सिंधू सरस्वती संस्कृती (भाग ५)

सिंधू सरस्वती संस्कृती (भाग ५)

सिंधू सरस्वती संस्कृती आणि ऋग्वेद

सुधीर भिडे

(मागील भाग)

ऋग्वेदातील कित्येक ऋचांत दास, दस्यू असे संदर्भ येतात. आर्य कोणास दास / दस्यू समजत असत?

ऋग्वेदातील सर्व ऋचा भारतातच निर्माण झाल्या आहेत, भारताबाहेरील प्रदेशाची, नद्यांची, लोकांची नावे त्यात नाहीत. उलट भारतातील नद्यांची वर्णने आहेत. ऋग्वेदात त्या कालाचा इतिहास सांगितला आहे. आर्यांनी सप्त सिंधूच्या प्रदेशात प्रवेश केल्यावर त्यांचे येथील लोकांशी संघर्ष झाले. हे लोक समृद्ध असून त्यांची नगरराज्ये होती. त्या राज्यांना पूर म्हणत असत. या शहरांभोवती तटबंदी असे. हे लोक आर्यांपेक्षा जास्त सुसंस्कृत होते. परंतु त्यांच्याकडे युद्धकौशल्य नव्हते. त्यामुळे त्यांचा आर्यांपुढे टिकाव लागला नाही आणि त्यांची संस्कृती नष्ट झाली.

आर्यांनी ज्या शांतीप्रिय लोकांवर हिंसाचार केला ते सिंधू सरस्वती संस्कृतीचे लोक असावेत. याविषयीची माहिती या भागात पाहू.

विषयाची मांडणी

  • आर्यांचे शत्रू कोण होते
  • सिंधू संस्कृतीच्या लोकांचे ऋग्वेदातील वर्णन
  • पणींची संस्कृती
  • शत्रूंचा संहार
  • सिंधू संस्कृती आर्यांची होती का?
  • सिंधू संस्कृतीचा विनाश नैसर्गिक आपत्तीने झाला का?
  • आजचा हिंदू धर्म

---
आर्यांचे शत्रू कोण होते?

आर्यांच्या शत्रूंना ऋग्वेदात दास, दस्यू, पणि, अव्रत, अदेवा: शिश्नदेवा: अशा निरनिराळ्या नावाने संबोधले जाते.

पणि हा शब्द सरस्वती नदीवर आणि समुद्रावर व्यापार करणार्‍यांसाठी वापरलेला दिसतो.

अव्रत म्हणजे यज्ञ न करणारे. अदेवा: म्हणजे ज्यांना देव नाहीत ते. आर्यांच्या शत्रूंना देव नव्हते असे नाही. पण आर्य त्यांचे देव मानण्यास तयार नव्हते. शिश्नदेवा: म्हणजे लिंगपूजा करणारे.

ऋग्वेदाचे १० भाग आहेत. प्रत्येक भागाला मंडल म्हणतात. प्रत्येक मंडलाचे उपभाग आहेत त्याना अनुवाक म्हणतात, अनुवाकाचे भाग केले आहेत त्याना सूक्ते म्हणतात. प्रत्येक सूक्त काही ऋचांचे बनले असते. ऋग्वेद संहितेत १० मंडले, ८५ अनुवाक, १०२८ सूक्ते आणि १०५५२ ऋचा / मंत्र आहेत. संदर्भ देताना बहुतेक वेळा अनुवाकाचा उल्लेख केला जात नाही. ३.१६.७.चा अर्थ तिसरे मंडल, सोळावे सूक्त, सातवा श्लोक असे होते.
या लिखाणात निवडलेल्या ऋचांचा शब्दश: अर्थ दिलेला नाही. फक्त भावार्थ दिला आहे.

या संदर्भात ऋग्वेदातील काही ऋचा पाहू –
७-६-३ - यज्ञ न करणाऱ्या पणि दस्यूंचा अग्नीने शेवट केला.
१ - १०१ – २ - त्याने क्रोधाने अव्रत (यज्ञ न करणाऱ्या ) शंबर, पिप्रू याना ठार मारले.
दास आणि दस्यू नावाने ऋग्वेदात संबोधिलेले लोक सिंधू संस्कृतीचे रहिवासी होते. ते आर्यांपेक्षा रूप, भाषा आणि धर्म या बाबतीत निराळे होते पण आर्यांपेक्षा सांस्कृतिकदृष्ट्‍या पुढारलेले होते.

सिंधू संस्कृतीच्या लोकांचे ऋग्वेदातील वर्णन

७ – ५ – ३ – हे अग्ने , पुरूने पेटवून दिलेली शहरे जाळली तेव्हा तुझ्या भीतीने काळी प्रजा आपल्या वस्तू टाकून पळून गेली.
१-१०० – १८ – इंद्राने गोऱ्या लोकांना (आर्यांना) शेते मिळवून दिली.
५ – २९ – १० – नाक नसलेल्या आणि जीभा हिंसित असलेल्या दस्यूंना शस्त्राने कापून टाकले.
सिंधू संस्कृतीत जिभेला सोन्याने चटका देऊन इजा करण्याची पद्धत असावी. त्यामुळे शब्द अस्पष्ट होत. आजही काही आदिवासी समाजात अशी पद्धत आहे.

डोक्यावरील शिंगे
सिंधू संस्कृतीत सापडलेल्या चित्रे आणि मूर्तींवरून हे दिसते की देवांच्या डोक्यावर शिंगे होती. याशिवाय समाजातील श्रेष्ठ पुरुष शिंगे असलेले शिरस्त्राण वापरत. सिंधू संस्कृतीत वृषभाला फार महत्त्व होते. शिंगाची कल्पना वृषभावरून आली असावी. आजही भारतातील काही आदिवासी समुदायात पुरुष शिंगे बांधतात.
७ – ९९ – ४ – तुम्ही यज्ञासाठी विस्तीर्ण भूमी निर्माण केली आणि शिंगे धारण करणाऱ्या दासांची माया नष्ट केली.
१ – ३३ – १२ – कुत्साने शिंगे असलेल्या शुश्नाला ठार केले.

आर्यांचे शत्रू बसक्या नाकाचे आणि काळ्या रंगाचे होते असे वर्णन आहे. जिभेला इजा करण्याची पद्धत होती. पुरुष डोक्याला शिंगे बांधत . यावरून सिंधू संस्कृतीचे लोक आर्यांपेक्षा निराळे होते.

पणींची संस्कृती

व्यापार करणार्‍यांना ऋग्वेदात ‘पणी’ म्हणून संबोधण्यात आले आहे. पणी समृद्ध असून नदी आणि समुद्रावर व्यापार करत असत अशी ऋचातून माहिती मिळते. (सिंधू संस्कृतीच्या लोकांविषयी बरीच माहिती ऋग्वेदातून मिळते.)दास आणि दस्यूंपेक्षा हे लोक वरच्या दर्जाचे असावेत. पणींच्या घराचे वर्णन शंभर दरवाजे असलेले असे केले आहे ( १० – ९९ – ३ )

आर्यांनी भारतात प्रवेश केल्या पासून पणींच्या गायी पळविण्यापासून सुरुवात केलेली दिसते –

१ – ८३ – १ - हे इंद्रा तुझ्या कृपेने घोडेस्वार प्रथम गायी पळविण्यास जातात.
गायी पळविण्यासाठी केलेल्या युद्धाला गोषु युद्धम ( १ – ११२ – २२ ) किंवा गोसाता ( ८ – ८४ – ७ ) म्हटले आहे. सिंधू उत्खननांच्या प्रारंभिक अवस्थेत घोड्यांचे अवशेष सापडले नव्हते. त्यामुळे असा समज होता की या लोकांजवळ घोडे नव्हते. पण मागून घोड्यांचे अवशेष मिळाले. आर्य घोडे पळवून नेत असत असे कित्येक ऋचातून उल्लेख आहेत. पशूंशिवाय धान्य लुटण्यासाठी हल्ले केले जात.

६ – २० – ४ – हे इंद्रा अन्न लुटण्याच्या संग्रामात पणी पळून गेले. काहीही अन्न उरू दिले नाही.

