बारह माह / अर्जन दास

शीख लोकांचे ५ वे गुरु, गुरु अर्जन देव दास यांनी लिहीलेले एक 'बारह माह' नावाचे काव्य सापडले. बारा ऋतु आणि विरहीणी म्हणजे ईश्वरापासून (शिव) वियोग झालेली आत्मारुपी वधू (जीव) अशी सांगड आढळते. हा एक पूर्वापार चालत आलेला लोकगीताचा प्रकार असून, ऋतुंचे मूडस आणि विरह ते मीलन असा वधूचा मानसिक प्रवास या गीतात रंगविलेला आहे. निसर्ग आणि अध्यात्मिक पातळीवरील प्रेम असा सुरेख संगम या पौरींमध्ये येतो. विरहाने पोळलेली नववधू शेवटी आपल्या प्रियकरास भेटल्यानंतर तिला मिळालेली असीम शांती व सुख - असे वर्णन येते. प्रत्येक महीन्याचे नाव व वर्णन येत जाते व वाचकास मानसिक स्थित्यंतराची व कधी फळाफुलांचे उमलणे तर कधी धो धो वर्षा, कधी आभाळ भरुन आलेले तर कधी विजांचा कडकडाट, कधी बोचरे वारे तर कधी गुलाबी थंडी अशा ऋतुबदलाची सफर, या काव्यामधुन घडते. विक्रम संवत्सराच्या १२ महीन्यांच्या दिनदर्शिकेचे हे महीने घेतलेले आहेत. चैत्रापासून ते फाल्गुन मासापर्यंत. चैत्र ते माघ असे ११ महीने विरहावस्था आहे तर बाराव्या म्हणजे फाल्गुन महीन्यात मीलनाचे वर्णन आलेले आहे. एकूण ६ ऋतु आहेत - वसंत, ग्रीष्म,वर्षा, शरद, हेमंत आणि शिषीर. प्रत्येक ऋतुचे २ महीने असे १२ महीने.

चैत्र (मार्च/एप्रिल)
वैशाख (एप्रिल/मे)
जेष्ठ (मे/ जून)
आषाढ (जून/जुलै)
श्रावण (जुलै/ऑगस्ट)
भाद्रपद (ऑगस्ट/सप्टेंबर)
अश्विन (सप्टेंबर/ऑक्टोबर)
कार्तिक(ऑक्टोबर/नोव्हेंबर)
मार्गशीर्ष(नोव्हेम्बर/डिसेंबर)
पौष (डिसेंबर/जानेवारी)
माघ(जनेवारी/फेब्रुवारी)
फाल्गुन(फेब्रुवारी/मार्च)

----------------------------------------------------------------------------------

किरति करम के वीछुड़े करि किरपा मेलहु राम ॥
चारि कुंट दह दिस भ्रमे थकि आए प्रभ की साम ॥
धेनु दुधै ते बाहरी कितै न आवै काम ॥
जल बिनु साख कुमलावती उपजहि नाही दाम ॥
हरि नाह न मिलीऐ साजनै कत पाईऐ बिसराम ॥
जितु घरि हरि कंतु न प्रगटई भठि नगर से ग्राम ॥
स्रब सीगार त्मबोल रस सणु देही सभ खाम ॥
प्रभ सुआमी कंत विहूणीआ मीत सजण सभि जाम ॥
नानक की बेनंतीआ करि किरपा दीजै नामु ॥
हरि मेलहु सुआमी संगि प्रभ जिस का निहचल धाम ॥१॥

हे ईश्वरा, आमच्या स्वत:च्याच कर्मांमुळे, कृत्यांमुळे, आम्ही तुझ्यापासून दूर झालो. तू दयाळू म्हणवतोस, आम्हाला तुझी भेट घडव. या मायेच्या मोहाच्या जंजाळामध्ये आम्ही भटकत आहोत. आम्ही थकून आता तुला शरण आलेलो आहोत. ज्याप्रमाणे भाकड गाय दूध देत नाही. ज्या प्रमाणे पाणी न दिलेले शेत सुकते व त्यापासून कोणालाच धनलाभ होत नाही तद्वत, तुझ्या नामस्मरणाविना आमचे आयुष्य व्यर्थ गेलेले आहे. ज्या जीवाच्या हृदयामध्ये ईश्वर वास करत नाही, हृतकमलावरती ईश्वराची स्थापना झालेली नाही त्या जीवाला कोठुन शांती, शीतलता मिळणार? त्याच्याकरता कोणतेही गाव, कोणतेही धाम हे धगधगती भट्टीच आहे. पतीच नसेल तर सर्व दागिने, शृंगार, पान-वीडा सारे व्यर्थ आहे, पतीशिवाय अन्य सगेसोयरे हे शत्रूच आहेत. नानक हीच प्रार्थना सदैव करतात - तुझे नाम माझ्या सतत मुखात राहो. मला सदैव तुझ्या चरणांचा दास बनव. कारण अन्य सारे नश्वर आहे.
पूर्वसंस्कारांच्या परिणामांमुळे, जीव , ईश्वरास विसरतो. पंच इंद्रिये आणि सहावे मन यांच्यापासून निर्माण होणार्या आगीत पोळुन निघतो. आणि मिळालेले अनमोल आयुष्य व्यर्थ दवडतो.

