‘Reality’ Shows!

‘रिअॅलिटी’ शो ‘Reality’ Shows
"Be grateful that you only see the outward man. Be grateful that you never see the passions, the hatreds, the jealousies, the malice, the sicknesses... Be grateful you rarely see the frightening truth in people."
-----Alfred Bester in The Demolished Man
तात्याचं लग्न होऊन चांगली सहा सात वर्षे झाली आहेत. त्याची बायको सुशी. दोघांचा संसार मजेत चालला आहे.
बायकोन खूपच आग्रह केला.पण तात्या बधला नाही. ‘अवास्तव धमाल’ हा नवीन चॅनेल धामधुमीत सुरु झाला होता, उद्घाटनाला बड्या बड्या धेंडांनी आवर्जून हजेरी लावली होती. कोण नव्हते आले? सी.एम तर होतेच होते. पण सुपरस्टारही आले होते. सुपर डायरेक्टर आले होते. जसे सुपर आले होते तसे सुमार आले होते. माहौल असा होता कि ऑस्कर पारीतोषिक वितरण सोहाळ्याची आठवण व्हावी.
सी एम साहेबांनी नेहमीप्रमाणे खुशखुशीत भाषण दिले. भाषण देण्यात त्यांचे तोंड कुणी धरू शकणार नाही. ते म्हणाले, “अमेरिका, युएसए, नॉर्थ अमेरिका आणि युनायटेड स्टेट्स ऑफ USA ह्या चार देशांनंतर आपला देश ह्या एक्क्लुसिव क्लबचा सदस्य झाला आहे. ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. ह्या ठिकाणी आज मला आपल्याला एक महत्वाचे सांगायचे आहे कि सगळ्यांनी मास्क वापरा. कायम हात धूत रहा. मी पण मीटिंग झाली कि माझे हात धुवून टाकतो. आय वॉश माय हॅंड्स!”
असं बरच काही.
तो सोहळा पाहून बायको भारावून गेली, म्हणाली, “आपण हा चानेल घ्यायला पाहिजे.”
तात्याने ह्या कानाने ऐकून त्या कानाने सोडून दिले. आखिर देवानं दोन कान कशाला दिले आहेत?
एक दोन दिवस शांततेत गेले,
तिसऱ्या दिवशी ऑफिसातून घरी परत आल्यावर कांदापोह्यांवर ताव मारत असताना, त्या नाजूक क्षणी बायकोने पुन्हा विषय काढला. “चानेलचे पैसे भरले?”
“कुठला चॅनेल?”
“म्हणजे अजून नाही भरले? तोच तो ‘अवास्तव धमाल.’ “
“अगं, ते खूप खर्चिक काम आहे. मी असं ऐकलं आहे की त्या चॅनेलचे कार्यक्रम बघण्यासाठी नवीन प्रकारचा थ्री डी टीव्ही घ्यायला लागतो म्हणून. ह्या आपल्या सपाट टीव्हीवर ते दिसणार नाहीत.”
“हे पहा, मी इंजिनिअर नाही म्हणून काय वाटेल ते सांगता आहात? मी माझ्या मैत्रीणीला विचारून सगळी माहिती काढून ठेवली आहे. फक्त मंथली वर्गणी भरावी लागते. नवीन चॅनेल सुरु झाला आहे म्हणून डिसकाऊंट ऑफर चालू आहे. तुमच्या त्या ह्या चॅनलपेक्षा स्वस्त आहे. तुम्ही अस करा तो चॅनल बंद करा अन हा घ्या.”
अशी त्या सुखी नवराबायकोंची भांडणं नेहमी चालू असतात. कधी ती जिंकते, कधी तो हरतो.
शेवटी घेतला एकदा. तेव्हा कुठे वादळ शांत झाले.
चॅनलवाल्यांनी सर्वात आधी मॅन्यूअल पाठवून दिले. तात्या टेक्निकल साईडचा असल्याने तो नेहमी मॅन्यूअलपासून सुरवात करतो. अशी सुरुवात केली की विषयावर चांगली ग्रिप येते असं त्याचे मत आहे. पण हे मॅन्यूअल जरा भारी पडत होते. मॅन्यूअल भारी भारी नकाशे, समीकरणे आणि ग्राफनी तुडुंब भरले होते.
दुसर्या् दिवशी ऑफिसात गेल्यावर तात्याने राणेला पकडले, “राणे तू ‘अवास्तव धमाल’ घेतले आहेस ना. तू ते चॅनलचे मॅन्यूअल वाचलं आहेस? काही समजले का?”
“अरे बापरे,” राणे घाबरून ओरडला. “तू वाचतो आहेस की काय? कुठपर्यंत वाचले आहेस तू?”
“मी चाळीसएक पाने वाचली. “तूच तुझ्या वास्तवाचा शिल्पकार!” असे काहीतरी लिहिले आहे तिथ पर्यन्त आलो. झोप आली म्हणून वाचन बंद केले॰ झोप खूप खूप डिस्टर्ब होती सगळी समीकरणे फेर धरून नाचत होती माझ्या भोवती. रानटी लोकांसारखी.”
“ताबडतोब वाचन बंद कर. उद्या ऑफिसला येताना मॅन्यूअल घेउन ये. आपण इथे श्रेडरमध्ये टाकून देऊ. तू ऐकलं नाहीस? मॅन्यूअल पूर्ण वाचलं तर वाचणारा वेडा होतो अस म्हणतात. दोन तीन लोकांच्या तर रक्ताच्या गुठळ्या होऊन ते ....”
“एपिसोड बघायला हरकत नाही ना?”
त्याला राणेंनी क्लीन चिट दिली. “उद्या मॅन्यूअल मात्र न चुकता ऑफिसला घेऊन ये. अशी पुस्तक नांदत्या भरल्या घरात ठेवायची नसतात.”
संध्याकाळी तात्या घरी गेला. विचार करत होता बायकोला कस सांगावे? सांगावे कि न सांगावे?
चहाचा कप पुढे करत बायको सांगत होती, तात्या ऐकत होता.
“आज दुपारी मी एक एपिसोड बघत होते. एलियन्स पृथ्वीवर हल्ला करतात अशी काहीतरी स्टोरी होती. इतकं खरं खरं वाटत होतं! म्हणजे तुम्ही ह्या खुर्चीवर बसला आहात ना त्यावरच एक एलिअन बसला होता. सहा फुट लांबीच्या 3-डी नाकतोड्या सारखा.” तात्याला थोडसं नाकतोड्या सारखे वाटले. हे नाकतोडे म्हणे आपल्या कम्पॅनिअनला काम झाले की मारून खाऊन टाकतात आणि मग मांजरी सारखे तोंड पुसून स्वच्छ करत बसतात म्हणे, “एलिअन होता कि एलिअन होती?”
“तुम्ही हे असेच छिद्रान्वेषी. शी!”
“तुला तो प्रोग्राम चालू करता आला? मॅन्युअल न वाचता?”
“कसलं मॅन्युअल? स्क्रीन ऑन करायचा आणि ‘रन’ चे बटन रिमोटने दाबायचं. तुम्ही मायक्रोसॉफ्टचा पीसी वापरता की नाही तो काय मॅन्युअल वाचून? जेवण झालं कि रात्री मी तुम्हाला समजावून सांगेन.” ती प्रत्येक वेळी दाखवून देते की तिलाच सगळं समजत, तात्या एक नम्बरचा बुद्दू आहे. अस करून काय मिळत बायकांना? जाऊ दे ती खूष आहेना बस्स झाल. बुद्दू नवरा अस नाटक करायला पैसे थोडेच लागतात? हे आपले सुखी वैवाहिक जीवन!
नेहमीप्रमाणे तात्याने हार मानली.
रात्री दोघे पटापट जेवणे उरकून प्रोग्राम बघायला बसले.
प्रोग्राम सुरु झाला.
आता तात्याला प्रोग्रामची खरी मजा कळली. एका क्षणांत तात्याच्या बेडरूमचे रुपांतर झाले. तात्याच्या समोरची भिंत विरघळून नाहीशी झाली. भिंतीच्या पलीकडच्या फ्लॅटमधलं दृष्य त्यांना स्पष्ट दिसायला लागले.
शेजारच्या फ्लॅटमध्ये तरुण जोडपे रहात होते. ती जागा त्यांनी भाड्याने घेतली होती. तात्याने ही माहिती काही मुद्दामहून काढली नव्हती. सोसायटीची AGM नुकतीच झाली होती. तेव्हा त्याच्या कानावर पडलेली गोष्ट. तात्याला असल्या गोष्टीत अजिबात स्वारस्य नाही. त्यांच्या घरी ते सुखी, माझ्या घरांत मी सुखी. तो मुस्लीम होता नि ती अस्सल ब्राह्मण होती. ही पण ऐकीव माहिती.
“अहो तुम्हाला माहित आहे? त्यांचे इंटरकास्ट मॅरेज आहे. लव्ह मॅरेज! आमच्या वेळी असं नव्हतं.”
“इंटरकास्ट नाही. इंटर रिलीजन! एनीवे आपल्याला काय करायचे आहे? त्यांच्या घरी ते सुखी, आपल्या घरांत आपण सुखी. हो की नाही?”
“तर काय. आपल्या आपल्याला काय कमी कटकटी आहेत?”
मधून मधून अस काहीबाही कानावर पडत असे. तो साफ्टवेअर मध्ये होता आणि ती कॉलेजमध्ये प्राध्यापक होती. का प्राध्यापिका? (जपून. सध्या दिवस वैऱ्याचे -आय मीन- स्त्रियांचे आहेत.)
“हे अस दुसऱ्याच्या घरात डोकावणे, हे बरं आहे का? त्यांच्या प्रायव्हसी वर हे आक्रमण नाही का?”
“हे बघ आपण काही आपलं घर सोडून त्यांच्या घरात गेलो आहोत का? समोरची भिंत विरघळली. त्याला आपण काय करणार? पैसे मोजले आहेत. फुकट थोडेच बघत आहोत? आपल्याला पण काही हक्क आहेत की नाही? हा असा विचार करायला लागलो तर थिएटर मध्ये जाऊन सिनेमा पण बघता येणार नाही. सिनेमातले नायक, नायिका, खलनायक आणि इतर सटर फटर! ते बिचारे त्यांचे आयुष्य जगत असतात. आपण इकडे त्यांच्या आयुष्याची सार्वजनिक लक्तरे करतो. पण ही सर्वमान्य जगरहाटी आहे.” हे बायकोला पटले. कुणालाही पटण्यासारखे होते. अश्याप्रकारे नैतिक समर्थन प्राप्त केल्यावर ते दोघे सिरीअलची मज्जा लुटायला सज्ज झालो.
हा फ्लॅट छान सजवला होता. ती सजावट बघून तात्याला आपल्या फ्लॅटची लाज वाटली. त्या फ्लॅटमधे ह्या भिंती पासून त्या भिंती पर्यंत मुलायम गालीचा पसरला होता.(बहुतेक काश्मीरचा असावा किमानपक्षी मिर्झापुरचा तरी निश्चीत!) सोफा सेट वगैरे होतच. पण बघण्यासारखं म्हणजे अॅंटिक डायनिंग टेबल. रेडवुडचं असणार. अठराव्या एकोणिसाव्या शतकातील स्टाईल. बटरफ्लाय टेबल. त्यावर स्वच्छ टेबल क्लॉथ. वर खायचे पदार्थ मांडलेले.
