चित्रबोध - २

याआधी:
भाग १
========
भाग-२

'भारतात पारंपरिक कलेपेक्षा वास्तवदर्शी चित्रकला इतकी लोकप्रिय का? ' याचा आढावा घेण्याच्या प्रयत्नातून काय निष्कर्ष आले?

ऋचा कुलकर्णी यांनी या विषयावर चांगले विवेचन केले. १४व्या शतकात कागदाचा वापर सुरू झाला. घराघरात असणारी चित्रपरंपरा ही घरगुती किंवा सहज मिळणारे रंग, नीळ वगैरे वापरून केली जाणारी होती जे माध्यम भिंतींवर वगैरे सहज वापरता येत होते. कागदावर चित्रकला सुरू झाल्यावर मुख्यतः पोथीचित्रे सुरू झाली हे आपण बघितलेच. मुघल राजवटीत काही काळानंतर काही लोककला (जसे रांगोळ्या वगैरे) सोडल्या तर चित्रकला ही एकतर पोथ्यांमध्ये किंवा राजवाड्यांमध्ये बंदिस्त होऊ लागली होती. त्याचवेळी महाराष्ट्राचा विचार केला तरी चित्रकलेत काही वेगळे प्रयोग करावे असे फारसे कोणाच्या मनात येत नव्हते. पहिल्यांदाच उत्तरेत अटकेपार मजल मारणाऱ्या राघोबावर मात्र एकूणच उत्तरेकडील ऐट, भारतीय खानदानी महाल, त्यावरील चित्रे, भारतीय चित्रपरंपरा यांचा मोठा प्रभाव पडलेला दिसतो. भारतीय कलापरंपरेचे महत्त्व ओळखल्यामुळे किंवा स्वतःही त्या तोडीचे असले पाहिजे असे वाटल्याने की काय माहीत नाही पण त्यावेळी त्याने उत्तरेतून विविध भागातून उत्तमोत्तम भारतीय चित्रकारांना एकत्र आणवले होते. भारतभरातील चित्रकारांकरवी त्याने भारतीय शैलीतच मात्र खास मराठमोळ्या विषयांवरही चित्रे काढलेली आढळतात. 'गणेश विसर्जन' हे त्यापैकीच एक चित्र. त्याच वेळी माधवराव पेशव्यांनी मात्र युरोपीय कलांना चंचुप्रवेश दिलेला दिसतो. युरोपीय कलाकार जेम्स वेल्स हे त्याचे प्रसिद्ध उदाहरण. आणि इथे युरोपीय कलाकारांना राजाश्रय मिळालेला दिसतो. पेशव्यांचे नाना फडणविसासोबत किंवा पेशवे दरबाराचे चित्र वगैरे युरोपीय शैलीतील चित्र सारी वैशिष्ट्यांसकट समोर येतात. या चित्रांतील यथार्थदर्शनाने पेशवे पुरते संमोहित झालेले दिसतात.

अर्जून आणि सुभद्रा - राजा रवी वर्मा
अर्जून आणि सुभद्रा - राजा रवी वर्मा

पुढे पेशवे जाऊन इंग्रजच आले आणि कलांचे पूर्ण इंग्रजीकरणच झाले असे नाही तर त्यांनी त्याचा अधिकृतपणे प्रचार व प्रसार सुरू केला. 'जे. जे. स्कूल ऑफ आर्ट' सारख्या संस्थेद्वारे त्याचे पद्धतशीर प्रशिक्षण सुरू झाले. दुसरीकडे भरपूर कर, इंग्रजांची गुलामी वगैरेमुळे पिचलेल्या जनतेतही कला दुय्यम स्थानी गेली. अशावेळी केवळ राजसत्तेकडे सीमित राहिल्याने सर्वसामान्यांसाठी भारतीय चित्रपरंपरेत अनेक दशकांची 'पोकळी' निर्माण झाली. आणि अशावेळी पुढे आली राजा रवी वर्मा यांची चित्रे. त्यांनी तीन गोष्टी केल्या. एक म्हणजे पाश्चात्त्य शैलीत चित्रे काढली तरी विषय पूर्णपणे भारतीय पुराणातील - लोककथांतील घेतले. दुसरे असे की त्यांनी चित्रातील पात्रांना भारतीय तत्कालीन पोषाखात नटवले. बाजुचे अर्जून-सुभद्रेचे चित्र पहा. मग सुभद्रा नऊवारीत आली, देवदेवता भरजरी वस्त्रात नटले, नायिका नथ-साज आदी अलंकार वापरू लागल्या आणि सामान्यांची या चित्रांशी नाळ थेट जुळली. मात्र सामान्यांमध्ये इतका प्रसार होण्याचे प्रमुख कारण म्हणजे 'लिथोग्राफी'! (यावर पहिल्या भागात उहापोह केला आहेच. इथे द्विरुक्ती करत नाही. ) त्यामुळे आता रंगीत व बऱ्यापैकी सुबक चित्रे छापली जाता येऊ लागल्याने व तुलनेने स्वस्तही झाल्याने ती घरांघरांत पोचली. एका वक्त्याने (बहुदा नितीन हडप) एक रोचक उद्धृत सांगितले. 'चित्रकाराचे नाव माहीत नसूनही ज्याची चित्रे घराघरात लावली जातात असा चित्रकार म्हणजे राजा रवी वर्मा आणि चित्रकाराचे नाव घरांघरांत माहीत असूनही एकही चित्र पाहिले जात नाही असाच चित्रकार म्हणजे पिकासो' Smile
राजा रवी वर्मांच्या वास्तववादी चित्रांमुळे एकूणच चित्रकलेवर आणि लोकांच्या अभिरुचीवर इतका परिणाम केला आहे की तो अजूनही पुसणे कठीण झाले आहे.

कलाकाराचे अनुभव व विचार चित्ररुप कसे धारण करतात? यावर काही उहापोह झाला का?
स्लीप - सुधीर पटवर्धन
स्लीप - सुधीर पटवर्धन

पहिल्या दिवसाच्या अखेर नारायण सुर्वे यांच्या कविता आणि चित्रकार सुधीर पटवर्धन यांची चित्रे यांच्यासोबत मुंबईची सफर घडवणारी 'साचा' ही डॉक्युमेंट्री दाखवण्यात आली. गिरण्या बंद पडायचा काळ, ज्यावेळी नारायण सुर्व्यांसारखा कवी शब्दातून व्यक्त होतो. त्याचवेळी पटवर्धनांसारखा चित्रकार त्या जीवनाशी संबंध नसूनही ती वेदना समजून उत्तमोत्तम चित्रे काढत होता. दुसऱ्या दिवशी प्रत्यक्ष पटवर्धनांचेच भाषण होते आणि त्यांनी चित्रकाराची चित्रे त्याची पार्श्वभूमी माहीत असली तर अधिक पोहचू शकतात असे प्रतिपादन केले. त्यासाठी त्यांनी केवळ स्वतः काढलेलीच नाहीत तर अनेक भारतीय चित्रकारांची चित्रे निवडली होती. वेगवेगळ्या प्रांतातली, वेगवेगळ्या शैलीतली चित्रे असूनही त्यात डोकावणारा चित्रकार त्यांनी छान विशद करून सांगितला. काहि स्लाईड्समधे त्यांनी भुपेन खक्कर या चित्रकाराची काही चित्रे दाखवली व नंतर चित्रकाराने तो समलिंगी असल्याचे घोषित केल्यानंतर त्याच्या चित्रविषयांमध्ये, चित्राच्या शैलीत आलेले बदल, मोकळेपणा सोदाहरण दाखवला.
आधीच्या भागात चिंतातुर जंतूंनी सांगितल्याप्रमाणे, समर नखाते यांनी देखील या विषयाला स्पर्श केला होता. आदिवासी जे रंग वापरतात ते रंग, त्या आकृत्या, मुखवटे हे आपल्याला भेसूर वाटू शकतात मात्र ते त्यांच्यासाठी सौंदर्याची पूर्ण अनुभूती देतात. आपल्याकडे कथकली नावाच्या नृत्यप्रकारात रंगवले जाणारे चेहरे हे देखील पारंपरिक शैलीतूनच उचललेले असले तरी ते एखाद्या 'भूमिकेला' साजेसे असतात.
चित्रबोध मध्ये सकाळच्या सत्रानंतर दुपारचे सत्र सुरू होण्यामध्ये दोनेक तासांचा काळ दिला होता, ज्यात जेवणाबरोबरच व्याख्यात्यांशी चर्चा करायची थेट संधी दिली जात होती. अशाच एका दिवशीच्या गप्पांतून चित्रकारांचे अनुभव आणि त्याचे प्रतिबिंब यावर समर नखाते यांच्यासोबत चर्चा सुरू होती. (मी अर्थातच श्रोत्याच्या भूमिकेत केवळ ऐकत बसलो होतो Lol नखाते सांगत होते की ते जेव्हा आफ़्रिकेत गेले होते तेव्हा काही दुर्मिळ आदिवासी कबिल्यांसोबत फिरले होते. त्यात एके दिवशी अख्खा कबिला नाचत होता. अंगाला भडक रंग फासलेले ते सारे धुंद होऊन नाचत होते. विवस्त्र स्त्रिया-पुरूष यांचा तो गोतावळा होता. आणि एक स्त्री असीच नाचत नाचत मध्ये उभ्या असलेल्या व्यक्तीसमोर गेली आणि हातातील शस्त्राने सप्पकन मुंडके उडवले आणि रक्त चेहऱ्याला फासले. सर्वांनी एकच जल्लोष केला. आता प्रश्न असा आहे की अश्या व्यक्तींनी काढलेली चित्रे आपल्याला खरंच समजतील का? त्यांचा अनुभव, त्यांच्या पद्धती याचा अंदाज करू शकतो पण मग त्यांची चित्रे समजलीच पाहिजेत हा अट्टहास का?


जागतिक कलविश्वावर चर्चा ठरविली होती त्याचे फलित काय?


सदर भाषण वेगळ्याच दिशेने गेले व मला त्यातून फारसा काही बोध झाला नाही. प्रेक्षकांतूनही यासंबंधी आश्चर्य व्यक्त केले गेले की विषयाशी काहीही संबंध नसलेल्या या भाषणातून काय समजायचे. असो.


समकालीन कला, अमूर्त चित्रण यावर विविध व्याख्यात्यांनी काय मते मांडली? त्यांच्याकडे विशेषतः अमूर्त चित्रांकडे बघायचा दृष्टिकोन बदलला का?
भारतमाता -अवनींद्रनाथ टागोर
भारतमाता -अवनींद्रनाथ टागोर

राजा रविवर्मा यांच्यावेळी बंगालात मात्र वेगळेच प्रयोग चालू होते. अवनींद्रनाथ यांनी पुन्हा एकदा पारंपरिक चित्रशैलींकडे सकारात्मकरीत्या बघायला लावले. व त्यानंतर भारतात अमृता शेरगिल, स्वतः रवींद्रनाथ इथपासून चित्रपरंपरा पुन्हा वाहती झाली ती आजतागायत विविध प्रयोग चालू आहेत. रविंद्रनाथांच्या चित्रकलेची सुरवात तर त्यांच्या कवितेत खोडाव्या लागणार्‍या शब्दांनाच नक्षीत गुंफून झाली होती हे वाचुन गंमत वाटते. पुढे त्यांनीही आपल्या भावना व्यक्त करायला कवितेइतकाच चित्रांचाही आधार घेतला. त्याचबरोबर समकालीन चित्रांविषयी बोलताना एम. एफ् हुसेन यांचे नाव न घेता पुढे जाता येणे अशक्य आहे. त्यांच्यासंबंधी बाकी वाद काहीही असोत त्यांचे चित्रविषय व ती काढण्याआधी त्यांनी घेतलेली मेहनत विविध व्याख्यात्यांनी सांगितली व ती चित्रातही कधी आली ते दाखवले. जाड रेषा, क्युबिझमचा प्रभाव, तरीही अनेक शैली डोकावणारी व खास भारतीय विषय घेऊन समोर येणारी हुसेन यांची चित्रे जवळजवळ प्रत्येक वक्त्याच्या भाषणाचा - स्लाइडासच अविभाज्य भाग होती. याव्यतिरिक्त पटवर्धनांची चित्रेदेखील पुन्हा पूर्वीच्या भारतीय शैलीतील 'लांब ते वर, जवळ ते खाली - सारे ठळक' ही पद्धत अवलंबणारी आहेत.

