ॲलोपथी आणि पर्यायी वैद्यकीय प्रणाली - भाग ५

प्रकरण ५ – परीक्षा आणि चिकित्सा

सुधीर भिडे

विषयाची मांडणी

  • अष्टपरीक्षा – मूत्र, मल, जिव्हा, शब्द, स्पर्श, नेत्र, आकृती, नाडी
  • अद्रव्य चिकित्सा – दैव व्यपाश्रय, धुपन, युक्तिव्यपाश्रय, सत्वावजय, लंघन, बृहण, रुक्षण, संदेहन, शल्य, रसायन, पंचकर्म
  • चिकित्सेत पथ्याचे महत्त्व
  • समालोचन

***

अष्टपरीक्षा
माहिती या निबंधातून घेतली आहे. Review of AshtaParikshaa, Anand Tekade, Deepali Vatkar, Kavitaa Daulatkar, Mukund Dive, International Journal Of Ayurveda and Pharma Research, Jan 2018.

आयुर्वेदात मूत्रपरीक्षा, मलपरीक्षा, जिव्हापरीक्षा, शब्दपरीक्षा, स्पर्शपरीक्षा, नेत्रपरीक्षा, आकृतीपरीक्षा आणि नाडीपरीक्षा या आठ चाचण्या रोगनिदानासाठी सांगितल्या आहेत.

  • मूत्रपरीक्षा – मूत्राच्या रंगावरून वात, पित्त, कफ किंवा इतर दोष याचे निदान केले जाते. (या लेखात मूत्राचा घनफळ किंवा वारंवारिता यांचा उल्लेख नाही.)
  • मल परीक्षा – विष्ठेचे प्रमाण, रंग, आकार, वास याची नोंद घेतली जाते. पाण्यात तरंगते की बुडते ते पाहिले जाते.
  • जिव्हा परीक्षा – रंग, जिभेवरील थर, स्पर्शाला मऊ किंवा कठीण, जिभेवर फोड दिसतात का हे पाहिले जाते.
  • शब्दपरीक्षा – आवाज घोगरा, नास्य, मुलायम.
  • स्पर्शपरीक्षा – स्पर्श थंड आहे का गरम आहे, त्वचा रखरखीत आहे का, मुलायम आहे का, त्वचेवर व्रण आहेत का.
  • नेत्रपरीक्षा – दृष्टी स्थिर आहे की भिरभिरणारी आहे, बुब्बुळे पांढरी आहेत की पिवळी, डोळे पाणीदार आहेत की कोरडे.
  • आकृतीपरीक्षा – शरीर रचना कृश, योग्य, स्थूल

नाडी परीक्षा
खालील माहिती तीन स्रोतांतून घेतली आहे.
नाडी परीक्षा – आर्ट ऑफ लिविंग; संपूर्ण आरोग्य वर्धिनी लेखक वैद्य खडिवाले; Journal of Ayurveda and Integrative Medicine, P Venkata Girikumar et al, Vol 10, Dec 2019,

नाडी परीक्षेचा प्रथम उल्लेख तेराव्या शतकात लिहिलेल्या शारंगधर संहितेत सापडतो. नाडीपरीक्षा त्रिदोष चिकित्सेचा पाया आहे. सकाळच्या काळात नाडी कफप्रधान असते, मध्यान्नी पित्तप्रधान असते आणि संध्याकाळी वातप्रधान असते. नाडीपरीक्षा सकाळी अन्शापोटी करावी. शक्य नसल्यास जेवणानंतर तीन तासांनी करावी.
वैद्याने तर्जनी अंगठ्याच्या मुळाशी ठेवावी, जिथे वात दोष समजतो. मध्यमा त्याच्या मागे ठेवावी जिथे पित्त दोष समजतो आणि अनामिका (ring finger) त्याच्या मागे ठेवावी जिथे कफ दोष समजतो.

या ठिकाणी रेडियल आर्टरी जाते. नाडीचे ठोके वात, पित्त आणि कफाचे प्रमाण ढोबळ मानाने सांगू शकतात.


नाडी परीक्षा

आपण एवढेच समजू शकतो की ही परीक्षा आणि त्यावरून काढलेले निष्कर्ष पूर्णपणे व्यक्तिनिष्ठ (सब्जेक्टिव) आहेत; वस्तुनिष्ठ (ऑब्जेक्टिव) नाहीत. एकाच धमनीच्या (आर्टरी) एक एक सेंटीमीटर अंतरावर नाडीचा अंदाज बांधायचा असतो. यात काही मोजमाप शक्य नाही. आणि जिथे मोजमाप नाही ते शास्त्र नाही.

'तेजोमय' मासिकाच्या २०२२ च्या दिवाळी अंकात ‘आयुर्वेदाची यांत्रिक अभिव्यक्ती’ अशा शीर्षकाचा एक लेख प्रसिद्ध झाला आहे. लेखकाने ‘नाडी तरंगिणी’ अशा नावाचे एक उपकरण शोधले आहे आणि त्याचे पेटंट घेतले आहे असा उल्लेख आहे. हे उपकरण मनगटावरील स्पंदनाची नोंद करून त्याचे विश्लेषण करते आणि विश्लेषणात २५०००हून अधिक डेटा पॉईंट वापरले असे लिहिले आहे.

लेखाविषयी बोलायचे तर लेखात तांत्रिक अथवा क्लिनिकल माहिती दिलेली नाही . एक साधा प्रश्न असा की या उपकरणाचे कॅलिब्रेशन कसे केले? आत्तापर्यंत किती आयुर्वेदाच्या डॉक्टरांनी हे उपकरण वापरून निदान केले आहे? लेखकाने उपकरणाच्या उपयोगाविषयी माहिती दिली असती तर बरे झाले असते. पेटंट उपकरणाचे आहे, उपकरणाच्या उपयोगाचे नाही. दिलेल्या माहितीवरून उपकरणाचा कसा वापर होणार आहे याचे भाकीत करणे अवघड आहे. शिवाय ज्या तत्त्वांच्या भौतिक अस्तित्वाविषयीच साशंकता आहे त्याचे मोजमाप करणे प्रश्न निर्माण करते.

आपण वर पाहिल्याप्रमाणे आयुर्वेदाच्या सांगण्याप्रमाणे नाडी परीक्षा त्रिदोषाची माहिती मिळण्यासाठी केली जाते आणि यावरून कोणत्याही रोगाचे निदान करता येते. आयुर्वेदाचे उपचार देणार्‍या ISO 9001 /14001 प्रमाणित संस्थेची एक जाहिरात महाराष्ट्र टाइम्सच्या १६ जुलै २०२२च्या पुणे प्लस पुरवणीत आली. त्या जाहिरातीप्रमाणे –

गुडघेदुखीवर विना शस्त्रक्रिया उपचार शक्य आहे. सर्व जुनाट सांधेदुखीच्या विकारावर नाडीचिकित्सा अतिशय उपयुक्त ठरते. आपल्या सांधेदुखीमागील मूल कारण नाडीपरीक्षेद्वारे समजून आजार समूळ नाश केला जातो. ज्यामुळे वेदनाशामक औषधे आणि शस्त्रक्रिया यापासून आपली कायमची सुटका होऊ शकते. --------- ने गेल्या १५ वर्षात नाडीचिकित्सेच्या आधारावर १००००हून अधिक रुग्णावर त्यांच्या संशोधित आणि प्रमाणित आयुर्वेदिक औषधांनी संपूर्ण उपचार केले आहेत.

वरील जाहिरातीत नाडी‘चिकित्सा’ हा शब्दप्रयोग केला आहे. इथे चिकित्सा या शब्दाचा अपेक्षित अर्थ उपचार. म्हणजे नाडीवर उपचार करून गुडघेदुखी बरी करणार. त्यानंतर लगेच नाडी परीक्षा हा शब्द प्रयोग आला आहे. यावरून काय समजावे?

समजा एक व्यक्ती, जिला गुडघे दुखीचा त्रास आहे, वरील संस्थेत गेली. एक वैद्य त्या व्यक्तीची पूर्ण तपासणी करणार. व्यक्ती अर्थातच वैद्याला गुडघे दुखतात हे सांगणार. ज्यांना गुडघ्याचा ऑस्टिओआर्थ्रायटिस असतो त्यांच्या गुडघ्यात वाक येतो. तेव्हा नाडी परीक्षेनंतर ऑस्टिओआर्थ्रायटिसचे निदान करणे सहज शक्य आहे. त्यानंतर लगेच आयुर्वेदिक औषधे चालू केली जातील. तेलाचा मसाज, शेकणे, ब्रेसेस अशा उपचारांनी काही आराम मिळू शकतो. काही औषधे दिली जातील. यात सहा-आठ महिने निघून जातात. यानंतर त्रास चालूच राहिला तर रोग्यापुढे मोठे प्रश्न उभे राहतात. आज या शस्त्रक्रियेला पाच लाख खर्च येतो. शिवाय शस्त्रक्रियेनंतर कुटुंबाचा सपोर्ट लागतो. ही शस्त्रक्रिया करून घेणे सर्वांनाच शक्य होत नाही. या व्याधीबरोबर जगणारे, लंगडत, डोलत, पाय खेचत चालणारे कितीतरी वृद्ध आपण समाजात पाहतो. असे वृद्ध आयुर्वेदाचे उपचार घेऊन का वेदनेशिवाय आयुष्य जगत नसतील?

नाडी परीक्षेने ढोबळ मानाने कफ, वात, पित्त याचा अंदाज येतो असे वैद्य म्हणतात. तर डॉक्टर पटवर्धन म्हणतात की त्रिदोष सिद्धांतच प्रश्नांकित आहे. अशा अनिश्चित पद्धतीचा वापर करून थेट निदान कसे करता येणार?

चिकित्सा

आयुर्वेदाच्या उपचार पद्धतीत दोन प्रकार आहेत – द्रव्यचिकित्सा आणि अद्रव्यचिकित्सा. या प्रकरणात आपण अद्रव्यचिकित्सेची माहिती घेऊ. पुढच्या प्रकरणात आपण द्रव्यचिकित्सेची माहिती घेऊ. खालील माहिती आयुर्वेद उवाच, लेखक डॉक्टर बालाजी तांबे, भाग २, बालाजी फाउंडेशन या पुस्तकातून घेतली आहे.

शरीरातील आजार घालविण्यासाठी करण्याच्या उपचारांना आयुर्वेदात चिकित्सा म्हणतात. मराठी बोलीभाषेत चिकित्सा हा शब्द analysis या अर्थाने वापरला जातो. आयुर्वेदात चिकित्सा म्हणजे उपचार. चिकित्सा शब्दाचे मूळ ‘कित’ हे आहे. कित म्हणजे घालविणे. शुद्ध चिकित्सा हा शब्द प्रयोग ग्रंथातून आढळतो. त्याचा अर्थ औषधाने होणारे दुष्परिणाम टाळून केलेले उपचार. आयुर्वेदातील महत्त्वाच्या अद्रव्यचिकित्सेची माहिती घेऊ.

दैव व्यपाश्रय – प्रत्यक्षम अल्पम, अनल्पम अप्रत्यक्षम. इंद्रियांना समजणारे थोडे आहे, इंद्रियांना न समजणारे अपार आहे. ही चिकित्सा इंद्रियांना जे समजत नाही त्यावर उपचार करते. (याचा मराठीत अर्थ अष्टपरीक्षेने निदान करता येत नाही असा आजार) दैव कालांतराने रोगाचे कारण ठरते. मंत्र म्हणून रोगावर नियंत्रण मिळविणे, तावीत घालणे, बळी देणे, यात्रेला जाणे, उपवास करणे, प्रायश्चित्त करणे अशा उपायांनी रोगांवर नियंत्रण मिळविता येते. (आज यावर कोण विश्वास ठेवेल?)

धूप – निरनिराळ्या औषधींचे धूप घालून जंतूंवर नियंत्रण मिळविणे.

युक्तिव्यपाश्रय – रोगाची लक्षणे, रोग्याची स्थिती यांचा विचार करून आचरण, आहार, आणि औषधे यांचा योग्य निर्णय करणे. (हे सर्वच वैद्यकीय प्रणालींनी – ॲलोपथीसकट – करणे आवश्यक आहे.)

सत्त्वावजय – मन शुद्ध ठेवणे हे आरोग्यासाठी आवश्यक असते. मनाचा निग्रह करणे म्हणजे सत्वावजय चिकित्सा. ज्ञान, धैर्य, स्मृती, समाधी यांनी मनावर नियंत्रण ठेवता येत. येथे समाधीचा अर्थ इंद्रियांपासून निवृत्त होणे हा आहे. मानसिक विकारांसाठी ही चिकित्सा महत्त्वाची ठरते.

लंघन – वमन, विरेचन, बस्ती, नस्य, वायुसेवन, उपवास, व्यायाम या प्रकारे लंघन करता येते.

बृहण – लंघनाच्या विरुद्ध बृहण, शरीराच्या धातूंची वृद्धी करण्यासाठी बृहण केले जाते.

रुक्षण – शरीरात पाणी साठले असता रुक्षण करण्याची जरूर असते. रुक्षणासाठी तिखट, कडू, तुरट अशा पदार्थांचे सेवन करता येते. ताक, मद्य, मैथुन, स्वेदन यानेही रुक्षण होऊ शकते. (लठ्ठ व्यक्तींना मद्य प्या आणि मैथुन करा, म्हणजे वजन कमी होईल असे सांगण्यात येत आहे!)

संदेहन – रुक्षणाच्या विरुद्ध संदेहन.
शल्य – शल्य चिकित्सेची माहिती खालील लेखातून घेतली आहे.
Sushruta: The father of surgery, Natl J Maxillofac Surg. 2017 Jan-Jun; 8(1): 1–3. Vibha Singh
वैद्य सुश्रुत २००० वर्षापूर्वी बनारस येथे रहात होते. त्यांनी सुश्रुत संहिता लिहिली. या संहितेत शल्यतंत्राची माहिती दिलेली आहे. त्या काळात सुश्रुतांनी मानवी शरीराची रचना समजण्यासाठी प्रेताचे विच्छेदन करण्याची गरज सांगितली आहे. संहितेत शल्यक्रियेची कर्मे आणि शल्यक्रियेची आयुधे यांची माहिती आहे. आठ प्रकारच्या शल्यक्रियेची माहिती देण्यात आली आहे. अस्थिभंग (fracture) झाल्यावर कशा प्रकारे हाडांची जुळवणी करावी या संबंधी सूचना आहेत. मागून फिजिओथेरपी कशी करावी हे पण सांगितले आहे. शल्यक्रिया करताना भूल देण्यासाठी मदिरा आणि भांग यांचा वापर करण्यात येत असे.

रसायन चिकित्सा

खालील माहिती Ayurveda for your health, Shri Dhanvantari clinic Ghajiabad यांचे माहिती पत्रक आणि प्रकृतीचे अंतरंग, भाग १ व २ लेखक वैद्य विजया लेले, आयुर्वेद हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर या पुस्तकातून घेतली आहे.

आयुर्वेदातील रसायन चिकित्सेचा आधुनिक रसायन शास्त्राशी (केमिस्ट्री) संबंध नाही. रसायनचिकित्सेपूर्वी शरीर पंचकर्म क्रियेने शुद्ध केले जाते. चरक संहितेप्रमाणे अशा प्रकारचा आहार, दिनचर्या आणि औषधे, जे वृद्धावस्थेला आणि रोगांना दूर ठेवतात त्यांना रसायनचिकित्सा म्हणतात. अश्वगंधा, गुडूची, आंवला, हरिताकी, शिलाजीत (कोलटार) आणि सुवर्णभस्म ही प्रमुख रसायने या चिकित्सेत वापरली जातात. (Immuno-modular medicines, Publication, Ayush Mantralaya)

रसायनचिकित्सा ही अष्टांगापैकी जराचिकित्सेत येते. वातातपिक आणि कुटिप्रवेशिका अशा दोन प्रकारे ही चिकित्सा करता येते. वातातपिक क्रिया ही खुल्या वातावरणात केली जाते तर कुटिप्रवेशिका ही क्रिया एका कुटीत बंद वातावरणात केली जाते.

कुटीत साधक / रोगी जगापासून पूर्णपणे निराळा केला जातो. कुटी एकात एक अशा तीन भिंती बांधून केलेली असते. या प्रकारे साधकाला / रोग्याला ४५ दिवस राहायचे असते. या काळात साधकाला / रोग्याला पळसाच्या खोडात शिजवलेले आवळे, मध आणि तूप खायला द्यायचे असते. या शिवाय गायीचे दूध दिले जाते. कुटीत फक्त हवा येण्यापुरती झरोके असतात. या क्रियेतील श्लोकाप्रमाणे श्वापदे, स्त्रिया आणि मूर्ख लोक यांना कुटीत येण्यास मनाई असते. (वाचकांतील स्त्रियांना काय वाटले? पुरुष वॉर्डात स्त्री नर्सेस नसाव्या हे सांगण्यासारखे झाले.) कुटीमधला काल हा गर्भाशयात पुन:प्रवेश केल्या सारखा असतो आणि त्या काळाच्या शेवटी पुनर्जन्म होतो. कुटीतच साधकाने जगाशी संपर्क न ठेवता राहायचे असते. कुटीत ध्यानधारणा करायची असते.
पुढील भागात आपण पाहू की रसायनचिकित्सा एका आयुर्वेदाच्या संस्थेने कॅन्सरच्या उपचारासाठी वापरली.

अष्टांग आयुर्वेद

काया चिकित्सा (इंटर्नल मेडिसीन), बालचिकित्सा (पिडीयाट्रिक्स), ग्रहचिकित्सा (सायकियाट्रि), उर्ध्वांगचिकित्सा (इ. एन टी), शल्यचिकित्सा (सर्जरी), दमस्त्रचिकित्सा (टॉक्सिकोलोजी), जराचिकित्सा (जेरीयाट्रिक्स), व्रशचिकित्सा (सेक्शुआलिटी)

पंचकर्म

माहिती डॉक्टर सुकुमार सरदेशमुख यांच्या ६ ऑगस्ट २२ रोजी महाराष्ट्र टाइम्समधील लेखातून.

पंचकर्माचा उपयोग शरीरात साठलेले दोष शरीराबाहेर काढण्यासाठी केला जातो. आयुर्वेदाप्रमाणे शरीरात त्रिदोष असतात.. लेखकाच्या सांगण्याप्रमाणे कफदोष आमाशयात (जठरात) निर्माण होतो. छोट्या आतड्यात पित्त निर्माण होते आणि मोठ्या आतड्यात वातदोष निर्माण होतो.

पंचकर्म शोधनचिकित्सेचा भाग आहे. दोष आणि आम शरीरातून बाहेर काढण्यासाठी शोधनचिकित्सेचा उपयोग होतो. पंचकर्म हे काही आजार नसलेल्या व्यक्तीसही सांगितले जाते.

  • जठरातील कफ दोषासाठी वमन (vomiting)
  • छोट्या आतड्यातील पित्तासाठी विरेचन, जुलाब (purgation)
  • मोठ्या आतड्यातील वात दोषासाठी बस्ती (enema)
  • गळा आणि डोक्याच्या आजारासाठी नास्य (cleaning nasal passage),
  • रक्तातील दोषासाठी रक्तमोक्ष (blood letting)

निरोगी व्यक्तींनी ऋतूंप्रमाणे पंचकर्म करणे सांगितले आहे. वसंत ऋतूत वमन, पावसाळ्यात बस्ती आणि शरद ऋतूत विरेचन करणे चांगले.
पंचकर्म करताना सुरुवातीला शरीर तयार केले जाते. वमन, विरेचन आणि रक्तमोक्षासाठी औषधी तूप प्यायला दिले जाते. शरीराला मालीश केले जाते आणि मग बाष्पस्नान दिले जाते.
अशा प्रकारे आयुर्वेदाप्रमाणे पंचकर्म प्रिव्हेंटीव मेडिसीन आहे.

आजारी व्यक्तींसाठी पंचकर्म करताना त्या आजाराचा सांगोपांग विचार केला जातो.

पंचकर्माचा उद्देश शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर काढून त्रिदोषांचे संतुलन प्रस्थापित करणे हा असतो. पंचकर्म सुरू करण्याआधी शरीर तयार करण्याची आवश्यकता असते. त्या क्रियेला पूर्वकर्म म्हणतात. यात तीन क्रिया केल्या जातात. उपवास आणि काही औषधी देऊन पचनसंस्था सुधारली जाते. त्यानंतर औषधीयुक्त तूप प्यायला दिले जाते ज्या योगे मेदात विरघळणारे विषाणू बाहेर जातात. शेवटी सर्व शरीराला बाष्प स्नान दिले जाते.

यानंतर वर उल्लेखिलेल्या पाच क्रिया केल्या जातात. ज्याला प्रधानकर्म म्हणतात. प्रधानकर्मानंतर पश्चातक्रिया केल्या जातात. यावेळी रोग्याचा आहार हळूहळू वाढविला जातो. यानंतर रसायन क्रिया सांगितली जाते. अशा प्रकारे पंचकर्म एक ते तीन आठवडे चालू शकते.

खालील माहिती घरोघरी आयुर्वेद या वैद्य परीक्षित शेवडे, एम. डी. (आयुर्वेद) यांनी लिहिलेल्या पुस्तकातून घेतली आहे. (नवचैतन्य प्रकाशन, २०१६)

बस्ती – विविध काढे, तेल, दूध, मध, सैंधव इत्यादी द्रव्ये गुदमार्गाद्वारे शरीरात प्रविष्ट करणे. गुदमार्गाने दिलेल्या बस्तीचे परिणाम सर्व शरीरावर दिसून येतात. बस्ती हा वातावरचा श्रेष्ठ उपचार आहे. कंबरदुखी ते हाडांची झीज यांसारख्या पुष्कळ आजारांवर बस्ती हा उपाय आहे. (कंबरदुखीचे एक महत्त्वाचे कारण असते पाठीच्या कण्यातील (स्पायनल कॉलम) दोष. त्याचा एनिमाशी काय संबंध? हाडाची झीज शरीरातील कॅल्शियम कमी झाल्याने होते, एनिमा देऊन ते बरे कसे होणार?)

वमन – हा कफावरचा सर्वश्रेष्ठ उपचार आहे. पाच दिवस सकाळी अन्शपोटी औषधी तूप पिण्यास द्यावे. मग काही तास गरम पाणी प्यावे. यामुळे तूप पचण्यास मदत होते. वमनाच्या आदल्या दिवशी कफ वाढविणारा आहार घ्यावा (दहीवडे, दही, खिचडी, केळी, इत्यादी.) वमनाच्या दिवशी दूध अथवा उसाचा रस पोट पूर्ण भरेस्तोवर घ्यावे. यानंतर उलटी होणारा काढा दिला जातो. कुष्ठ, खोकला, दम लागणे, स्तन्य दोष असे निरनिराळे आजार बरे होतात. (स्तनांतील आजारांचा कफाशी काही संबंध नसतो, स्तन छातीजवळ असले तरी त्यांचा फुप्पुसांशी काही संबंध नसतो.)

विरेचन – वमनाप्रमाणेच पाच दिवस तूप पिण्यास द्यावे. विरेचनाच्या दिवशी सकाळी जुलाब होण्याचे औषध दिले जाते. त्वचाविकार, मूळव्याध, कावीळ अशा आजारावर हा उपचार आहे. विरेचन पित्तावर श्रेष्ठ उपक्रम आहे. (यकृतातील निरनिराळ्या आजारांमुळे कावीळ होते, ती जुलाब करून कशी बरी होणार?)

नस्य – विविध औषधी तेले आणि तूप नाकाद्वारे घालणे. मेंदूपर्यंत ही औषधे जाऊन प्रभाव दाखवितात. नाकातील औषध गळ्यात आल्यावर खाकरून बाहेर काढावे. यामुळे बुद्धी तल्लख होते आणि खांदे मजबूत होतात. (नाक साफ केले की खांदे मजबूत होतात!)

रक्तमोक्षण – जळू लावून रक्त काढणे. जळू हा प्राणी फक्त अशुद्धद्र्व्ये घेऊन टाकतो. चांगले रक्त पित नाही. (हंसाला ज्याप्रमाणे नीरक्षीर विवेक असतो त्या प्रमाणे जळवांना शुद्ध आणि दूषित रक्तातील फरक कळतो त्या अशुद्ध रक्तच शोषतात. पृष्ठ ४९) (जळू हा प्राणी इतका हुशार असतो हे माहीत नव्हते!) त्वचाविकारावर हे काम करते. सांधेदुखीवरही रक्तमोक्षण काम करते.

काही प्रश्न –

या पाच कर्मांनी पुष्कळ आजार बरे होतात असे दावे आहेत. हे प्रयोग कोणी केले? प्रयोगाचे निष्कर्ष कोठे छापून आले? दुसर्‍या किती जणांनी तेच प्रयोग केले आणि तेच निष्कर्ष निघाले?

बस्तीमुळे हाडांची झीज बरी होते असे सांगण्यात आले आहे. यासाठी काय प्रयोग करायला लागेल? ज्या लोकांच्या हाडांची घनता (बोन मिनरल डेन्सिटी) कमी आहे असे पन्नास लोक निवडा. सहा महिने त्यांचा आहार असा ठेवा की आहारातून वाढीव कॅल्शियम आणि ड जीवनसत्त्व जाणार नाही. या लोकांना दर पंधरा दिवसांनी बस्ती द्या. सहा महिन्यांनी, १२ बस्त्यांनंतर या लोकांच्या हाडांची घनता मोजा. त्यात काही बदल, सुधारणा दिसते का?

लिखाणात वात, कफ, पित्त हे शब्द वापरण्यात आले आहेत. हे शब्द त्रिदोष सांगतात की व्यावहारिक भाषेचा अर्थ काढायचा? प्रत्येक कर्मात असे आजार बरे होतात असे सांगण्यात आले आहे की ज्यांचा एकमेकाशी काही संबंध नसतो.

सर्वांत कहर म्हणजे जळू या प्राण्याला रक्तातील अशुद्ध आणि शुद्ध द्रव्यातील फरक समजतो! रक्तातील कोणती अशुद्ध द्रव्ये जळू पिऊन टाकते? या अशुध्द द्रव्यांची रक्तातील मात्रा वाढली आहे हे कसे मोजले जाते? रक्तमोक्षणांनंतर मात्रा कमी झाली हे कसे मोजले जाते. आणि परत तेच प्रश्न – हे प्रयोग कोणी केले? प्रयोगाचे निष्कर्ष कोठे छापून आले? दुसर्‍या किती जणांनी तेच प्रयोग केले आणि तेच निष्कर्ष निघाले?

चिकित्सेत पथ्याचे महत्त्व

माहिती खालील लेखातून घेतली आहे.

REVIEW ARTICLE ON PATHYA-APATHYA OF CHARAK SAMHITA, February 2022.WORLD JOURNAL OF PHARMACY AND PHARMACEUTICAL SCIENCES 08(06):675-687

आयुर्वेद आहाराला फार महत्त्व देतो. आपला आहार योग्य असेल तर आपण बरेचसे आजार दूर ठेऊ शकतो. निरोगी व्यक्तीने कसा आहार ठेवावा याविषयी निर्देश सापडतात. यामुळे पथ्य हा चिकित्सेचा भाग समजला जातो.

तूप हा आहारातील चांगला भाग समजला जातो. काही थोड्या परिस्थितींत तूप न घेण्याचे सांगण्यात येते. शेळीच्या दुधाचे तूप वाईट समजले जाते. तांदळाचे निरनिराळे प्रकार खाण्यास सांगितले जातात. त्याच प्रमाणे मिलेटचे प्रकारही (ज्वारी, बाजरी वगैरे) आहारात असतात. भारतात गहू इ. स. पूर्व ३०००पासून पिकवला जातो मग आहारात गहू का नसावा? कुठले पक्षी आणि प्राणी खावेत हेही सांगितले आहे.

ऋतूप्रमाणे आहार बदलण्याचा सल्ला दिला जातो. निरनिराळ्या आजारांत काय आहार घ्यावा याचे मार्गदर्शन आहे. उदाहरणार्थ संधीवात आजारात जुने तांदूळ, लाल तांदूळ, जंगलातील प्राण्याचे मांस, पडवळ, आले, हिरवे वाटाणे, एरंडेल, लसूण हे आहारात ठेवावे असे सांगितले आहे. (जंगलातील प्राण्यांच्या मांसाचा संदर्भ परत आला, आधी तो क्षयासाठी होता, इथे संधीवातासाठी.)

आयुर्वेदात मांसाहार वर्ज्य नव्हता असे दिसते.

समालोचन

आयुर्वेदात रोगाचे निदान करण्यासाठी आठ प्रकारच्या चाचण्या सांगितल्या आहेत. मूत्रपरीक्षेत मूत्राच्या रंगावरून वात, पित्त, कफ किंवा इतर दोषांचे निदान केले जाते. यात कोणतेही मोजमाप नाही. त्यामुळे सर्व प्रकार संदिग्ध राहतो. याची तुलना आपण ॲलोपथीच्या मूत्र चाचणीशी करू.

नेहमीच्या मूत्रचाचणीनंतर असे निकाल मिळतात – pH, proteins, glucose, ketones, bilirubin, pus cells, crystals, micro organisms आणि अजून किती तरी. यांवरून डॉक्टरांना मूत्रपिंडे आणि यकृत काम कसे करत आहेत ते समजते. मधुमेहाचे निदान होते. हा निश्चितपणा आयुर्वेदाच्या चाचणीत अजिबात नाही.

नाडीपरीक्षेत काय समजते? वात, पित्त, कफ यांतील कोणता दोष प्रबळ आहे ते सांगता येते. यांत काही मोजमाप शक्य आहे का? नाही. वैद्याला जे वाटेल तो निर्णय. ॲलोपथीमध्ये नाडीच्या ठोक्यांचे मोजमाप निश्चित असते. त्याचा निकाल ई. सी. जी.त दाखविता येतो. त्यावरून हृदयतज्ज्ञाला पुष्कळ माहिती मिळते. नाडीपरीक्षेत दिसणारे कफ, वात, पित्त मोजण्याचे कुठलेही यंत्र आजवर विकसित झालेले नाही. आयुर्वेदिक वैद्याने मोजलेले कफ, पित्त, वात निसंदिग्ध आहेत याची खात्री देण्याचे कुठलेही मार्ग, साधन नाहीत.

यानंतर आपण चिकित्सेकडे वळू. आयुर्वेदात चिकित्सा याचा अर्थ उपचार. सध्याच्या बोलीभाषेत चिकित्सा हा शब्द निराळ्या अर्थाने वापरला जातो. या प्रकरणात आपण औषधचिकित्सा (द्रव्यचिकित्सा) सोडून इतर चिकित्सांचा विचार केला. औषधचिकित्सेचा विचार पुढच्या प्रकरणात होणार आहे.

पंचकर्म चिकित्सा ही काही अंशी preventive medicineसारखी वापरली जाते. ॲलोपथीमध्ये लशीकरण / इंनॉक्युलेशन हे महत्त्वाचे प्रीवेंटीव मेडिसीन आहे. पंचकर्म ही क्रिया इतकी अवघड, खर्चिकआणि वेळ घेणारी आहे की या बाबतीत ठोस पुरावा असल्याशिवाय कोणी असल्या भानगडीत पडणार नाही.

शल्यक्रियेत सुश्रुतानंतर विकास झालेला नाही. आजचे ॲलोपथीतील शल्यक्रियाज्ञान फारच पुढे गेले आहे.

आयुर्वेदात प्रत्येक आजारात एक पथ्य सांगण्यात येते. त्या आजारात काय खाऊ नये हे रोग्यास सांगण्यात येते. ठरावीक काही रोग सोडल्यास ॲलोपथीत पथ्य नाही. एखाद्या रोग्याची पोटातील अवयवांची शस्त्रक्रिया झाली असल्यास साहजिकच सुरुवातीला काही बंधने सांगितली जातात. साधारणपणे तीन दिवसांनंतर हळूहळू साधारण आहार चालू केला जातो. काविळीत तेलकट पदार्थ कमी करण्यात सांगितले जाते. असे काही अपवाद ॲलोपथीमध्ये आहेत.

लंघन आणि उपवास ही आयुर्वेदाची एक चिकित्सापद्धती आहे. या विषयावर डॉक्टर ह. वि. सरदेसाई लिहितात ‘लंघन करूच नये असे आमचे शास्त्र सांगते’ (आरोग्य – समस्या आणि उपचार उत्कर्ष प्रकाशन २००३, पृष्ठ ७९)

विरेचन आणि बस्ती हा पंचकर्माचा एक भाग आहे. याने शरीरातील विषारी द्रव्ये निघून जातात ही कल्पना. अशा प्रकारे रेचक घेणे हे ॲलोपथीला मान्य नाही. ‘पोट साफ राहण्यासाठी एरंडेल अथवा एनिमा घेणे हे साफ चुकीचे आहे. पोट साफ होत नसेल तर ते का याचे कारण शोधले पाहिजे.‘ (डॉक्टर ह. वि. सरदेसाई)

आयुर्वेदात दैव व्यपाश्रय या चिकित्सेमध्ये मंत्र म्हणून रोगावर नियंत्रण मिळविणे, तावीत घालणे, बळी देणे, यात्रेला जाणे, उपवास करणे, प्रायश्चित्त करणे अशा उपायांनी रोगांवर नियंत्रण मिळविता येते अशी समज आहे. ॲलोपथीला हे अर्थातच मान्य नाही.

(क्रमशः)

***

भाग १ - शास्त्रीय दृष्टीकोनातून निरनिराळ्या वैद्यकीय प्रणालींचे मूल्यांकन
भाग २ - ॲलोपथीच्या आधीचे पाश्चिमात्य वैद्यक
भाग ३ - आयुर्वेदाचे मूल सिद्धान्त
भाग ४ - आयुर्वेदाचे मूल सिद्धान्त – त्रिदोष

field_vote: 
0
No votes yet

पुढील भागाच्या प्रतिक्षेत. लेखांबद्दल खूप धन्यवाद. डॉ. जोगळेकर हे येथे प्रतिसाद देतील का असा विचार मनात आला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0