’इन्क्विझिशन’ ही रोमन चर्चमधील एक संस्था कॅथलिक चर्चचे पावित्र्य अबाधित ठेवण्याच्या हेतूने ९व्या ग्रेगरी - पोप असण्याचा काल १२२७ ते १२४१ - ह्या पोपने सुरू केली. पाखंड शोधून त्याचा नाश करणे हा त्याचा हेतु होता. त्या काळामध्ये युरोपात बहुतेक सर्व देशांमध्ये कॅथलिक चर्चचेच आदेश पाळले जात. प्रत्येक राजाने आपापल्या सत्तेच्या भागात इन्क्विझिटर नावाचे खास अधिकारी नेमून चौकशी करून शिक्षा देण्याचे विशेष अधिकार त्यांना द्यावेत आणि त्यांच्यासाठी विशेष सोयी निर्माण कराव्यात असा पोपचा आदेश होत. तदनुसार ’होली रोमन एम्परर’ दुसरा फ़्रेडेरिक आणि फ्रान्सचा राजा ९वा लुई ह्यांनी इन्क्विझिटर्स नेमले आणि संशयित पाखंडी व्यक्तींना पकडून अमर्याद काळापर्यंत तुरुंगात डांबून, तसेच त्यांना शारीरिक यातना देऊन त्यांच्याकडून पाखंड कबूल करवून घेण्याची अमर्याद सत्ता अशा इन्क्विझिटर्स कोर्टांना बहाल केली. पाखंड सिद्ध झाल्यास मृत्युदंड द्यायचे अधिकारहि त्यांना होते आणि राजसत्ता त्यांच्या कारभारात कसलाहि हस्तक्षेप न करण्यास बांधलेली होती.
लवकरच इन्क्विझिटर्स कोर्टांची ’न भूतो न भविष्यति’ अशी दहशत सर्व युरोपात पसरली. कबुली मिळेपर्यंत संशयिताचा छळ करणे, सांगोवांगीवरून किंवा कोणाच्या तक्रारीवरून संशयिताला ताब्यात घेणे असे प्रकार फैलावले. कोणाच्या पाखंडाची माहिती असतांनाहि ती कोर्टापुढे न आणणे हाहि गुन्हा ठरला आणि त्यामुळे स्वत:च्या सुरक्षिततेच्या भीतीमधून दुसर्यावर आरोप करणे असले प्रकार बळावले आणि इन्क्विझिटर्स कोर्टांची सत्ता आणि दहशत अमर्याद झाली.
ज्यू धर्म हा येशूच्या मारेकर्यांचा धर्म म्हणून आणि मुस्लिम धर्म ख्रिश्चनांची पवित्र स्थाने ताब्यात ठेवणारा प्रतिस्पर्धी धर्म म्हणून इन्क्विझिशनचे विशेष लक्ष्य ठरले. तसेच ख्रिश्चन धर्मविरोधी वर्तन, समलिंगी आणि अनैसर्गिक प्रकारचे लैंगिक वर्तन, एकाहून अधिक बायका असणे अशी गुन्ह्यांची संख्या वाढू लागली.
पश्चिम युरोपात, विशेषत: स्पेनमध्ये, मूरिश अरबांची सत्ता सुमारे ४०० वर्षे टिकून होती. फ्रान्सच्या सीमेपर्यंत त्यांचा प्रसार झाला होता. चार्ल्स मार्टेलने ७३२ मध्ये तूरच्या लढाईत अरबांचा फ्रान्समधील प्रसार थोपवला होता पण सर्व स्पेन अरबांच्या कमीअधिक ताब्यात होते. कास्तिलची राणी इझाबेला आणि आरगॉनचा राजा फर्डिनंड ह्याच्या विवाहानंतर स्पेनमधील ख्रिश्चन पक्षातील दुफळी मिटून आधुनिक स्पेनचा उदय होण्यास सुरुवात झाली - १५व्या शतकाचा दुसरा अर्धभाग - आणि त्यांच्या सत्तेच्या काळात इन्क्विझिशनला आणखीनच बळ मिळाले. अरब सत्तेचा शेवट करायला प्रारम्भ तर त्यांनी केलाच पण त्या बरोबरच सर्व ज्यू- धर्मियांची आपल्या देशातून त्यांनी हकालपट्टी केली. त्यांच्या ह्या कॅथलिक निष्ठेमुळे Their Most Catholic Majesties असे स्वत:ला म्हणवून घ्यायची मुभा पोपने त्यांना दिली होती.
वर वर्णिलेल्या पाखंडाला आणखी एक जोड ज्यू हकालपट्टीबरोबर मिळाली. ती म्हणजे relapsed christians असण्याचा आरोप. पुष्कळ ज्यू लोकांनी देश सोडण्याऐवजी धर्म बदलून कॅथलिक होणे पसंत केले होते. असे बाटगे हे धर्माशी खरेखुरे एकनिष्ठ नाहीत अशी शंका उपस्थित करून ज्यू लोकांना relapsed christians म्हणून त्रास देण्याचा नवा प्रकार सुरू झाला. कोणी असा ख्रिश्चन डुकराचे मांस खात नाही अशी शंका घेऊन त्याच्याविरुद्ध कारवाई करण्याची प्रथा पडली. (Goya's Ghosts नावाचा चित्रपट यूट्यूबर उपलब्ध आहे. गोया ह्या प्रख्यात स्पॅनिश चित्रकाराची मैत्रीण इनेस ही डुकराचे मांस खात नाही ह्या आरोपावरून इन्क्विझिशनने तिल्या ताब्यात घेतले. दरबारामध्ये आणि चर्चमध्ये असलेले आपले वजन वापरून तिची सुटका घडवण्याचे गोयाचे प्रयत्न हा ह्या चित्रपटाचा विषय आहे.
इन्क्विझिशनचे काम मोठ्या गंभीरपणे चालत असे. आरोपींची शारीरिक छळ, बनावट साक्षी असे सर्व मार्ग वापरून चौकशी झाल्यावर काही सुदैवी सुटून बाहेर येत पण गुन्हा सिद्ध झालेल्यांना मालमत्ता जप्तीपासून जळून मारण्यापर्यंत अनेक शिक्षा होऊ शकत. वर्षामधून एक किंवा दोन वेळा अशा शिक्षांची सार्वजनिक अमलबजावणी होत असे. माद्रिद शहरामध्ये Plaza Mayor हा शहरातील प्रमुख चौक ही तेथील इन्क्विझिशनची जागा आजचे महत्त्वाचे टूरिस्ट डेस्टिनेशन झाले आहे. गावातील प्रमुख चौकामध्ये चारी बाजूंनी प्रेक्षकांची बसायची सोय करून उच्चासनावर इन्क्विझिटर न्यायालय बसत असे आणि दंडित आरोपी तेथे समारंभाने आणले जात. त्यांच्या शिक्षा येथे त्यांना वाचून दाखवल्या जात पण आपापल्या शिक्षा दुर्दैवी दंडितांना आधीच ठाऊक असत कारण शिक्षेच्या वेळी त्यांनी वापरायचे कपडे त्या त्या शिक्षेनुसार ठरलेले असत. जाळून मारण्याची - burning at stake - san benito नावाची पिवळी उंच निमुळती टोपी घातलेली असे आणि त्यांच्या अंगावरच्या पिवळ्या लांब कपड्यावर क्रूस, विस्तवाच्या ज्वाला आणि सैतानाच्या दूतांच्या चित्रांनी वेढलेले त्याचे स्वत:चे चित्र असे. हाच वेष पण क्रूसाशिवाय असा वेष केलेले म्हणजे गुन्हा सिद्ध झालेले आणि तरीहि माफी मिळालेले. स्वत:च्याच कपड्यात आलेले म्हणजे दंड भरून सुटका करण्यायोग्य गुन्हेगार अशा त्यांच्या दर्जाप्रमाणे शिक्षा असत. शिक्षा वाचून दाखविल्यानंतर धार्मिक अधिकारी दंडिताचा आत्मा जीजसच्या काळजीवर सोपवला आहे असे जाहीर करून दंडितांना राजाच्या हवाली करत आणि राजाचे यमदूत तेथेच आधी उभ्या केलेल्या शेकोट्यांवर दंडितांना बांधून जागीच शिक्षेची अंमलबजावणी करत असत. अशा ह्या मोठया नाटकी आणि गंभीर देखाव्याला auto da fe - act of faith असे नाव होते. (किंचित् अवान्तर. औरंगजेबाने संभाजीराजाला हालहाल करून ठार मारण्याची शिक्षा सुनावली. तेव्हाचे जे वर्णन आहे त्यामध्ये उंटावर बसवून आणि दोक्यावर विदूषकाची उंच टोपी घालून त्यांची मुघल छावणीभर मिरवणूक काढण्यात आली असे वाचले आहे. तशीच ही उंच टोपी दिसते.)
पोर्च्युगाल आणि स्पेनने अशिया-अमेरिकेमध्ये पाय पसरायला सुरुवात केल्यावर इन्क्विझिशन राजसत्तेपाठोपाठ ह्या नव्या प्रदेशांमध्येहि पोहोचले
नव्याने ताब्यात आलेल्या मेक्सिकोमध्ये असे auto da fe होत असत. मेक्सिको शहरातील नॅशनल पॅलेसमध्ये दिएगो गार्सिया ह्या प्रख्यात म्यूरलिस्टने रंगविलेली आणि मेक्सिकोचा सर्व इतिहास चित्ररूपाने दाखविणारी एक म्यूरल चित्रांची मालिका उंच जिन्याच्या दोहो बाजूस रंगविलेली आहेत. त्यातील auto da fe चे चित्र येथे खाली पहा. उंच टोपीतील दंडित आगीत जळण्याची वाट पाहात तेथे दिसतात.
असेच इन्क्विझिशन गोव्यातहि येऊन पोहोचले आणि जुन्या गोव्यात आदिलशहाच्या पूर्वकालीन वाड्यामध्ये त्याची जागा होती. डेलॉन - M Dellon - नावाचा एक फ्रेंच डॉक्टर दमणमध्ये असतांना इन्क्विझिशनमध्ये सापडला. पवित्र कुमारी मेरीच्या चित्राला त्याने पुरेसा आदर दाखविला नाही अशा आरोपावरून त्याला ताब्यात घेण्यात आले. दमणमधील एका ख्रिश्चन बाईबरोबर त्याचे मैत्रीचे संबंध स्थापन होत होते ते दुसर्या एका प्रतिष्ठिताला आवडले नाही आणि त्याने डेलॉनला खोट्या आरोपात गोवले होते. आधी दमणमध्ये काही दिवस आणि नंतर सुमारे दोन वर्षे गोव्यामध्ये इन्क्विझिशनच्या कैदेत कष्टात काढल्यानंतर मोठ्या मुष्किलीने त्याची सुटका झाली आणि मोझांबिक-ब्राझील-पोर्च्युगालमार्गे तो अखेर मायदेशी म्हणजे फ्रान्सला पोहोचला. तेथे आपल्या गोव्यातील अनुभवावर एक पुस्तक लिहून १६८० साली प्रसिद्ध केले. ते आता भाषान्तररूपात उपलब्ध आहे. अनंत काकबा प्रियोळकरांनी गोवा इन्क्विझिशनच्या विषयावर जे पुस्तक लिहिले आहे त्यात डेलॉनचे अनेक संदर्भ मिळतात असे वाटते. (प्रियोळकरांचे पुस्तक मी पाहिलेले नाही.)