कोकाटेंंचा रोबोट --२

त्यांनी माझा दंड पकडून मला पलीकडच्या खोलीत नेले आणि झटकन दरवाज्याची खिट्टी लावून दरवाजा बंद केला. खोलीत अंधार होता. दिव्याचा स्विच ओंन केल्यावर खोली प्रकाशाने उजळली.
खोलीत टेबलावर एक संगणक होता. त्याच्या बाजूला दुसऱ्या टेबलावर एक पत्र्याचा डबा होता. त्याच्यावर फुटबॉल सदृश गोळा होता. त्या गोळ्याला नाक, डोळे, तोंड रंगवले होते. असं रंगवले होते कि त्या फुटबॉलवर एक मिश्कील हसू कायमचे गोठले गेले होते. मला हॅलोविनच्या कोरलेल्या भोपळ्याची आठवण झाली. त्या डब्याचा उजव्या बाजूने स्लॉटेड अॅंगलने बनवलेले “काहीतरी” होते. (कोकाटेंनी नंतर सांगितले कि तो “हात” होता.)त्या डब्यातून तारा निघून संगणकाकडे गेल्या होत्या. एकूण स्पूकी सीन होता.
कोकाटेंनी कॉंप्यूटर चालू केला.
“हा माझा रोबोट! रॉबी!” कोकाटे अभिमानाने मला सांगू लागले. “ह्या खोलीत प्रवेश करणारे माझ्या शिवाय तुम्हीच दुसरे. अगदी माझ्या बायका मुलांनाही इथे प्रवेश नाही.”
“ह्याला मी बुद्धिबळ खेळायला शिकवले आहे.” मग त्यांनी मला त्या रोबोटची रचना समजाऊन सांगण्याचा प्रयत्न केला. प्रयत्नच म्हणायला पाहिजे कारण ते जे काही बोलत होते ते माझ्या आवाक्याच्या बाहेरचं होतं. इंग्लिश भाषेच्या शिक्षकाला आरएस २३२, पॅरलल पोर्ट, सीपीयू, एक्सपर्ट सिस्टम, सर्च अल्गो... इत्यादी काय समजणार हो? शेवटी ते म्हणाले, “हो रोबोट बनवायला मला जवळपास सत्तर हजार रुपये खर्च आला आहे.”
“सत्तर हजार रुपये?” मी उद्गारलो. माझा विश्वास बसत नव्हता. "त्या टिनाच्या डबड्याला “सत्तर हजार रुपये?”” त्या काळातले सत्तर हजार म्हणजे सध्याचे...
भंगारवाल्याने दहा रुपडे सुद्धा दिले नसते.
आता कोकाटे रोबोटच्या समोर हात जोडून उभे राहिले. गोड आवाजात म्हणाले, “बेटा, हे माझे मित्र कुलकर्णी तुझ्यासोबत बुद्धिबळं खेळायला आले आहेत. खेळ त्यांच्याबरोबर, जिंकून दाखव त्यांना. माझी लाज राख. आज तू जिंकलास तर तुला इंटेल चा नवीन डूअल कोर प्रोसेसर घेऊन देईन.”
कोकणात पुजारी असे देवाशी बोलताना मी पाहिले होते. ती गोष्ट निराळी होती. कोकाटेंची सटकली की काय असा संशय आला.
“सर, ह्या रोबोटला तुम्ही काय बोलता ते समजते? ह्याला ऐकू येते?”
“नाही. अजून मी त्याला तेव्हढी बुद्धी दिली नाहीये. पण कुलकर्णी, ते कसं असतं ना, आपण मनापासून प्रार्थना केली तर देव देखील ऐकतो मग मशीन का नाही ऐकणार हो?”
मी चूप झालो. एकूण मशीन बरोबर कोकाटे कंफर्टेबल होते. पण माणसांबरोबर नाही. बायकामुलांबरोबर नाही. त्यांच्याबरोबर थोडं गोड वागले असते, थोडं गोड बोलले असते तर? मग ते कोकाटे कसले.
कोकाटेंचा पट पण निराळ्या पद्धतीचा होता. टिनाच्या चपट्या पेटीवर चौसष्ट घर रंगवली होती.
“कुठली सोंगटी कुठल्या घरात आहे हे रॉबीला कस समजते?”
“ही जी घर आहेत ना त्या प्रत्येक घराखाली मी स्ट्रेन गेज लावली आहेत. त्यामुळे रॉबीला त्याच्यावर असलेल्या सोंगटीचे वजन कळते. प्यादे, हत्ती, राजा ह्यांच्या वजनात सूक्ष्म फरक आहे ना? कळलं काही?”
“हो हो.”
मला कळलं ते एवढेच की ह्या जगात दोन कोकाटे आहेत. एक रॉबीला मुलासारखं वागवणारे प्रेमळ कोकाटे आणि दुसरे सर्वांशी हिडीसफिडीस करणारे भडकू कोकाटे. एक शरीर दो जिस्म!
“तर रोबि बेटा. जंग शुरू जो जाय!” कोकाटेंनी कीबोर्ड वरची कुठलीतरी कळ दाबली, रोबोटने हालचालीला सुरवात केली. त्याच्या यांत्रिक हाताच्या शेवटी बोटांची चिमुट होती. चिमट्यासारखी. त्यात तो एकेक प्यादे पकडून पटावर मांडत होता.
त्या खिडकी नसलेल्या खोलीत यंत्राच्या सान्निध्यात मला काय वाटत होत ते सांगणे कठीण आहे. कॉलेजमध्ये असताना आम्ही एकदा फ्लांचेट केलं होतं त्याची आठवण आली. निश्चित कोणाचा तरी आत्मा येऊन माझ्याशी बुद्धिबळं खेळणार असावा.
रॉबीने स्वतःला पांढरी प्यादी घेतली. ये बात है.
अर्थात तो गेम मी हरलो. चला म्हटले पहिला डाव रॉबीला.
दुसरा डाव सुरु केला. ह्या यंत्राबरोबर हरलो तर? माझ्या इज्जतीचा प्रश्न होता. मी विचारपूर्वक हळूहळू खेळत होतो. उलट रॉबी सेकंदात प्यादी हलवत होता. माझ्या हळूहळू खेळाने रॉबी अस्वस्थ झाला असावा. मी वेळ घ्यायला लागलो की तो बोटांनी टेबलावर टिक टिक करू लागला.
“रॉबी, बी पेशंट! कुलकर्णी सर तुझ्याइतके एक्सपर्ट नाहीत.” अस बोलून कोकाटे माझ्या जखमेवर मीठ चोळू पाहत होते.
एखाद्या डंब यंत्राबरोबर हरायचे दुःख तुम्हाला समजणार नाही.
मग सर्व साधारण माणसे जे करतात तेच मी केलं. चीट दाय नेबर. मी कोणाचे लक्ष नाहीये अस बघून रॉबीचा हत्ती उचलला आणि डब्यात टाकला. थोडा वेळ लागला. पण रॉबीच्या लक्षात आल असाव. कारण त्याने खेळ थांबवला.
“गेम ओव्हर.”
बिचाऱ्या कोकाटेच्या काही लक्षात आले नाही.
“प्रोग्राम तपासून बघायला पाहिजे. काहीतरी बग आला असणार. आजची रात्र ह्याच्यात जाणार.”
आता रात्र ह्याच्यात जाणार ह्या विचाराने ते उत्साहित झाले होते. त्यांना हे माहित नव्हते कि “बग” अगदी त्यांच्या समोर बसला होता. रॉबीला वाचा नव्हती आणि तो आंधळा होता ही किती दिलासा देणारी गोष्ट होती.
“कुलकर्णी सर, तुमचा विरस झाला असणार नाही का. पण हा रॉबी आता हंग झाला आहे. त्याला रिसेट करायला वेळ लागेल. पुन्हा केव्हातरी.”
पण त्या अर्ध्या एक तासात मला ह्या सगळ्यातला फोलपणा समजला. लाख रुपये खर्च करून कोकाटेंनी आपला अमूल्य वेळ खर्च करून हा रोबोट बनवला. त्या पेक्षा तोच पैसा आणि वेळ कुटुंबावर खर्च केला असता तर! मी तरी असल्या यंत्राबरोबर बुद्धिबळ खेळणार नाही. मला बुद्धिबळ खेळायाची हुक्की आली तर मी माझ्या मित्राला आमंत्रण देईन आणि चहा, कॉफी, किंवा इतर काहीतरी पीत पीत, गप्पा मारत मारत...
“चला मी तुम्हाला घरी सोडतो.”
आम्ही त्या यंत्रमानवाच्या “गुहेतून” बाहेर पडलो. बाहेर भाऊ बहिण गुप चूप अभ्यास करत होते.
कुणाशीही चकार शब्द न बोलता आम्ही बाहेर पडलो.
“मी थोडा बाहेर जाऊन येतो. काही आणायचं आहे का?” असलं काही नाही. बायका मुलं हे कोकाटेंच्या दृष्टीने अस्तित्वात नव्हते.
माझ्या घरापाशी एक इराणी आहे. तिथं आल्यावर मी कोकाटेंना फटफटी थांबवायला सांगितलं.
“चला आपण चहा घेऊ.”
कोकाटे निःशब्द होते. तो बग त्यांना चावला होता.
चहा पितापिता कोकाटे बोलले, “हे लोक चहात “ते” टाकतात असं मी ऐकलं आहे. खरं आहे का?”
“कोकाटे, सोडून द्याना ते. आपल्याला चव आवडतेना? बस्स.”
मग मी माझ्या मनातली मळमळ काढून टाकली.
“कोकाटे ह्या असल्या एकांगी रोबोटचा काय फायदा? मला असा रोबोट पाहिजे आहे ज्याच्या हातात मी पैसे देईन आणि सांगेन, “जा आणि त्या कोपरयावरच्या वाण्याकडून हे हे घेउन ये. पळ.””
“हो. त्यावरही काम चालू आहे.” मग विषय सोडून ते एकदम म्हणाले, “मघाशी तुम्ही हळूच एक प्यादे बाहेर काढले होते?”
मी गडबडून गेलो. स्वतःला सावरत म्हणालो, “आय जस्ट वांटेड टू टेस्ट...”
“अरेरे, माणसे एव्हढी फसवणारी असतात हे मी रॉबीला शिकवले नाही ही माझी चूक...बिचारा.”
मला चर्चा वाढवायची नव्हती. उठलो आणि काऊंटर वर बसलेल्या इराण्याकडे गेलो आणि अमूलची दोन डार्क चॉकलेट घेतली. नाईण्टी नाईन पर्सेंट डार्क! का? कुणास ठाऊक.
कोकाटेंच्या हातात ठेवली, “घ्या.”
“मी चॉकलेट खात नाही, कुलकर्णी,”
मी हसून बोललो, “ही तुमच्या साठी नाहीत. तुमच्या त्या गोड पिल्लांसाठी.”
“गोड? कोण? माझी मुलं गोड?”
आम्ही इराण्याकडून बाहेर पडलो. कोकाटे अजून तंद्रीत होते.
“कुलकर्णी, तुमच्या कडून खूप काही शिकण्यासारखं आहे.”
कोकाट्यांनी गाडीला किक मारली आणि ते निघून गेले.
(भाग-२ समाप्त)

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet