अल्पसंख्याकांचे प्रश्न
'जगायचीही सक्ती आहे'च्या प्रस्तावनेत मंगला आठलेकर लिहीतातः
खूप जणांच्या मनात येतं की मुळात स्वेच्छामरण हा असा काही गहन प्रश्न आहे का? त्याहून अधिक मोठे प्रश्न सध्या आपल्याला भेडसावत आहेत. आपल्या देशाची लोकसंख्या शंभर कोटींचा आकडा पार करून गेली आहे. दारिद्र्य, महागाई, बेकारीचा प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, आरोग्य, बालकामगारांचे प्रश्न ... असे एक नव्हे तर अनेक प्रश्न आपल्या देशासमोर आ वासून उभे आहेत. सामान्य माणसांना अनेक बाबतीत न्याय मिळत नाही, त्यांचे प्रश्न सुटत नाहीत, देशातील वाढती गुन्हेगारी ही केवढी तरी बिकट समस्या आहे. आजुबाजूचं सगळंच वास्तव नाना तऱ्हेच्या समस्यांनी प्रचंड अंधारुन गेलं आहे. त्या प्रत्येक प्रश्नासाठी एकेक मोठा लढा उभारण्याची आवश्यकता आहे. हे सगळे माणसाच्या जीवन-मरणाशी संबंधित असेच प्रश्न आहेत आणि मुख्य म्हणते ते बहुसंख्यांकांचे प्रश्न आहेत. असं असताना शंभर कोटींच्या देशात जेमतेमच शंभर माणसांना पडणारा स्वेच्छामरणासारखा प्रश्न मुळात चर्चेला घेण्याची तरी आवश्यकता आहे का? हे विचारणारी माणसं मला भेटलीच नाहीत असं नाही.
त्यांचा प्रश्न काही फारसा चुकीचा नाही आणि तो ज्या पद्धतीने केला जातो त्या तऱ्हेचा युक्तिवाद करणाऱ्याला माझ्याकडे खरंच काही उत्तरही नाही. पण एक मात्र खरं की आज जो शंभर माणसांचा प्रश्न आहे तो उद्या हजारो, लाखो लोकांना पडणारच नाही अशी खात्रीही देता येत नाही आणि ठीक आहे, एखाद्या छोट्या प्रश्नाचाही आपल्याला विचार करावासा वाटला तर तो आपण करू नये का? प्रश्न कितीजणांचा आहे त्यापेक्षा किती मूलभूत आहे हा विचारही महत्त्वाचा असतोच की! शिवाय एखाद्या गोष्टीची जाग अजून माणसांना आलीच नाहीय, ती जाग यावी म्हणून तरी असा प्रश्न चर्चेला घेण्यास काय हरकत आहे? त्यानंतरच कदाचित प्रश्न किती महत्त्वाचा आहे हे कळू शकेल.
या परिच्छेदांवरून मला बऱ्याचदा पडणारा प्रश्न कोणीतरी चर्चेला घेतला याचा आनंदही झाला. असे अनेक अल्पसंख्याकांचे प्रश्न आहेत. डावखुऱ्यांना बहुसंख्य उजव्या लोकांच्या जगात अडचणी येत असणार; हिंदू धर्माशी संबंधित परंपरा सोडूनच देऊ, आधुनिक जगातही अनेक गोष्टी डाव्या हाताने करणं भयंकर अडनिडं असतं. तरी नशीब डावखुरं असणं बेकायदेशीर नाही. बहुसंख्य भिन्नलैंगिकांच्या जगात अल्पसंख्य, समलैंगिक असणं अनेक देशांत बेकायदेशीर आहे. भारतासारख्या देशात मानसोपचार घेणार्यांकडेही समाज तुच्छपणे पहातो, पण त्याच वेळी मधुमेही, रक्तदाबाच्या रूग्णांना सहानुभूती मिळते. अलर्जींमुळे शिंकणार्यांना सहानुभूती पण एक्झिमाचा त्रास होणार्यांना वेगळी वागणूक मिळते. आणि अशा पद्धतीची मला चटकन न सुचलेली उदाहरणं असतील.
उत्क्रांतीमधून तगून रहाण्यासाठी (survival) सर्वच प्राण्यांमधे काही गुणधर्म आलेले आहेत. मानवी समाजात स्थैर्याबरोबर या गुणधर्मात, instinct मधे काही बदल झाले आहेत, होत आहेत. अगदी सोपं उदाहरण द्यायचं तर निरोगी अपत्याची अधिक काळजी घेणं. मनुष्यांमधेमात्र आरोग्याचे प्रश्न असणार्या बालकांची विशेष काळजी घेण्याचा हरेक प्रयत्न केला जातो. तगून रहाण्यासाठी बहुसंख्यांच्या आवडीनिवडी, सवयी, इ. गोष्टींचाच विचार होतो. पण गेले निदान काही हजार वर्ष आपण समाज म्हणून survivors म्हणून जगण्याऐवजी परिपूर्ण आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतो आहोत. धर्माचा, विशेषतः त्यातल्या तत्त्वज्ञानाचा उदय हा त्याचाच एक भाग. त्यात एखादी गोष्ट गुण म्हणून मोजण्यासाठी आपण संख्येचा विचार करतो आहोत का? कितीही कमी लोकांची गैरसोय, अडचण होत असेल तरीही चांगलं आयुष्य जगण्यात एका मनुष्याला येणारी अडचण म्हणून मानवजातीची अडचण अशा पद्धतीचा दृष्टीकोन आपण बाळगणार का?
मूळ पुस्तकाबद्दल किंचितः
जगायचीही सक्ती आहे.
लेखिका: मंगला आठलेकर
प्रकाशकः शब्द Publication
मूल्यः रू. १७५
प्रतिसाद
थोडा घाईत प्रतिसाद लिहितो आहे. जमेल तसे आणखी लिहितो.
१. लेखनाचं शीर्षक काहीसं politically charged आहे. आणि लेखनाचा विषय तर शीर्षकामुळे जो विषय पटकन डोक्यात येतो तो नाही. लेखिकेला अभिप्रेत नसलेला (अगदी बिनमहत्त्वाचा) गोंधळ इथे होऊ शकतो.
२. अल्पसंख्यांकांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या प्रश्नाबद्दल एकोणीसाव्या-विसाव्या शतकापासून बर्याच समाजधुरीणांचा, समाजशास्त्रज्ञ, तत्ववेत्त्यांचा विचार चालू आहे हेवेंसानल. त्याला शोषणाची , वंश-जाति-वर्ण भेदाची अनेक अंगे आहेत. वसाहतीच्या काळापासून ते वसाहतवादी शक्तींपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या विविध कालखंडामधले, विविध देशांमधले प्रश्न आहेत. प्रस्तुत लेखनामधे जे प्रश्न मांडले आहेत त्यांची उत्तरं निरनिराळ्या देशाविदेशातल्या प्रगतीनुसार , त्या त्या देशातल्या व्यवस्थेनुसार वेगवेगळी येणार. इतकंच नव्हे तर भारतासारख्या खंड्प्राय प्रदेशातल्या विविध भागांमधे , महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागांत वेगवेगळी येणार हे नमूद करतो. हे सांगायचा उद्देश इतकाच की या प्रश्नाचा संदर्भ असंख्य आहेत आणि निरनिराळ्या कोनांतून याकडे पाहिले जाता येईल.
(क्रमशः)
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
बाजूस सारणे नसावे
इच्छामरणात मृत्यू ही Irreversible गोष्ट अंतर्भूत आहे.
ही मागणी मान्य न होण्यामागे तो "थोड्यांचा प्रश्न" म्हणून Brushing aside होत आहे असे वाटत नाही. इच्छामरणाची सोय केल्यानंतर घडू शकणार्या गैरप्रकारांवर उत्तर मिळेपर्यंत ते मान्य करता येणार नाही असा समाजाचा विचार आहे असे वाटते.
जे लोक आजारपणाच्या त्रासाने वैतागून "देवा सोडव आता यातून" असे वारंवार बोलतात त्यांना पुढील वेळी त्रास होऊ लागल्यावर मदतीसाठी हाक न मारण्याचा उपाय उपलब्ध असतो. तो बहुतांशी अंमलात आणला जात नाही असे दिसते.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
अल्पसंख्यांकांपेक्षा संघटीत असण्या/नसण्याचा प्रश्न
रोचक चर्चाविषय आहे.
अल्पसंख्यांकांचे प्रश्न ते केवळ अल्पसंख्यांक आहेत म्हणून कमी प्राधान्यक्रमावर टाकणं अन्यायकारक वाटतं. ते प्रश्न खरेच अल्पसंख्यांकांचे आहेत का 'असंघटीत' गटाचे आहेत हा प्रश्न आहे. धार्मिक अल्पसंख्यांक अनेक देशांत संघटीत होत असल्याने त्यांचे प्रश्न प्राधान्यावर येतात मात्र शारीरिक फरक असलेले अल्पसंख्यांक (ज्यात काहि आजार तर येतातच शिवाय समलैंगिक, कोड असणारे, डावरे, रंगांधळे, विविध प्रकारचे अपंग वगैरे आजार नसणारी मंडळीही येतात) मात्र संघटीत नसल्याने त्यांच्या प्रश्नांना 'तेवढे' प्राधान्य मिळत नाही.
तेव्हा प्रश्न अल्पसंख्यांकांपेक्षा संघटीत असण्या/नसण्याचा वाटतो. 'स्त्री'ही बहुसंख्य आहे मात्र अनेक प्रश्नांवर संघटीत नाही. जसे स्त्रीयांची सार्वजनिक प्रसाधनगृहे. हा खरंतर बहुसंख्यांचा प्रश्न आहे तरीही हवे तितके प्राधान्य मिळत नाही.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
ती नेमकी म्ह्ण कुठली??
You can judge a civilization by the way it treats its women.
You can judge a civilization by the way it treats its mentally ill.
You can judge a civilization by the way it treats its prisoners.
You can judge a civilization by the way it treats its animals.
You can judge a civilization by the way it treats its weaker members.
बेल्जीयम देशात इच्छामरणाला अनुकूल कायदे आहेत. अमेरीकेतही काही राज्यात असीस्टेड सुईसाईड की कायसेसे उपलब्ध आहे. महागाई, जीवनशैली, ताणतणाव, नवेनवे आजार यातुन जगलो वाचलो तरी अजुन काही वर्षात इच्छामरणही होईल सरकारी सुवीधा म्हणून उपलब्ध.
असो यावरुन नुकतेच वाचलेले आठवले.
Australian Prime Minister Julia Gillard revealed the inside joke in a speech at a private fundraising dinner in Sydney last week, The Sydney Morning Herald reported, citing unnamed guests.
"I'm good mates with Barack Obama," Gillard was quoted as saying at the 40-table dinner attended by most of her ministers, business leaders and representatives of interest groups.
"I tell him, 'You think it's tough being African-American? Try being me. Try being an atheist, childless, single woman as prime minister.'"
आपल्याला जे हवे असते ते संघर्ष करुन मिळवावे लागते हा नाईलाज आहे. मग तो कोणताही समाज असो त्यापुढे दरवेळी काहीतरी नवी आव्हाने असणारच.
भारिच...
मूळ लेखापेक्षाही प्रतिसाद भारिच.
लेखावर लिहायला खूप काही आहे, फुरसतीत खरडीन म्हणतो.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
प्रतिसाद आवडला.
आणि सहमत आहे.
शिवाय दुसर्यांनी बदलावं या अपेक्षेने बहुतेकवेळा जास्त मनस्ताप होतो.
त्यापेक्षा मधुमेह, मननारोग्य याप्रमाणेच इतर अनेक लोक असंवेदनशीलतेच्या रोगाचे शिकार आहेत असे समजल्यास त्यांनाही क्षमा करणे सोपे जाते.
स्त्रियांसाठी प्रसाधनगृहे, चालू न शकणार्यांसाठी रॅम्प्स, अंधांसाठी खाणाखुणा वगैरे असायला हवं हे बहुतेकाना मान्य होईल आणि बहुतेक प्रगत समाजांमध्ये हे बर्याच प्रमाणात होतही असते, पण बहुसंख्य असंस्कृत लोक असलेल्या समाजांकडून मात्र अल्पसंख्यांकांचा विचार होईल अशी अपेक्षा करणे म्हणजे फुकटचा मनस्ताप आहे.
छान चर्चा
वाचतोय..
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २
अल्पसंख्य
जनहित साधताना लोकशाहीत बहुसंख्यांची सोय हाच निकष लावला जातो. अर्थात बहुसंख्यांच्या सोयीचे राजकारण करणारे राजकारणी अल्पसंख्यच असतात. उपद्रवमूल्याच्या जोरावर बहुसंख्यांना वेठीस धरणारे अल्पसंख्य असतातच की! ऋषिकेश म्हणतो तसे संघटित व असंघटीत अशी वर्गवारी केल्यास बहुसंख्य परंतु असंघटित व अल्पसंख्य परंतु संघटीत अशी विभागणी होउ शकते. समस्यांची वर्गवारी करताना दिले जाणारे प्राधान्यक्रम हे प्रत्येकाच्या दृष्टीने वेगळे असतात. तिथे परत बहुसंख्यांचे प्राधान्यक्रम काय आहे हा मुद्दा विचारात घेतला जातो. प्राधान्यक्रम वेगळे झाले कि निराकरण करणारे मुद्यांची क्रमवारीही बदलते.
मधुमेह व रक्तदाब या आजारांना समाजमान्यता मिळवताना त्यांनाही प्रथम याच परिस्थितीतुन जावे लागले. आज मानसोपचार घेणारे अल्पसंख्य आहेत त्यामुळे समाज तुच्छतेने म्हणा वा वेगळ्या नजरेने म्हणा पाहतो. हळूहळू हे प्रमाण कमी होईल. पाहुणचार करताना मधुमेहीला साखर नसलेला चहा दिला जातो. गोड पदार्थ दिले जात नाहीत. हे प्रबोधन वा जनजागृतीने शक्य झाले. मी बाहेर कुणाकडे गेलो कि तिथे आदरातिथ्याचा भाग वा पारंपारिक चालीरितीचा भाग म्हणून चहा किंवा खायला न विचारताच आणुन ठेवले जाते. मला आयबीएस चा त्रास होतो म्हणुन मला काहीच नको आहे. आयबीएस म्हणजे काय/ असा प्रश्न जिथे येण्याची शक्यता आहे तिथे पोटाचा त्रास आहे हे मी सांगतो. हे सांगितल्यावर 'असं कसं? घ्या हो थोडे. थोड्याने काही होत नाही.' अस म्हणून आग्रह केला जातो. मला आयबीएस चा त्रास होतो हे महान पातकाची कबुली द्यावी असे सांगावे लागते. जस जसा आग्रह केला जातो तस तशी माझी चिडचिड वाढत जाते. प्रत्येक ठिकाणी जवळपास हेच घडत. त्यांची सांगण्याची वा प्रेमळ आग्रह करण्याची पहिलीच वेळ असेलही कदाचित पण माझी सांगायची ही शंभरावी वेळ असते. त्यामुळे सुट्या पैशाला वैतागलेल्या कंडक्टरसारखी अवस्था होते. सुरवातीच्या काळात हा अत्याचार सहन करण्याची क्षमता होती. पण या दोन वर्षात तीही नाहीशी झाल्याने मला काही नकोच आहे हे मी स्पष्टपणे वा प्रसंगी थोडे उद्धटपणेही सांगतो. मग माझ्याकडे विक्षिप्त नजरेने पाहिले जाते. नातेवाईकांच्याकडे गेलो तरी परत परत तेच तेच सांगावे लागते म्हणून मी त्यांच्याकडे देखील जाणे टाळू लागलो आहे. माझ्यावर उपचार करणार्या डॉक्टरांना ही माझी व्यथा मी सांगत असतो. ते तरी काय उत्तर देणार यावर? मी अल्पसंख्यात मोडत असल्याने मला हा त्रास सहन करावा लागतो. खर तर आदरातिथ्यात काय हव काय नको असे विचारण्याची पद्धत असते. काही नको असणे हे मला स्वास्थकारक वाटत असेल तर मला ते स्वातंत्र्य हवे. मग त्रास असो वा नसो! पण काय करणार? मी समाजाचा एक घटक आहे ना!
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
+१
+१
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
उत्तम चर्चा
अरुणा शानबागची दयामरणाची याचना आणि यातना पाहिल्यावर असा कायदा तरी कशाला हवा, सरळ-सरळ निर्णय घेऊन टाकावा ह्या मताला असंख्य लोक येतात, पॅसिव्ह-मरणाचा न्यायलयाचा निर्णय हा फारच ग्रेट होता असं मला वाटतं.दयामरणाचा मुद्दा थोडा सेन्सिटीव आहे, त्यामुळे त्यासंदर्भात कायदा बनणं थोडं किचकट आहे.
पण इतर अल्पसंख्यांकाबद्दल बहूसंख्यांकांच्या वागणूकीला जेनेटीक डिटरमिनिझम कारणीभूत असावा, फार उदारमतवादी धोरण असले तरी फारतर एखादे पार्किंग अपंगांसाठी आरक्षीत असेल, जेनेटीक डिटरमिनिझमचे उदाहरण द्यायचे झाल्यास - उजव्यांबद्दल तक्रार करणारी डावखुरी माणसे हात नसलेल्यांबद्दल तेवढी कनवाळू नसतात, एक हात नसलेली माणसे दोन्ही हात नसलेल्यांबद्दल तेवढी कनवाळू नसावीत अँड सो ऑन...
अल्पसंख्याकांचा विचार एका मर्यादेपेक्षा जास्त झाल्यास तो समाजवादाकडे झुकतोय अशी शंका येते, समाजवाद थोडा जास्त कनवाळू आणि बहूसंख्याकांच्या तोट्याचा वाटतो, त्यापेक्षा फ्रँक लेस्टर वार्ड म्हणतो ते "मानव निर्मित(इम्पोझ्ड) बंधने हटवून निसर्ग निर्मित बंधनांमधे समजाला उन्नतीचा समान अधिकार मिळावा" थोडे अधिक योग्य वाटते.
मुक्तसुनित, ऋषिकेश आणि सहज -तिघांचे प्रतिसाद आवडले.
'अल्पसंख्यांक' ही कल्पना तशी
'अल्पसंख्यांक' ही कल्पना तशी प्रवाही आहे - म्हणजे एखाद्या ठिकाणी, एखाद्या समुहात, एखाद्या वेळी आपण बहुसंख्य असू तर दुस-या ठिकाणी/वेळी कदाचित अल्पसंख्य वर्गात मोडत असू. हा अनुभव सगळ्यांनाच येतो.
आपल्यासारख्या माणसांना सामावून घेणं आणि आपल्यापेक्षा 'वेगळ्या' माणसांकडे संशयाने पाहणं हे माणूस अनुभवाने शिकत गेला आहे. त्यात आता सर्वस्वाने बदल झाला आहे किंवा अजिबातच बदल झाला नाही ही दोन्ही मते टोकाची होतील.
इच्छामरणाचा प्रश्न थोडासा वेगळा आहे. कुटंब, संस्कृती यांचे सदानकदा गोडवे गाणा-या आपल्या देशात इच्छामरण अनेकांवर लादले जाईल अशी अनेकांना भीती वाटते - जी अगदीच निराधार मानता येणार नाही. माणसाचा जीव ही गोष्ट आज सगळ्यात स्वस्त आहे. शिवाय अनेकदा माणसं न लढताच हार मानतील का या कायद्यामुळे? जन्मतःच जे काही व्यंग घेऊन येतात - त्यांचे काय मग? इच्छामरणाला काही वयाची अट असावी का (म्हणजे उदाहरणार्थ ८० वर्षांच्या पुढे - हे आपले उदाहरण म्हणून आहे!)? - अशी बरीच गुंतागुंत आहे यात.
अपंग विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी अगदी गावच्या प्राथमिक शाळेतही आता वेगळी सोय केलेली दिसते. दिल्ली मेट्रोचे कर्मचारी वेगळ्या गरजा असणा-या प्रवाशांशी केवळ सौजन्याने वागतात इतकेच नाही तर मेट्रोने तशा सोयीही केल्या आहेत - डब्यात वेगळी जागा, पुरेशा चाकाच्या खुर्च्या, कर्मचारी वगैरे.
अनेकदा अल्पसंख्य हे शारीरिक दृष्ट्या किंवा मानसिक दृष्ट्या वेगळे असतील तर त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन निदान थोडासा बदलला आहे - संवेदनशीलता जागवल्याने, कायदे झाल्याने, सरकारी धोरणाने - असे म्हणता येईल. पण ज्यांचे विचार वेगळे असतात त्यांच्याबाबत मात्र अजूनही कडवेपणा आढळतो - जसे प्रेमविवाह करणा-या मुलामुलींना हरयाणातील 'खाप पंचायती'मार्फत दिल्या जाणा-या शिक्षा (मृत्यू).
आपण ज्या ज्या ठिकाणी बहुसंख्य असतो त्या त्या ठिकाणी अल्पसंख्य कोण आहेत हे पाहणे आणि त्यांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांची आवश्यक सोय करता येईल का ते पाहणे हे आपण आपल्यापुरते करू शकतो.
***
अब्द शब्द
जीवन
अदिती....
लेखाचे शीर्षक वाचकाला दुसर्या प्रांतात घेऊन जाते....विशेषतः राजकीय, पण गाभा वाचल्यावर वाटले की मूळचे मंगला आठलेकर यांचेच 'जगायचीही सक्ती आहे....' हेच याला उचीत वाटले असते. असो.
"जगायची सक्ती" आहेच आहे. स्वेच्छामरण [Euthanasia] सुप्रीम कोर्टानेच नामंजूर केले असल्याने तो विषय कायद्यात आता आणता येत नाही. - अरुणा शानबाग केस....१९७३....पुढील साली तिच्या अवस्थेला ४० वर्षे पूर्ण होतील आणि तरीही पिंकी वर्माचा तिच्यावतीने केलेला अर्ज फेटाळण्यात आला. त्याला कारण केवळ अरुणाची अवस्था नव्हती तर तिच्यावतीने केलेला अर्ज मंजूर झाला तर ती मग एक प्रथाच पडून जाईल, जी घटनेला अभिप्रेत नाही, असे कोर्टाला वाटणे साहजिकच आहे. हे जीवन सुंदर आहे, असे म्हणणारे म्हणतात. मात्र सर्वाच्याच वाट्याला असे सुंदर जीवन येतेच असे नाही. ज्यांना जगण्यातले सौदर्य दिसते त्यांनाच जगण्यावर प्रेम करावेसे वाटते. डाव्या लोकांना उजव्यांच्या जगात अडचणी येत असतील असे मला वाटत नाही. ते केवळ डावे आहेत म्हणजे 'बाय डिफॉल्ट' त्यांच्यात काहीतरी न्यून आहे अशी उजव्यांनी भावना बाळगणे त्यांच्यावर अन्यायाचे ठरेल. जगात प्रत्येकाला समाधानकारक जगण्याची संधी आहे, मात्र ती त्याच्या ताटात कुणीतरी आयती आणून ठेवेल अशी अपेक्षा बाळगत राहिले तर मग ती वेल वाढण्याअगोदर खुंटेल. तगून राहाण्यासाठी ज्या काही 'बेसिक' गोष्टींची गरज आहे त्यात प्रामुख्याने समोर येते ती 'जगण्याची इच्छाशक्ती'. तीच नसेल तर मग भौतिक सुखसोयी अवतीभवती नाचत असल्या तरी त्याच्यासाठी तिचे मूल्य शून्यच. भू-सुरुंगात उजव्या पायाला जखम होऊन पुढे तो गॅन्गरिनने सडू लागल्यावर मोठ्या हिमतीने पाय कापून टाकून मग त्यानंतर केवळ डाव्या पायाच्या आधारे पुढे तब्बल २२ वर्षे सुखात कामधंद्यात आयुष्य काढलेला एक निवृत्त लष्करी ऑफिसर माझ्या माहितीतील आहे. त्याच्या उदाहरणाने दोन धडधाकट पाय असलेल्या युवकांनी प्रेरणा घ्यावी असे त्याने भाजीपाला व्यवसायात केलेल्या प्रगतीकडे पाहून म्हणावे असे वाटत असे.
"भारतासारख्या देशात मानसोपचार घेणार्यांकडेही समाज तुच्छपणे पहातो, पण त्याच वेळी मधुमेही, रक्तदाबाच्या रूग्णांना सहानुभूती मिळते."
