेच गुडोदन, परमान्न, कृसरोदन इत्यादि अन्य प्रकार सांगितले आहेत.

ह्यानंतर ’क्षीरी’ म्हणजे खीरप्रकरण. तुपावर टाकलेले तांदूळ गरम दुधामध्ये शिजवून त्यात साखर आणि तूप घातले की खीर तयार होते. ह्याच्यातच शिजतांना नारळाच्या खोबर्‍याचे लहान तुकडे टाकले की होते नारळाची खीर. ’समिता’ म्हणजे कणीक किंवा मैदा. कणकेचे लांब धागे काढून ते खिरीमध्ये शिजविले की सेविका म्हणजे शेवयांची खीर होते.

’सूप’ म्हणजे आमटीचे वर्णन अगदी थोडक्यात आहे. कोठलीहि डाळ मीठ, आले आणि हिंग घालून शिजविली की ’सूप’ म्हणजे आमटी तयार होते.

भाताचे प्रकार, क्षीरी आणि सूप ही ’भोज्य’ ह्या अन्नप्रकाराची उदाहरणे आहेत. ह्यानंतर सुरू होतो ’भक्ष्य’ गट. ह्या गटामध्ये भोजनकुतूहलकाराने नाना प्रकारच्या पोळ्या, रोटया, मांडे आणि नाना प्रकारांचे वडे, तसेच गोड प्रकार वर्णिले आहेत. त्यांपैकी काही ठळक असे.

गोधूमा धवला धूता: कुट्टिताश्शोधितास्तत:।
प्रोत्क्षिप्ता यन्त्रनिष्पिष्टाश्चालितास्समिता: स्मृता:॥
वारिणा कोमलां कृत्वा समितां साधु मर्दयेत्।
हस्तलालनया तस्या लोप्त्रीं सम्यक्प्रसारयेत्॥

शुभ्र गहू मळणी करून, साफ करून आणि पाखडून जात्यातून काढावेत आणि पीठ चाळून घ्यावे. ह्याला ’समिता’ म्हणजे कणीक (मैदा इति भाषायम्) म्हणतात. ही पाण्याने मऊ करून चांगली मळावी. हातावर पसरून तिची ’लोप्त्री’ म्हणजे उंडा बनवावा.

अधोमुखघटस्यैतां विस्तृतां प्रक्षिपेद्बहि:।
मृदुना वह्निना साध्यो सिद्धो मण्डक उच्यते॥

थोडया विस्तवावर खाली तोंड करून ठेवलेल्या घटावर तिला बाहेरून सगळीकडून पसरावे. अशा तर्‍हेने भाजलेला ’मंडक’ (मांडा) तयार होतो.

दुग्धेन साज्यखण्डेन मण्डकं भक्षयेन्नर:।
अथवा सिद्धमांसेन सतक्रवटकेन वा॥

तो दूध, तूपसाखर, शिजवलेले मांस किंवा दहीवडयासह खावा.
अशाच प्रकारे ’तप्तक’ म्हणजे तव्यावर भाजून ’पोलिका’ (पोळी) करावी आणि ती ’लप्सिके’बरोबर (लापशी) खावी.

समितां सर्पिषा भृष्टां शर्करां पयसि क्षिपेत्।
तस्मिन् घनीकृते न्यस्येल्लवङ्गमरिचादिकम्॥

लापशी करण्यासाठी कणीक तुपावर - सर्पिष् - भाजून साखरेसह दुधात शिजवावी. ती घट्ट झाल्यावर त्यात लवंग, मिरी इत्यादि घालावेत.

ह्याच मार्गाने पुढे जाऊन अंगारपोळी. रोटी, लिटी, अन्य धान्यांच्या रोटया, जसे जवाची, उडदाची इ. दर्शविल्या आहेत. पैकी ’लिटी’ हा शब्द आपल्या ओळखीचा नाही. तसेच तो मोल्सवर्थलाहि ठाऊक नाही पण बिहारमध्ये ’लिटी-चोखा’ नावाच्या प्रकाराचे बरेच कौतुक आहे असे जालावरून दिसते. ह्यानंतर पापड (पर्पटी) डांगर (झर्झरी) हेहि सांगितले आहेत.

अनेक प्रकारचे ’वटक’ म्हणजे वडे ग्रन्थामध्ये दाखविलेले आहेत. त्यासाठी उडीद, मूग इत्यादि भरडून आणि त्यात पाणी घालून ’पिष्टिका’ बनवायची आणि पिष्टिकेचे गोळे, त्यात मीठ, आले आणि हिंग घालून तेलामध्ये तळायचे अशी वटकांची प्रमुख कृति आहे.

माषाणां पिष्टिकां युक्तां लवणार्द्रकहिङ्गुभि:।
कृत्वा विदध्याद्वटकांस्तांस्तैले विपचेच्छनै:॥
असे वडे हिंग-जिरे घातलेल्या ताकामध्ये टाकावेत.
संचूर्य निक्षिपेत्तक्रे भृष्टहिङ्गु च जीरकम्।
लवणं तत्र वटकान्सकलानपि मज्जयेत्॥

’अलीकमत्स्य’ नावाचा एक वडा दाखविला आहे. ह्याला तळलेल्या माशाचा वास येतो म्हणून हे नाव. (अलीक = खोटे).

