नऊला दहा कमी

नऊला दहा कमी

चिंतामणी लोकल मधून उतरला आणि धावत सुटला. स्टेशनच्या घड्याळात पहिले. अरे बाप रे! नऊला दहा मिनिटं कमी. असाच पळत गेला आणि लिफ्ट वेळेवर मिळाली तर अजूनही वेळेवर ऑफिस गाठता येईल. चिंतामणी रस्त्याच्या कडेकडेन पळत होता. “एक्स्क्यूज मी प्लीज” म्हणत पळत होता. कोणी एक्स्क्यूज करत होत का नाही याची त्याला तमा नव्हती.
“सम्हालो खुदको.”
“अबे साले, मरना है तो मेरे गाडी के नीचे क्यू?”
“घरसे टाईमपे निकलो ना भाईसाब.”
“मॅा बहेन नही ही क्या तेरेको?”
ही असली वाक्ये, असले रिमार्क तो गेली वीस वर्ष ऐकत होता.
समोरून एक टॅक्सी दारू पिऊन झिंगलेल्या दारूड्या सारखी त्याच्याच रोखाने भरधाव येत होती ह्याची जाणीव त्याला अगदी शेवटच्या क्षणी झाली. पण लहानपणी खेळलेल्या आट्यापाट्याची प्रॅक्टिस आता कामाला आली. चपळाईने तो बाजूला झाला. काळ आला होता पण वेळ आली नव्हती. कुणालातरी उडवून टॅक्सी बाजूच्या भिंतीवर आदळली. लोकांचा आरडाओरडा ऐकण्या साठी त्याला वेळ नव्हता. पोलिसांची गाडी येईल, अंब्युलंस येईल. तो जो कोण चिरडला गेला होता त्याला इस्पितळात घेऊन जातील. तो जगेल वा मरेल. हू केअर्स?
“अरेरे,बेचारा बेमौत मारा गया.”
“अग आई ग! मला नाही बघवणार आपण त्या फुटपाथ वरून जाऊ.”
“कौन था?”
“होगा कोई. जंटलमन दीख रहा था.”
“अरे हा तर आपला हा होता. काय बर त्याचं नाव? अगदी ओठावर आहे. मी ऑफिसच्या कामासाठी एकदा दोनदा.......”
चिंतामणी ऑफिसच्या लॉबिमध्ये पोचला तेव्हा त्याच्या रिस्टवॉच मध्ये नऊला दहा मिनिटे कमी होती. त्याने सुटकेचा निश्वास टाकला. ऑफिसमधे वेळेवर पोचण्याची निश्चिति झाली होती. पण चिंतामणीचे आयुष्य इतके सरळ साधे असते तर..... ऑफिसच्या सहा लिफ्टपैकी फक्त चारच चालू होत्या. त्या बिल्डींग मध्ये अजूनही ऑफिसं होती. सगळ्यांनाच घाई होती. लिफ्टसमोर लांब रांगा लागल्या होत्या. आता ओफिसात वेळेवर पोहोचण्याची शाश्वति नव्हती. मनेजर जे काही वाक्ताडन करेल ते खाली मान घालून ऐकून घ्यायचे. जेव्हा लिफ्टमध्ये जायची वेळ आली तेव्हा वॉचमनने हात मध्ये टाकला.
“बास, आधीच दोन लिफ्ट खराब पडल्या आहेत. काय सांगावे साहेब, सगळ्यांना घाई. सांगितले तरी ऐकायला मागत नाहीत. ओवरलोड.....बोलावले आहे ...... येतील.”
चिंतामणीचे वॉचमनच्या बडबडीकडे लक्ष नव्हते.
चिंतामणीने जागेवर जाऊन बुड टेकले नसेल तेव्हड्यात पांडू बोलवायला आला. कुणी बोलावले आहे हे विचारायची आणि सांगायची गरज नव्हती. चिंतामणीने घड्याळ्यात बघितले. नऊला दहा मिनिटे कमी होती. चिंतामणी बुचकळ्यात पडला. लवकर आलो तरी हा नाराज. कमाल आहे.
“मिस्टर दिनकर, .....”
“मी चिंतामणी ......”
“किती थापा माराल, मिस्टर बापट? आपण ऑफिसला उशिरा आला आहात ह्याची आपल्याला काही लाज?”
“मी दिनकर बापट नाहीये. मी चिंतामणी कोकजे आहे,” चिंतामणीचा आवाज नकळत वाढला, “मला उशीर झाला त्याला करणे आहेत. मी येत होतो तर रस्त्यात जीवघेणा अपघात झाला. कुणी बिचारा टॅक्सीखाली चिरडला गेला. कोण, कुठला, वाचला का मेला हे बघायला क्षणभरही मी थांबलो नाही. काय उपयोग? खाली लॉबित आलो, बघतो तर फक्त चार लिफ्ट चालू. एव्हढे होऊन देखील, सर, मी नऊला दहा मिनिटे कमी असताना ऑफिसमध्ये पोचलो. हे पहा अजूनही नऊला दहा मिनिटे कमी आहेत.” चिंतामणीने चक्क आपले घड्याळ पुढे केले. “पहा, नीट पहा.” भावनांना अशी वाट दिल्यावर चिंतामणीला आपली चूक कळून आली. आपण जरा जास्तच बोललो. पण माणसाने किती म्हणून ऐकून घ्यायचे? कोपऱ्यात फसलेले मांजरदेखील उलटून हल्ला करते.
“मिस्टर वाघचौरे, तुम्ही फार बोललात. सर्व लिफ्ट चालू असत्या तर कुणीही सोम्या गोम्या ऑफिसात वेळेवर आला असता. त्यात विशेष ते काय. एकही लिफ्ट चालू नसताना ऑफिसात वेळेवर येण्यासाठी कंपनी तुम्हाला पगार देते. (आता नेपोलियनचा घोडा दौडत येणार ह्याची चिंतामणीला खात्री होती.) मिस्टर ठोंबरे, तुम्हाला नेपोलियन(आणि तो तसा आलाच) माहित आहे? तो लढाई सुरु व्हायच्या आधी दहा मिनिटे रणभूमीवर हजर होत असे.”

“नेपोलियनकडे त्याचा खास घोडा असणार. शिवाय तेव्हा ट्राफिक जामही नसणार. त्याला म्हणव ८-११ च्या फास्ट लोकल मध्ये अंधेरीला चढून दाखव.”
मॅनेजरला धक्का बसला. आज हा दिनकर, मिस्टर बापट, मिस्टर वाघचौरे, मिस्टर ठोंबरे, (हू एवर ही मे बी!
व्हाट द हेल डू आय केअर) उलटून बोलला. ह्याला चांगला धडा शिकवायला पाहिजे. इथे बॉस कोण आहे हे विसरलेला दिसतोय.
“खूप बोललात. आता जा आपल्या जागेवर. लक्षात आहे ना. आज तुम्हाला क्लाएंटसमोर प्रेझेन्टेशन...”
चिंतामणी त्याची बक बक ऐकायला थांबला नाही.

आजचा दिवस काही निराळा होता. आधी तो जीवघेणा अपघात, नंतर लिफ्टचा झोल, आणि आता मॅनेजरशी बोलाचाली. त्या साल्याला माझे नाव आठवेना.
चिंतामणीने आपला कॉप्यूटर चालू केला आणि आपला पासवर्ड टाईप केला ‘आयग्रेटमणी’. कॉप्यूटरने एरर मेसेजचा बीपकार केला. “हा पासवर्ड निरुपयोगी आहे.”
“कमाल आहे. मी तर बरोबर टाईप केला होता,” चिंतामणी चक्रावून गेला. त्याने पुन्हा एकदा पासवर्ड टाईप केला.हळू हळू. प्रत्येक अक्षर लक्ष देऊन टाईप केले. ह्या वेळेला कॉप्यूटर रागावून ओरडला, “मूर्खा, सांगून समजत नाही? हा पण चुकीचा पासवर्ड आहे. आता जर पुन्हा चुकीचा पासवर्ड एंटर करशील तर तीन तास तुला लॉग-इन करता येणार नाही.” चिंतामणीला हे परवडण्याजोगं नव्हतं. आज त्याला क्लाएंटसमोर प्रेझेन्टेशन करायचे होते. गेले सात आठ दिवस तो तयारी करत होता. शनिवार रविवार ऑफिसचा सुट्टीचा दिवस. पण चिंतामणी मात्र ऑफिसमध्येच होता. काय करणार? जर त्याला कॉप्यूटरमधे लॉग इन करता आले नाही तर काय त्याचा उपयोग? त्याचे सर्व कष्ट त्या कॉप्यूटरमधे कुलुपबंद झाले होते.(त्याने फाजील आत्मविश्वासामुळे कुठेही बॅक-अप करून ठेवले नव्हते.)
त्याने शेवटचा प्रयत्न करायचे ठरवले.
त्याने युजरनेम आणि पासवर्ड नोट पॅड मध्ये टाईप केले. दोनदा दोनदा बघून खात्री करून घेतली. नोट पॅड वरून कॉपी पेस्ट करून कॉप्यूटरमधे भरताना त्याने कॉप्यूटरला पासवर्ड दाखवायला सांगितले. सगळे काही ठीक तर होते. देवाचे नाव घेऊन –देव जर आपल्या पाठीशी असेल तर कॉप्यूटरची काय बिशाद आहे- लॉग इनचे बटन दाबले. ह्यावेळी कॉप्यूटरने आरडाओरड न करताच एरर मेसेज दिला. चिंतामणीच्या डोक्यात अताशिक कुठे थोडा प्रकाश पडला.
आपण ज्या ठिकाणी बसलो आहोत तेथे कॉप्यूटरचे साम्राज्य आहे. देवाचे नाही.
चहू दिशांना जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी अस्तित्व तुझे अनंतात अहम ब्रह्मास्मि चा नाद गुंजतो हा मनामनात, कॉप्यूटर! जणू कॉप्यूटरांनी त्याला वेढा घातला होता. चहो बाजूंनी त्याला घेरले होते. मिस्टर चिंतामणी बोला आम्हाला चकवून कुठे पळणार आहात? ई-मेल, टेक्स्ट मेसेजिंग, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट, व्हट्सप! स्मार्टफोन? ते सुद्धा कॉप्यूटर! कुठल्याही दुकानात जा. डेबिटकार्डने, क्रेडीटकार्डने पेमेंट करा वा पेमेंट गेटवेने करा. कुठे तरी मोठा कॉप्यूटर तुमच्या खरेदीवर लक्ष ठेवतो आहे. तुम्ही कुठल्या दिवशी, कुठल्या वेळेला, कुठल्या दुकानात किती रुपयांची खरेदी केली. तुम्ही तुमच्या बायकोपासून लपवू शकता, पण कॉप्यूटर पासून नाही. आता फ्रीजचेच बघा. लोकांना वाटते कि फ्रीज अन्नपदार्थ थंड ठेवतो. नाही साहेब, तुम्ही चुकता आहात. खर तर कॉप्यूटर ते काम करत असतो. तुमचा फोन एक कॉप्यूटर आहे. तो तुमच्या मित्राला/मैत्रिणीला/बॉसला/ सहकाऱ्यांना/नातेवाईकांना फोन करतो आणि मग तुम्ही बोलता. तुमची कार म्हणजे चाकं आणि इंजिन असलेला कॉप्यूटर! आता तर काय कॉप्यूटरवाली मांजरं-कुत्री पण बाजारात विकत मिळायला लागली आहेत म्हणे. ती सकाळी सकाळी कोवळं उन खात येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर नजर ठेऊन असतात. ज्या माणसाची त्यांच्या डेटा-बेस मधे एन्ट्री नसेल त्याच्यावर भुंकतात! वर त्यांना मास मच्छी वा महाग डॉग फूड वगैरे देऊन लाड करायची गरज नाही. रात्री त्यांना कॉप्यूटरशी जोडा म्हणजे गेल्या चोवीस तासात कोण आले गेले त्यांच्या प्रतिमा तुम्ही बघू शकता. मग त्यांना चार्जिंगला लावा.
चिंतामणीचा आता कशावरही विश्वास राहिला नाहीये. खरं काय आणि खोटं काय. ज्याने त्याने आपापले ठरवावे.
एकदा तो मामेभावाकडे गेला होता. तो चिंतामणीला मोठ्या उत्साहाने स्वतः कलम केलेली गुलाबाची रोपं कौतुकाने दाखवत होता. चिंतामणीने हळूच एका रोपट्याला स्पर्श केला. ती प्लास्टिकची नाहीत ह्याची खात्री करून घ्यायची होती! दुर्दैवाने ती प्लास्टिकची निघाली. त्याला वाटले, भावाला सांगावे.
“बाबा रे ही प्लास्टिकची रोपटी आहेत.” पण त्याने विचार बदलला. कशाला उगाच त्याच्या जगाला टाचणी लावा!
चिंतामणी त्याच्या विच्रारांतून जागा झाला. स्वतःला वेळीच सावरले नाही तर, जग व्यापून दशांगुळे उरलेले हे कॉप्यूटर आपल्याला मॅानिटर मध्ये खेचूनसुद्धा घेतील. त्या हॉलीवूड सिनेमात दाखवले होते अगदी तसेच. काय नेम नाही. चिंतामणीला स्वतःचीच भीती वाटू लागली. आपल्याला आजच असे भास का व्हावेत?
आज पहिल्यांदा कॉप्यूटर त्याच्याशी बोलला. ठीक आहे. तो अनुभव काही इतका सुखकारक नव्हता.
त्याने आय टी डिपार्टमेंटला फोन केला. दुसऱ्या बाजूने बाईचा आवाज आला,
“सध्या आम्ही बिझी आहोत.आपला संदेश रेकॉर्ड करा.थोड्याच वेळात आमच्या सेक्शन मधून कोणीतरी आपल्याशी बोलेल.”
एकदम त्याला आठवण झाली. आल्यापासून आपण अजून एकदाही चहा प्यालो नाही.
“पांडू चहा पाज रे बाबा.”
“साहेब, किती चहा प्यावा माणसाने त्याला काही सुमार? कंपनीने चहाचे मशीन लावले आहे त्याचा अर्थ असा ““पांडू हा माझा पहिला चहा आहे.”
“पहिला चहा? सकाळी आल्या आल्या एक झाला. साहेबांच्याकडून परत आल्यावर एक, कॉप्यूटरमध्ये गोची झाली तेव्हा अजून एक. किती झाले?”
चिंतामणीचे डोके सणकले. केव्हा मी तीन चहा प्यालो? चहा पिण्यासाठी स्वस्थता कुठे मिळाली. हा पांडू माझी फिरकी घेतो आहे. आणि आज हा अस बोलतो आहे कि जणू ह्याचा बा माझ्यावर उपकार करतो आहे.
“समजल. जा पळ आणि चहा आण.”
“आता मी साहेबांच्या कामात बिझी आहे. हेss एवढे कागद झीरॉक्स करायला दिले आहेत. चहाची एवढी तलफ आली असेल तर बूड हलवा आणि मशीन पाशी जा. स्वतः चहा बनवा आणि प्या. मशीन मधून चहा कसा काढायचा ते माहित आहे ना की ते पण.....”
आय टी डिपार्टमेंटचा फोन आला.
“चिंतामणी. तुम्ही पासवर्ड बरोबर एन्टर केला आहे का? पुन्हा एकदा प्रयत्न करा. छोटी आणि मोठी अक्षरे बरोबर टाईप करा. नेहमी लोकांचा स्माल आणि कॅपिटल लेटरमध्ये गोंधळ होत असतो. मग येतात आमच्याकडे धावत.”
बोलणारा जर चिंतामणीच्या समोर असता तर चिंतामणीने त्याला दोन लाफा लगावल्या असत्या.
बापाला शिकवतो आहे हा की ..........
त्याने फोन डेस्कवर ठेवला. मनातल्यामनात एक ते पंचवीस आकडे मोजले, फोन उचलला आणि सांगितले,
“केला एन्टर, पुन्हा एरर मेसेज येतो आहे.”
“ठीक आहे. तुमचा लॅपटॉप आणण्यासाठी माणूस पाठवतो.
अश्याप्रकारे त्याचा लॅपटॉप आय सी यू मधे गेला.

चिंतामणीचा दिवस असा चालला होता. “चला चिंतामणी, उठा चहा पाहिजे असेल तर माशिनपाशी जाऊन स्वहस्ते करून घ्या आणि प्या.” चिंतामणी स्वतःशी बोलत होता.
“मॅनेजरच्या समोर दाखवलेला तोरा, ती अक्कडबाजी, ते डेअरिंग पांडूच्या समोर गायब ह.” आता नॅन्सी द रिसेप्शनिस्ट बोलत होती. तिच्या बोलण्यातला भोचक कुत्सित भाव त्याला तिथेही जाणवला. रिसेप्शनमध्ये जाऊन तिला शिव्या द्याव्यात अशी जोरदार सणक त्याच्या डोक्यात उठली.
चिंतामणी खुर्चीवर ताठ बसला. आपण सगळ्यांचं फार ऐकून घेतो, मवाळ आहोत ह्याची त्याला लाज वाटली.कोण हा पांडू? मला चहा देणे हे त्याचे काम आहे. हजारवेळा मागेन, हजारवेळा द्यायला पाहिजे. ही कंपनी सुरु झाल्यापासून मी इथे काम करतो आहे. अरे ह्या पांडूला मीच इथे कामाला लावले. तो आज मला उलट उत्तर करतोय. काय जमाना आला पहा.
“तेच ते. नुसते मनातल्या मनात बडबड करणार तू. असेल हिम्मत तर जा आणि पांडूला फायर कर. नाही चिंतामणी नाही.ती तुमची कामे नाहीत. त्याला पाहिजे जातीचे.”
आता हे कोण बोलले? डेटाबेस अॅडमिनिस्टेटर शैलजा वागळेच्या आवाजाशी मिळता जुळता होता. तो उभा राहिला आणि शैलजाकडे बघू लागला. ती हसत हसत फोन वर बोलत होती.
हसतेस काय. बघून घेईन. मला काय समजलीस तू? बुळा?
तो बसल्या जागेवरून उठला. सेक्शन शांत होता. प्रत्येकजण आपापल्या कामात गुंतले होते.
“शांतपणाचे नाटक करणाऱ्या मत्सरी, कपटी, सडैल, कुजक्या मेंदूच्या, शेणाच्या पोवात वळवळणाऱ्या अळ्यांनो, लक्षात ठेवा,मी असातसा हार मानणारा नाही,” त्याचा आवाज चढला होता. अंग आग ओकत होतं. डोकं तापलं होतं. शरीरचा रागाने थरकाप होत होता. मात्र सेक्शन शांत होता. प्रत्येकजण आपापल्या कामात गुंतले होते. आता तो जवळ जवळ ओरडत होता. “माझा अपमान करणाऱ्या एकेकाला असा धडा शिकवीन कि नानी याद आयेगी. समजलात काय तुम्ही मला. कोकणी माणूस आहे मी. मेल्यावरही तुमची पाठ सोडणार नाही.”
तरीही सेक्शन शांत होता. प्रत्येकजण आपापल्या कामात गुंतले होते. कोणाचेही चिंतामणीकडे लक्ष नव्हते. शैलजा अजूनही हसत हसत कुणाशीतरी फोनवर गुलूगुलू बोलत बोलत होती.
“माझा अपमान करण्यापेक्षा, शैलजा, काम कर. कामात लक्ष दे.” इतके ओरडूनही शैलजाचे त्याच्याकडे नव्हते.
ओ. के. म्हणजे तुम्ही मला अनुल्लेखाने मारणार आहात.
पांडू घाईघाईने त्याच्याकडेच येत होता.
“चिंतामणी साहेब, डायरेक्टर लोक केव्हाधरून तुमची वाट बघतायेत.”
चिंतामणी चक्रावून बघत राहिला. प्रेझेन्टेशन दुपारी साडेतीन वाजता होतं, आता तर नऊला दहा मिनिटे कमी होती. आता इतक्या लवकर प्रेझेन्टेशन?
पण बोलावणे आले होते. जायला पाहिजे!
प्रेझेन्टेशन तर तयार नव्हते पण पहिल्या ड्राफ्ट चे प्रिंट आउट होते. ते गोळा केले. आणि कॉन्फेरंस रूम कडे सिव्हासारखी दमदार पाउले टाकत निघाला.
“चिंतामणी, बसा.तुम्हाला परिस्थितीची कल्पना असेलच.” डीप व्हॉइस बोलत होता.
“नाही. कसल्या परिस्थितीची कल्पना? आपण कशाबद्दल बोलत आहात, सर?
“एचआर, तुम्ही ह्याला काही कल्पना दिली नाही का?”
एकूण आपल्या टर्मिनेशन बद्दल ही मिटिंग असावी.
“हो, म्हणजे नाही सर. सर आज मी प्रचंड बिझी होतो सर. सर, वेळच मिळाला नाही सर. सर माफ करा सर.” एचआर पडक्या आवाजात बोलला.
“दॅट्स आल राईट एचआर.” डीप व्हॉइस चिंतामणी कडे वळून म्हणाला
“चिंतामणी, तुम्ही नरकात पोचला आहात याची तुम्हाला कल्पना आहे? वेलकम टू द हेल. लोकहो, ह्याला काय नरकयातना द्याव्यात?”
“ह्याला कॉप्यूटरच्या तोंडी द्यावे. कॉप्यूटर ह्याचे कोट्यावधी तुकडे करून आसमंतात उधळेल. म्हणजे पुन्हा असे डांगू जीव जन्माला येणार नाहीत.” डायरेक्टर ऑफ मूर’स लॉ ने आपले मत नोंदवले.
“नाही, नाही. आपल्या नियमात हे बसणारे नाही. ह्याला आयुष्यभर आय मीन मृत्युभर यातना देणे ही आपली जबाबदारी आहे.” इति डीप व्हॉइस.
आता लॉर्ड ऑफ ‘जीवघेणे अल्गोरिथम’ची पाळी होती. “कॉप्यूटरच्या तोंडी दिल्यावर ह्याला आजचा दिवस पुन्हा पुन्हा जगायची -माय मिस्टेक जगणे हा शब्द देखील प्रतिबंधित आहे हे विसरलो - कॉप्यूटरच्या तोंडी दिल्यावर ह्याला आजचा दिवस पुन्हा पुन्हा मरायची शिक्षा द्यावी.”
“कॉप्यूटर इसे जीने नही देगा और टाईम लूप इसे मरने नाही देगा.”
(समाप्त)

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet