इमले अक्षरतेचे, अर्थात अष्टाश्वमेध नाटक - ३

#ललित #संसर्ग #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक२०२०

इमले अक्षरतेचे,
अर्थात अष्टाश्वमेध नाटक - ३

- जयदीप चिपलकट्टी

पहिला अंकदुसरा अंक

अंक तिसरा

(रात्रीची वेळ. ग्रॅन्डफादर क्लॉकमध्ये दहाचे टोले पडतात. सावित्रीबाई विणकाम करत दिवाणखान्यात एकट्याच बसल्या आहेत. डॉक्टर येतात. शिणलेले आहेत.)

सावित्रीबाई : डॉक्टर! बसा.

डॉक्टर : बॅरिस्टर इथे नाहीत?

सावित्रीबाई : दिल्लीला गेले आहेत. बार काउन्सिलची मीटिंग आहे. तेरवा परत येतील.

डॉक्टर : नाहीत हे एका दृष्टीने बरं आहे.

सावित्रीबाई : हो. (थोडा वेळ थांबून) तुमचं रात्रीचं जेवण झालं नसणार —

डॉक्टर : नाही. तुमचा फोन आला तसा लागलीच निघालो.

सावित्रीबाई : मी रावजीला सांगून आले आहे. तो इथेच काहीतरी घेऊन येईल.

डॉक्टर : ठीक आहे.

सावित्रीबाई : कसं आहे आता?

डॉक्टर : त्याला मॉर्फीनचं मोठं इंजेक्शन देऊन आलो आहे. तेवढ्याने झोपेल. पण माई, आता हे असं वारंवार होत राहणार. पोटात दुखणं, थकवा येणं, डोक्यात गोंधळ होणं — ही सगळी एन्ड-स्टेजची लक्षणं आहेत. (सावित्रीबाई डोळ्याला पदर लावतात.) माई —

(थोडा वेळ दोघेही अबोलपणे बसून राहतात.)

सावित्रीबाई : तुम्हाला सांगते डॉक्टर, दारूची लत त्याला नंतर लागली. आधी अपेशाची आणि दु:खाची लत लागली. सगळं चुकतच गेलं हो —

डॉक्टर : च्च! तुम्ही त्रास नका करून घेऊ.

सावित्रीबाई : ह्यांच्या अपेक्षा होत्या. आणि ते साहजिक आहे. एकुलता मुलगा. सगळं समोर मांडून ठेवलेलं. पण प्रत्येक माणूस तेवढं हुशार नसतं ना. बिचारा घुसमटून गेला. आणि मग काय? मला तुमचा तो अभ्यास जमतच नाही, यशाची तुमची ती व्याख्याच मला मान्य नाही, मला ह्यात पडायचंच नाही असं म्हणत म्हणत तेच घट्ट होऊन गेलं.

डॉक्टर : हो. बॅरिस्टर देखील बोलून दाखवायचे मला.

सावित्रीबाई : कधी कधी वाटतं की त्याला शिकण्यात रस नाही हे आधीच ओळखून समजून घेतलं असतं तर बरं झालं असतं. मी म्हणते जाग्रणं करत काहीतरी सटरफटर वाचत बसला असता. चार सुमार कविता केल्या असत्यान. अधून मधून थोडी प्यायला असता. तेवढ्याने काही बिघडलं नसतं. असल्या फुळकावणी वाईट सवयी सांभाळायची आमची ऐपत होती. पण आम्ही उगीच त्याला ढकललं आणि शेवटी दरीत पडला.

डॉक्टर : हो. आता इतकी वर्षं त्याला समोरच बघतो आहे. तुम्ही म्हणता तसंच थोडंबहुत झालं. पण शेवटी असं आहे माई, की चूक कुणाची न् काय ह्यात आत्ताच्या घटकेला शिरण्यात अर्थ नाही. आणि तसं ते ठरवणं शक्यही नसतं. पोरांनाही त्यांची त्यांची इच्छाशक्ती असतेच. एका प्रमाणाबाहेर ती हवी तशी वाकवता येत नाही.

सावित्रीबाई : खरं आहे.

(रावजी आत येतो. त्याच्या हातातल्या ट्रे मध्ये चिनी मातीचं सूप वाढायचं निळं भांडं आहे. बरोबर चांदीचा चमचा आहे.)

रावजी : तूपवरणभात. बाजूला थोडीशी कार्ल्याची भाजी वाढली आहे.

डॉक्टर : थँक यू.

रावजी : येस डॉक्टर. (जातो.)

डॉक्टर : (चवीने खात) बॅरिस्टर इथे असते तर हे बघून त्यांनी मला तुमचं घर कायमचं बंद केलं असतं! अब्रह्मण्यम्! वेजवूडच्या सूप टरीनमधून तूपवरणभात खातो म्हणते काय?!

सावित्रीबाई : खा हो. काय त्याचं एवढं? विलायतेतून हे परत आले तेव्हा तिथून आणलेल्या ह्या साहेबी सवयी मला रुचायच्या नाहीत. मी सतत त्यांना खिजवायला बघायची. आता आठवून लाज वाटते. एकदा मुद्दाम ह्यांच्यासमोर चांदीच्या ताटात राईस पुडिंग वाढून घेऊन त्याच्या चित्रावती घातल्या. फार चिडले होते.

डॉक्टर : तुम्हाला मानलं पाहिजे. इतकी वर्षं त्यांच्याबरोबर घालवून तुम्ही काही मेमसाहेब झाला नाहीत —

सावित्रीबाई : नाही हो, तो माझा पिंड नव्हे. झालं काय तर मला अठरावं लागलं तेव्हा बरीच स्थळं सांगून यायला लागली. मेणोलीला आमचा जमीनजुमला खूप होता. आता मुळात नानाला गंडा घालून मिळवलेले नंतर पठाणी व्याजाने देऊन फुगवले होते ते सोडा. पैसा जुना झाला की कुणी विचारत नाही कसा आला ते. ह्यांचंही घरचं बरं होतं पण आमच्याएवढं नाही. पोरगा खूप हुशार आहे, इंग्लंडला जायचं म्हणतो इतकं बघून बाबांनी स्थळ पसंत केलं. लग्न झालं. मग हेच म्हणाले की तिथे माझ्याबरोबर तू एका खोलीत कुडकुडत राहणार. शिवाय दोघांचा खर्च. त्यापेक्षा माहेरीच का राहीनास? म्हणून मी काही गेले नाही. मी कृष्णाकाठची वांगी खाल्ली तोवर यांनी तमसेकाठी बाजारचं खाल्लं. मोठे बालिष्टर होऊन आले. पुण्याला बस्तान बसवलं. पण माझ्यातली मेणोली काही गेली नाही.

डॉक्टर : हो. आता इतकी वर्षं बॅरिस्टरांना जवळून बघतोय म्हणून. नाहीतर हे साहेबी वागणं उपऱ्या माणसाला शिष्टपणाचं वाटतं.

सावित्रीबाई : मलाही आधी वाटलंच. पण तुम्हाला सांगू का, तसं सगळ्याच बाबतीत असतं. लहानपणापासून तुम्ही चित्पावन असलात तर ठीक. नाहीतर तो कद नेसून मळकट जानव्याशी चाळा करत नाकात बोलत फणसाची भाजी चिवडायची हेही शिष्टपणाचंच वाटतं.

डॉक्टर : बरोबर आहे.

सावित्रीबाई : पण काय झालं माहित नाही. ब्रिटिश जेंटलमन व्हायचं म्हणून करायची ती सगळी सोंगं केली. पण करता करता कुठेतरी ती आत झिरपली. हुशार होतकरू मुलगा म्हणून जाताना गेले होते. एक विचारी माणूस तिथून परत आला. एकूणात काय तर मला त्रास देत नाहीत आणि माझा करून घेत नाहीत. काही गोष्टी सांभाळून घ्याव्या लागतात, पण त्या आता असायच्याच. पोराचं जमलं नाही हे मात्र एक गालबोट आहे.

डॉक्टर : माई, तसं सगळीकडे यश कुणालाच मिळत नाही. कुठलीतरी बाजू लंगडी राहतेच.

सावित्रीबाई : खरं आहे. पण डॉक्टर, तुम्ही आधी चार घास खाऊन घ्या. इतक्या रात्रीची तुम्हाला धावपळ झाली.

डॉक्टर : (चवीने खात) कार्ल्याची भाजी छान आहे हो. मस्त कुरकुरीत लागते आहे.

सावित्रीबाई : नंदिनीच्या हातची आहे.

डॉक्टर : वा! (आणखी खात) माई, बाकी तुम्हाला कर्तबगार सून मिळाली.

सावित्रीबाई : हो. तनयला सांभाळून घेते, पण चिकटून बसत नाही. एकीकडे तिचं आपापलं काम धडाक्यात चालू असतं. वाचते खूप, लिहिते खूप. कसल्याशा पुस्तकासाठी अलिकडे टिपणं करते आहे. बबडीला कुठे कुठे घेऊन जाते. तिघं एकमेकांना धरून असतात.

डॉक्टर : एकूण सगळं रुळलं आहे तर. (हनुवटी वर करून छतावर नजर फिरवतात.)

सावित्रीबाई : (तोंडाला पदर लावून हसत) असंच म्हणायचं! वरच्या मजल्यावर तिघांच्या तीन खोल्या आहेत. मी काही चौकशी करत नाही. दृष्टीआड सृष्टी!

डॉक्टर : अहो, हसताय काय अशा?!

सावित्रीबाई : बरीक कुतूहल असतं हो! पण आता असले प्रश्न काय पोटच्या पोरीला विचारत बसू?! तुम्हाला एक सांगू का डॉक्टर, नाही म्हटलं तरी थोडं कसंसंच वाटतं. आमच्या स्वयंपाकघरात एक मोठ्ठाला चांदीचा झारा आहे. डोळ्यासमोर फार स्पष्ट चित्रं यायला लागली तर तो असा पंख्यासारखा हलवून झाडून घेते! (अजून हसतातच आहेत.)

डॉक्टर : मी काय म्हणतो माई, ह्या बाबतीतल्या आवडीनिवडी ज्याच्या त्याच्या असणार. त्यातलं काही स्वत:ला हवंसं वाटलं पाहिजे असं नाही. त्यांचं त्यांना आवडलं म्हणजे बास झालं!

सावित्रीबाई : मीही तेच म्हणते! पण एक आहे मात्र. आपलं आणि समोरच्याचं सारखं असलं म्हणजे कुणाला काय हवं ते पटकिनी कळत असणार. हेवा वाटावा अशीच गोष्ट आहे हो. नाहीतर आम्हाला काय आवडतं याची एरवी पत्रास कोण करतो? आमच्या पिढीत बाईच्या फार अपेक्षा नसायच्याच. उपद्रव नाही झाला म्हणजे सुख मिळालं असं समजायचं.

डॉक्टर : बघा माई, एकदा आडून विचारून बघा. तेवढीच तुमच्या वाक्चातुर्याची कसोटी लागेल. आम्हालाही सांगा काय काय कळतं ते. तसं डॉक्टर माणसाला तरी यातलं सगळं कुठे माहित असतं? आपण आपलं आयुष्यभर किडुकमिडुक शिकत राहावं.

सावित्रीबाई : डॉक्टर! काय तुम्ही तरी?! वरणभात संपवा आधी. इतकं धीट संभाषण आपल्या वयाला फार वेळ झेपायचं नाही. पण आपसूक काही समजलं तर सांगेनच तुम्हाला. मी काय म्हणतेय? इतक्या रात्री आता घरी परत नका जाऊ. आमची गेस्ट बेडरूम तयारच असते. आज इथेच झोपा, उद्या सकाळी तनयला एकवेळ बघून माझ्या हातचे कांदेपोहे खाऊन जा कुठे जायचं ते.

डॉक्टर : ठीक आहे.

सावित्रीबाई : बॅरिस्टरांचं धोतर देते तुम्हाला नेसायला.

डॉक्टर : बॅरिस्टर धोतर नेसतात?!

सावित्रीबाई : कुणी बघत नसेल तेव्हा नेसतात. अगदीच काही वीस शिलिंगी साहेब झालेले नाहीत.

(दिवाणखान्यात कोणीही नाही. मधुरा बॅडमिंटन खेळण्याच्या वेषात येते. हातातल्या रॅकेटला कव्हर आहे. दारापाशी एका स्टुलावर बसून बूट आणि मोजे काढून ठेवते. रावजी एका चांदीच्या थाळीत काचेचा उंच ग्लास घेऊन येतो.)

रावजी : मधुरा मॅडम, लेमोनेड इथे ठेवतो आहे.

मधुरा : थॅँक यू, रावजी.

रावजी : येस, मॅडम. (बूटमोजे आणि रॅकेट घेऊन आत जातो. आजूबाजूला नजर टाकून मधुरा अलमारीकडे जाते आणि एक गडद लाल रंगाचं पुस्तक बाहेर काढते. पुस्तकाची जाडी फार नसली तरी लांबीरुंदी ऐसपैस आहे. खुर्चीत रेलून बसून समोरच्या टेबलावर पाय ठेवून लेमोनेडचे घुटके घेत पुस्तक चाळू लागते. नंदिनी आत येते. आजूबाजूला नजर टाकून मधुराच्या जवळ जाते, तिच्या पापण्यांचं चुंबन घेते आणि किंचित जीभ बाहेर काढून घामाची चव घेते. मधुरा ह्याला विरोध करत नाही पण डोळे मिटून घेण्यापलिकडे प्रतिसादही देत नाही. मधुरासमोर बसून नंदिनी तिचे पाय आपल्या मांडीवर ठेवते, पण लागलीच मधुरा ते खाली काढून घेते.)

मधुरा : नको गं.

(नंदिनी काही न बोलता सरळ समोर पाहात शांतपणे बसून राहते. पंधरावीस सेकंद थांबून मधुरा पुन्हा दोन्ही पाय तिच्या मांडीवर ठेवते.)

मधुरा : चेप ना. (नंदिनी किंचित हसून तिचे पाय चुरू लागते.) आहा! काय छान वाटतंय. आज सॉलिड बॅडमिंटन खेळून झालं. पाय जाम दुखताहेत. (पुस्तक चाळत राहता राहता एकदम खुसखुसू लागते.)

नंदिनी : काय वाचते आहेस?

मधुरा : असंच. (पुस्तकाचं कव्हर दाखवते.) Winnie-the-pooh! पप्पा आणि मी लहानपणी एकत्र वाचायचो. मी फर्माईश केली की त्यांचा तो खास घोगरा इंग्लिश ॲक्सेंट काढून दाखवायचे! जुन्या कागदाचा वास आणि तो ॲक्सेंट. It was a deadly combination. काय मस्त वाटायचं! (नंदिनी तिच्याकडे रोखून पाहते आहे.) अगं, यात एक अस्वल असतं. अत्यंत मठ्ठ असतं —

नंदिनी : मधुरा, थापा मारू नकोस! मला तुझा चेहरा वाचता येतो. काय वाचते आहेस ते मुकाट्याने सांग! नाहीतर मी येतेच बघ तिथे— (हात लांब करून पुस्तक खेचून घेतल्याचा अभिनय करते. मधुरा किंचाळून पुस्तक मिटते, तसं त्यातून दुसरं एक पुस्तक खाली पडतं. नंदिनी ते उचलते.) कोकशास्त्र!

मधुरा : (तळहातांनी चेहरा झाकून घेत) धरणीमाते! मला पोटात घे —

नंदिनी : तू म्हणजे बाई चक्रमच आहेस! हे आणि कशाला वाचतेयस?

मधुरा : मग?! तुम्ही काय करता ते माझ्यासारख्या निरागस लेस्बियन युवतीला माहित व्हायला नको? चोरून चोरून मी सगळं इत्यंभूत वाचून काढते आहे. हे बघ. ह्यात लिहिलंय की म्हशीचं तूप, दंतपाल तेल, मध आणि पांढऱ्या कमळाचे तंतू समप्रमाणात मिसळायचे. घरातली एक चिमणी पकडून आणून त्यात बुडवायची आणि ती ब्रशसारखी वापरून तो लेप पुरुषाच्या बेंबीत लावायचा म्हणजे त्याला जास्त वेळ धरून ठेवता येतं. असं काही करता का तुम्ही?

नंदिनी : नाही, असं करायची गरज नसते — (हसत हसत तीही दोन्ही तळहातांनी तोंड झाकून घेते. थोडा वेळ दोघी एकमेकींची नजर चुकवतात.)

मधुरा : (तिच्याकडे पाहात) कसं वाटतं?

नंदिनी : (अनिश्चित मान हलवते.) तुला पुस्तकी उत्तर देते. तो एक अनुभव आहे. मला आवडतो पण माझ्यातून तसाच्या तसा काढून तुला दिला तर तू नको म्हणशील. तो शब्दांत वर्णन करून सांगता येत नाही असं म्हणण्याचा प्रघात आहे, पण त्याला काही अर्थ नाही. घेण्यालायक सगळे अनुभव समोर मांडून ठेवले तर त्यांपैकी शंभरातले पंचाण्णव शब्दांत वर्णन करून सांगता येणार नाहीत.

मधुरा : मी कधी घेतलेला नाही पण मला आवडेल असं वाटत नाही. कसं असतं बघ. अमुक एक भाजी आपल्याला आवडेल का हे खाण्याआधी खात्रीने सांगता येत नाही. पण ह्यातलं कळतं. मला आधी वाटायचं की हा प्रकार इतक्या जणींना आवडतो मग आपल्याला का नकोसा वाटत असेल? पण एखादी गोष्ट बिलकुल न आवडणं हाही आपल्या व्यक्तिमत्त्वाचाच भाग असतो ना. म्हणजे कसं, की रंगमंचावर ह्या पाहा मधुरा जातेगावकर: मी तुम्हाला त्यांची ओळख करून देतो. ह्यांना कार्ल्याची कोरडी भाजी आवडते, पण रामफळ आणि बाईपुरुषांतलं आवडत नाही. का ते विचारू नका.

नंदिनी : तसंच काहीसं ते आहे खरं. पण तुला सांगू का, त्यातल्या स्थानिक घडामोडी आपल्या आपण करून बघू शकतो. खरं तर जास्त कौशल्याने करून बघू शकतो. पण शेवटी तेवढंच नसतं ना. ते सगळं गाठोडंच असतं — दुसऱ्या शरीराची जवळीक असते, भावना गुंतलेल्या असतात.

मधुरा : म्हणून तुला आवडतं?

नंदिनी : तसं समज. पण आपल्या तुलनेत म्हणशील तर गडबडधडपड फार असते. त्यामुळे घेतल्यानंतर त्या अनुभवाची मनात पुनर्रचना करावी लागते.

मधुरा : धूर्त आणि पाताळयंत्री आहेस तू! (हे बोलता बोलता नंदिनीकडे जाऊन तिला बिलगून बसते.) खरं बोल. अशीच आपल्या संयुक्त अनुभवाची पुनर्रचना नाहीस ना करत तू?

नंदिनी : नाही! (मधुराचं चुंबन घेते.) करायचीच झाली तर एकमेकींना सांगूनसवरून दोघी मिळून करूयात. (पायात पाय गुंतवून दोघी काही वेळ नि:शब्द बसून राहतात.)

मधुरा : पण अवघड होतं गं कधी कधी. आज दुपारी —

नंदिनी : हो. अलिकडे तो फार लहरी झालाय.

मधुरा : म्हणून मी घरी नाहीच थांबले. क्लबमध्ये जाऊन खूप सणसणून खेळले.

नंदिनी : ते सगळंच माझ्या लक्षात आलं.

मधुरा : आत कुठेतरी मला शरम वाटते गं. माझा तो भाऊ आहे. मला त्याची असूया वाटायला नको. आणि आपण तिघे यात जाणूनबुजून आहोत. पण मन काबूत ठेवता येत नाही ना. अंगाला मुंग्या आल्यासारखं होतं — (नंदिनी तिचा हात हातात घेते.) डोळ्यासमोर फार स्पष्ट चित्रं यायला लागली तर मी बॅडमिंटनच्या रॅकेटने झाडून घेते!

नंदिनी : माझंही अवघड होतंच. आणि हे असं छापाकाटा करून तर ठरवता नाही येत —

मधुरा : नाही. तन्या म्हणाला तसंच: आपलं ढुंगण स्वयंभू आहे. मापाची चड्डी बेतणं सोपं नाही.

नंदिनी : आणि तन्याकडे फार वेळही नाहीय आता. त्यामुळे मला वाटत राहतं की त्याचं मन मोडू नये. (मधुरा रडू लागते. नंदिनी तिला आणखी जवळ घेते.)

मधुरा : नको मोडूस. नंतर मला वाईट वाटेल.

नंदिनी : (थोडा वेळ नि:शब्द राहून) पण ते राहू दे आता. संध्याकाळी काय करूया ते सांग!

मधुरा : कुठलातरी वेळखाऊ आणि किचकट पदार्थ करूया! म्हणजे मला खूप वेळ तुझ्या मागे मागे हिंडता येईल. उकडीचे मोदक करायचे?!

नंदिनी : येस! चालेल!

मधुरा : मी आंघोळ करून घेते. सगळा घाम घाम झाला आहे.

नंदिनी : पाठ स्वच्छ करायला मदत लागणार नाही ना?

मधुरा : (मिश्किलपणे हसत) आता तुझा आग्रहच असेल तर —

नंदिनी : आहे ना आग्रह. (काही क्षण थांबून) मधुरा, विषय निघाला आहे तर एक विचारते. रागावू नकोस आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे एकदम किंचाळू नकोस. प्रॉमिस?

मधुरा : ओके. प्रॉमिस.

नंदिनी : स्पष्ट चित्रं तुला एकदा प्रत्यक्ष बघायची आहेत? अर्थात तन्याची संमती असेल तर —

मधुरा : (आधी गोंधळते. मग विचारमग्न होते.) हं! अशा प्रश्नाचं पटकन उत्तर देणं अवघड आहे. पण का? त्यानं काय साधेल?

नंदिनी : तुझं कुतूहल शमेल. तन्या म्हणत असला तर त्यालाही स्पष्ट चित्रं दाखवू. त्याचंही शमेल.

मधुरा : कुतूहल त्यालाही आहे?

नंदिनी : अर्थात.

मधुरा : तुला तसं म्हणाला?!

नंदिनी : अर्थात.

मधुरा : हं. As they say, curiouser and curiouser. पण समज, मला शिसारी आली तर?

नंदिनी : बाहेर जा.

मधुरा : विनोदी वाटलं तर?

नंदिनी : हस. गालातल्या गालात.

मधुरा : ठीक आहे. नंदी, आत्ताच्या घटकेला मी हो म्हणत नाही आणि नाहीही म्हणत नाही. विचार करून सांगते.

नंदिनी : (मान डोलावत) सांगोपांग विचार करून सांग. हो म्हणालीस तर मी तन्याला विचारते.

मधुरा : तोवर मी बसवण्णाला सांगून ठेवते पांढऱ्या कमळांची लागवड सुरू कर म्हणून. उपाय लागू पडला तर चित्र स्पष्टपणे मनावर उमटायला जास्त वेळ मिळेल.

नंदिनी : कल्पना चांगली आहे. पण तुला चिमणी पकडता येते का?

(मधुरा हसत हसत नकारार्थी मान डोलावत राहते. दोघी हातांत हात घालून वरच्या मजल्यावर जातात.)

(संध्याकाळची वेळ आहे. बॅरिस्टर आणि डॉक्टर आपापली वर्तमानपत्रं वाचताहेत. सहा महिन्यांची गरोदर नंदिनी गालिचावर मांडी घालून बसली आहे. सावित्रीबाई तिचे केस विंचरताहेत. तनय निर्विकार चेहऱ्याने खुर्चीवर स्वस्थ बसला आहे. त्याच्या शेजारी भिंतीला टेकवून ठेवलेली वॉकिंग स्टिक आहे.)

सावित्रीबाई : सूनबाई, पुस्तक लिहित होतीस ते कुठवर आलं?

नंदिनी : तीन वह्या भरून टिपणं तयार आहेत. शिवाय सुट्या कात्रणांचा पसारा खूप आहे. एकदाची बाळंत झाले की गादीत बसून सगळं एकटाकी लिहून काढीन. सहाव्या दिवशी सटवाई येईल त्या निमित्तानं मला नवं फाउंटन-पेन घेऊन द्यायचं सासरेबुवांनी कबूल केलं आहे.

डॉक्टर : कशावर लिहिते आहेस?

नंदिनी : महाराष्ट्रातल्या कामगार चळवळीचा इतिहास लिहिते आहे. माथाडी कामगार संपाचं निमित्त झालं. मग त्याआधीचं कम्युनिस्टांचं काम, सत्यशोधक समाजाचं काम असा धागा पकडून मागे मागे जात राहिले तशी पुष्कळ माहिती मिळत गेली. नारायण मेघाजी लोखंडे हे इथले आद्यपुरुष, त्यामुळे पुस्तकाची सुरुवात त्यांच्यापासून करणार आहे. मुंबईला एका कापड गिरणीत स्टोअरकीपर होते. तिथल्या कामगारांचे जे हाल व्हायचे ते ह्यांच्या डोळ्यांसमोरच व्हायचे. भयंकर उकाड्यात रोज तेराचौदा तास हातमाग चालवायचा. दुपारचं जेवण आणि शी-शू ह्या सगळ्याला मिळून मध्ये पंधरावीस मिनिटं मिळाली तर मिळाली. सुट्ट्या नसायच्या. कामात चूक झाली, तागा खराब निघाला तर मालक पगारातून कापून घ्यायचा. मग लोखंडेकाकांनी गिरणी कामगारांची संघटना केली. दर आठवड्याला एक लंगोटीपत्र काढायचे. त्याला 'दीनबंधू' असं हृदयाला पीळ पाडणारं नाव ठेवलं होतं. तिथेही तोटा व्हायचाच. इकडे गिरणीमालकांची वेगळी संघटना होती तिचा उलट दट्ट्या असायचा. एकूण काय तर गणपतीच्या मेळ्यासाठी साने गुरुजींनी लिहावी तशातली रडारड कथा आहे.

सावित्रीबाई : ही सगळी केव्हाची गोष्ट?

नंदिनी : जोतिराव फुल्यांच्या नंतरच्या पिढीतले. म्हणजे अठराशे ऐंशी-पंच्याऐंशीचा काळ. पण फार रुक्ष विषय आहे हो. कुठे बॉँबस्फोट नाहीत की संडासाच्या भोकातून खाली जाऊन समुद्रात पंधरा मिनिटं पोहणं नाही. अमुक संघटनेचे ठराव, मायबाप इंग्रज सरकारपुढे तमुक निवेदन असलीच सगळी पानभरती आहे. पण नाही म्हणायला एक गंमतीदार नैतिक प्रश्न समोर आला.

डॉक्टर : सांग ना.

नंदिनी : म्हणजे समजा एखाद्यानं एक कृती अप्पलपोटेपणानं केली पण त्यातून आपसूक दुसऱ्याला फायदा झाला, तर त्या कृतीची कितपत वाखाणणी करायची? काय झालं ते सांगते. हा अठराशे साठ-सत्तरचा सुमार. मुंबईच्या ह्या कापड गिरण्यांमध्ये आठदहा वर्षांची पोरं कामाला असायची. त्यांना दिवसभर चोपून घेऊन वर मजुरी कमी द्यायचे, त्यामुळे कापड स्वस्तात विणून व्हायचं. परिणामी इंग्लंडमधल्या गिरणीमालकांचं पोट दुखायला लागलं, कारण तिकडचे फॅक्टरी ॲक्ट्स जास्त कडक असल्यामुळे त्यांना असं काही करता यायचं नाही. मग त्यांनी दबाव आणून इथे भारतातही एक फॅक्टरी ॲक्ट पास करून घेतला. यामुळे इथल्या कामगार पोरांचा एका अर्थाने फायदा झाला, कारण त्यांचे काबाडकष्ट हलके झाले. पुढे मोठा होऊन जो माणूस चाळीसाव्या वर्षी टीबीने मेला असता तो पंचेचाळीसाव्या वर्षी मरायला लागला. पण दुसऱ्या अर्थाने तोटा झाला कारण कामाचे तास कमी झाल्यामुळे मिळकतही कमी झाली. पण मी म्हणेन की आणखी पुढे जाऊन तिसऱ्या अर्थाने उलट फायदाच झाला. कारण सुरवातीचा फॅक्टरी ॲक्ट जरी फार हिणकस असला तरी निदान त्याच्यावर कागदोपत्री शिक्कामोर्तब झाल्यामुळे त्यापेक्षा जास्त बरा ॲक्ट पुढे केव्हातरी पास व्हायला एका प्रकारे दार उघडलं गेलं. असं सगळं ते आहे. श्रेय कुणाला द्यायचं आणि दोष कुणाला द्यायचा हे पटकन कळत नाही. तन्यापाशी हा विषय काढला की त्याला किल्ली बसते. मग तो consequentialism आणि deontology वगैरे शब्द वापरून पुढे सुरू करतो.

तनय : हो. एकेकाळी थोडीफार फिलॉसॉफी वाचली ती आता उपयोगी पडायला लागली आहे. When my troubles were small, I was a whiner. Now that they are large, I have become a stoic.

बॅरिस्टर : दुखतं का रे?

तनय : सतत.

(काही काळ शांतता. एका चांदीच्या ट्रे वर निळा लखोटा आणि कात्री घेऊन रावजी येतो. बॅरिस्टर बसले आहेत त्यांच्याशेजारी टेबलावर ठेवतो.)

रावजी : सर, हा दुपारच्या डाकेने आला.

बॅरिस्टर : थॅँक यू, रावजी.

रावजी : येस, सर. (जातो.)

बॅरिस्टर : डॉक्टर, हा तुमच्यासाठी आहे.

(डॉक्टर लखोटा उघडून आतला कागद वाचतात. स्वत:शी हसतात आणि नंदिनीच्या कानात काहीतरी सांगतात. तीही स्वत:शी हसते.)

डॉक्टर : माई, तुम्हाला नातू होणार की नात ह्यावर प्रयोगशाळेतून रिपोर्ट आला आहे.

सावित्रीबाई : अहो, मग सांगा ना! ताणून कसलं धरताय?!

डॉक्टर : नंदिनीला कानात सांगितलं आहे. ती सगळ्यांना एकदमच सांगेल. (ग्रॅन्डफादर क्लॉककडे पाहात) मधुरा मुंबईहून यायचीच फक्त खोटी आहे. एव्हाना डेक्कन क्वीन आली असणार.

बॅरिस्टर : बसवण्णाला मी गाडी घेऊन स्टेशनवर जायला सांगितलं आहे. डेक्कन क्वीन नेहमी वेळेवर येते.

सावित्रीबाई : (घड्याळाकडे बघतात.) मग आता काही उशीर नाही. पण डॉक्टर, प्रयोगशाळेला कसं कळतं? आमच्या मेणोलीला एक आलवणातली बाई होती. पोटाची गोलाई कुठून कशी आहे ते निरखून बघून सांगायची. शेरभर तांदूळ आणि सव्वा रुपया घ्यायची.

नंदिनी : पण बरोबर सांगायची का?

सावित्रीबाई : आता अधीमधी चुकायचं. पण तेवढ्याचं काय? भावाकडे आश्रित म्हणून राहायची. तेवढाच तिला आधार होतो म्हणून लोक आपले बोलवत असत. पण डॉक्टर, तुम्हाला कसं कळलं ते सांगा.

डॉक्टर : माई, ते थोडं किचकट आहे पण गोळाबेरीज पद्धत सांगतो. असं बघा की आपल्या शरीरात हजारो-लाखोंच्या संख्येने पेशी असतात. तर यातली प्रत्येक पेशी म्हणजे एक लहानशी पिशवी समजा. ह्या पिशव्या एकमेकींवर रचून आपला प्रत्येक अवयव बनवलेला असतो.

सावित्रीबाई : प्रत्येक अवयव?

डॉक्टर : प्रत्येक अवयव. हात-पाय-पोट-डोकं सगळं. ह्याच पिशव्या रक्तातसुद्धा पोहत असतात. तर आता मुद्द्याची गोष्ट म्हणजे यापैकी प्रत्येक पिशवीत दुपेडी सुंभ ठेवलेले असतात.

सावित्रीबाई : सुंभ?!

डॉक्टर : हो. काथ्याचे सुंभ असतात तसेच थोडेसे हेही दिसतात. पण अतिशय लहान कणांचे बनवलेले असतात, त्यामुळे प्रयोगशाळेत भिंगाखाली बघावे लागतात. तर आता मेख अशी की बाईच्या शरीरातले आणि पुरुषाच्या शरीरातले सुंभ वेगवेगळे दिसतात. पण हे ओळखायला त्यातला माहितगार माणूस पाहिजे. म्हणजे असं पाहा माई की स्वयंपाकात तुमची नजर बसलेली आहे, त्यामुळे बासमती तांदूळ आणि चमेली तांदूळ यांतला फरक तुम्हाला पटकन ओळखू येतो. बरोबर की नाही? तर प्रयोगशाळेतल्या माणसांची नजर अशीच बसलेली असते. त्यामुळे बाईच्या शरीरातले आणि पुरुषाच्या शरीरातले सुंभ त्यांना पटकन वेगळे ओळखू येतात.

सावित्रीबाई : थोडं थोडं समजतंय! छान सांगता हो तुम्ही.

डॉक्टर : तर याचा उपयोग कसा करतात ते सांगतो. नंदिनीचं बाळ आत्ता तिच्या पोटात आहे. त्या बाळाच्या अंगातले काही सुंभ विलग होतात आणि वारेतून उलट्या दिशेने नंदिनीच्या अंगात झिरपत राहतात. म्हणून आपण तिचं थोडंसं रक्त काढून घेऊन प्रयोगशाळेत पाठवून दिलं. त्यातले नंदिनीच्या स्वत:च्या अंगचे सुंभ आणि बाळाकडून आलेले सुंभ पहिल्यांदा वेगळे वेगळे करायचे. एकदा हे झाल्यानंतर बाळाकडून आलेले सुंभ तेवढे निरखून पाहिले की मुलगा आहे की मुलगी आहे ते सांगता येतं.

सावित्रीबाई : सोपं आहे हो! ही प्रयोगशाळा कुठेशी असते मला पण सांगून ठेवा! मी मुरलीधराला जाते तिथल्या कितीतरी बायका माझ्या ओळखीच्या झाल्या आहेत. त्यांनाही उपयोग होईल.

बॅरिस्टर : पूल ओलांडलात की लगेच डावीकडे एक लाल विटांची इमारत आहे. सापडायला अगदी सोपी आहे.

सावित्रीबाई : (विचारात पडतात. तळहातावर आकृती काढून बघतात.) काही लक्षात येत नाहीय बाई. लकडी पुलावरून मी हजारदा गेले असेन. पण अशी इमारत कुठे दिसली नाही हो.

तनय : आई, आबा तुझी थट्टा करताहेत. तो लकडी पूल नव्हे.

सावित्रीबाई : मग कुठला पूल?

तनय : टॉवर ब्रिज. तमसा नदीवर आहे.

डॉक्टर : माई, अशी काही प्रयोगशाळा अजून आपल्या देशात नाहीय. त्यामुळे बॅरिस्टरांच्या ओळखीनं आपण नंदिनीचं रक्त जहाजाने लंडनला पाठवून तपासून आणलं.

सावित्रीबाई : बाई गं! एवढा आटापिटा कशाला करायला हवा?! आणि खर्च केवढा आला असेल तो. तीनेक महिन्यांत आपसूकच कळलं नसतं का?

तनय : आई, माझ्याकडे तेवढा वेळ आहे याची खात्री वाटत नाही. जाण्यापूर्वी मला माहित करून घ्यायचं होतं.

(थोडा वेळ कुणी काही बोलत नाही. मधुरा आणि बसवण्णा आत येतात तसे सगळेजण वेगवेगळ्या आविर्भावांत तिचं स्वागत करतात. नंदिनी जमिनीला टेकू देऊन सावकाश उठते. तनय आधाराला काठी घेऊन उभा राहतो. मधुरावर मिठ्या आणि पाप्यांचा वर्षाव होतो. मधुराच्या कानाशी काहीतरी पुटपुटून बसवण्णा लगबगीने गायब होतो.)

मधुरा : (समोर एक चषक ठेवते. त्यात एक लाल पुडकं आहे.) पप्पा आणि मम्मा! हा चकचकीत चषक मी आपल्या चरणी अर्पण करते. बॉम्बे जिमखान्याची सिंगल्स टूर्नामेंट जिंकून आले! फिरंगी रॅकेटनं साथ दिली.

(सगळेजण उत्साहाने टाळ्या वाजवतात.)

सावित्रीबाई : बबडे, फायनल आज दुपारीच होती ना?

मधुरा : हो. कुलाब्याच्या झीझी खंबाटाबरोबर होती. फार छान खेळली. तिची रॅकेट जपानी होती. पहिला गेम तिनं घेतला आणि दुसरा मी घेतला. तिसऱ्यात आम्ही दोघींनीही खूप जोर केला. पण गेमच्या मध्यावर कुठेतरी बिचारीनं माझा एक शॉट सोडून दिला तो लॉबीच्या अगदी गुंजभर आत पडला. ती संधी साधून मी नाक पुढे काढलं आणि ढकलाढकली करत इलेव्हन-एटनं जिंकले. She was very gracious about it. मला म्हणत होती एक दिवस माझ्याच घरी राहा, तुला मुंबई दाखवते म्हणून. पण इथल्या सगळ्यांची फार आठवण आली गं. म्हणून मग मी बक्षीस समारंभ झाल्या झाल्या व्हीटीला जाऊन थडकले. पप्पांनी शॉपिंगला दिलेले सगळे पैसे तसेच्या तसे परत आणले. इच्छाच नाही झाली.

सावित्रीबाई : आणि हे पुडकं कसलं?

मधुरा : येताना डेक्कन क्वीनमध्ये जमशेद भेटला. त्याने बाळासाठी नवे कपडे दिले आहेत. खास पारशी डिझाईनचे.

तनय : बबडे, तू आलीस तेव्हा आमचा तोच विषय चालू होता. पास-नापास कळलेलं आहे. आम्हा कुणालाच माहित नाही. नोनो सगळ्यांना एकदमच सांगणार आहे.

मधुरा : येस! स्टेशनवरून येताना मला बसवण्णाने बातमी दिली. तो म्हणाला की दुपारच्या डाकेनं एक फिकट निळ्या रंगाचं पाकीट आलं आहे. पाकिटाला स्टॅँप्स चिकटवले आहेत पण त्यांच्यावर कुठल्याच देशाचं नाव लिहिलेलं नाही त्यामुळे कुठून आलंय ते कळत नाही. एवढ्यावरून मला ताबडतोब कळलं कुठून आलंय ते! (नंदिनी काही बोलू लागणार तोच —) नंदी, फक्त एक मिनिट थांब! बसवण्णा परत येतो आहे —

नंदिनी : बरं बाई!

(आधी रावजी आणि त्याच्यापाठोपाठ बसवण्णा येतो. रावजीच्या हातात एका ट्रेवर बोन चायनाचा मोठा वाडगा आहे. बसवण्णाच्या हातात वेताची टोपली आहे. त्यातून तो एक निळा आणि एक गुलाबी पुष्पगुच्छ काढून नंदिनीसमोर एकेका हातात एकेक धरतो.)

बसवण्णा : मॅडम, आता सांगा!

नंदिनी : (त्याच्या हातातून गुलाबी पुष्पगुच्छ घेत) मला मुलगी होणार आहे! (सगळेजण टाळ्या वाजवतात. आता तिच्यावर मिठ्या आणि पाप्यांचा वर्षाव होतो.)

मधुरा : नंदीनं आणि मी ठरवलंय की बाळाचं नाव ठेवायचा हक्क तन्याचा असणार. तो आपल्याला आत्ताच सांगणार आहे. कारण —

तनय : हो. माझ्या मनात तसं पक्कं आहे, पण तरीदेखील पुन्हा एकदा मिनिटभर विचार करतो.

बसवण्णा : तनयसर विचार करतंय तोवर थोडंसं स्वीट खाऊन घ्या म्हणतो मी! (रावजी चांदीच्या चमच्याने प्रत्येकाच्या तळहातावर थोडं थोडं वाढतो.) बेळगावचं कुंदा आणलं आहे. असल्या ऑकेजनला अगदी फिट बसतंय की हो. कुंदा शब्द म्हटलं तर मराठीत पुल्लिंगी पण असतंय आणि स्त्रीलिंगी पण असतंय. रिझल्ट काही पण लागलं तरी चालतंय की!

डॉक्टर : (तळहात चाटून पुसून खात) फक्कड चव आहे.

बसवण्णा : असं प्रिप्रेशन फक्त बेळगावातच जमतंय हो. इथे पुण्यात कुणाला पण नॉलेज नाही बघा.

सावित्रीबाई : ठीक आहे बाबा, तू म्हणतोस तर तसं. मार टोमणे!

तनय : आबा, आई, सगळे. मी दोन्ही नावं ठरवली आहेत; आवडतात का सांगा.

बॅरिस्टर : दोन्ही?

तनय : दोन्ही. माझ्यानंतर आपल्या बंगल्याचं नाव बदलून टाका कारण त्यातला 'त' ठेवायचं काही कारण उरलेलं नसेल.

बॅरिस्टर : अरे पण —

तनय : प्लीज बदलून टाका. आणि कुटुंबातले सगळेजण नव्या नावात सामावून घ्यायला हवेत. मुलीचं नाव आपण 'गार्गी' ठेवूया, आणि बंगल्याचं नवं नाव सामगायन' असं ठेवूया: सावित्री-मधुरा-गार्गी-यदुनाथ-नन्दिनी.

बॅरिस्टर : दोन्ही छान आहेत. मला फार आवडली.

डॉक्टर : सगळ्यांनाच आवडली आहेत. चेहऱ्यांवर दिसतंच आहे.

तनय : बंगल्याचं नाव 'सामगायनं' असं ठेवलंत तरी चालेल. टिळक इथून जवळच राहायचे, त्यामुळे आपल्याला अनुस्वारित 'नंदिनी' चालेल किंवा 'न' मोडलेली 'नन्दिनी' चालेल.

मधुरा : तन्या, इतकी गुंतागुंत कशाला वाढवायची? मला वाटतं नुस्तं 'सामगायन' असंच नाव छान आहे. आधीच आपण सानुनासिक शहरात राहतो. त्यात उगीच माकडाच्या हाती कोलीत देऊया नको.

सावित्रीबाई : मग ठरलं तर. दोन्ही नावं गोड आहेत! मनातल्या मनात गुणगुणत राहावीत अशी आहेत.

नंदिनी : 'गार्गी' आणि 'सामगायन'. कशी वैदिक आणि गूढरम्य वाटतात!

तनय : हो ना. मागेच जायचं तर थोडंथोडकं कशाला? तीन हजार वर्षं का नको?

नंदिनी : तन्या, पोरगी मोठी झाली की एखाद्या मुंडण केलेल्या तिरसट गुरूकडे पाठवून तिला सामगायन शिकवूनच आणायचं. अवघड गोष्ट जमायला लागली की मजा येते. (तनय नि:शब्दपणे हसतो.)

बसवण्णा : बॅरिस्टरसर, एक रिक्वेष्ट आहे बघा.

बॅरिस्टर : बोल, बसवण्णा.

बसवण्णा : मी मायसोर कंट्री क्लबात चीफ गार्डनर होतं तिथलं क्लबाचं चीफ कॅबिनेट मेकर माझं दोस्त असतं. बंगल्याचं नवीन लेटरिंग ते टॉप ग्रेड मायसोर सॅँडलवूड मध्ये कार्व्हिंग करून देईल बघा. चंदनचं लाकूड म्हणजे बेष्ट चॉईस बघा. किती पण वर्ष गेलं तरी फ्रेग्रन्स टिकून राहतं.

बॅरिस्टर : थँक यू, बसवण्णा. छान कल्पना आहे.

रावजी : माझी पण एक रिक्वेस्ट आहे, सर.

बॅरिस्टर : बोल, रावजी.

रावजी : बंगल्याचं जुनं लेटरिंग टाकून देऊ नका. माझ्याकडे सांभाळायला द्या. आय ॲम व्हेरी अटॅच्ड टु इट. (रडू लागतो. त्याची समजूत कशी घालावी ते कुणाला कळत नाही.)

(रात्रीचे अकरा वाजले आहेत. अंगात एक ढगळ गाऊन घालून नंदिनी दिवाणावर पहुडली आहे. मधुरा तिच्या शेजारी बसली आहे. टेबलाचा आधार घेऊन उभा असलेला तनय तिघांसाठी ड्रिंक्स तयार करतो आहे. तो खूप आजारी आणि अशक्त असल्याचं त्याच्या हालचालींवरून स्पष्ट व्हावं.)

नंदिनी : दमले बाई!

मधुरा : हो ना. मला तर तुझ्या कवायतींकडे नुस्तं बघूनच दमायला झालं.

नंदिनी : पण माझ्या प्रयत्नांना शेवटी फळ आलं. सात पाउंड एक औंस वजनाची पोटची गोळी सुखरूप बाहेर निघाली.

मधुरा : गोळीकडे बघताक्षणीच मी प्रेमात पडले. पुढची वीस वर्षं मी तिचे सॉलिड लाड करणार आहे.

नंदिनी : दमणूक झाली, पण छान वाटतंय.

मधुरा : मला पण.

तनय : नोनोच्या पोटच्या गोळीचा, उर्फ आपल्या सर्वांच्या लाडक्या गारगोटीचा, उर्फ गार्गीचा आज पृथ्वीतलावरचा पहिला दिवस आहे. आणि तिच्या उर्वरित आयुष्याचाही पहिला दिवस आहे. This calls for a celebration.

नंदिनी : जन्मल्या जन्मल्याच बिचारीच्या नावाची मोडतोड सुरू झाली.

मधुरा : येस. आपल्या घराचं वळणच तसं आहे.

तनय : बबडे, some cream sherry for you. नोनो, तुझ्यासाठी मंडईतल्या ताज्या मोसंब्यांचा रस. आणि माझ्यासाठी बोटभर स्कॉच. किंवा, कदाचित, दोन बोटं स्कॉच.

मधुरा : तन्या, सांभाळून.

तनय : असू दे गं. या घटकेला काही फरक पडायचा नाही. (दोघींना त्यांचे ग्लासेस देऊन काठीचा आधार घेत नंदिनीच्या दुसऱ्या बाजूला बसतो. तिघेही न बोलता ग्लासला ग्लास भिडवतात.)

नंदिनी : (रसाची चव तोंडात घोळवत) नव्या सवयी जडत चालल्या होत्या त्या पुन्हा बदलाव्या लागल्या.

मधुरा : अजून वर्षभर समज.

नंदिनी : ते आता गार्गीच्या लहरीवर आहे.

मधुरा : (क्रीम शेरी नंदिनीच्या नाकाजवळ नेते.) नुसती हुंगून बघायला हरकत नाही.

नंदिनी : (नाक भरून वास घेत) छान वास येतोय गं.

मधुरा : तुला पण.

(तिघेही आरामात रेलून घुटके घेत राहतात. बॅरिस्टर आत येतात. ते हाउस-गाऊनमध्ये आहेत. हातात एक ब्रीफकेस आहे.)

बॅरिस्टर : अरे! नवी पिढी इथे जमलेली दिसतेय.

नंदिनी : आम्ही यथाशक्ती सेलिब्रेशन करतो आहोत. आबा, do have a nightcap with us! पण इतक्या उशीरा तुम्ही जागे कसे काय?

बॅरिस्टर : (स्वत:साठी थोडीशी स्कॉच ओतून घेत) मोटवानीच्या केसवर काम करत होतो. खरं सांगायचं तर मला त्याचा कंटाळा यायला लागला आहे. केसचाही आणि माणसाचाही. पण मध्येच सोडून देता येत नाही ना. ह्या खटल्याचा एकदा सोक्षमोक्ष लागला की असल्या अप्रिय अशिलांशी संपर्क तोडूनच टाकावा म्हणतो. आयुष्यात खूप पैसे मिळवून झाले. बास झालं! यापुढे आता मी फक्त निरपराध लोकांचंच वकिलपत्र घेणार आहे.

मधुरा : पप्पा, असं नका करू. गार्गीचं सगळं शिक्षण अजून व्हायचं आहे.

बॅरिस्टर : बबडे, त्याची काळजी करू नकोस. आपल्याकडे खूप आहेत. खूप.

मधुरा : बघा हं! तुमच्यावर भिस्त ठेवून राहतेय.

बॅरिस्टर : बेशक राहा! (नंदिनीला उद्देशून) माझी नात झोपली का व्यवस्थित?

नंदिनी : हो. अर्थात रात्री केव्हातरी उठून सामगायन सुरू करेलच. पण आबा, स्त्रीराज्यातल्या काही घडामोडी वर्णन करून सांगायला अडचणीच्या असतात. तेव्हा त्यांत शिरूया नको. कल्पनेने समजून घ्या—

बॅरिस्टर : ठीक आहे!

तनय : पण एवीतेवी स्त्रीराज्यात राहायची आबांना आता सवय करून घ्यावी लागेल. चार बायकांच्या घरात त्यांचा एकुलता पुरुष लांबोडा होणार आहे.

(काही क्षण अवघड शांतता.)

मधुरा : पप्पा, मी आणि नंदी झोपून टाकू? खूप दमणूक झाली आहे. उद्या सकाळी किंवा दुपारी किंवा संध्याकाळी भेटू.

बॅरिस्टर : Of course. Goodnight, my girls.

नंदिनी : Goodnight, आबा.

मधुरा : Goodnight, पप्पा. आणि तन्या, तूही फार जागू नकोस.

तनय : नाही जागत. Goodnight, dears.

(तनयच्या आणि बॅरिस्टरांच्या कपाळाचं चुंबन घेऊन दोघी हातात हात घालून आत जातात. ते दोघे एकमेकांकडे थेट न पाहता काही क्षण अबोलपणे स्कॉच पीत राहतात.)

बॅरिस्टर : कसा आहेस?

तनय : (अनिश्चित मान हलवतो पण थोडा वेळ काही बोलत नाही. क्षणभर डोळे मिटून घेऊन चेहरा शांत करण्याचा प्रयत्न करतो.) चांगली बातमी अशी काही नाही.

बॅरिस्टर : Sorry to hear that. तुझ्यासाठी भेटवस्तू आणली आहे. मला नात दिल्याबद्दल. खूप वर्षांपूर्वी घेऊन ठेवली होती. (ब्रीफकेस उघडून कातडी बांधणीचं एक जुनं पुस्तक त्याला देतात.) एडवर्ड फिट्झजेरल्डच्या 'रुबायत' ची लिमिटेड एडिशन आहे. कवितेत मला फार गम्य नाही, पण तुला आहे. मी लंडनला असताना तिथे एक 'उमर खय्याम क्लब' होता. 'रुबायत' मधल्या कविता आणि आयुष्याबद्दलचा एकूणच तो पवित्रा ह्या सगळ्याचा जबरदस्त पगडा मनावर असलेली ही मंडळी होती. मिडल टेंपलमधला माझा एक मित्र त्यांच्यात असायचा. दिवसा वकिली, रात्री कविता. तेव्हाच केव्हातरी ही शंभर प्रतींची आवृत्ती क्लबने छापून घेतली. It was meant for private circulation. वशिला लावून मी पण एक घेतली. आतला बुकमार्क फार छान आहे. केशरी रंगाचा एक धागा बाइंडिंगमध्ये शिवून टाकून त्याच्या दुसऱ्या टोकाला जांभळ्या रंगाची मखमली थैली बांधली आहे. They chose classic Oriental colours. थैलीत ग्लेनद्रोनाखची छोटी बाटली आहे. सांभाळून काढ. It's a 21-year old Cask Strength Limited Edition. Hope you like it.

तनय : Thank you, आबा. It means a lot to me.

बॅरिस्टर : And you know, I am sorry for —

तनय : It's all right.

बॅरिस्टर : Okay. Goodnight then. फार वेळ जागू नकोस.

तनय : नाही जागत. Goodnight, आबा.

(बॅरिस्टर जातात. तनय तिथेच थांबतो.)

(दिवाणखान्यात आता फक्त झुंबरातून येणारा प्रकाश आहे. तनय एकाग्रतेने पुस्तकाची पानं उलटतो आहे.)

तनय : आहा! (कविता आवडली आहे अशा आविर्भावात मान डोलावत) अस्मादिक, कान देऊन ऐका. उमर खय्यामला सुरईत घुसळून एडवर्ड फिट्झजेरल्डने पृष्ठभागावर आणलेली रुबाई क्रमांक एकूणपन्नास:

It's all a chequer-board of nights and days!

अरेच्या! हा काय समोरच आहे! अभिधा असताना लक्षणा कशाला हवी? (उठून बुद्धिबळाच्या संचाकडे जातो.) चेस-बोर्डवरच्या पात्रांना हलवून आपण त्याचा चेकर-बोर्ड करूया. (बुद्धिबळाच्या पटावरचे सगळे मोहरे बाजूच्या टेबलावर ठेवून पट रिकामा करतो. पुढली काही मिनिटं ह्या पटाचा टेबल म्हणून वापर होईल.)

It's all a chequer-board of nights and days
Where destiny with men for pieces plays
Hither and thither moves, and mates and slays
And one by one, back in the closet lays.

It is a quatrain, love. यमकांची अशी रचना जमवायला अंमळ अवघड असते:
days-plays-slays-lays

अडगुलं-अडगुलं-अडगुलं-अडगुलं. A-A-A-A.

चार-ओळी. ही चार-ओळी आहे. चारोळी आहे. पण कवितेची चव चारोळीसारखी नाही. कवितेची चव कडू आहे. तोंड कडू होतं. तसं नको. तोंडची ही चव पुसून टाकायला हवी. रुचिपालट करायला हवा. सुदैवाने रुचिपालट करण्याची सोय आहे. (पुस्तकातला धागा हाताळतो. थैली उघडून स्कॉचची बाटली पटावर सावकाश ठेवतो. तिच्यावर डकवलेली चिठ्ठी वाचतो.)

Glendronach. ग्लेन-द्रोनाख. द्रोनाख-दरी. सुंदर, सुरम्य स्कॉटलंडमधली ही पाहा द्रोनाख-दरी. ग्लेन-द्रोनाख. (काहीसा अतिशयोक्त स्कॉटिश हेल काढून 'ख' म्हणण्याचा प्रयत्न करत, खाकरत-खोकरत हा शब्द पुन्हा पुन्हा उच्चारतो. या प्रयत्नात त्याला ढास लागते पण सावरतो.) बापरे! शब्द धोकादायक आहे. जपून उच्चारायला हवा. (यानंतर तोच शब्द मृदु आवाजात 'ख' म्हणत उच्चारतो.) तर ह्या दरीतली दारू. (एका क्रिस्टल ग्लासमध्ये बाटली उपडी करतो. ग्लास नाकाशी धरून हुंगतो आणि चव घेऊन पाहतो.) चवींच्या लाटा येताहेत. एकामागून एक. (किंचित थांबत थांबत एकेक चव ओळखतो.) मनुकेची चव. दालचिनीची चव. तापवलेल्या काळ्या गुळाची चव. (हे म्हणत असताना सतत स्कॉच पितो आहे.)

अस्मादिक, पुढे ऐका. रुबाई क्रमांक एक्कावन्न:

The moving finger writes; and having writ,
Moves on: nor all thy piety nor wit
Shall lure it back to cancel half a line
Nor all thy tears wash out a word of it.

This too is a quatrain, love. पण यमकरचना थोडी वेगळी आहे:
writ-wit-line-it

अडगुलं-अडगुलं-मडगुलं-अडगुलं. A-A-B-A.

(शेवटचा घोट घेतो.) संपली. दारू संपली. दरीतली दारू संपली. पण दारूची बाटली मात्र मोठी घाटदार आहे. (ती उचलून निरखून पाहतो.) थैलीत जपून परत ठेवून देऊया. (बाटली ठेवू लागतो.) अरेच्या?! हाताला काहीतरी निमूळतं लागतंय. आत दुसरी एक बाटली आहे की काय? (थैलीत हात चाचपडून आतली वस्तू बाहेर काढून पटावर ठेवतो.) हं! Curiouser and curiouser. (हे Pattern 1853 Enfield Rifle-Musket चं काडतूस आहे.) वस्तू धोकादायक आहे. जपून हाताळायला हवी! आबांनी बंदूक विकत घेतली तेव्हा हे देखील घेतलं असणार. इथे ठेवून विसरून गेलेले दिसतात. कुणास ठाऊक.

(काडतूस पटावर उभं करतो. मान तिरपी करून त्यावर लिहिलेली अक्षरं वाचतो.) The Royal Gunpowder Mills, Lea valley, England. ली-व्हॅली. ली-दरी. आबांच्या आवडत्या इंग्लंडमधली ही पाहा ली-दरी. (काडतूस हातात घेऊन चाटून पाहतो.) चवींच्या लाटा येताहेत. एकामागून एक. सिगरेटभोवतालच्या कागदाची चव. मधमाशांनी रिकाम्या केलेल्या पोळ्यातल्या मेणाची चव. हं! पण तिसरी चव नीट ओळखू येत नाहीय. फोडणीच्या डुकराबरोबर साधी गोमाता की साध्या डुकराबरोबर फोडणीची गोमाता? अशीच काहीशी चव. (भिंतीकडे जाऊन तिथली बंदूक खाली काढून घेऊन येतो. दातांनी काडतूस फाडून आतली दारू बंदुकीच्या नळीत सावकाश ओततो.) दरीतली दारू अजून शिल्लक होती! (कागदी आवरणातली शिशाची गोळी नळीत टाकून बंदुकीला लावलेली सळई आत खुपसून गोळी घट्ट बसवतो.) आता ऐका, अस्मादिक यदुनाथ जातेगावकर ह्यांनी रचलेली एक अप्रकाशित रुबाई:

The moving bullet; having done its deed
Moves no more: and disgorges its speed
Into coagulations of soft flesh; which enclose,
Lovingly, the contours of a deadened seed.

A-A-B-A. आऽबा.

(बंदुकीची नळी तोंडात धरतो आणि दोर खेचून झुंबराचा दिवा मालवतो. दिवाणखान्यात पूर्ण अंधार आहे. गोळी झाडल्याचा आवाज.)

❈ ❈ ❈
समाप्त

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

काय प्रतिक्रिया द्यायची तेच समजत नाही!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मनोरंजन चांगले झाले. संवाद आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अतिशय रंगवून आणि गुंगवून ठेवणारं लिखाण आहे.
मला काही कारणाने सबंध रात्र जगवायची होती. मी तीनही भाग एकापाठोपाठ वाचून काढले.
मेघनाभुस्कुटे ने आवर्जून वाच असं काल सांगितलं होतं. तिचे आभार या लेखनाकडे घेऊन आल्याबद्दल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तीनही भाग सलग वाचले. आवडले, नाही आवडले या ढोबळ प्रतिक्रिया टाळतो. पहिल्या अंकातील पात्ररचना तसेच संवादलेखन पद्धती जुन्या पारंपरिक मराठी दिवाणखाना टाईप नाटकातली होती पण कथानक हळूहळू पकड घेत गेले. दुसऱ्या व तिसऱ्या अंकात कथानकात असलेली वळणे पारंपरिक कथानकाच्या मर्यादा ओलांडून पुढे जाणारी आहेत. किंबहुना पारपंरिक घाट जाणिवपूर्वक निवडला आहे हे लक्षात आहे. नाटकातील संवादांमधले अंतस्थ नाट्य विलक्षण आहे. हे नाटक वाचून तुमचे पुढचे लेखन वाचण्याची उत्सुकता मात्र निश्चित निर्माण झाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0