याव्यतिरिक्त आधी म्हटल्याप्रमाणे अमूर्त चित्रांकडे केवळ एक चित्र म्हणून बघावे, ते शब्दात कळण्याचा अट्टहास करू नये असे एक सार्वत्रिक मत दिसले. सुदर्शन कलामंचाच्या बेसमेंटमध्ये अनेक चित्रे लावली होती. साधारण रोख, शब्द हे व्यक्त होण्याचे एकच माध्यम आहे असे का समजावे? प्रत्येक चित्र शब्दातच का 'समजले' पाहिजे? वगैरे कडे होता. जर काही भावना शब्दात व्यक्त करणे शक्य असते तर त्या शब्दातच नसत्या का मांडल्या? त्यामुळे प्रत्येक चित्राने 'कथा' सांगितलीच पाहिजे, चित्रविषय स्पष्ट केलाच पाहिजे हा अट्टहास टाळून चित्रे बघा जे जवळजवळ प्रत्येकाने सांगितले. गायतोंडे यांच्यासारख्या शब्दांचीच काय पण रेषांची, रंगांची देखील बंधने न मानणाऱ्या चित्रकाराची चित्रे ही कळायला बरेच कष्ट करावे लागतील इतके तरी समजलेच!
अन माझ्यापुरते बोलायचे तर होय दृष्टिकोन बदलला. आधी या चित्रांकडे मी पाहतच नसे. आता किमान पाहीन, बघून कसे वाटते आहे - मनात काही भाव उत्पन्न होताहेत का याचा प्रामाणिक शोध घेईन. इतके सांगता येईल.

आत, एकूणच पारंपरिक चित्रे ते समकालीन चित्रांचा प्रवास ठळकपणे दाखवायला ऋचा कुलकर्णी यांनी वापरलेली पद्धतच मी वापरणार आहे. तंतुवाद्य वाजवणारी स्त्री तीन काळातील चित्रकारांनी काढलेली आहे ती इथे एकापुढे एक मांडत आहे. त्यापुढे फार लिहायची गरज नसावी.


दृश्यकला आणि साहित्य यांचा संबंध श्री. वसंत डहाके यांनी कसा स्पष्ट केला? त्यांच्या व्याख्यानाचे सार काय सांगता येईल?