------------------------------------

दुसऱ्या पौरीमध्ये चैत्र मासाचे वर्णन येते. इथुन नववर्षाची सुरुवात झालेली आहे. हा महीना चैतन्यदायी आणि प्रसन्न आहे. त्यामुळे मन तरोताजा व उत्सुक आहे. अशा महीन्यात अर्जन दास जी म्हणतात -

चेति गोविंदु अराधीऐ होवै अनंदु घणा ॥
संत जना मिलि पाईऐ रसना नामु भणा ॥
जिनि पाइआ प्रभु आपणा आए तिसहि गणा ॥
इकु खिनु तिसु बिनु जीवणा बिरथा जनमु जणा ॥
जलि थलि महीअलि पूरिआ रविआ विचि वणा ॥
सो प्रभु चिति न आवई कितड़ा दुखु गणा ॥
जिनी राविआ सो प्रभू तिंना भागु मणा ॥
हरि दरसन कंउ मनु लोचदा नानक पिआस मना ॥
चेति मिलाए सो प्रभू तिस कै पाइ लगा ॥२॥

चैत्र आला आहे आणि बरोबर वसंत ऋतु घेउनच. विविध फुले उमलली आहेत. अशा काळात जर आपण ईश्वराची आठवण ठेवली तर आनंद द्विगुणीतच होइल. परंतु हा आशीर्वाद फक्त पात्र लोकांनाच मिळाणार आहे, ज्यांनी गुरु केलेला आहे. ज्यांनी कोणी ईश्वराचे नामस्मरण करुन, आपल्या जीवनाचे सार्थक करुन घेतलेले आहे, त्यांनाच आनंद मिळू शकेल. अन्य लोक करंटे ज्यांनी मिळालेला मनुष्य जन्म वाया दवडला. जो ईश्वर जल-स्थळ-काष्ठ-पाषाण सार्‍यात निवास करुन असतो तोच जर आपल्या हृदयात वास करत नसेल तर आपल्यासारखे दुर्भागी आपणच. ज्या कोणाच्या मनात ईश्वर वसतो ते साक्षात्कारी लोक आहेत. अशा सर्वव्यापी ईश्वराला भेटण्याकरता, नानक अधीर आहेत, त्यांना तहान लागलेली आहे. जे कोणी मला ईश्वराची भेट घडवुन देतील त्यांच्या पायावरती मी खुषीने लोळण घेइन.
या पौरीमध्ये सत्संग व नामस्मरणाची महती गायलेली आहे.
------------------------------------------------------------------------------
तीसरी पौरी आहे वैशाख महीन्याबद्दल.

वैसाखि धीरनि किउ वाढीआ जिना प्रेम बिछोहु ॥
हरि साजनु पुरखु विसारि कै लगी माइआ धोहु ॥
पुत्र कलत्र न संगि धना हरि अविनासी ओहु ॥
पलचि पलचि सगली मुई झूठै धंधै मोहु ॥
इकसु हरि के नाम बिनु अगै लईअहि खोहि ॥
दयु विसारि विगुचणा प्रभ बिनु अवरु न कोइ ॥
प्रीतम चरणी जो लगे तिन की निरमल सोइ ॥
नानक की प्रभ बेनती प्रभ मिलहु परापति होइ ॥
वैसाखु सुहावा तां लगै जा संतु भेटै हरि सोइ ॥३॥

वैशाख त्याच्याबरोबर घेउन येतो त्या अपेक्षा, इच्छा. ज्या वधू, पतीपासून विरह पावलेल्या आहेत त्यांच्या हृदयाला कोठुन थंडक असणार! असे हे लोक जे ईश्वरास विन्मुख होउन, मायेच्या मागे धावत आहेत. धन, दारा, पुत्र, व्यवसाय काहीच आपल्याला शेवटपर्यंत सोबत करत नाही. फक्त सोबत असते ती आपल्या अंत:करणातील ईश्वराची. पण या वैशाखात सारेजण नश्वर मोहाच्या मागे लागलेले आहेत आणि अध्यात्मिक ऱ्हास होत आहे. मृत्युसमयी, नाम सोडता, बाकी गोळा केलेले काहीही बरोबर घेउन जाता येत नाही. मृत्युपश्चात सर्व जमवलेल्या भौतिक सुखांपैकी कशाचाही उपयोग नसतो. एक नाम सोडले तर अन्य काही बरोबर घेउन जाता येत नाही. माझी प्रार्थना आहे की मला एकदा तरी तुझ्या छबीचे, दर्शन व्हावे. अशा रीतीने, संतसज्जनांची संगत प्राप्त झाली तरच वैशाखातील सृष्टीचा आनंद प्राप्त होउ शकतो.
------------------------------------------------------------------------------

पुढचा महीना म्हणजे तीसरा महीना जेष्ठ. जेष्ठ म्हणजे मोठा, पहीला. नावाप्रमाणेच हा महीना मोठा असतो म्हणजे रात्री लहान असतात आणि दिवस मोठे असतात. या महीन्याचे वर्णन येते चवथ्या पौरीत -

हरि जेठि जुड़ंदा लोड़ीऐ जिसु अगै सभि निवंनि ॥
हरि सजण दावणि लगिआ किसै न देई बंनि ॥
माणक मोती नामु प्रभ उन लगै नाही संनि ॥
रंग सभे नाराइणै जेते मनि भावंनि ॥
जो हरि लोड़े सो करे सोई जीअ करंनि ॥
जो प्रभि कीते आपणे सेई कहीअहि धंनि ॥
आपण लीआ जे मिलै विछुड़ि किउ रोवंनि ॥
साधू संगु परापते नानक रंग माणंनि ॥
हरि जेठु रंगीला तिसु धणी जिस कै भागु मथंनि ॥४॥

सर्वजण ईश्वराच्या पाया पडतात आणि या जेष्ठ महीन्यात आपणही ईश्वरचरणी माथा टेकविला पाहीजे. आणि आपण जर प्रभुचरण घट्ट धरले तर यमाचा फासही आपल्याभोवती पडू शकणार नाही. यमाच्या त्रासापासून आपली सुटका निश्चित आहे. लोक रत्ने, हीरे, मोती, जवाहर, माणिक सारे काही जमवितत व नंतर चोरीची भीती बाळगतात. पण देवाचे नाव हे असे मौल्यवान धन आहे ज्याची चोरी होऊ शकत नाही. या जगातील नानविध आश्चर्ये, सौंदर्य हे नामामुळे द्विगुणीतच होइल. हेही लक्षात घेतले पाहीजे ईश्वराचे पाईक , ईश्वराच्या मर्जीशिवाय काहीही करत नाहीत. त्याला रुचेल असेच ते वागतात. ईश्वराची स्तुती आपल्याला सन्मानच देईल. परंतु ईश्वर प्राप्ती ही फक्त आपल्या स्वत:च्या इच्छेने व प्रयत्नांनीच साध्य होत नाही. कारण तसे असते तर मग अनेक जीव ईश्वर वियोगात दु:खी कष्टी झालेच नसते. हे नानक, ज्यांना गुरुची प्राप्ती झाली त्यांनाच केवळ ईश्वरप्राप्ती होऊ शकते. आणि अशा लोकांचेच भाग्य उजळेल व त्यांना जेष्ठ महीना आनंददायक जाइल. ते ईश्वरास प्राप्त करुन घेतील.
अशा रीतीने या पौरीमध्ये अर्जनदासजी नामस्मरण व गुरुप्राप्तीचे महत्व विषद करतात. जे कोणी नामस्मरण करतात त्यांना इह लोकी व परलोकी सन्मानाचे आयुष्य मिळू शकते.

आता जो महीना येतो तो आहे आषाढाचा. पाचव्या पौरीमध्ये या महीन्याचे वर्णन येते. हा महीना फारसा सुखद नसतो. असह्य दमटपणा हवेत असल्याने उकडते. त्यामुळे ऐहिक व अध्यात्मिक अस्वस्थता दाटुन येते.

आसाड़ु तपंदा तिसु लगै हरि नाहु न जिंना पासि ॥
जगजीवन पुरखु तिआगि कै माणस संदी आस ॥
दुयै भाइ विगुचीऐ गलि पईसु जम की फास ॥
जेहा बीजै सो लुणै मथै जो लिखिआसु ॥
रैणि विहाणी पछुताणी उठि चली गई निरास ॥
जिन कौ साधू भेटीऐ सो दरगह होइ खलासु ॥
करि किरपा प्रभ आपणी तेरे दरसन होइ पिआस ॥
प्रभ तुधु बिनु दूजा को नही नानक की अरदासि ॥
आसाड़ु सुहंदा तिसु लगै जिसु मनि हरि चरण निवास ॥५॥

आषाढातील गर्मी त्या जीवरुपी वधूंना असह्य होते ज्या आपल्या पतीस विसरलेल्या आहेत. आपल्या ईश्वररुपी पतीस विसरुन अन्य लोकांवरती विसंबणाऱ्या या वधूंना उकाडा सहन होत नाही. अस्वस्थ वाटत रहाते. ईश्वरास विसरुन अन्य लोकांवर अधिक विश्वास टाकणे हे अधर्मी आहे आणि यमाच्या फंद्यास आमंत्रण आहे. जे स्वत: नश्वर आहेत ते इतरांना मदत काय करणार तेव्हा अशा नश्वरतेच्या मागे लागणे शहाणपणाचे नाही. आणि अशा जीवांच्या भाळी फक्त अवहेलना लिहीलेली असते. या लोकांना पश्चात्तापाशिवाय अन्य काहीही मिळत नाही. आणि शेवटी हृदय विदीर्ण होउनच असे लोक जगाचा त्याग करतात, मृत्यूस सामोरे जातात. याउलट गुरुस शरण गेलेले लोक इह व पर लोकातही सन्मान पावतत. देवा मला सतत तुझी भक्ती दे, तुझ्या प्राप्तीच्या इच्छेत मला आनंद दे. तुझ्याशिवाय मी कोणाला शरण जाउ? अशा रीतीने ईश्वरास शरण गेलेल्या जीवास आषाढाचा उष्ण महीनाही बिना कष्टाचा जातो. आणि बाह्य जगातील घडामोडींचा त्यांच्यावर शून्य परिणाम होतो.

----------------------------------------------------

सहावी पौरी आहे श्रावण म्हणजे पाचव्या महीन्याबद्दल. या महीन्यात मान्सून येतो. वातावरण परत एकदा शीतल आणि आल्हाददायक बनते परंतु वीजांच्या कडकडाटामुळे, ढगांच्या गडगडाटामुळे भीतीही वाटते. आणि याच भीतीचा उपयोग अर्जन दास यांनी त्यांच्या काव्यात वियोगी आत्म्याकरता करुन घेतलेला आहे. हा महीना कवि, तत्वज्ञच काय पण शेतकर्‍यां करताही महत्वाचा महीना आहे.

सावणि सरसी कामणी चरन कमल सिउ पिआरु ॥
मनु तनु रता सच रंगि इको नामु अधारु ॥
बिखिआ रंग कूड़ाविआ दिसनि सभे छारु ॥
हरि अम्रित बूंद सुहावणी मिलि साधू पीवणहारु ॥
वणु तिणु प्रभ संगि मउलिआ सम्रथ पुरख अपारु ॥
हरि मिलणै नो मनु लोचदा करमि मिलावणहारु ॥
जिनी सखीए प्रभु पाइआ हंउ तिन कै सद बलिहार ॥
नानक हरि जी मइआ करि सबदि सवारणहारु ॥
सावणु तिना सुहागणी जिन राम नामु उरि हारु ॥६॥

ज्याप्रमाणे धरित्री हिरवागार शालू नेसते, निसर्ग टवटवीत होउन तरारुन उठतो त्याप्रमाणेच या शिवापासून, वियोग पावलेल्या जीवाची भक्ती उचंबळून येते आणि प्रभुचरणांशी लीन होते. ज्याप्रमाणे निसर्ग हिरवा रंग परीधान करतो त्याचप्रमाणे जीवही ईश्वरभक्तीचा रंग धारण करतो. प्रेममय होउन जातो. त्याचे नाम हाच भक्तांकरता आधार बनतो. नश्वर मायेचा रंग त्याच्याकरता फिका पडतो. माया मिथ्या आणि राख वाटू लागते. पावसाच्या थेंबाथेंबाप्रमाणे, भक्ताचे मन ईश्वराच्या भक्तीरुपी अमृतमयी थेंबाकरता आचवते. परंतु गुरु भेटल्याशिवाय हे अमृतपान भक्त करु शकत नाही. गुरु भेटल्यानंतर, गुरुने सांगीतलेला प्रत्येक शब्द भक्तांकरताभामृततुल्य होतो. ज्या ईश्वराने सार्‍या चराचरात चैतन्याची उधळण केली त्याला भेटण्याकरता, माझे मन व्याकुळते. परंतु फक्त ईश्वराच्या मनात असेल ते भक्तच त्याच्या चरणांपाशी लीन होउ शकतात. त्याकरता ईश्वरी संकल्पच हवा. परत परत मी सच्या, साधू, गुरुंच्या पायी माथा नहारि, त्यांना शरण जातो ( बलिहारी) हे नानक त्या गुरुंच्या शब्दाश्ब्दाला सलाम, नमस्कार , नमन ज्या शब्दांमुळे माझे जीवन धर्मपथावर येउ शकते (मला धर्मलक्ष्मी प्राप्त होउ शकते). या श्रावणात नामस्मरण करणार्‍या , नामची माळ सतत कंठी गुंफणार्‍या, भक्तांच्या आशा पल्लवित होतात.
य अपौरीमध्ये नाम आणि गुरु यांची महती आणि आल्हाददायक श्रावणाची सांगड येते. नवजीवन, नवीन आशा पल्लवित होते.

भादुइ भरमि भुलाणीआ दूजै लगा हेतु ॥
लख सीगार बणाइआ कारजि नाही केतु ॥
जितु दिनि देह बिनससी तितु वेलै कहसनि प्रेतु ॥
छडि खड़ोते खिनै माहि जिन सिउ लगा हेतु ॥
हथ मरोड़ै तनु कपे सिआहहु होआ सेतु ॥
जेहा बीजै सो लुणै करमा संदड़ा खेतु ॥
नानक प्रभ सरणागती चरण बोहिथ प्रभ देतु ॥
से भादुइ नरकि न पाईअहि गुरु रखण वाला हेतु ॥७॥

सहावा महीना भाद्रपद पाहू यात. हा महीना महत्वाचा आहे. या महीन्यात सॄष्टीमध्ये संक्रमण घडते आहे. २ ऋतु अधोरेखित होत आहेत. कधी पावसाच्या धारा तर कधी दमट-उकाडा जाणवतो आहे. हा जो दुहेरी सृष्टीरंग आहे त्याचा भक्ताच्या मनावरही परीणाम होतो आहे. उकाड्यात, दमट हवेत, जीवास अस्वस्थता वाटते आहे. भक्ताची अशी अवस्था तर ज्या कोणास ईश्वराची ओढ अजुनी लागायची आहे असे अभक्त मायेच्या वाटेवर जात आहेत, हरवत आहेत. नानाविध दागिने , पोषाख ते भले परिधान करोत, ते सर्व व्यर्थ आहे. शरीरच नश्वर असल्याने जेव्हा रहाणार नाही तेव्हा या सोसाचा काय उपयोग? सगेसोयरे त्यागच करतील. जेव्हा यमदूत मनुष्याला बोलावणे धाडतील तेव्हा ते गंतव्य स्थानाचा, पत्ता थोडीच सांगणार आहेत? एका क्षणात माया-ममता सारी बंधने गळून पडतील कोणीही बरोबर येणार नाही. मृत्युसमयी पश्चात्ताप करुन काय उपयोग! शरीर जरजर झालेले, थकलेले असेल. रंग उडून जाइल. चेहरा कधी पांढरा फट्ट तर कधी वेदनेने काळानीळा पडेल. शरीर हे कर्मक्षेत्र आहे, जे काही पेराल ते उगवेल. हे नानक, जे कोणी गुरुंवरती श्रद्धा ठेवतील, गुरुंवरती प्रेम करतील ते लोक नरकापासून वाचतील. केवळ गुरुच त्यांना ईश्वरापर्यंत पोचवु शकतील. गुरुरुपी जहाजामधून हा भवसागर ते तरुन जातील.
या पौरीमध्ये अशा रीतीने, पेराल्क ते उगवेल हा संदेश तर दिलेलाच आहे परंतु भौतिक सुखाची क्षणभंगुरताही विषद केलेली आहे. चांगली कर्मे, उत्तम आचरण, ईश्वरभक्ती या मूल्यांचे उदात्तीकरण आढळते.

-------------------------------------------------------------------------

भाद्रपदानंतर येतो अश्विन महीना. भाद्रपदात सुरु झालेली थंडी आता जोर धरु लागलेली आहे. उकाडा व दमटपणापासून जरा सुटका मिळते आहे. गुलाबी थंडी जाणावते आहे. हवा शीतल व आल्हाददायक होते आहे. आठव्या पौरीमध्ये अर्जनदास काय म्हणतात ते पाहू यात. -

असुनि प्रेम उमाहड़ा किउ मिलीऐ हरि जाइ ॥
मनि तनि पिआस दरसन घणी कोई आणि मिलावै माइ ॥
संत सहाई प्रेम के हउ तिन कै लागा पाइ ॥
विणु प्रभ किउ सुखु पाईऐ दूजी नाही जाइ ॥
जिंन्ही चाखिआ प्रेम रसु से त्रिपति रहे आघाइ ॥
आपु तिआगि बिनती करहि लेहु प्रभू लड़ि लाइ ॥
जो हरि कंति मिलाईआ सि विछुड़ि कतहि न जाइ ॥
प्रभ विणु दूजा को नही नानक हरि सरणाइ ॥
असू सुखी वसंदीआ जिना मइआ हरि राइ ॥८॥

विरही जीव म्हणतो आहे दमट , उकाड्याच्या भाद्रपदानंतर आता या गुलाबी थंडीत माझ्या प्रियकरावाचून मला करमेनासे झालेले आहे. त्याला भेटायची ओढ माझ्या मनात व्याकुळ होते आहे. माझ्या तनामनाची तहान आणि तगमग आता फक्त प्रियकराच्या भेटीनेच शांत होइल. कोणी तरी मला माझ्या नाथाची भेट घडवुन द्या. मी ऐकून आहे की संतसज्जनांच्या सहवासानेच माझा ईश्वर मला भेटू शकणार आहे. आता मला त्यांच्या पायी शरण येण्या खेरीज अन्य मार्ग दिसत नाही. माझ्या पतीशिवाय आता मला अन्य कुठेही शांती मिळेलसे वाटत नाही. एकदा का ईश्वराच्या भेटीची आस भागली, त्याला एकदा जरी भेटले तरी मग इहलोक तुच्छ वाटू लागतो असे मी ऐकून आहे. आणि मग असे संत फक्त एकच मागणे देवाकडे मागतात आता आम्हाला तुझा दुरावा सहन होणार नाही. आम्हाला दूर लोटू नकोस. आम्हाला चिरविश्रांती फक्त तुझ्या पायाशीच प्राप्त होउ शकते. आमचे मन आता जगात लागत नाही. ज्या विरही जीवांवरती ईश्वर दयेचा वर्षाव करतो अशाच विरहीणि अश्विन महीन्यात मनःशांती मिळवतात. अन्य सारे विरहाग्नीत पोळूनच निघतात.
अश्विन महीन्यात जीवाचा, विरही भाव फार टोकदार झाल्याचे जाणवते. म्हणजे बाह्य जगात थंडी असली तरी विरहाग्नीमध्ये विरहीण पोळते आहे. या महीन्यात अर्जनदासजी हेच अधोरेखित करतात की संत साधू सज्जनांना शरण जा.

कतिकि करम कमावणे दोसु न काहू जोगु ॥
परमेसर ते भुलिआं विआपनि सभे रोग ॥
वेमुख होए राम ते लगनि जनम विजोग ॥
खिन महि कउड़े होइ गए जितड़े माइआ भोग ॥
विचु न कोई करि सकै किस थै रोवहि रोज ॥
कीता किछू न होवई लिखिआ धुरि संजोग ॥
वडभागी मेरा प्रभु मिलै तां उतरहि सभि बिओग ॥
नानक कउ प्रभ राखि लेहि मेरे साहिब बंदी मोच ॥
कतिक होवै साधसंगु बिनसहि सभे सोच ॥९॥

कार्तिक आहे आठवा महीना आणि या महीन्याचे वर्णन करणार्‍या नवव्या पौरीत गुरु अर्जनदास म्हणतात -
या आल्हाददायक, मनोहर कार्तिक महीन्यात जर एखादा जीव , ईश्वरापासून विलग असेल तर तो केवळ त्याच्या स्वतःच्या कर्मामुळे. कार्तिक महीन्यात देवभक्तीस पराड्मुख होणे हे निव्वळ करंटेपणाचे लक्षण आहे. आणि अशा व्यक्तीच्या भविष्यात संकटे, अडचणी, दु:खे ही अनिवार्य आहेत. या जन्मी जर तुम्ही ईश्वर भक्ती केली नाहीत तर अनेक जन्म त्रास आणि विरहच भोगावा लागेल. मग अन्य कोणाची मध्यस्ती चालणार नाही. आणि या जन्मीच्या करंटेपणामुळे पुढील अनेक जन्म विरह सहन करावा लागेल. परंतु जर सुदैवाने प्रत्यक्ष देवाने कृपा केली तरच हे दु:ख हरण होउ शकेल. नानक प्रार्थना करतात - या मायेपासून आम्हाला मुक्ती दे. आमचे कल्याण कर. जर या महीन्यात तुम्हाला सत्संगती लाभली तर मात्र विरहाच्या पोळण्यातून तुम्हाला आराम मिळू शकेल.
या पौरीमध्ये गुरु हेच सांगतात की ईश्वराच्या मर्जीनेच सत्संगतीची प्राप्ती होते. तिथेही ईश्वरी संकल्पच जरुरी असतो.

----------------------------------------------

कार्तिक महीन्यानंतर येणारा मार्गशीर्ष, कडाक्याची थंडी घेउन येतो. हिवाळा ऐन भरात आहे. अर्जन दास म्हणतात -

मंघिरि माहि सोहंदीआ हरि पिर संगि बैठड़ीआह ॥
तिन की सोभा किआ गणी जि साहिबि मेलड़ीआह ॥
तनु मनु मउलिआ राम सिउ संगि साध सहेलड़ीआह ॥
साध जना ते बाहरी से रहनि इकेलड़ीआह ॥
तिन दुखु न कबहू उतरै से जम कै वसि पड़ीआह ॥
जिनी राविआ प्रभु आपणा से दिसनि नित खड़ीआह ॥
रतन जवेहर लाल हरि कंठि तिना जड़ीआह ॥
नानक बांछै धूड़ि तिन प्रभ सरणी दरि पड़ीआह ॥
मंघिरि प्रभु आराधणा बहुड़ि न जनमड़ीआह ॥१०॥

कडाक्याच्या थंडीच्या मार्गशीर्ष महीन्यात पतीजवळ असलेली स्त्री सुंदर भासते. अशा वधू ज्या त्यांच्या पतीसमवेत आहेत त्या सर्वाधिक सुंदर दिसतात, त्यांच्या रुपगुणाचे वर्णन करण्यास शब्द असमर्थ ठरतात. संतसज्जानांच्या सहवासात ईश्वरभक्तीत रममाण होणारे भाविक लोक लोभस दिसत आहेत. परंतु ज्या लोकांना संतसंगतीच प्राप्त झालेली नाही त्यांची अवहेलना होते. तीळाच्या वाळक्या रोपट्यासारखे बिन मालकाचे असे हे अभक्त आहेत. असे अभक्त जेव्हा सत्संगतीवीण दिवस कंठतात तेव्हा त्यांच्यावरती अनेक दुर्गुण झडप घालतात. आणि अशा दुर्गुणांनी आधीच त्रास पावलेले हे लोक शिवाय यमाच्या फासात अडकतात. पण ज्या वधूंना त्यांच्या पतीची प्राप्ती झालेली आहे त्या वधू स्वतःला कटाक्षाने या दुर्गुणांपासून दूर ठेवतात. रत्नमाळांऐवजी, ईश्वराच्या नामाचीच माळ गळ्यात परीधान केलेल्या या जीवरुपी वधूंपाशी कोणतेही संकट अथवा दुर्गुण फिरकायचे धाडस करत नाहीत. नानक अशा संतांच्या पायधूळीची सुद्धा पूजा करु इच्छितात जे संत सदैव ईश्वरचरणी रुजू असतात. मार्गशीर्ष महीन्यात केलेले नामस्मरण , व्यक्तीचा जन्ममरणाचा फेरा चुकविते.
या पौरींमध्ये अर्जन दास जी यांनी दुर्गुण, मोह-ममता आष्डरिपूंपासून दूर रहाण्याकरता, सत्संगाची महती गायली आहे.

पोखि तुखारु न विआपई कंठि मिलिआ हरि नाहु ॥
मनु बेधिआ चरनारबिंद दरसनि लगड़ा साहु ॥
ओट गोविंद गोपाल राइ सेवा सुआमी लाहु ॥
बिखिआ पोहि न सकई मिलि साधू गुण गाहु ॥
जह ते उपजी तह मिली सची प्रीति समाहु ॥
करु गहि लीनी पारब्रहमि बहुड़ि न विछुड़ीआहु ॥
बारि जाउ लख बेरीआ हरि सजणु अगम अगाहु ॥
सरम पई नाराइणै नानक दरि पईआहु ॥
पोखु सोहंदा सरब सुख जिसु बखसे वेपरवाहु ॥११॥

पौष महीन्यात थंडीचा कडाका इतका वाढतो की जनजीवन ठप्प होते. सर्व लोक घरात, ऊबेत दडून बसतात. बाहेर पडत नाहीत. तेव्हा अशा पौष महीन्याबद्दल बोलताना अर्जन दास म्हणतात - जे लोक तनामनाने ईश्वरचरणी रुजू झालेले आहेत, त्यांना गारठा बाधत नाही, त्यांना थंडीचा त्रास होत नाही. असे लोक कोणत्याच मोहाच्या , दोषांच्या आहारीही जात नाहीत त्यांना आस असते ती फक्त प्रभुचरणाची. ईश्वराचे चरण हेच त्यांचे सर्वस्व असते त्यांना ईश्वरचरणाची फक्त ओढ असते. मायेचे आवरण त्यांना ना बाधू शकते ना विघ्न घालते. फक्त गोविंद-गोपाळ अर्थात ईश्वराची स्तुती हे त्यांचे ध्येय रहाते. असे ईश्वरभक्त काही औरच माझा त्यांना लाख लाख दंडवत. हे नानक परमात्म्याच्या द्वारी तिष्ठत असलेले हे जीव फक्त सद्गतीच पावतात. पौष महीना ईशरी कृपा ज्यांवरती झाली अशा लोकांना आरामदायी व शांतपूर्ण जातो.

------------------------------------------------------------

माघि मजनु संगि साधूआ धूड़ी करि इसनानु ॥
हरि का नामु धिआइ सुणि सभना नो करि दानु ॥
जनम करम मलु उतरै मन ते जाइ गुमानु ॥
कामि करोधि न मोहीऐ बिनसै लोभु सुआनु ॥
सचै मारगि चलदिआ उसतति करे जहानु ॥
अठसठि तीरथ सगल पुंन जीअ दइआ परवानु ॥
जिस नो देवै दइआ करि सोई पुरखु सुजानु ॥
जिना मिलिआ प्रभु आपणा नानक तिन कुरबानु ॥
माघि सुचे से कांढीअहि जिन पूरा गुरु मिहरवानु ॥१२॥

माघ महीन्यात हिंदूंमध्ये प्रयाग आदि तीर्थक्षेत्रात स्नान महत्वाचे समजले जाते. गुरु अर्जन दास जी म्हणतात - सत्संगत प्राप्त करा. तीर्थक्षेत्री जाउन केलेल्या स्नानाचे फळ तुम्हाला सज्जन, साधू संताम्च्या सहवासातच लाभेल. अशा संत सज्जनांचय चरणधूळीत स्नान करा अर्थात त्यांची भेट घ्या, त्यांचे विचार ऐका, आचरणात आणा. अनेक जन्मांच मळ आनि कुसंस्कारांची वासनांची मनावरील पुटे दूर होतील. अहंकार, गर्व, मी-मी-मी पणा यांना तिलांजली मिळेल. नामस्मरण केल्यानेच काम, लोभ, क्रोध अशा दोषांच्या जाळ्यात आपण फसणार नाही. आणि धर्माचरणामुळे इहलोकातही मानच मिळेल. फक्त नामस्मरण केल्याने ६८ तीर्थक्षेत्रांत स्नान केल्याचे पुण्या प्राप्त होइल. हे नानक, असे जीव ज्यांनी ईश्वरास प्राप्त केलेले आहेत त्यांना माझे शतकोटी प्रणाम. फक्त असेच जीव जे की गुरूंनी दाखविलेल्या मार्गावर अथक चालत आहेत, या माघ महीन्यामध्ये (स्नान न करताही) पुण्यवान झालेले आहेत.

बारावा व शेवटचा महीना आहे फाल्गुन. हा महीना २ शब्द जोडुन बनलेला आहे फळ + गुण अर्थात या महीन्यात जीवास त्याने आतापर्यंत केलेल्या नामस्मरनाचे, सत्संगाचे, धर्माचरणाचे, भकसद्गि, सद्गुणांचे फळ प्राप्त होते तो महीना.

फलगुणि अनंद उपारजना हरि सजण प्रगटे आइ ॥
संत सहाई राम के करि किरपा दीआ मिलाइ ॥
सेज सुहावी सरब सुख हुणि दुखा नाही जाइ ॥
इछ पुनी वडभागणी वरु पाइआ हरि राइ ॥
मिलि सहीआ मंगलु गावही गीत गोविंद अलाइ ॥
हरि जेहा अवरु न दिसई कोई दूजा लवै न लाइ ॥
हलतु पलतु सवारिओनु निहचल दितीअनु जाइ ॥
संसार सागर ते रखिअनु बहुड़ि न जनमै धाइ ॥
जिहवा एक अनेक गुण तरे नानक चरणी पाइ ॥
फलगुणि नित सलाहीऐ जिस नो तिलु न तमाइ ॥१३॥

थंडीनंतर येतो फाल्गुन - रंगांची उधळण करणारा महीना. या महीन्यात होळी येते तसेच ज्या जीवरुपी वधूंनी सतत ईश्वराचे स्मरण केलेले आहें त्यांच्या हृदयात सत्चितानंद फुलण्याचा हा महीना आहे. आतावरच्या, संतांच्या संगतीचे, फळ मिळण्याचा महीना. इच्छा तृप्तीचा महीना. हा महीना उत्सवी आहे, लाभदायक, मोक्षदायक आहे. या वधूंना त्यांच्या पतीची प्राप्ती झालेली आहे. आणि जीवाचे जन्ममृत्यूचे फेरे वाचलेले आहेत. हे नानक आपल्याला एकच मुख आहे पण ईश्वराचे गुण अगणित आहेत. त्यांचे वर्णन आपल्या मर्यादेबाहेरचे आहे. त्याचा जयजयकार करु यात.
------------------------------------------------

बारह माह मांझ ची पुढील शेवटची पौरी. यामध्ये सारांश आहे. नामस्मरण, सत्संग, गुरुकृपा , दोषमुक्त रहाणे, मायेपासून दूर रहाणे हेच यातही आहे.

जिनि जिनि नामु धिआइआ तिन के काज सरे ॥
हरि गुरु पूरा आराधिआ दरगह सचि खरे ॥
सरब सुखा निधि चरण हरि भउजलु बिखमु तरे ॥
प्रेम भगति तिन पाईआ बिखिआ नाहि जरे ॥
कूड़ गए दुबिधा नसी पूरन सचि भरे ॥
पारब्रहमु प्रभु सेवदे मन अंदरि एकु धरे ॥
माह दिवस मूरत भले जिस कउ नदरि करे ॥
नानकु मंगै दरस दानु किरपा करहु हरे ॥१४॥

-समाप्त-

------------------------------------------------

साभार - https://www.researchgate.net/publication/330839750_Quest_for_Ultimate_Tr...

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet