करोनाची लस

४५ च्या पुढच्या म्हाताऱ्यांना आजपासून लस घेता येणार असं वाचल्याने काल कोविन संस्थळावर नोंदणी केली. घराचा पिन कोड टाकल्यावर पालिकेचं सावरकर रुग्णालय आणि तिथल्या तारखा समोर आल्या. १३ तारखेपर्यंत जागाच नव्हती. मग जवळच्याच खाजगी रुग्णालयात जाऊन चौकशी केली, तर आरोग्य सेतू अॅपवर नोंदणी आवश्यक असल्याचं सांगण्यात आलं. रात्री पुन्हा कोविन संस्थळावर गेले तर आमचा पिन कोड टाकल्यावर घराच्या अगदी समोर असलेल्या लसीकरण केंद्राचं नाव आलं आणि आजची वेळही उपलब्ध होती. फोरनून आणि आफ्टरनून असे दोन स्लाॅट होते, मी आफ्टरनूनचा घेतला. जेवून पावणेदोनला मी आणि माझी मदतनीस दोघी पोचलो.
हे केंद्र पालिकेच्या एका नवीनच बांधलेल्या शाळेत आहे, या शाळेत डिसेंबरपर्यंत कोविड केअर सेंटर सुरू होते. रुग्णसंख्या कमी झाल्यावर ते बंद झाले होते, ते गेल्याच आठवड्यात पुन्हा सुरू झाले आहे. अॅम्ब्युलन्सचे आवाज रात्रीबेरात्रीही येऊ लागलेत पुन्हा. तर शाळेच्या मागच्या बाजूला एक प्रशस्त सभागृह बांधलेले आहे, तिथे लसीकरण केंद्र उभारले आहे. शेजारी मोठ्या मैदानात मांडव घालून शंभरेक खुर्च्या टाकल्या आहेत. पाणी, चहा, आणि अर्थात फोटो काढायची फ्रेम आहे. आम्ही गेलो तेव्हा पंचवीसेक लोक थांबलेले होते. आमचा नंबर येईस्तो अर्धा तास गेला असेल. दहा दहा लोकांना आत सोडत होते.
एक मराठी जोडपं आलं होतं. त्यातल्या बाईंनी कोणती लस मिळते याची बरीच चौकशी केली, जणू काही त्यांना हवी ती लस मिळत नसती तर त्या घरीच गेल्या असत्या. (कोविशील्ड देत आहेत.) मग त्यांनी त्यांच्या सासूला फोन केला. 'आई, आम्ही दोघं इथे आलोय. तुम्ही तयार राहा. अर्ध्या बाह्यांचा ड्रेस घाला. आधार कार्ड ओरिजिनल तयार ठेवा. नंबर जवळ आला की हा तुम्हाला घ्यायला येईल.' किमान सत्तरीच्या आईंना याआधीच लस का दिली नव्हती, असा प्रश्न मी विचारला नाही.
फोटो काढायची फ्रेम आमच्या समोरच होती. मग एकेकटीचे, जोडप्याचे असे अनेक फोटो निघाले. कोणी ना कोणी ओळखीचं भेटतंच फोटाे काढायला अशा ठिकाणी ते एक बरंय.
आम्ही आत गेलो. ४ संगणक होते. त्यांसमोर चार लोक बसलेले होतेच. त्यांची नोंदणी सुरू असतानाच लाइट गेले. देवा! थाेड्या वेळाने लक्षात आलं की सभागृहाच्या मागच्या भागात जिथे लस घेऊन बसलेले लोक होते तिथले पंखे सुरू होते. मग कळलं की ठिणगी उडून एक फेज गेली आहे. इलेक्ट्रिशियनची कामं आधीपासून सुरूच होती, केंद्र घाईघाईत सुरू केलेलं आहे त्यामुळे. अर्ध्या तासाने लाइट आले आणि पुन्हा मोठी ठिणगी पडल्याचा आवाज आला. अर्ध्या तासाने ते सुरळित झालं पण संगणकांचं वायफाय सुरू होत नव्हतं. मी म्हटलं, 'फोनचा हाॅटस्पाॅट घेऊन काम सुरू करा. घर जवळच आहे, डोंगल आणून देऊ शकते.' पण त्यांनी म्हटलं, 'केंद्र सरकारचा सर्वर आहे, हाॅटस्पाॅटवर कनेक्ट नाही हाेणार.' मला त्यातलं तांत्रिक कळत नसल्याने गप्प बसले. पण १० मिनिटांनी पाहिलं तर त्यांनी हाॅटस्पाॅटवरच काम सुरू केलं होतं. एकाने मला येऊन सांगितलंही, 'मॅडम, तुम्ही म्हणालात तसं केलंय बघा. आता एक डोंगल आणून ठेवतो इमर्जन्सीसाठी.'
मग यथावकाश नोंदणी झाली. कोविनवर आधी नोंदणी केल्याने फक्त फोन नंबर देऊन पटकन काम झालं. लस घेऊन अर्धा तास बसून घरी आलो. तिथेही अर्धा तास व्हायच्या आधीच घरी निघणारे वीर होतेच.
या केंद्रातले सर्व कर्मचारी मदत करणारे होते, शांतपणे बोलत होते, कोणाचाही आवाज चढला नव्हता. लाइट जाणं, पहिल्याच दिवशी, ही तशी मोठी गोष्ट. पण सगळ्यांनी नीट सांभाळून घेतलं. (लाइट जायलाच नकोत वगैरे बरोबर आहे, पण गेले ही खरी गोष्ट.)
सांगायची गोष्ट इतकीच, की सगळ्यांनी लस घ्या.

field_vote: 
0
No votes yet