गोम

डॉक्टर अजिंक्य ननवरेंना सन २२४२ सालच्या वार्षिक विज्ञान परिषदेचं निमंत्रण आलं ह्यात आश्चर्यकारक वाटण्यासारखं काहीच नव्हतं. ते दरवर्षी येतच असतं. तसं ते ह्यावर्षीही आलं. काही झालं तरी डॉक विज्ञान परिषदेच्या सुकाणू कमिटीचे सन्माननीय सदस्य होते.
डॉक्टर ननवरे पुण्याच्या पुणेकर कॉलनीत राहतात. ह्या कॉलनीत त्यांचा एक छोटासा बंगला आहे. त्याला ते प्रेमाने “मठी” असं संबोधतात. त्या “मठी”ला कॉलनिकर निरनिराळ्या नावांनी ओळखतात. कॉलनिकरांची चूक नाही. कारण डॉक्टरच त्यांच्या मठीचे नाव मनाला येईल तेव्हा बदलतात. लोक आपल्या बंगल्यांची नावे “पितृस्मृति”, “मातृछाया”, अशी एकूण कौटुंबिक ठेवतात. पण डॉक कुटुंब संस्थेबद्दल अज्ञानी होते. त्यांच्या मनात लग्नाचा विचार कधी आलाच नाही. बरोबरच आहे. त्यांचे आडनावच मुळी “न नवरे” असं आहे ना.
तर सांगायचा मुद्दा असा की सध्या त्यांच्या मठीचे नाव आहे “गुरुत्वकण”. पंधरा दिवसांपूर्वी हेच नाव “गुंतागुंत” असं होतं. गुरुत्वाकर्षणलहरीचे अस्तित्व २०१६ साली तीन शास्त्रज्ञांनी “लेसर इंटरफेरामीटर” वापरून सिध्द केले. डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे ह्या लहरी लहरी नसून त्या कणांच्या स्वरुपात असतात. आणि वर हे कण बुद्धिमान असतात. उदाहरणार्थ चंद्र आणि पृथ्वी यांच्यातील गुरुत्वाकर्षणाचे घ्या. पृथ्वी आणि चंद्र ह्यांच्यापासून निघालेले गुरुत्वकण मधेच भेटतात, एकमेकांच्या वस्तुमानांच्या माहितीची देवाणघेवाण करतात. न्युटनच्या सिद्धांतानुसार गुरुत्वाकार्षणाचा हिशोब करतात आणि माघारी जाऊन त्याप्रमाणे जोर लावतात! जाऊ दे .हा मोठा गहन विषय आहे. पुन्हा भेटलो की ह्यावर सविस्तर विचार करू.
त्या मठीत त्यांची सुसज्ज प्रयोगशाळा आहे. प्रकाश किरणांचा वेग कमी जास्त करणाऱ्या स्फटिकांवर त्यांचे संशोधन चालू आहे. त्यांनीच जगातील अव्वल क्रिकेटपटू कुमार जोशीला प्रकाश किरणांचा वेग कमी करणाऱ्या काचेचा चष्मा बनवून दिला होता. त्यामुळेच कुमार जोशी शतकामागून शतके मारायला लागला होता. कुमार जोशीला ह्याची अजिबात कल्पना नाही. त्याच्या मते डॉक्टरांनी त्याच्या डोळ्याचा नंबर अचूक ओळखून त्याला चष्मा बनवून दिला होता. तो चष्मा वापरायला लागल्या पासून कुमारला १६० किमी प्रति सेकंदाला झंझावाती चेंडूफेक करणाऱ्या आर्चरचे चेंडू उन्हाळ्यात गारवा आणणाऱ्या वाऱ्याच्या झुळूकेसारखे वाटू लागले होते.
सध्या डॉक्टर प्रकाशाचा वेग वाढवणाऱ्या स्फटिकावर प्रयोग करत होते. आईनस्टाईनच्या सिद्धांतानुसार निर्वात माध्यमात प्रकाशाचा वेग २९९७९२४५८ मीटर प्रति सेकंद आहे. ही वेगाची वैश्विक मर्यादा आहे. आणि ही मर्यादा कोणीही कधीही ओलांडू शकणार नाही असं त्याचे म्हणणे होते. डॉकना आईनस्टाईनचा हा सिद्धांत मान्य नाही. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आपण जर प्रकाशाला बाहेरून उर्ज्वा प्रदान केली तर त्याचा वेग वाढवू शकू. त्यात समस्या एवढीच होती की ते ज्या कॉलनीत रहात होते तिथला विद्युत पुरवठा बेभरंवशाचा होता. चतुःशृंगी कडून येणाऱ्या विद्युत वाहिनीतून ह्या वसाहतीला विद्युत पुरवठा होतो. त्या वाहिनीच्या तारा अशा डिझाईन केल्या आहेत की त्यावर माशी जरी बसली तरी लाईन ट्रिप होते. जेव्हा केव्हा डॉक्टर त्यांच्या प्रयोगाचे जुगाड करतात, नेमक्या त्याच वेळी विद्युत पुरवठा खंडित होतो. एकदा त्यांचा प्रयोगाची पूर्ण तयारी झाली होती. डॉक्टरांनी पुन्हा पुन्हा सगळी उपकरणं तपासली. स्फटिकाला बाहेरून विद्युतउर्ज्वा प्रदान करण्यासाठी तारा व्यवस्थित जोडल्या होत्या. ॠण आणि धन टोकांना ॠण आणि धन विद्युत पुरवठा जोडला होता. डॉक्टरांनी आईनस्टाईनचे स्मरण केले आणि स्वीच ऑन केला. तेव्हा त्या स्फटिकाने पॉवर ग्रीड मधून इतकी उर्ज्वा खेचली की नेपाळ, बंगलादेश, पाकिस्तान, श्री लंका ह्यांच्यासह संपूर्ण भारताचाच विद्युत पुरवठा खंडित झाला होता! डॉक्टरांनी जेव्हा हा किस्सा त्यांच्या भविष्यकाळातील मित्रांना वर्णन करून सांगितला तेव्हा त्यांच्या मित्रांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.
“ननवऱ्या, अरे तू निसर्गनियमाच्या विरुद्ध जातो आहेस. प्रकाशाचा वेग वाढवण्यासाठी तुला अनंत उर्ज्वा द्यावी लागेल. ह्या विश्वात असा उर्ज्वा स्रोत कुठेही नाही. तू एवढा हुशार शास्त्रज्ञ, तुला एवढेपण समजत नाही? आश्चर्य आहे. तू पुन्हा एकदा भौतिकीची पुस्तके उघडून वाच.”
डॉक्टरांचा अर्थात ह्यावर विश्वास नाही. त्यांचे प्रयोग चालू आहेत, चालू राहतीलच. असं आहे ना की बालहट्ट, स्त्रीहट्ट, राजहट्ट आणि डॉक्टर ननवरेहट्ट, बुझाऊ शकेना विधाता तयाला! असो. लगे रहो डॉक्टर!
आमंत्रण मिळाल्यावर डॉक्टरांनी पहिल्याप्रथम काय केलं असेल तर त्यांनी रघू परांजपेंना फोन लावला.
डॉक्टर रघुनाथ परांजपे हे डॉक्टर ननवरेंच्या तोडीस तोड शास्त्रज्ञ होते. फरक एवढाच की ननवरे भैतिकीतज्ज्ञ तर परांजपे अनुवंशशास्त्रज्ञ! मानवाचे आयुर्मान वाढवणे हा परांजपेंच्या संशोधनाचा विषय होता. भारतीय नागरिकांचे सध्याचे सरासरी आयुर्मान ६९ वर्षे होते. ते १२५च्या जवळपास नेण्यासाठी त्यांचे प्रयत्न होते. मी हे माझ्या हयातीतच करून दाखवेन अशी त्यांची जिद्द होती. “क्रिस्पर” नावाचे सॉफ्टवेअर वापरून नवजात गर्भाच्या गुणसूत्रात ढवळाढवळ करून त्यांनी काहीच्या काही जीव निर्माण केले होते.
“राघोबा, एके दिवशी तू ना फ्रॅंकेस्टाइनला जन्म देणार आहेस.” ननवरे नेहमी त्याला टोकत असत.
“आणि तू काय करतो आहेस? म्हणे “मी प्रकाशाच्या वेगाची मर्यादा तोडणार आहे.” माझ्या संशोधनामुळे मानवाचा केव्हढा फायदा झाला आहे याची तुला काही कल्पना आहे? आता जीन उपचार पद्धत वापरून आपण ‘डाऊन सिंड्रोम’ला मानवी जीवनातून कायमचं हद्दपार केलं आहे. नाहीतर पूर्वीच्या काळच्या अश्या अपत्यांच्या आई-बापांच्या दुःखाची तुला काय कल्पना असणार. आता ‘डाऊन सिंड्रोम’ इतिहासजमा झाला आहे. कुणामुळे? माझ्यामुळे. ननवऱ्या, केवळ माझ्यामुळे.”
“त्याबद्दल आभारी आहे. पण “आपली डिझाईनर बेबी बुक करा. चाफेकळी नाक, हिमगौर वर्ण, कमनीय देहयष्टी, सुडौल बांधा, कमलाक्षी, हिरवे, निळे, घारे डोळे. पसंद अपनी अपनी. अमर्याद चॉइस. आईनस्टाईनइतका प्रतिभासंपन्न, शाहरुखसारखा कलाकार, विराटसारखा क्रिकेटर, रॉजर फेडररसारखा टेनिसपटू? कसा पाहिजे आपला मुलगा? तुमच्या ऑर्डरबरहुकुम बेबी बनवणार.” ह्या टीव्ही वरच्या जाहीराती! बघितल्या आहेस? रघुनाथा, हेही तुझेच कर्तृत्व!”
“ते सोडरे, पण मला एक सांग, हायड्रोजन बॉंब कुणी बनवला?.....”
असे हे न संपणारे वाद. त्यातून निष्पन्न काय? वादे वादे जायते कंठशोषः. पण म्हणतात ना “तुझं माझं जमेना तुझ्या विना करमेना.” अशी त्यांची अतूट मैत्री.
“रघ्या लेका, परिषदेचे आमंत्रण आले आहेना? येणार आहेस ना? बरोबरीनच जाऊ.” ह्यावर्षीची परिषद शनीच्या टायटन उपग्रहावर ठेवण्यात आली होती.
त्या दोघांना घेऊन जाण्यासाठी परिषदेने खास “डी ब्राय” इंजिन (Louis de Broglie drive) असणाऱ्या हायपरस्पेसमधून प्रवास करणाऱ्या यानाची व्यवस्था केली होती. डी ब्राय नावाच्या राजेशाही शास्त्रज्ञाने वस्तूंचे लहरीत रुपांतर करण्याची कल्पना मांडली. हो, टेबल, टेलेफोन, खुर्ची अगदी माणूस सुद्धा यांच्या लहरींचे गणिती सूत्र मांडले. “डी ब्राय” इंजिन प्रवाश्यांसह स्वतःचे लहरीत रुपांतर करून प्रकाशाच्या वेगाने प्रवास करून मुक्कामाला पोहोचल्यावर पुनश्च मूळ स्वरुपात प्रकट होतं.
यानात बसल्या बसल्या ननवरेंनी लेक्चरबाजी सुरु केली. “रघू हे इंजिन खूप स्लो आहे .एकदा माझे
संशोधन .....”
यान चालकरोबोने त्यांना मधेच थांबवलं. “डॉक्टरद्वय, कृपाकरून आपण आपली चर्चा-कम-वादावादी थोडावेळ थांबवू शकणार नाही का? त्याचे काय आहे, तुमच्या चर्चेमुळे माझे लक्ष विचलित होऊन चुका होऊ शकतात. मग आपण कुठे पोहोचू त्याची खात्री नाही. तेव्हा, प्लीज.”
दोघेही चूप झाले.
परिषदेचे कामकाज सुरु होण्याआधी एक महत्वाची सूचना प्रसारित करण्यात आली.
“भूतकाळातून(पृथ्वीचे २०६१ हा त्यांच्यासाठी भूतकाळच होता.)...... कृपया कुणीही कंसात जाऊन कॉमेंट करू नका ........ भूतकाळातून आलेल्या शास्त्रज्ञांनी ह्या काळात केवळ साक्षीदार म्हणून वावरावं. आता असं सिद्ध झालं आहे की इथं केलेल्या कृतींमुळे त्यांच्या वर्तमानकालावर परिणाम होऊ शकतो. परत गेल्यावर ते दुसऱ्या समांतर विश्वात प्रकट होऊ शकतात. तेव्हा काळजी घ्या. सूचना समाप्त झाली आहे. आता परिषदेचे कामकाज सुरु होईल.”
मिस स्वातीबाईंनी प्रथम सुरुवात केली. विश्वातील बुद्धिमान जीवांचा शोध घेण्याच्या कार्यक्रमाच्या त्या मुख्या होत्या. एक सनसनाटी घोषणा करून त्यांनी परिषदेत खळबळ उडवून दिली. अखेर मानवाने पाठवलेल्या संदेशांना उत्तर आलं होतं. जरी त्या उत्तराचा अर्थ समजला नव्हता तरी तो संदेश बुद्धिमान प्राण्यांनी पाठवला होता ह्याची खात्री झाली होती. अर्थात त्यांच्या ह्या मताशी विज्ञान महासभेचे सर्व सदस्य सहमत होते अशातला भाग नाही. काहींच्या मते ते “उत्तर” “उत्तर” नव्हते तर अवकाशातून नेहमी येणारा अर्थहीन “गोंगाट” होता. काही मिश्कील लोकांचे तर ह्याही पुढे जाऊन अस म्हणणं होतं की डॉल्फिन माशांनी आमची चेष्टामस्करी करण्यासाठी हे संदेश पाठवले होते आणि त्याला आम्ही भोळे मानव फसलो. पण मिस स्वातीबाईंनी सर्व आक्षेपांना समर्पक उत्तरे दिली. आलेल्या संदेशांचे झिफच्या नियमानुसार विश्लेषण करण्यात आले होते. (डॉल्फिनच्या भाषेचे ह्याच पद्धतीने विश्लेषण करून आम्ही त्यांची भाषा आत्मसात केली होती. आता आम्ही त्याच्याशी गप्पा मारू शकत होतो. डॉल्फिन आम्हाला कमी बुद्धीवान समजतात हेही आम्हाला समजले होते. जसे आम्ही हत्ती, कुत्रे, मांजरे ह्यांना बुद्दू समजतो अगदी तसेच.)
हे संदेश ग्लीस ६६७सीसी ह्या “गोल्डीलॉक्स झोन” मधे असणाऱ्या ग्रहावरून आले होते. चोवीस प्रकाशवर्षे दूर असणारा हा ग्रह पृथ्वीशी ऐशी टक्के मिळता जुळता होता. सूर्य-गुरुत्व-भिंग दुर्बिणीतून ह्याचं निरीक्षण करायचा कार्यक्रम होता. पण ही दुर्बिण कार्यान्वित व्हायला अजून तीन वर्ष अवधि होता. तोपर्यंत भाषाशास्त्रज्ञ आलेल्या संदेशांचे विश्लेषण करणार होते.
स्वातीबाईंच्या नंतर डॉक्टर रामिरेझ बोलायला उठले. रामिरेझ अग्रगण्य अनुवंशशात्रज्ञ होते. त्यांनी पाणी शुध्द करणाऱ्या वनस्पतीच्या नवीन प्रजाती विषयी माहिती दिली. हे झाड त्यांनीच “बनवलं” होत. त्याचं एक रोपटं त्यांनी आपल्याबरोबर दाखवण्यासाठी आणलं होत. ह्या रोपाची पाने आकाराने मोठी व पसरट होती. त्यांनी एक पान खुडले. त्यातून नळासारखी पाण्याची धार वाहू लागली. त्यांनी ग्लासात पाणी जमा केले आणि निःशंकपणे पिऊन टाकले. सभागृहात टाळ्यांचा कडकडात झाला. सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न त्यांनी चुटकीसरसा सोडवून टाकला होता. ह्या रोपांची मोठ्या प्रमाणात लागवड करून त्यांना सांडपाण्याचा पुरवठा करायचा. रोप त्याचं पिण्याच्या पाण्यात रुपांतर करतील! ही झाडं समुद्राच्या खारट पाण्याचं सुद्धा रुपांतर करू शकतील काय? हा रामिरेझ ह्यांच्या संशोधनाचा पुढील टप्पा होता.
मध्यंतरात भोजनाची व्यवस्था “कॅफे हिल्बर्ट स्पेस”च्या हिरवळीवर करण्यात आली होती. जेवताना डॉक्टर ननवरे चूप बसले होते.
“ननवऱ्या, चूप झालास? अरे बोल काहीतरी बोल. नाहीतर मला खऱ्याखुऱ्या डॉक्टरला पाचारण करावे लागेल. तुझी तब्येत तपासायला?”
“मला काय धाड भरली आहे. मी विचार करतो आहे. परांजप्या, ते काय सांगत होते की भविष्यातली कृती वर्तमानावर परिणाम करते. हे तुला पटतं? मला नाही पटत बुवा. मला एक माहित आहे, अनुभव सुद्धा आहे की आज घेतलेल्या निर्णयांचा परिपाक भविष्यावर होतो. यू क्रिएट युवर फेट बाय युवर अॅक्शंस! नॉट अदरवे राउंड. तुला काय वाटतं?”
हिरवळीवरून जाणारी शतपाद गोम नेमकी त्याच क्षणी ननवरेंच्या बुटाच्या टाचेखाली आली. चिरडली गेली. बिचारी! भक्ष्याच्या शोधार्थ घराबाहेर पडली होती. आता कधीच भूक लागणार नव्हती. सरपटी आयुष्याची अशी चिरडअखेर झाली.
परांजपेंनी ननवरेंच्या प्रश्नाला काय उत्तर दिले? मला कल्पना नाही कारण माझे लक्ष त्या गोमेकडे होते. ननवरेंच्या हातून हे चुकून झालं होतं. तसं ननवरेंना निसर्गातल्या जीवनसृष्टीबद्दल अत्यंत आदर आणि प्रेम आहे. त्यांनी आपल्या मठीत कीटकनाशकाची कधी फवारणी केलेली नाही. अगदी पालीलाही ते हळूच चुचकारून घराबाहेर काढतात. पालीच्या ऐवजी तेच “चुचकारतात”.

खाण्याचे बील ननवरेंनी दिले. ह्या वेळी त्यांची पाळी होती न!
परिषदेचे सूप वाजलं. ननवरे आणि परांजपे डॉक्टरद्वय पुन्हा आपल्या काळात स्वगृही परतले. ननवरेंना त्यांच्या निवासस्थानाच्या बाहेर सोडून यान निघून गेले.
डॉक्टर ननवरे जेव्हा त्या सोसायटी समोर आले तेव्हा संध्याकाळचे सहा वाजले असावेत. संध्याछायेची ती कातर वेळ!
ही जागा त्यांना थोडीशी ओळखीची आणि बरीचशी अनोळखी वाटत होती. त्यांचा स्वतःवर जणू ताबा राहिला नव्हता. सगळे शरीर भारावून गेले होते. सगळ्या हालचाली यंत्रमानवासारख्या होत होत्या. यंत्रमानवाला जशी जाणीव, नेणीव असते पण फ्रीविल नसते, ननवरेंची अगदी तशीच स्थिति झाली होती. एखादी किल्ली दिलेली भावली जशी दहा पावले सरळ जाते, मग उजवीकडे वळते, आणि चालायला लागते तसेच ननवरे सोसायटीच्या गेटमधून आत आले, उजवीकडे वळले, लिफ्टमध्ये आत शिरले, त्यांनी तीन नंबरचे बटन दाबले, लिफ्ट वर गेली. लिफ्टचा दरवाजा उघडला,आणि ते बाहेर पडले. त्या मजल्यावर तीन सदनिका होत्या. त्यावर नावे लिहिली होती. ३०१, सदाशिव वाघमारे. ३०२, प्राजक्ता आपटे. ३०३, अजिंक्य ननवरे. अजिंक्य ननवरे? कोण आहे हा माणूस? घंटी वाजवून विचारू का? ननवरे बराच वेळ दरवाज्या समोर घुटमळत, विचार करत उभे राहिले. विचारावे की नाही विचारावे हाच मोठा प्रश्न होता. द्विधा मनस्थिति त्यांना असह्य झाली. शेवटी मनाचा हिय्या करून त्यांनी बेल दाबली. पस्तिशीतल्या बाईने दरवाजा उघडला,
“आज कमाल झाली. सूर्य पशिमेला उगवला. तुम्ही ऑफिसातून लवकर परत आलात.” ननवरेंच्या हातातील बॅग घेण्यासाठी बाईंनी हात पुढे केला. ननवरे संकोचून मागे सरकले. अपरिचित स्त्रीने आपल्या बॅगला सरळ हात घालावा हे त्यांना रुचले नसावे.
“माफ करा, पण अजिंक्य ननवरे इथेच राहतात काय? मला त्यांना भेटायचे आहे.” आपण अस का बोललो हे ननवरेंना समजलं असेल किंवा नसेल पण उमजलं नक्कीच नव्हतं हे निश्चित. त्या स्त्रीला मात्र जणू हजारो व्होल्टचा झटका बसला असावा. परंतु स्वतःला सावरून ती स्त्री मिश्कील गंभीरपणाने म्हणाली, “अजिंक्य ननवरे इथेच रहातात. ते अजून ऑफिसातून परत आलेले नाहीत. मी पुष्पा त्यांची पत्नी. तुम्हाला जर “स्वतःची” भेट घ्यायची असेल तर थोडं थांबायला लागेल.” मग पुष्पा खो खो करून हसायला. लागली, “हे काय आज नवीन सोंग काढलायस अजिंक्य? बाकी तुझा चेष्टेखोर स्वभाव अजून आहे तसाच आहे.”
मिस्टर ननवरे गोंधळले होते. ह्या बाईला वाटते आहे की मीच अजिंक्य ननवरे आहे, म्हणजे बहुतेक तिचा नवरा. मी तर हिला आयुष्यात प्रथमच बघत आहे. मी एक्झॅक्टली कोण आहे? माझे नाव काय? माझे घर कोठे आहे? माझे गाव कोठले? ननवरेंनी आपल्या खिशातून पैशाचे पाकीट काढले. आत पॅन कार्ड होते. वाहनचालकाचे परवानापत्र होते. दोन्हीवर त्यांचाच फोटो होता, त्यांचेच नाव होते, पत्ताही तोच होता. फलॅ्ट क्रमांक ३०३, स्वराली को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी. कोथरूड, पुणे. आता मात्र ननवरे पूर्ण गोंधळले होते. आपल्याला वेड तर लागले नाही ना अशी पुसटशी शंका त्यांना आली. ते काहीही असो अश्या प्रकारे अनोळखी स्त्रीच्या घरात घुसणे हा अक्षम्य गुन्हा आहे याची त्यांना जाणीव झाली.
“बाईसाहेब, माझा गोंधळ झाला आहे. मी चुकून केवळ नामसादृश्याने बेल दाबली. मला माफ करा. माझी खात्री आहे की मी अजिंक्य ननवरे आहे पण तुमचा अजिंक्य ननवरे नाही.” ननवरे जाण्यासाठी वळणार तोच बाईसाहेबांनी त्यांचा हात घट्ट पकडला आणि त्यांना ओढतच बेडरूमध्ये ढकलले आणि दरवाजा लॉक करुन टाकला. बेडरूमचा दरवाजा जरी बंद होता तरी ननवरेंना बाहेर काय चालले आहे ह्याची थोडीशी कल्पना येत होती. ती बाई मनोहर नावाच्या कोणालातरी रडक्या आवाजात सांगत होती. हा मनोहर बहुदा तिचा जवळचा नातेवाईक असावा. तो येईल तर पोलीस घेऊनच येईल. मग अटक, खटला जेल! अरे बापरे. आपल्याला पुढील काही वर्षे उचले, दारुडे, गांजेकस, खुनी, रेपिस्ट लोकांच्या सहवासात काढावी लागणार. ह्यातून सहीसलामत कसं बाहेर पडायचं. त्यांच्या स्मरणात कोणीतरी घुसायचा प्रयत्न करत होता. प! प. कोण? त्यांनी आपल्या स्मरणशक्तीला ताण दिला. पण “प.” त्याच्या ध्यानात येईना. जर हा “प.” आपल्याला आठवला तर त्याला आपण बोलावून घेऊ. तो येऊन ह्यांना समजावून सांगेल, गैरसमज दूर होतील. ठीक आहे. नशिबात असेल तस होईल. ह्या ननवरेंनी काय किंवा त्या ननवरेंनी काय दैवावर कधी भार टाकला नव्हता. पण आज त्यांच्यावर ही नामुष्कीची वेळ आली होती.
बेडरूमच्या बाहेर पुरुषाचा आवाज येत होता. तो मनोहर बहतेक आला असावा. ती पुष्पा नावाची स्त्री रडत होती.
“पुष्पे मी आलो आहेना. डॉक्टरांना बरोबर घेऊनच आलो आहे. आता होईल सगळे ठीक. तू काही काळजी करू नकोस.” हा मनोहर बोलत असणार! “डॉक्टर” म्हणल्यावर ननवरेंच्या स्मृती चालवल्या. जर खरच “डॉक्टर” आले असतील तर सोन्याहून पिवळे. ते ह्यांना.......
बेडरूमाचा दरवाजा उघडून दोन पुरुष आणि ती पुष्पा नामक स्त्री आत आली.
“हॅलो अजिंक्यराव, ही पुष्पी मला सांगते आहे की तुम्ही आज खट्याळ मूड मधे आहात म्हणून. अहो पण काय घाबरवलत तिला. पुष्पा चल आमच्यासाठी अजिंक्यरावांचा आवडतीचा केशरयुक्त कडक मीठा चहा बनव बघू.”
ननवरेंची मानसिक स्थिती आता पूर्ण बिघडली होती. आपल्या आयुष्याचा ताबा जणू आपल्या हातातून निसटून ह्या अनोळखी लोकांकडे गेला होता.
“आपण कोण?” ननवरेंनी क्षीण आवाजात विचारले.
“आपण कोण? अहो, साले साहेब, लग्नात कान पिळला ते विसरलात काय? पुन्हा पिळू?” तो पुरुष खळाळून हसत बोलला.
“मनोहरपंत, एक मिनिट. लेट मी हॅंडल इट.” तो दुसरा पुरुष मनोहरपंतांना उद्देशून बोलला आता तो ननवरेंकडे पहात होता, “ह्या पुष्पा वैनी, तुमची पत्नी, हे मनोहरपंत, म्हणजे पुष्पा वैनींचे भाऊ. आणि मी डॉक्टर परांजपे, आपला फॅमिली डॉक्टर. सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्ही आहात अजिंक्य ननवरे! डेटा डायनॅमिक्सचे सिनिअर जनरल मॅनेजर. बरोबर?”
ननवरे एकदम रिलॅक्स झाले, “परांजप्या, आयला हा काय चावटपणा चाललाय? तुला महिती आहे की मी बालब्रह्मचारी आहे. ह्या मूर्खांच्या कटात तू पण सामील? मला वाटल नव्हत की तू केजीबीचा एजंट असशील. एक लक्षात ठेव, मला किडनॅप करून केजीबीला एफटीएल ड्राइव्हबद्दल शष्पदेखील माहिती मिळणार नाहीये. तुम्ही जर माझे हलाल करायला लागलात तर माझा ब्रेन फ्रीझ होऊन जाईल अशी “रॉ” ने व्यवस्था केली आहे. फ्रॅन्कली यू पिपल आर लूझर्स!” ननवरेच्या चेहऱ्यावर विजयी हास्य होते.
“अजिंक्यराव, मी काय म्हणत होतो........”
डॉक्टर परांजपेंना मधेच थांबवत ननवरे बोलू लागले, “मी तुमचा अजिंक्य नाही. अजिंक्य अजिंक्य अजिंक्य असा धोशा लावून ब्रिटीशांनी जस त्या राजाला वेडा ठरवलं, त्या जुन्या क्लृप्त्या वापरून तुम्ही मला वेड लावू शकणार नाही. मी कोण आहे तुम्हाला माहीत आहे? मी जगप्रसिध्द शास्त्रज्ञ ननवरे आहे. विश्वाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकाला, एंटॅंगल्ड झालेले कण वापरून प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त वेगाने, म्हणजे खरतर क्षणार्धात- नाही हा पण शब्द बरोबर नाही- विदाउट एनी डीले, दॅट इज बेटर वर्डिंग- संदेशवहन.......” ननवरे तिथेच अडकले. पुढे काय बोलायचे ते त्यांना सुचेना. आठवेना. बेडरूममध्ये भयाण शांतता पसरली होती. पुष्पा, मनोहर आणि परांजपे आश्चर्यथकीत झाले होते.
परांजपेंनी शांततेचा भंग केला, “एक मिनिट मी अजिंक्यसाठी पाणी घेऊन येतो.” ते उठून किचन मध्ये गेले. परत येताना ग्लासभरून फ्रीजमधले गार पाणी घेऊन आले.
“अजिंक्य, तुझ्या घशाला कोरड पडली असेल. हे गार पाणी पी. बरं वाटेल.”
“थॅंक्यू यू डॉक्टर एर हुएवर यु आर. मला ह्याची नितांत गरज होती.” ननवरे ग्लासभर पाणी घटाघटा पिऊन गेले. एका दोन मिनिटात त्यांना ग्लानी येऊ लागली. झोप अगदी अनावर झाली.
“माफ करा मी ह्या तुमच्या बेडवर झोपणार......” ते वाक्य पूर्ण करू शकले नाहीत. पाच मिनिटात त्यांचे घोरण्याचे संगीत तालावर सुरु झाले.
“चला आता हा सकाळपर्यंत उठणार नाही. ह्याच्या भडकलेल्या, झपाटलेल्या मेंदूला थोडी विश्रांति मिळेल.”
पुष्पा रडकुंडीला आली होती. तिच्या सुखाच्या संसाराला नजर लागली होती. एका तासापूर्वी सुख दुथडी भरून वाहत होते. आणि आता मधुघट रिकामे झाले होते, “दादा, काय करू? कुठे जाऊ? तूच मला मार्ग दाखव.”
दादा तरी काय उत्तर देणार? शेवटी त्याने धीर धरुन डॉक्टरांना विचारले, “डॉक्टर हा काय प्रकार आहे? अजिंक्यला भुताने झपाटले आहे का? हा देव देवस्कीचा प्रकार आमच्या कोकणात......”
“मनोहरपंत प्लीज. तुम्ही विज्ञानाचे पदवीधर आहात. तेव्हा मी काय सांगतो ते नीट ऐका. ह्या प्रकाराला मानसशास्त्रात डिसोशिएट अॅम्नेशिया अस म्हणतात. ह्याचे बरेच प्रकार आहेत. त्यात एक आहे फ्यूगु अवस्था. माझ्या मते अजिंक्य फ्यूगु अवस्थेत गेला आहे. फ्यूग अवस्थेत गेलेला पेशंट स्वतःची ओळख नाव, गाव, भूतकाळातलं आयुष्य सगळे विसरतो. क्वचित स्वतःची नवी ओळख बनवतो. जस अजिंक्य स्वतःला जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ समजायला लागला आहे. हे पेशंट कधी कधी घर सोडून शेकडो मैल दूर दुसऱ्या नावानं वावरतात. म्हणून अजिंक्यला अजिबात एकटं सोडू नका.”
इतका वेळ धीराने राहिलेल्या पुष्पाचा बांध तुटून पडला आणि ती ओक्साबोक्शी रडू लागली.
डॉक्टरांनी तिला रडू दिले. दुखःचा पहिला उमाळा ओसरल्यावर त्यांनी हळुवारपणे सुरुवात केली, “वैनी, आता तुम्ही मी काय सांगतो ते ऐका. हा आजार बरा होतो. अजिंक्य केव्हा नॉर्मल होईल? अगदी उद्या सकाळी किंवा कदाचित वर्ष देखील लागेल. पण माझ्या मते तो निश्चित नॉर्मल होईल. हा तुमच्या कसोटीचा काळ आहे खरा.” इतका वेळ चूप बसलेल्या मनोहरला कंठ फुटला, “पण आमच्या अजिंक्यलाच हे दुर्दैवाचे दशावतार का बघावे लागत आहेत? आमच्या हातून कुलदेवतेचं करण्यात काही उणीव, त्रुटी राहिली असेल काय?”
“पुन्हा तुम्ही वेडगळ समजुतींना कवटाळून बसला आहात? तुम्हाला मनःशांति मिळत असेल तर काय पाहिजे ते दैवी उपाय खुशाल करा. मी काय सांगितलं ते मात्र विसरू नका. मी उद्या वेळा काढून येईन. तेव्हा सविस्तर बोलू.” डॉक्टर निघून गेले.
महिन्याभरात अजिंक्य पूर्ववत नॉर्मल झाला. त्याला त्याच्या भूतकाळातील अगदी बारीकसारीक गोष्टींच्या आठवणीना उजाळा मिळाला. चार वर्षांचा असताना त्याच्या बाबांनी कृष्णामाईच्या जत्रेत त्याला खांद्यावर बसवून कसं नाचवलं होतं, त्याच्या आईने त्याचा अकरावीचा रिझल्ट असलेलं वर्तमानपत्र कसे जपून ठेवलं होतं ( आई गेल्यावर तिच्या बॅगमध्ये तो पेपर मिळाला होता.) आयुष्यातील अपमान आठवले. (मान नाही आठवले.)
आता ननवरे डॉक्टर ननवरे नाहीत. ते साधे ननवरे आहेत. ते एका बहुराष्ट्रीय कंपनीत मोठ्या हुद्द्यावर काम करतात. चौकोनी कुटुंब आहे. कुटुंबाची काळजी घेणारी प्रेमळ पत्नी आहे. दोन गोजिरवाणी मुले आहेत. मोठ्या मुलाने नुकतेच चौथीच्या शिष्यवृत्तीच्या परीक्षेत भरघोस यश मिळवलं आहे. ननवरे त्याला आयआयटीचं वळण द्यायच्या प्रयत्नात आहेत. म्हणून त्याला आयआयटीच्या परीक्षेच्या तयारीच्या तयारीच्या तयारीच्या....... क्लासला घातले आहे. आयआयटी झाल्यावर पुढे आयआयएम नंतर युएसए असं एकंदरीत प्लॅनिंग आहे. श्री स्थानेश्वराच्या कृपेने सर्व सुरळीत होऊन जाईल.
मुलगा विज्ञान कथांचा फॅन आहे. तो सारखा टीव्हीला चिकटलेला असतो. डिस्नेप्लसवर वॉंडाव्हीजन, लोकी, समांतर अश्या सीरिअल बघत असतो. बाबा टीव्हीवर फक्त वादविवाद उर्फ आरडाओरडा बघतात. मधेच कधीतरी मुलगा येऊन विचारतो, “बाबा, आपण “समांतर विश्व” बघायला केव्हा जायचं?” “समांतर विश्व” ही मुळशीच्या रस्त्यावर भूगावच्या बाजूला विश्वामित्र आचार्य ह्या उद्योगपतीनं उभारलेली प्रति “डिस्नेलॅंड” आहे. कधी मुलगा येऊन त्यांना लोकीच्या गोष्टी सांगतो. हे असं मुलाने सांगितलं की ननवरे का कुणास ठाऊक भयानक अस्वस्थ होतात. अजून एक.
ननवरेंच्या पाकिटात कॅफे "हिल्बर्ट स्पेस"ची जेवणाची पावती आहे. अजिंक्यने ही पावती जपून ठेवली आहे. त्या पावतीवर तारीख आहे ७जुलाई २२४२! जेव्हा जेव्हा तो ही पावती बघतो तेव्हा तेव्हा त्याच्या मनात अनामिक भाव दाटून येतात. केव्हा? का? कुठे? ह्या प्रश्नांची उत्तरे नाहीत. हे ओझे खांद्यावर घेऊन तो जगतो आहे.
त्यांच्या अंतर्मनाच्या अज्ञात कोपऱ्यात अंधारात भरभक्कम कुलूप लावून बंद केलेलं एक कपाट आहे. ते त्यांना उघडण्याची खूप इच्छा आहे. बिचारे अंधारात चाचपडत किल्ली शोधताहेत केव्हापासून!.
गवसलं होतं ते हरवलं आहे. हरवलं आहे ते गवसेल का?
त्याची “गोम” अश्शी आहे की.......

trapped as he was in body he did not choose.

.
प्रभुदेसाई
माझा ब्लॉग इथे आहे.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

सगळे पुरुषोबा डॉक्टर आणि बाई मात्र मिस स्वातीबाई, एकदा मिस म्हणून पुरलं नाही तर वर बाईसुद्धा! आणि तेही सगळं मनुष्याच्या 'फ्यूग' अवस्थेवर ढकललं की आपण स्वच्छ.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कुणाचं काय तर कुणाचं काय....
आणि हे झाले सर्व कुणामुळे? ह्याला कारण "ती" गोम!
माझी चूक दाखवून दिल्याबद्दल आभार. (फ्यूग ! दुरुस्त केले आहे.) Anyway
"Why Can't a Woman Be More Like a Man?"

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0