"सरसकट उपरे असल्याची भावना पकड घेत गेली" - राही अनिल बर्वे

संकीर्ण

"सरसकट उपरे असल्याची भावना पकड घेत गेली" - राही अनिल बर्वे

- चिंतातुर जंतू

प्रश्न : वडील अनिल बर्वे, आजोबा शाहीर अमर शेख. आई प्रेरणा बर्वे अभिनेत्री. बहीण फुलवा खामकर नृत्य दिग्दर्शिका. तुमच्या सामाजिक, राजकीय आणि कलात्मक जडणघडणीत त्यामुळे काय फरक पडला?

राही अनिल बर्वे : खरं सांगायचं तर लहानपणापासून मला, आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांमधे कुणीतरी उपरेच असल्याची भावना होती. मी ज्या परिवारातला आहे तो परिवार कुठल्याही धार्मिक किंवा तात्त्विक कोंदणात बसणारा नव्हता. या वातावरणात घडलेल्या एका घटनेचा परिणाम खोलवर होता. १९९३ साली झालेल्या दंगलींच्या वेळी मी तेरा वर्षांचा होतो. प्रसंग असा होता की आजूबाजूच्या परिसरामधे निरागस माणसं जाळली जात होती. दैवयोगानं माझी आई त्या परिस्थितीमध्ये सापडली आणि निव्वळ तिचं आडनाव 'बर्वे' असं कळल्यामुळे ती वाचली. अर्थात, केवळ जातीधर्माविषयीच्या वाटत असलेल्या औदासीन्यामुळे माझ्यात काही कौतुकास्पद बदल घडले असं काही नाहीच. खरं सांगायचं तर एकीकडे कर्मठ आणि दुसरीकडे निगरगट्ट अशा भासत असलेल्या समाजाविषयी विलक्षण तिरस्कार निर्माण झाला आणि ती कटुता काढण्यातच निम्मं आयुष्य खर्च झालं असं आता वाटतं. 'आपण अगदी सरसकट सर्वत्र उपरेच आहोत' ही भावना घट्ट पकड घेत गेली. आता ती भावना जणू आत्म्याचाच भाग बनलेली आहे. या 'आउटसायडर' भावनेमुळेच, मी इंडस्ट्रीत राहूनच, शांतपणे, सोशीक राहून, सहा वर्षांच्या दीर्घ प्रयत्नांमधून इंड्रस्ट्रीच्या मुख्य प्रवाहापेक्षा खूप वेगळा असा 'तुंबाड' बनवू शकलो. मग तो तुम्हाला आवडो ना आवडो.

प्रश्न : तुमच्यावर साहित्यिक संस्कार कोणते झाले? तुम्हाला प्रभावित करणारं साहित्य कोणतं?

राही अनिल बर्वे : जागतिक साहित्यातली घ्यायची झाली तर असंख्य नावं आहेत. पण दुर्दैवानं मराठीत फक्त जीए. जेव्हाजेव्हा त्यांच्याहून काहीतरी श्रेष्ठ शोधायचा, वाचायचा प्रयत्न केला तेव्हा फक्त निराशा पदरी पडली. संपूर्ण मराठी साहित्य एका बाजूला आणि जीए दुसर्‍या बाजूला. १९८७ साली जीए गेले. इतकी वर्षं झाली तरी अद्याप त्यांच्या जवळपास पोचणारा एकही लेखक निर्माण होऊ नये हे खरंच आपलं दुर्दैव आहे. आणि गेल्या अनेक दशकांमधे झालेल्या मराठी भाषेविषयीच्या अनास्थेमुळे, पुढील पिढ्या मराठी भाषेत न शिकता इंग्रजी माध्यमांमधे गेल्यामुळे मराठी भाषा जणू अखेरचे श्वास घेत असल्यासारखी भावना झालेली आहे. त्यामुळे यापुढे असा कुणी लेखक यापुढे सापडणं जवळपास अशक्यच. माझ्यापुरतं हेच अतिशय दु:खद असं वास्तव आहे.

प्रश्न : घरात चांगले लेखक आणि वाचक असलेली साहित्यिक पार्श्वभूमी. तुम्ही फिक्शन लिहीत होतात. तुमची दोन पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. सिनेमाकडे कसे वळलात?

राही अनिल बर्वे : I hate both my books. पहिलं पुस्तक ( शीर्षक : 'पूर्णविरामानंतर') लिहिलं तेव्हा मी निव्वळ पंधरा वर्षांचा होतो. आता कुणी "ते पुस्तक मी वाचलंय" असं म्हणणारा भेटलाच तर स्वतःचं कपाळ बडवून घेतो. दुसरं पुस्तक 'आदिमायेचे!' या शीर्षकाचं. ते लिहिलं तेव्हा गद्धेपंचविशीत होतो. तेही आता मला निम्मं कच्चंच वाटतं. आता पुन्हा, हिम्मत करून 'श्वासपाने' प्रकाशित करतो आहे. लोकांना ते कसंकाय वाटेल कुणास ठाऊक. कारण ते लिहिताना फक्त स्वतःसाठी लिहिलं होतं. सात वर्षं त्याचं बाड पडून होतं. शेवटी माझी सहचरी जाई हिच्या अथक प्रयत्नांनंतर, तिच्यापुढे हार मानून, भीतभीत का होईना पण प्रकाशित करतो आहे. हे झालं पुस्तकांविषयी. पण सिनेमामात्र जणू जन्मापासून रक्तातच होता. सिनेमाच्या दिशेनं प्रयत्न वयाच्या १४व्या वर्षापासूनच सुरू झाले. आत्ताआत्ता लोकांना त्या प्रयत्नांची फळं जरा कुठे दिसू लागलेली आहेत. पुस्तकं लिहायच्या खूप आधीच मी सिनेमा या माध्यमाकडे वळलेलो होतो, ही वस्तुस्थिती आहे.

प्रश्न : अॅनिमेशन, व्हीएफएक्समधली करिअर ते 'मांजा'चं दिग्दर्शन हा प्रवास कसा झाला?

राही अनिल बर्वे : दहावीला नापास झालो होतो. मग वयाच्या १५ ते १८व्या वर्षापर्यंत खूप धडपडलो. मग वयाच्या १९व्या वर्षीच भारतातला सर्वाधिक कमाई असलेला अ‍ॅनिमेशन आर्टिस्ट बनलो. इतका पैसा मिळत होता की खरं तर तो सोडवत नव्हता. पण तरी कुठेतरी हेही ठाऊक होतं की, केवळ हे करत राहिलो तर जन्मभर असमाधानी राहीन. मग मात्र, त्यापुढची बारा वर्षं जणू नरकवास होता. पण जे घडवायचं ते अखेर घडवलं. आता पुढे बघू. या संदर्भात केवळ दुर्दम्य आशावाद असून भागत नाही. कारण सगळी सोंगं आणता येतात पण पैशाचं सोंग आणता येत नाही. You have to play your struggle like a chess-game. समोरचा प्रतिस्पर्धी जर नियतीसारखा भक्कम असेल तर आयुष्याची काही वर्षंच काय, दशकं सोडून द्यावी लागतात. जर 'तुंबाड' बनवू शकलो नसतो तर पुन्हा पुढली दहा वर्षं खेचत राहिलो असतो हे नक्की. हे जमणार नसेल, कौटुंबिक सुख, मुलंबाळं, आर्थिक स्थैर्य या गोष्टी जर अधिक महत्त्वाच्या असतील तर ह्या खेळात न पडणंच योग्य.

प्रश्न : 'मांजा' आणि 'तुंबाड' यांची जातकुळी खूप वेगळी असली तरी दोघांत काही साम्यस्थळं आढळतात. उदाहरणार्थ, दोन्हींमधली लहान मुलं - त्यांना आयुष्यानं दाखवलेला इंगा असा काही आहे की ती निरागस उरलेली नाहीत. दोन्हींमध्ये दिसणारी वडीलधारी माणसंदेखील लहानपणी हादरवून टाकणाऱ्या प्रसंगांना सामोरी गेली आहेत. ह्याचा तुमच्या भावविश्वाशी कसा संबंध लागतो?

राही अनिल बर्वे : 'तुंबाड', 'मांजा', 'मयसभा', 'रक्तब्रह्मांड', 'अश्वलिंग' या माझ्या सर्व फिल्म्समध्ये एक 'failed father figure' आणि 'father figure'साठी आसुसलेला एक मुलगा हे घटक माझ्याही नकळत आलेले आहेत. जाईनं सांगेपर्यंत याची मला जाणीवच झालेली नव्हती. या संदर्भात अधिक खोलात मी आताच जात नाही. जे बनवायचं ते सारं बनवून होऊ देत. मग कदाचित जाईन. थोडा विचार केला तर जाणवतं की मला स्वतःला घरातली अशी वडीलधारी व्यक्ती अशी नव्हती. (मला माझ्या वडलांबद्दल अशी काहीच स्मृती नाही.) पण वडीलधार्‍या व्यक्तीबद्दलचा 'father figure' माझा - कदाचित अबोध मनातला - शोध कधीच थांबलेला नाही. कारण हा शोध कधीच यशस्वी झालेला नाही. बहुदा तेच लिखाणात आणि फिल्म्समधे झिरपत असावं.

प्रश्न : नैतिकतेच्या सर्वसाधारण समाजमान्य कल्पनेत न बसणारे लैंगिक संबंध तुमच्या दोन्ही चित्रपटांत आहेत. तुमची प्रमुख पात्रं (कधी स्वेच्छेनं तर कधी अनिच्छेनं) त्यांत सहभागी असतात. तुमचे प्रोटॅगॉनिस्ट इतरांना मॅनिप्युलेट करतात किंवा इतरांवर ताबा मिळवण्याची आकांक्षा बाळगतात. आणि तरीही थेट नैतिक-अनैतिकतेची काळी-पांढरी लेबलं न लावता त्या व्यक्तिरेखांकडे एका कणवपूर्ण नजरेनं किंवा निदान तटस्थतेनं तुम्ही पाहता असं वाटतं.

राही अनिल बर्वे : मी चितारलेल्या या सर्व व्यक्तींपेक्षा, कदाचित मी फार वेगळा नसेन म्हणूनच कदाचित असं घडत असावं. तटस्थता असते म्हणूनच तर हे सारं निर्माण करणं जमतं. आणि ही तटस्थता काही हवेतून येत नाही. त्याकरतां वयाच्या विशीची चाळिशी व्हावी लागते. बहुतेकांना तर वयाच्या सत्तरीतही हे जमत नाही असं मी पाहातो. याबाबत मी थोडा नशीबवान होतो, इतकंच.

प्रश्न : त्याचवेळी, अतिशय कठोरपणे किंवा क्रूरपणे इतरांना मॅनिप्युलेट करण्यासाठीच कुप्रसिद्ध असलेल्या फिल्म इंडस्ट्रीत तुम्ही आपली जागा निर्माण करण्यासाठी झगडलात. अशा सर्व झगड्यातूनही इतरांकडे कणवपूर्ण नजरेनं किंवा निदान तटस्थतेनं पाहण्याची क्षमता तुमच्यात शिल्लक आहे असं वाटतं का? जर असेल, तर ती कशी जिवंत ठेवलीत?

राही अनिल बर्वे : ती आपोआप राहिली. राहिली नसती तर अगदी सहज जाऊ दिली असती. Emotions don’t help in such fights. कुणालाच नाही. तिथे फक्त थंडपणे केलेली गणितं आणि लॉजिक या गोष्टींमुळेच तुम्ही दीर्घकालपर्यंत टिकून राहू शकतां. भावनिक होऊन 'तुंबाड' बनवण्याचा प्रयत्न केला असता तर कधीच बनला नसता. निर्मिती करणार्‍याच्या भावनांचं महत्त्व फक्त 'अ‍ॅक्शन' आणि 'कट्' यांमधेच. त्याआधी आणि त्यानंतर तुम्हाला वास्तवाचा सामनाच करावा लागतो. याबद्दल एक कलाकार म्हणून कितीही असहाय वाटलं तरी तेच शेवटी क्रूर, जळजळीत असं सत्य आहे.

प्रश्न : 'मांजा'चं कथानक पाहता मुंबईची बकाल पार्श्वभूमी त्याला आवश्यक होती. 'तुंबाड'मधलं गाव (वस्ती) फारसं दिसत नाही. वाडा, घर, नदीचं पात्र, डोंगर अशा काही जागा दिसतात. चित्रपटाचा गूढपणा त्यामुळे अधोरेखित होतो. मात्र, जो भाग पुण्यात घडतो तो इतर कुठल्याही गावात घडू शकला असता असं वाटतं. पुणं निवडण्यामागे काही विचार होता का?

राही अनिल बर्वे : १९३०च्या कालखंडाचा भाग जो पुण्यात घडताना दाखवला आहे तो अन्य कुठे घडू शकला असता का? तुम्हीच विचार करून सांगा.

प्रश्न : कथेसाठी निवडलेली स्वातंत्र्यलढ्याची पार्श्वभूमी विशिष्ट कारणांसाठी असावी असं काही ठिकाणी वाटतं (उदाहरणार्थ, 'ब्राह्मणीच्या हाती दळलेले पीठ' प्रसंग किंवा अर्थात स्वातंत्र्यानंतरचं वाड्याचं भवितव्य). ही पार्श्वभूमी निवडताना तुमच्या मनात काय विचार होता?

राही अनिल बर्वे : 'तुंबाड' तीन भागांमधे विभागलेला आहे. तो विनायकच्या जीवनाचा प्रवास इतकाच मर्यादित नाही. त्याचबरोबर त्यात बदलत असलेल्या भारताचा प्रवासही आलेला आहे. आज जो भारत आपल्याला दिसतो तो १९२० ते १९४०च्या वर्षांमधे घडलेल्या घटनांनी बनलेला आहे. पहिल्या भागात विनायकच्या आईची पहिली पिढी चितारलेली आहे, जी जन्मभर केवळ एका मुद्रेची आस बाळगून म्हातार्‍या, कफल्लक 'सरकार'कडून शोषण करून घेत जगते. सार्‍या भारताकरताच हा काळ सरंजामी व्यवस्थेचा होता. दुसरा भाग १९३०च्या सुमारचा, विनायकचं चित्रण असलेला. दुसर्‍या महायुद्धाचे वारे वाहात होते. सारा देशच जणू साम्राज्यवादाच्या छायेखाली वावरत होता. विनायक या दुसर्‍या पिढीचा. जणू या संपूर्ण पिढीलाच एकाच एक नाण्यात रस नाही. त्याला सतत खूप नाणी हवी आहेत. कारण त्याला स्वतःचं सरकार स्थापन करायचं आहे. आणि मग येते, १९४०च्या उत्तरार्धातली तिसरी पिढी. विनायकचा मुलगा पांडुरंग तिचा प्रतिनिधी आहे. स्वतंत्र भारत अत्यंत संथपणे भांडवलशाहीकडे वळत होता. आता पांडुरंगाला निव्वळ 'अनेक' नाणी नको आहेत. त्याला 'सर्वच्या सर्व' नाणी हवी आहेत. कारण त्याला पूर्वीपेक्षा अधिक तगडा प्रतिस्पर्धी निर्माण झालेला आहे. हा असातसा 'सरकार' नाही. हा प्रतिस्पर्धी म्हणजे 'भारत सरकारच' आहे. (एके ठिकाणी पांडुरंग असं विचारतो की "सरकार औरत है?" तो प्रश्न अर्थपूर्ण आहे.)

प्रश्न : मनुष्याची निसर्गदत्त (किंवा त्याला जनावरापेक्षाही क्रूर करणारी) हाव आणि समष्टीचं भलं करण्याची आस बाळगण्याचा आदर्शवाद ह्यांच्यातला संघर्ष उभा करण्याची इच्छा होती का? आदर्शवाद तुम्हाला एकंदरीत पोकळ वाटतात का?

राही अनिल बर्वे : आदर्शवाद मला पोकळ 'वाटत' नाहीत. ते मुळात खरोखरच पोकळ 'असतात'. पण म्हणून त्यांच्यावर तुच्छतेने हसू गेलात तर अखेरीस फक्त हस्तर आणि विनायक इतकेच उरतील. बांबूसुद्धा पोकळच. पण त्याचा नीट अभ्यास करून अखेरीस बासरी बनवली की सूर निघतात की नाही?

प्रश्न : 'मांजा'मधले अनेक प्रसंग रात्री किंवा अंधाऱ्या जागांमध्ये घडतात. तरीही, अखेरचा (गोळी प्रकाशात धरण्याचा) प्रसंग भविष्याविषयी आशादायी वाटतो. पण, 'तुंबाड'मध्ये तशी आशा अजिबातच वाटत नाही. त्यात दिवसादेखील सूर्यप्रकाश दिसत नाही. शिवाय आपण भूगर्भातही जातो. हे झाकोळलेलं पॅलेट दोन्ही चित्रपटांच्या मूडला साजेसं आहे. ते पाहून 'सिन सिटी' किंवा तत्सम न्वार चित्रपटांची आठवण होते. तुम्हाला त्या शैलीतले चित्रपट आवडतात का? की तुमचा जगाविषयीचा दृष्टिकोनच इतका खिन्नतेनं आणि निराशेनं मळभलेला आहे? म्हणजे, तुमच्या मते माणूसजातीचं प्राक्तनच अंधारलेलं आहे का? तुम्हाला जी. ए. कुलकर्णी आवडतात असंही तुम्ही म्हणाला आहात. त्याचा संबंध इथे लागतो का?

राही अनिल बर्वे : 'मांजा'च्या 'रांका'ला फक्त जगायचं होतं. बहिणीला जगवायचं होतं. त्याहून अधिक या गरीब पोराची आयुष्याकडून फार कुठलीच अपेक्षा नव्हती. 'तुंबाड' तुम्हीही पाहिलाय. तल्लख असलेल्या, बापाची जागा घ्यायला वखवखलेल्या, कोवळ्या पांडुरंगाची गोळी - त्याने अखेरीस पंचा न स्वीकारता जिवंत पेटवलेला बापच - बनेल. त्याला ती जन्मात कधीच चघळता येणार नाही. ह्यात माझा वैयक्तिक आशा-निराशावाद कुठे येतो? हे पूर्णपणे त्या दोन, बारा-तेरा वर्षांच्या मुलांचं विधिलिखित आहे.

'मांजा' - इथे पाहता येईल :

Manjha - Directed by Rahi Barve from Recyclewala on Vimeo

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

मुलाखत आवडली.
'तुंबाड'ला आणखी प्रेक्षक मिळायला हवा होता. Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

वा!!! मुलाखत आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुंबाड आता 'अॅमेझॉन प्राईम'वर आलेला आहे अशी बातमी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

हिकरं नाय ए. भारतातच आहे का उपलब्ध?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

दिसतोय इथे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

Tumbbad (!) अमेरिकेत 'ॲमझॉन प्राइम'वर दिसतो आहे.
धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0