'दिल चाहता है' फोर्ट किधर है?

संकीर्ण #संसर्ग #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक२०२०

'दिल चाहता है' फोर्ट किधर है?

- कौस्तुभ नाईक

गोव्यातल्या शापोरा किल्ल्याचं 'दिल चाहता है फोर्ट' असं अनौपचारिक नामांतर होऊन जवळपास दोन दशकं उलटली आहेत. पोर्तुगीज काळात बांधलेला हा समुद्रतटावरचा किल्ला आज त्याच्या ऐतिहासिक वैशिष्ट्यांसाठी कमी आणि 'दिल चाहता है' ह्या चित्रपटातल्या दृश्यासाठी अधिक लोकप्रिय आहे. 'दिल चाहता है'मधली आमिर, सैफ आणि अक्षय खन्ना शापोरा किल्ल्यावर कॅमेऱ्याला पाठमोरे बसून समुद्राकडे बघून भविष्याचा विचार करत असलेली फ्रेम खूप लोकप्रिय झाली. त्यामुळे त्या किल्ल्यावर जाणाऱ्या प्रवाश्यांची संख्या वाढली. तुम्ही इंस्टाग्रामवर शापोरा किल्ल्यावर काढलेले फोटो बघाल तर आजही त्या फ्रेमचा पगडा तिथं भेट देणाऱ्या पर्यटकांमध्ये किती आहे ते दिसून येईल.

दिल चाहता है किल्ला इन्स्टाग्रामवरचा
इंस्टाग्रामवरच्या 'दिल चाहता है' फोटोंचं कोलाज

आधुनिक हिंदी चित्रपटाच्या इतिहासात 'दिल चाहता है' हा एक महत्त्वाचा चित्रपट मानला जातो. नव्वदीतल्या 'हम आपके है कौन?', 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे', 'परदेस' ह्या कुटुंबप्रधान चित्रपटांपेक्षा २००१ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट फारच वेगळा होता. ह्यात कॉस्मोपॉलिटन, शहरी भारताचं प्रभावी चित्रण करण्यात आलं होतं. खुल्या अर्थव्यवस्थेनंतर भारत ग्लोबल भांडवलशाहीचा भाग बनल्याने आलेली आर्थिक आणि सांस्कृतिक स्थित्यंतरं ह्या चित्रपटात अचूकपणे टिपली गेली. हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा आर्थिक उदारीकरणाचं एक दशक उलटून गेलं होतं. बऱ्याच सामाजिक आणि सांस्कृतिक पडझडी होऊन नव्या जाणिवा मूळ धरत होत्या. ऑफशोअर सर्व्हिसेसच्या वाढीनंतर भारतातील आयटी सेक्टर भरभराटीला येऊन 'वर्क हार्ड पार्टी हार्डर' ह्या ब्रीदवाक्यावर पोसलेली एक तरुण पिढी अर्थव्यवस्थेचा भाग बनत होती, जिचं नव्वदीपूर्व भारतातील राजकीय स्थित्यंतराशी काहीच घेणंदेणं नव्हतं. ह्याच काळात पर्सनल गॅजेट्स बाजारात येत होते. मोबाइल फोन, हॅंडीकॅम, डिजिटल कॅमेरा, इंटरनेट ह्या सगळ्यांमुळे आपण घेत असलेले वैयक्तिक अनुभव टिपून ठेवून ते शेअर करण्याची प्रक्रिया मूळ धरत होती. ही उपकरणं बाळगणं 'कूल' असण्याचं सधन लक्षण होतं.

ह्या चित्रपटातील प्रमुख पात्रं उच्चभ्रू आणि उच्चवर्णीय समाजातून असली तरी भारतात येऊ घातलेल्या महत्त्वाकांक्षी, मध्यमवर्गातल्या तरुण पिढीतही ह्या चित्रपटानं लोकप्रियता मिळवली. ही पात्रं क्लब्समध्ये जाणारी, रंगीबेरंगी भिंती असलेल्या ऐसपैस घरांमध्ये राहणारी होती. आणि मुख्यतः त्यांच्या आयुष्यातील निर्णय आणि दिशा ठरवण्यात त्यांच्या कुटुंबातील लोकांचा नगण्य वाट होता. नव्वदीतल्या कुटुंबप्रधान चित्रपटांत, नायक-नायिकांच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षा आणि आयुष्यं ह्यांच्या आड येणाऱ्या सामाजिक आणि सांस्कृतिक अडथळ्याचा संघर्ष होता. 'दिल चाहता है' येईपर्यंत हे अडथळे नगण्य ठरत आयुष्य आपल्या अटींवर आणि विविध अनुभव घेऊन जगलं पाहिजे, हा आशय पहिल्यांदा प्रभावीपणे हाताळण्यात दिग्दर्शक फरहान अख्तर यशस्वी ठरले.

'दिल चाहता है' ह्या चित्रपटामुळे गोव्यातल्या पर्यटन उद्योगाला एक निर्णायक कलाटणी मिळाली. ह्याआधीही गोवा आणि गोव्यातील लोकांविषयीचे समज 'बॉबी', 'एक दूजे के लिये', 'कभी हाँ कभी ना' यांसारख्या हिंदी चित्रपटातून रूढ झाले होते. 'दिल चाहता है'मधून गोव्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी नवे उद्देश आणि संदर्भ प्राप्त झाले. गोवा हा तारुण्यात, मित्रांबरोबर फिरून बघायचा प्रदेश आहे, तुमच्या मनातील कोलाहलांना इथे येऊन उत्तरं मिळतात, आयुष्याकडे पाहण्याची नवी दृष्टी प्राप्त होते, नवीन अनुभव आणि नवीन लोकांना भेटता येतं, असे बरेच काही समज गोव्याला जाण्याविषयी जोडले जाऊ लागले. गोवा शहरी धावपळीपासून विसावा घेण्यासाठी जाण्याचं हमखास ठिकाण बनलं. ह्या चित्रपटानंतर तारुण्य आणि मैत्री ह्या दोन गोष्टींचा अनुभव पूर्णपणे घेण्यासाठी गोवा हे एक आधुनिक तीर्थक्षेत्र बनलं. 'रोड ट्रिप' हा प्रकार अधिक लोकप्रिय झाला.

'दिल चाहता है'मध्ये गोव्याची एक विसावा घेण्यासाठीचं स्थळ म्हणून जशी प्रतिमा अधोरेखित केली गेली ती तशी नेहमीच नव्हती. गोव्याला स्वतःचा जसा राजकीय आणि सामाजिक इतिहास आहे, तसाच गोवा पर्यटनस्थळ म्हणून विकसित होण्याचा एक रंजक इतिहास आहे. गोव्याची प्रतिमा एका सुस्तावलेल्या प्रदेशाची आहे जिला आधुनिकतेचा, औद्योगिकरणाच्या स्पर्श झालेला नाही. तो अनुभव आपण एकविसाव्या शतकात गोव्यात येऊन घेऊ शकतो ह्यामुळेही गोव्याबाबतीत एक प्रचंड मोठं आकर्षण लोकांमध्ये आहे. आजच्या गोव्याची प्रतिमा टिकवून ठेवणं आणि स्थानिक लोकांच्या महत्त्वाकांक्षां यांमधल्या तफावतीमुळे संघर्ष दिसून येतो. पण हा संघर्ष गोव्यात पर्यटन व्यवसाय सुरू झाल्यापासून दिसत आलेला आहे.

विश्रांतीसाठी समुद्रावर जाण्याचा इतिहास

गोव्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी गोव्यातले समुद्रकिनारे हे प्रमुख आकर्षण आहे. खरं तर लोकांनी समुद्रावर विसाव्यासाठी आणि स्नानासाठी जाणं, ह्यांचाही मजेशीर इतिहास आहे. एकेकाळी खलाशी आणि व्यापारी सोडले तर समुद्रकिनाऱ्यावर जाणं तसं बाकी लोकांमध्ये प्रचलित नव्हतं. अठराव्या शतकाच्या मध्यात युरोपियन जीवनशैलीत समुद्रावर जाण्याला नवीन संदर्भ प्राप्त झाले होते. युरोपियन उच्चभ्रू समाजातील लोक व्यायाम व समुद्रस्नान करण्यासाठी, तसंच ताजी हवा घेण्यासाठी समुद्रकिनारी जाऊ लागले. औद्योगिक क्रांतीचं केंद्रस्थान असलेल्या ब्रिटनमध्ये उच्चवर्णीय समाज स्वतःच्या आरोग्याविषयी जागरूक होऊ लागला होता. कामगार वर्ग कारखान्यात करण्यात येणाऱ्या शारीरिक श्रमांमुळे चांगलं शरीर कमावत होता. त्या मानाने मालकवर्ग, कारखानदार शारीरिकदृष्ट्या दुबळे होते. ह्या दुबळेपणाचा गंड येऊन ह्या उच्चभ्रू वर्गात व्यायामाचं महत्त्व वाढलं. निरोगी शरीरासाठी समुद्रस्नानाचा सल्ला ह्या वर्गाला त्यांचे वैद्यकीय सल्लागार देत होते. समुद्राच्या पाण्यात औषधी गुण असतात आणि त्या पाण्याने त्वचा आणि हाडांचे रोग बरे होतात, हा समज रूढ झाला.

औद्योगिक क्रांतीच्या पार्श्वभूमीवर शहरी जीवनाची गती वाढत होती. धकाधकीच्या आयुष्यापासून काही काळ विश्रांती म्हणून समुद्रावर जाणं ह्या काळात प्रचलित झालं. रेल्वेच्या आगमनानंतर ही प्रक्रिया अधिक लोकप्रिय आणि सुलभ झाली. लांबचा प्रवास करणं स्वस्त झालं. औद्योगिक क्रांतीमुळे नुकताच सधन होऊ लागलेल्या नवीन मध्यमवर्गापाशी अशा गोष्टींत रमण्याची फावला वेळ आणि पैसे दोन्ही उपलब्ध होत होते. पूर्वी vacation ह्या शब्दाचा अर्थ अपरिहार्य कारणासाठी कामावर गैरहजर राहण्यासाठीची सुट्टी असा होता. औद्योगिक क्रांतीच्या काळात त्याचा विश्रांती घेण्यासाठीची रजा असा बदलला.

भारतीय अर्थव्यवस्थेच्या उदारीकरनंतरण हीच प्रक्रिया काहीशा अधिक आधुनिक आणि व्यापक रूपात आपल्याला भारतात बघायला मिळाली. महानगरांच्या आणि औद्योगिकीकरण झालेल्या शहरांच्या कोलाहलापासून दूर अशा जागी पर्यटनासाठी जाणं अधिक लोकप्रिय बनत गेलं. गोव्यात एकाएकी नव्वदीनंतर वाढलेला पर्यटन उद्योग हे त्याचंच द्योतक आहे. 'दिल चाहता है'च्या यशाने गोव्यातला पर्यटन उद्योग वाढला आणि त्याचं स्वरूप बदललं हे अनुभवाने सांगता येतं, पण आकडेवारी जुळवून हे विश्लेषण अजून कोणी केलेलं नाही.

गोव्याच्या पर्यटन उद्योगाचा आणि सरकारी धोरणाचा इतिहास

१९६३च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत पराभव करून महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचं सरकार गोव्यात स्थापन झालं. हे स्वतंत्र भारतातलं, केरळनंतर दुसरं, बिगर-काँग्रेस राज्य सरकार होते. बहुजन समाजाच्या वृद्धीच्या प्रचारावर निवडून आलेल्या ह्या सरकारांतर्गत 'कसेल त्याची जमीन, राहील त्याचे घर' ह्या तत्त्वाने कूळकायदा संमत करून पारंपरिक मुंडकारांना जमीन मालकीचे हक्क प्रदान करण्यात आले. तळागाळांत शिक्षणाचा प्रसार, शेतीविषयक धोरणं, आणि कूळकायदा ह्या कार्यक्रमावर प्रचंड लोकप्रियता मिळवलेल्या बांदोडकर सरकारपाशी पर्यटन व्यवसायाच्या वाढीसाठी ठोस काही धोरणं नव्हती. गोव्यात खाजगी मालकी तत्त्वावर खाणी चालू होत्या. बांदोडकर स्वतः एक खाणमालक होते. गोव्यातल्या खाणी किनारपट्टी भागापासून दूर होत्या. त्यामुळे खाण व्यवसायातून रोजगार आणि अर्थव्यवस्थेचे फायदे त्याच भागांत सीमित होते आणि किनारपट्टी भागांत त्यांचा काही विशेष प्रभाव नव्हता.

ह्या सर्वाचा सगळ्यात जास्त फटका किनारपट्टीतल्या खारवी (मच्छिमार) कॅथॉलिक लोकांवर झाला होता. खाण व्यवसायापासून चालना मिळत असलेल्या अर्थव्यवस्थेत ते भाग घेऊ शकत नव्हते. गोव्यातलं राहणीमानही हळूहळू महाग होत चाललं असल्याने केवळ पारंपरिक मासेमारी करून त्यांचं भागत नव्हतं. त्यात ट्रॉलर्सद्वारे होत असलेल्या आधुनिक मासेमारीसमोर त्यांचा टिकाव लागणं शक्य नव्हतं. ह्या सगळ्यामुळेच त्यांच्या उत्पन्नावर गदा आली होती आणि त्यांना अर्थार्जनाचे नवीन मार्ग शोधणं क्रमप्राप्त होतं.

१९६६ साली नेपाळमार्गे गोव्यात हिप्पी प्रवाशांची पहिली तुकडी आली. त्यांना कदाचित नेपाळमधून हाकलून लावलं असल्याने किंवा तिथे बराच काळ वास्तव्य केल्याने आपलं बस्तान बसविण्यासाठी दुसऱ्या एका जागेच्या शोधात ते गोव्यात आले आणि बार्देस तालुक्यातल्या किनाऱ्यांवर दाखल झाले. खारवी समूहांची वस्ती ह्याच किनारपट्टी भागात असल्या कारणाने आलेल्या हिप्पी प्रवाशांची राहण्याची व खाण्याची सोय त्यांनी करायला सुरुवात केली. कूळकायद्यांतर्गत त्यांना तिथले जमिनीचे मालकी हक्क प्राप्त झाले होते, ते खारवी समूहाला फायदेशीर ठरले. तत्कालीन सरकारचं पर्यटनविषयक काहीच ठोस धोरण नसल्याने हा पूर्ण व्यवहार हिप्पी प्रवासी आणि खारवी समूह ह्यांच्यातच थेट देवाणघेवाणीतून चालला होता. सुरुवातीला माफक भाडं आकारून प्रवाशांची राहण्याची सोय ते आपल्या घरातच करत असत. ह्यातून येणाऱ्या पैशांनी घरखर्च भागत असे. त्यांचा पारंपरिक मासेमारीचा उद्योग चालूच असल्याने हिप्पी प्रवाशांकडून मिळणारी रक्कम ही वरची कमाई होती. ह्या पैशांतून त्यांनी घरांची डागडुजी केली आणि प्रवाशांना राहायला घर भाड्यावर देऊन स्वतः बाजूला एका खोपटीवजा घरात राहू लागले. किनाऱ्यापाशी झापांच्या छताच्या खोपट्या बांधून तिथे प्रवाशांना जेवण देणंही कालांतराने सुरू झालं. आज गोव्यातल्या किनारपट्टीवर सीफूडसाठी प्रसिद्ध असलेल्या शॅक्सचे हे एक पूर्वरूप होतं, असं म्हणायला हरकत नाही.

पर्यटन मोसम ऑक्टोबरपासून मेपर्यंत चालायचा. जूनमध्ये पावसाचे वेध लागले की ह्या खोपट्या उतरवल्या जायच्या आणि प्रवाशांचीही वर्दळ कमीच असायची. पर्यटनातून येणाऱ्या पैशातून स्थानिक खारवी समूहाची आर्थिक सुबत्ता वाढली. हळूहळू त्यांनी पारंपरिक मासेमारी कमी केली तसेच त्यांच्या कुटुंबातील स्त्रियांनी उच्चवर्णीय जमीनदारांच्या शेताभाटांत मजूर म्हणून जायचं बंद केलं. त्यांच्या राहणीमानात कमालीचा फरक पडला आणि आता त्यांना पारंपरिक मासेमारी आणि मजुरी करण्याची गरज राहिली नव्हती. त्यामुळेच स्थानिक जमीनदारांनी वेगाने वाढत चालेल्या ह्या पर्यटन व्यवसायाविरुद्ध तक्रारी सुरू केल्या. पण ह्या धंद्याचा वाढता आलेख पाहून कालांतराने तेही ह्या व्यवसायात सहभागी होऊ लागले.

गोव्याच्या पर्यटनाच्यामोठमोठ्या प्रतिमेचे सांस्कृतिक संदर्भ

भारताला पश्चिमेकडील अरबी समुद्राची फार मोठी किनारपट्टी लाभली आहे. अगदी गुजरातपासून केरळपर्यंत विस्तारलेल्या ह्या किनारपट्टी भागात समुद्र पर्यटनासाठी गोवा सर्वाधिक प्रसिद्ध आहे. केरळही पर्यटनासाठी प्राधान्य दिलं जाणारं राज्य आहे, पण त्या राज्याच्या पर्यटनाची प्रतिमा गोव्याच्या पर्यटनापेक्षा खूपच वेगळी आहे. ह्यात केवळ समुद्रकिनाऱ्यामुळे नाही तर गोव्याची 'सुशेगाद' म्हणून ओळखली जाणारी संथ जीवनशैली, इथल्या लोकांचं आदरातिथ्य, टुमदार कौलारू घरं आणि खासकरून गोव्यातल्या गावाशहरांमध्ये असलेला एक दक्षिण युरोपियन गावाचा आभास. इथे दारू पिणं, मासे खाणं, आयुष्याचा आनंदच नाही तर उपभोग घेणं, लोकांच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहेत. ह्या सगळ्या गोष्टी त्या प्रतिमेचा भाग आहेत आणि त्या प्रतिमेच्या सामर्थ्याच्या जोरावरच गोव्यातील पर्यटन व्यवसायाची वृद्धी होत आलेली आहे.

हे सगळं जरी थोड्याफार प्रमाणावर खरं असलं तरी ही प्रतिमा आभासी आहे, असंच म्हणावं लागेल. गोव्यातल्या राहणाऱ्या लोकांना इतर लोकांसारख्याच महत्त्वाकांक्षा आणि अपेक्षा आहेत. रोजगाराच्या मर्यादित संधी, राजकारणातली उलथापालथ, नैसर्गिक संसाधनांचा होणारा ऱ्हास, धर्मभेद, जातीभेद ह्या इतर भारतात भेडसावणाऱ्या समस्या गोव्यालाही लागू पडतात. पण ह्या सगळ्या समस्यांना बगल देऊन पर्यटनासाठी म्हणून गोव्याची जी प्रतिमा निर्माण केली जाते त्यात गोव्यातल्या स्थानिकांचे प्रश्न, त्यांच्या महत्त्वाकांक्षांना बगल देऊन ही आभासी प्रतिमा निर्माण केली जाते. कुठल्याही शहराविषयी किंवा स्थळांविषयी जे काही प्रचलित समज असतात ते एका विशिष्ट हेतूने निर्माण केले जातात. गोव्याच्या ह्या दक्षिण युरोपियन गावाची जी प्रतिमा निर्माण केली जाते तिचाही इतिहास काहीसा असाच आहे.

साठ ते ऐशीच्या दशकांत गोव्यातल्या राजकारणात महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि युनायटेड गोवन्स डेमोक्रॅटिक पक्ष ह्या दोन स्थानिक पक्षांची मक्तेदारी होती. बांदोड्करांच्या अमाप लोकप्रियतेमुळे आणि मगोपक्षाच्या बहुजनवादी धोरणांमुळे दोन दशकं ह्या पक्षाकडे निर्विवाद सत्ता होती. ऐशीच्या दशकात ह्या स्थानिक पक्षांमध्ये दुही माजून बऱ्याच नेत्यांनी काँग्रेसमध्ये पक्षांतर करण्याचा पायंडा सुरू केला आणि हे पक्ष फुटायला लागले. ह्याच काळात गोव्यात काँग्रेस पक्ष पुन्हा डोकं वर काढायला लागला होता. बरेचसे फुटलेले नेते काँग्रेसमध्ये सामील होऊन काँग्रेस पक्ष ऐशीच्या उत्तरार्धात स्थानिक सत्तेत वरचढही झाला. गोव्यातल्या पर्यटन व्यवसायाला धोरणात्मक दिशा देण्याचं काम काँग्रेस पक्षाने केलं. १९८३ साली ब्रिटिश कॉमनवेल्थ देशांच्या राष्ट्रप्रमुखांची एक परिषद दिल्लीत झाली होती आणि तिथे उपस्थित नेत्यांना विरंगुळ्यासाठी गोव्यात आणलं होतं. गोव्याला पर्यटनस्थळ म्हणून जागतिक नकाशावर अंकित करण्यासाठीचं ते पहिलं धोरणात्मक पाऊल होतं. त्यानंतर कालांतराने १९८७ साली गोव्याच्या पर्यटन धोरणाचा मास्टर प्लॅन तयार करण्यात आला. ह्याच वर्षात दोन दशकं चाललेल्या भाषावादाला विराम देऊन, कोकणीला गोव्याच्या राज्यभाषेचा दर्जा देत, गोवा भारतीय संघप्रदेशात एक घटक राज्य बनलं होतं. ह्या प्रादेशिक भाषिक अस्मितेच्या वादातून जे काही समुद्रमंथन झालं त्यावरच गोव्याचं 'वेगळेपण' जपणारं पर्यटन धोरण आखलं गेलं.

ह्या प्रतिमेला सांस्कृतिक आवरण होतं 'गोवा दुरादा' ह्या मतप्रवाहाचं. गोव्याच्या इतिहासाचं लेखन आणि त्याचं विश्लेषण 'गोवा दुरादा' आणि 'गोवा इंडिका' ह्या दोन ढोबळ पद्धतींत विभागलं आहे. 'गोवा दुरादा' म्हणजे पोर्तुगीज भाषेत सोनेरी गोवा. ह्या अंतर्गत गोव्याची जीवनपद्धती आणि संस्कृती ही युरोपियन आणि कॅथॉलिक मूल्यांवर आधारलेली आहे, हे मांडणारे मतप्रवाह मोडतात. एकोणिसाव्या शतकातील पोर्तुगीज साम्राज्याच्या ढासळत्या प्रतिमेमुळे, स्थानिकांनी बंड करून पोर्तुगीज सत्तेला आव्हान देऊ नये म्हणून एके काळी पूर्वेकडील रोम म्हणून ओळखले जाणाऱ्या सोनेरी गोव्याची प्रतिमा लोकप्रिय करण्यात आली होती. जेणेकरून स्थानिक उच्चभ्रू लोकांनी ते सोनेरी दिवस परतण्याची इच्छा बाळगावी आणि पोर्तुगीज साम्राज्यातच आपले हितसंबंध सुरक्षित राहावेत. हे आश्वस्त करण्यासाठी 'गोवा दुरादा'चा वापर वेळोवेळी करण्यात येत असे. ह्या मतप्रवाहाला प्रतिक्रिया म्हणून 'गोवा इंडिका' हा महाप्रवाहही लोकप्रिय झाला. 'गोवा इंडिका' अंतर्गत गोवा हा भारतीय उपखंडाचा कसा अविभाज्य भाग आहे, इथले लोक आणि संस्कृती ह्या युरोपीयन आणि कॅथॉलिक नसून त्या भारतीय आणि हिंदू आहेत, हे मांडण्याचे प्रयत्न चालू होते.

ऐशीच्या दशकात जेव्हा गोव्याच्या पर्यटनाचा धोरणात्मक विचार सुरू झाला तेव्हा 'गोवा दुरादा' ही प्रतिमा गोव्याच्या मार्केटिंगसाठी वापरण्यात आली. गोवा एक युरोपियन अस्मिता असलेला एक निद्रिस्त प्रदेश आहे; जिथे भारतात इतरत्र लागू असलेल्या नैतिकतेच्या चौकटी लागू नाहीत आणि त्यामुळे इथे काहीही चालतं, ह्या तत्त्वावर गोव्यातला पर्यटन व्यवसाय लोकप्रिय व्हायला सुरुवात झाली. ह्या समजातून एका विशिष्ट पोताच्या पर्यटनाची सुरुवात गोव्यात झाली. गोव्यातलं (उर्वरित भारतापेक्षा असलेलं) स्वस्त राहणीमान, स्वस्त दारू, निरुपद्रवी स्थानिक लोक, समुद्रावर दिसणारे गोरे पर्यटक, ड्रग्स, कॅसिनो, रेव्ह पार्टीज, अशा अनेक गोष्टी गोव्याच्या पर्यटनाशी जोडल्या जाऊ लागल्या. 'दिल चाहता है'मध्ये दिसणारा गोवा हा ह्याच प्रतिमेची एक आधुनिक आवृत्ती आहे. फरक इतकाच की चित्रपटात त्याला आत्मशोधाचे कल्पक संदर्भ जोडले आहेत. एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे गोवा हा पोर्तुगीज संस्कृतीने नटलेला प्रदेश आहे, हा समज जसा पोर्तुगीज राज्यकर्त्यांनी रूढ केला, तसाच तो मुक्तीनंतरच्या काळात भारतीय सरकारनेसुद्धा केला. ह्यातून आधीच लिहिल्याप्रमाणे गोवा भारतीय प्रशासनात आणायला मदत झालीच पण गोव्यातल्या आणि भारतातल्या वसाहतवादाच्या इतिहासांतलं वेगळेपण आणि संघर्षांना बगल देण्यात यश आलं.

गोव्यातल्या पर्यटन धोरणाचे राजकीय संदर्भ

स्वातंत्र्योत्तर भारतात गोव्याला प्रशासकीय तसंच सांस्कृतिकदृष्ट्या सामावून घेणं हे सोपं काम नव्हतं. १९६१ सालापर्यंत पोर्तुगीजांच्या अखत्यारीत असलेला गोवा स्वातंत्र्योत्तर भारताच्या संकल्पनेत ठळकपणे फारसा नव्हताच. दुसरी गोष्ट म्हणजे, केंद्रीय प्रशासन गोव्यातल्या जनतेचा विश्वास संपादन करण्यात पूर्ण यशस्वी झालं नव्हतं. नेहरूंच्या प्रयत्नांनी गोव्याला मुक्ती मिळाली आणि त्यासाठी नेहरूंबद्दल गोव्यातील लोकांना आदरही होता, पण काँग्रेसला निवडणुकीत ह्या आदराचा काहीच फायदा झाला नाही. गोव्यातल्या स्वातंत्र्योत्तर राजकारणात पहिली दोन दशकं तरी स्थानिक पक्षांचाच पगडा राहिला. हिंदू का कॅथॉलिक, अभिजन का बहुजन, मराठी का कोकणी, संघप्रदेश का महाराष्ट्रात विलीनीकरण ह्याच स्थानिक मुद्द्यांवर गोव्यातलं बरेचसं राजकारण विभागलं होतं.

स्वातंत्र्योत्तर भारत हा प्रामुख्याने ब्रिटिश वसाहतीचा भाग असल्याने सरकारी कामकाज, प्रशासन, न्यायव्यवस्था ह्यांत एक व्यापक समानता होती. पण गोवा पोर्तुगीज अमलाखाली असल्याने इथली प्रशासन आणि कामकाजाची पद्धती वेगळी होती. वेगळे कायदे अस्तित्वात होते. ती व्यवस्था एकाएकी झटकून देऊन एकहाती भारतीय प्रशासन पद्धती लागू करण्यात बऱ्याच अडचणी होत्या. गोव्यातल्या वेगळ्या व्यवस्थेमुळे, त्या व्यवस्थेला सरावलेला एक सत्ताधारी आणि व्यापारी वर्ग तयार झालेला होता. त्या वर्गाचे हितसंबंध, त्यांची स्थानिक अर्थव्यवस्था आणि समाजव्यवस्थेत असलेली मक्तेदारीही अबाधित राखणं गरजेचं होतं. ह्यात आणखी एक भर म्हणून महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या सत्तेतील उदयाने पोर्तुगीज शासनकाळात सत्ता आणि सुबत्तेपासून वंचित राहिलेला बहुजन समाजही शिक्षण आणि सत्तेत थेट सामील होत होता. भारतातील इतर राज्यांत काँग्रेसने जसं प्रादेशिक पातळीवर प्रबळ असलेल्या जातीसमूहातील नेत्यांना तिकीट देऊन, लोकशाही राबविण्याच्या नावाखाली सत्तेत आणून, त्यांचं वर्चस्व कायम ठेवलं, तसं महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या प्रभावी यशामुळे गोव्यात त्यांना करता आलं नाही. ह्या सर्व कारणांमुळे गोवा हा एक वेगळंच समाजभान असलेला प्रदेश आहे, असं चित्र राष्ट्रीय पातळीवर उभं राहिलं. नेहरूंच्या 'अजीब है ये गोवा के लोग' ह्या वाक्यातून गोव्याविषयी राष्ट्रीय पातळीवर असलेला संभ्रम अचूकपणे अधोरेखित होतो.

ह्या एकूणच संभ्रमावर आणि सत्तांतराच्या अडचणींवर मात करण्यासाठी पर्यटन हा एक नामी उपाय ठरला. गोव्याला प्रशासकीय आणि सांस्कृतिकदृष्ट्या भारतात सामावून घ्यायचं असेल तर ते गोव्याचं वेगळेपण अधोरेखित करूनच घ्यावं लागेल हे केंद्र सरकारला कळून चुकलं. हेच तथाकथित सांस्कृतिक वेगळेपण गोव्याच्या पर्यटन धोरणाचा पाया बनलं. तथाकथित ह्याचसाठी की हे वेगळेपण एक व्यापक हेतू साध्य करण्यासाठी केलेल्या प्रक्रियेतून निर्माण केलं होतं. त्या पुढे जाऊन ह्या वेगळेपणाचा अनुभव पर्यटनाद्वारे भारतातल्या, तसंच भारताबाहेरच्या प्रवाशांसाठी खुला करण्यात आला. खाण व्यवसायानंतर पर्यटन उद्योग गोव्याच्या अर्थव्यवस्थेचा एक प्रमुख भागीदार बनला.

गोव्यातल्या पर्यटन उद्योगाचे भविष्य आणि आव्हाने

आज ह्याच प्रतिमांची पुनरावृत्ती करून गोव्यात नवीन पद्धतींनी पर्यटकांना येणासाठी भुलविलं जातं. गोवा आता केवळ एक विश्रांतीसाठीचं ठिकाण राहिलं नसून ते डेस्टिनेशन वेडिंग, सेकंड होम्स, विविध सांस्कृतिक महोत्सवाचं केंद्र बनत चालला आहे. पणजीच्या मांडवीकिनारी तरंगत्या कॅसिनोजना परवानगी देण्यात आली आणि त्यामुळे आता वर्षभर गोव्यात पर्यटकांची गर्दी असते. सहा महिन्यांचा पर्यटन मोसम आता बारमाही झाला आहे. २००५ सालापासून गोव्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव भरवला जायला लागला. हल्लीच सुरू झालेल्या 'सेरेंडिपिटी महोत्सवा'चं गोवा कायमस्वरूपी केंद्र बनलं आहे. 'सनबर्न फेस्टिवल' इथे दरवर्षी होतो. पण ह्या प्रक्रियेत जशी सुरुवातीला स्थानिकांची भागीदारी होती ती कमी होत होत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय भांडवलाची मक्तेदारी वाढत चालली आहे. सगळ्यांनाच गोव्याची हक्काची जागा आणि हवं ते करण्याची मुभा पाहिजे. सेकंड होम्समुळे गोव्यातल्या जमिनींचे भाव वाढून स्थानिकांना इथे घर किंवा जमीन घेणं आवाक्याबाहेरचं बनले आहे.

दुसरी चिंताजनक गोष्ट म्हणजे गोव्याच्या अर्थव्यवस्थेची पर्यटन व्यवसायावर असलेली भिस्त. कोव्हिडकाळात ह्याची तीव्रता ठळकपणे लक्षात आली. आधीच २०१२च्या सुप्रीम कोर्टच्या निर्णयाने गोव्यातला खाण उद्योग ठप्प आहे आणि त्यात पर्यटन व्यवसायाला बसलेल्या खिळीमुळे अर्थव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. ह्यामुळे केवळ सरकारी तिजोरी भरावी म्हणून कोविडकाळातसुद्धा लोकांच्या हिताचा विचार न करता घाईघाईने गोवा पर्यटनासाठी खुलं ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला. हे धाडस कधीपर्यंत टिकेल किंवा इथल्या व्यवस्थेवर त्याचे काय परिणाम होतील, हे आत्ता सांगता येणं कठीण आहे. गोव्यात गेल्या काही वर्षांपासून चालू असलेल्या सामाजिक चळवळींमध्ये हे संघर्ष प्रामुख्याने दिसून येतात. राष्ट्रीय पातळीवर हे संघर्ष वरकरणी जरी दिसत नसले तरी ते आतून धुमसत आहेत आणि ह्या सगळ्याला सरसकट विरोध करणारी एक प्रतिक्रियात्मक राजकीय चळवळ भविष्यात जोर घेऊ शकते.

'दिल चाहता है'च्या शीर्षक गीतात लिहिल्याप्रमाणे 'ये ख़ुशी रहे रोशनी रहे अपने वास्ते' ही गोव्याने आपली प्रतिमा तिथे येणाऱ्या पर्यटकांसाठी कायम ठेवण्याची 'नॉट सो माफक' अपेक्षा गोव्याकडून बऱ्याच लोकांची आहे. गोव्याच्या ह्या पर्यटनाभिमुख प्रतिमेचं भांडवलीकरण किती आणि कधीपर्यंत चालू राहील हे माहीत नाही, पण ते चालू स्वरूपात कायमचं राहू शकत नाही हे खरं.

संदर्भ :
१. Trichur, Raghuraman. Refiguring Goa: From Trading Post to Tourism Destination. Goa1556, 2013.
२. Parobo, Parag D. India's First Democratic Revolution: Dayanand Bandodkar and the Rise of the Bahujan in Goa. Orient Blackswan, New Delhi, 2015.
३. Anjaria, Ulka, and Jonathan Shapiro Anjaria. "Text, genre, society: Hindi youth films and postcolonial desire." South Asian Popular Culture 6.2 (2008): 125-140.
४. Daniel Blei. Inventing the Beach: The Unnatural History of a Natural Place. Smithsonian Magazine (2016) दुवा
५. Fernandes, Jason Keith. India Made Goa Portuguese. Herald (2015). दुवा
६. Pinto, Rochelle. Between Empires: print and politics in Goa. New Delhi: Oxford University Press, 2007.

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

होणार असं सुरवातीला वाटलं. पण माहितीपर निघाला. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0