“काय फ्लॅट आहे बघ.”
“नसायला काय झालं. डबल इंजिन आहे न.” बायको बोलली.
तो एकटाच काहीतरी खात असावा. बहुधा कॉर्न फ्लेक्स. वर भरपूर दूध. कॉर्न फ्लेक्स खाऊन झाल्यावर त्याने मोठ्या उंच ग्लास मध्ये संत्र्याचा ज्यूस ओतून घेतला. साला हा एकटा पिणार? मला त्याचा हेवा वाटला. पण ती कुठे आहे?
“तुला पाहिजे?” तो किचन कडे वळून म्हणाला.
किचनमध्ये खुर्चीवर ती बसली होती. आता पहिल्यांदाच आमच्या लक्षात आले.
“अहो तुम्ही बघितले का? तिला खुर्चीला जखडून बांधून ठेवलं आहे. तोंडाला सेलोटेपच्या पट्ट्या. काय प्रकार काय आहे?”
“आयला, हे काहीतरी निराळेच प्रकरण दिसतं आहे. ती त्याची बायको आहे ना?”
“मला काय माहित नाही बोवा. मी पहिल्यांदाच बघतो आहे.”
“मी सांगते आहे ना. ती त्याची बायको आहे.”
“ओके, असेल. बायको असली म्हणून काय झाले? खुर्चीला बांधून ठेवायचे? धिस इज मात्र टू मच.”
“श्श .....”
त्याने संत्र्याच्या रसाचा ग्लास उचलला आणि तो तिच्याकडे गेला. “तहान लागली असेल ना. घे. पी रस.” त्याने रसाने भरलेला प्याला तिच्या अंगावर ओतला. “पी, ज्यूस पी हं.” तिच्या डोळ्यातले भाव राग, दुःख, निराशा. तिचे हात बांधले होते न तोंड चिकट पट्टीने बंद केले होते म्हणून नाहीतर त्याला वाघीणीसारखे फाडून खाल्ले असते. तो डायनिंग टेबलाकडे परत आला. त्याने चिरलेल्या फळांची डिश ओढली. खायला सुरवात केली. तात्याने तरुणीकडे निरखून बघितले. इतके जवळून तो कुठल्याली तरुणीकडे प्रथमच पहात होता. ती दिसायला वाईट नव्हती. खर तर चांगलीच होती. (सुशीपेक्षा तरी निश्चित चांगली होती.) हल्ली दिसेल त्या तरुणीची सुशी बरोबर तुलना करायची वाईट खोड त्याला लागली होती.
“तुम्ही काही बोललात का?” सुशीने त्याला रॉंग फूट वर पकडला जणू.
“नाही म्हणजे कुठे काय?” तात्या थोडा गडबडला.
“तुमचे लक्ष कुठे आहे? आता त्याने तिच्या थोबाडीत मारली. बिचारी कळवळली असेल. पण तुम्हाला त्याचं काय? तुम्हाला झोप येत असेल तर सरळ झोपा की.”
“झोपेन कसा. आपल्या शेजारच्या खोलीत असे अघोरी प्रकार चालू असताना कोणी झोपू शकेल काय? हा माणूस इतका क्रूर निर्दयी अशी थोडी देखील कल्पना नव्हती. काय समजतो काय स्वतःला. आणि हा आपला शेजारी. माझी मलाच लाज वाटतेय.”
आता त्याने सिगारेटच्या पाकिटातून एक सिगारेट काढली. लायटर काढून पेटवला. लायटरच्या ज्योतीकडे पाहून त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. आधी त्याने सिगारेट पेटवली. दोन मनसोक्त झुरके घेतले. सुशीला सिगरेटच्या धुराचा वास सहन होईना. “शी” तिने नाकाला पदर लावला.
त्याने सिगारेट चिरडून रक्षापात्रात टाकली. काहीतरी विचार करून तो उठला. त्या तरुणीपाशी गेला. लायटर पेटवून त्याने ज्योत तिच्या पायापाशी नेली. तरुणीने व्यर्थ धडपड केली. सुशीने किंकाळी फोडली. “प्लीज बंद करा. बंद करा म्हणतेय न मी. बंद म्हणजे बंद!”
नाईलाजाने तात्याने टीवी बंद केला. खर तर तात्याला पुढे काय होते ते बघायची उत्सुकता होती.
“मी काय म्हणत होतो की मी पुढे जाऊन त्याची समजूत घालावी असा विचार करत होतो. अरे, सुंदर तरुणींना समजावयाची ही काय पद्धत झाली?”
“म्हणजे तुम्हाला काय म्हणायचे आहे की कुरूप तरुणीच्या तळव्यांना सिगारेटने चटके दिले तरी हरकत नाही,”
“हे बघ तू उगाच अर्थाचा अनर्थ करते आहेस. मला ......”
दिवे मालवून दोघेही झोपेची आराधना करू लागले. झोप थोडीच लागणार होती. दोघांच्याही डोक्यात शेजारच्या फ्लॅट मधली दृश्य तरळत होती. आता तो काय करत असेल? त्याने तिच्या पायाला लाईटरने चटके दिले कि नाही. त्या बिचाऱ्या तरुणीने कसे सहन केले असेल सगळे? ह्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत तोपर्यंत झोप कशी येणार? शेवटी सुशीने हार मानली.
“काय झाले असेल त्या मुलीचे? तुम्ही छान झोपला आहात इकडे डाराडूर. आपण काही करायला पाहिजे असं नाही वाटत तुम्हाला. म्हणतात न कठीण कठीण किती पुरुष हृदय बाई.”
तात्याला सुशी एवढीच उत्सुकता होती. पण बायको काय म्हणेल म्हणून तो चूप बसला होता.
“पुन्हा चालू करावा म्हणतेस? तू म्हणते आहेस तर सुरु करतो.” एपिसोड पुन्हा चालू झाला.
तरुणाच्या मनात काय विचार चालले होते कुणास ठाऊक.
“पाहिलं तुम्ही? तिचा ओठ फाटला आहे. त्यातून निघालेलं रक्त सादळलं आहे. गालावर डाग दिलेल्याच्या खुणा स्पष्ट दिसत आहेत. अग आईग.” सुशी वर्णन करण्यात रंगून गेली होती. तात्याला वाटले आपल्याला काही तरी बोलायला पाहिजे. नाहीतर सुशीला काय वाटेल. “धीस इज डॅम एक्सायटिंग.”
सुशीने तात्याकडे विचित्र नजरेने बघितले. “तुम्हाला हे सगळे एक्सायटिंग वाटते?”
“नाही तसं नाही ग. पण मी काय म्हणत होतो की ......”
आता त्या तरुणाने किचन मधून खिमा करायचा मोठा चॉपर आणला. कढई गॅसवर चढवली. थोडे तेल गरम करायला ठेवले.
“हा तिचे चॉप चॉप करून फ्राय करणार आहे का? दिल्लीला अशीच एक केस झाली होती. आठवतेय? ” सुशी घाबरून बोलली.
“मी जाऊन त्याला सरळ करू का?” तात्याच्या अंगात जोश चढला.
“काही नको तुमचे स्त्रीदाक्षिण्य. पाहिलात न त्याच्या हातातला चॉपर? तुम्ही आधी पोलीस कंट्रोल रूमला फोन करा पाहू. सांगा कि इथे मर्डर होणारे म्हणून. लवकर .घाई करा. थोडा जरी उशीर झाला तरी ती वाचणार नाही. बिचारी आधीच अर्धमेली झाली आहे.
तात्याने वाद घातला नाही. वाद घालून उपयोग नव्हता. ‘त्यांच्या भानगडीत आपण का पडायचे’ एवढेच त्याला म्हणायचे होते. पण नेहमीप्रमाणे त्याने माघार घेतली.
त्याने मोबाईल सुरु केला. फायर स्टेशन, इस्पितळ, रुग्णवाहिका ह्याचे नंबर बघता बघता शेवटी पोलीस कंट्रोल रूमचा नंबर मिळाला एकदाचा.
“आमची एक वायरलेस वॅन तुमच्या कॉलनीच्या बाहेर पार्क केली आहे. त्यांना संदेश गेला आहे. येतीलच ते लोक आणि तुम्हाला रिपोर्ट करतील.” बायकोनं माझ्या हातातून फोन हिसकून घेतला, “लवकर या हो.” ती फोन मध्ये ओरडली. बहुतेक तो पर्यंत फोन कट केला असावा. “तुम्हाला नीट बोलताही येत नाही. किती वेळकाढूपणा करता तुम्ही. म्हणे काय तर सर्कलला वळसा घालून उजव्या बाजूच्या गल्लीत बेकरी शेजारची ...अहो ते लोक GPS वापरतात. त्यांना सगळे माहित आहे.”
तोपर्यंत बेल वाजली. “कोण आहे?” तात्याने बावळटपणाने विचारले.
“खरोखर. कमाल आहे तुमची दुसरे कोण असणार. जा नि उघडा दरवाजा.”
मला आधी वाटले चोर असावेत. बघतो तर काय. साक्षात पुणे पोलीस.
“मी इन्स्पेक्टर खान. अन्वर खान. पुणे पोलीस क्राईमब्रॅंच. पुणे पोलीस आपल्या सेवेशी हजार आहेत. बोला काय प्रॉब्लेम आहे? मला तर इथे कुठे मर्डरचा म सुध्दा दिसत नाही. खोटी वार्ता देणाऱ्याला आम्ही कडीसे कडी सजा देतो. कदम, पीनल कोड कलम ....”
“खान साहेब, आमच्या इथे नाही हो. ह्या शेजारच्या फ्लॅट मध्ये. इकडे येऊन बघातरी.”
सुशी खानला आत घेऊन गेली. समोरचे दृश्य पाहून खान हादरला. “मला वाटायचं कि ही कॉलनी सभ्य लोकांची आहे. आताच ह्या फ्लॅटवर छापा टाकायला पाहिजे. म्हणजे गुन्हेगारांना रंगे हात पकडता येईल. चला कदम आणि कांबळे इकडूनच एन्ट्री घेऊया.”
“इकडून नाही जाता येणार. ही भिंत दिसते तशी पारदर्शक पण सॉलिड आहे. मघा आम्ही प्रयत्न केला.”
“ठीक आहे. आपण मुख्य दरवाज्यातून जाऊ.”
मग त्यांची वरात म्हणजे सुशी, खान, कदम, कांबळे आणि तात्या (तात्या नेहमीप्रमाणे पिछाडीला ) शेजाऱ्याच्या फ्लॅटकडे प्रस्थान केले. त्या फ्लॅटचा दरवाजा (अर्थात) बंद होता. खानने पोलिसी खाक्याने हिंस्रपणे दरवाजा ठोकला. “दरवाजा खोलो.”
बऱ्याच वेळानंतर आतून पेंगुळलेला बायकी आवाज आला. “कोण आहे? ह्या अश्या मध्य रात्री. डिअर, जरा बघ ना रे.”
“आम्ही कोण म्हणून काय पुससी! आम्ही असू लाडके. साक्षात कायदा आणि सुव्यवस्था तुमचा दरवाजा ठोठावत आली आहे.” खान माझ्याकडे पहात डोळे मिचकावत बोलला.
इतक्या गंभीर प्रसंगी त्याला विनोद सुचत होते. दरवाजा उघडला. समोर अर्धवट झोपेत असलेल्या त्या तरुणाने पायजम्याची लोंबणारी नाडी बांधत प्रचंड जांभई दिली. “पोलीस? आं? आता?”
“मी इन्स्पेक्टर खान, अन्वर खान.” आपले ओळखपत्र त्याच्या डोळ्यासमोर नाचवत खानने डोळे बारीक करत जागेचे निरीक्षण केले. “आम्हाला तुमच्या फ्लॅटची तपासणी करायची आहे. आम्हाला आमच्या खबऱ्याने अशी खबर दिली आहे की ह्या जागेत एका तरुणीला तिच्या इच्छेविरूद्ध डांबून ठेवण्यात आले आहे. आणि तिचा छळ केला जातो आहे.” तो तरुण खुर्चीवर बसला. त्याने हातानेच “गो अहेड आणि करा काय करायचे आहे ते” असा इशारा केला आणि टेबलावर डोके ठेऊन झोपी गेला. आत्ता ह्या क्षणी त्याला सर्वात प्रिय काय होते तर झोप! आतून ती तरुणी केस सावरत बाहेर आली. तिच्या अंगावर भाजल्याच्या काहीही खुणा नव्हत्या. अंगावर कुठेही जखमा नव्हत्या, मुक्या माराचे काळे निळे वण नव्हते. ओठ फाटून रक्ताचे ओहोळ नव्हते. सरप्रायसिंग! बायकोने माझ्याकडे आश्चर्यचकित नजरेने पहिले. मीही तिला त्याच्या पेक्षा जास्त आश्चर्यचकित नजरेने उत्तर दिले.
“आपण?”
“मी मिसेस मालन शेख.”
“ज्या तरुणीला टॉर्चर केले जात होते ती तरुणी कुठे आहे?” मिसेस मालन शेख चक्क लाजल्या. “इश्श. त्याला तुम्ही टॉर्चर म्हणता होय. काहीतरी गोड गैरसमज होतो आहे.” खान काहीतरी उत्तर देणार होता पण त्यांनी स्वतःला सावरले.
“कदम ह्या फ्लॅटवर रेड टाका.”
“येस्सर.”
खान, सुशी आणि तात्या तिघेही जण बावचळले. तेवढ्यात कदम आणि कांबळे घराची तलाशी घेऊन परतले.
“काय झाले? मिला कोई सुराग?” खानने विचारले.
“चप्पा चप्पा खोजा. काही मिळाले नाही. किचनमधले लहान लहान डब्बे पण उचकटून बघितले. सर आपण चतुरशिंगीच्या जत्रेतील “पिघलनेवाली लडकी” बघितली आहे?”
खानसर, मिसेस मालन , हवालदार एकमेकांकडे बघून अर्थपूर्ण हसले. तात्याला मात्र हा निराळाच पकार आहे ह्याची प्रकर्शाने जाणीव झाली. सगळ्या परिसरातल्या वातावरणात बदल झाल्यासारखे वाटत होते. त्याने सुशीचा हात पकडला. “सुशे आपले इथे काही काम नाही.”

“मिस्टर खान, ह्यांना समजलेलं दिसतं आहे. आणि तुम्ही अहो, मिस्टर शेख , खेळ खलास झाला आहे. उठा नि बेडरूम मध्ये जाऊन झोपा.” शेवटले वाक्य नवऱ्याला उद्देशून. तो उठला आणि रोबोसारखा चालत चालत बेडरूममध्ये गेला.
तात्या सुशीला हात धरून जवळ जवळ खेचतच स्वतःच्या फ्लॅटमध्ये घेऊन गेला. “तरी मी म्हणत होतो कि आपण त्यांच्या भानगडीत पडायला नको होतं.”
अर्थात त्यांना झोप लागायला खूप वेळ लागला.
वास्तव आणि अवास्तव ह्यांच्या पुसट सीमारेषेवरच्या संधिप्रकाशात कुणाला झोप येऊ शकेल काय!

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet