लसविषयक शंकानिरसन आणि चर्चा (भाग २)

लसविषयक शंकानिरसन आणि चर्चा (भाग २)

India Vaccination Drive

आमचे मित्र श्री प्रसाद शिरगावकर यांचा सोशल मिडीया व इतर माध्यमांमधून जनसंपर्क अफाट आहे. त्यांनी आज असं सांगितलं की जनमानसात लस, त्याचे दोन डोस त्यातील गॅप याविषयी बऱ्याच शंका, confusion आहे आणि ते दूर करणे जरुरी आहे.

शिरगावकरांनी एका पोस्टचा संदर्भ दिला होता . तिथूनच सुरुवात करूयात -

एक प्रश्न. बालिश वाटला तरी चालेल. समजा एका व्यक्तीची दुसरी लस ड्यु होऊन साठ दिवस उलटून गेले आणि त्याला अपॉइंटमेंट न मिळू शकल्याने लस नाही घेता आली तर -

  1. त्याची पहिली लस फुकट जाऊन त्याला परत दोन लसी घ्याव्या लागतील का?
  2. जेव्हा मिळेल तेव्हा (३, ६, ९ महिने, २ वर्षं) केव्हाही दुसरी लस घेऊन चालेल का?
  3. जास्तीत जास्त किती दिवसात दुसरी लस घ्यायला हवी?
  4. कदाचित कोविड झाल्यास पहिल्या लसीचा परिणाम म्हणून त्याचा मृत्यू होणार नाही किंवा फार लक्षणे दिसणार नाहीत. मग अश्या व्यक्ती स्प्रेडर बनणार नाहीत का?
  5. सरसकट सर्वांना अपॉइंटमेंटशिवाय लस नाही असा नियम करण्याऐवजी दुसरी लस आहे त्यांना वॉक-इन सुविधा देता येणार नाही का?

जाणकारांनी माहिती द्यावी.

उत्तर : जास्त शास्त्रीय खोलात न जाता तरीही थोडीशी प्राथमिक शास्त्रीय माहिती देऊन मग उत्तर देतो.

जेव्हा लस विकसित केली जाते तेव्हा त्याचा परिणाम जास्तीत जास्त चांगला व दीर्घ काळ टिकावा असे उद्दिष्ट असते (दर आजाराच्या लसीच्या बाबतीत ते शक्य असतेच असे नाही).

लस विकसित झाल्यावर आधी विविध प्राण्यांमध्ये तिच्या चाचण्या होतात. त्यानंतर सुरक्षितता चाचण्या छोट्या जनसमूहावर होतात. त्यानंतर फेज-२ आणि ३ मध्ये हजारो लोकांवर (साधारणपणे २५,००० ते ७०,००० लोकांवर) परिणामकारकतेबद्दल चाचण्या होतात. या चाचण्यांच्या निष्कर्षांचा अभ्यास करून प्रत्येक देशाचे नियामक मंडळ (उदा. आपल्या देशांत DCGI ही ती संस्था) मान्यता देते (किंवा नाकारते).

फेज-३ चाचण्यांमध्ये लस विकसित करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या मते नक्की उत्तम रिझल्ट येतील असा सर्वात सुरक्षित कालखंड (गॅप) दोन डोसच्या मध्ये ठेवला जातो. ( फेज-३ चाचण्यांमध्ये हीच गॅप दोन डोसमध्ये ठेवण्यात आलेली असते. आणि सार्वत्रिक लसीकरणात हीच गॅप सुरुवातीला सांगितली जाते.)

हे जरी असले तरीही लसीचा शास्त्रीय अभ्यास सार्वत्रिक लसीकरण सुरू झाल्यानंतर किमान एक वर्षभर चालू राहतो व त्यातून पुढे येणारे बरे-वाईट निष्कर्ष जाहीर केले जातात. त्यानुसार लसींच्या दोन डोसमधील गॅपमध्ये वेळोवेळी बदल केले जातात.

ही झाली त्रोटक पार्श्वभूमी.

आता उत्तरे :

भारतात सध्या दोन लसी उपलब्ध आहेत : कोविशील्ड आणि कोवॅक्सिन. दोन्ही लसींच्या फेज-३ चाचण्यांच्या वेळी दोन डोसमधील गॅप २८ दिवसांची ठेवली होती. आपल्याकडचे सार्वत्रिक लसीकरण सुरू झाल्यावर (म्हणजे १६ जानेवारीला) हीच गॅप सरकारतर्फे सांगितली गेली.

यातील कोविशील्ड लसीच्या (म्हणजे मूळ ॲस्ट्राझेनेका कंपनीच्या लसीच्या) फेज-३ चाचण्या जुलै-ऑगस्ट महिन्यात सुरू होऊन नोव्हेंबर महिन्याच्या आसपास संपल्या होत्या. त्यानंतर त्यांचा अभ्यास पुढे सुरूच होता. फेब्रुवारी महिन्यात मूळ कंपनीच्या (ॲस्ट्राझेनेका) पुढच्या अभ्यासाचे निष्कर्ष लॅन्सेट नावाच्या प्रख्यात वैद्यकीय जर्नलमध्ये प्रकाशित झाले. या अभ्यासातील एक निष्कर्ष असा होता की दोन डोसमधील गॅप २८ दिवसांपेक्षा वाढवली, अगदी १२० दिवस जरी ठेवली, तरी लसीच्या परिणामकारकतेवर कुठलाही वाईट परिणाम होत नाही. म्हणून तांत्रिक/शास्त्रीय दृष्ट्या १२० दिवसांपर्यंत दुसरा डोस घेतला तरीही उत्तम परिणाम मिळतो.

जगभरच्या सरकारांनी याची नोंद घेऊन २८ दिवसांची गॅप वाढवली आहे. आपल्या देशाने दुसरा डोस ४५ ते ६० दिवसांमध्ये घ्यावा असे सांगितले आहे.
कोवॅक्सिन बाबतीत मात्र असे नाही. याचे कारण म्हणजे त्यांच्या फेज-३ ट्रायल मार्चअखेरीला संपल्या. त्यांचे निष्कर्ष एप्रिलमध्ये जाहीर झाले. त्यांचा पुढील अभ्यास अजून सुरू असेल. त्यात असे काही निष्कर्ष आले तर ती कंपनीही सरकारला सांगेल. पण हे व्हायला अजून किमान एक-दोन महिने जातील असे वाटते.

ही झाली पार्श्वभूमी. आता प्रश्नांना थेट उत्तरे :

प्रश्न : एका व्यक्तीची दुसरी लस ड्यु होऊन साठ दिवस उलटून गेले आणि त्याला अपॉइंटमेंट न मिळू शकल्याने लस नाही घेता आली तर -
उत्तर :

  • पहिला डोस कोविशील्डचा असेल तर बिनधास्त दुसरा डोस घ्यावा, अगदी ऐंशी, शंभर दिवस झाले असतील तरीही.
  • पहिला डोस कोवॅक्सिनचा असेल तर मात्र हे सांगता येत नाही.

प्रश्न : जास्तीतजास्त किती दिवसात दुसरी लस घ्यायला हवी?
उत्तर :

  • पहिला डोस कोविशील्डचा असेल तर १२० दिवसांच्या आत.
  • पहिला डोस कोवॅक्सिनचा असेल तर ४५ दिवसांच्या आत.

प्रश्न : कदाचित कोविड झाल्यास पहिल्या लसीचा परिणाम म्हणून त्याचा मृत्यू होणार नाही किंवा फार लक्षणे दिसणार नाहीत. मग अश्या व्यक्ती स्प्रेडर बनणार नाही का?
उत्तर : हे नक्कीच होऊ शकते. पण क्वचित वेळी.

टीप : हा विषय तांत्रिकदृष्ट्या गहन आहे. प्रतिकारशक्ती,T & B सेल्स , प्रतिकार प्रतिसाद वगैरेंबद्दलची माहिती टाळून मी हे लिहिले आहे. सुलभीकरण करताना काही मर्यादा आल्या आहेत.

जिज्ञासूंकरता खाली तीन धागे देत आहे. त्यात अजून बरीच शास्त्रीय माहिती मिळेल :
लसविषयक शंकानिरसन आणि चर्चा
करोनाव्हायरस आणि प्रतिकारशक्ती - डॉ. विनीता बाळ भाग १भाग २

याहूनही जास्त जिज्ञासा असणाऱ्या लोकांना लसनिर्मिती कशी होते, त्यातील तंत्रज्ञान कुठले, चाचण्या कशा होतात इत्यादी संबंधित धागे :
कोरोना लस - भाग १, भाग २ (जनुकीय लस ), भाग ३ (वाहक व प्रोटीन आधारित लशी), भाग ४ (इनॲक्टिव्हेटेड लशी)
कोरोना लस कशी तयार होते?
कोरोना लस - mRNA तंत्रज्ञान

field_vote: 
0
No votes yet