राधा विलास

कितीही समजवा, कितीही हाकला, पण ती वृद्धा काही मुख्य द्वारामधुन जायचे नाव घेत नव्हती. विशाखाने तिला समजावले, ललीतेने धमकावले, सुचित्राने त्या वृद्धेला काही धन देऊ केले पण नाही. तिचा हट्ट एकच राधाराणीला भेटू द्या.

बरं कृष्णबाधेने पीडीत, विरहव्याकुळ, राधेची तब्येतही आज नरमगरम होती. तिला फणफणुन ज्वर चढला होता. तिचे चंद्राच्या चांदण्यासारखे गौर आणि तेजस्वी मुख आज पार म्लान होउन काळवंडुन गेले होते. तिचे ना चित्त थाऱ्यावर होते ना तिला कोणालाही भेटायची इच्छा होती. किती दिवस झाले तिचा कपटी कान्हा तिला भेटायलाच आला नव्हता. ही कोणती थट्टा. संध्याकाळ झाली आणि आकाशात पहीली चांदणी उगवली की राधा आतुरतेने प्रत्येक दिवशी सजुन सौधावर कान्ह्याची भेट घेण्याकरता जात होती परंतु गेले सात दिवस कान्हा मुळी फिरकलाच नव्हता. काय त्याच्या मनात होते नकळे. बरं राधेच्या सखींना देखील तो ताकास तूर लागू देत नव्हता. बित्तंबातमी काढायला गेलेली प्रत्येक सखी दररोज काहीच बातमी न आणता माघारी फिरत होती. असं कोणी करतं का? रोज सौधावरती भेटण्याचा नियम मोडून ते मोडून परत काही न झाल्यासारखे कान्हा रोज गाई चरायला नेतच होता. त्याला जाऊन भेटणार कशी राधा! तिच्यावरही बंधने होतीच की.

त्यात ही वृद्धा हट्ट धरुन बसली होती की ती राधेला भेटल्याखेरीज हलणारच नाही. का तर म्हणे ती राधेच्या पायावरती गोंदण रेखू इच्छित होती. आणि राधेच्या ज्वरावरती ते शीतल गोंदण उपयोगी ठरेल असा तिचा ठाम विश्वास होता. ती म्हातारी धमकावुनही दाद देइना शेवटी द्वारपालांचा आवाज चढलेला ऐकून राधाच गवाक्षात येउन डोकावुन पाहू लागली की हा इतका गोंधळ कशाबद्दल चालला आहे. राधा गवाक्षात येताच वृद्धेने राधेला अभिवादन केले व ती म्हणाली - "राधाराणी आपल्या देहावरती चंदनाचा शीतल लेप माझ्याकडुन लाउन घ्या. आपल्या सुंदर पावलांवरती गोंदण काढुन घ्या. आपल्याला त्वरीत आराम पडेल. माझे वचन आहे. माझा शब्द आहे. आणि माझ्याकडे खास बातमीही आहे" हां ही मात्रा मात्र बरोबर लागू पडली. या वृद्धेकडे खचितच कान्ह्याविषयी काही बातमी असावी असे राधेस वाटू लागले. नाही. तिला खात्रीच पटली म्हणा ना. बुडत्याला काडीचा आधार या न्यायाने, राधेने विचार केला पाहू तरी काय म्हणते ही म्हातारी. म्हणे काही खास गुपित आहे. माझ्या कान्ह्याशिवाय कोणताही विषय, कोणतीही बातमी कवडीमोलाची आहे - हे हिला कसे कळावे. पण जर हिच्याकडे त्याच्याबद्दल माहीती असेल तर? मी कशी हाकलू तिला. माझ्यासारखी अवलक्षणी मीच नाही का ठरणार!

वृद्धा हळुहळू सोपान चढून, राधेच्या शयनमहाली आली. विचित्रच् होती ती. तिची अट काय तर म्हणे राधेला एकांतातच भेटणार आणि ते गुपितसुद्धा एकांतातच सांगणार. सख्यांनी बाहेर जावे. यावरती राधेला हसूच आले. ज्या सख्यांपासून राधेचे कोणतेही गुपित लपले नाही, राधेचा स्वभाव, तिचा प्रत्येक मूड, आवडनिवड ज्या सख्या पूर्ण ओळखून होत्या त्यांचा भला कसला अडसर? पण वृद्धा हट्टी होतीच. ते आतापावेतो तिच्या वागण्यातून दिसतच होते. शेवटी गुपिताच्या आशेने राधेने सर्व सख्यांना बाहेर जाण्याचे फर्मान सोडले.

राधेच्या केशसंभारावरुन आपले खरबरीत आणि उबदार हात फिरवीत वृद्धा बोलती झाली - राधे किती विस्कटले आहेत गं तुझे केस. नक्कीच यांना वेणीफणीची गरज आहे. काय ही दशा करुन घेतलेली आहेस राणी! असे म्हणत तिने, बंधनातून राधेचे विपुल काळेभोर केस मुक्त केले. आणि ती राधेच्या केसांवरुन, पाठीवरुन हात फिरवु लागली. राधेने आतापर्यंत विशाखा, ललिता, सुचित्रा, चंपाकली आणि तत्सम प्रत्येक सखीकडून वेणीफणी करुन घेतलेली होती आणि तरी असा इतका मायेचा आणि सुंदर स्पर्श तिने कधीही अनुभवलेला नव्हता. खरं तर त्या स्पर्शात फक्त मायाच नव्हती तर प्रत्येके वेळी ती वृद्धा राधेच्या लांबसडक केसांमधुन बोटे फिरवत होती, राधेचे सैरभैर मन शांतावत चालले होते. काय जादू होती तिच्या बोटांत. राधा शीतल शीतल होत होती. राधेचा शृंगार कधी संपूच नये तो अनंत काळापर्यंत चालावा असे काहीसे राधेला वाटू लागले. वेणी घातल्यानंतर वृद्धेने आसनस्थ राधेची कोमल पावले स्वत:च्या हातात घेतली आणि स्वतःच्या हातांनी राधेच्या तळपावलांवर ती चंदनाचे उटणे चोळू लागली. राधेने डोळे मिटून घेतले आणि का कोण जाणे राधेला बासरीचे मधुर सूर ऐकू येउ लागले. चंदनाचा, वाळ्याचा सुगंध येउ लागला. तिचे अष्ट सात्विक भाव जागृत होउ लागले, राधा देहभान विसरु लागली. एका सुंदर गुंगीत, पदर ढळलेली, अशी ती उन्मनी आणि अनिवार सुखाने हुंकार देत, तक्क्याला रेलली. "आणि तिला वृद्धेचा स्पष्ट आवाज ऐकू आला - सावर प्रिये! आश्चर्य आहे, अजुनी मला ओळखले नाहीस?
राधेने चमकून डोळे उघडले - समोर वृद्धा नव्हतीच होता तिचा कान्हा.

http://cdn.shopify.com/s/files/1/0123/0156/6009/products/radha_bilas_1200x1200.jpg?v=1586201855

चित्रं जालावरुन साभार - https://www.tallengestore.com/products/radha-and-madhava-art-by-raja-rav...

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet