सूचना

अपग्रेडच्या कामासाठी भावेप्र शुक्रवार (७ ऑक्टोबर) ते रविवार (९ ऑक्टोबर) संध्याकाळपर्यंत ऐसी अक्षरे अनुपलब्ध असेल. काम लवकर पूर्ण झाल्यास संस्थळ आधीच सुरू होईल. तसदीबद्दल क्षमस्व.

मला पाहताना

2021 हे वर्ष माझ्यासाठी कमाल होतं. अगदी रोलरकोस्टर राईड नसलं तरी खूपच हॅपनिंग. आपल्या आयुष्याचं स्टिअरिंग आपल्या हातात आहे आणि त्यावर आपला पूर्ण ताबा आहे, अशी खूप मनापासून, आतून जाणीव करून देणारं हेच ते वर्ष. त्यामुळे बहुसंख्य लोकांकरता तापदायक, दु:खांचं ठरलेलं 2021 माझ्याकरता मात्र सुखकारक होतं. हे सांगताना, माझ्या भवताली असलेल्या, जगातल्या अनेक लोकांवर यावर्षी दु:ख, अनिश्चितता यांचे डोंगर कोसळलेत, कोरोना महामारीच्या संकटानं लाखो जीव गेलेत, याची मला जाणीव आहे. त्यांच्याबद्दल समानुभूती आहे.

Mental Health Image

तर आयुष्याचं स्टिअरिंग हातात आल्याची जाणीव झाली, ती मुख्यत: मानसिक स्वास्थ्यामुळे. या सबंध वर्षभरात इतक्या घटना घडून गेल्या, जवळच्या लोकांचे मृत्यू, फेब्रुवारी-मार्चदरम्यान दुसऱ्या लाटेत उडालेला हाहा:कार, काही कौटूंबिक घटना, कुटुंबातल्या व्यक्तींची आजारपण, हॉस्पिटलायजेशन्स, असं बरंच काही वर्षभर, सतत घडत होतं, तरीही नैराश्याचा स्पर्शही मनाला झाला नाही. वैताग, चीडचीड, कधीकधी असहायता, व्याकूळता, दु:ख, असूया असं सगळं अधूनमधून वाटायचं. पण त्यातच अडकून पडून निराशेच्या गर्तेत गेले, असं झालं नाही. कुणाशी तरी बोलले, मनातल्या भावनांचा निचरा झाला, चला आता विषय संपवून पुढे जाऊ…असं झालं. शिवाय या वर्षात घडलेल्या चांगल्या घटनांचं पारडं खरोखरंच जड आहे. चांगला जॉब, नवे मित्र मैत्रिणी, नव्या व्यावसायिक संधी, पहिल्या सहामाहीत वाचन, फिल्म्स बघायला मिळालेला बराच वेळ, थोडं फिरणं, लाडली मीडिया फेलोशिप, त्याअंतर्गत केलेलं काम हे सगळं खूप हुरूप वाढवणारं, आशादायी, सर्जनशील व्यस्ततेत ठेवणारं घडलं. एका पुस्तकाचं भाषांतरही करून झालं. एका मासिकात स्तंभलेखन करून झालं. मुख्य म्हणजे यातून खूप आनंद मिळाला, नवंनवं शिकता आलं. अडचणी आल्या, पण मार्गही काढता आला. सगळंच मनासारखं झालं तर ते आयुष्य कसलं? त्यामुळे नकोशा काही घटनाही घडल्या, पण त्याचा स्वीकार करायला शिकले.

हे केलं, ते केलं, या तपशीलाच्या एवढ्या जंत्रीत अनेकांना रस नसणार, त्यामुळे घडाभर तेल वाहून पुढचं महत्वाचं शेअर करते.

2020-2021 या दोन वर्षांत माझ्या स्वभावात खूप बदल झाला. एवढा की माझं मलाचं आश्चर्य वाटतं, आणि 2020 आधी आणि त्यानंतर मला पाहिलेल्या मित्र-मैत्रिणींनाही आश्चर्य आणि आनंद वाटतो. अगदी 2019 च्या शेवटापर्यंत मी खूप किरकिरी होते, इतकं की मित्र-मैत्रिणींना भेटल्यावर मी नेहमीच माझी रडगाणं त्यांना ऐकवत असे. मला कसं टाळलं जातं, ग्रुपिझमच कसं केलं जातं, सगळीकडेच सापत्न वागणूक कशी दिली जाते, याबद्दल मी खूप बोलत असे, अनेकदा तेच ते दळण पुन्हा-पुन्हा दळत असे. आणि खरोखरंच माझे काही कौटूंबिक प्रश्न तेव्हा फार गंभीर होते आणि मित्र-मैत्रिणी, सामाजिक वर्तुळांत आलेले वगळलेपणाचे अनुभवही खूप खोलवर जखमा करणारे होते/ आहेत. इतकं की त्यामुळे आपसूक स्वत:च्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण व्हायचं. अनेकदा न्यूनत्वाची भावना यायची. आपल्यातच काही तरी कमी आहे, आपणच चुकतो, आपल्यालाच आपल्या मित्र-मैत्रिणींइतके पॉप रेफरन्सेस माहीत नाहीत, आपण तर शाळेपासूनच अनकूल, नेहमीच लेफ्ट आऊट, फ्रेंडझोन्ड आहोत. अशा प्रकारचे विचार मनात दाटी करायचे.

2016 मध्येच माझ्या सायकॉलॉजिस्ट मैत्रिणीने प्रज्ञा मानेनं मला ‘लो सेल्फ एस्टीम’ असल्याचं निदान केलं होतं. खरं म्हणजे शाळेत पहिल्यापासून नंबरात येऊन, इतर उपक्रमांतून चांगली कामगिरी करून, नेहमीच शिक्षकांकडून कौतुक होत असतानाही, त्याच वयापासून माझा स्वत:च्या सामाजिकीकरणाबाबतचा आत्मविश्वास डळमळीत झालेला होता. सतत सगळीकडून वगळलं जाणं, हे यामागचं मोठं कारण. तरीही सतत यावर चर्चा करून नुसतीच उर्जा वाया जाते. प्रश्न आहे की, हे वास्तव बदलायचं कसं? दोन वर्षांपुर्वी मी या प्रश्नांचा फक्त माझ्यापुरता विचार करायचे. 2019 पासून जरा विचारांची दिशा बदलली.नैराश्य ही एक सुटी आणि वैयक्तिक घटना मुळीच नाही. न्यूनगंडही पोकळीत जन्म घेत नाही आणि या साऱ्याचा आपल्या सामाजिकीकरणाशी आणि समाजाशी खोलवरचा संबंध आहे. मूळ सांगाडाच जर विषमतेचा असेल तर वरच्या रचनेचा तोल जाणार आहे, त्यामुळे त्या वरच्या ढासळणाऱ्या रचनेबद्दलच बोलायचं की मूळ सांगाड्याकडेही पाहायचं, असं का होतं - याच्या मुळाशी जायचं, असे दोन पर्याय माझ्याकडे होते. खूप उशिरा, कूर्मगतीने का होईना पण मी दुसरा निवडला. मग मी खूप उलट सुलट विचार करू लागले, जमेल तसे टिपून ठेऊ लागले.

मला वगळलं जाण्यामागचं कारण जात-वर्ग, राहणीमान, भाषा, चार माणसांत संभाषणादरम्यान छाप पाडण्यासाठी लागणाऱ्या संदर्भसंपृक्ततेचा तेव्हा असलेला अभाव, सफाईदारपणाचा आणि मुख्य म्हणजे ह्युमरचा अभाव हे असल्याचं माझ्या साधारण लक्षात आलं. त्याचबरोबर आत्मपरीक्षणाचीही वेळ आलीच होती. आपल्याला नेमकं काय वाटतंय, तसंच आपण वागतोय ना, की कुणाची तरी अधिमान्यता हवी म्हणून स्वत:ला नकोशा वाटणाऱ्या गोष्टीही करतोय, टॉक्सिक माणसांना अतिमहत्व देतोय का? हे प्रश्न मी स्वत:ला विचारले, आणि जाणवलं हो…खरंच बऱ्याचदा आपण लायकी नसलेल्या माणसांचेही आपल्या मनात देव्हारे करून ठेवले आहेत, ते आधी उध्वस्त केले पाहिजेत. तसं करायची सुरुवात केलीही आणि त्यानंतर जी काय मनशांती मिळाली की बास…

तसेच काही माझ्या स्वभावाचेही दोष वा मर्यादा म्हणा पण होते, त्यावर मात्र मला काम करावंच लागणार होतं. एक मोठी मर्यादा म्हणजे दोन वर्षांपुर्वी कुठलीच गोष्ट मला हलक्यात घेता येत नसे. मी लहानपणापासून बरीच गंभीर आणि फटकळ असल्याने मला विनोदही आवडायचे नाहीत. अगदी दोन-तीन वर्षांपुर्वीपर्यंत तर माझी विनोदबुद्धी उणे शून्य असेल. कुणीही माझ्यावर हसलेलं, माझी चेष्टा केलेलं मला खपायचं नाही. मी भांडायचे. च्यायला माझं कौतुक तुम्ही करत नाही, माझ्या अस्तित्वाला अधिमान्यता देत नाही, आणि वर तुम्ही माझी टर कशी काय खेचू शकता…असं मला व्हायचं. टर खेचणं बऱ्याचदा बुलिंगमध्येही परावर्तित व्हायचं. त्याने खूप त्रास व्हायचा. अस्वस्थता, असुरक्षिततेची काजळी सतत मनावर पसरलेली असायची. त्यामुळे कशाकडेही स्वच्छपणे पाहणं मला शक्यच व्हायचं नाही.

अशा सगळ्या गोष्टींनी माझ्या स्वभावात एक प्रकारची कटूताही आली होती. अर्थात इतर बऱ्याच कारणांनी, खूप लहान वयात अनेक कौटूंबिक जबाबदाऱ्या पडल्यानेही माझं मन निबर झालं होतं. हे सगळंच काही हेल्दी असण्याचं लक्षण नाही, याचं काही तरी करायला हवं, अशा अवस्थेत प्रज्ञा मानेचा खूप आधार झाला. तिनं माझ्या समस्यांचं योग्य निदान केलं. बराच काळ थेरपी दिली. तिच्यासोबत अनेक सेशन्स व्हायची, त्यातल्या एक्टीविटीज मी करू लागले. त्याची खूप मदत होत होती. हळहळू आत्मविश्वास वाढत होता. आता मी विनोद, चेष्टा-मस्करी एंजॉय करू लागले होते. पण या कासवगतीनं सुधारणाऱ्या परिस्थितीत खूप आणि ड्रास्टिक म्हणावा असा बदल 2020 पासून व्हायला सुरूवात झाली.

2020 च्या फेब्रुवारीत मी लोकसत्ता सोडल्यानंतर, मार्चमध्ये पंधरा दिवस केरळला फिरायला जायचा प्लॅन केला. अगदी होम स्टे पासून सगळं बुकिंग केलं आणि कोरोनाचा शिरकाव पाठोपाठ लॉकडाऊन लागला. त्यात भरीस भर म्हणून उजवा पाय फ्रॅक्चर झाला, गुडघ्यापर्यंत घातलेलं प्लास्टर दोन महिने होतं. त्यामुळे घरातल्या घरात पण वॉकरशिवाय फिरता यायचं नाही. या काळात कधी नव्हे इतका मला शारीरिक आणि मानसिक आराम मिळाला. आपण काय करतोय..आपलं जगण्याचं उद्दिष्ट आदि क्लिशे पण महत्वाच्या गोष्टींवर खूप विचार करायला, सतत भंजाळलेलं डोकं शांत करून नीट कप्पे करायला वेळ मिळाला. ही पॅनेडमिकची देणगीच म्हणावी लागेल नाहीतर ज्या प्रकारचं माझं आयुष्य आहे, त्यात इतका वेळ मिळणं कधीही शक्य नव्हतं.

या सगळ्यात दोन गोष्टींची खूप मोलाची मदत झाली. एक म्हणजे सायकॉलॉजिस्ट गौरी जानवेकरची सेल्फ मेडिटेशन ही पॉडकास्ट्स आणि दुसरी गोष्ट - ‘टू ब्रोक गर्ल्स’ नावाची अमेरिकन सिटकॉम.

गेलं दीडेक वर्ष मी स्टोरीटेलवर गौरी जानवेकरची पाच-दहा मिनिटांची सेल्फ मेडिटेशन पॉडकास्ट दररोज न चुकता ऐकते. मला ही पॉडकास्ट्स जादूसारखी भासली. (अर्थात हे प्रत्येकालाच लागू पडेल असं नाही) ताणतणाव कसा हाताळावा, यासाठी खूप उपयोगी ठरलं हे. आणि ‘टू ब्रोक गर्ल्स’ ही अमेरिकन सिटकॉम मी पँडेमिकच्या काळात दिवसेंदिवस रात्रनरात्र पाहिली आहे. त्यातल्या मॅक्स ब्लॅक या पात्राचा सदोदित ह्युमरयुक्त वावर, तिचा जगण्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन यामुळे मला इतकी मदत झाली, की खरोखरंच शब्दात सांगणं कठीण आहे. ही आजिबातच ग्रेट वगेरे सीरीज नाही, तरीही दर्जेदार टाईमपास आहे. आयुष्य हाच एक फार्स आहे, हे अत्यंत घासून गुळगुळीत झालेलं वाक्य मीही अनेकदा याआधी ऐकलं होतं, पण ते खरंच तसं असतं नि त्याकडे फार वेगवेगळ्या कोनांतून बघता येतं, विशेषत विनोदाच्या अंगाने…हे ‘टू ब्रोक गर्ल्स’मुळेच साध्य झालं. इतकं की आता वाटतं, आयुष्य आणि मीम यात फार फरक नाही.

प्रश्नाकडे, वास्तवाकडे पाहण्याची पठडीबाज दृष्टी बदलली की जरा वेगळी घुसळण होते, अर्थात या साऱ्यासाठी लागणारं प्रिविलेज आता माझ्यापाशी आहे, हाही भाग आहेच, ते नसलेल्यांना तुम्ही दृष्टी बदला असं सांगणं क्रूरपणा होईल.

यासोबतच आयुष्यातून विखारी, विषारी माणसांना बाहेरचा रस्ता दाखवला. त्यांना हाड म्हणेैपर्यंत खूप भीती होती. एकटं पडू याची..पण नंतर कळलं, जेवढी भीती वाटत होती, तेवढं काही वाईट झालेलं नाही, नवे लोक आयुष्यात येत जातात.

स्वभावात बदल करणं मात्र खूप मेहनतीचं होतं. लवकर झालं, पण त्याकरता आणि मनस्वास्थ्याकरता आणखी काय छोट्या छोट्या गोष्टी केल्या, हे पुढच्या भागात शेअर करीन.

(वरचं शीर्षक सई केसकरच्या 'आरशात पाहताना' या दिवाळी अंकातल्या लेखावरनं सुचलेलं आहे, आपल्या अपीअरन्सवरनं केल्या जाणऱ्या टिका-टिपण्ण्या, बुलिंग इ. गोष्टी आणि त्यातून ती स्वतला कसं पाहते, हे तिनं लिहिलं होतं. तसंच मला माझ्या मानसिक स्वास्थ्याबाबत करावंसं वाटलं. सईचे आभार.)

(या लेखाचा दुसरा आणि अखेरचा भाग आता या लिंकवर वाचता येईल. )

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

टू ब्रोक गर्ल्स खरंच छान आहे.
लेखही मस्त!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तू स्वतःच्या स्वभावाचं विश्लेषण करू शकलीस ही महत्वाची गोष्ट आहे.

But sometimes, finding the right people is also a combination of our state of mind, the circumstances and the things we love to do.
And then you don't have to analyze yourself so much when you are with the right people.

माझ्या लेखाचा उल्लेख केल्याबद्दल आभार! Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भारी लेख आहे. सई केसकरांच्या 'ऐसी...' वरील लेखनाचा पंखा आहे. त्यांच्यासारखेच तुमचेही लेखन प्रांजळ वाटले. धन्यवाद!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काय छान लेख आहे! "आम्हास आम्ही पुन्हा पाहावे, काढुनी चष्मा डोळ्यांवरचा" हा उत्तम सल्ला असला तरी ते जमतंच असं नाही.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

डोळ्यांवरचा चष्मा काढल्याने आपले आपल्यालाच कसे पाहता येईल? त्याकरिता समोर आरसा धरावयास नको काय?

उलटपक्षी, समोर आरसा धरला, तरीही, पाहण्याकरिता जर सामान्यतः चष्मा लागत असेल, तर तो काढून कसे चालेल? त्याने आपले थोबाड दिसलेच (जे मुळात आरसा धरल्यामुळे दिसत आहे, चष्मा काढल्यामुळे नव्हे!), तरी ते धूसर दिसणार नाही काय?

(त्याशिवाय, आरसा जरी समोर धरला, तरी त्याने फक्त आपले थोबाड दिसेल. अगदी फुल-लेंग्थ आरशानेसुद्धा सर्वच (गुह्य?)अंगे-उपांगे तरीही दिसणार नाहीतच – त्याकरिता कदाचित एकाहून अधिक आरशांची योजना करावी लागेल. ते काहीही झाले, तरी आरसा ही निदान एक किमान सुरुवात तरी आहे. चष्मा काढणे हा त्याकरिता पर्याय कसा होऊ शकतो – नि चष्मा काढण्याने नक्की काय साध्य होते – ते कळले नाही.)

थोडक्यात सांगायचे म्हणजे, ही कविमंडळी काय, मागचापुढचा विचार न करता जे काही मनाला येईल ते लिहून जातात. ठोकुनि देतो ऐसा जे. ते कितपत ग्राह्य धरायचे, याचा विचार शहाण्यासुरत्या मनुष्यांनी करावयास नको काय?

(दुसऱ्या शब्दांत सांगायचे, तर, ते सांगतात चष्मा काढा. आम्ही सांगतो चड्डी काढा. त्यांच्या आणि आमच्या सांगण्यातून साधारणतः सारखाच उपयोग आहे – शून्य. शिवाय, आमचे सांगणे अधिक जनांस लागू व्हावे. कारण, चष्मा प्रत्येकासच नसतो. चड्डी घालणाऱ्यांची संख्या तुलनेने अधिक. (चूभूद्याघ्या.))

असो चालायचेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(दुसऱ्या शब्दांत सांगायचे, तर, ते सांगतात चष्मा काढा. आम्ही सांगतो चड्डी काढा. त्यांच्या आणि आमच्या सांगण्यातून साधारणतः सारखाच उपयोग आहे – शून्य. शिवाय, आमचे सांगणे अधिक जनांस लागू व्हावे. कारण, चष्मा प्रत्येकासच नसतो. चड्डी घालणाऱ्यांची संख्या तुलनेने अधिक. (चूभूद्याघ्या.))

a

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आम्ही तर स्वत:स चांगलेच ओळखले आहे, म्हणूनच ते कधी जाहीरपणे लिहिणार नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(तूर्तास माझी श्रेणिप्रदानव्यवस्था बोंबललेली – किंवा बोंबलवलेली – असल्याकारणाने, जाहीर प्रतिसादातून प्रस्तुत श्रेणिप्रदान.)

—————

या नवीन पद्धतीचा सौंदर्यबिंदू म्हणजे, आता मी एकाच प्रतिसादास वाटेल तेवढ्या वेळा श्रेणिप्रदान करू शकतो. शिवाय, माझ्याच प्रतिसादाससुद्धा श्रेणिप्रदान करू शकतो. हं, आता, अनामिक राहून या पद्धतीने श्रेणिप्रदान करता येत नाही, हे खरेच. परंतु, त्याने काय फरक पडतो?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रांजळ आणि मनमोकळा लेख. स्वतःचा स्वभाव बदलणं कष्टाचं आणि कठीण काम आहे, ते तुम्ही करून दाखवलं. Like your spirit.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सुंदर लेख.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

पुढच्या भागात शेअर करीन.

वाट पहाते आहे.
लेख भारी आहे. अगदी सविस्तर आणि मनमोकळं लिहा. खूप सकारात्मकता आहे तुमच्या लेखनात. आणि कृत्रिमपणाचा अभाव. लेख आवडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पुढच्या भागात शेअर करीन.

हे वाचले नव्हते.

(आफत आहे!)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या आत्यंतिक खाजगी माहितीचे मी (एक रँडम वाचक म्हणून) नक्की काय करावे अशी अपेक्षा आहे, हे कळले नाही.

तरी एक बरे आहे, अत्यंत मोघमपणे लिहिलेले आहे. ‘आयुष्याचं स्टिअरिंग हातात आल्याची जाणीव झाली’, वगैरे वगैरे. फारशा तपशिलात वगैरे शिरून लिहिलेले नाहीये.

या तपशीलाच्या एवढ्या जंत्रीत अनेकांना रस नसणार

मुळात आहे कोठे तपशील? (परंतु, नाहीये तेच बरे आहे.)

(बाकी, लोक काय, कशालाही आजकाल ‘वा वा! छान! उत्तम! अत्यंत उपयुक्त!’-टैप्स प्रतिसाद देतात. चालायचेच.)

(आणि, ते डोके, मेंदू, झाड, निळे आकाश, पांढरे पक्षी वगैरे चित्र म्हणजे उगाच.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काहीच नाही न.बा.
म्हणजे लेखिकेने इथे लिहिण्याएवजी सुमेरिअन लोकांप्रमाणे एखादया क्यूनिफॉर्मवर लिहिलं असतं किंवा आपल्या सुबक कव्हर असेलेल्या डायरीत लिहिलं असतं तरीही ते सारखंच थोडी असणार?

स्वत:ला कितीक् प्रामाणिकपणे एखाद्या कागदावर उतरवू शकणं हे एक कठीण काम आहे (मराठीतली शिळी आत्मचरित्रे पाहिली तर हे सहज उमगावं. हे लोक संडासातही कपडे घालूनच हगत असावेत.)

स्वत:ला प्रांजळपणे जोखण्याचा प्रयत्न आवडला. त्याबद्दल लेखिकेला सलाम.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जाहिरात वाटते

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.

(तूर्तास माझी श्रेणिप्रदानव्यवस्था इ. इ.)

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(तूर्तास माझी श्रेणिप्रदानव्यवस्था इ. इ.)

म्हणजे लेखिकेने इथे लिहिण्याएवजी सुमेरिअन लोकांप्रमाणे एखादया क्यूनिफॉर्मवर लिहिलं असतं…

…तर मग ते पुढेमागे आर्कियॉलॉजी विभागाच्या एखाद्या तज्ज्ञाच्या अभ्यासाचा विषय होऊ शकले असतेही कदाचित, परंतु, महत्त्वाची गोष्ट म्हणजे, माझ्या नजरेआड राहिले असते.

…किंवा आपल्या सुबक कव्हर असेलेल्या डायरीत लिहिलं असतं…

सेम पिंच! त्याही परिस्थितीत ते माझ्या नजरेआड राहिले असते.

…तरीही ते सारखंच थोडी असणार?

नाही ना! इथे लिहिले, तर ते माझ्या नजरेत येते. (त्याची गरज काय, हाच तर सवाल आहे.)

स्वत:ला कितीक् प्रामाणिकपणे एखाद्या कागदावर उतरवू शकणं हे एक कठीण काम आहे

आहे ना! नाही कोण म्हणतो?

परंतु, मुळात स्वतःला कागदावर उतरविण्याची गरजच काय, म्हणतो मी. One doesn’t (necessarily, and usually) owe the world an explanation, you know…

मराठीतली शिळी आत्मचरित्रे पाहिली तर हे सहज उमगावं. हे लोक संडासातही कपडे घालूनच हगत असावेत.

उपमा अंमळ रोचक आहे. अगदी चित्रदर्शी!

मात्र, त्याचबरोबर, अगोदरचे ‘कागदावर उतरविण्या’संबंधीचे विधान लक्षात घेता, त्यापुढच्याच वाक्यात या उपमेची ही योजना (जाणीवपूर्वक केलेली नसल्यास) अंमळ दुर्दैवी आहे, असे सुचवू इच्छितो.

(बोले तो, ही मंडळी जर (कपडे घालून का होईना, परंतु) संडासात हगत असतील, तर (तुलनेने) प्रस्तुत लेखिका ही अद्याप ‘कागदावर उतरविण्या’च्या(च) इयत्तेत आहे, असा काही(बाही) अर्थ प्रस्तुत रचनेतून (बहुधा अभावितपणे; चूभूद्याघ्या.) प्रतीत होतो.)

बाकी,

स्वत:ला प्रांजळपणे जोखण्याचा प्रयत्न आवडला. त्याबद्दल लेखिकेला सलाम.

Your funeral, not mine! सबब, आपला पास.

असो चालायचेच.

—————

तळटीपा:

त्यांना काय, वाटेल ते, वाटेल त्या विषयावर, नि वाटेल तसे ओबडधोबड१अ लिहिलेलेसुद्धा चालते – जोपर्यंत (१) दगडात खोदलेले आहे, नि (२) पुरातन आहे१ब, तोपर्यंत.

१अ किंबहुना, निरर्थक असले, तरीही चालते. उदाहरणार्थ, ते मोहेंजोदारोमध्ये त्या तथाकथित चित्राक्षर लिपीत खरडलेलेच घ्या ना! त्यातून काही तरी अर्थबोध होतो काय? परंतु म्हणूनच त्या लोकांना त्यात अधिक रस!

१ब ही अट मात्र महत्त्वाची आहे. आजकाल टूरिष्ट गडांच्या वाटांवर जे वासू-सपना, नाहीतर मह्या <3 निकिता 11-09-2001, वगैरे वगैरे जे ठिकठिकाणी दगडांदगडांतून खोदून ठेवलेले आढळते, त्याकडे ही आर्कियॉलॉजिष्ट मंडळी ढुंकूनसुद्धा पाहायची नाहीत! सांगण्याचा मतलब, प्रस्तुत लिखाण जर क्युनिफॉर्म स्वरूपात लिहून ठेवले, तर, कोण जाणे, काही शे नाहीतर काही हजार वर्षांनंतर एखाद्या आर्कियॉलॉजिष्टास ते सविस्तर वाचावेसे वाटू शकेलही. आजमितीस आम पब्लिक ते न वाचताच किंवा वरवर वाचून जे ‘वा! वा! छान!’-छाप (किंवा, आमच्यासारखा असेल एखादा, तर ‘भिकार!’-छाप) प्रतिसाद देते, त्यापेक्षा ते शतपटीने बरे, नव्हे काय? (हं, आता, लोकांनी लिखाण वाचू नये, फक्त प्रतिसाद द्यावेत, अशीच जर अपेक्षा असेल, तर गोष्ट वेगळी.)

किंवा उत्प्रेक्षा किंवा रूपक, जे काही असेल ते. शाळेत शिकलेले मराठी व्याकरण अंमळ विसरलो. ईश्वर (असलाच, तर) मो.रा. वाळंब्यांच्या आत्म्यास (असलाच, तर) सद्गती देवो.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एखाद्या आत्मचरित्रात्मक लिखाणाकडून माझी एवढीच अपेक्षा आहे की स्वत:बद्दल हातचं काही राखून न ठेवता लिहिता यायला हवं.
जे मराठीत दुर्मिळ किंवा अतिदुर्मिळ आहे.
सहज आठवलं म्हणून नारळीकरांचं आत्मचरित्र (चार नगरांतले माझे जीवन(?)) घ्या. ह्यापेक्षा आकाशगंगेतल्या ताऱ्यांची नावं का नाही लिहिली त्यांनी?
दळवी म्हणतात तसं "आत्मचरीत्र लिहायची ताकद नाही म्हणून आत्मचरित्राऐवजी" लिहिलं.
एकदा तरी स्वत:ला तपासून, कुठलीच भिंगं न लावता स्वत:बद्दल लिहिता यायला पाहिजे - त्यासाठी माणूस साहित्यिक किंवा मोठा असलाच पाहिजे असं नाही. किंबहुना तसा नसलेलाच बरा.

सदर लेखात असं काही सापडायची शक्यता दिसली. त्यासाठी +१. तपशील वाचनीय असतील नसतील.

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रज्ञा माने यांच कवडसा हे माणसे वाचणार अतिशय उत्तम पुस्तक आहे. मला वाटत सायकियाट्रिस्ट मनोज भाटवडेकर यांची प्रस्तावना पुस्तकाला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

म्हणजे, प्रज्ञा माने या एक प्रथितयश, नामवंत मानसशास्त्रज्ञ आहेत तर! (पुण्यामुंबईत, झालेच तर महाराष्ट्रात, तूर्तास ‘कंटेंपररी’ काय आहे, ‘हॅपनिंग’ काय आहे, याबद्दल (अनेक वर्षांच्या थेट संपर्काअभावी) फारशी कल्पना नसल्याकारणाने, हे ठाऊक नव्हते. माय बॅड! असो.)

परंतु मग, त्या परिस्थितीत, प्रस्तुत लेखिकेची प्रज्ञा मानेंशी (जाहीरपणे एकेरीत उल्लेख करण्याइतपत) जानपछान आहे, याहून अधिक कोणती उपयुक्त(?) माहिती प्रस्तुत लेखातून मिळते बरे?

थोडक्यात, एका प्रकारे नेम्सड्रॉपिंगचा प्रकार म्हणावा काय हा?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काही तरी काय नबा!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

प्रज्ञा माने नावाच्या कोणीतरी अस्तित्वात आहेत, एवढेच नव्हे, तर प्रथितयश, प्रख्यात वगैरे आहेत, याबद्दल मला यत्किंचितही कल्पना नव्हती. खरेच! यात अवाक्षरही खोटे नाही.

(फार कशाला, मनोज भाटवडेकर नावाचे कोणीतरी सायकियाट्रिस्ट अस्तित्वात आहेत, हेही ठाऊक नव्हते. नाही, माने काय किंवा भाटवडेकर काय, असतील आपापल्या क्षेत्रांत श्रेष्ठ. मला त्याबद्दल काहीच म्हणावयाचे नाही. परंतु, मला ते माहीत असलेच पाहिजेत, हे काय म्हणून?)

(फार कशाला, एट्नाच्या प्रोव्हायडर डिरेक्टरीतून आमच्या ग्विनेट कौंटीतल्या (किंवा गेला बाजार आमच्या मेट्रो अटलांटातल्या) दहा सायकियाट्रिस्टांची नावे सवडीने काढून देतो. ही सर्व मंडळी आपल्या क्षेत्रात प्रथितयश नसण्याचे काहीच कारण मला दिसत नाही. (मला जरी त्यांची नावे माहीत नसली, तरी. आणि, कशाला माहीत होतील? कधी संबंध आला नाही तर?) या सर्व मंडळींचे नाव तुम्ही ऐकून असलेच पाहिजे, अशी अपेक्षा मी नक्की कोणत्या अधिकाराने करावी?)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ0

मग मनोज भाटवडेकरांचे एका पुनर्जन्माची कथा हे वाचा. तुम्हाला न पटणारी बाजू देखील पहायला मिळेल. तेवढेच ज्ञानप्रकाशात जाता येईल

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

पुस्तकाची ई-प्रत उपलब्ध नाही.

छापील प्रतीची किंमत दीड ते पावणेदोन डॉलरच्या दरम्यान आहे, ती खिशास मुळीच जड नाही खरे तर, परंतु त्यावर साठ डॉलरच्या आसपास शिपिंग चार्जेस मोजण्याची हौस आलेली नाही. तितके शिपिंग चार्जेस तर मी उत्तमोत्तम ग्रंथांनासुद्धा जेथे मोजणार नाही, तेथे ते मोजून मी घरात उगाच विकतची अडगळ नक्की काय म्हणून वाढवू?

सबब, तूर्तास आपला पास. पुढेमागे जर ई-प्रत आली (नि तेव्हा आठवण राहिली), तर तेव्हाचे तेव्हा पाहून घेऊ.

मध्यंतरी “ज्ञानप्रकाशा”स छापावयास जर दुसरे मटीरियल उपलब्ध नसेल, तर ती माझी डोकेदुखी नव्हे. माझा अंत्यविधी तर नव्हेच नव्हे.

असो चालायचेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नेमड्रॉपिंग असले तरी अनुशंगिक(कि आनुशंगिक?) वाटते. बाकीचे बरेच चांगले लिहिले असल्याचे मावैम.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

अनुशांगिक.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पुंबा, फडकेंचा कोश आहे का तुमच्याकडे? छापील प्रत नको असेल तर 'शुद्धलेखन ठेवा खिशात' नावाचं अँड्रॉईड ॲप आहे. (आयफोनसाठी असेल तर मला माहीत नाही.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

(तूर्तास माझी श्रेणिप्रदानव्यवस्था इ. इ.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद! आता हे ॲप घेणे आले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

प्रज्ञा माने मानसशास्त्रज्ञ आहे, हे बरोबरच आहे, वरती घाटपांडे यांनी दिलेला तिच्या पुस्तकाचा संदर्भही बरोबर आहे. मुद्दा असाय की सचिन तेंडुलकर जगातला महान फलंदाज असला तरी, त्याचे मित्र-मैत्रिणी त्याला आदरणीय, महोदय सचिनजी, तेंडुलकरजी असं म्हणत नाहीत.
सबब आमच्याकडेही मित्र - मैत्रीण कितीही मोठे वकील, डॉक्टर, प्राध्यापक, लेखक, दरोडेखोर असले तरी त्यांना अहोजाहो करण्याची पद्धत नाही. अहोजाहो हे आदराचे संबोधन आणि वय हा आदराचा निकष अशी प्राचीन समजूत उत्क्रांतीत आमच्या शेपट्यांबरोबरच गळाली.

कळावे, क्षोभ असावा.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

की तैसी करणे हा मराठी आंजावर लेखन करणार्‍या अनेकांचा जन्मसिद्ध हक्क आहे. "मला काय म्हणायचंय त्याचा अर्थ कळतोय ना? मग विषय संपला" अशी सर्वमान्य धारणा असल्यामुळे ऐसीने फार लोड घेऊ नये

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काय हे! बाबुजींना किती वाईट वाटेल ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काय हे! बाबुजींना किती वाईट वाटेल ?
(पण आधी मला सांगा बाबुजी कोण? प्रमाणलेखनाचा आणि माझा काहीही संबंध नाही. तसा संबंध आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(आमच्या पिढीतले – किंवा खरे तर आमच्या बालपणीचे आणि तारुण्यातले, आणि बहुधा तिरशिंगरावांच्या पिढीतले किंवा कदाचित त्याही पुष्कळ अगोदरचे – गायक होते. तुम्हाला ठाऊक नसतील कदाचित. (सुखी आहात, हे माझे वैयक्तिक मत.) उच्चार चावूनचावून गायचे. परंतु (कदाचित म्हणूनच) भटांच्या आड्यन्समध्ये प्रचंड पॉप्युलर होते. (‘काय स्पष्ट उच्चार आहेत! वा!’))

—————

विकी त्यांचा जन्मसन १९१९ असा देतो. म्हणजे, आमच्या मातुःश्री जेव्हा रांगत होत्या१अ, तेव्हासुद्धा हे चांगले थोराड असणार!१ब

१अ इथल्या पब्लिकला झेपत नाही, एतदर्थ याहून अधिक चित्रदर्शी दाखले देत नाही.

१ब म्हणजे, बहुधा तिरशिंगरावांच्याही अगोदरच्या पिढीतले असणार. (चूभूद्याघ्या.) परंतु चांगले २००२ सालापर्यंत हयात होते. नि निदान आमच्या पिढीपर्यंत तरी लोकप्रिय होते.

नाही, गायक म्हणून अगदीच वाईट नव्हते, परंतु… अंमळ ओव्हररेटेड होते, हे माझे वैयक्तिक मत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बहुधा त्यांना सकाळीसकाळी पिसाळलेला मेक्सिकन, हिस्पॅनिक, लातीनो, किंवा स्पॅनियर्ड चावला असावा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रियांकाजी, लेख आवडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुम्ही स्वतःकडे कसे ही पाहा,स्वतः विषयी काही ही कल्पना करा
लोकांना काही देणेघेणे नसते

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

पते की बात!

(तूर्तास माझी श्रेणिप्रदानव्यवस्था इ. इ.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"मला पाहतांना" या लेखाच्या विषयाशी संबंधित एक कविता (माझी, हे महत्वाचे नाही) टिपण्णी म्हणून "ऐसी"च्या वाचकांशी वाटून(शेअर) घेत आहे.

डोळे न पाहती डोळे आरशाविना
हवे साधन काही जाणाया स्वमना
बुद्धी विचार मनावलंबित
मन चालवी तसे ते चालत
तेणें न होई मन प्रतिबिंबित
त्यासाठी हवा निर्मळ आइना
जिवा-भावाचे सगे-सोयरे
मम मनींचे भले अन् बुरे
ते दाविणे शक्य त्यां खरे
परि ममत्वे मन त्यांचे मलिना
जीवनभरीची सहचारिणी
इतुके मज अनुभवले कोणी?
अडकली स्वामित्व भावनी
कळणे कठिण मग मूळ मना
एकच आशा मित्र जिवलग
मनपैलू त्यां ज्ञात अलग-अलग
कळेल मन जे प्रतीत त्यां मग
या माध्यमे ऊत्सुक हो जाणण्या

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खरे तर तुमचा लेख वाचला आणि आपल्या प्रगती आणि सकारात्मक बदलाबद्दल छान वाटले. परंतु पोष्टाने केवळ लिफापा यावा आणि आतले पत्र गायब असावे तसे काहीसे वाटले. एखादा स्वत:स बदलून टाकणारा प्रसंग किंवा एखाद्या प्रसंगात केलेला वर्तनबदल किंवा एखाद्या व्यक्तीबद्दलची कोणती धारणा कशी बदलली याचे उदाहरण आले असते तर लेखात काही ऐवज मिळाला असता. सगळे लिखाण मोघम म्हणावे असे वाटले. असो. हे माझे मत झाले.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

यांना तपशील पाहिजेत. It takes all sorts to make a world. चालायचेच.

(‘सगळे लिखाण मोघम म्हणावे असे वाटले.’ याच्याशी शतशः सहमत. मात्र, ते तसेच बरे आहे, हे माझे मत झाले. अर्थात, येथे मतभेदाचा मुद्दा असू शकतो.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मराठा मोर्च्याच्या पार्श्वभूमीवर आरक्षणाने नव्हे, तर शिक्षण व स्वतंत्र व्यवसाय उभारण्यातून मराठा युवकांचे प्रश्न सुटू शकतील असे मांडणारा आजचा सुधारक मधील प्रियंका तुपे यांचा स्वानुभव अनुभव : मी मराठा ? त्या वेळी वाचला होता. आज परत शोधला. खास नबा साठी लिंक
अपेक्षित प्रतिकिया
आजचा सुधारक नावाच्या काहीतरी लंगोटी मासिक अस्तित्वात आहेत, एवढेच नव्हे, तर प्रथितयश, प्रख्यात वगैरे आहेत, याबद्दल मला यत्किंचितही कल्पना नव्हती. खरेच! यात अवाक्षरही खोटे नाही.
(फार कशाला, दि.य देशपांडे नावाचे कुणीतरी हे मासिक चालवणारे अस्तित्वात होते , हेही ठाऊक नव्हते. नाही, सुधारक काय किंवा ऐसी अक्षरे काय, असतील आपापल्या क्षेत्रांत श्रेष्ठ. मला त्याबद्दल काहीच म्हणावयाचे नाही. परंतु, मला ते सगळं माहीत असलेच पाहिजेत, हे काय म्हणून?) Lol Lol Lol Lol ROFL Lol Lol Lol Lol

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

सर्वप्रथम, दुव्यातील लेखाबद्दल.

लेख (फॉरअचेंज) चांगला आहे. (कारण, well-formed आहे, त्यात काही नॅरेटिव आहे, काही निश्चित असे सांगायचे आहे, जे सांगायचे ते व्यवस्थित, मुद्देसूद मांडलेले आहे, लेखाचा एकंदर flowही चांगला आहे. कदाचित कोणास लेख inspiringही वाटू शकेल, परंतु तो स्वतंत्र मुद्दा, पूर्णपणे वेगळा. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, लेखाला निश्चित असे काही उद्दिष्ट (‘अजेंडा’ नव्हे!) आहे, नि ते उद्दिष्ट व्यवस्थित, सहज समजून येते. आणि, लेखाचा flow वाचकाची पकड बऱ्यापैकी सहजगत्या घेतो.)

तुलनेने, (याच लेखिकेच्या) प्रस्तुत लेखाबद्दल यापैकी काहीच म्हणावेसे वाटत नाही. हा लेख नक्की का पाडला, यातून नक्की काय साध्य करावयाचे आहे, हे सगळे मला नक्की काय म्हणून सांगितले जात आहे, याचे मी नक्की काय करावे अशी अपेक्षा आहे, याच्याशी माझा काय संबंध, अगदी Why am I supposed to be interested in this, Why is this being inflicted upon me, What have I done to deserve this, इथपर्यंत भलभलते प्रश्न पडू लागतात; निदान, मला तरी पडले. थोडक्यात सांगायचे, तर काहीही ठोस न सांगता लेख all over the place झाला आहे, अशी निदान माझी तरी धारणा झाली.

राहता राहिली गोष्ट ‘आजचा सुधारक’ नि श्री. दि.य. देशपांडे यांची. ‘आजचा सुधारक’ नावाचे काही अस्तित्वात आहे, हे केवळ त्याचा ज़िक्र तुम्ही वारंवार करीत असता, याच कारणास्तव मला ठाऊक आहे. त्याहून खोलात शिरून अधिक तपास करण्याची उत्सुकता, गरज, वा आत्यंतिक निकड मला आजतागायत भासलेली नाही. (तुलनाच करायची झाली, तर ते कोण ते प्रा. अद्वयानंद गळतगे, त्यांच्या कोणत्या त्या महान ग्रंथराजाचा वारंवार उल्लेख मला त्याचे परिशीलन करण्यास उद्युक्त करीत नाही, , तद्वत.) सरतेशेवटी, श्री. दि.य. देशपांडे यांजबद्दल बोलायचे झाले, तर हे नाव यापूर्वी माझ्या ऐकण्यात आलेले नाही, तसे ते माझ्या ऐकण्यात येण्याचे काही कारण आजतागायत घडलेले नाही, आणि, त्यांच्या अस्तित्वाबद्दल मला कल्पना असण्याचेही कोणतेही कारण आजतागायत खरोखरच घडलेले नाही. श्री. दि.य. देशपांडे यांच्या योग्यायोग्यतेबद्दलची ही टिप्पणी अर्थातच नव्हे; कोणत्याही प्रकारे नव्हे.

असो चालायचेच.

—————

तळटीपा:

किंबहुना, त्याचा (वारंवार उल्लेखाचा) जर काही परिणाम झालाच, तर तो मला प्रस्तुत ग्रंथराजापासून शक्य तितके दूर राहण्यास उद्युक्त करण्याकडे होतो, हेही जाता जाता नमूद करणे अप्रस्तुत नसावे.

फॉर द रेकॉर्ड, न्यूटनचे ‘प्रिन्सिपिया मॅथेमॅटिका’, आइनस्टाइनचे सापेक्षतावादावरचे पुस्तक, झालेच तर शेक्सपियरचे ‘हॅम्लेट’ किंवा ‘ज्युलियस सीझर’, फार कशाला, बायबल, भगवद्गीता वा ‘भावार्थदीपिका’ (ज्ञानेश्वरी) यांच्याबद्दलसुद्धा माझी अशीच धारणा आहे. माझ्या सान्निध्यात त्यांच्या वारंवार उल्लेखाने मला त्यांच्यात रस निर्माण होऊन मी ते वाचेन, अशी कोणाची अपेक्षा असल्यास they have another guess coming. किंबहुना, अशा वारंवार उल्लेखामुळे मी ते उभ्या जन्मात वाचण्यापासून कायमस्वरूपी परावृत्त होण्याची शक्यता अधिक. असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेखवजा टिपणावरच्या सगळ्यांच्या प्रतिसादासाठी मनापासून आभारी आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लिखाण आवडलं.

या लेखाचा दुसरा आणि अखेरचा भाग इथे वाचता येईल : https://aisiakshare.com/node/8355

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.