सिलिकाच्या प्रदेशाकडे

#ललित #संसर्ग #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक२०२०

सिलिकाच्या प्रदेशाकडे

मूळ लेखक : मानस रे

भाषांतर - सोफिया
(Indian Literature (साहित्य अकादमी, दिल्ली), ऑगस्ट-सप्टेंबर २०१०च्या अंकात प्रकाशित)

ज्या क्षणाला टॅक्सीनं वेग घेतला, त्याक्षणी मी काहीतरी मागे विसरलो याची मला जाणीव झाली. हां, जेवणाचा डबा! गुगुलची बोटं डब्याच्या कडा चाचपडायला लागली. डबा तिथे नव्हताच. पण टॅक्सीतून उतरायची गरजच पडली नाही, पारुलनं आम्हांला डबा आणून दिला. पारुल, इतक्यातच लागलेली आमची मध्यमवयीन कामवाली. माझ्या आईचा बाल्कनीतूनच शेरा आलाच, "देवाशपथ, कधीतरी काहीही न विसरता बाहेर पडलाहेस का तू!"

सध्या सगळेजण माझ्यावर नाराज आहेत. मी नक्की काय करावं आणि कसं वागावं, ह्याबद्दल मी अनेकदा विचार करतो. माझ्या सहकाऱ्यांनी पण मला खोडसाळपणे विचारलंच "तू कलकत्त्याचा उन्हाळा टाळण्यासाठी लांबचं ठिकाण शोधतो आहेस नं?" खरंच, मी पण स्वत:ला तोच प्रश्न विचारला. मी बंगलोरला जात आहे, ते माझ्या मुलाची तिथल्या निवासी शाळेत नावनोंदणी करायला. श्रावणी, माझी बायको, तिच्या नवीन नोकरीनिमित्तानं दिल्लीला आणि मी इथेच कलकत्त्यात राहणार. सोळा वर्षांच्या लग्नानंतर ही आमची सध्याची साहचर्याची व्यवस्था. आता लोकांना याबद्दल काय वाटायचं ते वाटू दे.

आजचा दिवस माझ्यासाठी मोठ्या भाग्याचा होता. ट्रॅफिक सिग्नलला जीव मेटाकुटीला येईस्तोवर थांबायला लागलं नाही. आमची टॅक्सी लाल दिव्यापाशी थांबते, समोर ११३ सेकंदांचा आकडा दिसतो आणि तो जेमतेम ९०पर्यंत येत नाही तोच दिवा हिरवा. जादूचा दिवा! पावसाची कधीची वाट बघत होतो; आम्ही अर्ध्या रस्त्यात आल्यावर त्यानं अवतरण्याची कृपा केली. अगदी लहानसहान, फुटकळ गोष्टींनीसुद्धा एकदम भारावून जायची सवय मी चांगलीच आत्मसात केली आहे. त्यामुळे मी लगेच भारावून तारस्वरात 'आगमनी' या पावसाच्या गाण्याची दोन कडवी दांडग्या उत्साहात गायली. गुगुलनं तात्काळ माझ्या उत्साहाला खीळ घातली, "बाबा, प्लीज …..!" त्याची याहून काय वेगळी प्रतिक्रिया येणार?

"तुला नाही कळणार बेटा ते" त्याच्या प्रतिक्रियेनी नाउमेद न होता मी त्याला समजावलं, "माझ्या लहानपणी दरवर्षी नवरात्रात, पूजेच्या आधी, माझ्या आजीच्या घरी एक फिरस्ता भाट हे गाणं म्हणायचा…" खरंच, कुठे गेलं ते सगळं? तो भाट, ते गाणं आणि ते लाल-पांढरं तुतीचं झाड!" "दुर्गापूजेला अजून कितीतरी महिने आहेत," गुगुल माझ्याकडे एक प्रश्नार्थक कटाक्ष टाकत म्हणाला, आणि नंतर एखाद्या तत्त्ववेत्त्याच्या आविर्भावात उद्गारला, "तुम्ही हे म्हाताऱ्याचं नाटक फार चांगलं वठवता असं खरंच वाटतं का तुम्हाला?" मी खजील होऊन पुटपुटलो, "कदाचित हे फक्त नाटकच आहे!"

ट्रेन तिच्या प्लॅटफॉर्मवर उभी आहे. सुटायला अजून वीसेक मिनिटे आहेत, घड्याळ म्हणतंय. टॅक्सीचा प्रवास निर्वेध पार पडल्यामुळे मला स्वत:बद्दल एक निराळाच विश्वास जाणवतो आहे, आणि कसल्यातरी उन्मादातच मी ट्रेनच्या डब्यात शिरलो. मधल्या पॅसेजमध्यल्या गर्दीला धक्के देत, आमच्या सीटस्‌जवळ पोहोचलो आणि बघतच राहिलो. आम्ही नेहमीच मोजकं आणि सुटसुटीत सामान घेऊन प्रवास करतो, फक्त दोन ट्रॉलीवाल्या बॅगा. पण तिथे पाहातो तर तिथे बोटभरसुद्धा जागा शिल्लक नाही. ह्या एवढ्या गर्दीत नक्की कोण प्रवासाला जातंय आणि कोण सोडायला आल्येत, ह्याचा काहीएक पत्ता नाही.

एवढ्या सगळ्या गदारोळात एका बाजूला एक वयस्कर बाई अत्यंत नामानिराळी होती, अगदी नवल वाटावं इतकी. ती ज्या प्रकारे बसली होती, त्यामुळे तिच्या साडीच्या काठाची जांभळी नक्षी अगदी व्यवस्थित मांडून ठेवल्यासारखी दिसत होती; बिनाफ्रेमचा महागडा चश्मा तिच्या नाकावर होता. तिच्या समोर एक अठरा-एकोणीस वर्षांची, थोडीशी गुबगुबीत मुलगी एका हातात चॉकलेट आहे हे विसरून, दुसऱ्या हातातल्या तिच्या मोबाईलच्या जादुई विश्वात रममाण झाली होती. तिच्या बाजूला एक तिच्याच वयाची एक मुलगी बसली होती, ती मात्र बहुधा बंगाली नसावी. तिनं समोरच्या सीटवर पाय पसरले होते; तिच्या हातात एक रंगीबेरंगी पुस्तक होतं.

माझी नेहमीची असुरक्षिततेची भावना उसळी मारून वर आली, "हे अगदीच विचित्र आहे!" मी मोठ्यानं म्हणालो. "आता मी आमचं सामान कुठे ठेवू?" त्या साडीवाल्या बाईच्या बाजूला एक म्हातारे गृहस्थ वर्तमानपत्र वाचत बसले होते. त्यांनी आपली नजर उंचावून मला न्याहाळलं. त्यांच्या चेहऱ्यावर एक तिरस्काराची भावना तरळून गेली असं मला वाटलं.

ह्या सगळ्या गोंधळात माझ्या त्रासाला कारणीभूत असलेला एक होल्डॉल आपलं बेढब डोकं आमच्या सीटखालून बाहेर काढत होता.
"हा कोणाचा आहे रे? कुणाचा आहे हा?"मी मोठ्यानं विचारलं.
एसी डब्याच्या धुरकट काचेतून बाहेरच्या सावल्यांवर पाळत ठेवणाऱ्या बाईंनी माझ्याकडे मान वळवली, आणि मी त्या होल्डॉल तिथे ठेवणारा चुकार पुढच्या कंपार्टमेंटात शोधावा असं सुचवलं.
मी बाजूच्या कंपार्टमेंटात डोकावलो तर तो चुकार तिथे उगवला.
"ही तुमची सीट आहे? तुमचा बर्थ कोणता? हा माझा आहे?!"
त्याला त्याचा होल्डॉल सीटखालून काढताना पाहून माझ्यातली असुरक्षिततेची भावना पुन्हा उफाळून आली. "तुम्हाला खोटं का बोलावं लागावं? मुळात तुम्ही खोटं बोलताच का?"

गुगुलनं आमचं सामान आता रिकाम्या झालेल्या जागेत ठेवलं आणि माझ्या कानात कुजबुजला "बाबा, पुन्हा तेच!" रंगीबेरंगी पुस्तकवाल्या मुलीनं आपली बॅग वरच्या बर्थवर चढवली आणि आमच्या सामानासाठी पुरेशी जागा झाली. ट्रेननं हळूहळू प्लॅटफॉर्म सोडायला सुरुवात केली होती. बाहेरच्या सावल्यांवर पाळत ठेवणाऱ्या बाईनं आपली नजर आत हलविली. तिने तिचा खास मसाला काढला आणि भविष्यवाणी केली, "एकदा गाडीनी वेग घेतला की सगळ्यांचं सामान आपोआप मावेल."

"कोणत्या वर्गात आहेस? ओहो, तू आता ऍडमिशन घेणार आहेस? शाळा चांगलीच असणार... तुम्ही बघाल अगदी ओळखू न येण्याइतका बदलून जाईल हा... नाही हो, शाकाहारी जेवणाची काही फारशी अडचण नाही होणार. आणि होते सवय सगळ्या गोष्टींची हळूहळू, काही काळजी करू नका."
"नऊ डाग म्हणजे काही खूप नाही, आता नातीच्या दीक्षासमारंभासाठी जायचं ते तेवढं सामान होणारच ना", पुन्हा मसाल्याचा तोबरा भरत, त्यांनी सर्वज्ञाच्या थाटात आपलं बोलणं सुरू ठेवलं.

विनोद, वायफळ बडबड. मला आत्मविश्वास येण्यासाठी हे पुरेसे होतं.

"तुम्ही नक्की कलकत्त्याचे असणार. पाणी तुंबण्याचे प्रकार वगळता शहराचा तो भाग छानच आहे".
"काहीही! तुम्हांला काय वाटतं, मणिकाकांच्या गल्लीत पाणी तुंबतं म्हणजे काय लेक गार्डन्सचा अख्खा भाग पाण्याखाली जातो की काय? तो अलीकडे बांधलेला फ्लायओवर मात्र एकदम देखणा आहे बरं का"
तुम्ही काम कुठे करता?
माझ्या कामाबद्दलची चौकशी करणारा हा अपेक्षित प्रश्न आलाच.
"मी मार्केटींग आणि सेल्समध्ये... डेंटिस्टकडे लागणारी उपकरणं आणि अलेम्बिक, हो, हो, ते मुख्यत: फार्मामध्ये आहेत पण सध्या डायव्हर्सिफाय करत आहेत, इतक्यातच फर्टिलायझरर्समध्ये पण काम सुरू केलंय.
माझ्या उपजीविकेच्या व्यवसायाबद्दल ऐकून त्या माणसाला फार समाधान झालं नाही. त्यानं त्याच्या चष्म्यावरून माझ्याकडे एक अविश्वासपूर्ण कटाक्ष टाकला आणि आमच्या संभाषणात अचानक एक प्रकारचा ताण निर्माण झाला.
**
गुगुल त्याच्या रॅपच्या विश्वात हरवला. ती गुबगुबीत मुलगी अजूनही तिच्या मोबाईलमध्येच रमली होती. आता तिनं कानावर तिचे हेडफोन्स चढवले आणि गाणी ऐकता ऐकता मधूनच ते एकमेकांशी अधूनमधून बोलत होते.

दुसरी मुलगी ती वाचत असलेल्या आपल्या रंगीबेरंगी पुस्तकामधून वेळोवेळी डोकं काढून संभाषणात भाग घेत होती. बंगाली मुलीचं नाव रागिणी आणि दुसरीचं श्रेया. त्या दोघी बंगलोरला बायकोटेक्नॉलॉजी शिकत होत्या. त्या त्यांच्या पहिल्या वर्षाची परीक्षा झाल्यावर घरी आल्या होत्या, आणि आता त्या बंगलोरला परत जात होत्या.

माझ्या बाजूला बसलेले ते गृहस्थ (त्यांचे नाव मिस्टर बासू हे मला एव्हाना कळलं होतं.) आता बाटीकची लुंगी आणि
बनियन घालून आले होते. त्यांनी त्या संभाषणातील बायोटेक्नॉलॉजी ह्या शब्दाचा धागा पकडला आणि घोषणा केली "बायोटेक!" पण त्यांच्या त्या आकाशवाणीत अजिबात कुतूहल नव्हतं, उत्साहही नव्हता, नाही म्हणायला मत(!)प्रदर्शनाचा प्रयत्न होता पण त्यालाही ह्या क्षणी खीळ बसली होती.

आमची जेवणं झाली. काही वेळ झोपायची सोय करण्यात गेला. बऱ्याच लोकांसाठी ट्रेनप्रवासातील पहिली रात्र, खास करून जर प्रवास दोन रात्रींचा असला तर दुसऱ्या रात्रीची रंगीत तालीम असते. कदाचित त्यामुळे प्रवासाचा शीण जाणवत नसेल.

झोपण्याची तयारी करत असताना, मला आमच्या समोरच्या खिडकीजवळ बसलेली एक वृद्ध बाई दिसली, बरोबर एक मध्यमवयीन माणूस बसला होता, बहुतेक तिचा मुलगा असावा. काठाचा रंग पार उडालेली, जुनाट दिसणारी साडी आणि निर्विकार डोळे. तरीही त्यात एक संगती होती. तो माणूस कष्टाचं काम करत असावा. त्या दोघांना एकमेकांशी बोलण्यासाठी शब्दांची गरजच नव्हती. त्यांच्यातील बहुतेक संवाद त्यांच्या हालचालींमधूनच घडत होता. कदाचित त्यांना ह्या असल्या प्रवासाची सवय असावी.

गुगुल आणि रागिणीमध्ये कॅसेट्सची देवाणघेवाण झाली. त्यांचे निद्रासोबती म्हणजे एकतर रॅप, रेगे किंवा त्याच प्रकारचं कुठलं तरी संगीत. मी वरच्या बर्थच्या पायऱ्या चढायला जाणार, तेवढ्यात क्षणभर थांबलो आणि मुलींना विचारलं, "युकॅरियोटिक जिनोम म्हणजे काय?" हे शब्द गुगुलच्या जीवशास्त्राच्या पुस्तकात वाचल्याचं आठवत होतं.

माझ्या त्या प्रश्नानं रागिणी चकित झाली, मात्र दुसऱ्या मुलीला गंमत वाटलेली दिसली आणि तिनं सविस्तर सांगायला सुरुवात केली. चमकदार डोळे आणि तिच्या चेहऱ्यावर एकप्रकारचे मृदू सौंदर्य होतं. मी तिला थांबवलं आणि रागिणीकडे पाहात विचारणा केली, "डिट्रिटस"? तिने स्पर्धा सुरू असल्यासारखा लगेच हात उंच करून, इंग्लिशमध्ये बाणेदार उत्तर दिलं, "मृत किंवा वापरलेल्या वस्तूचा भाग". आणि लगेच विचारलं, "बरोबर आहे ना माझं, सर?" ती गंमत करत नव्हती. "हो, तुझं उत्तर बरोबर आहे. पण तू कधी डिट्रिटस मानव बघितला आहेस का?"

रागिणीला आपलं उत्तर बक्षिसपात्र आहे याची खात्री नव्हती. "नाही काका", ती काहीशा अनिश्चिततेनं श्रेयाकडे एक कटाक्ष टाकून, जरा हिरमुसली होऊन म्हणाली. तिनं आपल्या बॅगमधून टूथब्रश-टूथपेस्ट काढले आणि तिथून निघून गेली. गुगुल अधूनमधून माझे विनोद, जमेल तसे, सहन करत होता. आता तो दुसऱ्या बाजूच्या वरच्या बर्थवर लवंडला होता. तो खाली वाकला आणि कृतक गांभीर्यानं त्यानं श्रेयाला विचारलं, "माझ्या वडलांबद्दल तुला काय वाटतं?" "का?" तिनं विचारलं आणि माझ्याकडे अल्लड, थट्टेखोरपणे बघितलं.

पालथा पडल्या पडल्या मला माझे विसंगतीपूर्ण खेळ आठवले आणि मी स्वत:शीच हसलो. मी अशा बंदिस्त जागेत आहे हे मला जेव्हा जाणवतं, तेव्हा मला त्या बंदिस्त जागेचं रंगभूमी आणि समोरच्या वाद्यवृंदाच्या मधली जी जागा असते ना, त्यात रूपांतर करावं, असं अगदी उत्कटपणे वाटतं.

आता कंपार्टमेंटमध्ये शांतता पसरायला लागली होती. तितक्यात बाजूच्या कंपार्टमेंटमधून एक नवपरिणीत जोडपं बाथरूमच्या दिशेने जायला लागलं. काही बर्म्युडा-हाफचड्ड्यांमधली मुलं बाजूनी चालत गेली. शेवटचा चहावाला सगळ्यांना पुन्हा एकदा विचारून निघून गेला. मंद, मिणमिणत्या प्रकाशात झोप तशी लवकरच येते. बाजूच्या बर्थवर झोपलेल्या वृद्ध बाईची शून्यात लागलेली नजर माझ्या झोपेत विरून गेली.

मला जाग आली तेव्हा मी एका वेगळ्याच आनंदात होतो. नक्कीच नेहमीपेक्षा जास्त वेळ झोपलो होतो मी. बराच उशीर झाला होता. बर्थवरून खाली येताना मला कंपार्टमेंटमध्ये मैत्रीपूर्ण, खेळकर वारं वाहत असल्याचं जाणवलं. गुगुल आणि श्रेयाचा नाश्ता सुरू होता. रागिणी तिच्या मोबाईल चार्जिंगच्या खटपटीत होती. तिच्यासारख्या चॉकलेटी मुलीच्या उत्साही संभाषणात काहीच वावगं नव्हतं, पण तिच्या ह्या संभाषणात जो जोडीदार सामील झाला होता, ** ते मात्र गोंधळात टाकणारं होतं. बाजूच्या बर्थवरच्या, कष्टकऱ्याकडून निरनिराळ्या कंपन्यांचे मोबाईल फोन्स आणि त्यांचे वेगवेगळे प्रकार यांतलं अथांग आकलन अचंबित करणारं होतं.

आजकालचे मोबाईल फोन्स दिसायला अगदी सुबक असले तरी ते पहिल्या पिढीतल्या फोन्सच्या आवाजाच्या दर्जासमोर मात्र अगदी फिके पडतात. रूणूबाबूंचं जुन्या, अवजड मोबाईल फोनचं कौतुक रागिणीला फारसं रुचलं नाही. "बरं" असा एका रूक्ष शेरा मारून, तिनं मोबाईल चार्जरसाठी प्लगपॉइंटचा शोध सुरू ठेवला.

दक्षिण कलकत्त्याच्या आतल्या बाजूला पूर्व पुटीयारीमध्ये रुणूबाबूंचं स्टेशनरीचं दुकान आहे. ते त्यांच्या आईला वेल्लूरला घेऊन जात आहेत. तिला लिंफॅटिक कॅन्सर आहे. त्या दोघांच्या वेल्लूरच्या बऱ्याच चकरा होतात. प्रत्येकवेळी घरी परतल्यावर रुणूबाबू त्या कॅन्सरनिवारण संस्थेतली आतिथ्यशीलता, व्यावसायिक शिस्त, आपुलकीचं वातावरण या सगळ्यांमुळे काही काळ भारावून जायचे.

"आपण कधीच, काही करू शकणार नाही, का माहित्ये? ""साधनसामुग्री?" "नाही, माणुसकीच हरवली आहे आपली! प्रगती करण्यासाठी स्वत:शी प्रामाणिक राहण्याची वृत्ती मुळात हवी. आपल्यांत ती वृत्तीच नाही. आपण घालवून बसलोय तो प्रामाणिकपणा!"

The question opens a virtual Pandora's box for Mr Sur. With a long-drawn 'Then listen to me', he embarks upon a detailed comparison between Kolkata and Bangalore.
त्या प्रश्नानं श्री. बासूंचा बांध फुटला. आणि "तुम्ही आधी माझं ऐका" हे पुन्हा पुन्हा आळवून त्यांनी कलकत्ता आणि बंगलोर यांच्यातल्या तुलनात्मक निरीक्षणांवर तपशीलवार बोलायला सुरुवात केली.

सौ. बासूंना मात्र ह्या संभाषणात काडीमात्र रस नव्हता. बाजूच्या कंपार्टमेंटातून आलेल्या एका बाईबरोबर त्यांनी गप्पा सुरू केल्या. आपापल्या बंगलोरमधल्या मुलांची माहिती एकमेकींना देण्यात त्या दोघी मग्न होत्या.

"मी माझ्या मुलीला खिरीसाठी तो एक विशिष्ट प्रकारचा तांदूळ आणायला सांगितलं. मी रुपूसाठी, माझ्या जावयासाठी ती खीर करणार असं कबूल केलं होतं. तर ती म्हणाली, त्या प्रकारचा तांदूळ बंगलोरमध्ये मिळत नाही म्हणे. कमालच झाली म्हणायची, त्या तांदळाला इथे जिऱ्याचा तांदूळ म्हणतात. मी तिला म्हणलं, "स्वत:ला लागणाऱ्या गोष्टी कुठून आणाव्यात याची काहीएक माहिती नाही तुला. तुमचं सगळं आयुष्य तुमच्या कामाभोवती फिरत असतं". माझा जावई त्यामानानं व्यवहाराला धरून असतो. माझी मुलगी छांदिष्टच पहिल्यापासून." "कुठे काम करते तुमची मुलगी?" "सिंबायोसिसमध्ये," सौ. बासूंच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू पसरलं. "माझी मुलगी विप्रोमध्ये असते. तिने इंग्लिश ऑनर्स गोखलेमधून केलं, मग लग्न झालं आणि बंगलोरला गेली. दीड वर्षानं मुलगा झाला. मी तिथे जायचे बाळाची काळजी घ्यायला, तेव्हा तिने कॉम्पुटरचा कोर्स पूर्ण केला. तिला नोकरीही मिळाली त्यानंतर. आता माझ्या जावयाच्या बरोबरीनं कमावते ती."

"पण हे आताचं. लहान असताना ती एव्हढी हट्टी होती ना. तिला साडीच्या निऱ्यांचं भुसकट होतं. अगदी कॉलेजला जायला उशीर झाला तरी चालेल पण साडीच्या निऱ्या मात्र अगदी एकावर एक काटेकोरपणे बसल्या पाहिजेत. आणि मला तिथे उभं राहून हे बघायला लागायचं. तिची ही तऱ्हा, तर धाकटीला केसांचं वेड. डावीकडचे केस नीट चापूनचोपून बसले की नेमके उजवीकडचे केस तिच्या मर्जीला उतरायचे नाहीत. उजवीकडचे आवडले की डावीकडचे बिघडलेले असायचे. मग काय आई तिथे हजर हवीच निस्तरायला." "सध्या कुठे असते तुमची धाकटी?" "डेनव्हरला." "तुमचा जावई प्रोग्रामर आहे का?" "नाही, मुलगी आहे. जावई सी. ए. आहे. त्यांनी तिथेच एम. बी. ए. केलं आणि आता एका टेक्सटाईल कंपनीत नोकरी आहे. तसं बरं सुरू आहे त्यांचं."

मलापण एक गोष्ट सांगण्याची हुक्की आली. "माझ्या न्यूझीलंडमध्ये राहणाऱ्या मित्रानं एका गोऱ्या मुलीशी लग्न केलं. "हे तू कसं जमवलंस ब्रॅटीन?" मी त्याला विचारलं. "तुला माहितीये, मेरी भारतीय मुलाशी लग्न करण्यासाठी थांबली होती." "ओ, काय ते म्हणतात … पहली नजर में?" "नाही हो, ती म्हणाली, "तुमचा देश म्हणजे अगदी नंदनवन आहे, असं मी ऐकलं आहे. पालक आपल्या मुलांची लग्नं ठरवितात, त्यांची मुलंसुद्धा वाढवतात आणि जर का पटलं नाही तरी सुनेला आसरासुद्धा देतात. आणि त्याउलट इथे! कुणी तरी सापडला तरी तीन महिन्यांत तो गायब होतो. पुन्हा दुसरा शोधायचा तर त्याचीही तीच गत होते"."

सौ. बासूंना माझ्या बोलण्यातलं एक वाक्य खूप रोचक वाटलं आणि त्यांनी तेच पुन्हा पुन्हा म्हणून ते वाक्य आपलंसं केलं. पलीकडच्या कंपार्टमेंटमधून आलेल्या बाईला मात्र ह्या गप्पांमध्ये फारसा रस न नव्हता. ती उठली. जाता जाता सौ. बासूंना म्हणाली, "उद्या ह्या वेळेपर्यंत आपण घरी पोहोचलो असू. या घरी एकदा. माझ्या मुलीचं घर इंदिरानगरमध्ये आहे."
"आमचं पण जवळच आहे, कोरामंगलामध्ये."
"हो की! आपण सगळे शहराच्या त्याच भागात आहोत."
"काकू, सगळ्या बाता हो!", गुगुलची आळस देता देता टिप्पणी!!
"श्ऽऽ, असं आपल्या वडलांना बोलू नये."
"काकू, तुमचं माझ्या बाबांबद्दल काय मत आहे?" थट्टा आणि उत्सुकतावजा प्रश्नाचं गुगुलच्या मनावर गारुड होतं.
"जबाबदार वाटतात," सौ. बासू माझ्याकडे अर्थपूर्ण कटाक्ष टाकत म्हणाल्या.
"गुगुल, तुझे बाबा अ-फा-ट आहेत", श्रेयाकडून प्रमाणपत्र मिळाल्यामुळे मी सुखावलो. रागिणी तिचा मोबाईल रिचार्ज करून परत आली होती. बॅगेतून फ्रूटज्यूसचं पाकिट काढत म्हणाली, "अगदी मित्रासारखे. माझे बाबा म्हणजे एक त्रास आहे, खरंच सांगते." श्री. बासू ही संधी कशी सोडतील? त्यांनी लगेच तिला विचारलं.
"कुठं काम करतात तुझे वडील?"
"L&T, बडोदा. जनरल मॅनेजर आहेत ते."
रूणूबाबू मोबाईल चार्ज करण्यासाठी बाहेर निघत असताना थांबून मागे वळून विचारतात, "Larsen & Toubro?'
"हो, काका."
रूणूबाबू तिथून बाहेर पडले.
"अगं, पण तू सकाळपासून फक्त फ्रूटज्यूस पित आहेस. काही नाश्ता वगैरे नाही का करायचा? उपास असतो की काय तुझा मंगळवारी?"
"मी आधी शुक्रवारीपण उपास करायचे", रागिणी उत्साहानं म्हणाली. (आम्ही हळूहळू सौ. बासूचं नेतृत्व निर्विवादपणे स्वीकारायला लागलो होतो.)
"जरी उपास असला तरी मंगळवारी गोड खाल्लेलं चालतं बरं का. तू काहीतरी खात का नाहीस? शिवरात्रीचा उपास पण करतेस का तू?"
रागिणी होकारार्थी मान हलवून हसली.
"अगं पोरी," श्री. बासूंनी मत मांडलं, "तू शनिवार, मंगळवार किंवा आणखी काहीही उपास कर. पण तू जर बायोटेक्नॉलॉजी शिकत आहेस आणि तुला जर कामानिमित्त बाहेर जावं लागलं तर बाहेर जे मिळेल ते खावं लागतं. बायोटेक्नॉलॉजी!! तेच आहे उद्याचं भवितव्य!!

हे असं सगळं सुरू असताना मी वरच्या बर्थवर जाऊन पंख्याच्या दिशेला डोकं करून पडलो. मला तिथून बाजूच्या कंपार्टमेंटमधलं दृश्य दिसत होतं. काल रात्री दिसलेलं नवपरिणित जोडपं चादर ओढून अर्धवट रेलून पत्ते खेळत होतं.

ती मुलगी मधूनच आपल्या नवऱ्याकडे झुकून, त्याच्याशी प्रेमभरानं बोलत होती आणि मग मागं सरकून पुन्हा पत्ते खेळत होती. आणि खेळकरपणे आपल्या नवऱ्याच्या हातातला मोबाईल घेण्याचा तिचा प्रयत्न सुरू होता आणि नवरा फोन तिच्यापासून दूर करत, तो फोन शस्त्रासारखा तिच्यासमोर परजत तिला चिडवत होता. थोड्या वेळानं मला त्यांचा तो खेळ पाहण्याचा कंटाळा आला आणि मी माझ्या हातातल्या पुस्तक वाचण्यात लक्ष घातलं. लवकरच त्या निवांतपणामुळे माझा डोळा लागला.

"रीना" अशा उंच आवाजात कुणीतरी खडसावलं. त्यानं मला जाग आली. ती मुलगी आता नवऱ्याचा मोबाईल मिळवण्यासाठी उतावीळ झाली होती आणि तिचा नवरा तिला काही केल्या तो फोन देत नव्हता.

रीना सतरा-अठराची असेल किंवा जेमतेम वीस. जरा जास्तच बारीक, गोरी, मोठे डोळे आणि जरा लाडावलेली. ती खरं तर शाळकरी मुलगीच वाटत होती. माझं लक्ष त्या पुस्तकात लागत नव्हतं. मी खाली उतरलो. गाडी लहान लहान स्टेशनं पार करत होती. बाहेरचं दृश्य नेहमी दिसणारंच, सुरुवातीला प्लॅटफॉर्म, मग गिऱ्हाईकांची वाट पाहणाऱ्या रिक्षा, घरं, आणि नंतर लांबवर पसरलेल्या शेतांत नाहीसा होणारा अरुंद ओढा.

श्री. बासू पुन्हा रागिणीकडे वळले होते.
"तुम्ही सॉल्ट लेकमध्ये राहता?"
"हो"
"कुठल्या गल्लीत? हं, तिथे ते नवीन इंजिनियरींग कॉलेज उघडलंय तिकडे? कसं आहे ते?"
मी तरीही अर्धवट झोपेतच होतो. खरं तर मी आता गाढ झोपेतच असतो, पण रीना! मी रागिणीला सांगायला लागलो,
"सॉल्ट लेकमध्ये अगदी खोलवर मासे आहेत. तिथलं पाणी हिरव्या रंगाचं आणि मासे तर त्याहून हिरवेगार.

श्री. बासू उठले आणि माझ्याकडे बघत बाहेर पडले.
मासे अधूनमधून हवेचे बुडबुडे सोडत असतात. एक दुसऱ्याच्या जवळून जात असताना त्याच्याकडं पाहून हसत जातो. ते हसणं असतं नं, त्यात खूप गोष्टी दडलेल्या असतात. प्रवासाची गोष्ट, कठपुतळ्यांची, हिवाळ्यातल्या थंडगार रात्रीच्या शेकोटीची. त्यांना गोष्टी सांगण्यासाठी शब्दांची गरजच नसते. पाण्यावर उठणारे तरंगच पुरेसे असतात. तरंग अंतहीन असतात, ते अविरत तयार होत असतात, तुटत असतात...

"माझ्याकडे कुणीच लक्ष देत नव्हतं. मी बोलायचा थांबलो, तसं सौ. बासूंनी पुस्तकातून डोळे वर करून विचारलं, "तुम्ही लिहिता का?"
गुगुलला लाजल्यासारखं झालं. "बाबा एक अयशस्वी नट आहेत, आता लेखक होण्यासाठी त्यांचे खूप प्रयत्न सुरु आहेत." तो म्हणाला.
"तुझा तुझ्या वडलांवर एवढा राग कां रे? ते घरी खूप उशिरा येतात की काय?" सौ. बासू माझ्याकडे स्मित करत म्हणाल्या.
"खरं तर, मला वाटतं त्यांनी खूप उशिरा घरी यावं. म्हणजे मला हवी तेवढी गाणी ऐकता येतील … आणि मला (गुगुलनं माझ्याकडे नजर रोखली आणि म्हणाला) WWF पाहता येईल.
"काय ऐकतोस रे तू?"
"रॅप," गुगुलच्या वतीनं रागिणी उत्तरली.
"गुगुल, ऐक", रुणूबाबू त्याला बाबांसारखा सल्ला द्यायला लागले, "तू ज्या शाळेत जाणार आहेस, तिथे हे चालणार नाही."
"आधी त्याला तिथे प्रवेश तर मिळू दे."
"बरं बरं," गुगुल हात उडवत म्हणाला.
"तुला माहिती आहे तिथे आणखी काय शिकवतात? ध्यानधारणा."
"मला त्याचीच काळजी आहे."
"काळजी कशाला?" सौ. बासू विचारतात, "माझ्या मुलीनं पुण्याला कॉम्पुटर कोर्स केला. पहिल्या महिन्यात फक्त ध्यानधारणा!! ते शास्त्र असेल किंवा नसेल, पण सगळ्या गोष्टी भारतीय तत्त्वज्ञानावर आधारलेल्या आहेत."

माझी सॉल्टलेकमधल्या प्राचीन जगाची गोष्ट सुरू असताना श्री. बासू तिथून निघून गेले होते; ते कुरमुरे घेऊन आले.
"कुठल्या वर्गात जाणार आहे तुमचा मुलगा?"
"आठवीत."
"आता लढाई सुरू होणार आणि पुढच्या वर्षीपासून युद्ध."
गुगुल श्रेयाकडे बघून हसला, त्याच्या बाबांसारखा आणखी एक.
आम्ही आमची दुपारची जेवणं उरकून घेतली. श्री. बासूंनी एक वर्तमानपत्र विकत आणलं आणि त्यात ते डोकं खूपसून बसले. त्याच क्षणी, अचानक, बाजूच्या कंपार्टमेंटमधली ती नवपरिणित वधू वादळासारखी येऊन रुणूबाबूंच्या खांद्यावर डोके ठेवून रडायला लागली.
"मला माझ्या पप्पांकडे जायचं, पपा पपा, मला ते जबरदस्तीनं नेत आहेत."
तिच्याकडे पाह्यलं आणि मी चरकलो. सुजलेले डोळे, निस्तेज दृष्टी, कपाळभर पसरलेलं सिंदूर..
घाबरलेला रुणूबाबूंनी स्वत:ला तिच्या विळख्यातून दूर केलं. त्या अनपेक्षितामुळे भीती आणि शांतता पसरली.
"तो मला फसवून घेऊन जातोय", ती पुढे म्हणाली.
"कोण घेऊन जातंय तुला?" सौ. बासूंच्या शब्दांमध्ये त्यांचा नेहमीचा परखडपणा होता. तरीही त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीचं समाधान होतं.
"माझा नवरा."
"तो काही वेळापूर्वी बाथरूमकडे जाताना तुझ्याबरोबर होता, तो?"
"मला नाही माहीत. ते तिकडे आहेत, त्यांच्यातला एक".
गुगुलनं त्या दिशेला बघितलं आणि त्याला टकला, टी-शर्ट आणि हाफचड्डी घातलेला एक माणूस दिसला.
"तुला तो माहीतही नाही आणि तरी सुद्धा तू त्याला तुझ्याबरोबर येऊ दिलंस?"
"आता मला काय माहीत? तो आला आणि मला म्हणाला, "चल"."
"पण स्वत:चा नवरा जरी असला तरी त्याच्याबरोबर बाथरूममध्ये जाणं गैरच," शेवटी रूणूबाबुंचा संयम सुटला.
"हे बघ मुली, इथे माझ्याजवळ येऊन बस आणि मला सांग बरं सगळं नीट", सौ. बासूंच्या बोलण्यातला धीर आणि उमदेपणा जाणवून मी आधीच प्रभावित झालो होतो. आता त्यांच्या व्यक्तिमत्वातल्या माणुसकीमुळे मी भारावून गेलो. नेतृत्वासाठी आवश्यक असलेले ते हेच सगळे गुण, मी स्वत:शीच विचार केला.
"मला काही माहिती नाही. माझं डोकं गरगरतंय, मला पपांकडे जायचंय."
मी त्या बाजूच्या कंपार्टमेंटमध्ये डोकावलो, तिथे तो टकला इसम वरच्या बर्थवर चढून पुस्तक वाचत आजूबाजूला नजर ठेवून होता. फारतर तिशीचा असेल.
दुसऱ्या बाजूला, तिचा नवरा फार घाईघाईनं फोनवरून कुणाशी तरी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होता. तो रागावलेला किंवा गोंधळलेला न वाटता, जरा बेफिकीर वाटला. त्या दुसऱ्या इसमाच्या उलट, हा अगदीच किरकोळ शरीरयष्टीचा आणि पोरगेलासा होता. बाकी तसं त्याच्यात काहीच खास नव्हतं. त्यानं घातलेला पांढरा शर्टही धुवट आणि मनगटावर भलं मोठं घड्याळ, स्वस्तातलं, बेगडी. तो मला पाहून जागेवरून उठला.
"रीना, इथे परत ये. आज सकाळपासूनच तुझं लक्षण काही ठीक दिसत नाहीये मला. विचित्रच वागते आहेस तू. तुला माहिती आहे नं की मी पण तुझ्या पप्पांशी बोलण्याचा प्रयत्न करतोय म्हणून?"
रीनानं त्याची आज्ञा त्याची गुलाम असल्यासारखी ऐकली आणि ती निमूटपणे परत आपल्या जागेवर बसली. तिच्या नवऱ्यानं पुन्हा त्यांच्यावर चादर ओढून घेतली.
तिच्या नवऱ्याचं बोलणं रटल्यासारखं वाटत होतं. त्यात नको तेव्हढं प्रेम आणि समजूत आहे असं वाटलं. त्यावर विश्वास बसणं तसं कठीणच होतं. कुणीही तसं उघडपणे न म्हणता, सगळ्यांना तसंच वाटत होतं. माझ्या सात्विक संतापाचा उद्रेक होतोय हे मला कळत होतं.
"डोळ्यांना जे दिसतंय ना त्यापेक्षा बरंच काही आहे बरं", रुणूबाबू हात पसरवत म्हणाले. सौ. बासूंची आणि माझी नजरानजर झाली आणि त्या म्हणाल्या, "काळजी करू नका, ती नक्की पुन्हा येईल इथे."
"अहो, तुम्ही तिचे डोळे बघितले का?" मी हे म्हणत असताना माझ्या आत काहीतरी ढवळून निघतंय असं वाटलं मला. ट्रेन आता धडधडत रेल्वे ब्रिज ओलांडून जात होती, आणि तो ओलांडला की घाट. मी तसाच तिरमिरीत उठलो आणि उडत्या तबकडीनं ताबा घ्यावा तसा मी त्या नवऱ्याजवळ जाऊन त्याचं मनगट पोलादी मुठीत पकडलं. आणि जोरात ओरडलो, "हे काय सुरू आहे?" तसं त्यानं माझ्या हाताकडे पाह्यलं आणि तुसड्या स्वरात म्हणाला, "हात सोडा आधी माझा." त्यानं त्याचा हात सोडवण्याचा प्रयत्नही केला नाही. माझ्या नजरेला नजर भिडवली आणि थंडपणे माझ्याकडे बघत राहिला. शेवटी त्याच्या हातावरची माझी पकड आपोआपच ढिली पडली. त्यानं मला माझ्या जागेवर परत नेऊन बसवलं.
"हं आता सांगा, काय सुरू आहे?"
"त्या मुलीशी तुमचं नक्की नातं काय?" सौ. बासूंनी सौम्य स्वरात विचारणा केली.
"माझी बायको", तो उद्धटपणे उत्तरला.
"लग्न कधी झालं तुमचं?"
"हल्लीच."
"कामधंदा काय करता तुम्ही?"
"System Analyst."
"कंपनी कुठली?"
"ब्लू चिप्स," असं म्हणून त्यानं एक कार्ड आपल्या पाकिटातून काढून सौ. बासूंच्या हातात दिलं.
"तुमचं नाव राजीब हल्दर?
"हो"
"किती दिवसांपासून ह्या कंपनीत काम करत आहात?"
"जवळपास दोन वर्षं."
"तुम्ही कुठले?"
"आसनसोल."
"आणि ती मुलगी?"
"तीपण तिथलीच."
त्यांच्या बंगालीवर हिंदीचा प्रभाव होता.
"मला एक फोन करून काही चौकशी करायची आहे?"
"हो, ठीक आहे."
आणि नवरा तिथून निघून गेला.
"ह्या कंपनीबद्दल मी माझी मुलगी आणि जावयाकडून ऐकलं आहे." सौ. बासू आपल्या बॅगेतून आपला सेलफोन काढत म्हणाल्या. खूप मोठी नाही कंपनी, पण परिचयाची आहे.
त्यांचा फोन पहिल्याच झटक्यात लागला. "माझ्या आधी कुणीतरी नक्कीच फोन केला असणार. कारण ती रिसेप्शनिस्ट लगेच म्हणाली, "त्या नावाचं इथे कुणीच नाहीये." तो नक्कीच ही कार्ड ढिगानं वाटत असणार.
श्री. बासूंसाठी हे सगळं त्यांच्या सभ्यपणाच्या सगळ्या सीमा ओलांडून जाणार होतं.
डोळे विस्फारून गुगुल म्हणाला, "तुमच्या लक्षात आलं का त्या माणसाच्या पायाचं नख प्रचंड मोठं होतं ते?"
"एक परका इसम माझ्या बायकोला घेऊन बाथरूममध्ये जातो आणि एक नवरा म्हणून मी काहीही न करता स्वस्थ बसून राहतो!" रुणूबाबुंना हे कोडं काही उमजत नव्हतं.
माझ्या डोक्यात काहीतरी चमकून गेलं. मी क्षणात त्या नवऱ्याचं बखोट धरून त्याला आमच्या कंपार्टमेंटमध्ये घेऊन आलो.
"तू... तू… तू त्या मुलीला पळवून घेऊन चाललाहेस, विकण्यासाठी! ती तुझी बायको नाही." मला काहीएक दिसत नव्हतं, फक्त एकच गोष्ट जाणवत होती की मिनिटागणिक मी जणू उंच उंच होत चाललोय.
"माझी कॉलर सोडा. मी सांगतो तुम्हाला" राजीब तर आता अजूनच कोड्यात बोलत होता.
मी त्याची बखोट सोडली, तसा तो म्हणाला, "तुला नक्की काय खुपतंय रे? आमचा काय संबंध तुझ्याशी?"
सौ. बासूंचा तोल मात्र अजिबात ढळला नव्हता, त्या शांत होत्या.
त्याच स्वरात त्या त्याला म्हणाल्या, "खाली बस."
"ठीक आहे, काय म्हणणं आहे?"
"तुम्ही ब्लू चिप कंपनीत नोकरी करत नाही."
"मी तिथेच नोकरी करतो." आणि नंतर स्वरांत मार्दव आणत म्हणाला, "सकाळपासूनच रीना विक्षिप्तासारखी वागत्ये. सगळं कठीण होऊन बसलंय".
"ती याआधी कधी अशी वागली होती?"
"हो, माझा तिच्या वडिलांशीच बोलायचा प्रयत्न सुरू आहे."
"तिच्या वडिलांचा नंबर काय?"
तत्पर पोलीसासारखा सौ. बासूंनी लगेच त्या नंबरवर फोन लावला. त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले आणि त्याआधीच त्यानं आमच्या कंपार्टमेंटमधून काढता पाय घेतला.
"सगळी नुसती फसवाफसवी", श्री. बासू स्वत:शीच पुटपुटले आणि निघून गेले.
ह्या गडबडीत त्या सकाळी आलेल्या बाईला ह्या गोंधळाचा सुगावा लागला. त्यामुळे ती आमच्या कंपार्टमेंटमध्ये आली होती. "ते खरंच नवपरिणित जोडपं नाही, ह्याबद्दल तुमची खात्री आहे?" तिनं सौ. बासूंना विचारलं. "अहो, काल मी त्यांना ट्रेनमध्ये आठ की नऊ डाग घेऊन चढताना पाह्यलं. "
सौ. बासू तिच्या प्रश्नांकडे पूर्ण दुर्लक्ष करत रागिणीला म्हणाल्या, "ए, तो तुझा ज्यूसचा पॅक बाजूला कर. सांडतोय तो माझ्या हॅण्डटॉवेलवर."
"काकू तो 'ट्रेट्रापॅक' आहे."
"चिकट लागतंय, म्हणजे ज्यूस असणार तो."
"पण ट्रेट्रापॅकमधून कधीच गळत नाही, काकू."
रागिणीकडे एक कटाक्ष टाकत, सौ. बासूंनी त्यांच्या आतापर्यंतच्या सुसंस्कृत प्रतिमेला तडा जाईल असं काहीतरी केलं. आपलं बोट ओलं करून ते त्यांनी डागावर घासलं आणि ते बोट चाटलं. "पाहा, मी म्हणलं नव्हतं की ज्यूस आहे म्हणून! ऑरेंज ज्यूस आहे. सांगत होते मी तुला!" रागिणीनं जरा नरमाईनं, पण शरणागती न पत्करता आपलं म्हणणं पुढे रेटलंच, "काकू, तो ट्रेट्रापॅक आहे, कमालच आहे तुमची" असं म्हणून तिनं तो ट्रेट्रापॅक समोर धरला.
रीना पुन्हा आमच्या कंपार्टमेंटमध्ये घाईनं शिरली आणि तिच्या चिरक्या आवाजात मला म्हणाली, "काय हो, काय झालंय तुम्हाला? तुम्ही माझ्या नवऱ्याला वाट्टेल ते बोलताय? मी माझ्या नवऱ्याबरोबर बंगलोरला जाते आहे. तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे कां त्यात?"
"खाली बस" मी म्हणालो.

"मी का बसू तुमच्या शेजारी? माझं लग्न झालंय त्याच्याशी. नवरा आहे तो माझा." रीना हे पुटपुटली आणि पुन्हा आपल्या जागेवर जाऊन बसली. माझं लक्ष पुन्हा तिच्या डोळ्यांकडे गेलं आणि मी शहारलो. तिचे डोळे आणखी सुजलेले वाटत होते आणि तिची नजर अजूनच सैरभैर झाली होती.
रुणूबाबूंनी पाठ सरळ केली, विवेकानंदांसारखी हाताची घडी घातली, आणि ऐकू येतील अशा आवाजात श्वास घेणं सुरू केलं. त्यांच्या आईनं माझ्याकडे एक केविलवाणी नजर टाकली आणि त्या पुन्हा खिडकीबाहेर बघायला लागल्या. एका मिनिटापूर्वी सौ. बासूंनी तोंडात आणखी एक पान कोंबलं होतं. "नियमानुसार चाललंय त्याचं", त्या खेळकरपणे निरखत म्हणाल्या.
सौ. बासूंच्या सहवासामुळे मला माझ्यातला प्रामाणिकपणा खूप दिवसांनी जाणवला.
"ऐका, जर ती परत आली तर मला तिच्याशी बोलू द्या. तुमचं डोकं सहज फिरतं."
मी ते स्वीकारलं. त्यांचं नेतृत्व निर्विवाद आहे, हे मला पटलं होतं.
नेमक्या त्याच क्षणी, रीना परतली. दुसऱ्या कुणाकडेही न बघता ती सरळ सौ. बासूंच्या बाजूला जाऊन बसली. सौ. बासूंनी तिला जवळ घेतलं, तशी ती स्फुंदायला लागली. "नीट बस आणि माझ्या सगळ्या प्रश्नांची नीट उत्तरं दे", सौ. बासूंचा आवाज तिच्या शिक्षिकेसारखा झाला. त्या पुढे म्हणाल्या, "नाही तर आम्ही तुला काहीही मदत करू शकणार नाही."
"काकू, मला पप्पांकडे घेऊन चला." तिचा आवाज खूप लांबून आल्यासारखा वाटला. "ते माझ्याशी खोटं बोलले आणि मला पळवून घेऊन चाललेत."
"ते म्हणजे कोण?"
"मला नाही माहीत."
"तुझं लग्न कधी झालं?"
"परवा."
"कुठे?"
"कालीघाट." नंतर काही क्षण थांबून, दुर्मुखला चेहरा करून ती म्हणाली, "त्यानं सिंदूर कार्यक्रमाचा एक फोटो पण नाही ठेवला."
"तू कलकत्त्यात कुठे राहत होतीस?"
"हॉटेलमध्ये."
"तुझं घर कुठं आहे?"
"आसनसोल'
"घरी कोण कोण असतं?"
"वडील."
"बाकी कुणीच नाही?"
"एक काकू असते."
"तुझे वडील काय करतात?"
"ते फॅक्टरीमध्ये कामाला होते."
"आणि सध्या काय करतात?"
"टीव्ही रिपेअर करतात."
"कुणी कधी तरी ऐकलंय का, बंगलोरमध्ये सिस्टम ॲनालिस्ट असणाऱ्यानं कालीघाटच्या मंदिरात लग्न केलं म्हणून?
नॉनसेन्स!" हे सगळं रुणूबाबूंच्या आकलनापलीकडचं होतं.
"हे सगळं म्हणजे बकवास …" श्री. बासूंना बरंच बोलायचं होतं पण सौ. बासूंची चिडलेली नजर पाहून ते थांबले.
"तुझी आणि तुझ्या नवऱ्याची भेट कुठे झाली?"
"आमच्या स्टेशनबाहेर. सायकल स्टँडजवळ."
"तुमची ओळख कुणी करून दिली?"
"माझी मैत्रीण, शीलानं."
"आणि ही शीला काय करते?"
"ती आधी आसनसोलमध्ये राहायची, आता ती कलकत्त्यात नोकरी करते."
"कधी ओळख करून दिली तिनी तुमची?"
"महिन्याभरापूर्वी."
"म्हणजे तू त्याच्याशी एका महिन्यात लग्न केलंस?"
"माझं खूप प्रेम आहे त्याच्यावर."
"मग तुझ्या डोळ्यात हे अश्रू कसले?
"ते दुष्ट आहेत."
"असं का वाटतं तुला?"
"काल ते हॉटेलमध्ये आले."
"जो तुझ्याबरोबर बाथरूममध्ये जाताना होता, तो पण तिथे होता का?"
"मला काही आठवत नाही."
"त्यांनी तुझ्याबरोबर बाथरूममध्ये काय केलं?"
"नाही माहीत, मला काहीच माहीत नाही."
रुणूबाबू काही वेळापूर्वी गायब झाले होते. आता परत आले आणि अधीरपणे म्हणाले, "जाऊ द्या, पूर्ण सायकीक केस दिसतेय ही. तपास करणं निरर्थक आहे, मी सांगतो तुम्हांला, मेंटल पेशंट!"
मला रूणूबाबूंमध्ये झालेला बदल मला काही समजला नाही.
"काल त्यांच्याकडे आठ-नऊ डाग होते. साड्या, सोनं, … तिच्याकडे बराच माल असणार."
सौ. बासूंनी त्यांना नजरेच्या धाकानंच अडवलं.
"ह्या तुझ्या आहेत?" त्यांनी चौकशी पुढे चालू ठेवली.
"नाहीत त्या माझ्या नाहीत, ते मारताहेत मला"
"ते म्हणजे कोण?"
"माझा नवरा."
"जर तो तुला मारतो आहे तर तू त्याच्याबरोबर आलीसच का?"
"नाही... तो मला आज चादरीखालून मारत होता."
"बाबा, त्याचं ते लांबलांब नख", गुगुल माझ्या कानात कुजबुजला. तो एकदम गंभीर झालाय. अचानक रीना पुन्हा रडायला लागली आणि तिचं पुन्हा सुरू झालं, "काकू, मला पप्पांकडे जायचंय."
राजीब बाहेर गेला होता तो परत आला आणि तिच्या बाजूला जाऊन उभा राहिला. त्यांनी एकमेकांकडे पाह्यलं, ती त्याला जाऊन बिलगली आणि म्हणाली, "मला पप्पांकडे जायचंय, मला पप्पांकडे ने." राजीब तिला त्यांच्या जागेवर परत घेऊन गेला.
ते लोक गेल्यानंतर लगेच, रुणूबाबु, "सगळी सायकीक केस आहे. आज सकाळपर्यंत ती एकदम ठीक होती. त्या मुलासाठी मात्र हे सगळं फार कठीण असणार, हे ओझं सांभाळणं."

रुणूबाबूंची आई तिच्या एकांतवासातून बाहेर आली. रुणूबाबूंना थरथरत्या आवाजात म्हणाली, "पागल झाला आहेस का तू? काय बडबडतोयस तू? ती मॅड आहे म्हणजे काय तिला विकायला काढायचं की काय?" आणि एवढं बोलून बाकी कुणाकडेही न पाहता रुणूबाबूंची आई तिच्या एकांतवासात परत गेली.

दगडांचे घुमट वाटावेत अशा टेकड्या आता ट्रेन ट्रॅकच्या जवळ यायला लागल्या होत्या.

"बाबा, तुमच्या लक्षात एक गोष्ट आली का? त्याच्या पॅण्टच्या मागचा खिसा फुगीर दिसत होता, पण त्याच्या पाकिटामुळे नक्कीच नाही …त्यात औषधाची फाईल होती!" गुगुलच्या त्या युरेका क्षणामुळे आम्हा सगळेच चकित झालो. "अरे वा, तुझ्यात गुप्तहेराचे गुण दिसताहेत!" सौ. बासू जरा सैलावून हसत हसत म्हणाल्या. "तुझा फेवरीट डिटेक्टिव कोणता?" रागिणीनं आळसावून विचारलं.

गुगुलसाठी आता इथवर थांबणार नाही. 'प्वारॉ'साठी तसं करणं अन्यायकारकच ठरेल.
"मी आणखी एका गोष्टीचा उलगडा करू शकतो. काकू, तुमचा टाॅवेल ज्यूसमध्ये नव्हता भिजला. वर बघा. त्या बॅगचा एक कोपरा ओला झाला आहे. काहीतरी तिथून ठिबकतंय."
मी वर बघितलं. ती बॅग एका छोट्या स्टीलच्या ट्रंकवर ठेवलेली होती. आम्ही तिचा मालक लवकरच शोधून काढला. त्याला ती बॅग उघडायला लावली. लोणच्याची बरणी! त्यानं ताबडतोब दिलगीरी व्यक्त केली. तो गेल्यानंतर श्री. बासू गुरगुरले, "हे मारवाडी आणि त्यांचं लोणचेप्रेम! कुठल्या जगात राहतात कोण जाणे!"
"टेट्रा …." रागिणी निषेधाचं काही तरी बोलणार होती पण तिला ती संधीच मिळाली नाही.
"तू कुणाला गं सारखी फोन करत आहेस? आईला? भूक लागलीये का तुला?"
"आईला नाही लागला फोन. मग बाबांशी बोलले, ते म्हणाले, आई दक्षिणेश्वराच्या कालीमंदिरात गेली आहे. दोनेक तासांनी लागेल म्हणाले आईचा फोन."
"तुझे बाबा कुठे असतात?"
"ते बडोद्याला असतात. जनरल मॅनेजर आहेत L&Tमध्ये"
"आणि तुझी आई?"
"ती कलकत्त्यात. डाॅक्टर आहे."
"हे पाहा माझं ऐक, तुला काही सगळा देश पालथा घालायची गरज नाही. मी सांगते तू थोडी फळं नक्कीच खाऊ शकतेस. आहेत का तुझ्याकडे? मी देते थोडी."
"आहेत माझ्याकडे, काकू." रागिणी त्या ट्रेट्रापॅकचा अपमान सहजासहजी विसरणार नव्हती.
"तू एवढ्या लांबच्या प्रवासाला निघालीयंस अन तुझ्या आईनं शिवरात्रीचा उपास ठेवू नकोस, असं सांगितलं नाही तुला? तुम्हाला परंपरा पाळायच्या असतील जरूर पाळा, पण त्यांचे फायदे-तोटे नीट लक्षात घ्या आधी."

रीना आता झोपली होती. त्यातला एकसुरीपणा मला टोचायला लागला. मला हवा खावीशी वाटत होती. लांबवर, बर्म्युडा घातलेला पोरांची गँग पुस्तकं, पत्ते आणि मोबाईलमध्ये बिझी होती. ते नक्कीच बंगलोरच्या कुठल्यातरी संस्थेत विद्यार्थी असणार आणि सुट्टीसाठी घरी निघाले असणार. दुसऱ्या टोकाच्या बाथरूमपाशी गेल्यावर मला रुणूबाबू आणि राजीब गप्पा मारताना दिसले. त्यांच्या बोलण्याचा सूर कसल्या गुपिताची चर्चा केल्यासारखा होता. मला बघून त्यांना थोडी शरम वाटली असावी, आणि त्यांनी गप्पा बंद केल्या.

मी तिथून निघालो आणि पुढच्या कंपार्टमेंटमध्ये उघड्या खिडकीशेजारी उभा राहिलो. आंध्रातली कोरडी, वांझ दुपार. मधूनच दिसणारी ताडाची झाडं, कसली तरी वाट बघणारी. लांब पंखांचे पांढरे पक्षी खाली झेपावून आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत होते.

मी परत आल्यावर मला पुन्हा तेच दृश्य दिसलं. "मी माझ्या नवऱ्याबरोबर जात आहे. तुमचा काय प्रॉब्लेम आहे?" ती मुलगी, हातानं वरच्या बर्थच्या शिडीचं रेलिंग धरून सौ. बासूंना म्हणत होती. तिचा कापरा आवाज जरा किंचाळल्यासारखा यायला लागला. "आता खूश? ठीक, आता जाणार का इथून? मला पुन्हा त्रास द्यायला येऊ नका!"

राजीब आपल्या मोबाईलशी चाळा करत होता. तो थांबला, आमच्याकडे बघितल्या न बघितल्यासारखं केलं आणि पुन्हा आपल्या कामाला लागला.

रुणूबाबूंनी माझ्यापासून नजर चोरली आणि म्हणाले, "ह्यात आणखी नाक खुपसणं धोक्याचं आहे." आधी मला न दिसलेला एक म्हातारा हळूच आला आणि कंपार्टमेंटमध्ये आपल्या जागी बसला.
"आपल्याला काही करता येणार नाही का?" त्यांनी खास कुणालाही हा प्रश्न विचारला नव्हता.
"आपण स्टेशनमास्तरांना सांगू शकतो", आपल्या उशा सारख्या करत रुणूबाबूंनी उत्तर दिलं.
"जर तक्रार करायची असेल तर ती ट्रेन मॅनेजरकडे करावी लागेल, स्टेशनमास्तरकडे नाही," म्हाताऱ्या माणसानं रुक्षपणे प्रतिवाद केला.
"बघा … पण मला खात्री आहे की हे ट्रॅफिकिंग नाही." रुणूबाबूंनी पुन्हा माझ्यापासून नजर चोरली. "मी जेव्हा मॅनेजरला शोधायला जाईन…", सौ. बासू म्हणायला लागल्या, "चालता येतंय पण पहिलं पाऊल उचलायची तयारी नाही, अशा व्यक्तीला तुम्ही मदत का करताय? तिचं नशीब तिला बोलावतंय, समजलं का?"
मला दमल्यासारखं झालं, आणि मी ते प्रकरण सोडून न देण्याचं ठरवलं. म्हातारा माणूस निघून गेला, पण त्याची कोरडी नजर पिच्छा सोडेना. रीना पुन्हा झोपली.

श्रेया समोर बसली होती. मी तिच्या पेंगुळलेल्या डोळ्यांकडे बघितलं. ती ह्या सगळ्यात मूक निरीक्षक होती. माझ्या नजरेला नजर मिळताच ती हसली आणि म्हणाली, "काका, तुम्ही मॅनेजरला हा प्रकार का सांगत नाही?"
"सांगू शकतो."
"मी बरोबर येऊ का?"
"जरूर ये."

पोरांच्या गँगला ओलांडून जाताना मी म्हणालो, "एक मुलगी ट्रॅफिक होत्ये. आता काही करण्याची वेळ आहे."
कुणालाही फरक पडला नाही. कुणी माझ्याकडे बघितलंही नाही.
"तुम्हांला कुणाला काही म्हणायचं नाहीये?" मी प्रतिक्रिया देताना माझा संताप आवरायचा प्रयत्न केला.
सगळे आपापल्या गोष्टी करत राहिले. रणांगणाच्या मध्यात, डोक्यावर पक्ष्यांची शिट पडलेल्या, मूकबधिर पुतळ्यासारखा मी तिथे उभा राहिलो.
"चला, जाऊ या." श्रेयाच्या आवाजानं मला नॉर्मल व्हायला मदत झाली.
"हो, चल जाऊ."

थोड्या शोधातच मॅनेजर सापडला. दणकट बांध्याचा पैलवान निघाला तो. "मध्ये पडण्यासाठी आपल्याकडे क्लियर केस हवी", तो जरा उर्मटपणे म्हणाला. "समोरची पार्टी म्हणत्ये की तिनं प्रेमाखातर लग्न केलं आहे, आणि आपल्या घरी बंगलोरला जात आहे, तर आपण काय करू शकतो?"
"पण ती इतरही काही गोष्टी म्हणत्ये."
"डोक्यावर परिणाम झालेले लोक काहीही बरळतात. शिवाय, तुमच्या आणखी एका सहप्रवाशाचं म्हणणं की केस क्लियर नाहीये म्हणून!"
कोण म्हणालं असेल असं, मला प्रश्न पडला. रुणूबाबू?
"प्लीज, तुम्हीच या आणि बघा. एकदा तरी या."
"पाहतो", मॅनेजरला हा संवाद वाढवण्यात रस नसल्यामुळे त्यानं उत्तर दिलं. त्यानं टाईमटेबल बघायला सुरुवात केली.
"तुम्ही हे प्रकरण सोडून देऊ नका, काका." श्रेया कंपार्टमेंटमध्ये आल्यावर म्हणाली. "स्टेशनमास्तरला पत्र लिहा."
"फायदा काय?" मी विचारलं.
"प्लीज."
राजीबला दाखवल्यासारखं करत मी जोरजोरात पत्र लिहायला सुरुवात केली. राजीबनं मला बघितलं, पण काही फरक पडला नाही.
ट्रेन पुढच्या स्टेशनात येईस्तोवर श्रेयानं वाट बघितली. "चला, आता जाऊ," ती म्हणाली. मी सकाळचं स्त्रीदाक्षिण्य जागवायच्या प्रयत्नात होतो. ट्रेनच्या दुसऱ्या टोकाला, आमच्यापासून फारच लांब स्टेशनमास्तरचं ऑफिस होतं. तो तिथे नव्हता. तक्रारी घेणाऱ्या कारकुनाशी बोलायला आम्हांला सांगण्यात आलं. तो लगेच सापडला. तो हसला आणि आमची तक्रार ऐकायला लागला. मी थोडक्यात सांगायला लागलो, आणि मला थांबवून त्यानं विचारलं, "तुम्ही काही अर्ज लिहिला आहे का?"
मी लिहिलेलं पत्र त्याच्या हातात दिलं. त्यानं त्यावर ठप्पा मारला आणि पेपरवेटखाली ते जमा केलं. हातानंच त्यानं आम्हांला सांगितलं की आमचं काम झालं आहे, आणि आपल्या सहकाऱ्याबरोबर गप्पा छाटायला सुरुवात केली.
कारकुनाच्या खोलीतून बाहेर आल्यावर श्रेया उद्गारली, "आपण आकाशापर्यंत पोहोचणारी शिडी बांधतोय, असं वाटतंय."
"तुला जोन बेइझ आवडते का बॉब डिलन?" मी विचारलं.
"मी, जोन बेइझ." ती म्हणाली.
आम्ही प्लॅटफॉर्मच्या छपराखालून आता उघड्या भागात आलो. आमचं कंपार्टमेंट अजून थोडं लांब होतं.

"गोल्फ ग्रीनमध्ये माझं एका खोलीचं घर आहे. मी कधीमधी तिथे जातो आणि जोन बेइझ ऐकतो. तिथे बाल्कनीत खूप झुडपं आहेत; आणि बाहेर दुर्लक्षित बाग दिसते. बागेत बघितलं की तिथे लंगडी गाय बसलेली दिसते. कधी तरी, संध्याकाळी दाणेवाल्याचा बारका पोरगा गायीला खरारा करतो आणि आकाशाकडे बघतो. लोकांच्या बिझी नजरांपासून लांब, त्या बागेकडे बघताना मी काळवेळ विसरतो."
"पण लोकांपासून लांब का जावं लागतं तुम्हाला?" श्रेयाला कुतूहल वाटलं.
त्या लहान पोरासारखंच आकाशाकडे बघत मी म्हणालो, "मला आठवतं, सकाळी लवकर दूधवाला आला आणि त्यानं रिपोर्ट दिला, 'मां, आज दंगल होणार.'" खरंच तसं काही झालं का, हे मला आठवत नाही. पण मला आठवतं त्या दिवशीचं शहर. आठवतं ते शांत, इकडचं तिकडे काही न झालेलं."
श्रेयाला माझ्या बोलण्यात काही विचित्र जाणवलं नाही. आमच्या कंपार्टमेंटमध्ये शिरण्याआधी ती म्हणाली, "जोन बेइझ मला भविष्यकाळात घेऊन जाते."

आम्ही परत आल्यावर सौ. बासूंनी रिपोर्ट दिला, "तुम्ही गेलेले असताना आणखी एक राऊंड झाली."
"ती पुन्हा आली होती?"
"नाही, तिची हिंमत नाही. ती तिथेच बसली होती, आणि ओरडायला लागली की, ती तिच्या वडलांना बोलावेल, आणि काय काय."
मी रीनाकडे बघितलं. कोंबडीसारखी निपचित होती.
कालचा होल्डॉल-चुकार आला.
"ती अशी का वागत्ये? तुम्हाला वाटतं हे सगळं खरं असेल?"
"नाही, काही नाही. आपण सगळे प्रवास करतोय. तू इथे बस रे, भावा," श्री. बासूंना कंपार्टमेंटमधलं तापमान कमी करायचंच होतं.
"तुम्ही बंगलोरात राहता?"
"नाही, पहिलीच खेप तिकडे जाण्याची."
"मुलाखत?"
"नाही, कँपसमध्येच सिलेक्शन झालं. जाऊन जॉईन होणार."
"कुठली कंपनी?"
"सनराईज कम्युनिकेशन्स."
"मल्टीनॅशनल?"
"हो, पण भारतीय आहे."
"टेलिकम्युनिकेशन्स डिग्री?"
"कोलकात्यातून एमेस्सी फिजिक्स. आणि खडगपूरमधून एमटेक टेलिकॉम."
"सुरूवातीला ग्रॉस?"
"वीस." मुलानं आज्ञाधारकपणे पगाराबद्दलच्या प्रश्नालाही उत्तर दिलं. "पण सगळी काटछाट होऊन हातात किती पडतील माहीत नाही."
"तू सात वर्षं काढलीस, म्हणजे. माझ्या एका भावाच्या मुलीनं हैद्राबादमधून एम. सी. ए. केलं, पाच वर्षांत. आणि तिलाही सुरुवातीला तेवढाच पगार आहे."
"हो, सध्याची हीच सरासरी आहे. काही वर्षांत बायोटेकवाले आमच्यापेक्षा जास्त कमावतील."
रीना तेवढ्यात "मला त्रास देऊ नका" असं मोठ्यानं म्हणाली. तेवढाच संवादात खंड पडला.
"मायक्रोबायलॉजी, जेनेटिक्स, बायोटेक लवकरच पुढे येणारी फील्ड आहेत," होल्डॉल-चुकार म्हणाला.
"मी माझ्या मुलाला बायोटेकच्या पाच वर्षांच्या इंटिग्रेटेड कोर्सला घातलंय. तोवर बायोटेक भरात येईल अशी आशा आहे. त्याची तीन वर्षं बाकी आहेत, म्हणजे २००९. माझ्या गणिताप्रमाणे, तो बायोटेकचा बेस्ट काळ असणार आहे. टफ काँपिटीशन असेल तेव्हा. त्याला परीक्षेत किती मार्कं मिळतात त्यावरून त्याचं भविष्य ठरेल."

ती मुलगी बडबडायला लागली, मोठमोठ्यानं, घाबरलेल्या शेळीसारखी. "तुम्ही का मारताय मला? का?" अजिबात उसंत न घेता तिचा हा तमाशा चालू होता. राजीब उठला आणि तिथून चालता झाला.

त्या कोंडलेल्या जागेत, तापलेलं वातावरण हलकं करणं कुणालाच जमत नव्हतं. रीना कुणाकडेही पाहायला तयार नव्हती, उकिडवी बसून भिंतीकडे तोंड करून ती ओरडतच होती. कधी नाव वल्हवल्यासारखी दोन्ही हात सीटवर ठेवून, तर कधी नखांनी समोरच्या भिंतीवर ओेरखडे काढत होती. शिसारी येत होती. एकदा लहान असताना माझ्या भावानं एक खार पिंजऱ्यात पकडली होती. पिंजरा एका झाडावर उंचावर टांगला होता. जवळपास तासभर त्या पिंजऱ्यावर सतत आपटून आपटून ती खार शेवटी गलितगात्र होऊन निपचित पडली. तसंच काहीसं आता घडेल, मला वाटलं. जेव्हा माझ्याच्यानं सगळं असह्य झालं, आणि मी तिथून उठणार, तेवढ्यात सौ. बासूंनी मला नजरेनं दटावलं आणि मग तिथेच बसून ते सगळं सहन करण्यावाचून गत्यंतरच नव्हतं मला.

राजीब रेल्वे अटेंडंटला घेऊन परत आला.
"अगं, झालंय तरी काय तुला? का करत्येस हे असं? कुणी फसवलंय तुला? शी, काय हा फालतूपणा सगळा!'
लहान मुलाला समजवावं तसं तो अटेंडंट तिच्याशी बोलायला लागला. "तुझी साडी गच्च ओली झालीये. चल, ती बदल आधी". रीनानं राजीबकडे ओल्या डोळ्यांनी बघितलं, आणि काहीच म्हणाली नाही. मग कशीबशी तोल सांभाळत बाथरूमच्या दिशेला गेली.
ती जशी तिथून गेली, एक उग्र दर्प सगळ्यांच्या नाकात शिरला. रुणूबाबू लगेच म्हणाले, "घाण! आणि मुतलीये ती सगळीकडे"
"शुद्ध मूर्खपणा!!" श्री. बासू.
त्या असह्य दुर्गंधीमुळे सगळे आपोआप बोलायचं थांबले. सगळं संभाषणच ठप्प झालं. पण ती बर्म्युडा घातलेली पोरांची गॅंग कामाला येते. ते ताबडतोब कुठून तरी सफाई कामगाराला शोधून आणतात. सगळी साफसफाई झाल्यानंतर त्यांच्यातल्या एकानं आफ्टरशेव लोशन सगळ्या कंपार्टमेंटमध्ये उडवलं. "टळली एकदाची कटकट", मलासुद्धा तसंच वाटलं. सकाळी स्वत:मधली ती "अस्सल" भावना जिवंत ठेवण्याबद्दल मारलेल्या बढाईचं आता मला ओझं व्हायला लागलं.
काही तास गेले. दिवसभराच्या अनुभवांची धग मला अजूनही जाणवत होती, पण त्याबद्दल कुणाशी बोलण्याचं धाडस केलं नाही. त्यांचे बर्थ असे दिसताहेत की, जणू तिथे कधी कुणी नव्हतंच.

रुणूबाबू बराच वेळ दिसले नव्हते. ते रमतगमत, टॉवेलला आपले हात पुसत परत आले आणि त्यांनी सुरू केलं, "ठोकलं पाहिजे एकेकाला; जेव्हा सगळे उपाय फुकट जातात तेव्हा तोच रामबाण उपाय … तिला बाहेर नेऊन चांगला चोप दिला, आधी जरा आरडाओरड, नंतर रडारड आणि आता शांत झोपली आहे ती. मी अशा खूप सायकिक केसेस पाह्यल्या आहेत. तुम्ही त्यांना समजावणार कसं? सगळं समजावण्याच्या पलीकडे गेली असतात ही लोकं, नाही काहो?
यातलं "नाही काहो" मला उद्देशून होतं.
तो म्हातारा गृहस्थ पुन्हा अवतरला. "मनोरंजन व्यवसायासाठी एकदम योग्य!"
रुणूबाबूंच्या उत्साहाला उधाण आलं, "बारबालाछाप!"
"एवढ्या मोठ्या प्लॅनची दुसरी बाजू कुणाला दिसत नाही, नाही का?" श्री. बासूंच्या अवकाळी कॉमेंटमध्ये प्रश्न सोडवल्याचं समाधानही होतं.
"डिट्रियस …?" मी कालच्याच मूडमध्ये आहे.
कोणीच माझ्याकडे लक्ष देत नाही.
"ही बंगलोरची माणसं आयटीत आघाडीवर आहेत, आणि त्या बुद्धबाबूंनी काहीही जरी केलं तरी ते काही जागतिक स्तरावर सातच्या पुढे नेऊ शकणार नाहीत. एकदा बायोटेक इंडस्ट्रीनं वेग पकडला की हेच लोकं तिथेही पुढे जाणार."

श्री. बासूंकडे कुणाचंच लक्ष नव्हतं; सगळ्यांचं आपापलं काही सुरू आहे. फक्त रुणूबाबू मात्र अस्वस्थ होते. मी बाथरूमकडे गेलो तर ट्रेन अटेंडंटच्या बर्थवर रीना झोपलीये. राजीब तिथेच बाजूला एका ट्रंकेवर बसला होता. डब्याच्या उघड्या दारातून दिसणारं शरदाचं चांदणं!

आम्ही उद्या सकाळी पोहोचू. बंगलोरची दोन स्टेशनं आहेत. उतरण्यासाठी कुठलं स्टेशन योग्य, याबद्दल आजूबाजूला उहापोह सुरू आहे. मी घाईत असल्यामुळे, मी पहिल्या स्टेशनवरच उतरणार.

झाडूवाल्या पोरानं आज खूप काम केलं होतं. त्याबद्दल काहीतरी बक्षिशी द्यायची वेळ होती. गुगुलनं माझ्याकडून दहाची नोट घेऊन त्याला दिली. सौ. बासूंनी आपल्या मसाला पानाच्या डब्यातल्या गोष्टी गोळा केल्या आणि तो डबा बॅगेत ठेवला. "तुम्ही त्याला पैसे दिलेत कारण तो अपंग आहे, बरोबर? नाही तर त्यांना कुणी पैसे देण्याची गरज नसते."

हे त्या दिवसातलं शेवटचं संभाषण!

माझ्या पुतणीच्या, नंदिनीच्या घरी गेलं ना, की एखाद्या दुर्मीळ वस्तूंच्या दुकानात गेल्यासारखं वाटतं. तांडवनृत्य करणाऱ्या शंकराची पितळी मूर्ती, युगांडाहून आणलेले लाकडी मुखवटे, हॉलंडची काचेची भांडी. त्यांची दीड वर्षांची मुलगी, चटनी, विस्फारलेल्या डोळ्यांनी अवतीभवती बागडत असते. इथे आज रात्री राहणार आणि उद्या सकाळी गुगुलच्या शाळेसाठी भाड्याच्या कारनं इथून निघणार, १३० किमी अंतरावर.

कल्लोल, माझ्या पुतणीचा नवरा तसा बराच उशिरा घरी येतो. त्याच्या कामाच्या वेळा युरोपीयन वेळेनुसार असतात. त्यामानानं नंदिनीच्या कामाच्या वेळा खूपच बऱ्या आहेत. कल्लोल घरी परत आल्यानंतर आम्ही त्यांच्या बाल्कनीत गप्पा मारत बसलो. "गुगुलनं येताना बरेच पराक्रम केलेले दिसताहेत, हो ना गुगुल?" नंदिनी म्हणाली. तसा गुगुल त्याच्या खोलीकडे पसार झाला. नंदिनीला ट्रेनमधल्या रंजक घडामोडी सांगत असताना कल्लोल त्याच्या खुर्चीवरच रेलून आडवा झाला होता. "बारगर्ल्स… त्या काही वेश्या नसतात …" तो थकून पुटपुटला. फ्रीजमधून एक बाटली काढत त्यानं विचारलं, "काका तुम्ही कधी ती घेतली आहे, Uncle's Creek?" "तुला इथे परदेशी वाईन्स मिळतात?" "कुठल्या देशाची वाईन हवी आहे काका तुम्हाला? ते समोर मोठी इमारत दिसतेय ना, तिथे तुम्हाला हवं ते आहे." काही अंतरावर फोरम मॉल रात्रीच्या वेळेस ताजमहालासारखा चमकत होता.

रात्रभर झावळ्या खिडकीच्या गजांना चाटून जात होत्या. टोचत होत्या. अजिबात न थांबता.

गुगुलला बोर्डिंग स्कूलमध्ये सोडून एक महिना झाला. आपली नवजात माचो प्रतिमा घेऊन तो त्या झाडोऱ्यातल्या कॅम्पसमध्ये शाकाहारी जेवणापर्यंत कसा काय पोहोचणार होता, हे मला काही केल्या उमजत नव्हतं. त्याच्या पहिल्या पत्रावरून तरी तो मजेत असावा असं वाटतंय. रीनाचं करमणूक क्षेत्रात जाणं माझ्यात मनात घर करून राहिलंय. सुरुवातीला कधी मध्येच रात्री जाग आली तर मला धूसर प्रतिमा दिसायच्या, काही जण इकडून तिकडे जाताहेत, कुणीतरी जिवाच्या आकांतानं ओरडतंय, कुणाची तरी ह्रदय पिळवटून टाकणारी किंकाळी. जसजसे दिवस जायला लागले, त्या धूसर भंगलेल्या प्रतिमा मला घेऊन जातात, एका गुहेत... कुठल्यातरी अकल्पित आनंदाच्या.. कदाचित..

मी गुगुलच्या पुढच्या पत्राची वाट पाहत आहे.

मधुबन मित्र यांनी केलेल्या मूळ बंगाली कथेच्या इंग्लिश भाषांतरावरून भाषांतरित.

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

आधी "ती" वाचली. आज ही वाचली. "ती" शेवटी वाचली नाहीच. "ही"च काय होणार काय माहित. "ती", "ही", आणि त्या! सगळ्यांना जवळून पाहिले आहे. त्यामुळे कथा काळजाला भिडल्या.
आणि "त्या"च्या बद्दल कुणी लिहील काय? एक "तो" तर माझा जीवश्चकंठ्श्च मित्र होता. हे सगळे फार भयानक आहे. वाईट वाटते की आंपण मदत करू शकत नाही.
एक "तो" आमच्या गल्लीच्या तोंडाशी बसत असे. दिवसभर इंग्रजीत कुणाशीतरी वाद विवाद करीत असे.कधी वाटायचे त्याच्याशी दोस्ती करावी पण धीर झाला नाही. ह्या कथा वाचून "त्या" सगळ्यांची आठवण झाली

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अस्वस्थ करणाऱ्या कथा कोणी त्रयस्थपणे वा विनोदाच्या अंगाने सांगायला लागला की ते जास्त अंगावर येते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही कथा इंग्लिशमध्ये वाचली तेव्हा आवडली, असं ठामपणे म्हणता आलं नाही. आताही म्हणता येत नाहीये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.