‘झिप’ची अजब कहाणी

photo 1
आपण पँट, जॅकेट वा बॅग इत्यादींना एक स्लायडर ओढून बंद करतो वा उघडतो, यात काही तरी विशेष आहे हे कधीच आपल्या लक्षात येत नाही. परंतु यातील स्लायडर व त्याखालील एकमेकात अडकणाऱ्या दातांची पट्टी - ज्याला झिप (वा झिपर) म्हणून ओळखले जाते - हा एका प्रकारे चमत्कार आहे असे म्हटल्यास ती नक्कीच अतिशयोक्ती ठरणार नाही. औद्योगिक क्रांतीच्या काळात जन्माला आलेले हे अपत्य तुलनेने फारच दुर्लक्षित राहिले. आयसी इंजिन, टर्बाइन, बल्ब इत्यादींना जेवढी प्रसिद्धी मिळाली त्याच्या सहस्रांशसुद्धा प्रसिद्धी झिपच्या वाटेला आली नाही. झिप दिननित्यात वेळोवेळी वापरातली उपभोग वस्तु असून आपल्या आयुष्यात तो इतका अंगवळणी पडला आहे की त्याचा विचार करायलाही आपल्याला फुरसत नसते. परंतु हा चमत्कार आपल्याला पदोपदी अनुभवायलो मिळतो; एवढेच नव्हे तर हा अनुभव सर्वव्यापी आहे.

झिपचे मार्केटिंग
2017च्या एका सर्वेक्षणानुसार झिप उद्योगाची उलाढाल 11200 कोटी डॉलर्स एवढी होती. ही उलाढाल गर्भनिरोधक साधनांच्या उद्योगापेक्षाही जास्त असेल. एका अंदाजाप्रमाणे 2024 पर्यंत ही उलाढाल 19800 कोटी डॉलर्सपर्यत पोचू शकेल. खरे पाहता उलाढालीतील ही वाढ झिपमध्ये अभूतपूर्व सुधारणा होतील किंवा त्यात नाविन्यपूर्ण बदल होतील वा वस्त्रोद्योगात काही क्रांतीकारी बदल घडतील वा बॅग्स-बॅगेजच्या स्वरूपात वेगळे काही तरी होईल यावर अवलंबून नसेल. जगभरातील नवीन, स्वस्त व जास्त प्रमाणात गार्मेंट्स वापरण्यासाठीचा व पुढारलेल्या देशातील फॅशनचे अनुकरण करण्याकडे इतर देशात वाढत असलेला कल यामुळे ही वाढ होणार आहे. जरी झिपचा खप जगभरात मोठ्या प्रमाणात होत असला तरी याचे उत्पादन मूठभर कंपन्यांच्या हातात आहे. सुमारे 40 टक्के वाटा जपानच्या YKK या कंपनीचा असून याच कंपनीचे 73 देशात उत्पादन केंद्रं आहेत. चीनमधील क्युयाटो योंग्जिया कौंटी या बटणची राजधानी म्हणून जगभरात नावाजलेल्या शहरात दर वर्षी 2 कोटी किलोमीटर लांब भरतील एवढे झिपचे उत्पादन होते. जागतिक लोकसंख्येपेक्षा कित्येक पटीने जास्त प्रमाणात झिपचे उत्पादन होत आहे. भारतातही दिल्लीजवळील गुरगांव येथील टेक्स ही झिप उत्पादनातील अग्रेसर कंपनी आहे.

इतिहास
झिप ही एक अलीकडील ग्राहकोपयोगी वस्तु असून त्याचा प्रसार मात्र कासवाच्या गतीने झाला आहे. खरे पाहता माणूस रानटी अवस्थेतून बाहेर पडत असताना ऊन-पाऊस, थंडी व वारा यापासून शरीराचे रक्षण करून घेण्यासाठी प्रयत्न करू लागला. झाडांची पानं, झाडांची पातळ साल वा प्राण्यांची कातडी यासाठी उपयोगात आली. शेतीचा व नंतर कापसाच्या शोध लागल्यानंतर कापसापासून तयार झालेले कापड गुंडाळून त्यानी शरीराचे रक्षण केले. बटण, भोक पाडण्यासाठी सुई या गोष्टी नसल्यामुळे कदाचित कापडाच्या दोन टोकांना गाठ मारून तो आपले शरीर झाकत असावा. नंतर केव्हा तरी माशांच्या हाडापासून बनविलेल्या सुईसदृश साधनापासून वा टोकदार काटा वापरून कपड्याला भोक पाडून त्यातून काही तरी ओवून कापड शरीरभर घट्ट पकडता येते हे त्याच्या लक्षात आले. बटण हा प्रकार केव्हातरी नंतर शोधला असावा. 5000 वर्षापूर्वीच्या मोहंजोदारो-हरप्पा संस्कृतीत बटणटाइप वस्तु होत्या असे इतिहासकारांचा कयास आहे. बटण असले तरी कपड्यांना भोक पाडण्यासाठी सुईचा शोध नंतरच्या काळात लागला असावा. सुईसाठी लागणारे लोखंड चीनमधून जगभर पसरले. त्यानंतर मात्र बटण-काजे हा प्रकार रूढ झाला असावा. ग्रीक-रोमन काळात पायघोळ कपडे अंगावर गुंडाळलेले व खांद्यापाशी ब्रूचसारखे दिसणारे काटेसदृश्य वस्तु पाहायला मिळतात. त्यांचे बहुतेक कपडे जमिनीवरसुद्धा पदर लोंबकळत जाण्याइतपत लांब होते. कदाचित कपड्याच्या लांबीवरून त्यांची श्रीमंती ओळखली जात असावी.

मध्ययुगीन कालखंडात यासंबंधात भरपूर प्रगती झाली. त्याकाळातील अनेक चर्चमधील पुतळ्यांच्या कपड्यावर ब्रूचसारखे बटण व ते लावण्यासाठी भोक बघायला मिळतात. त्यापूर्वी लेसटाइप पट्टीने अंगावरील कपडे घट्टपणे बांधता येतात हे लक्षात आले असावे. 14व्या शतकात लूप व हूक यांचा शोध लागला असावा. कदाचित हाच झिपचा पूर्वज असावा. या लूप व हूकमुळे कपड्याला एकमेकावर न ठेवता घट्ट बांधता येते हे लक्षात आले असावे. परंतु हा प्रकार हाताळण्यास अवघड वाटला असावा. श्रीमंतांच्याकडे या कामासाठी नोकर ठेवलेले असावेत. महिलांच्या छातीवरील अंतर्वस्त्रासाठी लूप-हुकची पद्धत अजूनही टिकून आहे. प्रसिद्ध साहित्यिक मार्क ट्वेनने यासंबंधात 1871साली पेटंटही घेतल्याची नोंद आहे.

याच काळात अमेरिकन औद्योगिक प्रतिभेने झिपचा शोध लावला. एका इतिहासकाराच्या मते त्या काळातील इतर शोधांच्या तुलनेत झिप अगदीच विसंगत वाटत होता. थॉमस एडिसनच्या बल्बचा शोध सर्वत्र प्रकाश उधळून टाकणारा होता. अत्यंत स्वस्तही असल्यामुळे गरीब-श्रीमंतासकट सर्वानी त्याला उचलून धरले. अलेक्झांडर ग्राहम बेलच्या टेलिफोनने अशक्य असेच वाटलेल्या दूर संभाषणाला शक्य करून दाखविले. दीर्घकाळपर्यंत याची उपयुक्तता टिकेल की नाही याबद्दल त्याकाळी शंका होती. बघता बघता याची लोकप्रियता वाढतच गेली. परंतु झिपच्या संदर्भात एवढी घाई करण्याची गरज त्या काळच्या समाजाला वाटला नाही. जे काही – बटण, हूक, लेस, बक्कल इ.इ. – होते ते टाकाऊ आहे असेही वाटले नाही. त्यामुळे झिपमध्ये विशेष काही तरी आहे हे त्याकाळीही वाटले नाही (व कदाचित आजसुद्धा!)

झिपचा शोध
1851च्या सुमारास एलियास होवे या संशोधकानी Automatic, Continuous Clothing Closure या साधनाचे पेटंट घेतले. त्याच्या पेटंटमध्ये स्लाइड फासनरच्या सहाय्याने धागा ओढून ठेवण्याची कल्पना होती. परंतु त्याच्या उत्पादन-विक्रीसाठी त्यानी विशेष प्रयत्न केले नाही. 40 वर्षानंतर 1891मध्ये व्हिटकोंब जुड्सन याला स्लाइडरची ही कल्पना फार आवडली. अफाट कल्पना लढवणारा चिकॅगो येथील हा एक संशोधक होता. त्यानी काँप्रेस्ड हवा वापरुन स्ट्रीटकार्स चालवण्याचे प्रयोग केले. त्याचवेळी पायातील बुटाच्या लेसला पर्याय म्हणून हुक्स व त्याना अडकवण्यासाठी स्लायडरची रचना केली. 1893च्या सुमारास त्यांनी यासंबंधात भरपूर प्रयोग केले. परंतु ही वस्तु प्रत्यक्षात आणण्यात तो यशस्वी होऊ शकला नाही. तरीसुद्धा त्यानी युनिव्हर्सल फासनर्स या नावाने एक कंपनी काढली. त्यानंतर वैफल्यग्रस्त अवस्थेत त्याला ही कंपनी विकावी लागली. स्विडनहून अमेरिकेत स्थलांतरित झालेल्या गिडियन सँडबॅक या इंजिनियरने त्या कंपनीचा ताबा घेतला. प्यायच्या सूपच्या चमच्यांच्या आकारावरून काही कल्पना लढवत त्या एकमेकात विणतील अशी रचना त्यानी केली. कंपनीचे नाव बदलून आटोमॅटिक हूक अँड आय कंपनी या नावाने आजच्या झिप डिझाइनच्या जवळपास असलेले डिझाइन त्यानी विकसित केले. हुकच्या ऐवजी दातासारख्या आकाराच्या व एकमेकात गुंतणाऱ्या त्याच्या या डिझाइनमध्ये धातूचा वापर करून त्याला एक स्लायडरची जोड दिली व स्लायडर वर खाली होत असताना उघड वा बंद होण्याची सोय त्यात त्यानी केली. अशाच प्रकारचे एक डिझाइन स्वित्झर्लँडमधील कॅथरिना कुन्ह मूस या महिलेने विकसित केला होता. परंतु त्याचे उत्पादन होऊ शकले नाही.

सँडबॅक याच्या झिपच्या सुधारित डिझाइनला अजिबात मागणी नव्हती. त्याचा वापर फक्त पैशाचा बटवा किंवा तंबाखूची पिशवी यांच्यापुरतेच सीमित होती. अंगावरच्या कपड्यांसाठी बटणऐवजी झिपचा वापर होऊ शकेल याची पुसटशी कल्पना त्या काळी नव्हती. पहिल्या महायुद्धाने मात्र झिपला उभारी दिली. 1918च्या सुमारास अमेरिकन नौदलातील वैमानिकांच्या हवाबंद जॅकेटसाठी झिपचा वापर करण्यात आला. याच सुमारास सँडबॅक यानी झिपच्या युरोपमधील उत्पादनाचे हक्क मार्टिन ओथ्मर विंटरहाल्टर या जर्मन उद्योजकाला विकले. त्यानी यात फासळी व खाच वापरून काही सुधारणा केल्या. 1923मध्ये गुडरिच या टायर उत्पादन करणाऱ्या कंपनीने पावसाळ्यात वापरता येणाऱ्या रबरी बुटासाठी झिपचा वापर केला. ‘झिपर’ असे तिचे नामकरण करण्यात आले. हूकलेस फासनर ऐवजी फूटवेअर झिपर या नावाने झिपची नवी ओळख झाली. अंगावरील जॅकेटसाठीसुद्धा झिपचा वापर होऊ लागला. अमेरिकेत झिपला झिपर असेच सर्रासपणे म्हटले जाते. परंतु हे साधन सामान्यांना न परवडण्यासारखे होते. त्यामुळे त्याच्या डिझाइनमध्ये फारशी प्रगती झाली नाही. कदाचित अमेरिकेतील तयार कपड्यांचा बाजार कंजूस असे समजलेल्या ज्यूंच्या हाती होता; म्हणून झिपच्या धंद्यात म्हणावी तितकी वाढ झाली नाही, असे कारण पुढे केले जाते. परंतु ते तितके पटण्यायोग्य वाटत नाही. मुळात 1-2 डॉलर्सला मिळणाऱ्या तयार कपड्यासाठी 30-35 सेंटचे झिप परवडणारे नव्हते. कारण त्या काळी बटण-काजेसाठी फक्त 2-3 सेंट्स खर्च येत होता.

सुप्त आकर्षण
यात फक्त पैशाचा प्रश्न नव्हता. झिपचे वापरायला सुलभ व उघड-बंद करण्यातील तरलता हेच त्याला मारक ठरल्या. 1930च्या सुमारास वापरत असलेल्या महिलांच्या कपड्यात झिपमुळे कामुकता वाढते म्हणून नाक मुरडणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली. झिप हे कामोद्रेक उद्दीपन करणारे साधन म्हणून हिणवण्यात आले. प्रख्यात साहित्यिक अल्डस हेक्सलेसहित त्याकाळच्या लेखकांनीसुद्धा यात पुढाकार घेतल्याची उदाहरणं सापडतील. हक्सलेच्या ब्रेव्ह न्यू वर्ल्ड या त्याच्या अत्यंत गाजलेल्या पुस्तकातील झिप्पिकॅमिनिक्स व झिप्पिजामास ही पात्रं एकाच वेळी आधुनिकही वाटत होती व रानटीही वाटत होती. कारण लेखकाच्या मते झिपर हे सरपटणाऱ्या मगरीचा वंशज वाटत होता. झिपच्या संदर्भात आधुनिकता, प्रचंड उत्पादन योग्य, सहजपणे नक्कल करता न येणारी असे असले तरी निरर्थक सेक्सी असे त्याबद्दल उद्गार काढले जात होते. तरीसुद्धा त्या काळच्या अनेकांना ती हवीहवीशीसुद्धा वाटत होती. फॅशन डिझायनर्स आपल्या उत्पादनात झिपचा वापर करू लागले. वॅलिस सिंम्प्सन या सातव्या एड्वर्ड राजाच्या पत्नीला झिप लावलेल्या परिधान वस्त्रांचे विलक्षण आकर्षण होते. स्वतःच्या नवऱ्याच्या पँटला झिप लावण्यास तिने भाग पाडले. तिच्या मते ती एक ‘प्रदर्शनीय’ वस्तु होती. यथा राजा तथा प्रजा या उक्तीप्रमाणे त्या काळचे अभिजन राजाचे अनुकरण करण्यात पुढाकार घेत होते. प्रिन्स्टन विश्वविद्यालयातील 85 टक्के विद्यार्थ्यांच्या कपड्यात बटणऐवजी झिपचा वापर केला होता, असे 1940च्या सुमारास घेतलेल्या एका सर्वेक्षणात आढळते. परंतु 60 वर्षाच्या पुढील वयस्कर मात्र बटण-काज असलेल्या कपड्यांनाच शरण गेले होते!

सेक्सी झिप
दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतर झिपला चांगले दिवस आले. झिप वापरणाऱ्यांमध्ये आपण कुणी तरी क्रांतीकारक, शूर, वीर असा काहीसा आव होता. मार्लन ब्रॅंडो सारखे नटांच्या वा पंक या पंथांच्या युवकांच्या कपड्यांत झिपला असाधारण महत्व दिले जात होते. कारण त्यांना झिपमुळे पुरुषी श्रेष्ठत्व मिरवता येते असे वाटत असावे. शरीरावरील घट्ट कपड्यामुळे व्यक्तिमत्व उठून दिसते, स्त्रिया आकर्षित होतात, हा समज त्यामागे असावा. जास्त जाडीची टीप झिपसाठी वापरल्यामुळे अंगावरील कपडे घट्ट आवळल्यासारखे बसत होते व त्यामुळे पीळदार शरीर (स्त्री)मन वेधून घेणारा ठरेल हा हिशोब त्यामागे असावा. त्याकाळापर्यंत स्त्रिया वापरत असलेल्या तंबू टाइप कॉर्सेटचा जमाना संपत आला होता. गिल्डा (1946) या चित्रपटात रिटा हेवर्थ ही नायिका ‘मला झिपर बंद करता येत नाही.’ असे जेव्हा नायकाला म्हणते तेव्हा ‘यातून तुला काही तरी (वेगळे) सुचवायचे आहे का?’ असे प्रश्नार्थक उद्गार काढतो. कदाचित झिपरचा वापर एकेकट्यानी करायचे नसून आपापसात दोघानी मिळून करायचे असे त्यातून सुचविले जात असावे. बघता बघता झिपची जागा शरीराच्या पुढच्या भागातून मागच्या पार्श्वभागाजवळ गेली. झिप वर खाली करण्यातील मजा और आहे असे त्या काळच्या जोडप्यांना वाटले असावे. झिप उघडे करण्याला वेगळा ‘अर्थ’ प्राप्त झाला. जेम्स बाँडच्या, रॉजर मूर हिरो असलेल्या, लिव्ह अँड लेट डाय (1973) या चित्रपटात जेम्स बाँड नायिकेच्या पाठिमागे जाऊन तिच्या कपड्याचे झिप उघडलेले तिला कळलेसुद्धा नाही. कारण झिप उघडण्यासाठी हाताचा स्पर्श न करता लांबूनच लोहचुंबकानी झिप उघडण्याची किमया त्यानी केली होती! एरिका जोंगच्या फीअर ऑफ फ्लाइंग या पुस्तकात तर झिपलेस सेक्सचे वर्णन आहे. झिपच्या कामोत्तेजकता कंबरेच्या खाली पायांना घट्ट चिकटून बसणाऱ्या जीन्स पँट्समध्ये प्रकर्षाने जाणवतो. पुरुषीपणाचे उघड उघड प्रदर्शन करण्यात जीन्सचे कपडे आघाडीवर होते, असे म्हणता येईल. रबर वा PVCपासून बनविलेल्या घट्ट कपड्यापेक्षा त्याला लावलेले झिपच जास्त आकर्षक वाटणारा होता.

अव्यक्त भीती
गुप्तांगाजवळ झिप असणे हाच मुळात धोकादायक आहे असे अनेकांना त्याकाळी वाटत होते. स्लायडर वर खाली करत असताना त्यात गुप्तांग अडकून बसल्यास काय काय होऊ शकेल याची भीती अनेकांच्या मनात होती. रोनाल्ड रीगन चित्रपटात काम करत असताना झिप असलेले कपडे टाळत असे. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी झिप दगा दिल्यास किती नाचक्की होईल याची त्याला सारखी भीती वाटत होती.

photo ३
सुधारणा
झिपचा वापर जगभर होत असल्यामुळे त्यात काही भव्य, दिव्य अशा सुधारणा झाल्या आहेत का? या प्रश्नाला नाही असेच म्हणावे लागेल. धातूच्या ऐवजी नायलॉन वा प्लॅस्टिकपासून झिपरचे दात व/वा स्लायडर बनविण्यात आले, यालाच फार फार तर सुधारणा म्हणता येईल. काही ठिकाणी वेटोळ्या आकारातील झिप वापरलेले असतील. काही ठिकाणी त्यातील लवचिकतेत वाढही झाली असेल. परंतु मूळ डिझाइनपेक्षा विशेष नाविन्य असलेलेल झिप कुठेही दिसत नाही. खरे पाहता झिपच्या दातांच्या रचनेतच त्याच्या क्षमतेचे रहस्य दडले आहे. त्यांच्यातील अचूकतेची खात्री व कमी खर्चात, मूळच्या डिझाइनमध्ये बदल न करता मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्याचे तंत्रज्ञान शोधण्याला प्रगती म्हणता येईल. सर्व दातांची रचना एकपंक्तीत आणणे वा एखादा दात मध्येच तुटू नये याची काळजी घेणे हे मोठ्या प्रमाणात उत्पादन करणाऱ्यांना आव्हानात्मक असू शकेल. अचूक गुणवत्ता नसल्यास फक्त झिपच नव्हे तर संपूर्ण कपडे फेकून द्यावे लागतील याची जाण ठेऊनच नियोजन करावे लागेल.

जपानमधील YKK ही झिप उत्पादनातील एक अग्रेसर कंपनी असून या कंपनीने झिपच्या सुधारणाच्या संदर्भात काही पाऊले उचलली आहेत. झिप किमान 10000 वेळा तरी वर-खाली करता यावी यासाठी त्याच्या गुणवत्तेत वाढ केली आहे. टडाओ योशिडा या उद्योजकानी 1934मध्ये या कंपनीची स्थापना केली. दुसऱ्या मदायुद्धात त्याच्या कंपनीच्या ठिकाणी बांबहल्ला झाल्यामुळे युद्धानंतर पुन्हा एकदा सुरुवातीपासून कंपनी उभी करावी लागली. त्याच्या उत्पादनातील गुणवत्ता व विश्वासार्हता यामुळे युद्धोत्तर काळात ही कंपनी भरभराटीला आली. जगभर YKKच्या झिपला मागणी येऊ लागली. 1960च्या सुमारास कंपनीने अमेरिकेत उत्पादनाला सुरुवात केली. वस्त्रोद्योग अमेरिकेबाहेर जाऊ लागल्यामुळे YKKचे झिपसुद्धा त्या उद्योगाच्या मागे मागे जाऊ लागली. 73 देशात या कंपनीचे उत्पादन केंद्रं आहेत. जास्तीत जास्त उत्पादन चीनमध्ये होत आहे.

ही कंपनी जलनिरोधक, उष्णतानिरोधक, अंधारात चमकणाऱ्या झिपचे उत्पादन करू लागली. झिपमध्ये नाविन्यता आणण्यासाठी व सुधारणेसाठी मोठ्या प्रमाणात संशोधनावर खर्च करू लागली. परंतु मूळ डिझाइनपेक्षा उत्पादन निर्मितीच्या तंत्रज्ञानात जास्त सुधारणा होत आहे. खरे पाहता मूळ डिझाइनमध्ये बदल करण्यासारखे काहीही शिल्लक नाही. फक्त स्मार्ट फोनद्वारे बटण दाबून वा रिमोटद्वारे झिप वर खाली करण्याचेच आता बाकी राहिले आहे. फक्त तसे काही करत असल्यास हॅकर्सच्या करामतीला तोंड द्यावे लागेल.

जर झिपच्या डिझाइन वा कार्य प्रणालीत बदल होत नसल्यास त्याच्या वापरात काही बदल करता येईल का याचाही विचार केला जात आहे. उदाः टोकियोतील काही शल्यविषारदांनी शस्त्रक्रियेनंतर स्टिचेसऐवजी झिप वापरता येईल का याचा विचार करत आहेत. काही शस्त्रक्रियेत पुन्ह-पुन्हा स्टिचेस काढावे लागतात. त्यात फार मोठा धोकाही आहे. अशा वेळी झिप वापरता येईल का याचा अंदाज घेतला जात आहे. तंबूला कापडी दरवाजा लावून दरवाजा उघडण्यासाठी वा बंद करण्यासाठी झिपरचा काही प्रमाणात उपयोग केला जात आहे. गंमत म्हणजे झिपच्या वेगळ्या प्रकारच्या उपयोगासाठी वस्त्रोद्योगापेक्षा अनपेक्षितपणे वेगळ्याच क्षेत्रातून मागणी येऊ शकेल यावर कंपनीचा विश्वास आहे. स्मार्ट फोनची कल्पना फोन कंपन्याऐवजी अ‍ॅपलसारख्या संगणक क्षेत्रातून आली हे लक्षात घेण्यासारखे आहे. कदाचित वस्त्रोद्योगाशी वा बॅग-बॅगेजेस, तंबू तयार करणाऱ्याशी संबंध नसलेल्या क्षेत्रातून ही मागणी येऊ शकते.

त्या इतर क्षेत्राचे जाऊ दे, खुद्द वस्त्रोद्योगातही अजून झिपचा म्हणावा तितका प्रसार झाला नाही. उदाः टी-शर्ट वा जॅकेट वगळता इतर फॉर्मल शर्टसाठी अजूनही पारंपरिक बटण-काजेच जगभर वापरले जातात. तेथे झिप का पोचली नाही? याला उत्तर नाही. वापरणाऱ्याची मानसिकता, उत्पादनाची कार्यक्षमता, सुरक्षितता व प्रामुख्याने त्यासाठीची कल्पक जाहिरात या गोष्टी कुठल्याही उत्पादनाच्या वाढत्या मागणीसाठी आवश्यक असतात. या रसायनातूनच ते उत्पादन रूढ होऊ शकते.

झिप तंत्रज्ञान
खरे पाहता झिपच्या क्षेत्रात कुणीच प्रतिस्पर्धी नाही. वृक्षाच्या प्रेरणेतून प्रकाशात आलेला व्हेल्क्रो त्याचा प्रतिस्पर्धी होऊ शकत नाही. मुळात व्हेल्क्रोचा वापर लहान मुला-मुलींच्या व वृद्धांच्या वस्त्रांसाठी होतो. बुटासाटी होऊ शकतो. परंतु व्हेल्क्रोच्या काही मर्यादा आहेत. कच्च्या रस्त्यावर वा वाळवंटी प्रदेशात व्हेल्क्रो वापरल्यास त्यात माती/वाळूचे कण जाऊन व्हेल्क्रो निकामी होण्याची शक्यता आहे. शिवाय त्याच्या वापरात फॅशनेबल असे काहीही नाही. याउलट झिपमध्ये सौंदर्य आहे, निःशब्दता आहे, व वापरण्यात मजा आहे. या दृष्टीने पाहिल्यास झिपमध्ये सुधारणेला वाव नाही. व त्याला पर्यायही नाही.

विनाकारण सुधारणा, नाविन्यता, विकास, प्रगती यांना उत्पादन क्षेत्रात नको तितके महत्व दिले जाते. काही तरी नवीन, आकर्षक, खर्चिक, भन्नाट, गुंतागुंतीचे हे काही तंत्रज्ञान होऊ शकत नाही. बाजारात त्याची उपयुक्तता सिद्ध व्हावी लागते. या कसोटीवर झिप हे काही तंत्रज्ञान क्षेत्रातील मैलाचा दगड होऊ शकत नाही. व फारच गरजेची वस्तू म्हणूनही त्याचा नावलौकिक नाही. आता झिपला मान्यता मिळाल्यामुळे त्याच्या सेक्स अपीलची चर्चा करण्याचीसुद्धा गरज भासणार नाही. किंवा त्यात क्रांतीकारक वा अत्याधुनिक असे काहीही नाही. जगातील कुठल्याही ज्वलंत समस्येला उत्तर म्हणूनही त्याकडे पाहिले जाणार नाही. फक्त ती एक चांगली सोय म्हणून त्याकडे पहावे लागेल. एका प्रकारे हजारो-लाखो मॅन-अवर्स खर्ची घालून, कुठलाही गाजावाजा न करता, उत्सव-समारंभ साजरे न करता नवीन परंतु गरजेची वस्तू म्हणून त्याकडे पाहिल्यास झिपचे महत्व नक्कीच लक्षात राहील.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

अप्रतिम लेख आहे.
कपडे आणि फॅशन इन्डस्ट्री विषयी आकर्षण असल्यामुळे जास्तच आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्वतःसाठी झगे शिवताना झिपा शिवण्याचं कौशल्य येण्यासाठी एकेका झग्याच्या झिपा तीन-तीनदा शिवाव्या लागल्या होत्या. अदृश्य झिपासुद्धा आता नीट शिवता येतात; कदाचित तेही कारण असेल की शिंप्यांना सुरुवातीला त्या नकोशा वाटल्या असतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लेख आवडला. त्याच्या मगचा इतिहास कधी वाचलाच नव्हता.
झिपचा स्लायडर पुढे गेल्यावर कधीकधी मागचे झिप उघडत जाते आणि ते काही लोक घरच्या घरी दुरुस्त करतात. ते कधी मला जमले नाही बुवा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उत्तम माहितीपूर्ण. नेहमीप्रमाणेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख मस्त आहे. एक आठवण सांगतो.

भटकंतीच्या स्याकसच्या झिप चेन्स काहींच्या खूप टिकतात. तर काहींच्या झिपर्स लगेच तुटतात. एकदा रेल्वे (औरंगाबाद स्टेशन) स्टेशनला गाडीची वाट पाहात बाकड्यावर बसलेलो। एक मनुष्य आला म्हणाला की तुमच्या ब्यागेची चेन तुटली आहे. रिपेर करू? नको म्हटलं. मग तो पुढे गेला प्लाटफार्मवर दुसऱ्यांना शोधत.
ध्वनिक्षेपकावरून येणाऱ्या गाड्यांची माहिती सांगतानाच मधेमधे "आपल्या सामानावर लक्ष ठेवा" कोकलत होते. ब्याग माझ्या पायात घट्ट धरलेली होती. पण हा मनुष्य चेन रिपेर कशी करणार? पटकन काही काढणार तर नाही ना ही शंका होती.
जरा वेळाने माझी गाडी अजून एक तास उशिरा येणारची घोषणा झाली.
मग मी माझे पाकीट ( पाकीट आतच ठेवतो, काही सुटे पैसे वरच्या खिशात असतात.)आणि एक्सट्रा रिझव ठेवलेले पैसे ब्यागेतून काढून खिशात ठेवले . आता वेळ काढायचाच आहे तर करुया चेन रिपेर म्हणत मीच त्या माणसाची वाट पाहात राहिलो.

घरी मी चेन रिपेर केल्यात. एका बाजूने टोकाची शिवण काढायची, तिथे दुसरा कुठल्या जुन्या चेनचा झिपर खटपट करून सरकवायचा, बरोबर सरकतोय बघून टोक परत शिवायचे. असा मोठा कार्यक्रम असतो.

तर जरा वेळाने तो मनुष्य परत आलाच. "कर लो चेन रिपेर, गाडी को अभी एक घंटा बाकी है।"
"सिर्फ पाँच रुपये।" - मेरी घंटी बज गयी।
" ठीक|" मी खोट्या नाखुशीने हो म्हणालो. काय करणार ही उत्सुकता होती.

त्याने त्याच्याकडच्या छोट्या पिशवीतून काही झिपरस आणि पक्कड बाहेर काढली. पकडीने जुना तुटका झिपर तोडून काढला. त्याच्याशी मिळता जुळता त्याच्याकडचा घेतला. त्या झिपरांचा चेनमध्ये फिरणारी साइडची फट फाकवलेली होती. तिथून चेनमध्ये घालून पकडीने दाबल्यावर झिपर चेनमध्ये अडकला. दोन मिनिटांत काम झाले. त्याने ब्यागसुद्धा हलवली नाही. जिथल्या तिथे काम केले!
---------------–

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वायर मधील या विषयीचा लेख आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

झिपचा कसा लागला शोध, याचा सविस्तर झाला बोध.झीपची समजली मेख. आवडला लेख.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0