जग बदलू शकलेले विचारवंत व त्यांची पुस्तकं! …..4

ऑन दि अबॉलिशन ऑफ स्लेव्ह ट्रेड (1789)
-विलियम विल्बरफोर्स (1759-1833)

photo 1

इतिहासकारांच्या मते जगाला कलाटणी दिलेल्या काही मोजक्या स्थित्यंतरामध्ये ब्रिटनमधील गुलामांच्या व्यापारपध्दतीचे उन्मूलन याला सर्वात वरचा क्रमांक द्यायला हवा. शेकडो वर्षे राजरोसपणे चालत असलेल्या गुलामगिरीच्या या अमानुष पध्दतीच्या विरोधात 16व्या -17व्या शतकात काही जणानी आवाज उठवला, आंदोलनं केली, काही तुरळक हिंसक घटना घडल्या. परंतु अथेन्स - स्पार्टा या नागरी राज्यातील परंपरेची साक्ष देणाऱ्या व एके काळी असाध्य वाटणाऱ्या या प्रथेचे उन्मूलन साध्य करून दाखवलेल्या तरुणाचे नाव आहे विलियम विल्बरफोर्स. वयाच्या एकविसाव्या वर्षी तो ब्रिटिश पार्लिमेंटचा सदस्य झाला. पार्लिमेंटमध्ये 12 मे 1789 रोजी गुलामगिरीच्या व्यापारपध्दतीच्या उन्मूलनाविषयी त्याने विधेयक मांडले. या विधेयकाचे कायद्यात रूपांतरित होण्यासाठी तब्बल अठरा वर्षे त्यानी लढा दिला व त्याच्या अथक परिश्रमाला शेवटी यश मिळाले.

मुळात हे पुस्तक विलियम विल्बरफोर्सने पार्लिमेंटमध्ये 12 मे रोजी केलेल्या भाषणाचा लिखित वृत्तांत आहे. पार्लिमेंटमध्ये केलेल्या भाषणांचा दप्तरी नोंद करण्याची पध्दत अजून रूढ झाली नव्हती. परंतु विल्बरफोर्सच्या भाषणाला वृत्तपत्रामधून भरपूर प्रसिध्दी मिळाली. बहुतेक वृत्तपत्रांनी त्याचे संपूर्ण भाषण मुद्रित केले. त्याचेच नंतर पुस्तक म्हणून प्रकाशित करण्यात आले. विल्बरफोर्सच्या घणाघाती टीकेमध्ये गुलामगिरी हे मानववंशाला कळंक आहे या मुद्यावर भर होता. आपल्यापेक्षा इतर देश-प्रदेशातील माणसं रंगाने, उंचीने, आकाराने वेगळी आहेत म्हणून ती माणसंच नाहीत अशी समजूत व पैशाचा हाव यामधून गुलामगिरीचा व्यवहार क्रि.श.पूर्व काळापासून बिनदिक्कत चालत होता. 18व्या शतकात या पध्दतीने उच्चांक गाठला. पश्चिम आफ्रिकेतील सुमारे एक कोटी लोकांना पकडून त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत व अनन्वित छळ करून अमेरिकेत गुलाम म्हणून त्यांची विक्री केली जात होती. या व्यवहारात ब्रिटन, स्पेन, पोर्तुगाल, फ्रान्स इत्यादी अनेक युरोपियन देश सामील झाले होते. गुलामांच्या व्यापाराचे सुसूत्रिकरण करून या अमानुषतेला तात्त्विक मुलामा देत राजरोसपणे हा व्यवहार चालला होता. ब्रिटन जरी शेवटी शेवटी आलेला असला तरी, एका अंदाजानुसार लंडन शहरातील एक चतुर्थांश लोकांचा चरितार्थ गुलामांच्या व्यापार व्यवहाराशी निगडित होता. आजकालच्या माहिती तंत्रज्ञानाच्या आर्थिक व्यवहारात ज्या प्रमाणात पैशाची उलाढाल होते त्या प्रमाणात गुलामांच्या व्यापारात उलाढाल होत असे. ब्रिटनमधील लिव्हरपूल, ब्रिस्टॉल ही शहरं अशा व्यापारातून श्रीमंत झाली. या काळया व्यवहारातील पैशातूनच अनेक युरोपियन शहरात भव्य दिव्य चर्च, इमारती, राजवाडे, किल्ले बांधले. ब्रिटिश पार्लिमेंटमध्ये अशा पैशातून गबर झालेल्या खासदारांचा वरचष्मा होता. विल्बरफोर्सला अशा सत्ताधार्यांशी लढा द्यावा लागला.

गुलामांच्या व्यापाराची एक त्रिकोनी व्यवस्था होती. ब्रिस्टॉल व इतर बंदरामधून जीवनावश्यक जिनसांनी भरलेले जहाजं आफ्रिकेला जात होत्या. जिनसांच्या विक्रीच्या पैशातून आफ्रिकेतील गुलामांची खरेदी होत होती. जहाज अमेरिका व वेस्ट इंडीजला जाऊन गुलामांची विक्री करत होती. तिथून परत येताना गुलामांच्या विक्रीच्या पैशातून साखर, कॉफी, रम-व्हिस्की, तंबाखू इत्यादी चैनींच्या वस्तूंची खरेदी करत जहाजं मायदेशी परत येत होत्या. हा सर्व व्यापार कायदेशीर व सनदशीर मार्गाने होत असल्यामुळे समुद्र लुटारूंपासून जहाजांचे संरक्षण करण्याची जवाबदारी ब्रिटिश नौसेनेवर सोपवली होती. रॉयल नेव्हीचा सक्त पहारा असल्यामुळे समुद्रीलुटारू या बोटींना काहीही करू शकत नव्हते. व गुलामसुध्दा जहाजामधून बाहेर उडी मारून जाऊ शकत नव्हते. अशा प्रकारे हा व्यवहार वर्षानुवर्षे चालत होता.

1788च्या सुमारास घडलेल्या एका घटनेने विल्बरफोर्सला गुलामगिरीविरुध्द लढण्यास प्रेरणा मिळाली. झोंग या जहाजावरील कप्तानाने जहाजातील गुलाम विक्रीयोग्य नाहीत म्हणून बहुतांश गुलामांना समुद्राच्या पाण्यात अमानुषपणे फेकून दिले. जहाज बुडून विमा कंपनीचे नुकसान होवू नये म्हणून हे गैरकृत्य केले अशी खोटी साक्ष पोलीस तपासणीत दिली. कप्तान सहीसलामत सुटला. त्या निमित्ताने गुलामगिरी उन्मूलन समितीची स्थापना झाली होती. परंतु कणखर नेत्रृत्वाच्या अभावी चळवळ थंड पडली होती. विल्बरफोर्सच्या पुढाकारामुळे परिस्थिती बदलू लागली. विल्बरफोर्स कुठल्याही अंगाने नेता वाटत नव्हता. परंतु भाषण कलेच्या जोरावर त्यानी गुलामगिरीच्या विरोधात आवाज उठवला. गावोगावी जाऊन भाषणं देऊ लागला. समाजात गुलामगिरीच्या विरोधात जनमत तयार होऊ लागले. ब्रिटनचे प्रधान मंत्री विलियम पिट हा विल्बरफोर्सचा जवळचा मित्र असूनही पार्लिमेंटमधील बहुतेक सदस्यांच्या विरोधामुळे हे विधेयक टक्के टोणपे खात तसेच पडून होते. "मी फक्त सदस्यांना विनंती करू शकतो, त्यानी आपली सदसद्विवेक बुध्दी तपासून पहावी. मी गुलामगिरीच्या व्यवहाराबद्दल कुणालाही दोष देत नाही. परंतु मला याची लाज वाटते. आपण सर्व अपराधी आहोत. दोष कुणावर तरी ढकलून आपण निरपराधी होणार नाही." अशा प्रकारच्या भाषणामधून त्यानी ब्रिटिश सुसंसंकृततेलाच आव्हान दिले. "संवेदनशील जिवंत माणसांना त्यांच्या मुलाबाळापासून तोडून त्यांची खरेदी विक्रीची वस्तू समजणाऱ्या समाजाला सुसंसंकृत म्हणवून घेण्याचा अधिकार नाही. आफ्रिकेतील मूठभर टोळीप्रमुखांच्या लोभापायी, त्यांच्या ऐषारामापायी संगनमत करून त्या देशातील गोरगरीबांना हद्दपार केले जात आहे," असे त्यानी पटवून दिले.

विल्बरफोर्सच्या विरोधात आवाज उठवणाऱ्यांची संख्या पण कमी नव्हती. हा व्यापार थांबल्यास ब्रिटनची अर्थव्यवस्था कोसळेल, व्यापारावर अवलंबून असलेल्यांची उपासमार होईल, आफ्रिकेतील गरीब उपाशी मरतील, असा नेहमीचा युक्तिवाद केला जात होता. आफ्रिकेतील लोकांना आम्ही जीवदान देत आहोत, समृध्द जीवन जगण्याची संधी देत आहोत, गुलामांची आम्ही चोख व्यवस्था ठेवतो, जहाजाच्या प्रवासात ते गाणे गुणगुणतात, इ.इ. विधानं गुलामगिरीच्या समर्थनार्थ विरोधक करत होते. परंतु विल्बरफोर्सने गुलामांची पिळवणूक कशी होते, बेड्या बांधून कशा प्रकारे अत्यंत कष्टप्रद कामं त्यांच्याकडून करून घेतल्या जातात, जहाज प्रवासातील निकृष्ट आहार, झोपण्याची अव्यवस्था, पोराबाळांची होत असलेली ताटातूट इत्यादीविषयी भाषणामधून, निवेदनामधून तो समजावून सांगत असे. त्या काळच्या वृत्तपत्रांनी त्याला चांगलीच साथ दिली.

पार्लिमेंटच्या प्रत्येक अधिवेशनात काहीतरी क्षुल्लक कारणास्तव विधेयक पुढे पुढे ढकलले जात होते. तरीसुध्दा विल्बरफोर्स नाउमेद झाला नाही. अशा प्रकारे तब्बल अठरा वर्षानंतर 1807 साली गुलामांच्या व्यापाराविरुध्दचा कायदा पास झाला. शासनाने व्यापारासंबंधीच्या सर्व सोई-सवलती काढून घेतल्या. गुलामांच्या चोरट्या व्यापारावर सक्त नजर ठेवण्यात आली. सर्व जगभर याचे प्रतिसाद उमटले. अमेरिका (1808), स्पेन (1811), स्विडन (1813), नेदरलँड्स (1814), फ्रान्स (1817), पोर्तुगाल (1819), मेक्सिको (1829), ब्रिटिश वसाहती देश (1838), इत्यादींनी गुलामांच्या व्यापाराविरुध्द कायदे पास केले. गुलामांच्या व्यापारावर बंदी घातली. 1865मध्ये अमेरिकेने, 1886मध्ये क्यूबाने, 1888 मध्ये ब्राझिलने गुलामगिरी पध्दतीला आपापल्या देशातून हद्दपार केले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवी हक्कांच्या जाहीरनाम्यामध्ये जागतिक गुलामगिरी संबंधीच्या कलमांचा समावेश केला गेला.
photo 2
गुलामगिरीवरच पोसलेल्या अमेरिकेला याचा फार मोठा फटका बसला. दक्षिणेतील अमेरिकन राज्यातील मळयामध्ये, द्राक्ष, ऊस, तंबाखू इत्यादींच्या उत्पादनासाठी आफ्रिकेतून विकत आणलेल्या गुलामांना राबवून घेत नफा कमावला जात होता. गुलामांच्यातील स्वाभिमानाची पध्दतशीर कत्तल केल्यामुळे (व त्याला चर्चची पण साथ असल्यामुळे) गुलामी हेच सुख व मालकांना सुखी ठेवणे हेच जीवनाचे अंतिम उद्दिष्ट ही मानसिकता बळावलेली होती. 1851मध्ये हॅरियट बीचर स्टोव्ह या लेखिकेने लिहिलेल्या अंकल टॉम्स कॅबिन या कादंबरीत गुलामांच्या परिस्थितीचे विदारक वर्णन वाचताना मन हेलावून जाते. 1865मध्ये अमरिकेच्या यादवी युध्दानंतरच गुलामी पध्दतीला पूर्ण विराम मिळाला. तरीसुध्दा मार्टिन लुथर किंग व त्यांच्या अनुयायांना आपल्या हक्कासाठी विसाव्या शतकात लढा द्यावा लागला.

अशा प्रकारे मानवी इतिहासातील एक अंधारयुग, मानवतेला काळिमा फासणारी पध्दत विल्बरफोर्सच्या प्रयत्नामुळे, त्याच्या पुस्तकामुळे अस्तंगत झाल्या. माणसांची बेकायदा तस्करी, वेठबिगारी इत्यादीविषयी जागरूक राहणारी विल्बरफोर्स इन्स्टिटयूट ही संस्था अजूनही काम करत असून विल्बरफोर्सची आठवण ताजी ठेवत आहे.

क्रमशः

यापूर्वीचे
1..... प्रिन्सिपिया मॅथेमॅटिका
2..... ऑन दि ओरिजिन ऑफ स्पीसीज
3..... एक्स्पिरिमेंटल रिसर्च इन इलेक्ट्रिसिटी

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet