मूल दत्तक घेणे हा मूर्खपणा आहे का?

सुरुवातीलाच हे स्पष्ट करतो की हा प्रश्नच मूर्खपणाचा आहे. पण तो मला पडलेला नाही. वसुधाने(बायको) मानसिक समुपदेशक म्हणून काम करायला सुरुवात केल्यापासून एक एक वल्ली येऊन भेटतात त्यातल्याच एकाने विचारलेला हा प्रश्न! आता बायकोकडे येणाऱ्या रुग्णांबद्दल लिहिणे नैतिकतेला धरून नसल्याने त्याबद्दल जास्त लिहित नाही पण या प्रश्नाने विचार चक्र सुरु झाले.

आम्ही आमची एकुलती एक मुलगी दत्तकच घेतली आहे आणि त्या सगळ्या सरकारी प्रक्रियेतून जाताना अनेक अनुभव आले, अनेक लोक भेटले त्यांच्या प्रतिक्रिया, अनुभव (बऱ्याचदा अननुभव), न मागता दिलेले सल्ले आणि मत, ह्या क्षेत्रात बोकाळलेला भ्रष्टाचार, सरकारी लोकांचा तुच्छ आणि बेदरकार असा attitude, सगळ्याचा यथेच्छ अनुभव घेतला आणि मूल दत्तक घेण हा एक मूर्खपणा आहे असं काही काळ मलाही वाटू लागलं होतं. (अर्थात वसूच्या पेशंटला काही ही अशी खुदाई खिन्नता नव्हती आली! त्याच्या दत्तक घेतलेल्या मुलामध्ये आणि त्याच्या मध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला होता आणि तो हे मूल जैविकदृष्ट्या आपलं नाही म्हणून असं झालय असे समजून मूल दत्तक घेणे मूर्ख पणा असतो का? असे विचारत होता.)

याबाबतीतला आमचा सरकार/ कोर्ट विषयीचा अनुभव दिव्य आहे. एकतर ह्यातला भ्रष्टाचार भयानक आहे. मला आश्चर्य वाटले, पण पुण्यात मुलगा दत्तक हवा असेल तर ३-४ लाख रुपये मोजावे लागतात आणि मूल जर १ वर्षापेक्षा कमी वयाचे असेल तर ही रक्कम वाढते. नाहीतर ३ ते ५ वर्षाची प्रतीक्षा करावी लागते. मुलीला दत्तक घ्यायचे असेल तर काही पैसे लागत नाहीत. मुलगा असो मुलगी आम्हाला काही फरक पडत नव्हता आणि आम्ही पैसे मोजून काही मूल दत्तक घेणार नव्हतो म्हणून मग अहमदनगरच्या स्नेहालय या प्रसिद्ध अनाथालयाचे गिरीश कुलकर्णी (हीच ती आमीर खानच्या सत्यमेव जयते मध्ये दाखवली गेलेली संस्था-त्यावेळी त्यांच्याकडे एकही लहान मुल नव्हते) यांनी सल्ला दिला की,
तुम्ही एक युनिवर्सल असा अर्ज तयार करून सगळ्या महाराष्ट्रात जिथे तुम्हाला माहिती मिळेल तिथल्या अनाथाश्रमात नेऊन द्या. तिथल्या कोर्टात वारंवार जायची तयारी ठेवा. मी देखील माझ्या ओळखी मध्ये सांगून ठेवतो पण सगळी सरकारी प्रक्रिया तुम्हाला पूर्ण करावी लागेल त्यात काही पळवाट/ लाच देऊन काम करून हवे असेल तर माझी मदत अपेक्षु नका.

झालं, मग आमची धावपळ सुरु झाली. पहिलं म्हणजे दोघांच्या चारित्र्याचा दाखला तो पोलिसांकडून घ्यायचा त्याकरता पुण्याच्या कामिशनर हाफिसात खेट्या मारल्या. मग तिथून आम्ही जिथ राहत आहोत तिथल्या पोलीस ठाण्यापर्यंत वाऱ्या केल्या. २ महिन्यांनी माझा दाखला आला पण बायकोचा नाही, कारण ती मुळची नगरची! लग्न होऊन २-३ वर्षच झालेली, मग इथल्या पोलिसांना कसे कळणार की ती कोणी डांबिस गुन्हेगार वगैरे तर नाही ना! मग पुणे ते नगर अन नगर ते पुणे अशा खेट्या झाल्या. अखेरीस तो दाखला मिळाला. मग केस पेपर, आम्ही दोघांनी “मला मुल दत्तक का घ्यायचे आहे” हे सविस्तर सांगणारा वेगवेगळा लिहिलेला निबंध वजा शपथनामा, आमचे वैद्यकीय अहवाल (फक्त ससून च्या डॉक्टरांनी सही केलेलेच, का? हा प्रश्न विचारायची सोय नाही) उत्पन्नाचे दाखले, मालमत्ता, कर्ज, विमा, गुंतवणुकीची कागदपत्र वगैरे सोपस्कार झाले. बायकोच्या आणि माझ्या ओळखीच्या दोघा मित्रांचे (म्हणजे वेगवेगळ्या हां, नवरा बायकोला ओळखणारा समान मित्र असला की त्याची विश्वासार्हता संपते). आम्ही चांगले लोक असल्याची नोटरी समोर दिलेली ग्वाही ( मग पोलिसांचे character certificate कशाला?..सुरळी करून…जाऊ दे…) माझ्या आणि फक्त माझ्याच एका नातेवाईकाने- मी आणि माझी बायको दोघेही गचकलो तर तो आमच्या दत्तक मुलीला सांभाळेल अशी दिलेली ग्वाही( प्रतिज्ञापत्र )! आता आम्ही दोघेही गचकलो..! आणि त्याने नाही सांभाळले तर? त्याला काय आत टाकणार का कोर्ट? काय पण मागतात? हे सगळं सगळं पूर्ण केलं. तो चांगला २०० पानी दस्तऐवज तयार करून मुंबई, नाशिक, पुणे, नगर, नांदेड इथल्या अनाथाश्रमात दिला.

कर्मधर्म संयोगाने नांदेडच्या नरसाबाई अनाथालयात एक ३ महिन्याची मुलगी दाखल झाली होती. त्यांनी फोन केला म्हणून धावत गेलो. बायकोची मावशी तिकडे राहते त्यांनीच सगळी माहिती काढली होती. तिथल्या राठोड नावाच्या समाजसेवकाने सांगितले की
मुलगी दत्तक मिळेल पण प्रक्रिया पूर्ण करायाला २-३ वर्ष जातात. पण मधल्या काळात फोस्टर केअर(यशोदा-नंदासारख) म्हणून मुलगी तुमच्याकडे देऊ पण काही घोळ झाला तर मुलगी काढून घेऊ (जशी हप्ते नीट भरले नाहीत की गाडी उचलून नेतात तसे.)
शिवाय त्याची अपेक्षा होती की त्याच्या अनाथालयाला आम्ही काही तरी देणगी द्यावी. नसती दिली तर समाज सेवकाचा सर्च रिपोर्ट आणि न हरकतीचा दाखला त्याने अडकवला असता हे सांगणे नकोच (अनाथालय नांदेडच्या एका रिटायर्ड नायब तहसिलदाराच्या मुलीचे होते हेही इथे मुद्दाम सांगायाला हवे). मी म्हटले, “देतो, पण चेकने देणार आणि रीतसर पावती घेणार”, तो आढेवेढे घेऊन तयार झाला…हे काय चेकने दिलेले पैसे लंपास करू शकत नाहीत की काय? आमची आपली मनाची एक समजूत झाली अन काय! मग देणगी दिल्यावर त्याने बाकी सगळी शहानिशा करून, घरी पुण्याला भेट वगैरे देऊन त्याचे रिपोर्ट तयार केले आणि मग फोस्टर केअर अग्रीमेंट नांदेडला करून मुलगी आमच्या हाती सुपूर्द केली. ती तारीख होती ८ मार्च २०११- जागतिक महिला दिन, पण हा मात्र खरोखर एक योगायोग होता. राठोड ने त्याचे काम बरोबर दीड महिन्यात पूर्ण केले.
मग आमच्या कोर्टाच्या वाऱ्या सुरु झाल्या. विशेष गोष्ट म्हणजे कोर्टात ही केस म्हणून उभी राहते. कौटुंबिक न्यायालय वगैरे नाही, आपलं (आपलं कसलं डोम्बलाच..!) नेहमीचं सत्र न्यायालय. तिथे मी, सासू, सासरे, बायको, तिची मावशी, मावशीचे यजमान दीपक काका आणि ३ महिन्याची ही पोरगी घेऊन आम्ही उभे. न्यायाधीशाला पुरावा म्हणून जिवंत पोर दाखवायला नको? शेजारी हातकड्या घातलेले गुन्हेगार येजा करतायत, त्यातले कोणी आमच्या शेजारी येऊन बसतात (आपली काय हिम्मत? त्यांना इथे बाई माणसाच्या शेजारी बसू नका म्हणायची!). संडास लघवी करायची सोय तर दिव्यच. वकील म्हटला,
सकाळी ११ वाजता कोर्ट सुरु होते तुम्ही १०.३० ला या. पहिली तुमचीच केस घेऊ १० मिनिटात सोडतो.
म्हटलं,
१०.३० का १०.०० वाजता येतो पण लवकर मोकळं करा.
पण न्यायाधीश महाराजांना काय सुरसुरी आली काय माहित? आमच्या ऐवजी त्याने त्याच्या मनानेच एक दरोड्याची केस पहिली घेतली. मग दुसरी असं करत तिथे बाहेरच ४.०० वाजले. तिथे आम्ही १० ते ४.०० काहीही न खाता पिता ( म्हणजे चहा आणि बिस्कीट फक्त! आणि मी आणि दीपक काका मध्ये मध्ये खाली जाऊन सिगारेटी ओढून यायचो तेवढंच) उभे. आपण कुठे गेलो आणि आपल्याला पुकारले तर? नकोच ते म्हणून. शेवटी माझा संयम तुटला, वकिलाला म्हणालो,
तुम्ही म्हटलात १०.३० ला या आम्ही १०.०० वाजताच आलो. तुम्ही म्हटलात १० मिनिटात मोकळं करतो आता ५ तास होऊन गेले ३ महीन्याच लहान पोर घेऊन हे इथे आम्ही असे ५-५,६-६ तास उभे राहतो. तुम्हाला काही लाज वाटत नाही ?असं आणि काय काय बोललो असेल
वकील शांतपणे म्हणाला,
माझ्यासमोर काय चिडायचं ते चिडा आत जाऊन काही बोलू नका. माझा एक अशील होता. म्हणजे आहे अजून, त्याने अशीच मुलगी दत्तक घेतली आणि त्याची बदली झाली मद्रासला. खेट्या घालाव्या लागतात म्हणून जज समोर किरकिर केली. माझे ऐकले नाही, आज ७ वर्ष झाली ७ वर्षाच्या मुलीला घेऊन दर ६ महिन्यांनी येतो. त्या मुलीला काय वाटत असेल? पण कोर्टाला त्याच्याशी घेण देण नाही. बघा बुवा!

झालं, आपण गार. सगळी हवाच निघून गेली. शेवटी बेलीफाने ४.३० ला आत घेतले. तिथे मागे उभे राहिलो. अशीच काहीतरी दोन भावांच्या भांडणाची केस चालू होती. मी आता आजचा दिवस गेलाच आहे, आता जरा ही मजा ऐकून मनोरंजन तरी होईल. अशी मनाची समजावणी करून केस ऐकायला लागलो. जजचं काही आमच्याकडे लक्ष नव्हत. पण अचानक मिहीकाने (आमची मुलगी) आईच्या गळ्यातले मंगळसूत्र ओढले. (माझी बायको मंगळसूत्र घालत नाही पण वकील म्हटला, “तुमचे पुढारलेले विचार घरी ठेवा पुण्याला आणि नवऱ्याकरता नाही तर जज करता म्हणून मंगळसूत्र घाला”) म्हणून बायकोने ते सोडवून घेतले तसं तिने जोरात भोकाड पसरले. आता जजच काय, अख्ख्या कोर्टाचं लक्ष आमच्याकडे गेलं आणि जजने आम्हाला पुढे बोलावलं म्हणाले,
अरे यांची केस तर आजची पहिलीच होती ना, मग हे वेळेवर आले नाहीत का?
घ्या! आता कमाल झाली पण मी काही बोललो नाही कसनुसं हसलो फक्त.
जज म्हणाला, ( sorry म्हणाले)
हा, घ्या ह्यांचे पेपर्स…काय करता तुम्ही?
मी म्हणालो,
टाटा मोटर्स मध्ये नोकरी करतो सर, पुण्याला.( आपण साध्या लोकांनी जज ला मिलाड , युवर ओनर वगैरे म्हणायची गरज नसते साधे साहेब किंवा सर पुरते.)
जजने विचारले,
टाटा मोटर्स, ते काय आहे?
(अहाहा ! काय विद्वान, बहुश्रुत माणूस जज बनतो.-हे आम्ही मनात)
सर आम्ही गाड्या बनवतो इंडिका वगैरे....
बरं बरं. मुलीला सांभाळणार ना नक्की. टाकणार तर नाही ना?इति जज
(वा काय प्रश्न आहे!)
नाही सर, नीट सांभाळू.- मी
अहो पण नाही सांभाळले तर, आम्ही काय करणार?
आता याचं काय उत्तर देणार! मी कसनुसा चेहरा करून म्हटलं,
नाही नाही , नीट सांभाळू.
पण टाकली तिला तर, तिने काय करायचे? काही पैसे ठेवले का तिच्या नावाने?
हे असे काही असते हे आम्हाला काही माहित नव्हते? म्हटले,
नाही ठेवले
मग ठेवले पाहिजेत की नाही? किती ठेवाल? – जज म्हणाला ( sorry म्हणाले)
म्हटले माझी साधारण ३-४ लाख ठेवायची तयारी आहे
जज म्हटला, ( sorry म्हणाले)
ठीक आहे. १८ वर्षांसाठी १ लाखाची FD करा तिच्या नावाने, पावती जमा करा कोर्टात आणि मग ६ महिन्यांनी कोर्ट ऑर्डर घेऊन जा.( का? ६ महिन्याने का ? मनात… मनात, सगळं मनात!) आता प्रोविजनल ऑर्डर द्या ह्यांना.(हुश्श!)

आश्चर्य म्हणजे वसुधा म्हणजे जी बाई मिहीकाची आई होणार होती तिच्याकडे मिहीकाच्या काळजीने प्रश्न विचारणाऱ्या जजने ढुंकूनही पाहिले नाही...असो!
जाता जाता आणखी एक असच जाणवलं म्हणून, कोर्टात भिंतीवर दिशा लिहितात. तिथे उत्तरच्या ऐवजी डोंगराकडे, पूर्वेच्या ऐवजी रानाकडे, पश्चिमच्या ऐवजी नदीकडे आणि दक्षिणच्या ऐवजी समुद्राकडे असे लिहिल होतं. म्हणजे नांदेडच्या कोर्टात लिहिलं होतं. बाकीच्या ठिकाणचं माहिती नाही. त्याऐवजी तुरुंगाकडे, फाशीघराकडे, अंदमानकडे, असे काहीतरी लिहायला हवं होतं नाही का ?
आता ही FD फक्त सरकारी बँकेतलीच लागते बरं का! खाजगी किंवा सहकारी बँकेतली चालत नाही. मग पुण्याला आलो आणि SBI मध्ये गेलो FD करायला, तर ते म्हणाले जास्ती जास्त ८ वर्षांची FD होते. त्यांना कोर्टाची ऑर्डर दाखवली पण ते सुद्धा सरकारी कर्मचारीच, नाही म्हणजे नाहीच बधले. मग महाराष्ट्र बँकेत गेलो. तिथे माझी ओळख होती. तिथले ओळखीचे काका म्हणाले.
FD १८ वर्षाची होणार नाही पण मी त्यावर शिक्का मारून शेरा देतो कि PAYABLE TO THE RECEIPT HOLDER ON OR AFTER HER 18TH BIRTHDAY’ आणि तू एक बाहेरून नोटराइज्ड प्रतिज्ञापत्र करून घे. बँक १८ वर्षाची FD देत नाही म्हणून असा शेरा घेतला आहे, त्यावर मी सही शिक्का देतो.

मग मी तसे करून ती FDघेऊन कोर्टात (नांदेडला) गेलो आणि त्यानंतर परत ६ महिन्यानंतर जाऊन ऑर्डर घेतली.( नशीबाने ह्यावेळी मुलगी बायको असे लाटांबर न्यायाची गरज पडली नाही )तुम्हाला वाटेल झालं सगळ, गंगेत घोडं न्हालं एकदाचं, पण नाही आता तिचा जन्म दाखला! तो काढायचा आणि बाप म्हणून माझे नाव लावायला पाहिजे ना! म्हणून गेलो नांदेड महानगर पालिकेत तर , तर नांदेड महानगर पालिका म्हणते तिचा जन्म दाखला कांचन राठोड ह्या नावाने आधीच बनला आहे. (काय असते, हे अनाथाश्रमवाले मुलांची काही नावं ठेवून त्यांचे दाखले आधीच काढून ठेवतात. त्यांचा दोष नाही.) मग पुन्हा निरनिराळी कागदपत्र, ना हरकत दाखले, नांदेडच्या तहसीलदाराचे न हरकत प्रमाणपत्र, आता ते आणि कशाकरता लागते ?असले प्रश्न विचारायचे नाहीत (नायब तहसील दाराने तर आम्ही खरेच मुलगी दत्तक घेतली आहे का ते सुद्धा विचारले नाही.फक्त कोर्ट ओर्डर बघितली आणि त्याची एक प्रत आणि ेआमचा अर्ज ठेऊन घेतला पण ४ खेट्या आणि ५ दिवस लावले ) अन इतर असले सगळे सोपस्कार केले. त्याकरता नांदेडला ७-८ दिवस राहिलो. मे महिन्याच्या चांदण्यात फिरलो आणि ते काम पूर्ण केले. सगळे सोपस्कार होऊन तो जन्मदाखला हातात घेतला तर त्या जन्ममृत्यु नोंदणी कार्यालयातली बाई म्हणते कशी, घ्या “झालं सगळ तुमच काम. आता नीट काळजी घ्या मुलीची?” जसं काही ह्या बाईनेच सरकारी कार्यालयात खेट्या घालून चपलेच्या टाचा झिजवल्या होत्या. एरवी मी चिडलो असतो. काहीतरी खारट तुरट बोललो असतो. पण मी इतक्या कष्टानंतर मिळालेलं ते मिहिकांचं birth certificate डोळे भरून बघण्यातच गुंगलो होतो.

जाता जाता आणखी एक असच जाणवलं म्हणून, कोर्टात भिंतीवर दिशा लिहितात. तिथे उत्तरच्या ऐवजी डोंगराकडे, पूर्वेच्या ऐवजी रानाकडे, पश्चिमच्या ऐवजी नदीकडे आणि दक्षिणच्या ऐवजी समुद्राकडे असे लिहिल होतं. म्हणजे नांदेडच्या कोर्टात लिहिलं होतं. बाकीच्या ठिकाणचं माहिती नाही. त्याऐवजी तुरुंगाकडे, फाशीघराकडे, अंदमानकडे, असे काहीतरी लिहायला हवं होतं नाही का ?
मूल दत्तक घेणे हा एक मूर्खपणा खरंतर नाही. पण तयारी नसताना मूल दत्तक घेणे हा ठार मूर्खपणा आहे. म्हणजे समुद्रात पोहायला जाणे हा मूर्खपणा नाही पण पोहायला येत नसताना पोहायला जाणे हा नक्कीच मूर्खपणा आहे.

आमच्या आयुष्यात मिहिका आल्यापासून ती आमची जैविक (कसला भंगार शब्द आहे हा – biological child जरा तरी बरं आहे.) मुलगी नाही हे जणू विसरूनच गेलो आहोत. म्हणजे पहिल्या रात्री, सासुबाईंनी जुन्या साडीची झोळी करून त्यात तिला झोपव म्हणून सांगितले, तसे आम्ही तिला झोळीत घातले तेव्हा तिने रडून हलकल्लोळ केला होता. शेवटी तिला झोळीतून काढून दोघांच्या मध्ये घेतले तेव्हा ती तिच्या नव्या आईच्या कुशीत शिरून एकदम शांतपणे झोपली, जणू जन्मल्यापासून ती आईच्या कुशीतच झोपत आली आहे. त्यानंतर आजतागायत ती आईच्या कुशीतच झोपत आली आहे. आता ६ वर्षांची झालीये, वेगळा बेड, वेगळी खोली केली, तरी रात्री कधीतरी झोपेत उठून माझ्या किंवा आईच्या कुशीत शिरते, बरं वाटतं!

तिची आई वसू तिच्याशी कधीमधी बोलताना, तु शिकव मला आता तुला ९ महिने पोटात वाढवलय…वगैरे बोलुन जाते, तेव्हा मला जरा तिला जमिनीवर आणावं लागतं.
----आदित्य

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

'मूल दत्तक घेणे' ह्या एकेकाळी सहजशक्य गोष्टीसाठी तुम्ही काय काय अनुभवांमधून गेलात ह्याचा वृत्तान्त - आणि तोहि खुसखुशीत शैलीत लिहिलेला - वाचतांना मनोरंजन झाले.

’एकेकाळी सहजशक्य’ हे अशासाठी लिहिले की The Hindu Adoptions And Maintenance Act, 1956 अस्तित्वामध्ये येण्यापूर्वी हिंदु धर्मशास्त्रामध्ये घातलेल्या सीमांमध्ये राहून कोणासहि मूल दत्तक घेणे सोपे होते. झाशीच्या राणीचा दत्तक मुलगा दामोदर, टिळकांच्या चरित्रातील ताईमहाराज प्रकरणातील दत्तक पुत्र अशी अनेक ऐतिहासिक प्रकरणे माहीत आहेत. (टिळकांना ताईमहाराज प्रकरणात बराच मनस्ताप सहन करावा लागला. १८९७ साली ताईमहाराजांना दत्तक दिला त्यातून सुरू झालेले हे प्रकरण जवळजवळ टिळकांच्या १९२० मधील मृत्यूपर्यंत चालून होते. टिळकांच्या सुदैवाने त्यांच्या मृत्यूच्या काहीच दिवस आधी ह्या प्रकरणावर अखेरचा पडदा पडून टिळकांविरुद्धचे सर्व वहीम दूर झाले.)

हिंदु शास्त्रानुसार घ्यायच्या दत्तकाला शासनाची मंजुरी कोठेच लागत नसे म्हणून हे सोपे होते. अर्थात धर्मशास्त्रांमध्ये दत्तकाविषयी नियम-उपनियम-संमति-असंमतीवे
स्वतन्त्र जंजाळ होतेच. त्याची पूर्ण चर्चा म.म.काणेलिखित ’History of Dharmashastra, V.III, Ch. XXVIII' येथे पाहण्यास मिळते.

हिंदु धर्मानुसार पितृऋण फेडण्यासाठी आणि पितरांना श्राद्धदिनी पिंड मिळण्यासाठी वंश चालू ठेवणे हे प्रत्येकावर बंधनकारक होते आणि म्हणून दत्तक घेण्यास पात्र असणार्‍या कोणालाही दत्तक जाण्यास पात्र असलेल्या मुलाला दत्तक घेता येई. (काही ग्रन्थांनुसार कन्येचेहि दत्तकविधान करता येई.) हिंदु धर्मशास्त्राचे असे सर्व नियम The Hindu Adoptions And Maintenance Act च्या कलम ४ खाली रद्द झाले.

तरीहि कोणा हुशार वकिलाने ह्या कायद्यामुळे माझ्या हिंदु धर्म पाळण्याच्या मूलभूत हक्कावर गदा येत आहे असा दावा मांडला तर काय मजा येईल असा विचार करतो आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता खूप सोपे आणि पारदर्शक झाले आहे म्हणतात , हे सगळे आता CARAच्या मार्फत होते ....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आदित्य

दत्तक घ्यायला "सरकारची परवानगी" हा शब्दप्रयोग खोडसाळ आहे एवढे बोलून मी खाली बसतो. कोल्हटकर यांनी तो वापरावा हे आश्चर्यकारक आहे.

अवांतर: वैसे तो सरकारची परवानगी लागणे हा प्रकार लॉर्ड किमान डलहौसीच्या काळात रूढ होता १९५५/५६ पासून नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

पुन: माझा प्रतिसाद तपासून पाहा अशी विनन्ती मी चाचांना करतो. मी कोठेच 'सरकारची परवानगी' असे म्हटलेले नाही. Doctrine of Lapse अनुसार डलहौसीच्या काळापर्यंत अशी परवानगी लागत असे हे मी जाणतो.

मी वापरलेले शब्द 'दत्तकाला शासनाची मंजुरी' असे आहेत. धागाकर्त्याने जो अनुभव वर्णिला आहे त्याच्या वर्णनाला दुसरे कोणते समर्पक शब्द तुम्ही सुचवाल? न्यायाधीशाकडून मंजुरी म्हणजे शासनाची मंजुरीच नाही काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(१) कारा कडून जे मिळते ते "ना हरकत प्रमाणपत्र".
(२) न्यायाधीशाकडून मिळते ती अपॉईंटमेंट ॲज ॲडॉप्टिव्ह पॅरेंट. "I appoint", "I declare", "I order" असे शब्दप्रयोग असतात त्या कोर्टाच्या ऑर्डर मधे.
(३) या दोन्ही मधे अप्रूव्हल किंवा परवानगी/पर्मिशन हा शब्द कुठे ही नसतो.

थँक गॉड - सरकारची परवानगी किंवा अप्रूवल नाही. Otherwise I would have thought that the Govt has arrogated itself to that position.

या प्रक्रियेत सरकारच्या अनेक कृत्या अशा आहेत की असं वाटावं की सरकार हे बाळ दत्तक घेण्याची परवानगी व अप्रूवल देत आहे. .... पण .....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Now govt has appropriated the tasks involved in adoption through CARA. Earlier CARA only gave a kind of NOC to give the child in adoption. Parents used to apply to an agency/orphanage of their choice/vicinity, They could suggest a child to the parents, parents would say OK and take the child after the court approval.

Now parents apply to CARA. CARA suggests them a child from anywhere in India (out of their countrywide database), parents go to that place to see the child and approve it. It is no more left to the adoption agencies/ orphanages.

Central control you see .......

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

Central control you see .......

हो. कारा चा फुलफॉर्म च "सेंट्रल" या शब्दापासून सुरु होतो. चाईल्ड वेल्फेअर कमीटी ही जुव्हेनाईल जस्टीस ॲक्ट २००० च्या केंद्रसरकारच्या कायद्या अन्वये निर्मिलेल्या आहेत. केंद्रसरकार (कारा) ना हरकत प्रमाणपत्र देतं. ऑपरेटिंग व ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रक्रियेची नियमावली सुद्धा कारा ची असते.

अंतिम निर्णय ज्युडिशियरी कडून मिळतो. व ज्युडिशियरी चे सुद्धा स्वत:चे नियम आहेत. उदा. इन्व्हेस्टमेंट रिक्वायरमेंट. हे एवढेच काहीसे विकेंद्रीकरण.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टाटा मोटर्स, ते काय आहे?

लोल... लोललो हे वाचुन

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सर्वप्रथम मुलीला आणि तुम्हालाही शुभेच्छा. या एवढ्या दिव्यातून जाऊन मूल दत्तक घेणं ही अजिबात सोपी गोष्ट वाटत नाही. ज्यांना खरोखरच मूल हवंय तेच लोक या प्रक्रियेतून जातील; असं म्हणावं तर तुमच्यासारख्यांना निष्कारण त्याचा त्रास. त्यामुळे जे लोक खरोखर मूल दत्तक घेऊन व्यवस्थित वाढवतील, त्यांनाही 'नकोच ते' वाटण्याची शक्यता अधिक!

जैविक मुलगी, हे थेट भाषांतर वाटतं; त्यामुळे तुम्हाला तो शब्द आवडला नाही हे योग्यच आहे. पोटची मुलगी हा शब्द अधिक मराठी आहे.

(आणि एक सूचना, दोन परिच्छेदांमध्ये एक रिकामी ओळ ठेवली तर डोळ्यांना ते सुखद वाटतं. तसं वाचण्याची, खरं तर बघण्याची सवय असते.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ज्यांना खरोखरच मूल हवंय तेच लोक या प्रक्रियेतून जातील

सहमत.

प्रक्रिया कठोर करण्यामागे हा च हेतू असावा असं म्हणायला जागा आहे. The criteria is so stringent that one has to submit more than 20 different documents, get the documents notarized, and then apostilled (had never heard this word before) before the no-objection certification can be issued. Documents include - birth, marriage, education, employment record and salary details (employer's letter confirming salary details), mortgage, family details, criminal history, property documents, income tax filings, Complete medical assessment report, 3 references, Inspection report on the home (whether the home has fire extinguisher, smoke alarm or not) where the kid will live post adoption, 3 independent assessments of the adoptive parents by a certified social worker etc etc.
.
Apostille म्हंजे नोटरी हा नोटरायझेशन करतानाच्या वेळी वैध होता याचे सर्टिफिकेट.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कुणास ठाऊक? पण आमचे काम बघणारा जो स्वयंसेवक होता राठोड म्हणून त्याने सांगितले कि इतके सगळे कडक नियम करून देखील साधारण ५०% लोक दत्तक घेतलेले मुल संस्थेकडे परत करतात. ह्यामागे अनेक करणेही असतात नवरा किंवा बायको मरणे, घरच्यांचा पराकोटीचा विरोध ( आधी त्याना विश्वासात घेतलेले नसते आणि नंतर त्यांचा विरोध सहन करायची हिम्मत नसते)नंतर स्वत:चे मुल होणे त्यामुळे दत्तक मुल नकोसे वाटणे किंवा सरळ सांगतात म्हणे कि नाही झेपत आता ,आधी वाटलं जमेल म्हणून पण नाही झेपत ... मग काय करणार ?दंड वगैरे करतात , ती FD असते ती मुलाच्याच नावाने असते ती संस्था ताब्यात घेते हा व्यवहार झाला पण त्या मुलावर कारण नसताना दुसर्यांदा अनाथ व्हायची वेळ येते ...माझ्या कामाच्या ठिकाणी असलेला एक माझा माजी सहकारी त्याने आमचे पाहून एक मुल दत्तक घेतले अगदी जिथून आम्ही घेतले त्याच संस्थेतून , नवरा बायकोला मुल होत नव्हते तसा म्हणे त्यांच्या पैकी कुणात मेडिकल प्रोब्लेम काही नव्हता पण कर्मधर्म संयोगाने त्यानी दीडवर्षाचा मुलगा दत्तक घेतल्यानंतर त्याच्या बायकोला ही दिवस गेले आणि हा शहाणा मला म्हणाला कि दोन मुलं मला झेपायची नाहीत तर हे एक परत करतो. काय प्रोसेस असते? ( जसे काय आम्ही हे असलेच धंदे करत फिरतो गावभर ) पण त्याच्या बायकोने त्याला घरी झापडला असावा कारण पुढे काही तो गेला नाही आणि आता आज ते चार जणांचे कुटुंब सुखी आहे , कारण नसताना मला मात्र घरी वगैरे बोलावण त्याने कमी केलय ( लाज वाटत असावी )...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आदित्य

50 % returns is a bit too much. My wife worked in an agency for 12 years. The agency is about 40 yrs old. They have only two cases of returns out of may be 250 adoptions.

The home study is very important. Social worker should talk to extended family (even though the couple may be staying separately) as well as neighbours. Secondly the age of adoptive parents is likely to cause the problem. Many couples adopt the child too late (close to their fifties) and adopt a very young child. Bringing up a 2 yr old child is tough for 50 yr old parents. They simply don't have the energy. The woman is close to or past her menopause. That makes it difficult for her who takes major share of upbringing the child.

Causes like family not accepting the child are indicative of lack of due diligence on the part of the agency.

Still even 10% returns should be considered high.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

May be , I wrote what that Social Worker told me, he might be exaggerating...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आदित्य

तो आकडा कितीही कमी का असेना, कोणत्याही मुलावर पालकांनी सोडून देण्याची वेळ येणं वाईटच. पण त्यासाठी होऊ घातलेल्या पालकांना अशा मद्दड आणि कोरड्या प्रक्रियेतून जावं लागणं, हेही वाईटच.

तुम्ही न्यायाधीशाबद्दल जे लिहिलेलं आहेत, त्याबद्दल आता विनोदानं लिहीत आहात. पण तो किती कोरडा-व्यवहारीपणा आहे! १८ वर्षांची FD न्यायालयानं मागणं, बँकेकडे तशी सोयच नसणं, दोन सरकारी संस्थांचा परस्परांशी काहीही संबंध नसणं आणि त्याचा त्रास होऊ घातलेल्या प्रेमळ पालकांना होणं, हा सगळा प्रकार संतापजनक आहे.

यापेक्षा परिस्थितीचा विचार करून, तज्ज्ञांनी ही प्रक्रिया पुनरेकवार तयार करणं अधिक उपयुक्त ठरेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

त्या प्रक्रियेला बायपास करणाऱ्या पद्धती अस्तित्वात आल्या आहेत ज्या बेकायदेशीर आहेत.

गब्बरसिंग म्हणतात ते योग्य आहे. (अनेक) पालकांची अशी समजूत असते की आपण बालक दत्तक घेत आहोत म्हणाजे त्या बालकावर आणि समाजावर उपकार करत आहोत. "आम्ही उपकार करतोय तर सरकार आम्हालाच पिडतं आहे" अशी भावना असते. ही भावना चुकीची आहे. ड्यू डिलिजन्स करणे हे सरकारचे कामच आहे.

दुसरी बाब ही आहे की दत्तक घेण्यास इच्छुक पालकांची संख्या वाढली आहे (आणि बायपास पद्धती* वापरल्या जात आहेत) त्यामुळे संस्थांकडील अनाथ बालकांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळेही मूल मिळण्यास विलंब होतो.

*मागे इथल्याच एका धाग्यावर कुसुम मनोहर लेले पद्धतीचा उल्लेख केला होता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

ड्यू डिलिजन्सला विरोध नाहीच. पण १८ वर्षांची FD मागणं, मात्र तशी व्यवस्था बँकेकडेच नसणं; पोलिसांचे रेकॉर्ड एकाच राज्यात दोन शहरांमध्ये हस्तांतरित होऊ न शकणं; किंवा होऊ घातलेल्या आईला मंगळसूत्र घालायला लावणं; हे प्रकार तापदायकच आहेत. पालकांची चौकशी, त्यांच्यासाठी स्वतंत्र साक्षीदार/मैत्र मागणं वगैरेंबद्दल तक्रार नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

भारतापुरतंच बोलायचं तर बालके वॉर्ड ऑफ द स्टेट बनण्यामागची जी कारणे सांगितली जातात ती ही - (१) गरीबी, (२) अविवाहित माता. ही दोन प्रमुख कारणे आहेत. इतर कारणे असतातच पण ही दोन प्रबल.

दत्तक घेण्यासंबंधीत जो काही गव्हर्नन्स आहे त्यामागे ह्युमन ट्रॅफिकिंग रोखणे हा एक उद्देश असतो.

आणि या प्रक्रियेमागचे आणखी एक तत्व असेही आहे की - preventing potential adoptive parents from thinking that they are shopping for a baby.

प्रक्रिया विस्तृत, व्यापक, क्लिष्ट, लांबलचक करण्याने (म्हंजे २० पेक्षा जास्त कागदपत्रं जमा करायला लावण्यानं) नेमकं काय साध्य होतं ? तर अनौपचारिकरित्या च बोलायचं तर ---- ॲडॉप्टिव्ह पॅरेंट्स नी आयुष्यात काही भानगडी केलेल्या असतील तर त्या कुठेनाकुठे तरी समोर याव्यात हा विचार असतो - असं मला एका जाणकार व्यक्तीने सांगितलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नांदेडसोडून इतर ठिकाणी प्रक्रिया कमी त्रासाची असते का हे पाहायला हवे. ओळखीच्यात/ नात्यांत तीन उदाहरणे दत्तकाची आहेत पण हा विषय टाळतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुंम्हा तिघांनाही खूप अानंद मिळो, ही शुभेच्छा. तुंम्हा दोघांच्या चिकाटीला दाद द्यायला हवी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0