माषपिष्टिकया लिप्तं नागवल्लीदलं महत्।
तत्तु संस्वेदयेद्युक्त्या स्थाल्यामास्तारकोपरि॥
ततो निष्कास्य तं खण्डं ततस्तैलेन भर्जयेत्।
अलीकमत्स्य उक्तोऽयं प्रकार: पाकपण्डितै:॥
तं वृन्ताकभरित्रेण वास्तुकेनापि भक्षयेत्।
अलीकमत्स्याश्शुष्का वा किं वा क्वथिकया युता:॥

नागवेलीचे मोठे पान उडदाच्या पिष्टिकेने लेपून फडक्यावर ठेवून थाळीमध्ये भाजावे. तदनंतर त्याला तेलात तळावे. पाकविद्यानिपुण ह्याला ’अलीकमत्स्य’ असे जाणतात. तो वांग्याच्या - वृन्ताक - भरिताबरोबर, चाकवताबरोबर, कढीबरोबर किंवा नुसताच खावा.
क्वथिका (कढी अथवा कठिका) अशी करतात:

स्थाल्यां घृते वा तैले वा हरिद्राहिङ्गु भर्जयेत्
अवलेहनसंयुक्तं तक्रं तत्रैव निक्षिपेत्॥
एषा सिद्धा समरिचा कथिता क्वथिका बुधै:॥

हळद, हिंग आणि मिरी तेलावर वा तुपावर टाकून त्यामध्ये ताक अन्य मसाल्यांसह (अवलेहन?) घालावे. ह्याला विद्वान ’क्वथिका’ (कढी) म्हणतात.

आता काही मोजके गोड पदार्थ पाहू. प्रथम शंकरपाळे:

मण्डवत्समितां सिद्धां कृत्वा कुर्याच्च पोलिकाम्।
शृङ्गाटाकृतिकान् कुर्यात् खण्डशस्तान् पचेद् घृते॥
मज्जयेच्च सितापाके ततस्ते तु समुद्धृता:।
शङ्खपाला इति प्रोक्ता: पाकशास्त्रविशारदै:॥

मांडयासारखीच कणीक तयार करून त्याची पोळी लाटावी. तिचे त्रिकोणी तुकडे कापून ते तुपामध्ये तळावे. नंतर ते साखरेच्या पाकामधून काढावेत. ह्याला पाकशास्त्रविशारद शङ्खपाल - शंकरपाळे - म्हणतात.

समिताया घृताढयाया वर्तीर्दीर्घास्समाचरेत्।
तास्तु संनिहिता दीर्घा: पीठस्योपरि धारयेत्॥
वेलयेद् वेलनेनैतां यथैका पर्पटी भवेत्।
ततश्छुरिकया तां तु संलग्नामेव कर्तयेत्।
ततस्तु वेलयेद्भूय: शकटेन तु लेपयेत्।
ततस्संवृत्य तल्लोप्त्रीं विदधीत पृथक् पृथक्।
पुनस्तां वेल्लयेल्लोप्त्रीं यथा स्यान्मण्डलाकृति:॥
ततस्तां सुपचेदाज्ये भवेयुष्च पुटा: पुटा:।
सुगन्धया शर्करया तदुद्धूलनमाचरेत्॥
सिद्धैषा फेनिका नाम्नी मण्डकेन समा गुणा:॥

समितेमध्ये तूप घालून तिचे मोठे पोळे लाटावेत आणि ते पाटावर त्यांना एकमेकावर रचावेत. त्याला लाटण्याने लाटून पापडासारखे पातळ करावे. त्याची वळकटी करून सुरीने तिचे तुकडे पाडावेत. हे तुकडे साट्याने माखून त्याचे उंडे बनवावेत आणि हे उंडे लाटून गोलाकार करून तुपामध्ये तळावेत. ह्यामध्ये पापुद्रे निघतील. त्यांवर सुगन्धित साखर भुरभुरवावी. ह्याला ’फेणी’ म्हणतात आणि तिचे गुण मांडयासारखेच असतात. (शकट म्हणजे ’साटा’ - मोल्सवर्थ. शालिचूर्णं घृतं तोयमिश्रितं शकटं वदेत्। दोन थरांमध्ये घालण्याचे पीठ, लोणी, तूप अशा प्रकारचे भरण.)

वरील श्लोकांचा सुसूत्र अर्थ न समजल्याने जालावर ’फेणी’च्या कृति पाहिल्या पण सुतरफेणीपलीकडे काहीच हाती लागले नाही. अखेरीस विकिपीडियावरून असा अंदाज आला की ह्या कृतीला ’खाजा’ असेहि म्हणतात. खाजाच्या कृति बर्‍याचशा वरील वर्णनाशी जुळतात.

समितावेसने जीरहिङ्गुमारीचयोजिते।
घृताक्ते जलसंयुक्ते पीठस्योपरि वेल्लिते॥
घृतेन वाऽथ तैलेन भर्जिता पूरिका भवेत्॥

कणीक आणि बेसनामध्ये जिरे, हिंग आणि मिरी आणि तूप घालून पाण्यावर मळावे आणि त्याचे गोळे करून पाटावर लाटावे. ते तुपात अथवा तेलात तळले की पुरी तयार होते. (वेसन - दालयश्चणकानां तु निस्तुषा यन्त्रप्रेषिता:। तच्चूर्णं वेसनं प्रोक्तं पाकशास्त्रविशारदै:॥ चण्याची इत्यादि डाळ साफ करून जात्यावर - यन्त्र - त्याच्या केलेल्या पिठाला पाकनिपुण वेसन म्हणजे बेसन म्हणतात.)

मोतीचूर लाडू:

मुद्गानां धूमसीं सम्यग् घोलयेन्निर्मलाम्बुना।
कटाहस्य घृतस्योर्ध्वं झर्झरं स्थापयेत्तत:॥
धूमसीं तु द्रवीभूतां प्रक्षिपेज्झर्झरोपरि।
पतन्ति बिन्दवस्तस्मात् तान् सुपक्वान् समुद्धरेत्॥
सितापाकेन संयोज्य कुर्याद् हस्तेन मोदकान्॥
एवंप्रकारका: कार्या वेसनेनापि मोदकान्।

मुगाचे भरड पीठ (धूमसी) पाणी घालून पातळ करावे. उकळत्या तुपाच्या कढईवर झारा ठेवावा आणि पातळ पीठ त्यावर घालावे. तुपात पडलेले थेंब तुपावर चांगले शिजले म्हणजे त्यांना बाहेर काढून त्यामध्ये साखरेचा पाक घालावा आणि हाताने त्याचे लाडू बनवावेत. हे मोतीचुराचे लाडू. असेच बेसन इत्यादींचेहि लाडू करता येतात.

शेवेचे लाडू:

घृताक्तया समितया कृत्वा सूत्राणि तानि तु।
निपुणो भर्जयेदाज्ये खण्डपाकेन योजयेत्॥
युक्तेन मोदकान् कुर्यात् ते गुणैर्मण्डका यथा।

तूप मिसळलेल्या कणकेतून लांब शेवया काढाव्यात आणि त्या तुपामध्ये तळून त्यात साखरेचा पाक घालावा. त्याचे लाडू गुणांनी मांडयासारखे असतात.

ह्यानंतर जिलेबी किंवा कुण्डलिनी:

नूतनं घटमादाय तस्यान्त: कुशलो जन:।
प्रस्थार्धपरिमाणेन दध्नाम्लेन प्रलेपयेत्॥
द्विप्रस्थां समितां तत्र दध्यम्लं प्रस्थसंमितम्।
घृतमर्धशरावं च घोलयित्वा घटे क्षिपेत्॥
आतपे स्थापयेत्तावद्यावद्याति तदम्लताम्।
ततस्तु प्रक्षिपेत्पात्रे सच्छिद्रे भाजने च तत्॥
परिभ्राम्य परिभ्राम्य तत्संतप्ते घृते क्षिपेत्।
पुन: पुनस्तत्प्रवृत्य विदध्यान्मण्डलाकृतिम्॥
तां सुपक्वां घृतान्नीत्वा सितापाके तनुद्रवे।
कर्पूरादिसुगन्धे च श्रमयित्वोद्धरेत्तत:॥
एषा कुण्डलिनी नाम्ना पुष्टिकान्तिबलप्रदा।

नवा घडा घेऊन त्याच्या आतील भागावर अर्धा प्रस्थ (एक शेर) आंबट दही लेपावे. चार शेर कणीक, एक शेर दही आणि अर्धा शेर तूप चांगले मिसळून घडयामध्ये भरावे. मिश्रण आंबेपर्यंत घडा उन्हात ठेवावा. सच्छिद्र भांडयामध्ये काढून घेऊन मिश्रण उकळत्या तुपामध्ये पाडून आणि फिरवून फिरवून वर्तुळाकार आकृति करावी. ती चांगली तळली गेल्यावर तिला तुपातून काढून कापूर इत्यादींनी सुवासित केलेल्या घट्टसर साखरपाकामध्ये बुडवून काढावी. हिला कुण्डलिनी म्हणतात.

जिलेबी - झलाबिया हा प्रकार १६व्या-१७व्या शतकात मध्यपूर्वेकडून महाराष्ट्रात आला आणि तदनंतर देशभर पसरला हा रंजक इतिहास येथे आणि येथे वाचता येईल.

(भोजनकुतूहलकाराने ग्रन्थात कोठेच वजने अथवा मापांचा उल्लेख केलेला नाही. पुढील कोष्टक मला उदय चंद्र दत्तलिखित Materia Medica of the Hindus ह्या पुस्तकामध्ये मिळाले: ६ गुंजा = १ आणा, १२ गुंजा = १ माष, ८ माष = १६ आणे = १ तोळा, ८ तोळे = १ पल, ८ पल = ६४ तोळे = १ शराव शेर, २ शेर = १ प्रस्थ, ४ प्रस्थ = १ आढक, ४ आढक = १ द्रोण, १२.५ शेर = १ तुला. ११.६६ तोळे = १ ग्रॅम ह्या हिशेबाने १ प्रस्थ = १४९२ ग्रॅम अदमासे, म्हणजे साधारण दीड किलो इतका पडतो. वजनेमापे वेगवेगळ्या ग्रन्थांमध्ये वेगवेगळी दाखवलेली असतात पण २ शराव = १ प्रस्थ हे आयुर्वेदात वापरले जाणारे परिमाण आहे असे 'शब्दकल्पद्रुम' हा ज्ञानकोष सांगतो.)

आपल्या सर्वांच्या परिचित पुरणपोळीचे वर्णन एकाच ओळीत आहे:

पोळिका पूर्णगर्भा तु गुर्वी स्याद्गुडदालिता। (पूर्णपोली)

गूळ आणि डाळीचे मिश्रण भरलेली पोळी म्हणजे पूर्णपोली.

अपूप ह्या प्रकारात अनारसे असे दाखविले आहेत:

प्रक्षाल्य तण्डुलान्सम्यक् चूर्णयेत्तानुलूखले।
समया सितया योज्य मर्दयेत्तद्विचक्षण:॥
यथा पिण्डीभवेत् पिष्टं तथा लोप्त्रीं विधाय च।
बीजेषु वाहिफेनस्य निस्तुषेषु तिलेषु वा॥
प्रसारितां तां सुघृते पाचयेत्सुविचक्षण:।
भवन्ति ते ह्यनरसा रसिकानां मुदावहा:॥

तांदूळ धुवून त्यांना उखळामध्ये कांडून तेवढीच साखर त्यात घालून मिश्रण मळावे आणि लोप्त्री तयार करावी. खसखस किंवा तिळावर तिला लाटून तुपातून तळून काढावी. असे अनारसे रसिकांना आनंद देतात. (अहिफेनाचे बीज म्हणजे खसखस. अहिफेन म्हणजे अफू. अफयून - opium - ही चीज अरबांनी मध्ययुगामध्ये हिंदुस्थानात आणली असा उल्लेख उदय चंद्र दत्तलिखित Materia Medica of the Hindus येथे दिसतो.)

मांसाचे काही प्रकार आता पाहू. प्रथम अगदी साधे शुद्धमांस.

पाकपात्रे घृतं दद्यात्तैलं वा तदलाभत:।
तत्र हिङ्गुहरिद्रां च भर्जयेत्तदनन्तरम्॥
छागादेरस्थिरहितं मांसं तत्खण्डखण्डितम्।
धौतं निर्गलितं तस्मिन् घृते तद्भर्जयेच्छनै:॥
पाकयोग्यं जलं दत्त्वा लवणं च पचेत्तथा।
सिद्धे जलेन संसिच्य वेसवारं परिक्षिपेत्॥
द्रव्याणि वेसवारस्य नागवल्लीदलानि च।
तण्डुलाश्च लवङ्गानि मरीचानि समासत:॥
अनेन विधिना सिद्धं शुद्धमांसमिति स्मृतम्॥

भांडयामध्ये तूप, ते नसल्यास तेल टाकावे. हिंग आणि हळद त्यामध्ये तळून घ्यावी. त्यातच नंतर शेळीचे वगैरे अस्थिरहित केलेले मांस तुकडे करून, धुवून घेऊन आणि निथळून टाकावे आणि सावकाश तळून घ्यावे. आवश्यक तेवढे पाणी आणि मीठ टाकून ते शिजवावे. तयार झाल्यावर पाण्याने शिंपडून त्यामध्ये वाटण टाकावे. वाटणामध्ये विडयाची पाने, लवंगा, मिरी इत्यादि असतात. असे केलेल्या मांसास शुद्धमांस म्हणतात.

नंतर तक्रमांस:

पाकपात्रे घृतं दत्वा हरिद्राहिङ्गु भर्जयेत्।
छागादेस्सकलस्यापि खण्डान्यग्नौ तु भर्जयेत्॥
सिद्धियोग्यं जलं दत्त्वा पचेन्मृदुतरं यथा।
राजिकादियुते तक्रे मांसखंडानि धारयेत्॥

भांडयामध्ये तुपावर हळद आणि हिंग तळून घ्यावेत आणि शेळीच्या इत्यादि मांसाचे तुकडे विस्तवात भाजून घ्यावेत. नंतर योग्य तितके पाणी घालून मऊ शिजवावेत. मोहरी इत्यादि घातलेल्या ताकामध्ये मांसाचे तुकडे टाकावेत.

तलितमांस:

शुद्धमांसविधानेन मांसं सम्यक् प्रसाधितम्।
पुनस्तदाज्ये संभृष्टं तलितं प्रोच्यते बुधै:॥

शुद्धमांस तयार झाल्यावर ते तुपामध्ये तळून घेतल्यास त्यास विद्वान् ’तलितमांस’ असे संबोधतात.

शूल्यमांस (आपले परिचित शीखकबाब):

कालखंडादिमांसानि ग्रथितानि शलाकया।
घृतं सलवणं दत्त्वा निर्धूमे दहने पचेत्॥
तत्तु शूल्यमिति प्रोक्तं पाककर्मविशारदै:॥

यकृत् (कालखण्ड) इत्यादि मांस सळईवर अडकवून तूप आणि मीठ लावून धूर नसलेल्या विस्तवावर भाजून घ्यावेत. ह्याला पाकर्मविशारद शूल्यमांस असे म्हणतात.

अखेरीस मांसशृङ्गाटक म्हणजे समोसे:

शुद्धमांसं तनूकृत्य कर्तितं स्वेदितं जले।
लवङ्गहिङ्गुलवणमरीचार्द्रकसंयुतम्॥
एलाजीरकधान्याकनिम्बूरससमन्वितम्।
घृते सुगन्धे तद्भृष्टं पूरणं प्रोच्यते बुधै:॥
शृङ्गाटकं समितया कृतं पूरणपूरितम्।
पुन: सर्पिषि संभृष्टं मांसशृङ्गाटकं वदेत्॥

शुद्धमांसाचे बारीक तुकडे करून त्यांना आणखी कापावे. (हा खिमा.) त्यामध्ये लवंग, हिंग, मीठ, मिरी, आले, तसेच वेलदोडा, जिरे, धणे आणि लिंबाचा रस घालून त्यास तुपामध्ये तळावे. ह्याला विद्वान् ’पूरण’ असे ओळखतात. कणकेचे त्रिकोण करून त्यांमध्ये हे पूरण घालून पुन: तुपावर तळले म्हणजे त्यास मांसशृङ्गाटक (समोसे) म्हणतात.