या संग्रामात खूप धन लुटले जाई –


Indus Valley Civilization

६ – २० – ७ - ऋजीश्ववाने पिपृची तटबंदी असलेली शहरे लुटली तेव्हा त्याला अमित धनाचा लाभ झाला.
सिंधू संस्कृतीचे लोक सोन्याचे दागिने करण्यात कुशल होते. (A beautiful necklace with jedite beads with gold in between was found, Indus Valley Civilization, Vol 1, page 34 )
ऋग्वेदात याचा उल्लेख येतो हिरण्येन मणीना शुभमाना: (१- -३३ – ८)
श्रेष्ठ व्यापारी बृबु – ( ६ – ४५ – ३१, ३२, ३३ ) या तीन ऋचांत बृबु या व्यापार्‍याचे वर्णन आहे. तो अतिशय श्रीमंत होता. सूक्तकार लिहितो – इंद्रा आम्ही तुझे भक्त असूनही लिंगपूजक पणी श्रीमंत आहेत.
अजून एका ऋचेत लिहिले आहे इंद्राने व्यापार करणाऱ्या पणींना पराभूत केले. ( ८ – ६६ – १० )
आर्यांच्या शत्रूंची शेते असल्याच्या पुष्कळ ऋचा आहेत. – शत्रूंची शेते, मनुष्ये, घोडे, गायी जिंकून घेणार्‍या इंद्रासाठी सोम आणा. ( २ – ११ – १ )

शत्रूंचा संहार
आर्य आणि येथील सिंधू संस्कृतीचे लोक यांच्यातील संघर्षाची माहिती आपल्याला ऋग्वेदातील बऱ्याच ऋचातून मिळते.
४ – १६ – १३ हे इंद्रा तू ५०,००० काळ्या लोकांना कापून टाकलेस, त्यांची पुरे ध्वस्त केलीस
४ – ३० – १५ – हे इंद्रा चर्ची नावाच्या दासाच्या ५०००० अनुचरांना तू ठार मारलेस.
७ – ९९ – ५ – हे इंद्रा तू शंबराची तटबंदीची ९९ शहरे फोडलीस आणि १००,००० लोक मारून टाकलेस.
२ – १५ – ७ – हे अध्वर्युंनो ज्या इंद्राने शेकडो वैर करणार्‍यांना काटून टाकले त्याला सोम द्या.
८ – ९६ – १३ – कृष्ण नावाच्या दस्यूला अंशुमती या त्याच्या तटबंदी असलेल्या शहरात ठार मारले
४ – ३८ – ८ – त्रसदस्यू जेव्हा दस्यूंची कत्तल करण्यासाठी त्यांच्यावर विजेप्रमाणे तुटून पडे तेव्हा तेव्हा तो भयंकर होई. (त्रसदस्यू या नावाचा अर्थच मुळी दस्यूंत भय उत्पन्न करणारा असा आहे.)
१– ५१ – ५ – ऋजीश्वन याने पिपृच्या शहरांचा विध्वंस करून दासांची मोठ्या प्रमाणावर कत्तल केली.
१ - ५३ – ८ – दिवोदासाने एक लाख दस्यूंची कत्तल करून चर्चीला ठार मारले.
ऋग्वेदात सर्वात जास्त सूक्ते इंद्र आणि अग्नीची आहेत. इंद्र आणि अग्नी यांचे वर्णन शहरे तोडणारा असे आहे.
३ – १५ – ४ – हे अग्ने सर्व उत्तम वस्तू जिंकून शत्रूची पुरे जाळून टाक.
मोहेंजोदारोत ठिकठिकाणी समुदायात मारून टाकलेल्या लोकांची प्रेते सापडली आहेत.
४ – ३८ – १ , ७ – १९ – ३ – आर्य नदीकाठची सुपीक शेते जबरदस्तीने ताब्यात घेऊन आर्य लोकात वाटून टाकीत.
आर्य पूर्व लोकांजवळ घोडे नव्हते अशी कल्पना होती, पण ऋग्वेदातील ही ऋचा पाहा –
४ – १७ – ११ – इंद्र आपल्या सामर्थ्याने शत्रूच्या गायी, सोने, घोडे जिंकून संपत्ती विभागून देतो.
ऋग्वेदात दासांच्या पुराचे वर्णन अश्मन मयीनाम म्हणजे दगडांनी बनलेली असे केले आहे . गावांना वेढा घातल्याच्या ऋचा आहेत. गावांना तटबंदी असे. त्यामुळेच वेढा घालावा लागे. तटबंदीची दारे लाकडाची असत, त्यांना आगी लावून शहरात प्रवेश केला जाई.
हरीयुपिया – हराप्पा – चा नाश
६ – २७ – ५ – द्रव्याचा लाभ करून घेण्यासाठी हरीयुपियात पूर्वेकडील अर्ध्या भागात असणार्‍या वृचीवताला तू ठार मारलेस तेव्हा पश्चिमेकडील भागात असलेला परम भयाने विदीर्ण झाला.
येथे हे सांगण्यात येत आहे की शहराच्या पूर्वेकडील भागात वृचीवत संरक्षण करण्यासाठी तयार होता, तर पश्चिम भागात परम नावाचा कोणी श्रेष्ठी काय होते ते पाहत होता.

सिंधू संस्कृती आर्यांची होती का?
काही विद्वानांनी असे मत व्यक्त केले आहे की सिंधू संस्कृती आर्यांनीच वसवली. आपण ऋग्वेदातील रुचा पाहिल्या ज्यात दास आणि दस्यू यांच्या विरुद्धचा संघर्ष दिसतो. ऋग्वेदातील दास आणि दस्यूंच्या संस्कृतीला अर्थातच सिंधू संस्कृती असे म्हणता येत नाही. हे नाव आधुनिक काळातील आहे. परंतु लिंगपूजा आणि डोक्यावर शिंगे परिधान करणे हे सिंधू संस्कृतीच्या लोकांचे लक्षण होते. ऋग्वेदात या लोकांचा यज्ञ न करणारे असा उल्लेख येतो. तटबंदी असलेली शहरे हीपण सिंधू संस्कृतीची विशेषता आहे. त्या काळात आर्यांनी वसविलेल्या शहरांचे उल्लेख नाहीत. यावरून आर्यांचा हा संघर्ष कोठल्या तरी दुसर्‍या वंशाच्या लोकांबरोबर होता. हा संघर्ष भारतात झाला हे निश्चित कारण ऋग्वेदात भारतातील नद्या आणि ठिकाणांचे उल्लेख येतात. यावरून एकच निष्कर्ष होऊ शकतो – सिंधू संस्कृती ही आर्यपूर्व लोकांनी विकसित केलेली संस्कृती होती.

सिंधू संस्कृतीचा विनाश नैसर्गिक आपत्तीने झाला का?
ढवळीकर यांच्या मते (कोणे एके काळी, प्रकरण ९, सिंधू संस्कृती राजहंस प्रकाशन २००६) इ स पू २२०० ते २००० या काळात भूकंप, महापूर, दुष्काळ अश्या नैसर्गिक आपत्ती आल्या. सरस्वती लुप्त झाली. ढवळीकर यांच्या मते या काळात कोणतेही परचक्र आले नाही. मग ऋग्वेदातील ज्या ऋचांचा आपण विचार केला तो आर्यांचा संघर्ष कोणाबरोबर होता?

आजचे हिंदू धर्माचे आचरण
आर्यांचे देव होते इंद्र, अग्नी, मरुत, उषस, अश्विनौ. आर्य मूर्तिपूजक नव्हते. त्यांची धर्मपद्धती यज्ञ ही होती. ते सोम गाळीत, जो धर्माचा भाग होता.
दास आणि दस्यू यांचे देव होते लिंग, मातृ देवता. हे लोक मूर्तिपूजक होते. यज्ञ धर्माचा भाग नव्हता.
आज ज्या धर्माचे आपण पालन करतो तो आर्यांचा धर्म नाही. तो दास आणि दस्यूंचा धर्म आहे.

संस्कृतीचा ऱ्हास

दोन नैसर्गिक आपत्तींमुळे ही संस्कृती लयास गेली.

  • भूकंप
  • वातावरणातील बदल

चार हजार वर्षांपूर्वी सिंधू सरस्वती नदीच्या भागात मोठा भूकंप आला. या भूकंपात सिंधू नदीचा पुढचा प्रदेश उंचावला गेला. यामुळे शहरात पाणी शिरले. उत्खननात वस्त्रगाळ माती मिळाली.

सरस्वतीच्या बाबतीत दुसरा प्रश्न निर्माण झाला. सतलज आणि यमुना या दोन नद्या सरस्वतीस मिळत असत. भूकंपामुळे यांचा प्रवाह बदलला. सतलज सिंधूला मिळाली आणि यमुना गंगेस मिळाली. त्यामुळे सरस्वतीस येणारे पाणी बंद झाले.
वातावरणात दोन बदल झाले. उत्तर गोलार्धात थंडी वाढली. त्यामुळे समुद्राची पातळी खाली गेली. लोथल समुद्रापासून दूर गेले. पश्चिम भारतात पावसाचे प्रमाण कमी झाले. सिंध आणि राजस्थान हे भाग रेताड बनले. सरस्वती वाळवंटात विरून गेली.
हा सर्व बदल सुमारे पाचशे वर्षात झाला. आपली शेतीवाडी, घरे आणि शहरे सोडून या लोकांना पूर्वेकडे म्हणजे सध्याच्या उत्तर प्रदेशाच्या दिशेने आणि दक्षिणेकडे जाणे भाग पडले. गंगायमुनेच्या सुपीक जमिनीवर यांनी वस्ती केली. काही लोक महाराष्ट्राच्या दिशेने गेले.

समारोप

ऋग्वेदातील ऋचा वाचल्यानंतर एक गोष्ट निश्चित वाटते की आर्यांचा, ते ज्यांना दस्यू, दास, अनार्य, अव्रत, शिंगे धारण करणारे, शिश्न देवाला मानणारे असे म्हणत त्यांच्याशी संघर्ष झाला. संघर्ष शब्द योग्य नव्हे कारण हा एकतर्फी झालेला संहार होता. वरील सर्व वर्णनावरून आणि ऋग्वेदातील सिंधू आणि सरस्वती यांच्या उल्लेखावरून असे म्हणता येते की आर्यांनी ज्यांच्यावर हिंसाचार केला ते सिंधू सरस्वती संस्कृतीचे लोक होते.

सिंधू सरस्वती संस्कृतीमधील लोकांच्या धर्माचरणाचा विचार केला तर अग्नी पूजेचे पुरावे अचंबित करतात. यज्ञ करणारे आर्य आणि मूर्तिपूजक अनार्य या कल्पनेला तडा जातो. एकच शक्यता दिसते. सिंधू सरस्वतीच्या लोकांनी आर्यांकडून यज्ञ कल्पना घेतली आणि आर्यांनी सिंधू सरस्वती संस्कृतीच्या लोकांकडून लिंग पूजा घेतली. मागून आलेले शक, हूण, कुशाण हे ज्याप्रमाणे येथील समाजात मिळून गेले त्याप्रमाणे आर्य येथील समाजात मिसळून गेले.

आर्य भारतात बाहेरून आले की नाही हा चर्चेचा विषय झालेला आहे. याविषयी जास्त माहिती आपण पुढच्या प्रकरणात घेऊ. परंतु हा प्रश्न आणि सिंधू सरस्वती संस्कृती हे निराळे विषय आहेत. यासाठी सिंधू सरस्वती संस्कृतीच्या माहितीची समाप्ती येथे केली आहे.

ऱ्हास
साधारण तीन चार दशकांपूर्वी एक सोपी गोष्ट सांगितली जाई. सिंधू नदीकाठी एक संस्कृती पाच हजार वर्षापूर्वी उदयास आली. त्यानंतर आर्य भारतात पोचले. त्यांनी या संस्कृतीचा नाश केला. त्यानंतर भारतात आर्यांची संस्कृती वाढली.

त्यानंतर नवीन संशोधन / उत्खनन झाले आणि चित्र पूर्णपणे बदलून गेले. प्रथम ही संस्कृती सिंधू नदीकाठी सीमित नव्हती. ती आजच्या हरियाणा, राजस्थान, महाराष्ट्र आणि संभवत: तमिळनाडूपर्यंत पसरली होती. ही संस्कृती नष्ट झाली नाही. उलट आर्यांची संस्कृती आज नष्ट झालेली आहे. आर्यांच्या धर्माचे मुख्य आचरण यज्ञात होते. आज आपण यज्ञ करत नाही. आर्यांचे देव आज आपण पुजत नाही. आर्य मूर्तिपूजक नव्हते. आपण मूर्तिपूजा करतो. आपले बहुतेक सर्व आचरण सिंधू सरस्वती संस्कृतीच्या धर्माचरणासारखे आहे.

सिंधू सरस्वती संस्कृतीचा ऱ्हास झाला पण ती लुप्त झाली नाही. या ऱ्हासाची तीन कारणे दिसतात. वातावरणातील बदल, भौगोलिक बदल आणि आर्यांच्या विरुद्ध संघर्ष. यातील वातावरणातील बदल आणि आर्यांशी संघर्ष या घटना एक दोन शतके चाललेल्या असाव्यात. या काळात सिंधू सरस्वतीचे लोक पूर्वेकडे आणि दक्षिणेकडे स्थलांतर करीत राहिले. आजच्या बहुसंख्य भारतीय जनतेत सिंधू सरस्वती संस्कृतीच्या लोकांचे डी एन ए आहेत.

संदर्भ ग्रंथ
सिंधुसंस्कृती, ऋग्वेद व हिंदुसंस्कृती, प्र. रा. देशमुख, प्राज्ञ पाठशाळा मंडळ वाई, १९६६

(पुढील भाग)

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet