माझे कोविडायन - श्रीप्रसाद रिसबूड

गेले जवळपास एक वर्ष corona pandemic 19 किंवा कोरोनाने संपूर्ण जगाची झोप उडवली आहे.

सुरुवातीला फक्त चीन,इटली,स्पेन मग युके फ्रांस जर्मनी,अमेरिका, ब्राझील आणि इराण या देशात पाय पसरणारा किंवा मुद्दामून पसरवलेला हा व्हायरस आपल्या देशातही बघताबघता पसरला आणि भल्याभल्यांची भंबेरी उडाली.

मागील वर्षी हा आला तेव्हा नक्की उपाय काय करायचे इथपासून सुरुवात होती, त्यामुळे सुरुवातीला गर्दी टाळणे, रस्त्यावर न थुंकणे, मास्क वापरणे, सॅनिटायझर वापरणे, वाफारा घेणे, विकत घेतलेल्या वस्तू धुवून घेणे, हळद घालून गरम दूध घेणे इ जे जे उपाय सरकारी, खाजगी पातळीवर आणि व्हाट्सअप्प तज्ज्ञांकडून सांगितले गेले ते लोकांनी केले.

कशाचा कशाला पायपोस नव्हता, पार सरकारी आणि खाजगी आस्थापना, शाळा, कॉलेजेस, हॉटेल, मॉल, सिनेमा थिएटर, सर्व प्रकारची सार्वजनिक वाहतूक, सर्व धार्मिक स्थळे, सर्वधर्मीय सण, उत्सव, सर्व सार्वजनिक कार्यक्रम, लग्न सोहळे यावर बंदी, गाव, शहर, राज्य, देश आणि जग या पातळीवरील प्रवास या सर्वांवर निर्बंध , त्यामुळे काय झाले हे आपण सर्वांनी अनुभवले, म्हणजे अनेक जण नोकऱ्या गेल्याने बेकार झाले, व्यवसाय बंद पडले, बऱ्याच जणांना आपले व्यावसायिक मॉडेल बदलावे लागले, अनेकांना खायची भ्रांत झाली, बँकेचे, खाजगी संस्थेचे कर्ज हप्ते भरणे अवघड झाले, रोजंदारी कमी झाली, पगार कमी झाले.

खेडेगावातील लोकं किंवा कामगार किंवा चाकरमानी 'गड्या आपला गाव बरा' असे स्वतःला पटवत कायमचे स्वगावी परतले.

याही परिस्थितीत सरकारी मदतीबरोबरच अनेक खाजगी आस्थापना, सार्वजनिक मंडळे, ट्रस्ट, आर एस एस, दानशूर व्यक्ती यांनी आपापल्या परीने मदत करून गरजूंना सावरण्याचा प्रयत्न केला.

देशाचे आणि देशातील सर्वसामान्य लोकांचे न भूतो न भविष्यति असे नुकसान अनेक पातळीवर झाले.

Banks during Covid
(प्रातिनिधिक प्रतिमा आंतरजालावरून साभार)

माझ्यासारख्या बँकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची मानसिक अवस्था काही वेगळी नव्हती परंतु सर्वच बँक कर्मचाऱ्यांनी याही परिस्थितीवर मात करून, सर्व सरकारी आणि त्या त्या बँकेने ठरवून दिलेले नियम पाळून, सर्वच ग्राहकांना समाधानकारक सेवा देण्याचा प्रयत्न केला एवढेच नव्हे तर त्या त्या बँकांचा व्यवसायही वाढविला, असे दुहेरी काम करून दाखविले.

यात अनेक बँक कर्मचाऱ्यांना कोरोनाचा सामना करावा लागला, काही कर्मचारी यात दगावलेदेखील, तरी देखील मानसिकरीत्या खच्ची न होता, हिंम्मत न हारता आज दुसऱ्या लाटेमध्ये देखील तेवढ्याच हिमतीने सेवा प्रदान करीत आहेत, या दुसऱ्या लाटेत जी पहिल्यापेक्षा अधिक वेगाने पसरत आहे आणि तीव्र आहे त्यात देखील बँक कर्मचारी कोरोनाग्रस्त होत आहेत, काही कर्मचारी या दुसऱ्या लाटेतदेखील दगावले आहेत पण बँक कर्मचाऱ्यांनी हार मानलेली नाही आणि मानणार नाहीत, किती ही लॉकडाउन केले तरी अत्यावश्यक सेवेअंतर्गत असल्याने रोज कामावर जातच आहेत फरक फक्त वेळेचा किंवा ठिकाणाचा. एवढे असूनही आम्ही बँक कर्मचारी कायम तिरस्काराचे धनी आणि इतर अश्याप्रकारे सेवा देणारे पुरस्काराचे धनी, असो.

या दुसऱ्या लाटेत मी स्वतः बाधित झालो, मागील वर्षी मी कटेन्मेंट झोनमध्ये असलेल्या शाखेत काम करून, अनेकांशी भेट होऊनदेखील बाधित झालो नव्हतो, म्हणजे मी एकदम स्ट्राँग आहे असे मला वाटत होते. फाजील आत्मविश्वास नव्हता पण विश्वास होता की मला कोरोना होणार नाही. पण २०२१च्या फेब्रुवारी महिन्यात १९ तारखेला शिवजयंतीच्या दिवशी दुपारी मला थंडी वाजून थोडा ताप आला, मी क्रोसिनची गोळी घेऊन झोपलो पण ताप कमी झाला नाही, संध्याकाळी आमच्या फॅमिली डॉक्टरांकडे गेलो , त्यांनी मला तपासले तर ताप १०३ पर्यंत गेला होता आणि त्यांनी तिथेच शंका व्यक्त केली की तुला कोरोना झाला असावा तरी पण आपण २ दिवस औषध घेऊ आणि ताप कमी झाला नाही तर टेस्ट करू, त्याप्रमाणे माझा ताप थोडा कमी झाला तरी तोंडाची चव गेली आणि उलट्यादेखील झाल्या, मी आधीच घरातील इतरांना संसर्ग नको म्हणून qurantine झालो. २२ तारखेला टेस्ट केली, रिपोर्ट २३ तारखेला अपेक्षेप्रमाणे positive आला.

लगेचच औषधांचा कोर्स चालू केल्याने आणि qurantineचे सर्व नियम निगुतीने पाळल्याने मी हळूहळू बरा होत होतो, यात माझी आतेबहीण वर्षा आणि माझा मेहुणा अभिक यांनी माझा रिपोर्ट पाहून क्षणाचाही विलंब न लावता आवश्यक ती औषधे मला घरपोच केली, माझा मित्र दिनेश कर्वे याने ऑक्सिमीटर आणि स्टीमर दिला, आमचे फॅमिली डॉक्टर श्री ओक, आयुर्वेदिक डॉक्टर श्री फडके, ॲलोपॅथी डॉक्टर श्री मुथा यांनी वेळोवेळी फोनवर किंवा मेसेजवर चौकशी करून योग्य ते मार्गदर्शन केले, बँकेतील अनेक सहकारी, मित्र, नातेवाईक, शेजारी यांनी आस्थेवाईकपणे विचारपूस केली आणि शुभेच्छा दिल्या.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझ्या घरच्या सगळ्यांनीच माझी खूप काळजी घेतली, योग्यवेळी, योग्य ते खाणे, औषधे देणे, मला एकट्याला कंटाळा येऊ नये म्हणून व्हाट्सअप्प कॉल किंवा नॉर्मल कॉल करून गप्पा मारणे इ.

एरव्ही धावपळीच्या किंवा धकाधकीच्या आयुष्यात आपण आपले घरातील वास्तव्य अनुभवत नाही. या कोरोना qurantineमुळे घरातील अनेक वस्तूंशी, ज्या आपणच आणलेल्या असतात, एवढेच नाही तर अगदी खोलीच्या भिंती, कपाटे या सगळ्यांशी माझी नव्याने ओळख होते आहे असेच मला वाटले, या वस्तू, भिंती, कपाटे जणू काही म्हणत होत्या की बघ एरव्ही तुझे आमच्याकडे लक्ष नसते, आता कसा २४ तास आमच्याच बरोबर आहेस, आमच्याशिवाय आता २१ दिवस तुला दुसरं काहीच दिसणार नाही, तुला आमच्याच साथीसंगतीने हा qurantine काढायचा आहे तेव्हा काळजी करू नको, दिवसरात्र आमचे वेगवेगळे रंगरूप अनुभव, सूर्यनारायणाच्या प्रकाशाने आमचे रूप कसे बदलत जाते ते अनुभव, बाहेर असणाऱ्या झाडांवर येणाऱ्या जाणाऱ्या विविध पक्षांचा दिनक्रम अनुभव, त्यांचे मंजुळ आवाज ऐक, पानांची सळसळ ऐक, रात्री रातकिड्यांचा आवाज ऐक मग बघ एकांतात कंटाळा न येता एकवीस दिवस कसे मजेत जातील आणि झालेदेखील तसेच.

माझ्या मनात विचार आला की आपल्याला तर २१ दिवसच या खोलीत एकांतात काढायचे आहेत. स्वा. सावरकरांनी अंदमानात काळ्या पाण्याची शिक्षा त्या ७*९ च्या खोलीत कशी भोगली असेल, नुसती भोगली नाही तर कमलासारखे अजरामर काव्य भिंतीवर लिहून पाठ केले आणि शिक्षा संपल्यावर ते कागदावर लिहिले.

आपल्याला तर या काळात मोबाइलसारखे साधन उपलब्ध आहे ज्या आधारे आपण पाहिजे ते बघू आणि ऐकू शकतो, कोणालाही भेटू शकतो, मग २१ दिवस ते काय.

या सकारात्मक विचारामुळे एवढ्या मोठ्या आजारातून मी खडखडीत बरा झालो आणि १६ मार्चला माझे रुटीन परत चालू झाले.

लेख लिहिण्याचा उद्देश एवढाच की कोरोना positive दिवसेंदिवस वाढत चालले आहेत.

कोरोना आज ना उद्या नक्की जाणार किंवा राहिला तरी त्यावर मानवजात नक्की मात करणार तरी देखील -

सरकार आणि विरोधीपक्ष एकमेकांवर काय ताशेरे ओढायचे ते ओढू देत, पण तुमच्या घरच्यांना तुमच्याशिवाय आणि तुम्हाला तुमच्या घरच्यांशिवाय कोणी नाही त्यामुळे कुठलीही बेफिकिरी न करता, सर्व आवश्यक ते नियम पाळा, रोज व्यायाम करा विशेषतः प्राणायाम, उपलब्ध vaccine कुठलीही वेडी शंका न घेता घ्या आणि आपले आयुष्य आपल्या कुटुंबियांसह सुखाने व्यतित करा.

श्रीप्रसाद भालचंद्र रिसबूड
पुणे
दिनांक ०४ एप्रिल २०२१

field_vote: 
0
No votes yet