शहाणे करावे सकळ जन ...

--- तर बरं का मैत्रीणींनो, तुम्ही तुमच्या नखांची काळजी घ्यायला हवी. नखांचे सौंदर्य वाढविण्याकरता एंजल चे नेलपॉलिश नियमित वापरा. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि व्यक्तिमत्व खुलून दिसेल. सुंदर रंगाचे नेलपॉलीश तुमच्या ....

देविकाने रेडिओचे बटण बंद केले. ती आता चांगलीच वैतागली होती. आज तिच्या कुंडलीतल्या ग्रहांनी काहीतरी कट केला होता की काय देवजाणे. सकाळपासून जो भेटेल तो तिला सल्ला देत होता. सुरुवात सखूबाईने केली होती. नेहमीप्रमाणे बाईसाहेब उशिराच आलेल्या होत्या. पण देविकाला स्वयंपाकाला उशीर करून चालणार नव्हते. मग बरीचशी भांडी स्वच्छ करून घेणे क्रमप्राप्त होते. महिन्यातले निम्मे दिवस मलाच भांडी स्वच्छ करून घ्यावी लागतात .. या बाई आरामात असतात. पण बोलायची सोय नाही, नाहीतर यायचा मोर्चा. रागारागाने घासल्यामुळे भांडी चांगली लखलखीत दिसत होती.

सखूबाई आल्यावर, तिला समोरच्या कुलकर्णी आजींनी जास्तीचे काम सांगितले, म्हणून उशीर झाला वगैरे सांगू लागली. नेहमीप्रमाणे आज्जी असं करतात आणि तसं करतात वगैरे तक्रारीही सुरु झाल्या. तिचे बोलणे मध्ये थांबवित देविका म्हणाली ..
"अगं बाई, तू तुझ्या अडचणी सांगतेस पण मला माझ्या नवऱ्याला, मुलांना जेवणाचा डबा द्यायचा असतो ना? डबेवाल्याच्या वेळेत तयार ठेवावा लागतो.. कारण त्याला अजून दहा घरचे डबे घ्यायचे असतात. काहीही कर पण तू जरा लवकर येत जा."
तर म्हणते कशी ?
"वयणी तुमाला सांगू का.. तुमी सगळी भांडी डब्बल घ्या."
"म्हणजे?" देविकाने विचारले.
"म्हंजे बगा कढई, परात, उलातनं , तवा सम्द दोन दोन घ्यायाचं." सखूबाईने सांगितले.
"आणि ते का म्हणून? आधीच माझ्या घरी इतकी भांडीकुंडी जमली आहे. त्यात सतत भर पडतेच आहे आणि अजून डब्बल कशाला?" देविकाने विचारले.
"आवो म्हंजी मी उशिरान आली, तरी तुमाला येगळी भांडी असतील नव्हं का? मग मी घासीन समदी सावकाशीनं " सखूबाईने तोडगा सुचवला.
"अगं पण त्या पेक्षा तू जरा लवकर का येत नाहीस?" देविकाने विचारले. तशी पदर खोचत सखुबाई उत्तरली,
"लै कामं असत्यात मला वयणी, तुमच्याकडं यायला कसंबसं जमवती मी"
असे म्हणून कोपऱ्यातला कुंचा उचलून फरशीवर चालवू लागली. यावर काही न बोलणे योग्य आहे असे देविकाने ठरवले, कारण सखूबाईला गमावणे तिला परवडणारे नव्हते.

***

आज तिला शौनक च्या शाळेत जायचे होते. त्याच्या वर्गशिक्षिका बाईंनी त्याच्या शालेय डायरीमध्ये तसे लिहून दिले होते. तिला कळेना असे मधेच काय कारण घडले असावे? नुकतीच युनिट टेस्ट झाली होती.. तसे बरे गुण मिळाले होते त्याला. शाळेतली उपस्थिती पण व्यवस्थित होती. पण चिरंजीवांचा उद्योगीपणा माहिती असल्याने ती जरा धास्तावली होती.

शाळेत वर्गशिक्षिका बाईंनी शौनकच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला. त्या नंतर बाई जरा गंभीर झाल्या, म्हणाल्या --
"अभ्यास तसा ठीक आहे त्याचा. कार्यानुभव, खेळ वगैरे समाधानकारक आहे. पण एक चिंतेचा विषय आहे, तो म्हणजे त्याची रंगांची आवड आणि निवड."
यावर काय बोलावे ते सुचल्याने देविका त्यांचे पुढचे बोलणे ऐकू लागली. हे प्रकरण काहीतरी निराळेच होते. मग बाई पुढे म्हणाल्या,
"त्याला गडद रंग आवडतात आणि त्यातही लाल, काळा असे.
"हो, मग? त्याचे काय?" देविकाने विचारले. तिच्या अज्ञानाने बाई व्यथीत झालेल्या होत्या.
"मिसेस काळे तुम्हाला खरंच समजत नाही का? एखाद्याला कुठला रंग आवडतो यावरून त्याच्या वृत्तीचा कल लक्षात येतो. रंगांचेही एक शास्त्र असते. म्हणजे पांढरा रंग सात्विक असतो, तर पिवळा रंग उत्साह आणि ऊर्जेचे प्रतीक. लाल आणि काळा रंग आवडतो ही काळजीची गोष्ट आहे, कारण त्या रंगाच्या सान्निध्याने व्यक्ती आक्रमक, हिंसक होतात."
बाईंचे रंगपुराण चालू होते. त्यांना मधेच थांबवून देविकाने विचारले,
"मॅडम त्याने काही केले आहे का? मी सांगेन त्याला. तसा तो शांत आहे हो, भांडण, मारामारी वगैरे नाही करणार. चुकून काही झाले असेल तर.. " देविका तिच्या लेकाची बाजू मांडत होती.
"नाही तसे त्याने काही केले नाहीये, पण त्याचा कल तसा असण्याची शक्यता आहे. त्याला देखावा काढायला सांगितला तर त्याने झाडाचे खोड काळे आणि पाने लाल रंगवली. मोर काढायला सांगितला तर त्याचा पिसारा लाल रंगाने रंगवला ... मग माझ्या लक्षात आले त्याचा डबा, पाण्याची बाटली, दप्तर लालच आहे. त्याने त्याच्या एका वहीच्या कव्हरवर काळ्या खडूने काहीतरी चितारले आहे. त्याची रंगांची निवड मला चिंताजनक वाटली म्हणून तुम्हाला निरोप दिला"
बाई तिला समजावून सांगत होत्या. देविका चकित होऊन ऐकत होती. इतक्या साध्या वाटणाऱ्या गोष्टी मध्ये, इतके गंभीर संकेत असतील असे तिला वाटलेच नव्हते. काही न सुचल्याने अस्वस्थपणे रुमाल घेण्यासाठी पर्स उघडली आणि... अरे देवा ! नेमक्या तिच्या हातात लाल रंगाच्या बांगड्या होत्या आणि रुमालावर लाल रंगाची नक्षी. तिने घाईने रुमाल पुन्हा पर्स मध्ये ठेवला आणि आता बाई काय सांगतात ते ऐकू लागली.
"तुम्ही काळजी करू नका. शाळा विद्यार्थ्याची नेहमीच काळजी घेते. गेल्या महिन्यात शाळेने मुलांच्या वर्तणुकीबद्दलच्या आणि इतर मानसिक समस्यांचे निराकारण करण्याकरता मानसोपचार तज्ज्ञाची मदत घेण्याचे ठरवले आहे. त्यांचे नाव आहे डॉ नीना दासगुप्ता. त्यांनी बालमानसशास्त्रामध्ये पी एच डी केली आहे. त्या तुम्हाला मदत करतील आणि या समस्येचा सामना कसा करायचा? या बाबत सल्ला देतील. त्यांच्या समुपदेशानाचा नक्क्की चांगला परिणाम दिसून येईल. त्यांचे 'कलर कोड' नावाचे पुस्तक आहे. मी त्याचा अनुवाद केला आहे 'रंगांचे स्वभाव'," असे म्हणून त्यांनी एक पुस्तक देविकाच्या हाती दिले. "हे वाचून बघा... किंमत जास्त नाहीये."
देविकाला काय बोलावे सुचेना. तिने बाईंच्या सर्व सूचना लक्षपूर्वक ऐकुन घेतल्या. त्यावर बोलण्यासारखे काहीच नव्हते. दासगुप्ता बाईंचे नाव, पत्ता, दूरध्वनीक्रमांक इत्यादींची नोंद करून घेतली, नेमके तिच्याकडचे पेन देखील लाल रंगाचे असावे ना ? आता तिला फारच अपराधी वाटू लागले होते. तिने बाईंचे पुस्तक विकत घेतले. ते वाचल्यावर तिला समस्येची संपूर्ण कल्पना येईल असे बाई म्हणाल्या होत्या.