~ नाही अदिती. मी या ना त्य निमित्ताने बर्याच 'वृद्धाश्रम' घटकाशी संबंधित आहे. त्यातही मानसोपचाराची आवश्यकता असणारे इनमेट्स [याना तिथे जाणीवपूर्वक पेशंट म्हणत नाहीत] पाहिले आहेत आणि त्यांच्याकडे कोणताच घटक तुच्छपणे पाहात नाही. उलटपक्षी शुगर बीपी वाले, जे घरीच असतात त्याना त्यांच्या रक्तातील नात्याकडूनच कशी तुच्छतेची वागणूक मिळते याचाही विदा माझ्याकडे [भरपूर प्रमाणात] आहे.
बाकी मंगला आठलेकर म्हणतात त्याप्रमाणे 'इच्छामरणाहूनही महत्वाचे काहीतरी या देशाच्या पटलावर असलेल्या समस्येत आहे.' त्याची उकल महत्वाची.
अशोक पाटील
या पुर्वीची चर्चा
पुर्वी इच्छामरणावर झालेली काही चर्चा http://mr.upakram.org/node/828 इथे व http://mr.upakram.org/node/1386 इथे वाचता येईल. सुखांत हा दयामरणावर आलेला चित्रपट ही उदबोधक आहे.
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
सन्मानाने मरण्याचा हक्क
वरील प्रतिसादात उल्लेख केलेल्या चर्चेबरोबरच सन्मानाने मरण्याच्या हक्काच्या संदर्भातील हेही दोन लेख कृपया वाचावे.
उत्तम
चांगल्या विषयावर चर्चा चांगली चालू आहे. समाजातील सर्व स्तरांचा, घटकांचा विचार करणारे,त्यांना मुख्य प्रवाहात आणू पाहणारी मुले येथे आहेत हे पाहून कौतुक वाटले.
अत्यल्पसंख्य
'अत्यल्पसंख्य' अशी सुद्धा एक कॅटेगरी आहे. मी बहुतेक त्यांतच मोडतो. माझ्या नातेवाईकांत मी 'विक्षिप्त' म्हणून ओळखला जातो. मी तिरसट नाही, माणूसघाणा तर नक्कीच नाही. पण प्रत्येक गोष्टीचे वा कृती करण्याचे ठोस वा शास्त्रीय कारण कळल्याशिवाय ती गोष्ट करण्यास मी सपशेल नकार देतो.
घरी माणसे आलेली मला आवडतात पण त्यांनी नको म्हटल्यास बळजबरीने आदरातिथ्य करत नाही.
निव्वळ रुढीला विरोध करायचा म्हणून पूर्वापार चालत आलेल्या सगळ्या गोष्टी मी त्याज्य ठरवत नाही, पण त्याचे शास्त्रीय वा उपयुक्त कारण कळले नाही तर त्या मी कधीच करत नाही. अशी बरीच उदाहरणे सांगता येतील. पण मी हे सगळे मुद्दाम, इतरांपेक्षा वेगळे दिसावे म्हणून करत नाही.
मी निराश नाही पण मनसोक्त जगल्यावर आता इच्छामरण यावे असे मला मनापासून वाटते. इथला कंटाळा आला असे म्हणण्यापेक्षा, पलिकडे काय आहे ते जाणून घेण्याची उत्सुकता वाढीस लागली आहे.
पलिकडे?
पलिकडे म्हणजे नेमके कुठे? आपले मरणोत्तर अस्तित्व कसे असेल याबाबत उत्सुकता आहे असे म्हणायचे आहे का? तसे असल्यास तो अध्यात्मिक भाग आहे असे आपल्याला वाटते का?
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
आध्यात्मिक
मरणोत्तर आस्तित्व आहे की नाही हे कोणालाच माहिती नाही. अध्यात्माशी माझा सुतराम संबंध नाही की त्या विषयी मला ओढ नाही. पण समजा असे आस्तित्व असलेच तर ते स्वतः मेल्याशिवाय कळणार नाही, कदाचित, नसलेच तर काहीच कळणार नाही. दोन्ही शक्यता आहेत.
+१
हम को मालूम है जन्नतकी हकी़क़त लेकिन,
दिल को खुश रखनेको गा़लिब ये ख्याल अच्छा है.
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
पोटाला मिरची, तिखट, मसालेदार
पोटाला मिरची, तिखट, मसालेदार झेपत नाही त्यामुळे मलाही अशा प्रकारच्या अत्याचाराला सामोरं जावं लागतं. पण हा प्रश्न थोडा भारतीय मानसिकतेचाही वाटतो. घरी आलेल्या पाहुण्याला काहीतरी खायला दिलंच पाहिजे, "विन्मुख पाठवू नये" अशा प्रकारच्या विचारांमुळे मग जे चटकन उपलब्ध असेल ते खायला देणं. घाटपांडेंना खाण्याच्याच त्रास, मनोबा, माझ्यासारख्या लोकांना ठराविक प्रकारच्या अन्नाचा त्रास.
मद्य, मांस भक्षण करण्या-न करण्यावरूनही अनेकांना ताप होतो.
सहज यांनी ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांबद्दल लिहीलेलं आहे. भारताच्या राजकारणात सध्या ममता बॅनर्जी, जयललिता आणि मायावती अशा तीन सशक्त स्त्रिया आहेतच ज्या सिंगल आणि विनापत्य आहेत. (भारतात एकट्या माता असत्या तर अधिक अडचण आली असती.) तिघींच्या धार्मिक असण्या-नसण्याबद्दल चर्चाही होत नाही. मायावती भाषणांमधे "कुवारी हूं, चमारी हूं, तुम्हारी हूं।" असं म्हणतातही. यदाकदाचित इंदीरा गांधी अविवाहीत असत्या तरीही त्याचा कितपत फरक पडला असता?
धर्माधारित तत्त्वज्ञानातील फरकामुळे असावा, लग्न, मुलं, संसार इत्यादी गोष्टी राजकारण्यांच्या बाबतीत भारतात महत्त्वाच्या नसतात. एकाहून अधिक विवाह हा मात्र भारतात चर्चा, टीकांचा विषय निश्चित झाला असता. आतिवासने हाच मुद्दा प्रतिसादात सुरूवातीला मांडलेला आहे.
तिरशिंगरावांचा मुद्दा, प्रत्येक गोष्टीकडे शास्त्रीय दृष्टीकोनातून पहाणे. नास्तिक, निधर्मी म्हणवणार्या माझे ओळखीतल्या लोकांना अशा प्रकारच्या विचारांमुळे अनेकदा वेगळं काढलं जातं. माझ्या एका नास्तिक मित्राचा शाळेत असताना प्रार्थना म्हणण्यास विरोध होता. त्याला म्हणे प्रार्थना सुरू असताना भिंतीकडे तोंड करून उभं करत. नास्तिक लोकांची मोठी रॅली अलिकडेच अमेरिकेच्या राजधानीत झाली होती.
अर्थात हे सर्व तपशील झाले. अल्पसंख्य असल्यामुळे वेगळं काढलं जाणं बहुतेकवेळा होतंच.
घरातल्या पिकल्या पानांना तरूण वर्गाकडून तुच्छ वागणूक मिळण्याचा आणि रक्तदाब, मधुमेह या गोष्टींचा संबंध असेलच असं वाटत नाही. वाईट वर्तणूक या रोगांकडे दुर्लक्ष केल्यामुळे दृश्यमान होत असेल. आज अचानक रक्तचाचणीत शर्करा आढळली म्हणून एखाद्या व्यक्तीची उपेक्षा सुरू होत असेल असं वाटत नाही. उलटपक्षी अनेक धार्मिक घरांमधे, "तुम्ही भटजी-पूजेसाठी थांबू नका. काहीतरी तोंडात टाका" वगैरे वाक्य हमखास कानावर येतात. (हा पुन्हा शहर आणि निमशहर असा फरक असल्यास कल्पना नाही.) याउलट एखादी व्यक्ती मानसोपचारतज्ञाकडे जाते म्हटल्यावर अनेकांचं वागणं बदलतं.
माझ्या नात्यातल्या एकीला एकेकाळी वारंवार मानसोपचार तज्ञाकडे जाण्याची आवश्यकता भासत होती. तिच्या मनात या गोष्टीबद्दलही अजूनही गंड आहे. त्यातून मी तिच्या सासरची नातेवाईक. हा विषय निघाला असता, "बिग डील! कोणाला ओबेसिटी, कोणाला डायबेटीस, कोणाला ओसीडी (obsessive compulsive disorder)!" असं म्हणून तू काही जगावेगळी नाहीस हे समजवताना फार कष्ट पडले.
'जगण्याचीही सक्ती आहे'मधे जे विचार मांडले आहेत तशाच प्रकारचे विचार घाटपांडे आणि नानावटी यांच्या लेखात आणि त्यावरच्या प्रतिसादांत आहेत; विशेषतः इच्छामरणाचा पुरस्कार करणारे. 'सन्मानाने मरण' हा मनुष्याचा अधिकार असावा; आणि मनुष्य जन्मावरही आता मनुष्याला ताबा मिळतो आहे हे दोन मुद्दे मला विशेष आवडले. धार्मिक तत्त्वज्ञान, जन्मावर ताबा नाही तर मरणावरही नको, हे आधुनिक विज्ञानामुळे फार महत्त्वाचं राहिलेलं नाही.
इच्छामरणाचा दुरूपयोग ही व्यावहारिक अडचण आहेच. शंभर गुन्हेगार सुटले तरी चालतील पण एकाही निरपराधी व्यक्तीस शिक्षा होऊ नये हे तत्त्व मान्यच आहे; पण 'सन्मानपूर्वक मरण' हा मनुष्याचा अधिकार मानण्यासाठी मुळात समाजाच्या सुसंस्कृतपणाचा संबंध आहेच.
तिरशिंगरावांचा मुद्दा "मी निराश नाही पण मनसोक्त जगल्यावर आता इच्छामरण यावे असे मला मनापासून वाटते." मला विचार करण्यायोग्य वाटतो. पण पलिकडे काही असेल यावर माझा अजिबात विश्वास नाही. किंवा हे थोडं कृष्णविवराच्या आत काय असेल या प्रश्नासारखं वाटतं. त्या बाजूला (मरण असो वा कृष्णविवराच्या आत) काय आहे हे समजलं तर या बाजूच्या लोकांना ते कळवता येणं शक्यच नाही. त्यामुळे ते कोणाला समजलं तरी ते इथे पोहोचणारच नाही. सिमोन द बोव्व्हारबद्दल करूणा गोखलेंनी लिहीलं आहे, जाँ पॉल सार्त्र गेला त्यानंतर ती म्हणाली, "त्याच्या जाण्यामुळे आमच्यात अंतर निर्माण झालेलं आहे. माझ्या मरणामुळे ते नष्ट होणार नाही."
नैसर्गिक प्रेरणेनुसार मनुष्याचं मुख्य काम पुनरूत्पादन. त्याचं वय टळल्याच्या सर्व खुणा अगदी व्यवस्थित दिसतात. पुनरूत्पादन हीच आयुष्याची इतिकर्तव्यता नाही, पण आता इतिकर्तव्यता झाली असं वाटणारे अनेक सुजाण लोकं समाजात नक्कीच असतील. आपलं आपल्या जन्मदात्यांवर, काका-मामे, मित्रांवर प्रेम आहे म्हणून त्यांच्या इच्छेविरोधात त्यांना काही करायला भाग का पाडावं? (अशा संदर्भात 'जगायचीही सक्ती आहे'मधे विस्तृत विचार आहे. तिरशिंगराव, तुम्हाला हे पुस्तक निश्चित आवडेल.)
हे आवडले आणि पटलेही.
"असंवेदनशीलतेच्या रोगाला बळी पडणार्यांना" रोगाचा त्रास होत नाही. पण ही कल्पना आवडली.
संघटीत असण्या-नसण्याचा मुद्दाही रोचक आहे. अनेकदा आपण काही अन्याय्य वागत आहोत याचीही जाणीव कदाचित बहुसंख्येतल्या अनेकांना नसावी. अल्पसंख्य संघटीत होण्यामुळे ही जाणीव निर्माण करून दिल्यास काही प्रश्न लगेच सुटतातही. उशीरा उठणार्या काही विद्यार्थ्यांनी सुचवल्यामुळे टॉक्स, सेमिनार्स, कलोक्युअम, गट-चर्चा सकाळी ११ ऐवजी शक्यतोवर संध्याकाळी ४ वाजता ठेवण्याचा प्रघात माझ्या एका ऑफिसात पडला आहे.
शीर्षकाबद्दल थोडं. आपल्यापैकी बहुतेकांनी कुठल्याकुठल्या प्रकारे लौकीकार्थाने अल्पसंख्य असण्याचा अनुभव घेतला असावा. अगदी महाराष्ट्राबाहेरही गेल्यास लगेच आपण भाषिकदृष्ट्या अल्पसंख्य असू. पण भाषा, जात, धर्म ही विभागणी मानवनिर्मित आहे, नैसर्गिक नाही. नैसर्गिक एककांबद्दलही विचार सुरू असल्यामुळे असं शीर्षक ठेवावंसं वाटलं.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
सुंदर प्रतिसाद.
नास्तिक, वैचारिक असण्याबद्द्ल मात्र एक सुचवणी करायची आहे.
तिथे जनभावना व जनरेटा लक्षात घेत व्यवहार्य मार्ग म्हणून होता होइल तोवर गपगुमान लोंढ्यात सामील होउन जीव वाचवणेच भारतीय समाजात श्रेयस्कर ठरेल.
जाइनात का लोक कुठल्या बाबाला, करिनात कुठल्याशा उत्सवात सकाली नवस,होमहवन अन् रात्री धत्तड्-तत्तड. जोवर तुम्हाला दुर्लक्ष करता येतय तोवर करीत रहायचं.
प्रार्थनेबाबतच म्हणायचं तर कित्येक प्रार्थना म्हणवली जाणारी गीते वैताग आणत. पण उगा तेवढ्यासाठी बंडाचा झेंडा घ्यायची मला गरज वाटली नाही. मम म्हणायचे आणि पुढल्या कामाला लागायचे असे धोरण ठेवले.(महत्वाचं म्हणजे मी ज्यांना "आपले" मानतो त्यांना लोकांना काही जिव्हारी लागेलसे बोलणे,कठोर शब्दांत बोलणे,वाद घालणे मला जमत नाही, विशेषतः त्यांचा भाबडेपणा दिसत असताना. होता होइल तोवर समजुतीचे धोरण अशा "कंडिशनिंग" झालेल्या मनांसोबत घेणे बरे; दरवेळी साअवरकर बनून विज्ञाननिष्ठ निबंध आचरणे सोपे नाही. )
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars