इन्ट्रो: ऐसीवरचं हे पहिलंच गद्य लिखाण. मुळात मुम्बईकर असल्याने मराठीची जागोजाग विटंबना दिसून येते. तशात इन्टर्नेट. त्यावर स्माईलीची ठिगळं लावून फॉरवर्डले जाणारे भयानक म्यासेज. मजा अशी की हे संकेतस्थळ सापडलंय, ज्यात सातत्याने फक्त आणि फक्त शुद्धच लेखन केलं जातं. ह्यातली फोनेटिक टंकलेखन पद्धत झकासच आहे. आयाम अॅडिक्टेड टू धिस वेबसाईट्ट.
मुद्दा: मध्यंतरी आन्तरजालावर एका गृहस्थांशी संपर्क झालेला. (ह्या पिकल्या पानाचा देठ बराच पिवळा आहे.) तर, ह्यांची टूम अशी, की उगीच र्हस्व-दीर्घ च्या भानगडीत न पडता सरसकट सगळे उकार-ईकार र्हस्व घोषीत करावेत. ह्यासाठी ते आंतरजालावर भन्नाट प्रचारही करतात.
ह्याकारणाने, (म्हणे)
१. मराठीचं अधिककाळ संवर्धन होईल
२. टाईपसेट तयार करणे, छपाई इत्यादींमध्ये बराच वेळ आणि पैसा वाचेल
३. मराठी शिकायला/शिकवायला सोपी होईल
४. अमराठी लोकांनाही ब्यानर, अॅड वगैरेमध्ये दणादण मराठीत छपाई करून बरेच कार्यभाग साध्य होतील.
५. मुळात त्या र्हस्व-दीर्घमागे काही लॉजिक नाहीये, आणि असलंच तरी ते कालातीत नाही. (स्याडली, मुंबईतल्या जागोजागच्या भुमीपुजन सोहळ्याची सुचना वाचून मला ह्या सगळ्यात भयानक तथ्य वाटतंय.)
ह्यावर माझं मत जरी नकारात्मक असलं, तरी मुंबईत राहून प्रचण्ड जडवादी आणि ऑब्जेक्टीव्ह झालेल्या माझ्या मनास, हे मुद्दे अंशतः पटल्याशिवाय राहिलेले नाहीत. ह्यावर तार्किक चर्चा अपेक्षीत आहे. काळाची दिशा हीच आहे का? असेल तर अती अँटॅगॉनिस्ट राहून कोणाचंच भलं झालेलं नाहीये, हेही आलंच. त्याचबरोबर, स्वातंत्र्य आणि स्वैराचार ह्यात अत्यंत पुसट अशी रेषा असते, हेही आमच्या दहावीला मराठी शिकवणार्या बाईंचं वाक्य लक्षात आहे.