मनावर काळजीचे ओझे घेऊनच ती वाहनतळाकडे निघाली होती, तर तिला गार्गीची आई भेटली. लोअर, अप्पर केजी मध्ये गार्गी, शौनक बरोबर होती. आता ती दुसऱ्या वर्गात होती, तरीही या दोघींची ओळख अजून टिकून होती. गार्गीच्या आईचे नाव शालिनी. तिचा स्वभाव चांगलाच बोलका होता. तिला देखिल काही कारणाने शाळेत बोलावले होते. ती तिची कर्मकथा सांगत होती. तिला पण समुपदेशनासाठी जायचे होते. बोलत बोलत दोघी वाहनतळाकडे आल्या. किल्ली लावून देविकाने तिची स्कुटी सुरु केली, तर शालिनी एकदम म्हणाली,
"अय्या!! तू अजून स्कुटीच चालवतेस?"
"हो .. का गं ?" देविकाने विचारले.
"मी मागच्या महिन्यात ही ॲक्टिव्हा घेतली. इतकी छान चालते ... आणि डिझाइन पण मस्त आहे. परवा मी सिलेंडर आणला, अगदी व्यवस्थित राहिला पायापाशी" शालिनीने सांगितले.
"तू पण घे .. खरंच खूप उपयोगी आहे, गार्गीला फार आवडली. समोर उभी राह्यला भरपूर जागा आहे ना..."
शालिनीचे नव्या गाडीचे कौतुक संपेना.
"खरंच तू वापरून बघ, मग तुला कळेल" शालिनीने सल्ला दिला.
"नको स्कुटी बरी आहे माझी, आणि आमच्याकडे गॅस पाईप मधून येतो, सिलेंडर आणायला लागत नाही"
बोलता बोलता तिने स्कुटीच्या ॲक्सिलेटरला चालना दिली.
"ॲक्टिव्हाच्या पार्टीसाठी बोलाव गं मला" असे म्हणत तिने स्कुटीला वेग दिला.

***

घरी आली तरी तिला शौनकच्या वर्गशिक्षिकेचे बोलणे आठवत होते. पडद्यावरची लालसर नक्षी तिच्या नजरेला टोचत होती. बाल्कनी मध्ये कुंडीत फुललेल्या लाल गुलाबाकडे बघणेही तिला नकोसे वाटले. ती तशीच सोफ्यावर बसून राहिली होती... निर्विकार आणि निर्विचार. कारण नक्की कशाचा विचार करायला पाहिजे हे तिला समजत नव्हते. अशी अवस्था प्राप्त करण्याकरता विपश्यना करावी लागते म्हणे. तिची शेजारीण कुसुम तिला त्याबद्दल नेहमी सांगत असे. तिला विपश्यना शिबिरात जायचे होते. देविकाने तिच्या बरोबर यावे म्हणून तिला सतत विपश्यनेचे महत्व सांगत असे. देविकाला वाटले, कुसुमला मुलगा किंवा मुलगी असती तर तिला विपश्यने करता शिबिरात जाण्याची गरजच भासली नसती.

संध्याकाळी देवापुढे दिवा लावायला गेली, तर काळ्याभोर शिसवी लाकडाचा देव्हारा तिला भीतीदायक वाटला. आता देव्हारा बदलावा? की त्याला वेगळा रंग लावता येईल? या बद्दल ती विचार करू लागली.

रात्री सर्व आवराआवर करून ती दिवाणखान्यामध्ये आली. सुनील दूरचित्रवाणीवर कुठलासा चित्रपट बघत होता. तिला गप्प राहिलेली पाहून त्याला आश्चर्य वाटले.
"काय गं काय झाले? " त्याने विचारले.
देविकाने त्याला सारे सविस्तर सांगितले, तर तो हसायलाच लागला. देविका रागानेच बोलली,
"तुला जराही काळजी नाही. सारे काही माझ्यावर सोपवून आरामात टी.व्ही. बघत असतोस. मी इथे किती काळजीत आहे? सुचत नाहीये मला काही."
"ते आलंय माझ्या लक्षात, भाजीमध्ये मीठ नाही, आमटीमध्ये मसाला नाही.. " सुनील म्हणाला. देविकाने रागारागाने हातातला बडीशेपेचा डबा जरा जोरातच तिथल्या टेबलावर ठेवला.
"देविका, अगं ही काय समस्या आहे का? इतका विचार करू नकोस. बाईंनी समुपदेशनाला जायला सांगितले आहे ना? जाऊ या आपण. पुस्तक तर तू विकत घेतलच आहेस. आणि शौनकचा कल हिंसेकडे असण्याची शक्यता वगैरे सर्व विसरून जा," सुनील तिला समजवत म्हणाला.

***

देविका तशी साधी सरळ, चारचौघींसारखी एक गृहिणी होती. घर, संसार, मुले यांच्या व्यापात स्वतःच्या आवडी-निवडी विसरून गेलेली होती. पण आता मुलांच्या शाळा सुरु झाल्या होत्या, मग तिला दुपारी जरा निवांत वेळ मिळू लागला होता. दुपारी काही काळ तिला दूरचित्रवाणी बघणे देखील आता शक्य झाले होते. दुपारच्या मराठी मालिका ती आवर्जून बघत असे. त्यातही तिच्या आवडत्या मालिका म्हणजे "आई भवानीची परडी" आणि "सून माझी लक्ष्मी". परंतु गेले काही दिवस ".. परडी" मालिकेत भवानी देवी, तिची भक्त जानकीची परीक्षा घेत होती. परीक्षेच्या नावाने जानकीचा चाललेला छळ देविकाला बघवत नसे. आणि ".. लक्ष्मी" मध्ये नेहमी प्रमाणे सासू सुनेची भांडणे चालू होती. मग तिने आज वेगळा चॅनल लावला. तर काय, तिथे आकाशगामी खरेदी केंद्राच्या जाहिराती. आणि त्या देखील कशा?

"सोनाली ची मन:शांती नाहीशी झाली होती, कारण अचानक तिचे केस गळू लागले. पण तिला असा रामबाण उपाय सापडला की तिचे केस परत लांब आणि दाट झाले, आणि समाजातील ती एक प्रसिद्ध आणि सर्वांची लाडकी व्यक्ती बनली. तुम्हाला पण तसेच व्हायचे आहे ना? चला तर मग, सोनालीने काय उपाय केला ते जाणून घ्या. सर्वप्रथम आमचे काजळ काळे केश तेल खरेदी करा. त्या नंतर ......"

देविकाने समोर असलेल्या शो केसच्या काचेच्या दारामध्ये तिचे प्रतिबिंब पाहून घेतले. केस अगदी पाहिल्यासारखे नाही, तरी तसे ठीक होते. तिला हायसे वाटले.
"चला म्हणजे सध्यातरी 'पॅराशूट तेल' बदलायची गरज नाही."
तिने परत दूरचित्रवाणीकडे लक्ष केंद्रित केले ---

तुमचा पती तुमच्या कडे दुर्लक्ष करतो? घरामध्ये जास्त वेळ थांबत नाही? तुमच्यासोबत असताना सतत त्याच्या मोबाईल फोन मध्ये व्यस्त असतो? मग आम्ही सांगतो ते उपाय नक्की ट्राय करा. .. तो तुमच्या प्रेमाचा बंदी होईल. अगदी सोप्पा उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. बुधवारी शुभ्र रंगाचे कपडे परिधान करून, शुभ्र रंगाच्या गोड पदार्थाचे सेवन करा. शुभ्र रंगाच्या पात्रामध्ये ठेवून तो पदार्थ ९ कुमारिका आणि पाच सुवासिनींना दान करायचा आहे. त्या सोबत शुभ्र, अथवा रक्तवर्णी (म्हणजे लाल) वस्त्रे आणि शुभ्र धातूचा दागिना दान करू शकता. सोबत काही नोटा आणि नाणी सुद्धा....."

"नोटा आणि नाणी देखील शुभ्रच पाहिजेत का? का नेहमीची चालतील?" देविकाच्या मनात शंका आली. परंतु जाहिरातीत सल्ला देणाऱ्या बाई शंकानिरसन करत नसाव्यात. तितक्यात पुढच्या जाहिरातीची सुरुवात झाली. देविका लक्षपूर्वक ऐकत होती.

"तुम्हाला तुमच्या सासरी लोकप्रिय व्हायचे आहे? मग श्री देवदेवेश्वरी महादेवीचे व्रत करा. त्यासाठी विशेष धातूने सिद्ध देवीची मूर्ती आम्ही तयार केली आहे.. जी तुम्हाला इतरत्र कुठेही मिळणार नाही. तसेच संपूर्ण पूजाविधीचे साहित्य अगदी अल्प किमतीत मिळेल "श्री देवदेवेश्वरी मंत्र पठण" ही सीडी आम्ही तुम्हाला मोफत देत आहोत. प्रसादाचे संपूर्ण पॅकेज उपलब्ध".

देविकाने चॅनल बदलला. अनेक जाहिरातींमधील कार्यक्रम बघण्याचा ती प्रयत्न करीत होती. परंतु सर्व चॅनल्सवर परोपकारी आणि उद्धारकर्त्या लोकांची रीघ लागलेली होती. समाजसेवी संस्था, आणि समाजसेवकांच्या स्फूर्तिदायक कार्याचे माहितीपट सतत झळकत असत. कुठे वजन घटविण्याचा उपदेश, कुठे सौंदर्य कसे जपावे त्याचे प्रशिक्षण. कुठे ध्यानधारणा आणि आत्मिक उन्नतीचे मार्गदर्शन तर कुठे चटपटीत, खमंग आणि आरोग्यदायी पदार्थांच्या कृती. इतके सारे ज्ञान आपल्या लहानशा मेंदूत सामावणे अवघड आहे हे तिच्या लक्षात आले, मग तिने दूरचित्रवाणीचा नाद सोडून दिला.

***

आज देविकाला तिच्या मावसबहिणीच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमाला जायचे होते. घराचे आणि मुलांचे आवरण्यात तिचा बराच वेळ गेला होता. कालच धोब्याकडून ड्रायक्लिन आणि रोलप्रेस करून आणलेली साडी ती नेसली. नाजुकशी मोत्याची माळ, कुड्या, बांगड्या असा जामानिमा केलेला होता. हॉलवर पोहोचली तर कार्यक्रम सुरु व्हायला अजून अवकाश होता. हार, गजऱ्याचा सुवास, रेशमी वस्त्रांची सळसळ, सनई चे सूर .. एकंदरीत वातावरण प्रसन्न होते.
"अग बाई देविका, आलीस का? बरं झालं .. मुलं आणि आमचे जावई आले आहेत ना?"
एका मावशीने तिचे स्वागत केले.
"हो हो आले आहेत ना" देविका उत्तरली. इतक्यात तिथे सुधामामी आल्या, म्हणाल्या
"अग्गोबाई देविका, किती दिवसांनी दिसतेयस?"
यावर काय बोलावे ते न सुचल्याने देविका नुसतीच "हो ना .." असं काहीतरी बोलून कशीनुशी हसली.
सुधामामी गोकुळदास कॉलेज मध्ये समाजशास्त्र शिकवीत असत. तिच्याकडे निरखून बघत त्या बोलल्या..
"कसली साडी नेसली आहेस? चांगली काठपदराची तरी नेसायची आणि गळ्यात फक्त मोत्याचा सर? सोन्याचे दागिने आहेत ना तुझ्याकडे? रूपी च्या सासरचे काय म्हणतील?"
"का? चांगली तर आहे" देविका म्हणाली, "प्युअर सिल्क आहे... आणि मोत्यांचा सेट मला आईने दिलाय गौरीपूजेच्यावेळी, नवीनच आहे गं .. पहिल्यांदाच काढलाय पेटीतून" देविका तिची बाजू मांडत होती.
देविकाच्या सुदैवाने रुपी .. रुपाली, देविकाची मावस बहीण तिथे आली. दोघींच्या गप्पा सुरु झाल्या.
"ए तुझी साडी किती क्युट आहे? छान दिसतीय" रुपी म्हणाली.
देविकाने सुधामामीचा चेहरा बघून घेतला आणि म्हणाली ..
"आवडली तुला? सुनीलने आणलीय (कधी नव्हे ते... हे मनातल्या मनात). तो बंगलोरला गेला होता ना कामानिमित्त... तिथून आणलीय."
थोड्या वेळात रुपालीचा मेकअप करण्याकरता पार्लरवाली आली. रुपाली तिथून गेल्यावर सुधामामीने परत देविकाकडे मोर्चा वळवला. त्यांच्या अनेक उलट सुलट प्रश्नांना उत्तरं देताना देविका हैराण झाली होती. शेवटी मामी म्हणाल्या,
"पालघरहून माईवन्सं आल्यात, जा भेटून ये त्यांना."
देविकाने पडत्या फळाची आज्ञा झेलत तिथून काढता पाय घेतला.

***

आपल्या बाबतीत हे असे का व्हावे ते तिला समजत नव्हते. प्रत्येक जण तिला काही तरी सल्ला देऊन जात असे. सल्लागारांच्या हेतूबद्दल तिला काहीच म्हणायचे नव्हते, परंतु तिचा आत्मविश्वास मात्र तिला सोडून गेला होता. तिने केलेल्या प्रत्येक कृती मध्ये येताजाता काहीतरी बदल सुचवले जात, मग तिच्या उत्साहाला, आनंदाला ओहोटी लागत असे.

आज देविकाच्या घरी सोसायटीतल्या बायकांची भिशी होती. ती आणि कुसुम दोघींची मिळून भिशी होती. तयारी करण्यासाठी कुसुम दुपारीच तिच्या घरी आली होती. बटाटेवडे, आंबाबर्फी आणि कॉफी असा सुटसुटीत बेत ठरला होता.
उकडलेले बटाटे कुकरमधून काढताना ती कुसुमला म्हणाली,
"अगं सकाळी मीनल चा फोन आला होता... माझी भावजय गं. तिला म्हणल मी, भिशीसाठी वडे करणार आहे, तर म्हणाली समोसे, किंवा कचोरी जास्त आवडेल म्हणे सगळ्यांना. खरच का गं ? मी तुला विचारणार होते.. पण म्हणल जाऊ दे, इतक्या ऐनवेळी बेत बदलला तर गोंधळ होईल."
कुसुम म्हणाली, "नाही वडे ठीक आहेत.. त्या मीनल ला म्हणायचे, मी तुझ्याकडे येईन तेव्हा कर तू समोसे... लोकं उगीच नसते सल्ले देतात, आणि तू ऐकतेस. स्वभाव बदल बाई तुझा... म्हणून म्हणते एकदा विपश्यना शिबिराला ये, फायदा होईल तुझा."
बोलता बोलता कुसुमने हातातल्या गरम बटाट्याच्या साली काढायला सुरुवात केली होती. आता विपश्यनेवर व्याख्यान ऐकायला लागणार हे देविकाच्या लक्षात आले. मग तिने मोठी कढई फडक्याने पुसून शेगडीवर ठेवली आणि झारा शोधण्याकरता ड्रॉवर उघडला.

***

देविका घरातला पसारा आवरत होती, तेव्हढ्यात सुनील आला. पसरलेला दिवाणखाना बघताना झालेला त्याचा प्रश्नार्थक चेहरा पाहून देविका म्हणाली,
"आज भिशी होती ना माझी.. धनलाभ झाला आहे मला ... मोजून पंधरा हज्जार. रविवारी मी जाणार आहे शॉपिंग करायला. ते पैसे खर्च करायचे आहेत मला."
देविका उत्साहात बोलत होती, सुनील मधेच म्हणाला,
"अगं पण मी .. म्हणजे माझ्या ऑफिसमधले .."
त्याचे अडखळणे बघून देविकाला संशय आलाच. सोफ्यावरचे कव्हर तसेच ठेवून ती म्हणाली,
"ऑफिसमधले काय? रविवारी आपल्या घरी येणार आहेत, असच ना?"
"हो, म्हणजे काय झाले ... गेल्या महिन्यात अप्रेझल होते ना आमच्याकडे, मला पगारवाढ आणि प्रमोशन मिळाले". सुनील सांगत होता.
" आणि लगेच त्याचे सेलीब्रेशन करायला पाहिजेच .. नाही का?" देविका रागातच बोलली.
"तू मला विचारले पण नाहीस? माझा फोन नंबर सेव्ह केलेला आहेस ना? का डिलीट केलास ?"
या बोलण्यावर गप्प रहाणे हा एकमेव उपाय आहे हे सुनीलला अनुभवाने माहिती होते.

***

"अगं मी ना ठरवूनच टाकले आहे, की आधी स्वतःला वेळ द्यायचा, -- घर, कुटुंब, इतर जबाबदाऱ्या कायमच्याच आहेत."
सौ गोडबोले सांगत होत्या. श्रीयुत गोडबोले सुनीलचे कार्यालयीन सहकारी. खरे, गोडबोले, जोशी, गोखले असे काहीजण त्यादिवशी सहकुटुंब सुनीलच्या घरी जमले होते. कुणाला प्रमोशन तर कुणाला पगारवाढ मिळाली होती. फक्त ॲडमिन आणि अकौन्ट्स मध्ये कार्यरत असलेल्या सुरुची वैद्य अशा होत्या, ज्याची स्थिती 'जैसे थे' होती. तरीही सहकर्मींच्या आनंदात त्या त्यांच्या पतिदेवासमवेत सहभागी झालेल्या होत्या.

देविका भटुरे करण्यात गुंतलेली होती. छोले, पुलाव, रायता वगैरे तिने आधीच तयार करून ठेवले होते. काका हलवाई कडून पाकातले गुलाबजाम आणवले होते. परंतु पाहुण्यांच्या एकंदरीत बोलण्यावरून त्यातील बरेच जण डाएटवर असल्याचे कळले, त्यामुळे भरपूर उरणार होते. एक एक भटुरा लाटून ती कढईमधील गरम तेलामध्ये सोडत होती. पाहुण्या सर्व टेबलाभोवती बसून बोलत होत्या.

"तुला कसं जमतं बाई सगळं? मी किती ठरवते, पण काही ना काही अडथळा येतोच. बघ ना -- काही दिवसांपूर्वी मी योगा क्लास ला जात होते. इतकं बरं वाटायचे, मला वाटते थोडेफार वजन देखील कमी झाले होते. त्याच सुमारास आमचे युरोप ला जायचे ठरले .. मग काय? आता परत सुरु करायला जमतच नाहीये." सौ जोशी म्हणाल्या.
"तेच ना, हे सगळे मनाचेच खेळ आहेत. जमत नाही, वेळ नाही हे नुसते बहाणे आहेत. तु मानसी गोस्वामीचे व्हिडीओ बघ. इतकं छान सांगते ती सगळं. मी तर तिची भक्तंच झाले आहे. माझी लाईफ स्टाईल गुरु आहे ती. तिच्या व्हिडीओ मध्ये योगा, झुंबा, एरोबिक्स सारे काही असते. आणि ती फॅशन, हेअर स्टाईल, मेकअप वगैरेंच्या टिप्सही देते" सौ गोडबोले त्या कुणा गोस्वामी बाईची जाहिरात करीत होत्या.
"त्या ऐवजी रोज पाच कि.मी. चालायला जावे. मी रोज सकाळी जाते. मोकळी हवा आणि शांत वातावरण असते. खूप प्रसन्न वाटते. नंतर ध्यानधारणा आश्रमात जाते. माझ्या येण्याच्या वाटेवरच आहे ना? तिथे अर्धा पाऊणतास प्राणायाम आणि ध्यान केले की चित्तशुद्धी होते. आमचे गुरुजी सांगतात, असे केल्याने आंतरिक ऊर्जा जागृत होते." सौ.गोखले बोलल्या.

देविकाने शेवटचा भटुरा कढईमधे सोडला. शेगडीच्या आचेने तिचा चेहरा लालसर झाला होता. ओट्यावरचा पसारा कोपऱ्यातल्या सिंकमध्ये ठेवून तिने फ्रीज उघडला. त्यातली सरबताची बाटली काढत ती म्हणाली,
"ए तुम्हाला सगळ्यांना पेरूचे सरबत चालेल ना?"
"साखर नसली तर चालेल" सौ खरे बोलल्या.
"थोडी आहे..पण आजच्या दिवस चालेल" गुलाबी रंगाच्या सरबताने भरलेला ग्लास त्यांच्यापुढे ठेवीत देविका म्हणाली.
"तुझी बाकी कमाल आहे हं देविका. सगळं घरी करण्याचा घाट कशाला घातलास? मी तर त्या श्रेयस केटरिंग वाले आहेत ना, त्यांनाच सांगते. त्यांचे पदार्थ चांगले असतात, आणि त्यांचे कर्मचारी वाढून देतात आणि आवरून जातात" सुरुची वैद्य म्हणाली.
"फार काही नाही केलय. आणि एखाद्या दिवशी चालतं", देविका म्हणाली. थंडगार, आंबटगोड सरबताचा ग्लास हातात घेऊन ती टेबलाजवळील एका खुर्चीमध्ये विसावली.
"तू दिवसभर काय करतेस मग?" सौ गोडबोले देविकाला विचारत होत्या. "योगा, जिम किंवा इतर कसले क्लासेस वगैरे? प्रत्येक स्त्री ने स्वतःकरता वेळ दिलाच पाहिजे, नाहीतर घरातले आपल्याला गृहीत धरतात."
"नाही गं, मी काहीच करत नाही, घरातले सर्व आवरता आवरता दिवस कसा संपतो कळत नाही बघ. दुसरे काही करायचा उत्साहच शिल्लक रहात नाही. शनिवार, रविवार जरा निवांत असतं सगळं, पण सगळे घरी असतात, मग मला बाहेर जावेसे नाही वाटत. मुलांकडे कोण बघणार हाही प्रश्न असतोच ना?" देविका म्हणाली.

त्या सगळ्यांचे बोलणे ऐकताना तिला वैषम्य वाटत होते, की तिला असे काहीच का जमत नाही?

"ठरवले तर वेळ मिळतो बरं का? माझ्याकडे सकाळी मावशी येतात स्वंयपाकाला, इतर कामाला बाई आहेच. आजकाल सगळं ॲमेझॉन, स्विग्गी, डनझो वरून मागवते, त्यामुळे बाजारहाट करण्यात वेळ जात नाही, भरपूर मोकळा वेळ मिळतो. तो मी माझ्या व्यक्तिमत्व विकासासाठी वापरते. सदानंद दिवसभर ऑफिसमध्ये आणि राणी-- माझी लेक पाचगणी च्या बोर्डिंग स्कुल मध्ये असते. पाहुणे आले तरी मी माझे रुटीन अजिबात बदलत नाही, कारण मध्ये खंड पडला की सारे काही बिनसते. आणि घरी नोकर आहेतच की त्यांच्या दिमतीला. तू त्या मानसीचे व्हिडीओ बघ, तुलाही वेगळं काही करण्याची प्रेरणा मिळेल" गोडबोले बाई अनुभवाचे बोल ऐकवीत होत्या.
"अगदी बरोबर आहे तुझे .." आता सौ खरे बोलत्या झाल्या. "मलाही नोकरी करायची होती, ... नाही जमलं. पण मग घरातच आयुष्य व्यर्थ घालवायचे का? मी 'स्वामिनी' मंडळाची स्थापना केली आहे. स्त्रियांचे मनोबल वाढविण्याकरता आम्ही अनेक उपक्रम करीत असतो, जसे गुलाब पुष्प प्रदर्शन, हलव्याचे दागिने करण्याची स्पर्धा, सौंदर्य स्पर्धा, कला-कौशल्य विकास वर्ग असे अनेक उपक्रम आमच्या मंडळातर्फे आयोजित केले जातात. या कार्यामुळे माझा परिवार खूप मोठा झाला आहे. समाजोपयोगी कार्य करण्याचे खूप समाधान लाभतं".
देविका कौतुकाने म्हणाली, "घर, मुलं, सासूसासरे .. सगळ्यांना सांभाळून इतके कार्य करायचे म्हणजे ..."
"हो ना, खूप तडजोडी कराव्या लागतात गं. घरी सासू, सासरे आहेत, ते मोकळेच असतात. सासरे मुलांच्या शाळा, अभ्यास सांभाळतात, आणि सासूबाई घर सांभाळतात. तरीही माझे लक्ष असतंच " सौ खरे म्हणाल्या.

देविका नवलाने सर्वांची बोलणी ऐकत होती.
"किती स्मार्ट आहेत ह्या सगळ्याजणी? नाही तर मी, सकाळ-संध्याकाळ पोळी, भाजी, भात,आमटी करण्यात आयुष्य वाया चालले आहे माझे " मनातल्या मनात तिचे स्वागत चालू होते.
काही वेळाने रिकामे ग्लास ठेवलेला ट्रे, आईस बकेट वगैरे घेऊन सुनील तिथे आला. हातातले सामान ओट्यावर ठेवत म्हणाला,
"देविका, सर्व पदार्थ बाहेरच्या टेबलवर ठेवू? की इथेच वाढून घ्यायचे?"
"बाहेर हॉल मधेच सोयीचे होईल ... " असे म्हणत देविका लगबगीने उठली. आलेल्या पाहुण्या भांडी, प्लेटस, चमचे वगैरे हॉल मधील टेबलावर मांडायला मदत करू लागल्या.

***

दुपारची निवांत वेळ होती. दिवाणखान्यातील आरामदायी सोफ्यावर बसून देविका पुस्तक वाचनाचा प्रयत्न करीत होती. पुस्तकातील मजकुरावर नजर फिरत होती, परंतु अर्थबोध होत नव्हता. राहुन राहून तिला रविवारची बोलणी आठवत होती. किती कर्तृत्ववान आहेत त्या सगळ्या? घराचे पाश त्यांना बांधून ठेवू शकत नाहीत. मी पण असे काही करायला पाहिजे, पण काय? ती चांगलीच विचारात पडली. पण तिने पक्के ठरवले होते, आता घरामध्ये जास्त गुंतून राहायचे नाही.

एक दिवस देविकाने घराजवळच असलेल्या योग प्रशिक्षण केंद्रामध्ये नाव नोंदणी केली. "चला, सुरुवात तर केली.. बघु आता कसे जमते आहे ते" देविकाला उत्साह वाटू लागला होता. केंद्राची ची वेळ तिला सोयीची होती, मुलं शाळेतून यायच्या आधी घरी परतणे तिला जमणार होते.

"तुम्ही या पूर्वी कधी योगासनाचे अध्ययन केले होते का?" केंद्राच्या कार्यालयामधील एक प्रशिक्षक तिला प्रश्न विचारत होते. देविकाला वाटले तितके योगासनाचे प्रशिक्षण सहज साध्य नव्हते. तिला खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरे द्यायची होती.
"हो बऱ्याच वर्षांपूर्वी ... म्हणजे साधारण दहा बारा वर्षे. पण आता मला सर्व प्रथमपासून शिकायला लागेल कारण ...."
"किती योगासने माहिती आहेत?" प्रशिक्षकाने तिचे बोलणे अर्ध्यावर तोडत विचारले.
"साधारण .. पाच सहा " नक्की किती सांगावीत हा देविकाला प्रश्न पडला होता.
"कुठली?" प्रशिक्षकाने पुढचा प्रश्न विचारला.
"हा योग प्रशिक्षक आहे की "५१ प्रश्न" मालिकेचा लेखक?" देविकाच्या मनात आले.
"पद्मासन, चक्रासन, ताडासन ... " देविकाला आणखी नावे आठवेनात.
"बरं ठीक आहे, तुमचे वय?" प्रशिक्षकाचा पुढचा प्रश्न तयारच होता.
बराचवेळ ही प्रश्नोत्तरे चालली होती. शेवटी प्रशिक्षकाने ती प्रश्नावली तिच्याकडे देत म्हणले.. "सगळी उत्तरे नीट तपासून सही करा".
"चला संपले वाटते प्रश्न " असे मनातल्या मनात म्हणत तिने फुली काढलेल्या रेघेवर सही केली. टेबलावर ठेवलेली पर्स घेत ती उठणार तितक्यात प्रशिक्षकाने सांगितले,
"प्रशिक्षण सुरु करण्या आधी काही नियम तुम्हाला माहीत असायला हवेत, तसेच काही सूचना आम्ही तुम्हाला देणार आहोत." देविकाने सर्व सूचना ऐकल्या, नियम लक्षात ठेवले. एकंदरीत प्रकरण तितकेसे सोपे नाही हे तिच्या लक्षात आले होते. तिचा उत्साह मावळला होता, पण तरीही नेटाने तिने योगासन वर्गात प्रवेश केलाच.

***

पण घरापासून स्वतंत्र होण्याचा तिचा निश्चय योगासन वर्गापुरताच सिमीत राहिला. कारण गृह व्यवस्थापन करण्याकरता तिच्या मदतीला कुणीच नव्हते. तिच्या घरी सासू-सासरे नव्हते आणि नोकरचाकर देखील नव्हते. एक सखुबाई कशीबशी यायची, धुणे, भांडी आणि सफाईसाठी. तिचे महिन्यातले असंख्य खाडे आणि सतत बदलत्या वेळा, या मुळे तिच्यावर विसंबून राहणे शक्यच नव्हते. कालच बाईसाहेब गौरीगणपतीच्या निमित्ताने गावी गेल्या होत्या आणि सुपर्णा, तिची दूरच्या नात्यातली नणंद, पुण्यातले गणपती बघण्यासाठी सहकुटुंब आलेली होती. त्यामुळे योगासन वर्गाला सुट्टी देणे क्रमप्राप्त होते.

"सोफ्याची कव्हर्स कुठून आणलीस तू?" सुपर्णाने विचारले.
दुपारची जेवणे आटोपून दोघी दिवाणखान्यामध्ये बोलत बसल्या होत्या. तन्वी आणि रुपेश कार्टून बघण्यात गुंतली होती. त्यांचे वडील, मोहनराव तिथेच वर्तमानपत्र चाळत होते.
"तयार नाही, शिवून घेतली आहेत मी. घरसंसार म्हणून दुकान आहे... चांगली कापडे आहेत त्यांच्याकडे" देविकाने सांगितले.
"हो का? पण या पेक्षा तू वेलव्हेट चे कापड का नाही घेतलेस? छान दिसतात ती कव्हर्स.. आणि अशी कुशन्स चांगली नाही दिसत. त्या ऐवजी भरतकाम केलेली आणि लेस लावलेली घे तू. बघ तुझा दिवाणखाना एकदम वेगळाच दिसेल" सुपर्णा ने सल्ला दिला.
"सुपर्णा, सूचना नकोत हा आता इथे..." वर्तमानपत्र डोळ्यासमोरून जरासे बाजूला करीत मोहनराव म्हणाले.
"तुम्ही थांबा हो ... तर देविका मी काय म्हणते? सोफा कव्हर्स साठी अर्दन कलरमधली शेड निवड, म्हणजे तुझ्या दिवाणखान्याला एक कोझी आणि कम्फर्टेबल लूक मिळेल " सुपर्णाने सल्ला दिला.
"हो चालेल, पुढच्यावेळेस करेन तसं " देविका बोलली. पण सुपर्णाला आता चांगलाच उत्साह आला होता.
"आणि हा टी.व्ही जवळचा रिकामा कोपरा आहे ना, तिथे एक लहान लाकडी टेबल ठेव, त्यावर पोर्सेलीनची फुलदाणी ठेव.. त्यातली फुले नियमितपणे बदलायची. म्हणजे वातावरण प्रसन्न राहील."
"हो खरंच की, छान वाटेल नाही?" देविका उगीचच काहीतरी बोलली. खरं म्हणजे तिला म्हणायचे होते, बाई गं आमचा दिवाणखाना म्हणजे माझ्या मुलांचे क्रीडामैदान आहे. क्रिकेट, बॅडमिंटन, जिम्नॅस्टिक्स, उंच उडी, लांब उडी या सर्वाचा इथे सराव चालू असतो. इथे पोर्सेलीन काय, लोखंडी फुलदाणीसुद्धा टिकायची नाही. पण ती काही बोलली नाही. सुपर्णा उत्साहाने तिला घर सजावटीसाठी सल्ले देत होती. देविकाला प्रश्न पडला होता, ही गणपती बघायला आली आहे, का माझ्या घराची सजावट करायला आली आहे? या अनाहूत सल्ल्यांमुळे ती चांगलीच बेजार झालेली होती.

"ए हे मखर असं का केलंय? याच्यापेक्षा माझे मागच्या वर्षीचे कितीतरी चांगले होते, नाही का हो?" प्रश्न मोहनरावांना विचारला होता. त्यांनी काही न बोलता मान डोलावली. पण ते हो म्हणतायत का नाही, ते कुणालाच कळले नाही.
सगळेजण सार्वजनिक गणपती बघण्याकरता आलेले होते. तिथले देखावे, लाइटिंग आणि सजावट बघताना सुपर्णाची समीक्षा चालू होती.
"हा हार कित्ती मोठा केलाय? चांगला नाही दिसत. जरा लहान करायला पाहिजे आणि त्यात झेंडूची फुले जास्ती पाहिजेत म्हणजे उठून दिसेल."
रस्त्यांवर भाविकांची गर्दी लोटली होती, त्यामुळे सर्वांना एकत्र चालणे अशक्य होऊ लागले होते. मग सुनील आणि मोहन मुलांना घेऊन पुढे आणि देविका, सुपर्णा त्यांच्या मागे अशी विभागणी झाली होती. आता सुपर्णाची एकमेव श्रोती देविकाच होती.
"या लाईटिंगचे कलर कॉम्बिनेशन बदलायला पाहिजे नाही का? आणि गाणी काहीच्या काहीच निवडली आहेत."
यावर काय बोलणार? म्हणून देविका आता काही न बोलता चालत होती. तशीही सुपर्णाला तिच्या प्रतिक्रियेची अपेक्षा नसावी, कारण तिच्या परीक्षणात खंड पडला नव्हता. देविकाने पुढचे काही दिवस काही दिवस गणपती बघण्यासाठी बाहेर न जाता घरी थांबण्याचा निर्णय घेतला होता. विसर्जनाची मिरवणूक दूरचित्रवाणीवर बघायचे ठरले, त्यामुळे तिला हायसे वाटले होते. सुपर्णा, मोहन इंदूरला परत गेले. आणि तिचा योगाभ्यास परत सुरु झाला.

***

"हे बघ देविका, योगासनांचा खरा उपयोग तेव्हाच होईल जेव्हा तू आहार-विहाराचे नियमन करशील." ज्योत्स्नाताई तिला सांगत होत्या.
ताई देविकाच्या वर्गातच होत्या पण अनेक वर्षे योगाभ्यास करीत होत्या. आज त्यांना तिच्या सोसायटीमध्ये राहाणाऱ्या त्यांच्या नातेवाईकाकडे जायचे होते, म्हणून प्रशिक्षण वर्ग संपल्यावर त्या तिच्याबरोबर आल्या होत्या.
"सकाळी नाश्ता घेणे चुकवायचे नाही. चहा बिनसाखरेचा घेत जा. त्या नंतर शुद्ध, मोकळ्या हवे मध्ये ओंकार साधना करायची, मग अनुलोम विलोम .. तुझ्या दिवसाची सुरवात अशी शांत, पवित्र झाली की मग पुढचा दिवस.... "
" ज्योत्स्ना, तिकडे सगळे तुझी वाट बघताहेत. मला वाटले तुला घराचा पत्ता बरोबर मिळाला की नाही?" ज्योत्स्नाताईंचे पती त्यांना शोधत आले होते. देविकाला हायसे वाटले, त्या दोघांचा निरोप घेऊन ती इमारतीच्या लिफ्टपाशी आली. विजेचा पत्ता नव्हता, आणि जनरेटर कमी चालवायचा असा सोसायटीचा ठराव असल्याने तिने पायऱ्या चढण्यास सुरुवात केली.
"सकाळी इतके सगळे कसे जमायचे?" तिच्या मनात आले "ज्योत्स्नाताईचे बरे आहे. दोन्ही मुले नोकरी निमित्त परदेशामध्ये, सुना नातवंडे देखील तिकडेच. मुलीचे सासर नागपूरला... म्हणून जमते, सकाळी शुद्ध, मोकळ्या हवेत ओंकार साधना. मला एकीकडे पोळ्या लाटताना, सकाळचा चहा घ्यावा लागतो. अनुलोम- विलोम कसले करतीय मी?"
घराचे कुलूप उघडताना तिला हायसे वाटले. पायातले सॅण्डल्स तसेच दाराजवळ ठेवून तिने पंख्याचे बटन चालू केले. फ्रीजमधले थंड पाणी घेऊन ती सोफ्यावर बसली. आधीच उकाड्याने हैराण झालेले असताना, इतके जिने चढून यावे लागले होते.
"छे!! योगासनांचा काही परिणाम झालेला दिसत नाहीये माझ्यावर. पायऱ्या चढताना अजूनही इतका दम लागतो आहे" तिच्या मनात आले.

***

रविवारची सकाळ होती. सारे कसे शांत, निवांत होते. देविकाने ओल्या पीठाने भरलेला स्टॅन्ड इडली पात्रात ठेवला. झाकण लावून ते पात्रं शेगडीवर ठेवले. चटणीसाठी भिजवलेली डाळ रोवळीमध्ये काढून ठेवली आणि फ्रीज उघडून आले, मिरच्या इत्यादी शोधत होती, तितक्यात दारावरची बेल वाजली.
"इस्त्रीचे कपडे द्यायला धोबी आला असेल... त्याला जरा थांबायला सांग, मला चादरी द्यायच्या आहेत." तिने सुनीलला आतूनच सूचना दिली.
दार उघडल्याचा आवाज आला आणि सुनील बोलत होता, "अरे केशव मामा? अलभ्य लाभ !!"
देविकाच्या कपाळावर आठी उमटली, " हं .. गेली आता रविवाराची सकाळ."
सुनील स्वयंपाक घराच्या दाराजवळ येत म्हणाला, "देविका, केशव मामा आलाय."
देविकाने चेहऱ्यावरची नाराजी पुसली, खुर्चीवर अडकवलेली ओढणी स्वतःभोवती लपेटून घेत ती दिवाणखान्यात आली.
"मामा, आज अचानक? आणि मामी?" तिने विचारले.
"मामी गेली आहे तिच्या महिला मंडळात. इकडे वृंदावन भवन मध्ये तिचा काहीतरी कार्यक्रम आहे. तिला तिथे सोडून मी तुझ्याकडे आलो" मामा म्हणाले.
मग सुनील आणि मामांच्या गप्पा रंगल्या. देविकाने केलेल्या इडल्यांचा समाचार घेऊन, चहाचा कप हातात घेत मामा मनापासून म्हणाले,
"बरं झाले रे मी तुझ्याकडे आलो. नाहीतर त्या वृंदावन भवन मध्ये आलेपाकाच्या वड्या चघळत बसावे लागले असते."
जरावेळाने मामा म्हणाले, "सुनील तुझी गच्ची बघायची आहे मला, बरीच मोठी आहे म्हणे? तुझी मामी सांगत होती"
"बरीच मोठी वगैरे नाही, पण थोडीफार मोकळी जागा आहे" असे म्हणत सुनील ने दवाजा उघडला.
"अरे वा बरीच रोपे जमा केली आहेस" मामा म्हणाले.
"ते झाडे, माती, कुंड्या वगैरे देविकाच करत असते, माझे त्यात काही नाही" सुनीलने सत्यपरिस्थिती सांगितली.
"इतक्या कुंड्या ठेवल्या आहेत, पण सगळी फुलझाडे नाहीतर शोभेची.. उपयोगाचे एकही नाही. काय ग देविका?"
बाजूला उभी असलेली देविका काहीच बोलली नाही. मग मामाच म्हणाले,
"मी आमच्या घराच्या अंगणात औषधी वनस्पती लावलेल्या आहेत. पुदिना, मिरची, कढीपत्ता, तुळस हे पण आहे. घरच्या घरी सारे काही मिळते, स्वच्छ आणि ताजे. मी काय म्हणतो देविका, मी तुला रोपे देतो, तू शोभेची झाडे काढून त्या जागी त्यांची पेरणी कर. त्यांची निगराणी, जोपासना कशी करायची ते सांगेन मी. रोपे सगळी उपयोगी, औषधी अशी देईन, म्हणजे तुझ्या मेहनतीचा काहीतरी उपयोग होईल काय?"
सुनील काळजीने देविकाकडे बघत होता. तिची नाराजी त्याला कळत होती, पण मामाचे बोलणे थांबवणे त्याला शक्य नव्हते. काही वेळाने मामींचा फोन आला, कार्यक्रम संपला सांगण्यासाठी, मग मामा सभागृहाकडे जाण्यासाठी निघाले. त्यांची आजची सकाळ खूप आनंदात व्यतीत झाली असे ते सुनीलला परत परत सांगत होते. देविकाचा मात्र चांगलाच विरस झालेला होता.

***

रविवारची नाराजी हळू हळू निवळली, परंतु प्रसंग मात्र स्मरणात राहिला होता. दुपारची वेळ होती. दूरचित्रवाणीचा रिमोट हातात घेऊन देविका दिवाणखान्यात बसलेली होती. उगीच वेगवेगळे चॅनल्स बदलत बघत होती. जरावेळाने तिला योगप्रशिक्षण वर्गात जायचे होते, सुरवातीचा उत्साह मावळला होता. तिला आठवले आज तर तिला भिशीसाठी जायचे होते. इमारत क्रमांक ६ मधील सौ पंडितांकडे आजची भिशी होती. दारावरची बेल वाजली, तिच्या सासूबाई-- सुनीलच्या आई आलेल्या होत्या. तिने त्यांना परवाच सांगितले होते तसे, कारण मुलं यायच्या वेळेस घरात कुणी असणे जरुरीचे होते ना. तिने त्यांच्या साठी चहा केला, मग कपडे बदलून पायात सॅण्डल्स अडकवीत म्हणाली,
"मला यायला ७-७.३० तरी होतील. सुनील पण साधारण तेव्हाच येईल."
"मला माहितीय, तू काही काळजी करू नकोस" तिच्या सासूबाई म्हणाल्या.

पंडितांच्या हॉल मध्ये शांतीनगर सोसायटीतील रहिवासी महिला जमलेल्या होत्या. दर महिन्याचा भिशीचा कार्यक्रम होता तो. नेहमीप्रमाणे पुढच्या भिशीच्या नावाची चिट्ठी काढण्यात आली. मग साऱ्याजणी अल्पोपहाराची थाळी घेऊन एकमेकांबरोबर बोलण्यात गुंतल्या. जरावेळाने सौ पंडितांनी सांगितले,
"आपल्या भिशीची एक सभासद कुसुम, नुकतीच विपश्यना शिबीरात राहून आली आहे, आज आपण तिचे अनुभव ऐकूयात."
सर्वजणी उत्सुकतेने ऐकत होत्या. कुसुमने शिबिरात प्रवेश केल्यापासूनचे अनुभव कथन करण्यास सुरुवात केली. सर्वात शेवटी कुसुम म्हणाली,
विपश्यनेने मला काय दिले? तर स्वतःची ओळख, आत्मभान. आयुष्य जगत असताना आजूबाजूच्या गोतावळ्यात मी स्वतःला इतकं गुंतवून घेतले, की माझे वेगळे अस्तित्वच उरले नाही. माझे सुख-दु:ख, आशा-निराशा, इच्छा-आकांक्षा हे सारे माझ्या भवतालावर अवलंबून होते. मला कुणीही दु:खी करू शकते, निराश करू शकते हे किती भयावह आहे? सतत इतरांना काय वाटते? इतर कुणाची प्रतिक्रिया काय असेल? या वर माझे यश अपयश मी मोजत राहिले तर मी कधी सुखी होऊच शकत नाही, आणि मन:शांती माझ्यापासून मृगजळासमान कायम दूरच राहते. विपश्यनेने मला शिकवले माझ्या भाव-भावनांवर माझे नियंत्रण असले पाहिजे.

एक बुद्धकथा आहे.-- सर्वत्र बुद्धाचे भक्त त्यांचे गुणगान करीत असतात. बुद्धाला शरण जाऊन त्यांचे शिष्यत्व पत्करतात. एकजण मात्र असा होता ज्याला ते काही आवडत नव्हते. त्याला बुद्धांचे श्रेष्ठत्व मान्य नव्हते. आपल्याप्रमाणेच असलेल्या एका व्यक्तीला देवत्व का म्हणून द्यायचे? असे तो म्हणे. सर्वजण आश्रमात जात, आशीर्वाद घेत, पण हा माणूस मात्र कधीच गेला नाही. मात्र एक दिवस त्याने ठरवले आणि आश्रमात प्रवेश केला.
बुद्धदेवांसमोर तो बसला होता. त्याने त्यांची निंदा-नालस्ती सुरु केली, दूषणे दिली, तरीही बुद्ध शांतच होते. काही काळाने तो माणूस बोलून थकला आणि शांत बसून राहिला. मग गौतम बुद्धांनी त्यांच्या शिष्याला सांगितले, शिष्याने काही ताजी आणि मधुर फळे त्या माणसासमोर ठेवली. शीतल जलाने भरलेले पात्र तिथे ठेवले.
त्या मनुष्याने फलाहार केला, जलपान केले आणि तृप्त झाला. त्याला नवल वाटत होते, इतकी दूषणे देऊनही बुद्ध शांत कसे? त्याने विचारले,
"महाराज तुम्ही काय साधना केलीत? ज्यामुळे इतका संयम तुमच्यामध्ये आहे."
तेव्हा बुद्ध हसले आणि म्हणाले,
"साधना कसली? अगदी साधे, सोपे तत्व आहे. काय स्वीकारायचे? आणि काय नाही? हे आपण ठरवायचे. म्हणजे सगळी दु:खे, सगळा संताप दूर राहतो. मी तुला मधुर फळे दिली, ती तू स्वीकारलीस आणि तृप्त झालास. तू मला दूषणे दिलीस, पण मी ती स्वीकारलीच नाहीत. त्यामुळे मला क्लेश झाले नाहीत."
विपश्यनेनी मला हेच शिकविले. निर्लेप वृत्तीने स्वतःचे अंतरंग जाणून घेता आले की आयुष्यातील व्याप, ताप, चिंता दूर जातात.

देविका लक्षपूर्वक कुसुमचे अनुभवकथन ऐकत होती. घरी आली तरी तिला ते सारे आठवत होते. आता तिच्या लक्षात येत होते तिच्या नाराजीचे, निराशेचे मूळ काय आहे? इतरांच्या टीका टिप्पणीला जरुरीपेक्षा जास्त महत्व देणे योग्य नाही हे तिला आता समजत होते. इतरांनी केलेली प्रशंसा इतकी महत्वाची का असली पाहिजे? दुसऱ्याने केलेल्या सकारात्मक टीकेचा स्विकार आणि निरर्थक निंदेकडे दुर्लक्ष करणे, हे मला जमले पाहिजे. नाहीतर जगणे खरोखरीच अवघड होईल. देविकाने कुसुमचे मनोमन आभार मानले.

***

टिळक स्मारक मंदिराचा परिसर गजबजला होता. दुचाकी, चारचाकी वाहने येत होती. खाद्यविक्री केंद्राभोवती तुरळक गर्दी दिसत होती. देविका आणि तिच्या सोबत आणखी काही जण असलेला गट तिथेच थांबलेला दिसत होता. काहीवेळाने सर्वजण बाजूला असणाऱ्या प्रदर्शाच्या मांडवापाशी आले. तिथे पुष्परचना प्रदर्शन आयोजित केलेले होते. विविधरंगी फुलांचा तो सुगंधी मेळावा, मोहक दिसत होता. देविका देखिल त्या प्रदर्शनात आणि स्पर्धेमध्ये सहभागी झालेली होती. परीक्षक तिथे मांडलेल्या मेजावरच्या पुष्परचनांचे मूल्यमापन करीत होते. परीक्षक निघून गेल्यावर इतरांना आत सोडण्यास सुरुवात झाली. देविकाच्या ओळखीचे बरेचजण तिथे आलेले होते. ती उत्सुकतेने लोकांच्या प्रतिक्रिया आजमावण्याचा प्रयत्न करीत होती. दिनकर काका आणि सरला काकू प्रदर्शनाच्या मांडवा बाहेर येताना तिला दिसले. तिने पुढे होत त्यांना विचारले,
"काका, कसे आहे प्रदर्शन? आवडले का?"
काका म्हणाले, "चांगले आहे. तुझी स्पर्धेकरता ठेवलेली फुले आणि त्यांची केलेली रचना छान आहेत हं. त्यातले एक ब्रह्मकमळ आहे ना? सुरेख दिसते आहे."
देविका म्हणाली, "हो ब्रम्हकमळ आहे, आणि कृष्ण कमळ पण आहे. बाजूला निशिगंध ... सगळी फुले माझ्या घरच्या बागेतली आहेत."
यावर काका काहीतरी बोलणार, तेव्हढ्यात काकू म्हणाल्या,
"ब्रह्मकमळ जरा बोजड वाटते नाही? आणि गुलाब एकही नाही? दोन तीन गुलाबाची फुले वापरायची होतीस, अजून शोभा वाढली असती."
देविकाचा चेहरा जरा उतरला होता,
"हो ग, लक्षातच नाही आले माझ्या" नेहमीच्या सवयीने ती बोलली.
काका, काकू गेल्यानंतर ती तिला दिलेल्या टेबलजवळ आली. तिथे मांडलेली फुले ती निरखून बघत होती. तिच्या नजरेला तर काहीच त्रुटी जाणवत नव्हती. "मग काकू असं का म्हणाली असेल?" ती विचार करत होती. त्याचवेळी आयोजकांपैकी एकजण तिथे आला. त्याच्या हातात एका गोलसर आकाराच्या कागदावर काही लिहिलेले होते. त्याने तो कागद तिच्या टेबलावर चिकटवला आणि तिच्याकडे बघत म्हणाला, "अभिनंदन मिसेस काळे, तुमच्या रचनेची पारितोषिकाकरता निवड करण्यात आली आहे."
आता तिच्या चेहऱ्यावर हास्य दिसत होते. परत एकदा तिने तिच्या पुष्परचनेकडे निरखून पाहिले. तिला सरला काकूचे बोलणे आठवले,
"काकूचे बोलणे मी उगीचच मनावर घेतले. कुसुमने सांगितलेले मी विसरले कशी? कुणाच्यातरी बोलण्याला उगीच महत्व कशाला द्यायचे?"

***

आता देविकामधे थोडा बदल झालेला आहे. बाह्यतः कुणाला जाणवलेला नसेल, पण तिला मात्र त्याची जाणीव आहे. आता ती सहजासहजी नाराज होत नाही. काय स्वीकारायचे? आणि काय नाही? हे तिला माहिती आहे. कोण काय म्हणेल? ही भीती आता तिला सतावत नाही. "आपणासी जे ठावे | ते इतरांसि सांगावे| शहाणे करावे । सकळ जन || हा समर्थांचा उपदेश सतत आचरणात आणणाऱ्याचे सल्ले, निर्विकारपणे ऐकणे तिला शक्य होते आहे. आता रोजचे, तेच ते आयुष्यदेखील तिला अजिबात कंटाळवाणे वाटत नाही. तिच्या दिवसाची सुरवात उत्साहाने आणि शेवट समाधानी चित्ताने होतो.

***

"देविका, ही पर्स तुझ्या या साडीला शोभत नाहीये, खूप मोठी आणि बोजड दिसतीय."
देविकाच्या अनेक नणंदांपैकी एक, केतकी तिला सांगत होती. देविकाच्या बाजूला उभ्या असलेल्या सुनीलचा चेहरा चिंताग्रस्त झाला होता. दोघेजण त्यांच्या एका नातेवाईकाच्या विवाह समारंभाला आलेले होते. हातातल्या पर्स कडे बघत देवकी म्हणाली,
"चांगली नाही वाटत? पण मला सोयीस्कर वाटते ग ती."
"लहान पर्स जास्त सोयीची वाटते मला, आणि तुझ्या कांजीवरम साडीवर झुमके चांगले दिसले असते. साडी इतकी भारदस्त आहे, त्यावर तसेच ठसठशीत दागिने चांगले वाटतात" केतकी म्हणाली.
आता देविका काय म्हणते या काळजीने सुनील तिच्याकडे बघत होता. पण काय आश्चर्य? देविकाचा चेहरा शांत होता. कपाळावर एकही आठी नव्हती. ती हसत हसत केतकीला म्हणाली,
"असू दे गं, माझी जुनाट आवड. तू मात्र तुला छान मेंटेन केलं आहेस हं! अगदी हेअर स्टाईल पासून पायातल्या सॅण्डल्स पर्यंत.. सगळे एकदम परफ़ेक्ट."
देविकाच्या स्तुतीने केतकी सुखावली, सुनीलच्या चेहऱ्यावरचा ताण निवळलेला दिसत होता. आणि देविका हसतमुखाने, दूर कोपऱ्यात एकट्या बसलेल्या सिंधुआज्जीची विचारपूस करण्याकरता खुर्च्यांच्या रांगांमधून वाट काढत होती.

***

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

सिंधु आज्जींसोबत स्लोथ्या असला तर अजूनच मज्जा! Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-ताराबाई
टिप टिप चांदणी

सिंधू आज्जीने स्लॉथ्याला घरीच ठेवले बहुतेक.

-- त्याला ओल्ड सॉन्ग्ज्स आवडत नाहीत ना. 'गंगा, सिंधू, सरस्वतीच यमुना' वगैरे सुरू झाले की तो अस्वस्थ होतो, 'शुभमंगल सावधान' होईपर्यंत त्याला कह्यात ठेवणे कठीण जाते. पण त्याच्या साठी जिलबी, मसालेभातचा डब्बा आणि छोट्या बाटलीत मठ्ठा तयार ठेवायला सांगितले आहे आज्जीने.

कथा वाचल्याबद्दल धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

मला सिंधुआज्जींपेक्षा स्लॉथ्याच आवडतो!

(नाही! मी कथा वाचली नाही, मी टरफले उचलणार नाही!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असते एकेकाची आवड ...

कथा न वाचल्याबद्दल धन्यवाद!

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||