वसंत डहाके यांचे भाषण म्हणजे नेमकेपणाचा नमुना म्हणता यावे. प्रत्येक मुद्दा स्वच्छ, स्पष्ट आणि नेमक्या शब्दांत श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्यात ते कमालीचे यशस्वी ठरले. त्यांच्या भाषणाचे हायलाईटस इथे देतोय
-- लेखन काय किंवा दृश्यकला काय एक व्यक्त होण्याची भाषाच झाली. आणि कोणतीही भाषा ही प्रतिमा आणि प्रतीके यांनी मिळून बनलेली असते.
-- आपले म्हणणे अधिक स्पष्ट करण्यासाठी त्यांनी 'दृश्यवाक्ये' ही संकल्पना तयार केली. दृश्यवाक्य म्हणजे एखादे दृश्य, एखादी रेषा, एखादे टिंब, एखादा रंग - थोडक्यात शब्दांशिवाय व्यक्त झालेले असे काहीतरी 'दृश्य'
-- मग कविता करणे, कथा लिहिणे, लेख लिहिणे जसे शब्दांच्या प्रतीकातून -चिन्हातून- व्यक्त होणे झाले तसे चित्र काढणे हे रंग, रेषा आदींमधून दृश्यवाक्य लिहिण्यासारखेच झाले.
-- जसे साहित्यात लेखणी, कागद, शब्द हे जसे साहित्य-माध्यम वापरलेले असते तसेच चित्रांत ब्रश, रंग, कॅनव्हास, रेषा वापरलेल्या असतात.
-- मग जसजसे लेखन 'स्वतंत्र' होऊ लागते, तसतसे तेही कळायला कठीण होतेच की. (थोडक्यात ग्रेस काय किंवा गायतोंडे काय समजायला सराव हा हवाच)
-- याव्यतिरिक्त त्यांनी चित्रपट, साहित्य इत्यादींच्या चित्रसाक्षरतेच्या टंचाईबद्दल तीव्र आक्षेप व चिंता व्यक्त केली. एखादी कलाकृती, अगदी लेखनही समजण्यासाठी दृश्यकलांचाही अभ्यास असणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांनी जी. ए. चे एक वाक्य घेतले (मी आठवणीतून देतोय. जीए चाहते योग्य वाक्य सांगतीलच Smile )"शेवाळाने भरलेल्या हिरव्याशार डोहावर त्याने दगड मारला अन त्या डोहाने आपला काळा डोळा क्षणभर उघडला". जीए हे स्वतः दृश्यकलांचे जाणकार होते हे सत्य त्यांच्या लेखनातून वेळोवेळी दिसते असे त्यांनी प्रतिपादन केले. अन त्या लेखनाची समीक्षा करताना दृश्यकलांबद्दल निरक्षर असाल तर पूर्ण न्याय कसा द्याल?

यापुढील भागांतः
भाग -३

ही दृश्यकलेची जाण मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी काय करावे लागेल?
दृश्यकलांच्या स्पर्धा, परीक्षा असाव्यात का? त्याचे मुलांवर कसे परिणाम होतात?
एकुणात चित्रबोधचे वातावरण कसे होते? व्याख्यानांशिवाय इथे इतर कोणत्या अॅक्टीव्हीज होत्या का?
मला चित्रबोधमधून काय कळले? काही कळले का?

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (3 votes)

प्रतिक्रिया

धाग्याबद्दल ऋषिकेशचे आभार.

मराठा दरबाराचे उत्तरेकडच्या शैलीच्या प्रभावातले एक चित्र (१८२०):

'साचा' या चित्रपटाविषयी अधिक माहिती इथे मिळू शकेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

ऋषिकेशचे परत एकदा आभार.
भारीपैकी रोचक आहे हे कार्यशाळेचा प्रकार. इंट्रेश्टिंग आहे सगळीच माहिती. पण पारंपरिक कला वास्तवदर्शी कलेपेक्षा लोकप्रिय का, या प्रश्नाचं उत्तर मात्र यातून नाही मिळालं. ते तसंच्या तसं मिळावं अशी अपेक्षाही करणं, कदाचित चुकीचं असेल.
पुढच्या भागाची वाट पाहते.
अवांतरः चित्रकलेखेरीज कोणत्या विषयावर अशा प्रकारची कार्यशाळा मला आवडेल? नाटक, सिनेमे आणि पुस्तकं अर्थात रोचक असतील, पण ते तसेही पुरेसे लोकप्रिय विषय आहेत. बहुधा शास्त्रीय संगीत. ते समजून घेण्याचा प्रयत्न केला, तरी सोशिक-उदारमतवादी-सर्वसमावेशक-उचित मार्गदर्शनाअभावी आपण बर्‍याच गोष्टींना मुकतो असं वाटतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

पण पारंपरिक कला वास्तवदर्शी कलेपेक्षा लोकप्रिय का, या प्रश्नाचं उत्तर मात्र यातून नाही मिळालं.

हा टायपो आहे का? खाली चिंजंनी म्हटल्याप्रमाणे परिस्थिती उलट आहे.
जर वास्तवदर्शी अधिक लोकप्रिय का? असा प्रश्न असेल तर त्याची उत्तरं अनेक असतील. मात्र त्यातलं ऋचा कुलकर्णी यांनी उहापोह केलेलं उत्तर लेखात दिलं आहे. एकूणच आर्थिकदृष्ट्या पिचलेल्या + एकूणच चित्रकला धर्म+राजसत्ता यातच बंदिस्त असताना राजारवीवर्म्यांच्या रूपात सहज+सुबक चित्रे मिळू लागली आणि जनतेची दृष्टीच बदलली.

अजून थोडक्यात सांगायचं तर चित्र काढणे ही अभिव्यक्त करण्याची 'कला' न राहता त्रिमितीत "जसे दिसते तसे" किंवा जे बघितले "तस्सेच्या तस्से" द्वीमितीत उतरवण्याचे 'कसब' झाले. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ऊप्स! हो. टायपो आहे. पण मुळात वाचतानाच मी (का कोण जाणे!) बरोबर उलट वाचत होते. Tongue
अवांतरः मला संपादन करण्याचा ऑप्शन का दिसत नाहीय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

>>पण पारंपरिक कला वास्तवदर्शी कलेपेक्षा लोकप्रिय का, या प्रश्नाचं उत्तर मात्र यातून नाही मिळालं.

पण पारंपरिक कला अधिक लोकप्रिय आहे असं मुळात म्हणता येईल का? स्वातंत्र्यपूर्व काळात अपारंपरिक रविवर्मा लोकप्रिय झाला आणि आताच्या काळात तर मुघल लघुचित्रं आणि वारली शैलीसारखे एखाददुसरे अपवाद सोडले तर भारतीय पारंपरिक चित्रशैली फारशा परिचितदेखील नाहीत असं दिसतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

वास्तवदर्शी कला अधिक लोकप्रिय होण्यामागे सत्ताकारण आणि पराभूत जनतेची मानसिकता हे घटकदेखील कार्यरत असू शकतील. मुघल काळात आपल्याइथे विकसित झालेली लघुचित्रांची शैली ही मुळात पर्शियन लघुचित्रांवरून आलेली आहे. तिला राजाश्रय मिळाला म्हणून ती इथे फोफावली. पण सत्ताधार्‍यांचं अनुकरण करण्यात धन्यता मानणं हीदेखील पराभूत जनतेची एक प्रवृत्ती असते. ब्रिटिश सत्तेत आपल्या मध्यमवर्गानं उदरनिर्वाहासाठी इंग्रजी शिक्षण घेतलं; साहेबाची मर्जी राखण्यासाठी पारंपरिक पोशाख सोडून देऊन शर्ट-पँट स्वीकारले. तद्वत साहेबाची कला तीच उच्च कला आणि आपली ती मागासलेली असा काही भाव त्या वास्तवदर्शी शैलीच्या लोकप्रियतेमागे असेल अशीही शक्यता आहे.
(गंमत म्हणजे युरोपियन कलाजगतात ब्रिटिश कला निम्नदर्जाची समजली जाई. इटालियन, डच, स्पॅनिश, फ्रेंच वगैरे चित्रकला उच्च दर्जाची मानली जात असे. ब्रिटिश कलाकार शिक्षणासाठी 'काँटिनेंट'वर जात.)

>>अवांतरः मला संपादन करण्याचा ऑप्शन का दिसत नाहीय?

एखाद्या प्रतिसादाला उपप्रतिसाद आल्यानंतर तो संपादित करता येत नाही बहुतेक.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

वास्तवदर्शी कला अधिक लोकप्रिय होण्यामागे सत्ताकारण आणि पराभूत जनतेची मानसिकता हे घटकदेखील कार्यरत असू शकतील.
तद्वत साहेबाची कला तीच उच्च कला आणि आपली ती मागासलेली असा काही भाव त्या वास्तवदर्शी शैलीच्या लोकप्रियतेमागे असेल अशीही शक्यता आहे.

+१
अजून एक दृष्टीकोन यावरच्या चर्चेत आला तो जातीव्यवस्थेचा. भारतातील लोककला, आदीवासी कला जातीच्या उतरंडीवर बर्‍याच निम्नस्तरावर अवगत होती - टिकून होती. मात्र इंग्रज आल्यावर त्यांच्याकडून शिकलेल्या उच्चवर्णीयांची अभिरूची (कदाचित पराभूताच्या मानसिकतेतून) बदलली व स्वतःला ज्या जाती उच्च समजत त्यांची अभिरूची आपोआपच उच्च समजली गेली असावी.

हा दृष्टीकोन किती खरा असेल सांगता येणे कठीण आहे. मात्र अगदीच असे झाले नसेल असेही वाटत नाही

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हम्म. याच न्यायानं हॉलिवुडचे सिनेमे म्हणजे कसे 'चकाचक नि भारी' असतात असा एक समज मोठ्या प्रमाणावर दिसतो (लोकप्रिय अमेरिकन सिनेमाला नाक मुरडण्याचीही फॅशन आहेच, पण ती मर्यादित आहे). त्याला तोंड देऊन भारतीय सिनेमा कसा काय टिकलाय, यावर जंतूंचं विवेचन ऐकायला आवडेल. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

सुधीर पटवर्धन यांच्या व्याख्यानात आलेला एक महत्त्वाचा मुद्दा हा कलाकार आणि समाज यांच्यातल्या नात्याविषयी होता. काही कलाकार आपल्या कलाकृतींद्वारे समाजाचं चित्र उभं करतात; त्यांच्या कलाकृतींना तत्कालीन, सामाजिक किंवा सांस्कृतिक संदर्भ असतात. उदाहरणार्थ, मुंबईतल्या कामगार वस्त्या आणि तिथलं जीवन दाखवणारी खुद्द पटवर्धन यांची चित्रं ही सामाजिक संदर्भांसह येतात; किंवा अमृता शेरगिल यांनी युरोपात शिक्षण घेऊन भारतात आल्यानंतर इथल्या समाजाचं चित्रण करताना शैलीत बदल केले. त्यांचं पाश्चिमात्य शैलीतलं हे चित्र पाहा :

आणि त्या तुलनेत भारतीयीकरण झाल्यानंतरचं हे चित्र पाहा :

याउलट काही कलाकारांचं काम हे समाजापासून दूर राहून होत असतं किंवा त्या कामात उघड सामाजिक संदर्भ नसतात. साहित्यात अशी उदाहरणं आपल्या परिचयाची आहेत - जसे कवी ग्रेस. चित्रकलेत पाहायचं झालं तर खुद्द रवींद्रनाथ टागोरांची चित्रकला अशी होती :


अद्भुत जनावर


अद्भुत पक्षी

अशी कला समाजविन्मुख भासली तरीही कोणत्याही निरोगी समाजात अशा कलेची गरजदेखील असते आणि अशा कलेतूनही संस्कृती समृद्ध होत असते असा मुद्दा पटवर्धन यांनी मांडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

>>अशी कला समाजविन्मुख भासली तरीही कोणत्याही निरोगी समाजात अशा कलेची गरजदेखील असते आणि अशा कलेतूनही संस्कृती समृद्ध होत असते असा मुद्दा पटवर्धन यांनी मांडला.

अशी कला कायमच समाजविन्मुख असेल असे वाटत नाही, समाजिक परिस्थितीबद्दल असलेली कलाकाराची भावना/परिप्रेक्ष्य व्यक्त करण्यासाठी मूर्त कलेची मर्यादा(सदोषता) ओलांडण्याची अपरिहार्यता अशा कलाकृतीस कारणीभूत ठरत असावी, अशा कलकृतीच्या आस्वादकला मात्र तीच भावना/तोच परिप्रेक्ष्यच पोहचेल ह्याची हमी देणे अवघड आहे, त्यामूळे कलाकृती निर्माण करणे व त्याचा आस्वाद घेणे ह्या परस्परावलंबी नसलेल्या तसेच व्यक्तिसापेक्ष प्रक्रिया आहेत असे माझे मत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेखमाला व चर्चा रोचक आहे. वाचत आहे.

काही कलाकार आपल्या कलाकृतींद्वारे समाजाचं चित्र उभं करतात; त्यांच्या कलाकृतींना तत्कालीन, सामाजिक किंवा सांस्कृतिक संदर्भ असतात.

यावरुन एका जुन्या आवड्त्या मालिकेतला किस्सा आठवला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सर्वप्रथम एका उत्कृष्ट लेखमालेबद्दल ऋषिकेशचे आभार. सावकाश वाचतो आहे.

अशी कला समाजविन्मुख भासली तरीही कोणत्याही निरोगी समाजात अशा कलेची गरजदेखील असते आणि अशा कलेतूनही संस्कृती समृद्ध होत असते

हा मुद्दा मांडणं म्हणजे खूपच बॅकवर्ड डिफेन्सिव्हवर जाऊन खेळल्यासारखं वाटतं. समाजविन्मुखता ही जणू काही कलेची कमतरता आहे, आणि ती कमतरता असली तरी तिचे इतर फायदे बघा किती होतात, असा काहीसा युक्तिवाद दिसतो. मुद्दा अर्थातच चुकीचा नाही, पण मला त्यामागचा बचावात्मक दृष्टीकोन पटत नाही.

माझ्या मते कलेसाठी, समाज हा इतर विषयांप्रमाणे एक विषय आहे. जी समाजाभिमुखता काही कलाकृतींमध्ये दिसते ती दिसते कारण तो मोठा व्यापक विषय आहे. पण म्हणून त्यापलिकडे जे विषय आहेत त्यांना दुय्यम लेखणं योग्य नाही. सर्वच उत्तम दर्जाच्या कलाकृती, मग त्यांचा विषय काही का असेना, संस्कृती समृद्ध करतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शनिवारच्या लोकसताचा अग्रलेख चक्क दृश्यकला प्रदर्शनावर बघुन सुखद ध्क्का बसला. एखाद्या दृश्यकला प्रदर्शनावर अग्रलेख मी पहिल्यांदाच वाचत असेन. त्याबद्दल लोकसत्ताचे अभिनंदन
अग्रलेख इथे वाचता येईल
डॉक्युमेंटा विषयी इथे विकीपिडीयावर वाचता येईल
भारतीय चित्रकार (ज्यांचे यंदाच्या डॉक्युमेंटामधे कलाकृती समाविष्ट केली आहे) त्या नलिनी मलानी यांच्या त्या कलाकृती संबंधी विडीयो हॉक्युमेंटच्या संकेतस्थळावर इथे बघता येईल

या निमित्ताने या धाग्याला 'डॉक्युमेंटा'च्या निमित्ताने डॉक्युमेंटाविषयी किंवा नलिनी मलानी यांच्या चित्रांविषयी / त्यांच्याविषयी अशी चर्चांची पुरवणी जोडता येईल असे वाटते. कोणाला या प्रदर्शनाविषयी किंवा या चित्रकाराविषयी अधिक माहिती असेल तर सांगावे. विषय वाढल्यास वेगळा काढता येईलच

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ऋषिकेश, हा विषय 'न कळणारा' या सदरात कधीचाच टाकला होता. पण तुमच्या लेखांनी कुतूहल पुन्हा जागे झाले आहे .. ते किती टिकेल हे पहायचे!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0