कोकाटेंंचा रोबोट --३

रात्रीचे दहा वाजले असावेत. झोप येणे अवघड होते. कोकाट्यांचा तो बुजगावण्यासारखा सारखा दिसणारा रोबोट सारखा डोळ्यासमोर येत होता. शपथेवर सांगतो, मी आजवर कुणालाही जाणूनबुजून फसवलं नव्हतं. पण आज मी त्या “यंत्र मानवाला” फसवलं होतं. त्याची मनाला चुटपूट लागून राहिली. एका परीने कोकाटेंच्या घरातले वातावरण त्याला कारणीभूत असावे. असं पण असेल की मला कोकाटेंच्या हव्यासातला फोलपणा दाखवून द्यायचा असेल. पहा बघता बघता मी देखील त्या चक्रात ओढला गेलो होतो. एका निर्जीव यंत्राला कळत नकळत सजीव मानायला लागलो होतो. अशा विचारांच्या धुंदीत झोपेतही मला रॉबी दिसत होता. त्याच्या चेहऱ्यावर ते मिश्कील हसू नव्हते. थोडेसे रागीट, थोडेसे निराशेचे भाव होते.
दुसऱ्या दिवशी कॉलेजला गेल्यावर सगळ्यात आधी कोकाटेंना पकडले.
“सर, काल माझं चुकलच. मी रॉबीबरोबर असा अप्रामाणिकपणा करायला नको होता. प्लीज रॉबीला सांगा की “कुलकर्णी इज सॉरी.””
“अहो तुम्ही विनाकारण सेंटीमेंटल होऊ नका. मी त्याला अजून जाणीव नेणीव दिलेली नाही, जेव्हा त्याला मी ती देईन तेव्हा त्याची काम, क्रोघ, लोभ, मोह, मद, मत्सर ह्या षड्रिपूंशी ओळख होईल. त्याला अजून वीस वर्ष लागतील. पण जेव्हा तसं होईल तेव्हा रोबोट आणि मानवांमध्ये काही फरक उरणार नाही. अर्थात मी माझ्या रॉबीला माणूस होऊ देणार नाहीये. त्या मोहात मला पडायचे नाही. कुलकर्णी मी तुम्हाला सांगतो जगात सगळ्यात विश्वासघातकी प्राणी कोण असेल तर तो म्हणजे माणूस...” अशी आगपाखड जी चालू झाली ती थांबेचना.
माझीच चूक होती. सकाळी सकाळी झक मारली नि त्यांच्यासमोर विषय काढला. बोलून बोलून त्यांच्या तोंडामधून फेस यायला लागला. दम लागला तेव्हा ते थांबले.
मी आश्चर्यथक्कीत होऊन पहातच राहिलो. काय बोलावे तेच सुचेना. ह्या माणसाच्या अंतरमनात काय काय दडपून ठेवले आहे कुणास ठाउक. छोटीसी ठिणगी आणि दारूच्या कोठाराचा स्फोट.
हळू हळू दिवस जात होते.
एक दिवशी बातमी आली. मे महिन्याच्या सुरवातीला कुणाची ना कुणाची विकेट पडते. कॉलेज लाईफ असेच. सारे जण टेंपरवारी. काही कमी काही जास्त. पण टेंपरवारीच. पुढच्या टर्मचा भरवसा नाही.
ह्या वेळी कोकाटेंची विकेट गेली.
मला एका मानसशास्त्रज्ञाने सांगितले होते. लोक वेळ काढून आवर्जून हॉस्पिटलमध्ये भरती झालेल्या मित्राला, नातेवाईकाला भेटायला का जातात कारण त्यांना त्यामुळे दिलासा मिळतो, “मी नाही. मला हार्ट अॅटॅक येणार नाही. माझी किडनी शाबूत आहे. मी रेषेच्या ह्या बाजूला आहे. मला काही होणार नाहीये.” इथेही अगदी तोच प्रकार. त्याच मानसिकतेतून सगळ्यांना कोकाटेला भेटून सहानभूति दाखवायची होती. पण कुणाची हिम्मत झाली नाही.
कॉमन रूम मध्ये हलक्या आवाजात लोकं बोलत होती.
“कोकाट्याला जीपीएल झालं. बर झालं. त्याची तीच लायकी.”
आपण वाचलो. कोकाट्या गेला. अशी चर्चा एक दिवस झाली. हार तुरे नाहीत. सेंड ऑफ नाही. बनावट भाषणं नाहीत नाहीत कि शेक हॅंड नाहीत.
मी मात्र उपचार म्हणून का होईना कोकाटेंना जाऊन भेटलो.
कोकाटे “इलेक्ट्रॉनिक्स फॉर यू” वाचत बसले होते.
“सर, तुम्ही चाललात? कॉलेजने एक अनुभवी टीचर गमावला.”
कोकाटे दिलखुलास हसले, “कुलकर्णी, छापिल वाक्यं बोलू नका. काय मनात असेल ते माणसाने बोलून टाकावे.”
ते असे काही तिरकस बोलतील ह्याची मला खात्री होती. त्यामुळे मी तयार होतोच.
“कोकाटे, आता आपण फिरून भेटू कि नाही? काही सांगता येत नाही. भेटू किंवा नाहीही. तुमचा विषय आहे विज्ञान. तुम्ही मानवी जीवनाला तर्कशास्त्र आणि गणित ह्यांच्या साच्यामध्ये ठोकून बसवायचा प्रयत्न करता. तो फसला कि तुम्ही सैरभैर होता. अहो सर, माणसाला स्वतःला समजत नाही कि तो असा का वागला. तुम्ही तुमच्या रॉबीला बुद्धिबळ शिकवलत. समजा रॉबीने उद्या प्रश्न केला कि “गुरुजी, घोडा अडीच घर दुडक्या चालीने का चालतो? उंट तिरकस का चालतो? “ तुम्ही काय उत्तर द्याल? मानव उंट आणि घोड्यापेक्षा निराळा नाहीये. कुठल्या घरी जन्म घ्यायचा हे त्याच्या हातात नाही. त्याचे डीएनए त्याच्या आई बापाच्या डीएनए चे गूढ संयुग असते. आई-बाबांचे डीएनए अजून कुणाचेतरी मिक्चर... तुम्हाला बिग-बॅंग माहित असेलच. ते जेव्हा झालं तेव्हाच संपूर्ण विश्वाचे, माझे, तुमचे भविष्य लिहिले गेले. हे जर समजले तर तुम्हाला कोणाचाही राग येणार नाही उलट कणव वाटेल. जेव्हा जीझस ख्राईस्टला क्रुसावर चढवले तेव्हा काय म्हणाला,
“Then Jesus said, “Father, forgive them, for they do not know what they are doing.”
हे वाक्य तुम्हाला सतत मार्गदर्शन करेल.”
“मला कुणाच्याही मार्गदर्शनाची गरज नाहीये कुलकर्णी. जीझस ख्राईस्टची तर अजिबात नाही. माझ्यासाठी फक्त विज्ञान मार्गदर्शक आहे.”
त्यांनी जीझस ख्राईस्टला हे असं उडवून लावलं, जणू काय रॉजर फेडररचा क्रॉस कोर्ट रिटर्न! मी शिस्तबद्ध माघार घेतली.
“कोकाटे, माझ चुकलं. आय अॅम सॉरी.”
या पुढे कोकाटेच काय पण दुसऱ्या कोणालाही सल्ला द्यायचा नाही असा निश्चय केला.
“मी एक विचारू का? थोड पर्सनल आहे. रागावणार नसाल तर विचारतो.” कोकाटेंनी विचारले.
“विचारा न. खुशाल विचारा.”
“तुमचे लग्न झाले नाहीये ना.”
“तरीच.”
“तरीच काय? कोकाटे स्पष्ट बोला.”
“”प्रत्येक अयशस्वी माणसाच्या मागे एक स्त्री असते.” हे तुम्हाला समजणार नाही. लग्न झाल्याशिवाय.”
हे मी आयुष्यात सतत ऐकत आलो आहे.
“तुझं बर आहे रे, तुला नाही समजणार आम्हा लोकांचे दुःख. आपण मेल्या शिवाय नरक दिसत नाही.”
मी अविवाहित आहे म्हणून मला हे असल नेहमी ऐकावे लागते. आता सवय झाली आहे. मन निरढावले, निगरगट्ट, कोडगे, झाले आहे. ह्या साल्यांना कोणी मानगूट पकडून जबरदस्ती उभे केले होते बोहोल्यावर? म्हणतात ना दुरून डोंगर साजरे. ह्यांना काय सांगू कि आम्हाला कोणी सकाळी चहाची कपबशी हातात घेऊन लाडे लाडे उठवत नाही! स्वतःचा चहा स्वतः करून घ्यावा लागतो. ते काय आहे ना “जो खायेगा उसका भला और नाही खायेगा उसका भी भला.
एक आईसकोल्ड हस्तांदोलन करून मी कोकाटेंचा निरोप घेतला.
ह्या गोष्टीला पाच सहा वर्षे झाली असावीत. किंवा जास्तच. ह्या पाच सहा वर्षात कॉलेजमध्ये कुणालाही कोकाटेंची आठवण झाली नाही. खोटं कशाला सांगू? मलाही नाही झाली. उडत उडत एवढेच कानी आले होते कि त्यांनी टीचिंग लाईन सोडून कुठल्यातरी इलेक्ट्रोनिक कांपोनेंट बनवणाऱ्या कंपनीत नोकरी पत्करली होती.
आणि अचानक एके दिवशी कोकाटे दत्त म्हणोनी माझ्यासमोर उभे ठाकले.
मी आपला खुशाल रस्त्याच्या बाजूच्या ठेल्यापासच्या बाकड्यावर बसून कटिंग चहा आणि बुकशॉप मध्ये आलेले ताजे ताजे गूजबम्स “बिवेअर द बॉग गर्ल” वाचत होतो. इतक्यात एक टक्कल पडलेला, किरकोळ शरीरयष्टीचा, लफूटपैकी दिसणारा माणूस समोर येऊन बसला. समोरचं दुसरं बाकडं माझ्या बापाचं नसल्यानं माझा नाईलाज होता. मी एकवार तिकडं नजर टाकून माझं वाचन चालू ठेवलं.
“ओहो कुलकर्णी अलभ्य लाभ. मला ओळखलेले दिसत नाहीये. मी तुमची आठवण विसरलो नाही. ओळखा पाहू मी कोण?”
मी पुस्तकातून लक्ष काढून त्या उखाणे घालणाऱ्या सदग्रहस्थाकडे बघितले. तेच ते, धुक्यात हरवलेल्या दीपस्तंभाच्या दिव्यासारखे लुकलुकणारे दोन डोळे.
“ओ माय! कोकाटे! सॉरी हा. मी तुम्हाला ओळखलेच नाही. केव्हडे बदलला आहात तुम्ही.” मी खाडकन उठून उभा राहिलो. शेकहॅंडसाठी हात पुढे केला.
माझ्या हाताकडे दुर्लक्ष करून कोकाटेंनी विचारले, “काय म्हणतेय कॉलेज? तुमची नोकरी अजून चालू आहे ना?”
मी माझा हात पॅंटच्या खिशात ठेऊन दिला.
“कॉलेज? कॉलेज एकदम फर्स्टक्लास!” त्यांना भेटून माझ्या मनात काय भाव आले ते मी सांगत नाही. तरी देखील मी बळेबळेच बोललो, “ग्लॅड टू सी यू सर. तुमचा तो रॉबी कसा आहे?”
“तुम्हाला अजून आठवण आहे म्हणजे. चला आता माझ्या बरोबर माझ्या घरी. रॉबी आता बोलायला शिकला आहे. पाच वर्षांचा झाला आहे.”
आई-बाबा आपल्या मुलाच्बद्दल जितक्या अभिमानाने आणि प्रेमाने बोलतात तेव्हढ्या प्रेमाने कोकाटे बोलत होते.
“तो आता कविता करतो. वाचा तरी एकदा.”
मी असं काहीतरी ऐकलं होतं. आंतरजालावर जे लिस्टिकल्स आपण वाचतो ते म्हणे रोबोट्स लिहितात. लिस्टिकल्स म्हणजे “टॉप टेन हॉरर बुक्स” “ऑल टाईम टॉप टेन मूवीज” “टॉप टेन फलाणा धिकाना” सध्या हे असलं म्हणे रोबोट लिहितात. ह्यांची मजल आता कविता करण्यापर्यंत गेली?
“कोकाटे नाही. माझा विश्वास नाही.”
“मग चला माझ्या बरोबर. वाचा त्याने लिहिलेली प्रेमपत्र. रॉबी शेक्सपिअरच्या, डिकन्सच्या, हेमिंग्वेच्या स्टाईलने लिहिलेल्या कथा आणि कविता दाखवतो. कुलकर्णी, तुम्ही प्रेमकथा लिहिताना? बस करा. रोबोट तुमच्या पेक्षा सरस कथा लिहितील. मूव्ह ओवर ऑथर. रोबोटना जागा करून द्या. पुढच्या काही वर्षात वाङ्मयाचे नोबल प्राईझ रोबोटना मिळणार आहे. लेखक महाशय तुमच्या लेखण्या म्यान करा.” कोकाटे छद्मी हसत बोलले.
हे सगळे भयावह होते. असह्य आणि अशक्य. माणसाची माणुसकी हिरावून घेण्यासारखे क्रूर होते. मी मनोमन आशा करत होतो कि कोकाटे फुगवून चढवून सांगत आहेत. तद्दन खोटं बोलताहेत.
आता मात्र त्यांच्याबरोबर जाणं भाग होतं. इच्छा नव्हती पण इलाज नव्हता.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet