संपादकीय

#अंकाविषयी #संपादकीय #ट्रॅश #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक२०२२

संपादकीय

ट्रॅश, पल्प किंवा हीन अभिरुचीच्या गोष्टींचा आस्वाद भलेभले लोकही पुरेपूर घेत असतात, पण चारचौघांत ते तसं सांगत नाहीत असं पूर्वी बऱ्याचदा दिसत असे. गेल्या काही काळात ही परिस्थिती बदलली. कदाचित सोशल मीडियात वावरताना लोकांची भीड चेपली आणि ह्या (तथाकथित) हीन अभिरुचीविषयी अगदी खुल्या दिलानं आणि चवीचवीनं सार्वजनिक संभाषितात (Public Discourse) बोललं जाऊ लागलं. मात्र, आजही पुष्कळसे लोक केवळ 'आम्हाला हे आवडतं बुवा!' एवढंच म्हणत राहतात, तर काही लोक अजूनही नाक मुरडत ते किती वाईट आहे असं म्हणून जणू आपली अभिरुची उच्च आहे असं दाखवू पाहतात. ट्रॅशकडे पुरेशा गांभीर्यानं (आणि गंमतीतही) बघितलं जायला हवं अशा अपेक्षेनं 'ऐसी अक्षरे'नं दिवाळी अंकासाठी हा विषय निवडला होता.

ह्या निमित्तानं काही वेगळा विचार वाचकांसमोर आणण्याच्या प्रयत्नात अनेक प्रिय गोष्टींची उजळणी आम्हाला करता आली. आणि ह्याचा आनंद आम्ही नक्कीच घेतला. उदा. वसंत आबाजी डहाके यांनी ॲगाथा ख्रिस्ती यांच्या रहस्यकथांमधल्या रचनातत्त्वांविषयी मांडणी केली आहे आणि त्यामागची ख्रिस्ती धर्मातली पापसंकल्पना किंवा सुप्त वर्गसंघर्ष दाखवून दिला आहे. जेम्स हॅडली चेसच्या कथांतली न्यायसंकल्पनाही ते उलगडतात. परदेशी कथांबरोबरच अर्नाळकर किंवा दिवाकर नेमाडेंसारख्या मराठी लेखकांच्या कथांमधले काही गुणविशेष ते नमूद करतात. या लिखाणाला पुरेशी प्रतिष्ठा मिळत नाही याची त्यांना खंतही वाटते. नंदा खरे ब्रिटिश वसाहतवादाशी होम्सकथांचा संबंध कसा लागतो ते सांगतात आणि हा कथाप्रकार तंत्राच्या प्रभावाखाली नको तितका जातो तेव्हा त्यातलं साहित्यिक मूल्य कसं हरवू लागतं तेही दाखवून देतात. डहाके किंवा खरे यांना हे पल्प साहित्यप्रकार गंभीर विश्लेषणाच्या योग्यतेचे वाटले ही मराठीसाठी उत्साहवर्धक गोष्ट आहे. रेखा इनामदार-साने यांच्यासारख्या साहित्याच्या प्राध्यापकांनाही स्त्री-कादंबरीकारांचा लेखाजोखा घेताना केवळ रसिकमान्य लेखिकाच नाही, तर एके काळी नाक्यावरच्या सर्क्युलेटिंग लायब्ररीत गठ्ठ्यागठ्ठ्याने दिसणाऱ्या जनमान्य कादंबरीकारांच्या लिखाणाचंही विश्लेषण त्यात समाविष्ट करावंसं वाटलं, हेही मराठी साहित्यव्यवहारात लक्षणीय आहे. शैलेन यांनी वि.का. राजवाड्यांच्या ट्रॅशनिर्मितीच्या निमित्ताने इतिहासलेखनातल्या ट्रॅशचं वर्गीकरण करून जी काही राजवाडे-रत्नं गोचर केली आहेत त्याला आमचीच नव्हे, तर ऐसीच्या सुजाण वाचकांचीही दाद मिळावी. शांतारामबापू ते RRR (व्हाया नागमोडी जिना, त्यावरून पाईप ओढणारे वडील) असा जनप्रिय भारतीय सिनेमाचा एक उभा (की आडवा?) छेदही अंकात दिसेल.

आणि अर्थात, विषयाच्या निमित्तानं आणि विषयाव्यतिरिक्त काही ललित आणि ललितेतर लेखनाचाही लुत्फ वाचकांना घेता येईल. नव्वदच्या दशकातल्या तारुण्यसुलभ भावनांना खतपाणी घालायला जेव्हा कुमार सानू अवतरला तेव्हा काय राडे झाले ह्याचं पंकज भोसले यांनी उभं केलेलं खुसखुशीत चित्र आवडण्यासाठी 'नाईन्टीज किड' असायची गरज नाही, आणि माधुरी पुरंदरे यांचा नट-निवेदक आवडण्यासाठी रंगकर्मी असणं ही पूर्वअट नाही. आदूबाळ यांचा १८९५मधला तल्लख कथानायक तर चक्क पुढे जाऊन चापेकर बंधूंचा निर्दालक होणार आहे ह्याचं ज्ञान कथेच्या आस्वादासाठी अपरिहार्य नाही, पण ते लक्षात घेतलं तर कथेची खुमारी आणखीनच वाढेल. अस्वलाच्या कटघऱ्यात या वर्षी कचरा सापडला आहे, तर कटकोळ यांनी एका सेक्सी बॉयकॉट मोहिमेचा कारनामा केला आहे. इंद्रजित खांबेंना दिसलेलं बनारस आणि चिन्मय धारूरकरांनी उलगडलेलं मराठीचं इतर दक्खनी भाषांशी असलेलं नातं या वर्षीच्या अंकाचे विशेष मानबिंदू ठरावेत. अंगावरचे केस काही जणांना आवडतात, तर काही जणांना तो कचरा वाटू शकतो; थोडक्यात काय, तर वाचकांच्या रुचिर्भिन्नतेचा सन्मान राखायला हवा. हे लक्षात घेऊन वेगवेगळ्या विषयांवरचं लिखाण अंकात समाविष्ट केलेलं आहे. तर असा हा बहुरंगी गुच्छ (किंवा खूप सारा पसारा!) आता तुमच्यासमोर आहे. त्याचा आस्वाद (आणि त्यातल्या ट्रॅशचाही आस्वाद) घ्याल तेव्हा आवडलेल्या लेखांची शिफारस आप्तांना आणि नावडलेल्या लेखांची शिफारस शत्रूंना करायला विसरू नका!

field_vote: 
0
No votes yet