होळी रे होळी...

" होळी रे होळी , पुरणाची पोळी "
लहानपणा पासून हेच गात आणि ऐकत आलो, आणि हो हे गात असतानाच रसना चळवळ जोमात सुरू होते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणाला पुरणाची पोळी आवडत नाही असा महाशय मिळणे तसे दुर्मिळच हो.
होळी आणि पुरणाच्या पोळीचं नातं अतिशय दृढ , होळीदिवशी आपण आपल्या आयुष्यातील सर्व वाईट गोष्टी, दुःख, नात्यांमधील कटुता यांची होळी करतो आणि नवीन मंगलमय सुरुवात करतो , नवीन आणि मंगलमय सुरुवात म्हणजे पुरणपोळीनेच व्हायला हवी हे ही खरंच.
महानैवेद्ययात सर्वोच्च स्थान पटकवलेली , आणि जिच्या शिवाय घरात कोणत्याही शुभ कार्याला शोभा नाही मग ते लहान बाळाचं उष्टावण असो की घरातील लग्न, साठीशांत किंवा पंच्चहत्तरी चा सोहळा किंवा लेक माहेरी आली की पुरणाचा बेत, अधिकमासाच निमित्त आशा सर्वच समारंभाला ती पाहुण्यांना तृप्त करून सोहळा संपन्न करते.
अशी ही पुरणपोळी तिच्याविषयी बोलावं तितकं कमीच ,
उद्या पुरण घालणार म्हणलं की महिलावर्गाची आदल्या दिवशी पासूनच चर्चा ,तयारी सुरू होते , कोणी म्हणतात १ वटीचं, कोणी १ किलोचे पुरण घालणार आहे , चर्चाही तिच्या तितक्याच रंजक, तिच्यासारख्या खमंग आणि मऊ लुसलुशीत असणारच , कोणी पैज लावून पुरणपोळी खातात, तर कोणी आमरसा सोबत भुरका घेऊन खातात. कशीही खावा हो, तिची गोडी कायम मनाला तृप्त करून समाधान देते.
○ जिचा थाट असा तिचं कौतुक ही तितक्याच प्रेमाने करावे लागते, छान मऊसर शिजवताना तिच्या आगमनाची झलक मिळते , बरं शिजवून घेतल्यावर तिचा " कट " काढण्याचा कट आधीच मनात शिजवायला लागतो , कारण कटाची आमटी ही तिची पक्की जोडीदार तिच्याशिवाय पुरणपोळीचा बेत संपन्न होणे नाही , बनवलेल्या पुरणाला वेलदोडा आणि जायफळाची खमंग वासाची खुसखुशीत सोबत हवीच , तेल आणि मीठ घालून मऊसूत मळलेल्या कणकेत , गोड खमंग पुरणाचा अलगद शिरकाव.. लाटताना तर तिची प्राजक्ताच्या फुलाला हाताळतो तशी हलकेच हातानी काळजी घ्यावी लागते, आणि जेव्हा ती तव्यावर पोहोचते, आणि त्यावर लोणकढ तुपाची धार पडते तेव्हा तिच्या घरभर पसरणाऱ्या घमघामाटाने स्वयंपाक घराकडे लहानग्या आणि मोठयांची पाऊले आपोआपच वळतात , कधी कधी तर शेजाऱ्यांचीही अपेक्षा उंचावते , आयती पुरणपोळी चालत घरी आली तर कोणाला नाही आवडणार , आणि मग ते नैवद्यआचे ताट तयार होताच कधी एकदा ताव मारतो आहे आणि रसना तृप्तीचा आनंद घेतोय हेच विचार मनी दरवळतात... या ताट भर आणि पोटभर जेवणानंतर विड्याच्या पानाचा आस्वाद घ्यायला मिळाला तर आणि काय हवे आयुष्यात ?

field_vote: 
0
No votes yet