ह्यानंतर नाना कंद, फळभाज्या, पालेभाज्या इत्यादींचे उल्लेख असून त्यांची नावे आणि आयुर्वेदिक गुण वर्णिले आहेत. त्यातील काही उल्लेखनीय असे:

कंदामध्ये पलाण्डु (कांदा), आर्द्रक (आले) हरिद्रा (हळद), लशुन-रसोन (लसूण), सूरण (सुरण) अशी परिचित नावे आहेतच पण अन्य असे अनेक कंद आहेत की जे आज आपणास भाजीबाजारात कोठेच दिसत नाहीत आणि ज्यांना आपण ओळखूहि शकत नाही. पिण्डालु - मोहलकांदा, रक्तालु, कांसालु, फोडालु, पानीयालु असे अनेक ’आलु’ प्रकारात मोडणारे कंद उल्लेखिले आहेत. ह्यांपैकी ’पिण्डालु’ ह्याचा उल्लेख मला Materia Medica of the Hindus येथे मिळाला आणि तेथे त्याला Dioscorea globosa असे नाव भारतातील वनस्पतिशास्त्राचे जनक विल्यम रॉक्सबर्ग ह्यांनी दिलेले आहे असा उल्लेख मिळाला. ह्या नावाचा अधिक शोध घेता चित्रावरून असे दिसले की आज आपण ज्याला ’कोनफळ’ म्हणतो तो हा कंद आहे. (कोनफळ विशेष कोठे आढळत नाही पण कोनफळी रंग सर्वांस माहीत आहे.) अशा सर्व कंदांना ’आलु’ म्हटलेले आहे आणि त्यामध्येच ’रक्तालु’ म्हणजे सर्वपरिचित रताळेहि आहे. मौजेची बाब अशी की ’आलु’ ह्याचा मूळचा अर्थ आता लोपून जाऊन ’बटाटा’ ह्या कंदाचा तो समानार्थी शब्द बनला आहे, यद्यपि बटाटा भारतात पुष्कळ उशीराने आलेला आहे. दिवाळीच्या उटण्यात भेटतो तो कर्चूर-कचोरा, तसेच शृङ्गाटक-सिंघाटे (आजचा शिंगाडा) हेहि कंदगटामध्ये भेटतात.

फळभाज्यांमध्ये कूष्माण्ड-कोहळा, तुम्बी-भोपळा, कलिङ्ग-कलिंगड, खर्बूज-खरबूज, कोशातकी-दोडका, पटोल-परवल, निष्वाप-घेवडा, वाकुची-गोवारी, शिग्रु-शेवगा, तुण्डी-तोंडली, कारवेल्ल-कारले, कर्कटी-काकडी, वृन्ताक-वार्ताकी-वांगे, भेण्डा-भेंडी, चिंचा-अम्लिका-चिंच-इमली (हिंदी) अशा ओळखीच्या तर देवडांगर, वाळुक, चिर्भीट, सेंदणी, दिंडसे, कुहिरी अशा मराठी नावाने लेखकाने उल्लेखिलेल्या अपरिचित फळभाज्याहि दिसतात. केळी, बोरे, लिंबू, आवळा अशांच्या अनेक उपजाति वर्णिल्या आहेत. लिंबाच्या आयुर्वेदास माहीत असलेल्या जम्बीर, लिम्पाक, निम्बूक, वीजपूर, मधुकर्कटिका, मातुलुङ्ग, करुणा आणि नागरङ्ग अशा आठ जाती Materia Medica of the Hindus येथे दर्शविल्या आहेत. ह्यापैकी जम्बीर म्हणजे पिवळ्या सालीचे मोठे लिंबू, ज्याला lemon असे म्हणतात ते आणि लिम्पाक म्हणजे वरणभातावर वापरतात ते हिरवे लिंबू lime अशी माझी समजूत आहे. मातुलुङ्ग म्हणजे महाळुंग.

पत्रशाक म्हणजे पालेभाज्यांमध्ये वास्तुक-वास्तूक-चाकवत, चुक्र-चुका, शिग्रुपत्र-सेउगपत्र-शेवग्याची पाने, पालख-पालक, पुष्कल-पोकळा, राजशाकिनिक-राजगिरा, मारिष-माठ, शतपुष्पा-सेउप-शेपू, तण्डुलीय-तांदुळजा, अम्बष्टा-आंबाडा अशा ओळखीच्या तर पिंपलगा, कामोणी, सण, सराटे, वासेनी, भोपनी अशा पूर्ण अपरिचित भाज्या दिसतात.

ह्या पुढील तिसर्‍या भागामध्ये दूध-ताक-दही-तूप, शिखरिणी, ऊस-साखर-मीठ, मद्य अशा काही गोष्टींकडे जाऊ.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

आरती संग्रह (मराठी) - नेहमीच्या वापरासाठी आम्ही बनवलेलं नवीन अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप

नमस्कार मंडळी.

सर्वांना नेहमीच्या वापरातल्या आरत्या, श्लोक, आणि मंत्र सहज आणि सोप्प व्हाव म्हणून मी आणि माझ्या साथीदारांनी "आरती संग्रह (मराठी)" नावाचे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप तय्यार केले आहे. हे अ‍ॅप वापरण्यासाठी एकदम सोप्पे, आकर्षक, आणि सुटसुटीत असे आहे किंबहुना तसा बनवण्याच्या प्रयत्न केला आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे हे अ‍ॅप निशुल्क वापरण्यासाठी उपलब्ध आहे.

कित्त्येक वेळा आरत्या म्हणताना चुकतात किंवा आपल्याला शब्द आठवत नाहीत. अश्यावेळी, "आरती संग्रह (मराठी)" अ‍ॅप जरूर उपयोगी पडेल अशी प्रामाणिक अपेक्षा आहे.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

संत अन स्त्रीरुप

सर्वात आधी हे स्पष्ट करते की मी कोणत्याही धर्माचा , सखोल अभ्यास केलेला नाही. पण एक हौस्/छंद म्हणून शीख, ख्रिश्चन, हिंदू आदि धर्मांतील गोष्टी/श्लोक वाचल्या आहेत. बर्‍याच वेळा असे आढळले आहे की - संत हे स्वतःला स्त्री (वधू) मानून परमेश्वराची (पतीची) आराधना करतात. या संदर्भात एक असे विश्लेषण ऐकले होते की परमेश्वर हा धनभारीत (देणारा दाता) असून आपण नेहमीच ऋणभारीत (घेणारे/याचक) असतो अन तो दाता - याचक
संबंध या कथा दर्शवितात.

चैतन्यमहाप्रभू देखील स्वतःला राधा समजत. त्यांनी स्वतःचे प्रतिबिंब पाण्यात पाहीले अन त्यांना राधारुप दिसले वगैरे आख्यायिका प्रचलित आहेत.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

भोजनकुतूहल - १

शीर्षकात दाखविलेले स्वयंपाक ह्या विषयावरचे ’भोजनकुतूहल’ हे पुस्तक मला DLIच्या संस्थळावर दिसले. असले विषय संस्कृत लिखाणात क्वचितच दृष्टीस येतात म्हणून कुतूहलाने ’भोजनकुतूहल’ उतरवून घेतले आणि चाळले.  त्यातून वेचलेले काही वेधक उल्लेख येथे दाखवीत आहे.

पुस्तक ’रघुनाथ’ नावाच्या लेखकाने १७व्या शतकाच्या शेवटाकडे लिहिले असावे.  त्याची मजसमोरील आवृत्ति १९५६ साली (तत्कालीन) त्रावणकोर विद्यापीठाच्या विद्यमाने मुद्रित झाली आहे.  पुस्तकाचा लेखनकाल, त्याचा लेखक रघुनाथ आणि त्याच्या अन्य कृति ह्याविषयी भांडारकर प्राच्यविद्या संस्थेचे डॉ.प.कृ.गोडे ह्यांनी केलेल्या संशोधनाचा सारांश ह्या लेखाच्या अखेरीस लिहिला आहे.

वेगवेगळे खाण्याचे पदार्थ कसे कसे करावे, त्यांच्यामध्ये कायकाय घालावे असे जे मार्गदर्शन सध्याच्या पाककृति ह्या विषयांवरच्या पुस्तकांमध्ये असते तसे ह्या पुस्तकात फार थोडे आहे.  काही ठळकठळक प्रकार कसे बनवायचे असे मार्गदर्शन देऊन त्या प्रत्येक गोष्टीचे शरीरावर काय परिणाम होतात त्याचे आयुर्वेदाच्या अंगाने विवेचन असे पुस्तकाचे स्वरूप आहे.  दिलेले प्रकारहि आजच्या पेक्षा काही फार वेगळे आहेत असे नाही.  तरीपण पुस्तक मनोरंजक वाटते ते अशासाठी की १७व्या शतकात लोक काय खात होते आणि काय खात नव्हते, कोणते अन्नघटक उपलब्ध होते आणि कोणते नव्हते ह्याचे सामाजिक इतिहासाच्या संदर्भात उपयुक्त असे दर्शन ह्यातून होते.  काही काही कृति वापरातून अजिबात गेल्या आहेत, काही काही वेगळ्या नावांनी पुढे येतात तर काही काहींचे दर्शक शब्द आता विस्मरणात गेले आहेत असे लक्षात येते.

पुस्तकाची काही प्रमुख प्रकरणे अशी आहेत:

१) शूकधान्यप्रकरण. ह्यामध्ये शूकधान्ये - शालि (तांदूळ), गोधूम (गहू), यव (जव) आणि यावनाल (ज्वारी) - ह्यांचे प्रकार.  ’शूक’ म्हणजे कणीस.  ही धान्ये कणसांमधून मिळतात.  ( पुस्तकातील वर्गीकरण हे पारंपारिक आयुर्वेदिक असून लिनेअसच्या वनस्पतिवर्गीकरणाशी काही संबंध ठेवत नाही हे ध्यानात ठेवायला हवे.). ह्या प्रत्येक धान्याचे आयुर्वेदाच्या दृष्टीने काय गुणदोष आहेत त्यांचे वर्णन सुश्रुत, भावप्रकाश, राजनिघण्टु, वाग्भट अशा ग्रंथांमधील अवतरणांच्या आधारे दिलेले आहे.  ह्यापुढे वर्णिलेल्या अन्य गोष्टींबाबतहि असेच केले आहे.

शूकधान्यांपैकी शालि आणि यावनाल ह्यांच्या अनेक पोटजाती दर्शवून त्यांना मराठीमध्ये काय म्हणतात ह्याचेहि एकेका शब्दात दिग्दर्शन आहे.  ( लेखक रघुनाथ हा मराठीभाषिक होता.  ह्याच्याविषयी पुढे अधिक माहिती येईलच.) शालिविषयात वेगवेगळ्या ग्रंथांमधून घेतलेली असे प्रकार पुढीलप्रमाणे -  राजशालि (महाराष्ट्रात रायभोग, आन्ध्रात राजान्न), कृष्णशालि (गोदातीर), रक्तशालि (तामसाळ?), स्थूलशालि अथवा महाशालि (कोळम, कृष्णा-तुंगभद्रा अंतर्वेदीमध्ये विख्यात), सूक्ष्मशालि, गन्धशालि किंवा प्रमोदक (कमोद), षाष्टिका (साठ दिवसात होणारी, मालव प्रान्तातील) आणि असेच आणखी काही.

यावनाल म्हणजे ज्वारी हिच्या उपप्रकारांमध्ये पांढरी (लटोरा, मोल्सवर्थने ह्याचा अर्थ अरगडी असा दिला आहे), तांबडी, शारद म्हणजे हिवाळ्यात होणारी (शाळू) आणि मका (मक्का, हा बालप्रिय असल्याचा उल्लेख आहे म्हणजे मक्याची कणसे भाजून खायचा उद्योग असणार) इतके प्रकार दर्शविले आहेत.  मका ज्वारीखाली टाकला आहे ह्याबाबत काही लिखाण नंतर येईल.  अखेरीस बाजरीचाहि अस्फुट उल्लेख ज्वारीखालीच केला आहे.  रघुनाथाने त्याला त्रोटकपणे ’सजगुरे’ असे म्हटले आहे आणि मोल्सवर्थप्रमाणे ह्याचा अर्थ ’बाजरी’ असा आहे.

२) शिम्बीधान्यप्रकरण - शेंगांमधून मिळणारी धान्ये.  ह्यामध्ये मुद्ग (मूग), मसूर, माष (उडीद), चणक (हरभरे), लंका (लाख) - एक गुलाबी डाळ, ही खाल्ल्याने लकवा होतो अशी समजूत आहे.  उत्तर भारतात हिचा वापर आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटांमधे अधिक होतो - तुवरी (तूर), कुलित्थ (कुळीथ), मकुष्ठ (मोठ म्हणजे मटकी), तिल (तीळ), सर्षप (मोहरी), निष्पाव (वाल?), अतसी (जवस), कलाय (मटार) इत्यादींचा समावेश आहे.  ’शेंग’ हा शब्द ’शिम्बी’चाच अपभ्रंश दिसतो. शेंबी असाहि शब्द मी ऐकला आहे आणि मोल्सवर्थ इ. कोशांमधून त्याचा अर्थ ’टोपण’ अशा अंगाने दिला आहे.  तोहि येथून निघाला असावा.

३) तृणधान्यप्रकरण - ह्यामध्ये प्रियंगु (राळे), कोद्रव (हरीक), वरक (वरई), श्यामाक (सावे) अशी काही गवताच्या बियांसारखी असणारी धान्ये दिली आहेत.

४) चौथ्या प्रकरणात धान्यांपासून काही प्रक्रियेने होणार्‍या वस्तु, म्हणजे भाजून केलेल्या लाजा (लाह्या), कुटून केलेले पृथुक (पोहे), अर्धपक्व धान्ये गवतावर भाजून होलक (हुरडा), धान्य भिजवून केलेले कुल्माष (घुगर्‍या), यन्त्रपिष्ट (जात्यामध्ये धान्य भरडून केलेले) सक्तु (सत्त्व), भाजलेले चणे (फुटाणे), मिठाचे पाणी शिंपडून भाजलेले (मिठाणे), तेच तेलात तळलेले (उसळे) अशा गोष्टी आहेत.

अशा ह्या सर्व प्रकारच्या धान्यांचे उल्लेख भारतीय प्राचीन वाङ्मयात अनेकदा मिळतात.  यजुर्वेदान्तर्गत अशा प्रसिद्ध रुद्रसूक्तात सूक्तकार रुद्रांकडून ज्या ज्या अनेक गोष्टींची प्रार्थना करतो त्यांमध्ये ’व्रीहयश्च मे यवाश्च मे माषाश्च मे तिलाश्च मे मुद्गाश्च मे खल्वाश्च मे गोधूमाश्च मे मसुराश्च मे प्रियंगवश्च मेऽणवश्च मे श्यामाकाश्च मे नीवाराश्च मे’ अशाहि मागण्या आहेत.

५) ग्रन्थकर्ता ह्यापुढे शिजवलेल्या अन्नाकडे वळतो.  येथे नाना प्रकारचे भात, खिरी, पोळ्या, सूप म्हणजे आमटी, क्वथिका म्हणजे कढी, वटक (वडे), शिखरिणी, जिलबी, शंखपाल (शंकरपाळे), मांसाचे प्रकार, मद्य इत्यादींची वर्णने आहेत.  ह्या मनोरंजक विषयांकडे आणि उर्वरित ग्रंथाकडे पुढील भागामध्ये पाहू.

मिरची, बटाटा, भुईमुगाच्या शेंगा, टोमॅटो ह्या आजच्या मराठी - किंबहुना भारतीय -आहारातील महत्त्वाच्या घटकांचा ग्रंथामध्ये मुळीच उल्लेख नाही.  ग्रंथातील सर्वात अधिक तिखट गोष्ट म्हणजे मरीच किंवा मिरी.  तिचे उल्लेख मुबलक आहेत.  आर्द्रक म्हणजे आलेहि ह्या संदर्भात अनेकदा दिसते पण मिरची कोठेच नाही.  ह्याचे कारण असे की स्पॅनिश विजेत्यांना ह्या दक्षिण अमेरिकेतील मूळच्या गोष्टी तेथे माहीत होऊन त्या युरोपात पोहोचायला १५व्या शतकाची अखेर आली आणि तेथून त्या पोर्तुगीज-स्पॅनिश वसाहतकारांबरोबर आफ्रिका-आशियात पसरल्या.  रघुनाथाने प्रस्तुत ग्रंथ लिहीपर्यंत त्या दक्षिण भारतात पुरेशा प्रसार पावलेल्या नसाव्यात.  अपवाद दोन गोष्टींचा - मक्याचा उल्लेख यावनाल (ज्वारी) प्रकारात आला आहे हे वर उल्लेखिलेले आहे.

प्रस्तुत ग्रंथाचा लेखक रघुनाथ कोण असावा? ग्रंथाच्या प्रस्तावनेमध्ये पूर्वी भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूटचे बरीच वर्षे क्यूरेटर असलेले डॉ.प.कृ.गोडे ह्यांच्या संशोधनाच्या आधारे असे लिहिले आहे की हा रघुनाथ नवहस्त (नवाथे) आडनावाचा एक महाराष्ट्रीय कर्‍हाडा ब्राह्मण समर्थ रामदासांच्या परिवारात होता आणि रामदासांनी त्याला लिहिलेली पत्रे उपलब्ध आहेत.  काही काळ चाफळच्या राममंदिराच्य़ा देखभालीचे काम त्याच्याकडे होते.  नंतर १६७८च्या सुमारास तो दक्षिणेकडे भोसले घराण्याच्या तंजावर शाखेच्या आश्रयास गेला. त्याचे अन्य सात संस्कृत आणि तीन मराठी ग्रंथ माहीत आहेत.

त्याचे हा तंजावर संबंध पाहता अशी शंका घेता येईल काय की नलदमयन्तीस्वयंवराचा कवि रघुनाथपण्डित तो हाच काय?  असे मी फार सावधपणे लिहीत आहे कारण डॉ गोडेंनी असे कोठेहि सुचविलेले नाही.  परन्तु विश्वकोशामधील रघुनाथपंडितावरील लेखन आणि महाराष्ट्रसारस्वताच्या पुरवणीमध्ये डॉ.शं.गो.तुळपुळे ह्यांचे त्याच्यावरील लिखाण ह्या दोहोंमध्ये तो तंजावरला १६७५च्या पुढे गेल्याचा उल्लेख आहे, तसेच तो रामदासांच्या परिवारातील एक होता असेहि म्हटले आहे. भोजनकुतूहलकार रघुनाथ आणि नलदमयंतीकार रघुनाथपंडित ह्यांच्या चरित्रांतील हे समान दुवे पाहता ते दोघे एकच व्यक्ति असण्याची शक्यता दृष्टिआड करता येईल काय?

(नलदमयंतीस्वयंवरातील हा श्लोक, कमीतकमी त्यातील शेवटची ओळ, बहुतेकांस माहीत असते:
तदितर खग भेणें वेगळाले पळाले।
उपवन जलकेली जे कराया मिळाले।
स्वजन गवसला जो त्याजपाशी नसे तो।
कठिण समय येता कोण कामास येतो?)

धाग्याचा प्रकार निवडा: : 

तेलंगण

तेलंगणचा प्रश्नाने सध्याच्या सरकारसाठी एका चिघळलेल्या गळूचं स्वरूप धारण केलं आहे. मुळात भारतीय संघराज्य संरचनेत, स्वतंत्र राज्यांसाठी इतका टोकाचा संघर्ष करण्याची गरज पडू नये अशी लवचीकता आहे. पण तरीही हा प्रश्न चिघळतच गेला आहे. याला काँग्रेसचे सद्य सरकारच जबाबदार आहे हा निष्कर्ष आततायी ठरावा. मुळात हा प्रश्न नवा नाही किंवा "तेलंगण हे स्वतंत्र राज्य असावे का?" यावरील उहापोहही स्वतंत्र भारताला नवीन नाही. हैदराबाद संस्थान भारतात समाविष्ट केल्यापासून हा प्रश्न अस्तित्वात आहे. अर्थातच, हैदराबादच्या विलिनीकरणाच्याही आधी किंबहुना भारतीय स्वातंत्र्यपूर्व काळापासून या प्रांताचा इतिहास आहे.

धाग्याचा प्रकार निवडा: : 

ऐसी अक्षरे कुल सम्मेलन, पुणे (वृत्तांतासहित)

(नवीन धागा काढण्याऐवजी याच धाग्यात वृत्तांत लिहितो आहे - राजेश घासकडवी)

धाग्याचा प्रकार निवडा: : 

मनोरमाबाई रानडे

आजच्या दिनविशेषात रविकिरण मंडळातील कवयित्री मनोरमा रानडे ह्यांचा १३ जानेवारी १८९६ हा जन्मदिन आणि १३ जानेवारी १९२६ हा मृत्युदिन अशी नोंद आहे. ती वाचून सुचलेले काही विचार.

धाग्याचा प्रकार निवडा: : 

ऐसी अक्षरे सांस्कृतिक कट्टा १ - पुणे फिल्म फेस्टिवल

सध्या ऐसी सदस्यांसाठी कट्टा करण्याचं घाटतं आहे. त्यावरून आठवलं. ऐसी अक्षरेतर्फे काही सांस्कृतिक कट्टे व्हावेत अशी इच्छा स्थापनेपासूनच व्यक्त केलेली होती. त्यात नुसतंच कट्ट्याला भेटण्यापेक्षा काहीतरी कार्यक्रम एकत्र करावा, पहावा आणि त्याबरोबर गप्पाटप्पा व्हाव्यात अशी कल्पना होती. पुण्यात लवकरच सुरू होत असणारं फिल्म फेस्टिवल ही या दृष्टीने उत्तम संधी आहे.

सांस्कृतिक कट्ट्यांमध्ये येऊ शकणाऱ्या गोष्टी.

धाग्याचा प्रकार निवडा: : 

पाने

Subscribe to RSS - संस्कृती