पुस्तकवेड्यांची अजब दुनिया!

photo 1पुस्तक हाच विषय केंद्रस्थानी ठेऊन लिहिलेली पुस्तकं इंग्रजी साहित्यविश्वात मोठ्या प्रमाणात आढळतात. तसे पाहिल्यास मराठी साहित्यात अशी पुस्तकं फारच कमी प्रमाणात असावेत. मराठी साहित्यिकांना हा विषय कदाचित गौण वाटत असावा. परंतु पुस्तकसंस्कृती रुजवण्यात अशा प्रकारच्या पुस्तकांचा वाटा फार मोठा आहे.

मुद्रणाचा शोध सहाशे वर्षांपूर्वी झाला तेव्हापासूनच पुस्तकासंबंधी मोठ्या प्रमाणात विचार व कृती केले जात असावेत. वाचकांच्या हातात पुस्तक देत असताना तो एक अमूल्य ठेवा म्हणून ठेवला जात असावा. पुस्तक केवळ निर्जीव वस्तू नव्हे तर त्यामागे दडलेले विचार व लेखनाचे उद्दिष्ट यांनाही जास्त महत्त्व आहे, याची दर्दी वाचकांना नक्कीच जाण असावी. तर अशाच प्रकारचा ग्रंथ ठेवा नितीन रिंढे यांनी ‘लीळा पुस्तकांच्या’ या ग्रंथरूपात वाचकापर्यंत पोचवला आहे
लेखकांनी आपल्या प्रस्तावनारूपी विषयांतर या प्रकरणात मराठी पुस्तकसंस्कृतीबद्दल काही प्रश्न उपस्थित केले आहेत. महाराष्ट्रीयांच्या असलेल्या व/वा नसलेल्या पुस्तकसंस्कृतीचा लेखाजोखा मांडत असताना पुस्तकाविषयीची पुस्तकं हे दालन मराठीत फार समृद्ध नाही अशी खंत ते व्यक्त करतात. मुळात पुस्तकसंस्कृती आकाराला येण्यासाठी पुस्तकप्रेमी (bibliophile) व पुस्तकवेडे (bibliomaniac) अशा दोन्ही प्रकारचे लोक मोठ्या संख्येने असावे लागतात. पुस्तकप्रेमी/ग्रंथप्रेमी कुणाला म्हणावे व पुस्तकवेडे कुणाला म्हणावे याचे काही निकष ठरवता येतील. काही पुस्तकसंग्राहकांना एका विशिष्ट विषयाला/ लेखकाला/ प्रकाशकाला अनुसरून व त्यांना उपयुक्त अशा पुस्तकांचे वाचन व संग्रह करण्यावर भर असतो अशा व्यक्तींना आपण पुस्तकप्रेमी असे ढोबळपणे म्हणू शकतो. परंतु पुस्तकवेडे ही कॅटेगरी मात्र फार वेगळी आहे. त्यांना पुस्तकातील आशय व त्यातील विचार यांच्यापेक्षा इतर बाह्य गोष्टीवरच लक्ष जास्त असते. पुस्तकांचा जुनाटपणा, पुस्तकांची पहिली आवृत्ती, लेखकाने सही केलेली पुस्तकं, लेखक/अभ्यासक यांनी पानाच्या मार्जिनमध्ये केलेल्या नोंदी व टीका-टिप्पणी, इत्यादींच्यावर त्यांच्या पुस्तकसंग्रहाचा रोख असतो. यासाठी ते जिवाचे रान करतात; वणवण फिरतात; रद्दी उपसून काढतात व आपले ईप्सित पूर्ण करून घेतात.
आजसुद्धा आपल्या महाराष्ट्रात अशा पुस्तकप्रेमी/पुस्तकवेड्याची कमतरता नाही. उदाहरणार्थ, आपल्या बेळगावचे शंकरराव चाफाडकर, बदलापूरचे श्याम जोशी, मुंबईचे सतीश काळसेकर, सांगलीचे डॉ. तारा भवाळकर इ.इ. नावं पुस्तकदर्दींच्या यादीत अग्रक्रमाने कोरले जातील. तरीसुद्धा पाश्चात्य देशातील पुस्तकवेड्यांच्या तुलनेत ही संख्या अगदीच तुरळक असणार. कदाचित डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या कालखंडापूर्वी बहुजनांसाठी ज्ञानाचे दरवाजे बंद होते व त्यामुळे पुस्तकप्रेमी व पुस्तकवेड्यांची संख्याही कमी असावी. वाचक वर्गात सर्व जाती स्तरांचा समावेश होण्याची प्रक्रिया अद्यापही पूर्ण झालेली नाही असे लेखकांचे मत आहे.

लेखकाला अत्यंत आवडलेल्या वॉल्टर बेंजामिन या जगावेगळ्या संग्राहकाविषयी लिहिताना कुठल्याही संग्राहकात बेशिस्तपणा व विक्षिप्तपणा असल्याशिवाय तो पट्टीचा संग्राहक होऊ शकत नाही, असे उल्लेख करतात. वॉल्टर बेंजामिन (१८९२ -१९४२) हा एक जर्मन लेखक. ‘सिलेक्टेड रायटिंग्ज’ (पाच खंड), पत्रव्यवहाराचे खंड, ‘आर्केड प्रोजेक्ट’ व आयुष्यभर जमवलेल्या वैशिष्ट्यपूर्ण संग्रहांचा वेध घेणारा ‘अर्काइव्हज’ अशा ग्रंथसंपदांचा हा लेखक. हा रूढार्थाने अकॅडमिक स्कॉलर नव्हता. भाषिक विश्लेषण करणारा असला तरी तो भाषावैज्ञानिक नव्हता. धर्मशास्त्रात रस होता तरी तो धर्मशास्त्रज्ञही नव्हता. विसाव्या शतकात पूर्ण आयुष्य घालवत असला तरी एकोणिसाव्या शतकाने त्याला जंग जंग पछाडले होते. जुन्या वस्तू, जुनी पुस्तकं यांच्या वेडापायी तो मरेपर्यंत एकोणिसाव्या शतकातील युरोपियनाप्रमाणे तो जगत होता, वागत होता. एका प्रकारच्या विषण्णतेची गडद छाया त्याच्या आयुष्यात पसरलेली होती. त्यातच त्याचा दुर्दैवी अंत झाला.

वयाच्या पंधराव्या वर्षापासून पुस्तकाने पछाडलेल्या स्टुअर्ट केली यानी ‘द बुक ऑफ लॉस्ट बुक्स’मध्ये प्राचीन काळापासून आतापर्यंत नाहिशा झालेल्या पुस्तकांचे वर्णन केले आहे. कागदावर उमटलेली अक्षर/शब्द (व विचार) कधीना कधीतरी पुसून जाणार याचे प्रत्यंतर स्टुअर्ट केलीला आले. कारण लिहिण्यासाठी वापरला जाणारा कागदच मुळात नाशवंत आहे. तो सहज फाडता येतो. वेगाने तो जळतो. उंदीर, वाळवी यांचं ते खाद्य आहे. एवढेच नव्हे तर कागदाच्या व त्यावरील शाईच्या अंतर्गत घडणाऱ्या रासायनिक प्रक्रियेमुळे तो काळाठिक्कर/पिवळाधम्मक पडून अक्षरं पुसली जातात. जीर्ण होऊन त्याचे तुकडे तुकडे होऊ शकतात. त्यामुळे पुस्तकांना काहीतरी निमित्त घडून नष्ट होण्याचा धाक असू शकतो. गंमत म्हणजे स्टुअर्ट केलीच्या मते पुस्तकं नाहिशा होण्याचा एक सर्रास आढळणारा प्रकार म्हणजे तो जाणीवपूर्वक नष्ट करणे. स्वतःला मान्य नसणाऱ्या विचारसरणीची पुस्तकं जाळून टाकण्याची परंपरा अलेक्झांड्रियाच्या लायब्ररीतील पुस्तके जाळून खाक करण्यापासून हिट्लरच्या काळात सार्वजनिकरित्या पुस्तकांची होळी करेपर्यंत अनेक वेळा अनेक ठिकाणी टिकून आहे. स्टुअर्ट केलीने ग्रीक काळापासून एकोणिसाव्या शतकापर्यंत नष्ट झालेल्या पुस्तकांचा मागोवा घेतला व ‘द बुक ऑफ लॉस्ट बुक्स’ हे छानसे पुस्तक लिहिले.
पुस्तकाचा इतिहास हासुद्धा एखाद्या पुस्तकाचा विषय असू शकतो, याबद्दल लिहिताना याविषयीचे अनेक पुस्तकांचे उल्लेख नीतीन रिंढे करतात. मार्गारेट विल्स या लेखिकेचे ‘रीडिंग मॅटर्स’, अँड्रयू पेटिग्री यांचं ‘दि बुक इन द रिनेसान्स’, अ का प्रिओळकर यांचे ’द प्रिंटिंग प्रेस इन इंडिया’, नॅशनल बुक ट्रस्ट तर्फे प्रसिद्ध झालेले ‘हिस्टरी ऑफ प्रिंटिंग अंड पब्लिशिंग इन इंडिया’, शरद गोगटे यांचे ‘मराठी ग्रंथ प्रकाशनाची दोनशे वर्ष’, अभिजित गुप्ता संपादित ’प्रिंट एरिया’, ‘मुव्हेबल टाईप’ इत्यादी पुस्तकांचा उल्लेख ते करतात.
photo 2
पण ‘कॅसानोव्हा वाज अ बुकलव्हर अँड अदर नेकेड ट्रुथ्स अँड प्रव्होकेटिव्ह क्युरिअसिटीज अबाउट द रायटिंग, सेलिंग अँड रीडिंग ऑफ बुक्स’ असं लांबलचक शीर्षक असलेल्या जॉन मॅक्सवेल हॅमिल्टन याच्या पुस्तकाबद्दल मात्र ते भरभरून लिहितात. हॅमिल्टन हा पत्रकार असल्यामुळे गेली दोन-तीनशे वर्षातली मिळालेली भरगच्च माहिती पुस्तकभर विखुरलेली आहे व हॅमिल्टनने ती मनोरंजकपणे सादर केली आहे. पुस्तकाच्या शीर्षकातच मिस्कीलपणा उठून दिसतो, हे मान्य करायला हवे. खरे पाहता कॅसानोव्हाची बाईलवेडा, रंगेल, छंदीफंदी अशी प्रतिमा असल्यामुळे त्याचा पुस्तकाशी काय संबंध हा प्रश्न वाचकांच्या मनात उमटणे साहजिकच आहे. परंतु हॅमिल्टन या लेखकाच्या मते मात्र कॅसानोव्हा एक हाडाचा पुस्तकवेडा होता. त्याने इतर अनेक उद्योग केले असले तरी त्याला लेखक म्हणून घ्यायला आवडायचे. त्यासाठी त्यांनी अनेक अभिजात पुस्तकांचे भाषांतर केले. आपले लेख छापून आणण्यासाठी दोन मासिकं चालवली. इतिहास, तत्त्वज्ञान अशा गंभीर विषयावर लेखन केले. कविता रचल्या. नाटकं लिहिली. नास्तिक मताचा समर्थन केलं. नंतरच्या काळात लैंगिक आशय असलेली कविता वाचून दाखवल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला. पुस्तकांमुळे त्याला तुरुंगवास भोगावा लागला. तसाच तो पुस्तकामुळे तुरुंगातून निसटूही शकला.

पाश्चात्य साहित्यविश्वात अल्बर्टो मँग्वेल यांचा समीक्षक, कादंबरीकार आणि अनुवादक म्हणून दबदबा आहे. पण अलीकडच्या काळात पुस्तकाविषयीच्या पुस्तकांचे लेखक म्हणून त्याची एक नवी ओळख तयार झाली आहे. ‘लायब्ररी अ‍ॅट नाईट’ या ग्रंथालयकेंद्रित पुस्तकात ग्रंथालयाचा इतिहास गुंफला आहे. त्याच्या मते ग्रंथालयातील पुस्तकं रात्रीच्या वेळी एकमेकांशी संवाद साधतात म्हणून तो शक्यतो दिवसा पुस्तकं वाचतो. ग्रंथालयाच्या जन्माची कथा उलगडताना त्याचं नातं अलेक्झांड्रिया ग्रंथालयाशी तो जोडतो. ग्रंथालयाची स्वतःची एक आयडेंटिटी असून आजच्या आत्मकेंद्री, असहिष्णू व विषारी समाजकारणावर ग्रंथालयातून प्रसवणारी बहुसांस्कृतिकता रामबाण उपाय ठरेल, असे त्याला वाटते. पुरेशी जागा नाही या सबबीखाली जेव्हा ग्रंथालय आपले संग्रह निकालात काढतात तेव्हा ती राष्ट्रीय संपत्तीची हानी असते, याचे अनेक दाखले मँग्वेलनी ‘लायब्ररी अ‍ॅट नाईट’मध्ये दिलेली आहेत.

लेखक रिंढे यानी वर्णन केलेल्या झोरान झिवकोविच या सर्बियन लेखकाच्या ‘द लायब्ररी’ या कथासंग्रहातल्या कथेमधील जग पुस्तकांनीच व्यापलेले आहे. एका कथेत पुस्तकांनी घराचा पूर्ण ताबा घेतल्यामुळे मालकाला घराबाहेर काढलेल्या भयस्वप्नाचे वर्णन आहे. अजून एका कथेत नायक मृत्यूनंतर नरकात जातो. परंतु त्याला उकळत्या तेलाच्या कढईत किंवा आगीत होरपळण्याच्या शिक्षा देण्याऐवजी ग्रंथालयात अनंत काळपर्यंत वाचत बसण्याची शिक्षा दिली जाते. नरकातील कारकुनाच्या नोंदीप्रमाणे हा माणूस जिवंतपणे फक्त दोन पुस्तकांना हात लावलेला असतो; त्यापैकी एका पुस्तकाची चार पाने व दुसऱ्या पुस्तकाlतील एक परिच्छेद एवढेच वाचन केल्यामुळे त्याला ही जबरदस्त शिक्षा सुनावली जाते.

पुस्तकांच्या जगातील अनभिषिक्त सम्राटाचा दर्जा वाचकांचा असतो. लेखकसुद्धा त्यांच्यासमोर गौण ठरतो. वाचक नावाची एक नवीन प्रजातीच मुद्रण व्यवसायानंतर जन्माला आली असे म्हणावयास हरकत नाही. एकेकाळची श्रोत्यांची जागा वाचकांनी घेतली. अशाच वाचकांच्याभोवती इतालो केल्विनोचा ‘इफ ऑन अ विंटर्स नाइट अ ट्राव्हलर’ व मार्सेल बुनोबुचे ‘डम्प धिस बुक व्हाइल स्टिल यू कॅन’ या कादंबऱ्या लिहिल्या आहेत. याचेच वर्णन लेखकानी एका प्रकरणात केले आहे. रिंढे यांच्या मते पुस्तकाशी असणार वाचकांच नातं जेवंढ आनंददायक असतं तेवढच यातनादायकही असतं. पण हे अशा आनंददायक - यातनादायक नातं कादंबरीत उलगडत जातं तेव्हा आपल्यासारखे वाचक नक्कीच सुखावतात.

पुस्तक आणि माणूस यांच्यातील नातेसंबंध हे युरोपियन संस्कृतीतील विविध पैलूतील महत्त्वाचा पैलू असे म्हणता येईल. या नात्याचे अनेक छटा कादंबरीत व्यक्त होत असतात. मिग्वेल डी सेर्व्हांटिस याचे ‘डॉन किहोते’ या साहसवेड्याची कादंबरी असो, की पास्कल मेसिअर याचे ‘नाईट ट्रेन टु लिस्बन’ असो किंवा कार्लोस झाफोनचा ‘द शॅडो ऑफ द विंड’ असो त्यांच्या आशयातील वैचित्र्यामुळे वाचक खिळून जातो. ‘द शॅडो ऑफ द विंड’मध्ये पुस्तकाच्या कबरस्तानाची कल्पना लढवली आहे. जी पुस्तकं वाचली जात नाहीत अशा विस्मृतीत जमा झालेल्या पुस्तकांना या कबरस्तानात आश्रय मिळतो. या कादंबरीतील नायक एकदा फक्त शीर्षक वाचून पुस्तक विकत घेतो व रात्रभरच्या प्रवासात व्यक्तीशोधाबद्दलचे हे पुस्तक वाचून संपवतो. पुस्तकात केवळ व्यक्तीचा शोध नसून पोर्तुगालमधील सालाझार राजवटीची जुलुमशाही आणि व्यक्तींची नैतिकता म्हणजे काय या प्रश्नाचा शोध घेतलेले असते. खरे पाहता शोध घेणं हा मुळातच लोकप्रिय रहस्यकथांचा आकृतीबंध. परंतु या कादंबरीत हा शोध वेगळ्या पातळीवर होतो.

आपल्याला कादंबरीचा विषय कसा सुचला, आपण कादंबरी का लिहिली या विषयावरील लेखन उम्बर्टो इकोसारख्या लेखकांनी केले आहे. त्याचे याविषयीचे ‘कन्फेशनस ऑफ अ यंग नॉव्हेलिस्ट’ हे पुस्तक गाजले त्याचेच अजून एक ‘सिक्स वॉक्स इन द फिक्शनल वुड’ हे पुस्तकसुद्धा याच विषयाशी संबंधित आहे. मारियो वऱ्हास योसा या लॅटिन अमेरिकन लेखकाचे ‘राईटर्स रिअलिटी’ आणि टर्की लेखक ओरहान पामुक यांचे ‘द नाइव्ह अँड द सेंटीमेन्टल नॉव्हेलिस्ट’ ही पुस्तकंसुद्धा कादंबरीकाराच्या लेखन प्रक्रियेवर झोत टाकतात. उम्बर्टो इको यांनी संगणक व माध्यमक्रांती यामुळे मानवी जीवनात गेल्या अर्धशतकात जे मोठे परिवर्तन घडून आले त्या विषयी भरपूर लेखन केले आहे गंमत म्हणजे वयाच्या सत्तावन्नाव्या वर्षी पहिली कादंबरी लिहिलेला हा ‘यंग’ कादंबरीकार गोष्टीरूपातच समीक्षा, सदरलेखन, तत्त्वज्ञान, समाजशास्त्र इत्यादीवर लिहितो. आपला पीएच डीचा प्रबंधदेखील एखाद्या गुप्तहेर कथेसारखे लिहिल्यामुळे परीक्षकांची नाराजी त्याला पत्करावी लागली. अकादमिक वर्तुळातील विद्वान समीक्षक अशा प्रकारच्या गोष्टीवेल्हाळांना तुच्छ लेखतात. परंतु वाचक मात्र खूश असतात.
photo ३
झपाटलेपणा हासुद्धा पुस्तकवेडासाठी पुरेसे कारण ठरेल. झपाटलेपणाचा असा कोणताच फॉर्मुला नसतो. कोणत्या क्षणी, कशामुळे, कोणामुळे माणसं झपाटले जातील, हे सांगता येत नाही. परंतु झपाटून जाणं हे आयुष्यभर पुरू शकतं. अशाच एका झपाटलेल्या अत्तरविक्याची गोष्ट एका पुस्तकाचा विषय आहे. झॅग ग्युरिन ह्याला मार्सेल प्रूस्त या फ्रेंच कादंबरीकाराने झपाटले होते या कादंबरीकाराच्या प्रेमात पडल्यानंतर ग्युरिनने प्रूस्तच्या मिळतील त्या प्रकाशित/अप्रकाशित पुस्तकं, त्यानी हाताळलेल्या वस्तू, त्याच्यावरील नाटकं/चित्रपट इत्यादींची पुनर्मांडणी करत प्रूस्तला अजरामर करण्याचा वसा तो पत्करतो. लोरेन्झा फोशिनी या संशोधिकेने लिहिलेल्या ‘प्रूस्तस् ओव्हरकोट’ या पुस्तकामुळे झॅग ग्युरिनची कथा जगाला कळाली.

आर्तुरो पेरेझ – रिवेर्ते हा स्पॅनिश रहस्यकथा लेखक. त्यानी लिहिलेले ‘द्युमाज क्लब’ हे पुस्तक सर्वसाधारण वाचकांसाठी एक रहस्यकथा असू शकेल. पण एखाद्या पुस्तकवेड्या वाचकाला हे पुस्तक आणखी वेड लावेल. जुन्या दुर्मिळ पुस्तकांच्या हस्तलिखितांचा ठावठिकाणा शोधणं, हस्तलिखितांच्या वा पुस्तकांच्या प्रती खऱ्या आहेत की बनावट हे शोधणं या भोवती हे पुस्तक विणलेले आहे. दुर्मिळ पुस्तकांचे मूल्य कशावरून ठरते, त्यांची खरेदी-विक्री कशी होते, इत्यादीविषयीची चर्चा या कादंबरीत जागोजागी आहे. नकली प्रती तयार करणारे लोक, त्यासाठी कागद-शाई जुनी दिसावी यासाठी वापरलेल्या करामती, वेगवेगळया कालखंडातील छपाई व पुस्तक बांधणीच्या तंत्रांचा बारकाईने केलेला अभ्यास, त्या त्या काळच्या अक्षरांच्या टाइपमध्ये होत गेलेले बदल इत्यादीबद्दल वाचताना वाचक थक्क होतो.

‘अ‍ॅट होम विथ बुक्सः हाऊ बुकलव्हर्स लिव्ह अँड केअर फॉर देअर लायब्ररीज’ या कॉफी टेबल टाइपचे हे पुस्तक इस्टेले इलियास, कॅरोलिन सीबॉम आणि क्रिस्तोफर सिमॉन सेइक्स या तिघानी मिळून लिहिले आहे. पुस्तकाच्या शीर्षकातच एक प्रकारचा निवांतपणा आहे, विनाव्यत्यय जवळीक, एकांत आहे, पुस्तकप्रेमाची ऊब आहे. ऐसपैस मोठ्या आकाराच्या या पुस्तकात पानोपानी विखुरलेल्या छायाचित्रांमधून पुस्तकाने भरभरून वाहणारी जिने, भिंती, टेबल, कपाट, खुर्च्या, खिडक्यांची कठडे यांना बघताना वाचक वेडा होतो. मजकुरात जितकं बोलतं त्याहून कितीतरी पटींनी छायाचित्रातून पुस्तकीवेडेपणाचे दर्शन हे पुस्तक घडवतं. छायाचित्रांमध्ये पुस्तकात बुडालेले पुस्तकवेडे, लेखक. वाचक आपल्याला दिसतात. त्यांच्या चेहऱ्यावरील पुस्तकाबद्दलचा जिव्हाळा उठून दिसतो.

खरे पाहता पुस्तक वेड्यांच्याबद्दलच्या पुस्तकात बुकशेल्फ वरचा लेख काहीसा असंबद्ध वाटेल. बहुतेक पुस्तकवेड्यांचे पैसे पुस्तक खरेदीतच खर्च होत असल्याने पुस्तकासाठी कपाट बनवून घेण्यात टाळाटाळ करण्यकडे त्यांचा कल असतो. पुस्तकं कमी असतात तेव्हा घरात त्या कुठेही पसरलेले असतात. पुस्तक कुठेही तुम्ही ठेवलात तरी बिचारे अंग चोरून घेऊन बसतात; उभी राहतात; आडवे पडतात. परंतु जेव्हा पुस्तकांची संख्या वाढत जाते तेव्हा मात्र बुकशेल्फची आठवण येते. बुकशेल्फचे विविध आकार, त्याची रचना संग्राहकाच्या/ग्रंथालयाच्या कुवतीप्रमाणे बदलत जातात. या बुकशेल्फचा अतिशय रोचक इतिहास हेन्री पेट्रोस्की याच्या ‘द बुक ऑन बुकशेल्फ’ (बुकशेल्फवर ठेवलेले पुस्तक या अर्थाने नव्हे!) या पुस्तकात वाचावयास मिळते.

आपण वाचत असलेल्या/वाचून संपवलेल्या पुस्तकांतलं आपल्या किती व काय काय लक्षात राहते असे एखाद्या पुस्तकप्रेमीला विचारल्यास ती व्यक्ती अडखळते. कारण वाचलेल्या पुस्तकांची संख्या प्रचंड असल्यामुळे सर्वकाही लक्षात ठेवणे अशक्य होते. परंतु यावर उपाय म्हणून अनेक पुस्तकप्रेमी पुस्तक वाचत असतानाच मार्जिनमध्ये नोंदी ठेवतात, पेन/पेन्सिलीने खुणा करतात, काही वाक्य/शब्द अधोरेखित करतात. वैयक्तिक पुस्तकातील समासातील या विद्रुपीकरणाला (मार्जिनालियाला) सर्व गुन्हे माफ! ‘परफ्युम’ या जगप्रसिद्ध फ्रेंच कादंबरीचा लेखक पॅट्रिक झस्किंड याने या समासातील नोंदीचा मागोवा घेत ‘थ्री स्टोरीज अँड अ रिफ्लेक्शन’ हे पुस्तक लिहिले आहे. वाचनसंस्कृतीविषयीच्या संशोधनात मार्जिनालिया हा एक महत्त्वाचा अभ्यासविषय बनला आहे. एच जे जॅक्सन या संपादक-विदुषीने लिहिलेलं ‘मार्जिनालियाः रीडर्स रायटिंग इन बुक्स’ या पुस्तकाचा नीतीन रिंढे आवर्जून उल्लेख करतात.

पुस्तकाचे विक्रीयोग्य दर्शनीय भाग म्हणजे त्याचे मुखपृष्ठ. परंतु बहुतांश वाचक मुखपृष्ठावर न रेंगाळता लगेच पान उलटून मजकूर वाचू लागतात. मुखपृष्ठ कितीही कलात्मकतेने सजविले असले तरी वाचक, समीक्षक, पुस्तकाचे मूल्यमापन करणारे, इत्यादी घटकांकडून कायमच दुर्लक्षित केलेली ही बाब असते. पुस्तकाच्या अशा अतीपरिचित परंतु पूर्ण दुर्लक्षिलेल्या मुखपृष्ठांचा इतिहास अ‍ॅलन पॉवर्स या लेखकाने ‘फ्रंट कव्हर’ या पुस्तकात दिला आहे.

वाचनाविषयी उदासीन असलेल्या या समाजात पुस्तकं जमविणारे आणि ते वाचणारे साहजिकच अल्पसंख्य आहेत. परंतु पुस्तकप्रेमी व पुस्तकवेडे आपण जमवलेली सर्वच्या सर्व पुस्तकं वाचतीलच याचा नेम नाही. पुस्तक दिसले की अधाश्यासारखे विकत घेतील व सवड मिळेल तेव्हा केव्हातरी वाचून काढतील. आपण पुस्तक वाचले नाही याची खंत मात्र त्यांना अस्वस्थ करते. वाचनाविषयी अपराधगंड दूर करणारे ‘हाऊ टू टॉक अबाऊट अ बुक यू हॅवन्ट रेड’ हे पुस्तक असून त्याचा लेखक आहे पियरे बायर्ड. पुस्तकप्रेमींच्या न वाचण्यामागचा तत्त्वज्ञान सांगणारे हे पुस्तक आहे.

नितीन रिंढे यांनी या पुस्तकातील एका प्रकरणात हिंदू या दैनिकात सदर लिहिणाऱ्या प्रदीप सेबॅस्टीअन या भारतीय लेखकांच्या ‘ग्रोनिंग शेल्फ’ या पुस्तकाबद्दल लिहिले आहे. पुस्तके गोळा करणे, त्याची मांडणी, पुस्तकांचे मुखपृष्ठ. त्याची बांधणी, पहिल्या आवृत्तीचा संग्रह करणारे नादिष्ट, पुस्तकाविषयी पुस्तक लिहिणारे लेखक, पुस्तकांचे इतिहासकार, जगातील काही मोठी व उत्तम पुस्तकांची दुकाने, पुस्तकाविषयीचे चित्रपट, पुस्तकाविषयीच्या कादंबऱ्या, पुस्तकाविषयीचे वेबसाईट, ई-बुक रीडर अशा विविध विषयावरील मुक्तचिंतन या पुस्तकात आहे.

माणूस पुस्तक का वाचतो या प्रश्नाचे उत्तर जॉन कॅरे (‘द अनएक्स्पेक्टेड् प्रोफेसरः अ‍ॅन ऑक्सफर्ड लाईफ इन बुक्स’ या पुस्तकाचे लेखक) यानी मार्मिकपणे दिलेले आहे. विचार करण्याचे, अनुभव घेण्याचे अनेक मार्ग वाचन खुले करते; वाचन चिकित्सेला बळ देते; तुमच्या धारणा, विचार यांच्यातील एकांगी ठामपणा डळमळीत करते; साध्या गोष्टींमधल्या असामान्यत्वाचे भान देते; वाचन तुम्हाला दुसऱ्याच्या मनात प्रवेश मिळवून देतो आणि त्या दुसऱ्यांना ती तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा हिस्सा बनवते; वाचन म्हणजे तुम्हाला पडलेल्या तुमच्या अस्तित्वाच्या विचारशक्‍तीच्या त्रासापासून मुक्त होणारी गोष्ट.
लेखकाने इतर काही प्रकरणात एका नामांकित विद्यापीठातील प्राध्यापक दुर्मिळ पुस्तकांचा विक्रेता कसा बनला याबद्दल, पुस्तकचोराच्या मागोवा घेतलेल्या गुप्तहेराबद्दलच्या पुस्तकाबद्दल, शब्दकोश तयार करणाऱ्या सॅम्युएल जॉन्सन या आद्य शब्दकोशकाराबद्दल, क्रूरकर्मी अडॉल्फ हिट्लरच्या पुस्तकसंग्रहाबद्दल, व पुस्तकांच्या पॅशनविषयी लेख लिहिलेले असून हे लेखसुद्धा तितकेच वाचनीय आहेत.
photo 4
पुस्तकासंबंधी विचार करत असताना पुस्तकं मानवी जीवनातून नाहिश्या झाल्यास काय होईल ही भीती कायमची असते. उम्बर्टो इकोच्या मते अशी भीती बाळगण्याचे कारण नाही. कारण जोपर्यंत भाषा जिवंत राहते तोपर्यंत पुस्तकाला, मग ते मुद्रित स्वरूपात असो की डिजिटल स्वरूपात असो की क्वांटम/नॅनो स्वरूपात असो, मरण नाही. जग कितीही बदलले तरी पुस्तकं कुठल्या ना कुठल्या स्वरूपात टिकून राहणारच. चाकाचा शोध प्राचीन काळी झाला म्हणून तो काही त्याज्य झाला नाही. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळ्या स्वरूपात चाक वापरत असले तरी ‘चाक’ ही संकल्पना कायम राहिली. तसाच प्रकार पुस्तकांच्या बाबतीतही आहे, असे उम्बर्टो इकोला वाटते.

लेखकानी एके ठिकाणी म्हटल्याप्रमाणे पुस्तकवेड्यांच्या पुस्तकसंग्रहाबद्दलचा अत्युत्साह बघता पुस्तकाचे स्वरूप बदलेल, कागदावर छापलेली पुस्तकं जाऊन त्याजागी ई-पुस्तकं येतील, पण त्यातही ‘वाचन करणे’ ही गोष्ट कायम राहील. जोवर माणसाला नवनव्या गोष्टी जाणून घेण्याची, अनुभवण्याची तहान आहे तोवर पुस्तकांना (व पुस्तकवेड्यांनासुद्धा!) मरण नाही.

लीळा पुस्तकांच्या
नीतीन रिंढे
लोकवाइमय गृह प्रकाशन
पाः १८९, किः २५० रु

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
0
No votes yet